अजूनकाही
कोणे एके काळी नरेंद्र नावाचा राजा होऊन गेला. त्याने भल्या मोठ्या साम्राज्यावर राज्य केले. हिंदूंसाठी धार्मिकदृष्ट्या सर्वांत पवित्र समजले जाणारे मंदिरही याच राज्यात होते. या राज्याचा पालनकर्ता म्हणून त्याची प्रजा त्याला देवासमान मानत असे. तथापि, समृद्ध वंशपरंपरेचा वारसा मिळूनही तो असमाधानी होता. त्याच्यापूर्वी सिंहासनावर आरूढ झालेले व त्यानंतर सिंहासनावर आरूढ होऊ शकणाऱ्यापेक्षा आपण स्वत:चे वेगळे स्थान निर्माण करावे अशी त्याची इच्छा होती. तर अशा या आपल्या अहंकारी राजाने स्वतःसाठी आणि प्रजेसाठी एक नवीन राजधानी निर्माण केली आणि तिला नाव दिले ‘नरेंद्रनगर’!
मी सांगितलेली ही कथा काही मिथक किंवा प्राचीन नाही. ती एक सत्यकथा आहे. वर उल्लेख केलेली ही घटना अगदी काही शतकापूर्वी घडली. राजा नरेंद्र शाह हा तेहरी गढ़वाल राज्याचा राजा होता. त्यांच्या कुटुंबाच्या अधिपत्याखाली बद्रीनाथ मंदिर होते. स्वतःचे नाव दिलेल्या या नव्या राजधानीला त्याने १९१९ मध्ये पूर्ण केले.
मी लहानपणी गढवालच्या पायथ्याशी असलेल्या नरेंद्रनगरला ब-याचदा गेलो. अहमदाबादच्या एका बड्या क्रिकेट स्टेडियमचे नाव ‘नरेंद्र मोदी’ ठेवले गेले, त्या वेळी या कथेच्या उगमाच्या मूळ आठवणी जाग्या झाल्या. या नावाच्या निवडीशी संबंधित संपूर्ण तपशील कदाचित कधीही सार्वजनिक केला जाणार नाही. एका इंग्रजी वृत्तपत्राने “नरेंद्र मोदी रीनेम्स स्टेडियम आफ्टर हिमसेल्फ” या शीर्षकाने बातमी प्रकाशित केली. ही कल्पना बहुदा भारतीय क्रिकेट प्रशासनाशी कौटुंबिक हितसंबंध जोडल्या गेलेल्या त्या गुजराती राजकारण्याची आहे. या माध्यमातून त्याने आपल्या ‘बॉसला’ खुश करणे आणि आपल्या चिरंजीवाच्या नावाने होत असलेल्या टीकेला शांत करणे हे दोन्हीही साधले असावे. तथापि, विद्यमान पंतप्रधानांनी असे स्टेडियमला स्वतःचे नाव देण्यासाठी प्रोत्साहित करणे किंवा त्यासाठी मान्यता देणे किंवा पुढाकार घेणे, ही एक प्रकारची व्यूहरचना आहे.
..................................................................................................................................................................
हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
नावात बदल करणे हे आश्चर्यकारक आहे. ट्विटरवाल्यांनी त्वरित लक्षातही आणून दिले की, ही कृती ‘अडोल्फ हिटलरच्या कृतीशी जुळणारी आहे, ज्याने १९३०च्या दशकात स्टूटगार्ट येथे फुटबॉल स्टेडियमला स्वतःचे नाव देण्यास अनुमती दिली होती. या वृत्ताबाबत ‘द वायर’च्या लेखकाने अधिक सविस्तर माहिती मिळवली असता असे दिसून आले की, हिटलरचे सहकारी हुकूमशहा बेनिटो मुसोलिनी, सद्दाम हुसेन आणि किम इल-सुंग हे सत्तेत असताना त्यांनीही स्वतःची नावे स्टेडियमला दिली.
सर्वच राजकारण्यांना स्वतःबद्दल मोठेपणाचा भाव असतो आणि हे राजकारणात अपेक्षितही असते. खरे तर प्रजासत्ताकातील राजकारण्यांनी लोकशाही प्रक्रियेचे महत्त्व समजून घेतले पाहिजे आणि त्यांच्याकडे असलेल्या पदापेक्षा त्यांनी स्वतःला कधीही मोठे होऊ देता कामा नये. एखादा राजा स्वत:ला त्याच्या साम्राज्याएवढा समजू शकतो, परंतु लोकशाही पद्धतीने निवडलेल्या पंतप्रधान किंवा राष्ट्रपतींनी मात्र स्वत: ला त्या देशाचा पर्याय समजू नये. ही दु:खद बाब आहे की, जगातील सर्वांत प्राचीन प्रजासत्ताकच्या नेत्यांनी हा धडा कधीही घेतला नाही.
अमेरिकन इतिहासकार आर्थर स्लेसिंगर ज्युनियर यांनी आपल्या देशातील ज्या नेत्यांनी लोकशाही प्रतिनिधी म्हणून कमी आणि ‘राजा’ म्हणून जास्त राज्यकारभार केला, त्या राजकारण्यांसाठी ‘एम्पिरिअल प्रेसिडेन्सी’ हा शब्द वापरला.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
आपल्या देशाच्या प्रजासत्ताकाच्या इतिहासात ‘तीन अहंकारी पंतप्रधान’ आहेत. ते म्हणजे जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि नरेंद्र मोदी. या सर्वांची उंची त्यांच्या पक्ष आणि सरकारमधील त्यांच्या सहकाऱ्यांपेक्षा मोठी होती. नेहरू आणि इंदिरा दोघांनाही ते पंतप्रधानपदी कार्यरत असताना देशातील सर्वोच्च भारतरत्नने सन्मानित करण्यात आले. मोदीची व्यूहरचना अशी तर नसेल?
सरदार पटेल क्रिकेट स्टेडियमला नरेंद्र मोदींचे नाव देण्याच्या या सोहळ्यास राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, याचे आश्चर्य वाटले. २०२२ किंवा २०२३ मध्ये कोविंद यांच्या हस्ते मोदींना भारतरत्न जाहीर करण्याची ही नांदी तर नाही ना!
अशी शक्यता मला दोन कारणांमुळे वाटत नाही. पहिले, मोदींनी आपल्या पूर्वपदस्थापासून स्वतःला पद्धतशीरपणे दूर ठेवले आहे आणि या बाबतीतही ते तसेच करतील. दुसरे म्हणजे, स्वत:बद्दल त्याच्या प्रचंड महत्त्वाकांक्षा आहेत. मोदी यापेक्षाही अधिक नेत्रदीपक काही करतील. भव्य आणि खर्चिक स्मारके उभारून ते भारताच्या राजधानीला नवीन रूप व आकार देतील.
वाचकांच्या हे लक्षात येईल की, जून २०१४ मध्ये पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदींनी लोकसभेत असे म्हटले होते की, १२०० वर्षांच्या गुलामीला (बारा सौ साल की गुलामी) बदलवण्याचे आपले ध्येय आहे. तेव्हा एका तरुण लेखकाने मला सांगितले होते की, मोदीचे वक्तव्य आणि त्यांच्या भाषणातून त्यांच्या राजकीय आणि वैयक्तिक महत्त्वाकांक्षा उजागर होतात.
मोदीना वाटते की, हिंदू लोकांना बराच काळ परदेशी लोकांनी गुलाम केले वा त्यांच्यावर त्यांनी राज्य केले. मात्र आता हिंदूना त्यांचा हरवलेला आत्मसन्मान आणि प्रतिष्ठा परत मिळवून देण्यासाठी त्यांचा उदय झाला आहे. माझ्या मित्राने मला सांगितले की, अशा प्रकारे मोदी हे सुचवत होते की, ते पहिले हिंदू राज्यकर्ता आहेत, ज्यांनी देशाला संघटीत केले. आपले सर्व पराक्रम आणि त्यांच्याशी संबंधित लोककथा असूनही शिवाजी राजे आणि पृथ्वीराज चौहाण हे उपखंडातील एका छोट्या भागावर नियंत्रण ठेवू शकले. प्रादेशिक किंवा राजकीय संदर्भात ते (बौद्ध) अशोक किंवा (मुस्लिम) मुघल किंवा (ख्रिश्चन) ब्रिटिशासारखे थोडेही यशस्वी झाले नाहीत. जे कार्य करण्यात शिवाजी राजे आणि पृथ्वीराज चौहान अपयशी ठरले, ते अखेर पंतप्रधान मोदी यांनी केले. ते हिंदूंच्या झालेल्या नुकसानीची भरपाई करतील.
आपले महत्त्व आणि वर्चस्व सिद्ध करणे, तसेच सार्वभौमत्वाला मान्यता मिळवण्यासाठी राजे नेहमी नव्या राजधानीची उभारणी करतात. नरेंद्र शाह यांनी गढवालमध्ये आपली नवीन राजधानी उभारली, तेव्हा त्यांनी भारत आणि परदेशातील अनेक राजांचे अनुकरण केले. वास्तवात नरेंद्र शाह यांनी नरेंद्रनगर स्थापण्याच्या निर्णयाच्या काही वर्षांपूर्वी इंग्लंडचा राजा जॉर्ज पंचम यांनी अशी घोषणा केली की, ब्रिटिश भारताला नव्या राजधानीची आवश्यकता आहे. यापुढे कलकत्ता येथून सरकार चालणार नाही. अशा प्रकारे, दिल्लीच्या जुन्या शहराच्या दक्षिणेकडील खेड्यांमधून ताब्यात घेतलेल्या जमीनीवर ब्रिटिश साम्राज्यवाद्यांनी स्वतःच्या उन्नतीची भावना घेऊन भव्य शहर वसवले.
ब्रिटिश साम्राज्याने आपली राजधानी हलवण्याअगोदर तीन शतकापूर्वी मोगल साम्राज्यानेही असेच केले होते. बाबरपासून सुरू झालेल्या या राजवंशाचा पाचवा शासक शाहजहानने त्याच्या साम्राज्याची राजधानी आग्रा येथून दिल्लीला हलवली. त्याने अनेक भव्य इमारतींच्या बांधकामांवर स्वत: देखरेख ठेवली, त्यापैकी बऱ्याच इमारती आजही दिमाखात उभ्या आहेत. जेव्हा सर्व काही सुव्यवस्थित झाले, तेव्हा त्याने त्या नगराला आपले नाव दिले. त्याला ‘शाहजहानबाद’ असे म्हणतात.
लेखक अभिषेक कैकर यांनी १७व्या आणि १८व्या शतकातील दिल्लीच्या इतिहासाची नोंद ‘द किंग एंड द पीपल’ या ग्रंथात नोंदवली आहे. ते लिहितात ‘सर्व मुघल सम्राटापेक्षा शहाजहान आपले सार्वभौमत्व हे वैभवशाली वास्तुकलेच्या माध्यमातून प्रदर्शित करायचा. स्वतः जनतेसमोर जात असताना एखाद्या देवदूताप्रमाणे आपण प्रगट व्हावे, यासाठी तो खूप परिश्रम घ्यायचा. सकाळच्या प्रहरी जेव्हा हा सम्राट आपल्या राजवाड्यातील खिडकीच्या नक्षीदार कमानीखाली यायचा, त्या वेळी सूर्यकिरणांमुळे प्रभामंडलाने त्याची प्रतिमा व्यापली जायची, तेव्हा तो अधिकच खुलून दिसायचा.
शहाजहानप्रमाणेच नरेंद्र मोदी हेसुद्धा त्यांच्या पोशाखावर आणि वैयक्तिक राहणीमानावर विलक्षण लक्ष देतात. त्यांचा पोशाख, त्यांची ढब, ज्या पार्श्वभूमीवर त्यांचे छायाचित्र काढली जातात, त्याकडे फार बारकाईने लक्ष दिले जाते. शहाजहानपेक्षा मोदी हे फारच नशीबवान आहेत, असे म्हणावे लागेल कारण शाहजहान या मध्ययुगीन राजाला असा जादूमय परिणाम साधण्यासाठी स्वतःला प्रत्यक्ष सामोरे जावे लागत असे, जिथे मोदी हे आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर रेडिओ, टीव्ही, वर्तमानपत्रे, वेबसाईट, व्हाट्सअप, इन्स्टाग्राम आदी. समाजमाध्यमांचा वापर करून ते जनतेपर्यत पोहोचतात.
पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांची वागणूक अहंकारयुक्त आहे, ज्यात राजकीय मित्रपक्ष आणि राजकीय प्रतिस्पर्ध्यांविषयीचे त्यांचे वर्तन, सार्वजनिकरीत्या त्यांनी केलेले स्वत:चे सादरीकरण, संसदेतील वादविवादाचा तिरस्कार आणि पत्रकार परिषद घेण्यास नकार यातून तो दिसून येतो. एकविसाव्या शतकात 'मन की बात' हा कार्यक्रम ‘मोगल फतवा’ असल्यासारखा वाटतो. राजकीय सत्तेच्या केंद्राची वास्तू बदलून स्वत:ला संस्मरणीय ठेवण्याची त्याची इच्छा आहे. अहमदाबादमधील क्रिकेट स्टेडियम किंवा भारतरत्नद्वारे हे शक्य होणार नाही.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
ब्रिटिश आणि मुघल राजवटीवर कडक टीका करूनही दिल्लीत ब्रिटिश आणि मोगलांनी जे काही केले, त्याच्याशी साजेसा असा आपला कायमस्वरूपी वारसा नरेंद्र मोदींना निर्माण करायचा आहे, ही गंमतीदार गोष्ट आहे. मोदींना असे वाटते की, तीनशे-चारशे वर्षानंतर, हिंदू राष्ट्रातील लोक त्यांनी निर्माण केलेल्या भव्य वास्तू मोठ्या अभिमानाने तर त्यांच्या पूर्व सम्राटांनी निर्माण केलेल्या वास्तू उपहासाने पाहतील. ही त्यांची अपेक्षा पूर्ण होण्याची शक्यता नाही.
कारण ज्या निर्मात्याची (आर्किटेक्टची) त्यांनी निवड केली आहे, ज्यांना त्यांच्याबद्दल आणि त्याच्या पूर्वीच्या निर्माणाबद्दल माहिती आहे, त्यांना असे वाटत नाही की, या नवीन प्रयोगातून कोणतीही इमारत दुरूनही लाल किल्ला किंवा जामा मशिद, नॉर्थ वा साउथ ब्लॉक एवढी सुंदर असेल.
शेवटची गोष्ट, नवी दिल्लीला नवा चेहरा देण्यासाठी तयार केलेल्या योजनेला ‘सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्ट’ असे म्हणतात. एकदा नवीन स्मारक इमारतींसह तयार झाल्यावर या वसाहतीच्या नावाच्या जागी निश्चितपणे एक आत्मनिर्भर नाव असेल. 'नरेंद्रनगर', ते तर शतकांपूर्वीच त्या डोंगराळ राज्याच्या राजाने स्वतःच्या नावाने केले आहे. कदाचित ते नरेंद्र महानगर? की 'मोदीबाद'? असे असू शकेल!
..................................................................................................................................................................
हा मूळ इंग्रजी लेख स्क्रोल या संकेतस्थळावर २८ फेब्रुवारी २०२१ रोजी प्रकाशित झाला आहे. मूळ लेखासाठी पहा -
..................................................................................................................................................................
लेखक रामचंद्र गुहा इतिहासकार व आहेत. त्यांचे इंडिया आफ्टर गांधी, 'गांधी : द इयर्स टू चेंज द वर्ल्ड' यासह अनेक पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत.
अनुवादक : प्रा. प्रियदर्शन भवरे आणि प्रा.विलास भुतेकर हे बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय, जालना येथे अध्यापन करतात.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment