‘पंगतीतलं पान’ : ग्रामीण भागातल्या नातेसंबंधांतील गुंतागुंत आणि मानवी वर्तनातील विविधांगी रूपे समर्थपणे उकलणारी कादंबरी
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
शंकर विभुते
  • ‘पंगतीतलं पान’ आणि ‘हिंदू’ या कादंबऱ्यांची मुखपृष्ठे
  • Fri , 19 March 2021
  • ग्रंथनामा शिफारस भालचंद्र नेमाडे Bhalchandra Nemade हिंदू Hindu अविनाश कोल्हे Avinash Kolhe पंगतीतलं पान Pangtitala Paan

मानवी जीवन तर्कसंगत वर्तनाच्या चौकटीत बसवणे अतिशय कठीण आहे. विज्ञानाच्या नियमानुसार मानवी वर्तनाचा निष्कर्ष लावता येत नाही. माणसाचा स्वभाव संचारीभावाप्रमाणे क्षणोक्षणी बदलत असतो. मनातील ही गुंतागुंत शब्दांत पकडणे तर अतिशय कठीण आहे. विज्ञान व सामाजिक शास्त्रे मानवी वर्तनाचा अभ्यास करतात, पण मानवी मनातील भावनांचे विविध कंगोरे त्यात सापडणे दुर्मीळ असते. ही गुंतागुंत फक्त ललितसाहित्यातूनच व्यक्त होऊ शकते. म्हणूनच ललितसाहित्य ललितेत्तर साहित्याच्या तुलनेत वेगळे ठरते. कथा, कविता, कादंबरी, नाटक इत्यादी ललितसाहित्यात मानवी भावनांच्या वर्तनाचा शोध घेण्याचे सातत्याने प्रयत्न होत आहेत. अर्थात त्याकरता लेखकाजवळ सूक्ष्म निरीक्षणशक्ती, संवेदनशील मन, सभोवताली पाहण्याची व्यापक दृष्टी व लेखनाची शैली या बाबी असाव्या लागतात.

एखाद्या कादंबरीचे कथानक त्या परिसराची कहाणी सांगत असले तरी ती त्या प्रदेशापुरती सीमित न राहता मानवी मनातील विविध भावनांचे प्रतिनिधित्व करत असते. या अर्थानं अविनाश कोल्हे यांच्या ‘पंगतीतीलं पान’ या कादंबरीकडे पाहायला हवं. पत्रकार, वक्ते व अभ्यासक म्हणून परिचित असलेल्या कोल्हे यांनी या कादंबरीच्या रूपानं साहित्यिक म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे.

मुंबईच्या मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊसने ज्येष्ठ कादंबरीकार व ज्ञानपीठ पुरस्कार विजेते डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्या ‘हिंदू’ या कादंबरीतील कोणताही एक धागा घेऊन स्वतंत्ररीत्या कादंबरी लेखनाकरता एक स्पर्धा आयोजित केली होती. ‘पंगतीतीलं पान’ त्या कसोटीला उतरली. ही प्रथम पारितोषिक विजेती साहित्यकृती असली तरी ‘हिंदू’चा आणि या कादंबरीतील आशयाचा काही संबंध नाही. ही एक स्वतंत्र कलाकृती आहे.

..................................................................................................................................................................

हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

विदर्भातील फुलगाव या खेड्यातील गुलाब समाधानराव धांडे पाटील यांची ही कहाणी आहे. हाच या कादंबरीचा नायक. त्याच्याविषयी कादंबरीच्या पहिल्या प्रकरणात अशी माहिती येते - ‘निपुत्रिक काशाकाकाचा मानलेला मुलगा म्हणजे गुलाब धांडे पाटील. राहणार : फुलगाव, तालुका मलकापूर, जिल्हा बुलढाणा.” (पृ.४) त्यांच्या काकाची इच्छा गुलाबला दत्तक घेण्याची असली तरी गुलाबच्या आई-वडिलांनी नकार दिला. तसं गुलाबला साहेबराव नावाचा मोठा भाऊ असून त्याला एक मुलगा (आदेश), एक मुलगी (संगिता) आहे. पण खेड्यातील परंपरागत मानसिकता इथं दिसून येते. घरची परिस्थिती उत्तम, पाटील असल्याने गावात मानसन्मान, सोबतच मोठ्या शहरांमध्ये घेत असलेलं शिक्षण, यामुळे नायकाला फारसं संकटांना सामोरं जावं लागत नाही. पण तो फक्त चैनी, विलासी वृत्तीचा नाही, तर देशातील प्रश्नांची त्याला उकल करावीशी वाटते. ‘अनेक महापुरुषांनी जीवापाड मेहनत घेऊनही हजारो वर्षांपासून आपल्या देशात जात कशी टिकून आहे? एखाद्या वेळेस आपणास धर्म बदलता येईल पण जात का बदलता येत नाही. चिवटपणे जात टिकून राहण्याचे मूळ कशात आहे?’ हा नायकाच्या संशोधनाचा, चिंतनाचा, जिव्हाळ्याचा विषय. त्यासाठी तो पुणे, मुंबई, दिल्ली, हाँगकाँग इथं जातो, शोधनिबंध वाचतो. पण दुर्दैवानं त्याचा हा प्रकल्प पूर्ण होत नाही. त्यामुळे भरपूर हुंडा घेऊन जातीतील मुलीशी लग्न करण्याचा त्याचा निर्णय त्याच्या चिंतनाला दुटप्पी ठरवतो.

जात अजूनही टिकून का आहे, या प्रश्नाचं उत्तर ही कादंबरी देत नसली तरी (तसं कोणत्याही ललित कलाकृतीकडून समाजातील गंभीर प्रश्नांची उत्तरं मिळण्याची अपेक्षा ठेवणंच मुळात चुकीचं आहे. तिने वाचकाला विचार करायला भाग पाडलं पाहिजे. आणि हे या कादंबरीनं साध्य केलं आहे.) ग्रामीण समाजातील नात्यातील वीण, गुंतागुंत किती घट्ट आहे, याची प्रचिती ही कादंबरी वाचताना वेळोवेळी येते. सासरवाडीचा पाठिंबा कोणत्या कामी उपयोगी येतो, हे शहरात जन्मलेल्या व्यक्तीला कळत नाही. उदा. गुलाबचे मित्र म्हणतात, “असं बगं. आज हा सायब्या एवढ्या गमजा कशापायी कराया लागला? त्याले सासरंच बॅकिंग हाय म्हणूनच नं? मंग? तू बी असंच कर. इकडची पोरगी केली म्हणजी तुया सासरची सारी ताकद तुया मांगं उबी राहीन. मंग काई सायब्या वावरातल्या मालाले हात लावू शकनार नाई.” (पृ.९८)

हा अनुभव महाराष्ट्रातील कोणत्याही खेड्यापाड्यातील शेतकऱ्यांच्या पोरांना लागू होण्यासारखा आहे. सासरवाडीचा हा पाठिंबा इतका जालीम उपाय आहे की, शहरात शिकलेल्या व काही प्रमाणात पुरोगामी विचार बाळगणाऱ्या गुलाबचीही त्यातून सुटका होत नाही. हे ग्रामीण भागातील वास्तव लेखकानं अचूकपणे पकडलं आहे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

या कादंबरीचा आवाका मुख्यतः ग्रामीण असला तरी शिक्षणाच्या व संशोधनाच्या निमित्तानं नायक शहरातील जीवनमान, लोकांच्या प्रवृत्तीची बारकाईनं नोंद घेतो. विद्यापीठातील व्याख्याते विशेषतः प्रा. महापात्रा सर, बक्षी सर यांचे विचार नायकाच्या मनावर खोल परिणाम करतात. त्याच्यासोबत संशोधन करणारी व त्याला आवडणारी सुलक्षणा म्हणते, “गुलाब मला माहीत आहे की, मी तुला फार आवडते. मलासुद्धा तू फार आवडतोस. पण प्लीज, मी कदाचित कधीच लग्न करणार नाही. तू उगीच इन्व्हॉल्व होत जाशील व नंतर यातून बाहेर पडताना फार त्रास होईल...” (पृ.१००) शहरी संस्कृतीत वाढलेल्या सुलक्षणाला लग्नापेक्षा करिअर, संशोधन महत्त्वाचं वाटतं. पुरुषासोबत मैत्री करणं, त्याच्यासोबत रात्री झोपणं यात तिला काही वावगं वाटत नाही. थोडक्यात लेखकानं एकाच वेळी खेडे आणि शहरातील जीवनमान टिपण्याचा प्रयत्न केला आहे.

या कादंबरीचं एक बलस्थान तिच्या भाषाशैलीत दडलेलं आहे. ही कादंबरी वाचताना पुरुषोत्तम बोरकर यांच्या ‘मेड इन इंडिया’ या कादंबरीची आठवण येते. वऱ्हाडी बोलीभाषेतील शब्द पानोपानी आढळतात. उदा. म्हेरी, येळ, याड, भौ, होवो, तुया, तुले, हुभी, मरन, उनी उनी, बुडा-बुडीचा, शैरात, तुमाले, हाय, पन, येऊन राहिलो, जाऊन राहिलो... हे शब्द जसे येतात तसे प्रसंगानुरूप हिंदी व इंग्रजी वाक्यांनी गोडी निर्माण केली आहे. “गुल गया, गुलशन गई, गई होठोंकी लाली, छोड दे पपिताका पिछा, वो होनेवाली है लायसन्सवाली” (पृ.१४१) सारखे शेर, “ओव्हरचा शेवटचा बॉल. सर्वत्र ताण. गुलाबने पवित्रा घेतला. बॉल मिडल व ऑफ स्टंपवर होता” (पृ.११७)सारखी क्रिकेटची भाषा आणि यासोबतच म्हणी, वाक्प्रचार, पत्र यांमुळे ही कादंबरी वाचनीय झाली आहे.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

कोल्हे यांनी वैचारिक लेखन भरपूर केलेलं असलं तरी ललितलेखक म्हणून ही त्यांची पहिलीच कादंबरी. त्यामुळे पहिलेपणाच्या काही खुणा जाणवतात. उदा. नायक गुलाब एकदा सकाळी साडेअकरा वाजता घरी झोपतो, तेव्हा त्याला एक स्वप्न पडतं. (पृ.६४) सकाळी साडेअकरा वाजता झोपणं व स्वप्न पडणं हे एक वेळेस समजून घेता शकतं, पण या स्वप्नातील सुसंगत घटनाक्रम व व्यवस्थित शेवट कृत्रिम वाटतो. तसंच नायक ‘जात कशी टिकून राहिली’ यासारख्या गंभीर विषयावर चिंतन करतो, पण त्याचं वागणं नीतीमूल्याला धरून नसल्याचं स्पष्ट दिसून येतं. दारू पिणं, सतत सिगारेट ओढणं, अनेक मुलींशी शारिरीक संबंध ठेवणं, हुंडा पद्धतीचं समर्थन करणं, स्वत: हुंडा घेणं, जातीतील मुलीशी लग्न जुळवणं यांसारख्या कृती त्याच्या गंभीर चिंतनाला मातीमोल करतात.

वरवर पुरोगामी वाटणारा हा नायक परंपरागत चालीरितीला विरोध करत नाही, कोणताच धाडसी निर्णय घेत नाही. कधी कधी तर त्याची विधानं वादग्रस्तही आहेत. उदा. ‘जात माणसाला जन्मतःच एक आयडेंटिटी देते, तसेच त्याला एक व्यवसायसुद्धा देते’ (पृ.५८), ‘आपण हुंड्याकडे मुलीच्या वडिलांच्या संपत्तीतला हक्क म्हणून बघितले तर चित्र बदलते’ (पृ.५९), ‘बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतरजातीय विवाहाविषयीच्या विचारांचा पराभव झाला’ (पृ२४) इत्यादी. थोडक्यात हा नायक महापुरुषांच्या विचारांतली चूक सांगतो, पण आपल्या वागण्यातून ती दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न करत नाही.

‘पंगतीतलं पान’ ही कोल्हे यांची पहिलीच कादंबरी असूनही काही मर्यादा वगळता ती अनेक बाबतीत यशस्वी ठरली आहे. ग्रामीण भागातल्या नातेसंबंधांतील गुंतागुंत आणि मानवी वर्तनातील विविधांगी रूपं उकलण्यात ती कमालीची उजवी ठरली आहे.

..................................................................................................................................................................

लेखक शंकर विभुते नांदेडमधील यशवंत महाविद्यालयाच्या मराठी विभागात प्राध्यापक आहेत.

shankarnvibhute@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......

म. फुले-आंबेडकरी साहित्याकडे मी ‘समाज-संस्कृतीचे प्रबोधन’ म्हणून पाहतो. ते समजून घेण्यासाठी ‘फुले-आंबेडकरी वाङ्मयकोश’ उपयुक्त ठरणार आहे, यात शंका नाही

‘आंबेडकरवादी साहित्य’ हे तळागाळातील समाजाचे साहित्य आहे. तळागाळातील समाजाचे साहित्य हे अस्मितेचे साहित्य असते. अस्मिता ही प्रथमतः व्यक्त होत असते ती नावातून. प्रथमतः नावातून त्या समाजाचा ‘स्वाभिमान’ व्यक्त झाला पाहिजे. पण तळागाळातील दलित, शोषित व वंचित समाजाला स्वाभिमान व्यक्त करणारे नावदेखील धारण करता येत नाही. नव्हे, ते करू दिले जात नाही. जगभरातील सामाजिक गुलामगिरीत खितपत पडलेल्या समाजघटकांचा हाच अनुभव आहे.......

माझ्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवलेला हा सीमारेषाविहिन कवी तुमच्याही हृदयात घरोबा करो. माझ्याइतकंच तुमचंही भावविश्व तो समृद्ध करो

आताचा काळ भारत-पाकिस्तानातल्या अधिकारशाही वृत्तीच्या राज्यकर्त्यांनी डोकं वर काढण्याचा आहे. अशा या काळात, देशोदेशींच्या सीमारेषा पुसून टाकण्याची क्षमता असलेल्या वैश्विक कवितांचा धनी ठरलेल्या फ़ैज़चं चरित्र प्रकाशित व्हावं, ही घटना अनेक अर्थांनी प्रतीकात्मकही आहे. कधी नव्हे ती फ़ैज़सारख्या कवींची या घटकेला खरी गरज आहे, असं भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतल्या विवेकवादी मंडळींना वाटणंही स्वाभाविक आहे.......