अजूनकाही
पत्रकार सुचिता देशपांडे यांचे ‘काळोखातील प्रकाशरेषा’ हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. ही गोष्ट आहे, अध्यापनाच्या एका अफलातून प्रयोगाची. कलात्मक स्वातंत्र्याची, क्रौर्याने पुरत्या कोलमडून गेलेल्या कोवळ्या जिवांमध्ये, जीवनेच्छा जागवण्याची! नाझींनी चित्रकला, गाणं, नाटक या गोष्टींना फावल्या वेळेतील मनोरंजन मानलं, त्यामुळे छळछावणीत या गोष्टी शिकवण्याची अखेर परवानगी मिळाली. अनन्वित अत्याचार होत असतानाही, अभ्यासक्रम नावीन्यपूर्ण पद्धतीने शिकवण्याची चालून आलेली ही एक अनोखी संधी होती आणि यातून जन्माला येत होता एक नावीन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोग! या पुस्तकाला ज्येष्ठ लेखक व शिक्षण अभ्यासक हेरंब कुलकर्णी यांनी लिहिलेली ही प्रस्तावना…
..................................................................................................................................................................
हिटलरच्या १२ वर्षांच्या काळ्याकुट्ट राजवटीने ६० लाख ज्यूंची कत्तल केली. मानवी इतिहासातील या अमानुष क्रौर्याचे तपशील युद्धसमाप्तीनंतर हळूहळू जगासमोर येत गेले आणि इतक्या क्रूर पद्धतीने, इतक्या कमी कालावधीत झालेला हा भयावह वंशविच्छेद पाहून मानवजात अस्वस्थ झाली. छळछावणीत मरणप्राय यातना भोगल्यानंतरही जिवंत राहिलेल्या व्यक्तींनी सांगितलेल्या कहाण्या आणि बळी गेलेल्यांच्या नोंदी, साहित्य, कलाकृती यांतून या विनाशाची तीव्रता जगाला कळली.
जगभरातील अनेक ठिकाणी होलोकॉस्ट म्युझियम्सना जो कुणी या भेट देतो, तो प्रत्येक जण, त्या वेळेस ज्यू समुदायाने भोगलेल्या वेदना पाहून, भविष्यात अशा प्रकारच्या कोणत्याही फॅसिझमला बळ न मिळो, याची करुणा भाकतो. अशा प्रकारच्या निर्धारासाठीच या विनाशकारी संहाराचे जागरण होणे अत्यंत गरजेचे आहे. सुचिता देशपांडे यांनी लिहिलेले ‘काळोखातील प्रकाशरेषा’ हे पुस्तक म्हणूनच खूप महत्वाचे आहे.
साहित्य, कला, चित्रपट, नाट्य, चित्र या सर्वच माध्यमांनी नाझी भस्मासुराची ही कहाणी वेगवेगळ्या पद्धतीने कथन केली. ‘शिंडलर्स लिस्ट’ या चित्रपटाने, ‘डायरी ऑफ अॅन फ्रँक’ या पुस्तकाने ही वेदना जगभर पोहोचवली. ‘लाइफ इज ब्युटिफुल’ या नितांतसुंदर चित्रपटात वडील आपल्या लहानग्या मुलापर्यंत या संहाराची तीव्रता पोहोचू नये, म्हणून किती प्रयत्न करतात, ते दाखवले आहे. याच भावनेने एक संवेदनशील शिक्षिका छळछावणीतील शेकडो विद्यार्थ्यांना जगण्याचे बळ कसे पुरवते, याचे हृदयस्पर्शी चित्रण या पुस्तकात आले आहे.
..................................................................................................................................................................
हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
मराठीत ‘नाझी भस्मासुराचा उदयास्त’ आणि त्यानंतर प्रकाशित झालेल्या अनेक पुस्तकांमधून तसेच भाषांतरित कहाण्यांमधून नाझी अत्याचारांची कहाणी वाचकांपर्यंत पोहोचलेली आहेच. जेव्हा फॅसिस्ट विचार सर्वसामान्यांना आकर्षित करू पाहतो, तेव्हा या संहाराविरोधी जागरण तितक्याच तीव्रतेने पुन:पुन्हा करणे आवश्यक ठरते. सुचिता देशपांडे यांचे हे पुस्तक याच मालिकेतील आहे.
हे पुस्तक शिक्षकांसाठी आणि शिक्षण क्षेत्रासाठी प्रेरक आहे. कला हे माध्यम जीवनाच्या कोणत्याही टप्प्यावर किती प्रभावी व महत्त्वाचे ठरू शकते, हे या पुस्तकाने अधोरेखित केले आहे. त्याच वेळी फॅसिझमविरोधी विचार बुलंद करण्यासाठीही या पुस्तकाचे मोल अधिक आहे. या छोटेखानी पुस्तकाने एकाच वेळी या तीन भूमिका बजावल्या आहेत.
दु:ख बघून वाल्मिकींना महाकाव्य सुचले आणि छळछावणीत वेदना व दु:ख सहन करणाऱ्या लहान मुलांनी आपल्या वेदना चित्र रेखाटून व्यक्त केल्या. या लहानग्यांची चित्रे पाहून ‘जगात वेदना जितकी सुंदर बोलते, तितके सुख बोलत नाही,’ या पु. ल. देशपांडे यांच्या विधानाची प्रचीती येते.
शिक्षक असणे ही एक पूर्ण वेळाची मनस्थिती असते. ती जनजीवन शांत असताना सक्रिय असते तसेच मृत्यूची गडद छाया पडलेल्या छळछावणीतसुद्धा तितकीच तीव्रतर असते, हे या होलोकॉस्टसंबंधित कहाणीतून लक्षात येते. अवघे ५० किलो वजनाचे सामान सोबत घ्यायची परवानगी असताना, अनेक वस्तूंचा मोह टाळून, तिथे लहान मुले असतील हे लक्षात घेत, त्यांच्यासाठी चित्रकलेचे साहित्य, पुस्तके सोबत घेऊन छळछावणीत निघालेली फ्रीडल अंतःकरणाच्या तळापासून शिक्षक आहे. छळछावणीत शिकवायला बंदी होती, फक्त मनोरंजनाला तिथे परवानगी असल्याने तिने मुलांना मनोरंजनाच्या माध्यमातून शिक्षण दिले आणि मग ही लहान मुले कलेच्या माध्यमातून अभिव्यक्त झाली. त्यांच्या दुःखाला कलेद्वारे वाट मिळाली. ही वाट कधी कवितेची आहे, तर कधी चित्रांची होती. या सर्व प्रक्रियेत फ्रीडल या विद्यार्थ्यांसोबत असते. त्या विद्यार्थ्यांना जणू छळछावणीत आपल्या लहानशा जगण्याचा अर्थ सापडला आणि जगण्याचा जो दिवस उपलब्ध आहे, तो कलेच्या माध्यमातून स्वतःला अभिव्यक्त करण्यासाठी मुलांनी उपयोगात आणला. कला हे माध्यम मृत्यूच्या टोकावर उभे असणाऱ्यांचे मनोबल वाढवण्याकरता किती महत्त्वाचे आहे, हे पटवून देणारे ‘काळोखातील प्रकाशरेषा’ पुस्तक म्हणूनच वैशिष्ट्यपूर्ण आहे.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
हे पुस्तक वाचताना कलेकडे जीवनाची अभिव्यक्ती म्हणून बघण्याचा दृष्टिकोन कला शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात विकसित होणे का आवश्यक आहे, हे आपल्या लक्षात येते. कला ही एक थेरपी आहे, कलेद्वारे आपल्या भावना, वेदना, दुःख यांचे विश्लेषण करता येऊ शकते तसेच कला आत्मसंवादाचे किती प्रभावी माध्यम आहे, हे या मुलांच्या चित्रांमधून स्पष्टपणे जाणवते. उपाशीपोटी असणारी मुलं अन्नपदार्थांची, कुटुंबासमवेत घेतल्या जाणाऱ्या जेवणाची चित्रं तन्मयतेने काढतात, हे वाचताना गलबलून येते. त्या मुलांचे एकटेपण त्यांनी रेखाटलेल्या चित्रांमधून प्रभावीपणे व्यक्त झाले आहे. लहान मुलांच्या मनातील दबलेल्या भावना, दुःख, वेदना यांना वाट करून देण्यासाठी चित्रकलेसह इतर कलांचा उपयोग शिक्षकांनी करणे का महत्त्वाचे आहे, हे या पुस्तकातील कलाविषयक लेखनातून लक्षात येते. त्यासाठी लेखिकेने अनेक क्षेत्रांमधील तपशील आवर्जून उद्धृत केले आहेत.
या पुस्तकाच्या निमित्ताने फ्रीडलने सहजतेने दिलेले हे शिक्षण एक स्वतंत्र शिक्षणपद्धती असू शकते का, याचीही चर्चा व्हायला हवी. शिक्षणात मुले व मुलांची अभिव्यक्ती महत्वाची असते, मूल ज्ञानाची निर्मिती स्वत:च करत असते आणि शिक्षक केवळ मदतनीस असू शकतो, या आज विकसित झालेल्या रचनावाद सिद्धांताची बीजे यांत दडलेली आहेत. कलाशिक्षण हे केवळ कलावंत निर्मितीसाठी नसते, तर स्वत:ची ओळख करून घेण्यासाठीही महत्त्वाचे असते. त्यामुळे रसग्रहणाची क्षमता आणि निरीक्षण क्षमता विकसित व्हायला मदत होते. भोवतालच्या प्रतिकूल परिस्थितीला तोंड देण्याकरता कलाशिक्षण कसे उपयुक्त ठरते, याचेही भान फ्रीडलच्या या अभिनव शिक्षणपद्धतीतून येते.
फ्रीडलच्या या शैक्षणिक प्रयोगाचा आणखी एक पैलू म्हणजे यात शिक्षक किंवा अभ्यासक्रम मुलावर प्रभाव गाजवत नाही. इथे जे कृष्णमूर्ती यांची आठवण होते. ‘शिक्षकाने आपला आदर्श किंवा प्रभाव मुलांवर लादायचा नाही, अन्यथा मुलाच्या मनात न्यूनगंड निर्माण होतो’, असे ते स्पष्टपणे बजावतात. चित्र ही एक संवादाची स्वतंत्र भाषा असू शकते, संकटात सहकार्यभावनेने कसे जगावे व त्यासाठी कला-नाट्य हे माध्यम परस्परांना जोडणारे कसे ठरू शकते या गोष्टीही फ्रीडलच्या या अभिनव शिक्षणप्रयोगाने सिद्ध झाल्या आहेत. तुम्ही सकारात्मकतेने जीवनाकडे बघायला हवे, असे जणू फ्रीडलमधील शिक्षिका केवळ त्या विद्यार्थ्यांनाच नव्हे, तर वाचकांनाही बजावते. सातत्याने त्या विद्यार्थ्यांना सौंदर्यदृष्टी देणाऱ्या फ्रीडलने मृत्यूच्या छायेतही तुम्ही किती आनंदाने, कलात्मकतेने जगू शकता हे आपल्याला दाखवून दिले आहे.
या पुस्तकातून व्यक्त झालेले शिक्षिकेचे समर्पण वाचणाऱ्याला थक्क करणारे आहे. स्वतःच्या कुटुंबाची झालेली वाताहत, मृत्यूच्या दिशेने तिचा सुरू असलेला प्रवास... ही सर्व स्थिती एखाद्याचा जगण्यावरचा विश्वास डळमळीत करणारी असली तरीही, फ्रीडलमधील शिक्षिका अखेरच्या क्षणापर्यंत जिवंत राहते. तिच्या जगण्यातील उत्कटता आपल्याला पार हलवून टाकते.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
नाझी भस्मासुराचा अंत होऊनही जग द्वेषाच्या आणि सुडाच्या चक्रातून आजही मुक्त झालेले नाही. जगभरातील काही देशांमधील हिंसाचार, हुकूमशाही विचारसरणी व द्वेषाचे राजकारण लक्षात घेता, आजही आपण ज्यूंच्या वंशविच्छेदातून काहीच शिकलो नाही, असे वाटण्याजोगी परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर हे पुस्तक महत्त्वाचे ठरते. कोणत्याही आपत्तीचे बळी महिला आणि लहान मुले अधिक ठरतात, हेही या पुस्तकातून प्रकर्षाने जाणवते. ही जाणीवजागृती करणारे पुस्तक मराठीत लिहून सुचिता देशपांडे यांनी खूप महत्वाचे काम केले आहे.
शिक्षक समुदायासमोर आदर्श नाहीत व हा समूह परिवर्तनाच्या लढाईत मोलाची भूमिका घेत नाही, अशी तक्रार सतत केली जाते. अशा पार्श्वभूमीवर फ्रीडलसारखी शिक्षिका आपल्यासमोर दीपस्तंभासारखी उभी आहे. मृत्युच्या छायेतही ती तिचा शिक्षकधर्म निभावते व गॅसचेंबरच्या दिशेने रवाना होईपर्यंत लहान लेकरांना धीर देत असते. जगभरातील कोणत्याही शिक्षकाला प्रेरणा देणाऱ्या फ्रीडल डिकर ब्रॅण्डाइस यांचा मराठी शिक्षणसमूहाला या पुस्तकाद्वारे सुचिता देशपांडे यांनी करून दिलेला परिचय लक्ष वेधणारा आहे. पोलंडमधील जनुस कोरचॅक या अनाथ मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या बालमानसशास्त्रज्ञाच्या सर्व विद्यार्थ्यांना गॅसचेंबरमध्ये पाठवताना, त्याला मात्र जिवंत राहण्याची सवलत नाझींनी देऊ केली होती; पण ‘माझी मुले मारणार असाल, तर मग मलाही जिवंत राहायचे नाही’, असे म्हणत त्याने मुलांच्या अगोदर मृत्यू पत्करला. या शिक्षकानंतर, ‘काळोखातील प्रकाशरेषा’ या पुस्तकाद्वारे फ्रीडलच्या रूपात आणखी एक प्रेरणादायी उदाहरण शिक्षक समुदायासमोर आले आहे. मराठी शिक्षणविश्वात, कलाविश्वात आणि विचारविश्वात महत्वाचे ठरावे असेच हे पुस्तक आहे.
‘काळोखातील प्रकाशरेषा’ - सुचिता देशपांडे,
अभिधा प्रकाशन, मुंबई
मूल्य – ३०० रुपये.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment