अजूनकाही
एक साक्षर वाचक म्हणून शारदा देशमुख यांचं ‘चिरेबंदी कळा’ वाचलं. यातल्या बहुतांश नायिकांचं दु:ख हे घरंदाज, खानदानी दु:ख आहे. बहिणाई लिहून गेल्यात तसं ते माजघरात कोंडलेलं आहे. ते लिहून शारदाताईंनी त्याला हिमतीनं बैठकीच्या खोलीत आणलंय.
तथाकथित वर्णव्यवस्थेत कथित उच्चवर्णीय असलेल्या स्त्रीलाही ज्ञानव्यवहार करण्याचा अधिकार सुरुवातीला नव्हता. मग तिनंही तो झगडून मिळवला. लक्ष्मीबाई टिळक, विभावरी शिरुरकर अशा स्त्रिया लिहित्या झाल्या. पुढच्या पिढीसाठी त्यांनी वाट सोपी केली.
वर्णाच्या उतरंडीत पार तळाशी राहत आली ती दलित स्त्री. दलित आणि स्त्री असं दुहेरी पिचलेपण घेऊन जगताना त्यांच्या वाट्याला आलेला भोगवटा भयंकरच होता, अजूनही आहे. दलित म्हणून जन्माला आलेली ही स्त्री कमालीच्या धारदार शब्दांत व्यक्त झाली. आजही व्हायलीच. कुमुद पावडे, उर्मिला पवार, बेबीताई कांबळे, मल्लिका अमर शेख, प्रज्ञा दया पवार यांना ऐकता वाचताना हे जाणवत राहतं. या जुन्या-नव्या लेखिकांच्या ताकदीच्या अभिव्यक्तीनं जातीय वा वर्गीय या कुठल्याही अर्थानं तळागाळातल्या असलेल्या बाईला व्यक्त व्हायला, तिच्या विद्रोहाला एक अनुकूल ‘जमीन’ निश्चित मिळवून दिली.
या उतरंडीत अध्येमध्ये असलेली बाई मात्र अशी हातचं काही न राखता लिहिती झालीय असं दिसत नाही. तिची कोंडी फुटत नाही. मराठा समाजातल्या स्त्रीबाबत बोलायचं तर ताराबाई शिंदे यांच्या ‘स्त्री-पुरुष तुलना’ या सशक्त वैचारिक मांडणीनंतर मधला एवढा मोठा काळ बहुतांशी कोराच राहिलाय. भारदस्त गढ्याच्या पायथ्याला कुणाकुणाला पुरलं, काळोख्या माजघरात काय काय घडून गेलं, माडीवरच्या खोलीनं काय काय सहन केलं, ते मांडायची कुवत अनेक जणी ठेवून असतीलही. पण ते घडाघडा बोलायची हिंमत एकवटता आली नसेल. आता मराठा मूक मोर्चाच्या निमित्तानं बाहेर पडलेल्या स्त्रीनं त्यामुळेच बोलतं आणि लिहितं होण्याचीही गरज आहे.
कोपर्डीतली शाळकरी मुलगी कुण्या दुसऱ्या जातीतल्या नराधमाच्या अत्याचाराला बळी पडली. पण आंतरजातीय विवाह केला म्हणून जन्मदात्या बापाच्या हातून मारली गेलेली साताऱ्याची आशा शिंदेही मराठाच होती. तिचं काय करायचं? या स्वजातीतल्या क्रौर्याकडं कसं पाहायचं? उंबऱ्याआतल्या हिंसेचं उत्तर कसं शोधायचं?
शारदाताईंच्या ‘अवांछीत’ कथेतली वेणू, ‘अस्तित्व’मधली पार्वती या जातीअंतर्गत कौटुंबिक हिंसाचाराशी डोळा भिडवायला लावते. परिकथेतल्या राजाचे प्राण पोपटात असतात तसं खानदानाची इज्जत बाईच्या कथित चारित्र्यात असते, ही समजूत पुरुषाला अमानवी बनवते. खोटी प्रतिष्ठा जपत मुलीला विष प्यायला भाग पाडणारा बाप आणि हतबल झालेल्या कुटुंबातल्या इतर स्त्रिया यांची सत्यकथा ‘अवांछीत’मध्ये आहे.
कथांमधली कोण स्त्री का दु:खी आहे, हे शोधताना एखाद्या वेळी वाटतं की, स्त्री असणं हेच त्यांच्या दु:खाचं कारण आहे की काय? कारण ती स्त्री विवाहित असूनही सुखी नाही. अविवाहित असतानाही नाही. ती कथितपणे ‘चारित्र्यवान’ असताना सुखी नाही. कथितपणे ‘चारित्र्यहीन’ असतानाही नाही. कुमारी असताना सुरक्षित, मुक्त नाही. आणि तथाकथित वांझ किंवा विधवा असताना तर नाहीच.
शारदाताईंच्या कथांमध्ये विवाहित असण्याचं ‘सौभाग्य’ नायिकांच्या वाट्याला आलंय. पण त्या विवाहानंतर सौभाग्यवती असण्याहून अधिक दुर्भाग्यवती बनल्याचंच जाणवत राहतं.
कथेतल्या बहुतेक स्त्रिया निमुटपणे आपापली ही ‘स्त्री’ असण्याची, ते स्त्रीत्व पारंपरिक निकषांनीच वागवण्याची आयडेंटिटी सहन करतात. त्यालाच नियती आणि नाईलाज मानतात. काहीजणींना आपल्या त्यांच्या सोसण्याचं मूळ उमगलंय. ते त्या बोलूनही दाखवतात. ‘अस्तित्व’ कथेतली जयवंतरावाची पत्नी पार्वती जयवंतरावानं विवाहबाह्य संबंधातून ‘ठेवलेल्या’ बाईला, वत्सलेला म्हणते, ‘तू विकलेली अन मी दान केलेली. फारसा फरक नाही आपल्यात. तुला मला विकणारे आपापल्या जागी मुक्त आहेत. तू आणि मी मालकाच्या दाव्याला बांधून घातलेल्या गायीच. दुसरा मालक वाड्याला देऊन आपणही मुक्त होऊ.’ इथं नायिकेला आपल्या दु:खाचं कूळ आणि मूळ उमगलंय. ही तिला उजेडाच्या वाटेवर घेऊन जाणारी गोष्ट वाटते.
इथली कुटुंबव्यवस्था आणि स्त्रिया यांच्यातला दैनंदिन व्यवहार अशा काही पद्धतीनं होतो की, जन्मल्यापासून ते मरेपर्यंत स्त्री असण्याचा एक गिल्टच या बायांच्या देहमनावर ठळक गोंदवला जातो.
या व्यवस्थेत स्त्रीलाच काय पण पुरुषालाही अनेकदा स्वत:साठी काही निवडण्याचा हक्क नाही. आयुष्याचा जोडीदार तर नाहीच नाही. ‘डंख’ नावाची कथा हेच सांगते. मराठा जातीत जन्मलेल्या एका तरुणाला आंतरजातीय विवाह करण्याचा निर्णय न घेता आल्यानं पुढं होरपळत गेलेली तीन आयुष्य शारदाताई या कथेत रंगवतात. भारतीय विवाहसंस्था, तिचं जातीआधारित अपरिवर्तनीय असणं यावरचं मार्मिक भाष्य कथेदरम्यान येतं. पात्रांच्या तोंडचे संवाद पुरुषाच्याही वृत्तीत भिनलेल्या पितृसत्तेला उजागर करतात. सोबतच बाई जात आणि पितृसत्तेचं वाहन करण्याचं माध्यम कशी बनत आली हेही यातून प्रकटतं.
समाजातलं तुमचं वर्गीय अस्तित्व बदललं तरी जातीचे, खोट्या प्रतिष्ठेचे काच सैल होत नाहीत. राजघराण्यातल्या तरुणीची घुसमट, सोन्याच्या पिंजऱ्यात बंद असण्यातलं सक्तीचं सुख, फसवं स्वातंत्र्य उलगडणारी ‘गुस्ताखी’ नावाची कथाही बोलकी आहे. आजघडीला जन्मानं राजेशाहीचा वारसा सांगणारी आणि परंपरागत राजकीय सत्ता असणाऱ्या महाराष्ट्रातल्या बड्या घराण्यामधल्या स्त्रियांच्या अस्तित्वहीन जगण्याचंच हे प्रतीकात्मक चित्रण आहे असं वाटत राहतं.
शारदा देशमुख यांचं हे लेखन केवळ बाईनं बाईपुरतं केलेलं फेमिनाईन लेखन म्हणून उरतं असं नाही. विविध स्वरूपाची दृश्य-अदृश्य प्रतिकूलता घेऊन जगणारे, घुसमट व्यक्त करायला तडफडणारे अनेक समूह आज भवतालात आहेत. त्यांचं जगणं, त्यांचं भोगणं अद्यापही विस्तारानं समोर आलेलं नाही. ते तसं यावं यासाठीची एक अनुकूल वाटही शारदाताई आपल्या लिहिण्यातून ठळक करत जातात. त्या अर्थाने या कथांचं मोल निश्चित मोठं आहे.
(‘चिरेबंदी कळा’ कथासंग्रहाच्या प्रकाशन समारंभावेळी केलेल्या भाषणाचा अंश.)
चिरेबंदी कळा - डॉ. शारदा देशमुख, साकेत प्रकाशन, औरंगाबाद, पाने - १२८, मूल्य - १५० रुपये.
ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
लेखिका मुक्त पत्रकार आहेत.
sharmishtha.2011@gmail.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Bhagyashree Bhagwat
Thu , 09 February 2017
सोपं, सहज आणि मनाला स्पर्शून जाणारं