अजूनकाही
आजवर मी व्यासपीठावर वावरणं कटाक्षानं टाळत आलो आहे. कोवळ्या वयात एखाद्या व्रतासारखं मी संशोधन आणि ज्ञानसाधन स्वीकारलं आणि त्या साधनेतला आत्मिक आनंद अनुभवत त्याच रसरंगात तल्लिन होणं श्रेयस्कर मानलं.
अनेक गौरवाचे क्षण मला सातत्यानं लाभले आहेत आणि वाचकप्रेमाचा उदंड अनुभव मी घेतला आहे, घेतो आहे. याबाबतीत मी समाधानी आहे. तृप्त आहे. कृतज्ञही आहे. अतृप्ती आहे ती अजून खूप करायचं राहिलं आहे याची. ज्ञानाचा पैस खूप मोठा आहे. संस्कृतीची रहस्यं खूप गूढ आणि गुंतागुंतीची आहेत आणि माणसाचं आयुष्य फार लहान आहे. सामर्थ्य फार मर्यादित आहे.
म्हणून उर्वरित आयुष्यात आणखी काही संकल्पांना अक्षररूप देता आलं तर मला ते हवं आहे. जे करायचं आहे ते अजून खूप आहे. कितीतरी साधनं सापडताहेत, खुणावताहेत, नव्यानं बोलकी होत आहेत. माझ्या अभ्यासक्षेत्रात माझ्या पूर्वसुरींनी जे व्यापक, विविधांगी आणि मूलगामी संशोधनाचं काम केलं आहे, त्याचा वारसा नकळत्या वयात माझ्याकडे आला. साधनांचा शोध घेणं, माहितीचं संकलन करणं, वर्गीकरण आणि व्यवस्थापन करणं या गोष्टी प्राचीन साहित्य आणि संशोधनाच्या क्षेत्रात किती महत्त्वाच्या असतात हे माझ्या पूर्वसुरींकडून मी एकलव्यासाखा शिकलो. आणि मग उपलब्ध माहितीचे दुवे जुळवता जुळवता नवे अन्वयार्थ लक्षात घेत संस्कृतीची पुन्हा अर्थपूर्ण रूपसिद्धी करणं हे काम म्हणजे अमूर्ताला रूप देणाऱ्या प्रतिभावंताचं आहे, कलावंताचंच आहे हेही मला समजत गेलं.
त्या नव्या आकलनाच्या आधारे संशोधनसाधनांचाच विस्तार मी करत गेलो. वेगवेगळ्या ज्ञानशाखांच्या साचेबंद सीमारेषा पुसून ज्ञानाच्या अखंडपणाकडे जात राहिलो. अभिजनांच्या सांस्कृतिक इतिहासाची अनेक कोडी उलगडताना आणि मराठी धर्मजीवनाची गुंतागुंत उकलताना या इतिहासाचं सामाजिक अंग मी कधी दृष्टिआड होऊ दिलं नाही. बहुजनांच्या उत्थानाच्या प्रक्रियेवरचं लक्ष कधी ढळू दिलं नाही.
माझ्या पूर्वसुरींनी – राजवाडे, केतकर, चाफेकर, सारस्वतकार भावे (किती नावं घ्यावी?) यांच्यासारख्यांनी माझ्यातल्या संशोधकाला जाणतं केलं, डोळस केलं, प्रगल्भ केलं. आणि मुळांना रस पुरवला तो माझ्या गावानं, माझ्या बालपणानं.
वयाच्या पाचव्या वर्षापासून तेराव्या वर्षापर्यंत मी माझ्या आजोळच्या मावळमातीत वाढलो. तिथल्या मंदिरात नित्यनिनादत राहिलेल्या टाळ-मृदगांच्या साथीनं रंगणाऱ्या भजनात रंगलो. ज्ञानोबा-तुकोबांच्या आणि त्यांच्या परंपरेतल्या असंख्य संतांच्या ओवी-अभंगाचा अक्षय संस्कार उत्कटतेनं मनात मुरवत राहिलो. संतांचं तत्त्वचिंतन, त्यांचं अनुभवधन आणि दिव्यानुभवांनी उजळलेली त्यांची वाणी, यांचं सामर्थ्य आकळण्याइतकं ते वय नव्हतं, पण माझी माती त्या समर्थ वाणीनं भिजली आहे. चातुर्मासात आजोळघरचं कर्तव्य म्हणून दीड-दोनशे श्रोत्यांसमोर श्रीधरांच्या देवकथांचं आणि महिपतींच्या संतकथांचं जे प्रकट पठण माझ्या मुखातून घडत होतं, त्यामुळे महाराष्ट्राचा देव्हारा माझ्या अंत:करणातच विराजत राहिला आणि मायशारदेच्या कृपाप्रसादानं तो सतत तेजाळतही राहिला.
माझ्या लहानशा खेड्यानं मला निर्धनाला लोकसाहित्य आणि लोकसंस्कृती यांचं अक्षय धन दिलं. गावाकडचं सगळं भौतिक वस्तुजात सोडून कोवळ्या वयात मी पुण्यात आलो, पण कुणी कधी हिरावून घेऊन शकणार नाही अशी श्रीमंती माझ्याजवळ होती. अवघ्या शभंर उंबऱ्यांचं, रूढार्थानं निरक्षर माणसांचं ते गाव. पण संतपरंपरा आणि लोकपरंपरा यांनी जगवलेलं आणि जागवलेलं अक्षरवाङ्मय त्यांच्यामुळे सारस्वताचं वरदान घेऊन माझ्या आयुष्यात अवतरलं. संस्कृताचा गंधही ज्यांनी कधी अनुभवला नाही त्या माझ्या ग्रामीण माणसांनी संस्कृतीचा केवढा तरी मोठा संभार सात्त्विक निष्ठेनं सांभाळला आणि माणुसकीच्या स्पर्शानं माझ्यासारख्या दुर्बळाचं बळ वाढवलं. माझ्या आयुष्यभरच्या लेखनात बहुजनांचा विसर मला कधी पडला नाही आणि स्त्रियांच्या सुख-दु:खांचा स्वर कधी दाबला गेला नाही. तो दु:खद दारिद्रयातही, वेदनेचा वसा घेतलेल्या आयुष्यातही भलेपण सहज सांभाळणाऱ्या माझ्या गावामुळे. माझ्यासाठी माझं आजोळ गाव हे साऱ्या महाराष्ट्राचं ‘मिनिएचर’ होतं, लघुरूप होतं आणि माझी आजी त्या गावाच्या संस्कृतीचं प्रतिनिधित्व करणारी एक जबरदस्त शक्ती होती. स्त्रीची माया, तिचं सोसणं, तिचं खंबीरपण, तिचं शहाणपण, तिची कणव, तिची आयुष्यं उभी करणारी विलक्षण शक्ती या सगळ्याविषयी माझ्या मनात आणि लेखनात जी आदराची, ओढीची आणि समजुतीची भावना उमटत राहिली तिचा उगम माझ्या आजीच्या आयुष्याशी आहे, असं मला आज सारखं वाटतं.
मी पुण्यात आलो आणि माझं प्राथमिक शिक्षण ज्या म्युनिसिपल शाळांमध्ये झालं त्या दोन्ही शाळांतल्या काही शिक्षकांना मी जन्मभर आठवत राहिलो आहे. आधुनिक मराठी कवितेची रसालयं माझ्यासाठी खुली करणारे बारोकर गुरुजी आणि मला मराठी साहित्याची गोडी लावणारे कृष्णराव जाधव गुरुजी यांच्यासारखे काही शिक्षक माझ्या आयुष्यातच वडीलधाऱ्या माणसासारखे आले आणि माझं अनाथ आयुष्य त्यांनी साहित्याच्या सांत्वनानं भरवलं.
पुढे माध्यमिक शाळेतही मी काही शिक्षकांचा तसाच अनुभव घेतला. शाळेबाहेर पडलो आणि पुण्यातल्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अशा कित्येक विद्वानांनी माझ्या आयुष्यात गुरुकुल निर्माण केलं. त्यांचं निर्मत्सर, निरभिमानी आयुष्य जवळून पाहताना सांस्कृतिक मूल्यांचा साक्षात अनुभवच मी घेत गेलो. त्या सर्वांचं स्मरण आज मला होत आहे. या सत्काराच्या निमित्तानं या व्यासपीठावरच ते होतं आहे असं नाही तर नव्या अभ्यासासाठी उरलेली अल्पस्वल्प शक्ती कारणी लागावी म्हणून धडपडत असताना भोवतालच्या पर्यावरणाच्या संदर्भात ते अधिकच सातत्यानं होतं आहे.
माझ्या मनात सारखी हीच भावना दाटून येते आहे की, झपाट्याने दूषित होत चाललेल्या सामाजिक, सांस्कृतिक, वाङ्मयीन पर्यावरणात, अभंग निष्ठेनं शुद्ध ज्ञानोपासनेचा वारसा चालवणारी माणसं आता दुर्मीळ होत चालली आहेत. जवळ तसं भौतिक लाभाचं काहीही नसताना मी माझ्या अक्षय आनंदाचा ठेवा शोधू शकलो तो माझ्या आधी डोंगराएवढं काम करीत राहिलेल्या मोठ्या माणसांच्या आधारानं आणि मोठ्या ग्रंथांच्या आधारानं. त्यांनीच मला मोहांपासून दूर ठेवलं आणि भ्रष्टतेपासून वाचवलं. मला आयुष्यभर रंगणारी साधना दिली. तिनं मला असा एका उद्दिष्टाची ओढ लावली की, त्या ओढीनं, त्या ध्यासानं मला माझ्या छोट्या-मोठ्या लौकिक दु:खांचा, संकटांचा सहज विसर पडावा.
या ओढीचा, या ध्यासाचा वर प्रसाद नव्या पिढीतल्या अभ्यासकांना मिळावा आणि सर्जक शक्तींची कृपा लोकमंगलासाठी नव्या अभ्यासकांवर नित्य असावी, अशी माझी भगवतीच्या चरणी प्रार्थना आहे. माझ्यावर स्नेहाचा आणि आदरभावनेचा वर्षाव करणाऱ्या सगळ्या मराठी रसिकांनाही माझी विनंती आहे की, अशा प्रकट औपचारिक सत्कार प्रसंगातून त्यांनी आता मला दूर असू द्यावं, आणि माझ्यातली उरलीसुरली शक्ती माझ्या कामासाठीच लावण्याची मला मोकळीक द्यावी. साहित्य आणि संस्कृतीच्या अभ्यासक्षेत्रात अजून करणं बाकी आहे असं पुष्कळ काम आहे. मला अजून पुष्कळ हाका ऐकू येत आहेत. या उतरत्या वयात त्यांना जमेल तसा प्रतिसाद देणं माझं कर्तव्य आहे. कारण मी तसं केलं नाही तर ती माझ्या सार्थ जगण्याशीच प्रतारणा ठरेल. तेव्हा मला तुमच्या प्रेमादराच्या बळावरच नवीन काम करण्यासाठी सार्वजनिक सत्कार-समारंभातून मुक्त करा आणि माझं नम्र अभिवादन स्वीकारा, एवढीच विनंती करतो आणि भगवती शारदेनं याला ‘तथास्तू’ म्हणावं अशी उत्कट प्रार्थना करून थांबतो.
(१८ ते २१ जानेवारी २००८ मध्ये सांगली इथं झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये डॉ. रा. चिं. ढेरे यांचा सत्कार करण्यात आला. त्याला ते प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्या वतीने त्यांच्या कन्या व प्रसिद्ध लेखिका अरुणा ढेरे यांनी पुरस्कार स्वीकारला. त्यावेळी त्यांना डॉ. ढेरे यांचं भाषणही वाचून दाखवलं. त्याचं हे शब्दांकन.)
डॉ. ढेरे यांची पुस्तके खरेदी करण्यासाठी क्लिक करा.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
pramod bapat
Sat , 14 January 2017
संतुलित .. तरीही सोयीसाठी नसलेलं अर्थसुंदर भाषण. सुजनांचा आणि सुजाणांचाही विवेक अशा शब्दांनी जागा राहतो. ढेरेअण्णांचे असंच एक भाषण लख्ख स्मरणात आहे. त्यांना महाराष्ट्र शासनाचा पहिला 'ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार' मुंबईत रवींद्र नाट्यमंदिरात प्रदान करण्यात आला. तेव्हा त्यांनी सन्मान स्वीकारानंतर केलेले भाषण खूपच मोलाचे आहे. तेही मिळवून इथे प्रकाशित केल्यास नित्य जागृतीची वीणा झंकारत राहील.
pramod bapat
Sat , 14 January 2017
संतुलित .. तरीही सोयीसाठी नसलेलं अर्थसुंदर भाषण. सुजनांचा आणि सुजाणांचाही विवेक अशा शब्दांनी जागा राहतो. ढेरेअण्णांचे असंच एक भाषण लख्ख स्मरणात आहे. त्यांना महाराष्ट्र शासनाचा पहिला 'ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार' मुंबईत रवींद्र नाट्यमंदिरात प्रदान करण्यात आला. तेव्हा त्यांनी सन्मान स्वीकारानंतर केलेले भाषण खूपच मोलाचे आहे. तेही मिळवून इथे प्रकाशित केल्यास नित्य जागृतीची वीणा झंकारत राहील.
Vivek Jadhavar
Tue , 22 November 2016
अतिशय उत्तम !
anagha londhe
Sat , 29 October 2016
Read Aksharnama just now I fully agree with the views like fallacy of understanding..... Samajnyacha attaahaas sodnyaachi bhoomika... Floats sodun gahirepanaat sawatahala zokun dene.... First couple of views I have experienced personally. The last one is something i can't express about so early. Sagunaakadun nirgunaakde nenaara pravaas sopa nakkich naahi.. That's why people are not ready to come out of moorthi pooja easily.... I liked the way you are narrating this very much important subject... Thanks for sharing ,sir..
Sandeep
Mon , 24 October 2016
Nice
Yash Kadam
Sun , 23 October 2016
mala classical music aikayla nakki awadel!