अजूनकाही
‘राजहंस प्रकाशन’ आणि ‘अक्षरनामा’ यांच्या संयुक्त विद्यमाने कादंबरीकार अभिराम भडकमकर यांच्या ‘इन्शाअल्लाह’ या बहुचर्चित कादंबरीवर १ ते २८ फेब्रुवारी दरम्यान घेण्यात आलेल्या ‘परीक्षण स्पर्धे’त दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीसप्राप्त ठरलेले परीक्षण...
..................................................................................................................................................................
हल्ली हिंदू-मुस्लीम हा धार्मिक संघर्ष फार प्रतिक्रियावादी होत चालला आहे. विशेषकरून सोशल मीडियावर याचं फारच बटबटीत स्वरूप पाहायला मिळतं. ‘आरे’ला ‘कारे’ करणं, हे नेहमीचंच झालंय आता. पण प्रश्नांच्या मुळाशी जाऊन त्यावर काम करण्याची किती लोकांची तयारी असते? सर्जनात्मक (constructive), सकारात्मक (positive) काम करण्यासाठी स्वतःला किती लोक गाडून घेतात? हे प्रश्न अनुत्तरितच राहतात, अशा वेळी कोण मार्ग दाखवणार? राजकारणाने कायमस्वरूपी चिघळवत ठेवलेल्या या प्रश्नाकडे डोळसपणे कोण पाहणार? महाकवी रामधारी सिंह दिनकर म्हणतात, ‘जब जब राजनीति लडखडाई है, तब तब साहित्यनेही उसे संभाला है!” दर्जेदार साहित्य हेच अशा प्रश्नांना थेट भिडण्याची क्षमता ठेवतं.
सध्याच्या काळात मुस्लीम समाजाच्या समोर असलेले काही प्रश्न अग्रक्रमानं सोडवलं पाहिजेत. ते म्हणजे ट्रिपल तलाक, मुस्लीम मुलांचं शिक्षण, बुरखा पद्धत, घटस्फोटानंतरची पोटगी आणि साहित्य निर्मितीत पिछाडीवर असलेल्या मुस्लिमांचा टक्का, या आणि अशा ज्वलंत विषयांना थेट हात घालणारी अभिराम भडकमकर लिखित ‘इन्शाअल्लाह’ ही कादंबरी आहे. गेल्या १०-२० वर्षांपासून केवळ भारातातच नाही तर जगभरात मुस्लीम धर्माबद्दल एक वैचारिक घुसळण सुरू आहे. ही वैचारिक घुसळण केवळ मुस्लीम विरुद्ध इतर धर्म अशी नाहीये. मुस्लिमांमध्ये असलेले इतर पंथ जसे शिया व सुन्नी यांचेही कित्येक वर्षांपासूनचे वाद आहेत. धार्मिक कट्टरता, टोकाचा धर्मवाद याची पहिली शिकार ठरते ती मानवता!
जवळजवळ ३५० पानांच्या या कादंबरीवर समीर मुल्लाचं श्रेयश मोहिते यांनी काढलेलं छायाचित्र हे मुखपृष्ठ म्हणून वापरलेलं आहे. विषय-आशयाला समर्पक असंच हे मुखपृष्ठ आहे. या कादंबरीत मुख्य पात्र आहेत तीन - जमीला, झुल्फी आणि रफीक. कोल्हापूर रेल्वे स्टेशन बॉम्बस्फोटाने उडवून देण्याचा कट पोलिसांनी उधळून लावलेला असतो. या घटनेपासून जमीलाचा मुलगा जुनैद फरार आहे. झुल्फी हा महाविद्यालयात शेवटच्या वर्षात शिकत असणारा एक तरुण मुलगा. स्वभावानं समजूतदार, विचारी आणि मुख्य म्हणजे सुधारणेच्या बाजूने झुकणारा आहे पण कट्टर सुधारणावादी नाही. नव्या-जुन्याचा सुवर्णमध्य साधण्याचा त्याचा नेहमीच प्रयत्न असतो. रफीक हा ‘फतेह’ नावाच्या एका मुस्लीम सुधारणावादी संघटनेचा कार्यकर्ता-अध्यक्ष. एकदम तडतड्याच. टोकाचा सुधारणावादी, इतका की प्रसंगी दोन देण्याची आणि दोन खाण्याचीसुद्धा तयारी असलेला.
..................................................................................................................................................................
अधिक माहितीसाठी पहा - https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
या कादंबरीचं कथानक कोल्हापुरातील एका छोट्या मुस्लीम मोहल्यात घडतं. तिथं राहणारे मुस्लीम लोक रूढीग्रस्त, अशिक्षित तर आहेतच, त्याचबरोबर मुस्लीम मौलवी आणि धर्मगुरूंचा जबरदस्त पगडा असलेला असा हा मोहल्ला आहे. बॉम्बस्फोटाचा कट उधळून लावल्यानंतर जी धरपकड होते, त्यात या मोहल्यातील दोन तरुण मुलांना पोलीस पकडून नेतात. अशा कथानकानं या कादंबरीची सुरुवात होते. पहिल्या १०-१५ पानांतच ही कादंबरी वाचकांच्या मनाची पकड घेते. शेवटपर्यंत तिची विषयावरची पकड ढिली पडणार नाही, हे भान राखण्यात ही कादंबरी कमालीची यशस्वी झाली आहे.
जमीला, झुल्फी, रफीक ही जरी या कादंबरीतली मुख्य पात्रं असली तरी इतर दुय्यम पात्रंसुद्धा आपलं असं एक स्थान राखून आहेत. इतर ‘महाकादंबरी’ म्हणून घेणाऱ्यांसारखं मुख्य नायकाच्या आजूबाजूला काहीच घडत नाही, असं या कादंबरीमध्ये मात्र होत नाही. दुय्यम पात्रंदेखील आपला ठसा उमटवतात.
या कादंबरीतील नायक-नायिकेच्या व्यतिरिक्तसुद्धा जी स्त्री-पुरुष पात्रं आहेत, ती मुस्लीम समाजाच्या त्या त्या वर्गाचं प्रतिनिधित्व करतात... जे समाजात घडणाऱ्या छोट्या-मोठ्या घटनांमुळे सहज भेदरले जातात... ज्यांच्या धर्मभावना सहज आहत होतात. त्यांच्या याच दुखावलेल्या धर्मभावनेच्या जोरावर राजकारणाची पोळी सहज भाजता येऊ शकते, इतपत त्या आहत झालेल्या असतात. या वर्गाचं धार्मिक ध्रुवीकरण सहज करता येतं. सोशल मीडियाच्या जोरावर त्याला खतपाणीही घालता येतं. एका बाजूला काही लोक असतात, ते म्हणतात, ‘अरे हा कोण लागून चालला आहे, आमच्या धर्मात सुधारणा शिकवणारा, त्याने त्याच्या धर्मात सुधारणा करावी की...!’ तसेच दुसरीकडे ‘आपल्याला काय करायचंय या धार्मिक राजकारणाशी? नकोच ते!’ म्हणून व्यक्त होणारी, तशीच गप्प बसणाऱ्या लोकांचं प्रतिनिधित्व करणारी कित्येक पात्रं आपल्याला या कादंबरीत जागोजागी भेटतात.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
एक प्रसंग आहे, जुनैदची केस लढवण्यासाठी मीना गोखले नावाची एक स्त्री वकील तयार होते. सोशल मीडियावर जुनैदला लोकांनी अगोदरच अतिरेकी ठरवून टाकलेलं असतं. आपल्याकडे नाही का रिया चक्रवर्तीला सुशांतसिंग राजपुतच्या खटल्यामध्ये न्यायालयाने दोषी ठरवण्याच्या आधीच मीडिया तीला दोषी ठरवून टाकतो, अगदी तसंच! यावरून सोशल मीडियावर वाद होतात. किती उथळ विचार करून व्यक्त होत असतात लोक सोशल मीडियावर! एखाद्या खटल्याचा पूर्ण तपशीलही माहीत नसतो अनेकदा या लोकांना. कुणाला दोषी तर कुणाला निर्दोष ठरवून मोकळी होतात लगेच. अनेकदा प्रतिक्रियावादी लोक जे असतात ते आपल्या क्रियेवर विश्वास ठेवण्यापेक्षा आपल्या प्रतिक्रियेलाच जास्त प्राधान्य देतात. त्यातच धन्यता मानतात. परंतु प्रतिक्रियेच्या नादात ही मंडळी एक गोष्ट विसरतात की, त्यांच्या प्रतिक्रियावादी असण्याने ते आपलाच विचार कमकुवत करतात! दोन्ही बाजूचे (हिंदू-मुस्लिम) असे प्रतिक्रियावादी आपापल्या धर्मात सुधारणा करू शकत नाहीत. धार्मिक सुधारणा करण्यासाठी रूढींच्या विरुद्ध दंड थोपटून उभं राहावं लागतं. प्रसंगी एखाद्या वर्गाचा कायमस्वरूपी रोष पत्करावा लागतो.
मुस्लिमांमधील अशा प्रचलित रूढींच्या विरुद्ध - मग ती बुरखा पद्धत असेल, ट्रिपल तलाक असेल किंवा तलाकनंतर दिली जाणारी पोटगी असेल - जो उभा राहतो तो म्हणजे या कादंबरीतला नायक झुल्फी. रफिक त्याला मार्गदर्शनाचं काम करतो. रफीक या पात्रावर हमीद दलवाईंचा प्रभाव असावा असं या कादंबरीत भरपूर ठिकाणी जाणवतं. सुरुवातीला असं वाटतं वाटत होतं की, यात मुस्लीम स्त्रियांच्या प्रश्नाला हाताळलं गेलं नसेल. पण जेव्हा मी कादंबरीत निम्याच्या पुढे सरकलो, तेव्हा हा समज गैरसमज ठरला. मुस्लीम स्त्रियांचे वर उल्लेखलेले महत्त्वाचे प्रश्न कादंबरीत तरुण मुलांच्या संवादातच गुंफलेले आहेत. त्यामुळे ते आपल्याला जास्त अपील होतात. त्यांचा मुस्लीम स्त्रियांच्या प्रश्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आधुनिक आहे. तलाक झालेल्या स्त्रीला तीनच महिने पोटगी मिळते, असं शरिअतचा कायदा सांगतो. पुढे या टाकलेल्या स्त्रीचं जगणं, मुलांचं संगोपन किती मुश्कील आहे, याचा विचार जेव्हा ही तरुण मंडळी करू लागतात, तेव्हा किती बरं वाटतं, हे झुल्फी या पात्रावरून दिसून येतं. समान नागरी कायदा केला गेला तर द्विभार्या प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी मुस्लीम स्त्रीही हाताळेल. जाचातून त्यांची सुटका होईल.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
‘इन्शाअल्लाह’ ही कादंबरी एका गोष्टीवर मात्र नेमकं बोट ठेवते - मुस्लिमांच्या समस्यावर... जे सामाजिक कार्यकर्ते सोयीस्कररीत्या मौन बाळगतात त्याच्यावर. या कार्यकर्त्यांच्या, सेलिब्रिटींच्या वेळोवेळी घुमजाव करणाऱ्या वक्तव्यांमुळेच बऱ्याच वेळा मुस्लीम धर्मातील लोकांची पंचायतच होते. ही मंडळी इतर धर्मातील दोष दाखवताना स्वधर्मातील कर्मठपणा, रूढी-परंपरा यांबद्दल मात्र सोयीस्कर मौन बाळगतात. हिंदूंना ‘हिंदूपण’ टाका म्हणणारे मुस्लिमांना ‘मुस्लीमपण’ टाका म्हणतील का? असेच सोयीस्कर वागणारे काही मुस्लिमांमध्येच आहेत असं नाही, थोड्याफार फरकाने सर्व धर्मात आहेत. परंतु मला वैयक्तिक पातळीवर असं वाटतं की, भारतीय या नात्यानं भारतातील कोणत्याही धर्मात दिसणाऱ्या चुकीच्या, अनिष्ट गोष्टींचा विरोध मात्र करायलाच हवा.
सुधारणा या काही आभाळातून पडत नाही. ज्या त्या समाजातूनच सुधारणा वर आल्या पाहिजेत. त्यासाठी चटकेही सहन करण्याची तयारी असावी लागते. सुधारणेचा हा रेटा त्या त्या धर्मातूनच यायला हवा. वेळप्रसंगी कायद्याची बंधनं घालून किंवा प्रबोधनातून. मला वाटतं, भारतात ही गोष्ट करणं काही अशक्य नाहीये. कारण भारतात प्रबोधनाची अशी एक मोठी परंपरा आहे.
एक मुस्लीम मोहल्ला, तिथले स्वतःच्या धर्माच्या चुकीच्या समजुतींना बदलू पाहणारे तरुण, राजकारणी, हिंदू-मुस्लीम नेते, कार्यकर्ते यांना चित्रित करणारी ‘इन्शाअल्लाह’ ही एक सुंदर कादंबरी आहे.
..................................................................................................................................................................
अजिंक्य कुलकर्णी
ajjukul007@gmail.com
..................................................................................................................................................................
‘इन्शाअल्लाह’ या कादंबरीच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5223/Inshallah
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment