‘Checkmate : How the BJP Won and Lost Maharashtra’ या बहुचर्चित पुस्तकाचा ‘चेकमेट : निवडणूक जिंकूनही भाजपने महाराष्ट्रातील सत्ता का गमावली?’ या नावाने लवकरच मराठी अनुवाद प्रकाशित होत आहे. पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांनी लिहिलेल्या मूळ इंग्रजी पुस्तकाचा हा मराठी अनुवाद मुक्त पत्रकार ममता क्षेमकल्याणी यांनी केला आहे. डायमंड पब्लिकेशन्सतर्फे प्रकाशित होत असलेल्या या पुस्तकातील हे एक प्रकरण...
..................................................................................................................................................................
अजित पवार यांनी २०१९च्या नोव्हेंबर महिन्याच्या मध्यात अमित शहा यांना सरकार-स्थापनेसंदर्भात फोन केला. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मूळ योजनेनुसार पुढे जाण्याचे निश्चित केले होते. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ३५ ते ३८ आमदारांशी बोलणी केली होती आणि त्यांनीदेखील अजित पवारांना पुढे जाण्यास सांगितले होते. भाजपच्या स्वतःच्या १०५ जागा, १५ अपक्ष उमेदवार आणि छोट्या पक्षांचा पाठिंबा धरून १४५ या जादूई आकड्याच्या पुढे जाण्यासाठी भाजपला आणखी २५ आमदारांची गरज होती. भाजपच्या बाजूला येऊ पाहणाऱ्या या आमदारांना आश्वस्त करण्यासाठी देवेंद्र फडणविसांनी त्यांना फोन केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे हे आमदार मुंबईत आल्यानंतर त्यांना दिल्ली किंवा हरियाणा येथे हलवले जाणार होते.
दरम्यान, राज्यपालांकडून हंगामी विधानसभा अध्यक्षांची निवड केली जाणार होती. विधानभवनाच्या नियम ८, कलम १८० (१)नुसार, विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीसाठी एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास हंगामी अध्यक्षाला गुप्त मतदान पद्धतीने निवडणूक घेण्याचा अधिकार प्राप्त होतो. अशा प्रकारे सभागृहाच्या अध्यक्षांची निवड गुप्त मतदान पद्धतीने करण्याचा पर्याय देशातील केवळ महाराष्ट्र राज्यात उपलब्ध आहे. फडणविसांनी कायद्यातील या पळवाटेचा वापर करून दुसऱ्यांदा सत्तेत येण्याची योजना आखली. कारण हात उंचावून केलेल्या उघड मतदानापेक्षा गुप्त मतदानादरम्यान आमदारांची मते फुटण्याची शक्यता जास्त असते. गुप्त मतदान पद्धतीने अध्यक्षांची निवड झाली असती, तर मते फुटून बहुमत चाचणी भाजपसाठी सोपी झाली असती. मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सभागृहात बहुमत सिद्ध करणे फारसे कठीण गेले नसते. सत्ता स्थापन करण्यासाठी १४५ सदस्यांची गरज असताना भाजपकडे केवळ १२२ आमदार असूनही देवेंद्र फडणवीस यांनी २०१४मध्ये हात वर करून त्यांच्या सरकारचे बहुमत सिद्ध केले होते. त्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसने सभात्याग केला होता, तर शिवसेनेने सभागृहात गोंधळ घातला होता; तरीही भाजपला सत्तेत येण्यापासून कोणीही रोखू शकले नव्हते. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांचे सरकार असंविधानिक असल्यासंदर्भातील दावे न्यायालयात दाखल करण्यात आले होते आणि अशा सरकार-विरोधात खूप काही लिहिण्यातदेखील आले होते, पण यांपैकी कोणत्याच गोष्टीचा फार परिणाम झाला नव्हता.
फडणवीस यांनी २०१९मध्ये कदाचित तीच पद्धत वापरण्याचा निर्णय घेतला असावा. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडण्याच्या योजनेला भाजपच्या दिल्लीतील नेतृत्वाने संमती दिली होती. फुटून येणाऱ्या ३८ आमदारांपैकी २० आमदारांना कॅबिनेट किंवा राज्यमंत्री पदे देण्याचे निश्चित करण्यात आले होते, तर उर्वरित आमदारांना महामंडळे आणि म्हाडा-सिडको यांसारख्या विकास आणि गृहनिर्माण संस्थांचे अध्यक्ष पद देण्यात येणार होते.
२२ नोव्हेंबर २०१९ रोजी वरळी येथील नेहरू सेंटरमधील महाविकास आघाडीच्या बैठकीतून बाहेर पडलेले अजित पवार चर्चगेट येथील आपल्या खासगी निवासस्थानी पोहोचले. त्यानंतर रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास त्यांनी घर सोडले. रस्त्यात एके ठिकाणी त्यांनी आपल्या वाहन चालकाला थांबायला सांगितले. त्यानंतर आपल्या चालकाला गाडीसह घरी परत जायला सांगितले. पवार एका दुसऱ्या गाडीत बसले आणि पश्चिम उपनगरांकडे निघाले. याच वेळेच्या दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी आपला मुख्यमंत्र्यांचा ताफा सोडला आणि दुसऱ्या गाडीने ते बीकेसी येथील हॉटेल सोफीटेल येथे मध्यरात्रीच्या सुमारास पोहोचले. दोन्ही नेत्यांनी जनतेच्या नजरा आणि माध्यमांचे लक्ष टाळणेच पसंत केले. या आलिशान पंचतारांकित हॉटेलमध्ये दोघांनी पुढील प्रवेशद्वाराऐवजी मागील दाराने प्रवेश केला. त्यांची बैठक एक तास चालली.
..................................................................................................................................................................
अधिक माहितीसाठी पहा - https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
महाराष्ट्राचे संभाव्य मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचे नाव ऐकताच देवेंद्र फडणवीस अस्वस्थ झाले आणि लगेच दुसऱ्या दिवशी, म्हणजे २३ नोव्हेंबर २०१९ रोजी त्यांना राजभवन येथे शपथ घ्यावी लागणार असल्याचे त्यांनी अजित पवार यांना सांगितले. ‘‘नाहीतर हात चोळत बसण्याशिवाय पर्याय राहणार नाही’’ असे फडणवीस पवारांना म्हणाले.
अजित पवार यांनी राष्ट्रपती राजवट आणि इतर प्रक्रिया यांविषयी विचारणा करून फडणवीस यांना घाई न करण्याची विनंती केली. शरद पवार यांनी हिरवा कंदील दाखवला असला, तरी अंतिम चर्चा होणे बाकी असल्याची माहिती अजित पवार यांनी फडणवीस यांना दिली. लेखकाने बातचीत केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याच्या म्हणण्यानुसार, चर्चा नंतरही शक्य असल्याचे फडणवीस यांनी अजित पवार यांना सांगितले. फडणवीस यांच्या मते, शक्य तितक्या लवकर शपथ घेणे आवश्यक होते; उर्वरित मुद्दे नंतर चर्चा करून सोडवता आले असते.
दरम्यान, शरद पवार भाजपबरोबर आघाडी करण्यास अनिच्छुक असल्याचे अजित पवार यांना कळले. अजित पवार यांचे निकटवर्तीय असलेल्या व्यक्तीने लेखकाला सांगितले की, शिवसेना आणि काँग्रेस यांच्याबरोबर सरकार स्थापन करण्याचे नियोजन सुरू असताना, उपमुख्यमंत्री पदासह गृहमंत्रीपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले होते. अजित पवार यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का होता. अजित पवार यांना नियोजनबद्धरित्या बाजूला करण्याचा आणि उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपला की, सुप्रिया सुळे यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री करण्याचा हा नियोजनबद्ध कट असल्याचे दिसून येत होते....
ही सगळी योजना अजित पवार यांची कारकीर्द संपुष्टात आणणारी भासत होती. यामुळेच कदाचित अजित पवार अस्वस्थ झाले आणि स्वत:चे काका अनिच्छुक असूनही अजित पवारांनी भाजपबरोबर हातमिळवणी करण्याचा पर्याय स्वीकारला. शरद पवार यांना जास्त वेळ दिल्यास, बंडखोर आमदारांबरोबर सरकार स्थापन करणे कठीण होण्याचा इशारा अजित पवार यांनी फडणवीस यांना दिला होता, असे समजते. कारण या सगळ्याची चाहूल लागल्यानंतर शरद पवारांनी स्वत:च्या पद्धतीने हे बंड मोडून काढले असते, हे स्पष्ट होते.
त्यामुळे शरद पवार यांनी स्वत:ची हुकमी खेळी खेळण्यापूर्वीच अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना सगळा डाव स्वत:च्या बाजूने करून घ्यायचा होता. वरळी येथील नेहरू सेंटरमध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात झालेल्या बैठकांमध्ये कुरबुरी होत असल्या, तरी तुलनेने सगळे काही सुरळीत पार पडत असल्याचे दिसत होते आणि या तिघांचे महाविकास आघाडी सरकार सत्तेत येण्याची चिन्हेही स्पष्ट दिसत होती. परिणामी, महाविकास आघाडीने राज्यपालांपुढे आपले पत्र सादर करण्यापूर्वी भाजप आणि इतर नेत्यांना शपथ घेणे आवश्यक होते. त्यामुळेच, शनिवार २३ नोव्हेंबर रोजी, राजभवन येथे भल्या पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शपथविधी सोहळा महाराष्ट्र अर्धवट झोपेत असताना पार पडला.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
अजित पवार आणि त्यांच्या विश्वासू साहाय्यकाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्या ३८ आमदारांना फोन करून मुंबईतील मंत्रालयासमोरील धनंजय मुडेंच्या ब-४ या बंगल्यावर पहाटे १२.३० वाजता जमा होण्यास सांगितले. या संदर्भात घडत असलेल्या घडामोडींची सुनील तटकरे, धनंजय मुंडे आणि प्रफुल्ल पटेल यांना अद्ययावत माहिती होती. या तिघांनीही अजित पवारांना घाईने बंड न करण्याचा सल्ला दिला होता. प्रथम पक्ष नेतृत्व पातळीवर आमदारांना विश्वासात घेऊन नंतरच भाजपबरोबर हातमिळवणी करावी, असे त्यांचे मत होते. भाजपबरोबर हातमिळवणी करण्यासाठी ती योग्य वेळ नसल्याचे मुंडे यांचे आग्रही मतप्रतिपादन होते. मात्र अजित पवार मुंडेंचे म्हणणे ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हते. मुंडे द्विधा मन:स्थितीत होते. स्वत:चे राजकीय गुरू अजित पवार यांच्या बाजूने उभे राहावे की, पक्षप्रमुख शरद पवार यांना पाठिंबा द्यावा, असा दुहेरी पेच विल्यम शेक्सपिअरच्या ‘हॅम्लेट’ या इंग्रजी नाटकातील नायकाप्रमाणे मुंडेंना पडला होता. त्या मध्यरात्री मुंडे स्वत:च्या घरापासून पाच मिनिटांच्या अंतरावर असलेल्या कफ परेड येथील मित्राच्या घरी गेले. त्यांना पहाटे तीनपर्यंत झोप लागली नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र काही वेळाने त्यांना गाढ झोप लागली.
दरम्यान, मूळ योजनेनुसार मुंडे यांच्या बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार येऊ लागले. भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड आणि अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार ही सगळी परिस्थिती हाताळत होते आणि तिच्यावर बारकाईने नजर ठेवून होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ३८ आमदारांना हरियाणा येथे घेऊन जाण्यासाठी आणि तिथे त्यांना हॉटेलमध्ये एकत्र ठेवण्यासाठी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सात आसन क्षमतेची सात खासगी विमाने तयार ठेवण्यात आली होती.
स्वत:चा मतदार संघ सोडत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे हे आमदार एकमेकांना फोन करून अजित पवार यांनी बैठकीसाठी बोलवल्याचे सांगू लागले होते. या ३८ आमदारांव्यतिरिक्त इतर आमदारांना मुंबईतील या बैठकीचा मागमूसही नव्हता. शरद पवार यांच्या पाठिंब्याशिवाय, अजितदादांनी एकट्यानेच हे पाऊल उचलले असल्याची जाणीव होताच, त्यांतील काही आमदारांनी स्वत:चे पाऊल मागे घेतले. अखेर ३८ आमदारांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे केवळ १५ आमदारच राज्यभरातून मुंबईत दाखल झाले. अजित पवार यांचा बंडाचा मार्ग फारसा सुकर नसल्याचाच हा पहिला संकेत होता.
२३ नोव्हेंबर रोजी पहाटे १२.३० ते १.००च्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांना या घडामोडींची चाहूल लागली. राजभवनमधील अभियंत्यांनी ध्वनियंत्रणा चालकाला तिथेच थांबण्याच्या सूचना दिल्या होत्या. ही बातमी पसरली आणि राजभवनमध्ये काहीतरी घडणार असल्याचे संकेत मिळून संशयाचे वातावरण निर्माण झाले. अजित पवार यांनी बैठकीसाठी बोलवले असल्याचे शरद पवार यांच्या थेट संपर्कात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी शरद पवार यांना कळवले. शरद पवार यांच्याशी बोलणे झाल्यानंतर त्यांच्यापैकी अनेकांनी बैठकीला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला.
अशा प्रकारे पवार यांना आपल्या पुतण्याच्या योजनेचा सुगावा लागला. मात्र तिच्या यशस्वीतेबाबत त्यांच्या मनात शंका होती. अजित पवार यांच्या बाजूने किती आमदार होते, याची तपशीलवार माहिती शरद पवार यांनी शनिवारी पहाटे सुमारे तीन वाजेच्या सुमारास घेतली. त्यांच्या पुतण्याबरोबर केवळ १५ आमदार गेले असते, तर त्यांच्या मदतीने सरकार स्थापन करणे शक्य झाले नसते, हे पवार जाणून होते. भाजपच्या १०५ जागा आणि १५ अपक्ष आमदारांचा पाठिंबा यामध्ये १४५चा जादूई आकडा गाठण्यासाठी आणखी कमीत कमी २५ ते ३० आमदारांची गरज होती. भाजपबरोबर हातमिळवणी करून अजित पवारांनी केवळ स्वत:चे हसेच करून घेतले नसते, तर स्वत:ची विश्वासार्हताही गमावली असती. १९६०च्या महाराष्ट्र राज्य विधानसभा नियमानुसार, हंगामी अध्यक्षाला सभागृहाच्या अध्यक्षाची निवड करण्यासाठी गुप्त मतदानाचा पर्याय निवडण्याचा अधिकार असतो. या अधिकाराचा हंगामी अध्यक्षांनी उपयोग केला असता, तर परिस्थिती पलटू शकली असती आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळी कलाटणी मिळाली असती.
राजभवनापासून अवघ्या १५ मिनिटांच्या अंतरावर असलेल्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी पहाटे तीनच्या सुमारास झोपायला गेल्याचे शरद पवार यांनी ‘एबीपी माझा’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. त्याच वेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस मोठ्या उत्साहाने तयारी करत होते. एका स्थानिक वृत्तवाहिनीच्या बातमीनुसार, मध्य प्रदेश येथील नालखेडामधील माँ बागलमुखी मंदिराच्या पुजाऱ्याला बोलवून, पहाटे चार वाजता फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ‘मिरची हवना’चा पुन्हा सत्ताप्राप्तीसाठीचा प्रसिद्ध विधी केला.
बागलमुखी ही एक हिंदू तंत्रदेवता आहे. उत्तराखंडमधील हरीश रावत यांचे सरकार वाचवण्यासाठी अशाच प्रकारचे हवन करण्यात आल्याचे फडणवीस यांना सांगण्यात आले होते. रावत सरकारने सभागृहातील बहुमत गमावले होते, त्या वेळी हरीश रावत यांचे बंधू जगदीश रावत यांनी तत्परतेने बागलमुखी मंदिराला भेट देऊन तेथे मिरची हवन करून घेतले होते आणि अखेर रावत आपले सरकार वाचवू शकले होते. तेव्हापासून हे मंदिर राजकारणी आणि उद्योगपती यांच्यामध्ये खूप प्रसिद्ध झाले.
या वृत्तवाहिनीने असेही म्हटले होते की, मुंबईतील ‘वर्षा’ या मुख्यमंत्र्याच्या अधिकृत शासकीय निवासस्थानी मिरची हवन केल्यास, फडणवीस पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनू शकतील, अशी त्यांना खात्री वाटत होती. त्यापूर्वी फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची ज्या-ज्या वेळी धोक्यात आली होती, त्या-त्या वेळी फडणविसांनी हेच मिरची हवन केले होते. हवन होताच, तांत्रिकाला भरगच्च दक्षिणा देऊन मध्य प्रदेश येथे विमानाने परत पाठवण्यात आले. यासंबंधीचे सर्व नियोजन प्रसाद लाड यांनी केले होते. इतिहासकार इंद्रजीत सावंत यांच्या प्रतिपादनानुसार, शिवकाळात औरंगजेबाने रजपूत सरदार मिर्झाराजा जयसिंग याला शिवाजी महाराजांच्या विरोधात पाठवले असताना, जयसिंगाने असाच बागलमुखीचा ‘मिरची हवन’ हा विधी केल्याची नोंद इतिहासातील बखरीत सापडते.
राजभवनात दुसऱ्यांदा शपथ घेण्यासाठी फडणवीस तयारी करू लागले. तांत्रिकाने दिलेल्या सल्ल्यानुसार, मिरची हवन आणि दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेताना फडणविसांनी आपल्या आवडत्या, निळ्या रंगाच्या जॅकेटची निवड न करता, दुष्ट शक्तींपासून बचाव करण्यासाठी म्हणून काळ्या रंगाच्या जॅकेटची निवड केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ नेता या नात्याने अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५४ आमदारांची मराठीत आणि इंग्रजीत स्वाक्षरी असलेली मूळ यादी होती. वर्षा निवासस्थानी वाट पाहत असलेले महाराष्ट्राचे मुख्य सचिव अजॉय मेहता यांच्याकडे ही यादी सुपूर्द करण्यात आली. ‘इंडियन एक्सप्रेस’च्या २ डिसेंबर २०१९च्या वृत्तानुसार देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा २३ नोव्हेंबरचा शपथविधी सोहळा तत्काळ घडवून आणण्यासाठी अजॉय मेहता यांना खास विमानाने दिल्ली येथून बोलवण्यात आले होते. मेहता तत्परतेने राजभवनावर पोहोचले. मूळचे नागपूरचे असलेले, राज्यपालांचे राजभवन येथील सचिव सचिन कुर्वे यांनी अजॉय मेहता यांच्याकडून संबंधित कागदपत्रे स्वीकारली. त्यांवर राज्यपालांनी त्वरित स्वाक्षऱ्या केल्या आणि भाजपच्या १०५ जागांसह त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५४ आमदारांचा पाठिंबा असलेला इ-मेल कुर्वे यांना लिहिण्यास सांगितले. भाजपला १५९ आमदारांचा पाठिंबा मिळाला असल्याचे आणि सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेल्या १४५ जागांपेक्षा हा आकडा जास्त असल्याचे या मेलमध्ये नमूद करण्यात आले होते. त्यानंतर, राज्यातील राष्ट्रपती राजवट लवकरात लवकर हटवण्याची या मेलद्वारे राष्ट्रपतींना विनंती करण्यात आली होती.
राजभवन येथून येणाऱ्या कागदपत्रांची पहाटेपासून वाट पाहणाऱ्या पंतप्रधान कार्यालयाला ही सर्व कागदपत्रे मेलद्वारे लगेचच पाठवण्यात आली. त्यानंतर पंतप्रधान कार्यालयाने राष्ट्रपती राजवट हटवण्याचा आदेश दिला. भारत सरकारच्या १९६१च्या नियम १२नुसार, कॅबिनेटच्या संमतीशिवाय असे पाऊल उचलण्याचा अधिकार केवळ पंतप्रधानांना असतो. पंतप्रधान कार्यालयाकडून हा निर्णय राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना कळवण्यात आला. त्यानंतर राष्ट्रपतींनी निवेदनाद्वारे जाहीर केले की, ‘भारतीय राज्यघटनेने कलम ३५६च्या उपकलम (२)नुसार मला जो अधिकार दिला आहे, त्या अन्वये मी रामनाथ कोविंद, भारताचा राष्ट्रपती या नात्याने जाहीर करतो की, उपरोक्त कलमांअंतर्गत १२ नोव्हेंबर २०१९ रोजी महाराष्ट्र राज्यात लागू करण्यात आलेली राष्ट्रपती राजवट मी २३ नोव्हेंबर २०१९पासून मागे घेत आहे.’ राष्ट्रपतींचे हेच निवेदन केंद्रीय गृह मंत्रालयाला पाठवण्यात आले. गृह मंत्रालय या निवेदनाची वाटच पाहत होते. त्यानंतर २३ नोव्हेंबर २०१९च्या पहाटे ५.४७ मिनिटांनी केंद्रीय गृह सचिव अजय कुमार भल्ला यांनी राजपत्र अधिसूचना जारी केली.
शुक्रवार, २२ नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि त्यांचे निकटवर्तीय गिरीश महाजन या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांना फोन करून, दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजता ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी कांदेपोहे आणि शिरा यांचा नाश्ता करण्यासाठी व गोड आणि गुप्त बातमी ऐकण्यासाठी बोलवले होते. २३ नोव्हेंबर रोजी पहाटे पाटील आणि महाजन फडणविसांच्या घरी पोहोचले, तेव्हा त्यांनी या दोघांना नागपुरी पद्धतीचे कंदिली पोहे आणि शिरा यांचा नाश्ता दिला आणि या दोघांना घेऊन फडणवीस लगेचच राजभवन येथे पोहोचले. त्या वेळी त्या ठिकाणी अजित पवार, त्यांच्या पत्नी सुनेत्रा, मुलगा पार्थ आणि त्यांचे बंधू श्रीनिवास पवार हे सपत्नीक राज्याच्या भावी मुख्यमंत्र्याची वाट पाहत असल्याचे पाहून पाटील आणि महाजन आश्चर्यचकित झाले. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांच्या नेत्यांमध्ये काहीतरी घडत असल्याची कुणकुण पाटील आणि महाजन यांना लागली होती. मात्र या सगळ्याची इतकी वेगवान प्रगती ही त्यांच्या कल्पनेपलीकडची गोष्ट होती.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
अजित पवार यांनी राजभवन येथे बोलवलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांपैकी एक डिंडोरीचे झिरवल नरहरी सीताराम होते. त्यांनी लेखकाला सांगितले की, ते त्या ठिकाणी पोहोचले, तेव्हा देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन यांना पाहून ते आश्चर्यचकित झाले. ‘‘मला प्रथम असे वाटले की, शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसान-भरपाई-संदर्भात आम्ही राष्ट्रवादीचे नेते राज्यपालांना भेटणार आहोत. मात्र देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदांची शपथ घेणार असल्याची मला अजिबात कल्पना नव्हती,’’ असे झिरवल यांनी लेखकाला सांगितले.
राजभवन येथील प्रत्येक जण घाईत असल्याचे आणि तेथील सर्व लोक एकमेकांना पाहून अचंबित होत असल्याचे झिरवल सांगतात. ‘‘काय बोलावे हे कोणालाच कळत नव्हते. जे काही सुरू होते, ते आम्ही फक्त पाहत होतो. राज्यपाल दरबार हॉलमध्ये आले आणि त्यांनी प्रक्रिया सुरू करण्यास सांगितले. देवेंद्र फडणविसांनी शपथ घेतली. शपथविधी सोहळा संपल्यानंतर राजभवन येथे असलेल्या गाड्यांमध्ये आम्हाला लगेचच बसण्यास सांगितले गेले. कपडे आणि सामान सोबत आणले नसल्याचे मी तेथील योजनाकर्त्यांना सांगितले. त्यावर त्यांनी मला काळजी न करण्याचा सल्ला दिला आणि ते माझ्यासाठी नवीन कपड्यांची व्यवस्था करणार असल्याचे सांगितले,’’ झिरवल सांगतात. तिथून या आमदारांना दिल्ली आणि हरियाणा येथे नेण्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्थेसह मुंबई विमानतळावर नेण्यात आले.
ही राजकीय उलथापालथ माध्यमांकडे वादळासारखी येऊन धडकली. २३ नोव्हेंबरला सकाळी ७.५० वाजता देवेंद्र फडणविसांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर फडणवीस आणि अजित पवार यांचे अभिनंदन केले होते. ‘महाराष्ट्राच्या उज्ज्वल भवितव्यासाठी हे राज्यकर्ते मेहनत घेतील, असा मला विश्वास वाटतो’ असे ट्विट पंतप्रधानांनी केले होते. भाजप अध्यक्ष आणि गृहमंत्री अमित शहा यांनीदेखील या दोघांचे अभिनंदन केले होते.
..................................................................................................................................................................
अधिक माहितीसाठी पहा - https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment