शब्दांचे वेध : पुष्प एकोणतिसावे
मागच्या आठवड्यात या लेखाच्या पूर्वार्धात पोर्नोग्राफी म्हणजे काय आणि १९५० नंतर ती भूमीगत वास्तव्यातून कशी बाहेर पडली आणि आज एखाद्या त्सुनामीसारखी कशी जगभर थैमान घालते आहे, हे आपण थोडक्यात पाहिलं. १९७० नंतर लॅरी फ्लिंटचा या क्षेत्रात प्रवेश झाला आणि त्यानं बघता बघता ‘पॉर्न किंग’ म्हणून स्वतःचं एक साम्राज्य स्थापन केलं. असे आणखीही बरेच ‘पॉर्न किंग’ आहेत, पण लॅरीची तऱ्हाच न्यारी होती. त्याची पोर्नोग्राफी ही सरळ, राजरोस, ‘नर आणि मादीचा संभोग’ या धोपट मार्गानं न जाता विकृतीच्या वेड्यावाकड्या आणि छुप्या गल्लीबोळांतून आणि आडमार्गानं धावू लागली. हे तेव्हाच्या अमेरिकेलासुद्धा नवीन होतं. पण लवकरच त्याचा जम बसला आणि मग शेकडो अडचणींना तोंड देत देत तो या क्षेत्रातला एक अनभिषिक्त सम्राट बनला. खास त्याचा असा एक विशिष्ट वाचकवर्ग तयार झाला.
त्यांच्यासाठी तो काहीही करायला तयार असे. सामान्य लोकांना माहीत नसतील असे नवनवीन फंडे त्यानं शोधून काढले, त्यांना लोकप्रिय केलं आणि स्वतःचा एक कल्ट म्हणजे पंथ तयार केला. हा कल्ट ‘प्लेबॉय कल्ट’पेक्षा वेगळा होता. ‘प्लेबॉय’ला क्लास म्हणजे काही प्रमाणात दर्जा तरी होता. फ्लिंटच्या हसलर मासिकाचं ‘अत्यंत गलिच्छ, घाणेरडं, बीभत्स, हिडीस, ओंगळवाणं, अभिरुचीहीन’, यांसारख्या शेलक्या विशेषणांशिवाय अन्य कोणतंही वर्णन तुम्ही करू शकणार नाही.
कोण होता हा ‘विकृत डोक्याचा लिंगपिसाट’? तो माथेफिरू (अमरावतीच्या वऱ्हाडी बोलीत म्याट (मॅड) ) तर नक्कीच नव्हता. अत्यंत थंड डोक्यानं विचार करणारा तो एक खास धंदेवाईक इसम होता. प्रचंड पैसा कमावणं हा त्याचा एकमेव हेतू होता आणि तोही वैध मार्गानं. नियमांच्या आधीन राहून केलेला पोर्नोग्राफीचा व्यवसाय अमेरिकेत वैध आहे. म्हणून त्यानं जाणूनबुजून ही लाईन निवडली. ही एक calculated risk होती. त्यात तो सफल झाला. वैध आणि अवैध यांच्यामध्ये जी सीमारेषा असते, अगदी तिच्यावर पाय ठेवून तो उभा झाला.
क्रिकेटमधल्या क्रीझ किंवा कबड्डीतल्या मधल्या रेषेसारखं हे असतं. एखाद्याच इंचाच्या फरकानं सारं दृश्य पालटू शकतं. लॅरीनं आपला पाय त्या सीमारेषेच्या पलीकडे कधी जाऊ दिला नाही. धोका पत्करला पण विचारपूर्वक, अक्कलहुशारीनं. म्हणून, तो अवैधरीत्या पोर्नोग्राफीचा धंदा करतो, या आरोपावरून त्याच्यावर असंख्य कोर्ट केसेस होऊनही तो त्यांत एक अपवाद वगळता कधी अडकला नाही.
आता अशा माणसाला तुम्ही वेडा तर नक्कीच म्हणू शकत नाही. (हसलरचंच एक भावंड आहे, फ्लिंटनंच जन्माला घातलेलं. त्या सचित्र मासिकाचं नाव आहे, ‘बेअरली लीगल’ (Barely Legal). १८ वर्षांखालच्या मुलींचा पोर्नोग्राफीसाठी वापर करून घेता येत नाही. यावर तोडगा म्हणून या पठ्ठ्यानं भरदार अवयव असलेल्या आणि थोराड दिसणाऱ्या १६-१७ वर्षांच्या मुलींचं वय बदलून त्या १८ वर्षांवरील आहेत असं दाखवणं सुरू केलं. किंवा ज्यांच्या वयाला १८ वर्षं आणि एकच दिवस झाला आहे, अशाही मुली निवडल्या. कायद्याची परिभाषा बदलायला २४ तासांचा अवधी पुरेसा आहे, हे तो जाणत होता. म्हणून या मासिकाचं नावच ‘बेअरली लीगल’ म्हणजे ‘जेमतेम सज्ञान’ असं ठेवलं गेलं.)
..................................................................................................................................................................
अधिक माहितीसाठी पहा - https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
१९४२ साली जन्मलेल्या लॅरीचं बालपण काही फारसं सुखी नव्हतं. जन्मतारखेचा खोटा दाखला देऊन तो वयाच्या १५व्या वर्षीच अमेरिकन भूदलात नोकरी करू लागला. काही वर्षांनी तिथून बाहेर पडल्यावर त्यानं काही छोटी-मोठी कामं केली, चोरून दारू विकली. त्यानंतर त्यानं चार वर्षं अमेरिकन नौदलातही काम केलं. नंतर १९६४मध्ये ओहायो राज्यात मद्यविक्रीचा एक छोटा पण साधा बार सुरू केला. यातूनच पुढे त्याच्या डोक्यात वेगळ्या प्रकारचे, हाय क्लास सोसायटी बार सुरू करण्याचा किडा घुसला. यात नग्न किंवा अर्धनग्न स्त्रियांचे नाच होत असत. त्याच प्रकारच्या स्त्रिया बार वेट्रेस म्हणूनही काम करत. ‘हसलर क्लब’ असं नाव असलेले अशा प्रकारचे चार क्लब-बार त्यानं ओहायो राज्यात सुरू केले. त्यांतून त्याला भरपूर द्रव्यप्राप्ती होऊ लागली. आणि यातूनच मग ‘हसलर’ मासिकाची कल्पना त्याच्या सुपीक डोक्यात आली.
‘हसलर’ (Hustler) या बोलीभाषेतल्या असभ्य शब्दाचा अर्थ देह-विक्रय करणारी बाई असा होतो. म्हणजेच वेश्या. पण साध्या वेश्येसारखं या बायकांचं ठराविक असं काही ठिकाण, जागा नसते. त्या रस्त्यांवर हिंडतात आणि ग्राहक शोधतात. सौदा जमला तर मग दोघे जण कुठल्या तरी लॉज किंवा हॉटेलात तास-दोन तासांकरता जातात. आपल्या क्लबला आणि प्रस्तावित मासिकालाही हे असं नाव देऊन लॅरीनं एक वेगळीच कल्पकता दाखवली. नावापासूनच त्यात वेगळेपण होतं.
अमेरिकेत ‘फर्स्ट अमेंडमेंट’ (पहिली घटनादुरुस्ती) नावाचं एक ब्रह्मास्त्र आहे. या दुरुस्तीनुसार तिथल्या नागरिकांना (जवळपास) अनिर्बंध अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळालं आहे. ट्रम्प राष्ट्रपती असताना त्याच्या काही विरोधकांनी त्याचा बाहुल्याच्या आकाराचा एक मोठा पुतळा बनवला होता आणि गावभर त्याची धिंड काढली होती. येणारा-जाणारा त्या बाहुल्याच्या ढुंगणावर लाथ मारत होता. या दृश्याचा व्हिडिओ दोन-तीन वर्षांपूर्वी इंटरनेटवर दाखवला जात होता. हे अशा प्रकारचं बेधडक अभिव्यक्ती स्वातंत्र्य फक्त अमेरिकेतच उपभोगता येतं.
लॅरीनं पहिल्यापासूनच फर्स्ट अमेंडमेंटचा आधार घेऊन आपल्या पोर्नोग्राफी व्यवसायाला कायदेशीर स्वरूप देण्याचा चंग बांधला. कोणाला आवडो न आवडो, कोणी कितीही निंदा करो, जोवर मी करतो ते कायद्याच्या चौकटीत बसतं आहे, तोवर ते मी करणारच आणि फर्स्ट अमेंडमेंटनं तो अधिकार मला दिला आहे, हे त्याचं ठाम प्रतिपादन होतं. त्यामुळे सभ्य, पापभिरू, सुसंस्कृत लोकांच्या विरोधाला अजिबात भीक न घालता त्यानं ‘हसलर’च्या माध्यमातून पोर्नोग्राफीचं (तेही विकृत पोर्नोग्राफीचं) मार्केटिंग केलं.
त्याचा वाचकवर्ग मुख्यत्वे करून तिथला कामगार वर्ग, निम्न मध्यमवर्गीय आणि निम्न कनिष्ठवर्गीय लोक, असा होता. त्यांना भुरळ पडावी, त्यांच्यातली कामुकता जागृत व्हावी, सतत जागी रहावी, यासाठी त्यानं वेगवेगळ्या क्लृप्त्या केल्या. एक गोरी स्त्री आणि एक गोरा पुरुष यांचा साधा सरळ संभोग दाखवणं तोवर जुनं झालं होतं.
लॅरीनं त्यात व्हेरिएशन्स म्हणजे वेगळेपण असलेले बदलाव आणले. त्यानं एक काळी बाई आणि एक गोरा माणूस (किंवा याच्या उलट) यांच्यातल्या संभोगाचे फोटो छापले. अनेक पुरुष आणि स्त्रियांच्या एकाच वेळी एकाच पलंगावर चाललेल्या कामक्रीडेचे फोटो (ग्रुप सेक्स); लांबलचक आणि जाडजूड शिस्न असलेल्या नग्न पुरुषांचे फोटो; दोन स्त्रिया किंवा दोन पुरुष यांच्यातल्या कामक्रीडेचे फोटो; सुंदर, तरुण नग्न मुलींच्या सताड फाकलेल्या मांड्यांजवळ कॅमेरा नेऊन त्यांच्या उघड्या योनींचे, भगोष्टांचे, शिस्निकांचे काढलेले क्लोज-अप फोटो; घोडा - अस्वल - कुत्रा अशा प्राण्यांसोबत एखाद्या स्त्रीने केलेल्या संभोगाचे फोटो, यासारख्या अनेक गोष्टींचा या व्हेरिएशन्समध्ये समावेश होता.
त्यामुळे काही तरी वेगळं, अतिरेकी, बेफाम असं बघायला मिळतं आहे हे समजल्यावर वासनेनं वखवखलेल्या वाचकांच्या ‘हसलर’वर उड्या पडू लागल्या. काही काळातच त्याच्या विक्रीनं नवे उच्चांक गाठले. या सर्व लंदफंद प्रकारांना वैधता असावी म्हणून तो दोन ‘डिसक्लेमर्स’ छापत असे. एक, ज्यांचे फोटो काढले आहेत ते सर्व मॉडेल १८ वर्षांच्या वरचे आहेत, आणि दुसरं म्हणजे या फोटोत जी संभोग दृष्यं दाखवली आहेत ती सिम्युलटेड म्हणजे कृतक, कृत्रिम (खोटी) आहेत. नग्न पुरुषाच्या फोटोंत त्याचं लिंग सुप्तावस्थेत असे - म्हणजे त्यात खऱ्या वासनेमुळे आलेली ताठुरता नसे. हे प्रमाणपत्र दिलं की, अमेरिकेतलं कोणतंही न्यायालय त्याच्यावर अश्लीलतेचा खटला चालवू शकत नव्हतं. फर्स्ट अमेंडमेंटचा आधार तर सोबत घेऊनच तो जगत होता.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
‘हसलर’मध्ये जास्त रंग भरला जावा म्हणून नंतर त्यानं आणखीही काही युक्त्या केल्या. त्याला साहित्यिक मूल्य असलेल्या कथा, मुलाखती असं काही नको होतं. फक्त आणि फक्त चावट, फाजील असंच काही तरी त्याला हवं होतं. त्यानं यासाठी अत्यंत अश्लील, व्हल्गर, हीन दर्जाचे जोक आणि कार्टून्स छापणं सुरू केलं. हे विनोद बहुतेक वेळी आक्षेपार्ह (offensive ) असत. लोकांच्या रंगावर, व्यंगांवर, त्यांच्या लैंगिक समस्यांवर हे जोक आणि कार्टून असत. सेक्स आणि विकृती हा त्यांचा पाया होता. नवीन निघालेल्या ब्लू फिल्म म्हणजे निळ्या सिनेमांचं थोडक्यात परीक्षण ‘हसलर’मध्ये येऊ लागलं. त्यांचं दरमहा रेटिंग केलं जाई. पण स्टार देण्याच्याऐवजी तो पुल्लिंगाच्या चित्रांतून हे रेटिंग करत असे. ‘उत्कृष्ट’ ब्लू फिल्मला पूर्ण विकसित लिंगाचं रेटिंग, तर ‘फालतू, तिसऱ्या दर्जा’च्या ब्लू फिल्मला ‘लिंप’ (limp) म्हणजे सुप्तावस्थेतल्या लिंगाचं रेटिंग दिलं जात असे.
एक प्रकार तर याहूनही भयंकर होता. तो म्हणजे ‘बलात्कारची फॅंटसी’. ‘मला कोणावर बलात्कार करायला आवडेल आणि तो मी कसा करेन?’, या विषयावर ‘Chester the Molester’ नावाचं एक कार्टून कॅरेक्टर स्त्रियांवर बलात्कार करताना किंवा त्यांची छेडखानी करताना दाखवलं जाई.
या पुढचा प्रकार होता, पॅरडी. विडंबन. मोठमोठ्या, प्रसिद्ध व्यक्तींवर यात अत्यंत शिवराळ भाषेत जहाल, अनर्गल अशी टीका-टिप्पणी केली जात असे. त्यात सत्याचा अंशही नसायचा. जेरी फॅलवेल नावाच्या सुविख्यात क्रिस्ती धर्मगुरूचे लहानपणी स्वतःच्या आईशी शरीरसंबंध होते, असा (धादान्त खोटा) आरोप करणारी एक पॅरडी ‘हसलर’मध्ये छापून आली होती. यावरून या लिखाणाचा एकंदरीत दर्जा लक्षात येईल. या ‘Asshole of the Month’ या सदरात दर महा कोणत्याही एका अतिप्रसिद्ध, सार्वजनिक जीवनात नाव कमावलेल्या व्यक्तीवर अत्यंत घाणेरडी, वैयक्तिक स्वरूपाची टीका-टिप्पणी केली जाते.
एका माणसाने माजी राष्ट्रपती जॉन एफ केनेडीच्या लावण्यवती पत्नीचे (जॅकलीन केनेडीचे) सूर्यस्नान करतानाचे (सनबेदिंग) नग्न फोटो चोरून काढले. प्रचंड किंमत देऊन ‘हसलर’नं ते विकत घेतले आणि जसेच्या तसे छापले. ‘हसलर’च्या या अंकावर लोकांच्या उड्या पडल्या. एका अंदाजानुसार त्या महिन्यात मासिकाच्या सुमारे दहा लक्ष प्रतींचा विक्रमी खप झाला.
थोडक्यात, कंबरेखालचं जे जे काय आहे, ते सारं ‘हसलर’ला स्वीकार्य होतं. त्यामुळे तसं वाचायला/बघायला आवडणाऱ्या लोकांनी लॅरी फ्लिंटला आणि त्याच्या मासिकाला डोक्यावर उचलून धरलं. ही एक उलट्या, उफराट्या प्रकारची लोकप्रियता होती. लॅरी पैशांत लोळू लागला.
पण त्याच वेळी लॅरी न आवडणारे, त्याचा राग, तिरस्कार करणारे लोकही अमेरिकेत होतेच. यात काही कट्टर धार्मिक लोक होते, पोर्नोग्राफी न आवडणारे लोक होते, स्त्रीवादी (फेमिनिस्ट) होते, त्याचे प्रतिस्पर्धी होते, आणि फ्लिंट कधी चूक करतो यावर डोळ्यात तेल टाकून लक्ष ठेवणारे खरे आणि नैतिक पोलीसही होते. यातल्या काहींनी त्याच्यावर न्यायालयांत अश्लीलतेच्या आरोपाखाली खटलेदेखील दाखल केले. यातल्या फक्त एका खटल्यात त्याला सात दिवसांसाठी जेलमध्ये जावं लागलं होतं.
१९७८ साली जॉर्जिया राज्यात असाच एक खटला सुरू होता. त्यासाठी लॅरी आणि त्याचा वकील न्यायालयात जात असताना फ्रॅंकलिन नावाच्या माणसानं लॅरीवर पिस्तुलातून गोळीबार केला. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला. त्याच्या पाठीच्या कण्याला भयंकर दुखापत झाली आणि परिणामी तो जन्मभरासाठी पांगळा होऊन व्हीलचेअरशी कायमचा बांधला गेला.
फ्रॅंकलिननं लॅरीवर हल्ला का केला, याचं कारण मात्र विचित्र होतं. लॅरी अश्लीलता पसरवतो याबद्दल त्याला काही आक्षेप नव्हता. पण तो होता कट्टर व्हाईट सुप्रिमॅशिस्ट - म्हणजे गोऱ्या कातडीशिवाय अन्य रंगांच्या कातडीचे लोकही जगात असू शकतात, हे मान्य न करणारा. ‘हसलर’ मासिकात अश्वेत बाई/माणूस आणि गोरा माणूस/बाई यांच्या संभोगाचे फोटो लॅरी छापतो, हे त्याला अपमानास्पद वाटायचं. तसं पाहिलं तर ही कल्पना साऱ्या अमेरिकेसाठीच तेव्हा नावीन्यपूर्ण होती. पण रंगभेदी फ्रॅंकलिननं ते फारच मनावर घेतलं आणि त्यानं लॅरीचा खून करायचा बेत केला. लॅरीची जीवनरेखा प्रबळ असल्यानं त्याचा जीव वाचला, पण तो कंबरेपासून पार लुळा झाला.
या आजारपणानंतरही त्याचं डोकं मात्र तसंच तल्लख राहिलं. दीर्घकाळ रुग्णालयात घालवून तो घरी जायला निघाला, तेव्हा त्याला पत्रकारांनी गाठलं आणि आता तो काय करणार, हा प्रश्न विचारला. तो म्हणाला, “I'm a changed man now! I've found religion”. म्हणजे हॉस्पिटलच्या वास्तव्यात माझ्यात बदल झाला असून मी आता धार्मिक मनोवृत्तीचा झालो आहे. यावर पत्रकार म्हणाले, म्हणजे आता तू ‘हसलर’ मासिक बंद करणार आहेस का? यावर त्याचं उत्तर होतं, नाही, मुळीच नाही. पण मी आता त्यात थोडे बदल करणार आहे. जनावरांसोबत मानवी बायकांच्या संभोगाचे फोटो छापणं आता मी बंद करणार आहे. त्याच प्रमाणे ‘Chester the Molester’ आता ‘Chester the Protector’ बनून स्त्रियांच्या अब्रूचं रक्षण करेल. बाकी सारं मात्र आहे तसंच चालू राहील.
याला म्हणतात मुजोरी. लॅरीची ही मुजोरी तो मरेपर्यंत कायम राहिली, हे विशेष! खूप पुढे लॅरीनं ‘बेअरली लीगल’सारखी काही स्वतंत्र मासिकं काढली आणि निव्वळ हार्ड कोअर आणि खरीखुरी पोर्नोग्राफी दाखवणारे आणि चोवीस तास चालणारे स्वतःचे केबल टीव्ही चॅनेल्स पण सुरू केले. लॅरीचं खासगी आयुष्य काही खूप हेवा करावं असं नव्हतं. पैसा भरपूर होता, पण सुख नव्हतं. कंबरेखालचं लुळंपण कायम राहिलं. त्याच्या स्वतःच्या मुलीनं त्याच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप लावले. त्याच्या धंद्यात त्याला मदत करणाऱ्या पुतण्यांशी त्याचं बिनसलं. तो राजकारणात शिरला आणि निवडणूक लढवण्याचा त्यानं प्रयत्न केला. पण तिथे तो विजयी झाला नाही. त्याच्या जीवनावर ‘The People Vs. Larry Flint’ या नावाचा एक चित्रपट निघाला. इंटरनेटच्या जमान्यात त्यानं छापील मासिकांसोबत डिजिटल आवृत्त्याही प्रकाशित केल्या. गेल्या महिन्यात (१० फेब्रुवारी २०२१) तो वयाच्या ७८व्या वर्षी मरण पावला.
लॅरी फ्लिंट हा पोर्नोग्राफीच्या क्षेत्रातला एक महत्त्वाचा दुवा होता. पण हा धंदा करणारा तो काही एकमेव इसम नव्हता. असे शेकडो पोर्नोग्राफर आज जगभरात पसरले आहेत. त्यांच्या दुनियेत अनेक बिलियन (अब्जावधी) डॉलरची उलाढाल दर वर्षी होत असते. पोर्नोग्राफी पूर्वीही होती. पण ती भूमीगत होती. तेव्हा तिचे चटके आजच्यासारखे प्रखर नव्हते. लॅरीनं तिला ‘सन्मानानं’(?) सार्वजनिक केलं, खुलेआम तिचा प्रचार - प्रसार केला. त्याचंच अनुकरण पुढे जगभरात केलं जाऊ लागलं.
आज पोर्नोग्राफी एखाद्या विषवल्लीसारखी, खरं तर करोनाच्या विषाणूसारखी, सर्वत्र फोफावली आहे. तिचं दाहक स्वरूप, भेसूर चेहरा अनेकांना (विशेषतः तरूण वर्गाला) आकर्षित करतो आहे. ड्रग्ज किंवा दारूचं व्यसन लागावं तसं पोर्नोग्राफीचं व्यसन लोकांना लागलेलं आहे. अत्यंत सुलभतेनं कोणीही, कधीही, कुठेही पोर्नोग्राफी वाचू/बघू शकतो. ती नव्या नव्या अवतारांत प्रकट होते. फोन सेक्स, लाईव्ह चॅट, लाईव्ह शो, हेंटाई (अॅनिम आणि मॅंगा कार्टून), चाइल्ड सेक्स, रेप म्हणजे बलात्कार, गॅंग रेप, लैंगिक अत्याचार, आत्यंतिक क्रूरता, लैंगिक गुलामगिरी, इन्सेस्ट (म्हणजे स्वतःच्याच कौटुंबिक सदस्यांसोबतचा सेक्स) - अशा अनेकानेक भयावह प्रकारांतून आज पोर्नोग्राफी साऱ्या जगात धुमाकूळ घालते आहे.
नॉर्मल सेक्सप्रमाणेच विकृत सेक्स हीदेखील आज एक सामान्य बाब झाली आहे. लाखो अल्पवयीन मुलामुलींप्रमाणेच तरुण आणि वयस्क लोकही पोर्नोग्राफी बघतात, त्यासारखं प्रत्यक्ष जीवनात वागायला जातात, आणि स्वतःसोबत समाजाचंही एकंदरीतच नुकसान करतात. हे सारं कृत्रिम आहे, खोटं आहे, हे त्यांच्या पचनी पडत नाही. ते या आभासालाच खरं मानतात आणि त्याच दुनियेत जगतात. फार क्लेषकारक अशी ही परिस्थिती आहे. यातून मार्ग कसा निघणार?
एक गोष्ट तर नक्की आहे की, वेश्या, दारू, ड्रग्ज या प्रमाणेच पोर्नोग्राफीदेखील या दुनियेतून कधीच नाहीशी होणार नाही. या मार्गातून ज्यांना पैसा कमवायचा आहे, ते असं होऊ देणार नाहीत. कितीही कडक कायदे केलेत तरी ज्यांना पोर्नोग्राफी बघायची आहे, तेही त्यातून मार्ग काढतीलच. पोर्नोग्राफी हे एक प्रकारचं FMCG आहे - फास्ट मुव्हिंग कंझ्युमर गुड्स - शीघ्र विकलं जाणारं प्रॉडक्ट. एकानं नाही म्हटलं तर दुसरा कोणीतरी ते विकत घेईल. पण वेश्या, दारू, ड्रग्ज या प्रमाणेच हाही एक धंदा आहे. तो ग्राहकाअभावी कधीच बंद पडणार नाही. त्याला समाजात उजागिरीनं आणण्याचं आणि त्याचा खप वाढवायचं बऱ्यापैकी ‘श्रेय’(?) लॅरी फ्लिंटकडे जातं.
पोर्नोग्राफीच्या या यशाचं रहस्य पुरुषी अहंकारात (Vanity आणि ego) आहे. चाणाक्ष लॅरी हे जाणत होता. बहुसंख्य पुरुषांना आपला ‘लिबिडो’ (Libido, कामवासना) एखाद्या ज्वालामुखीप्रमाणे सदैव धुमसत रहावा असं वाटत असतं. वयोपरत्वे किंवा वैद्यकीय कारणांनी या कामवासनेची तीव्रता कमी होत जाते किंवा नाहिशी होते. पण हे सत्य स्वीकारायला अनेक पुरुष तयार नसतात. कसंही करून आपलं पौरुषत्व चिरकालिक आहे, हे त्यांना सिद्ध करून दाखवायचं असतं. याचे पहिले प्रयोग अर्थातच पत्नीवर होतात. मग बाहेर कोणावर तरी. आपली मर्दानगी वाढवायला ते प्रसंगी वाजिकरणाचा तर अनेकदा पोर्नोग्राफीचा आधार घेतात. पॉर्न सिनेमांत दिसणाऱ्या दणकट हिरोप्रमाणे आपलं लिंगही किमान आठ-दहा इंच लांबीचं असावं, अशा असुयेनं ग्रासलेले अनेक पुरुष आपल्या लिंगाची लांबी आणि जाडी वाढावी, यासाठी उपाय करून घेत असतात. हे प्रयोग कधीच सफल होत नाहीत हे ते विसरतात. (मुळात, सेक्सचा आनंद घ्यायला चार ते पाच इंचाचंही ताठूर लिंग पुरेसं असतं. आठ इंच किंवा त्यापेक्षा जास्त लांबीच्या लिंगाचा उपसर्गच होतो. ते अॅसेट नसून एक ब्याद असते. पण हे या लोकांना कळत नाही!)
पडद्यावरचा हिरो अर्धा अर्धा तास किंवा जास्त वेळ संभोग करत असतो. कामतृप्तीच्या क्षणी (orgasm) पडद्यावरच्या बायका वेडेवाकडे आवाज काढतात. हे सगळं खोटं असतं. हे असं मैदानात दीर्घ काल टिकून राहण्यासाठी पडद्यावरचा हिरो स्टिरॉईड्स घेतो, लोकल अॅनस्थेसिआ वापरून ताठ लिंगाला काही वेळासाठी बधीर करतो, ते घाणेरडे आवाज प्रोफेशनल कलाकारांकडून साऊंड स्टुडिओत वेगळे रेकॉर्ड केले जातात आणि नंतर ‘डब’ (dub) केले जातात. पडद्यावर दिसणारे अनेक कलाकार मुळात गरीब असतात, भुकेले असतात, दिवसाला २०-२५ डॉलर तरी मिळावेत यासाठी ते आपलं मन, लाज, अब्रू हे सारं विसरून, गुप्त रोगांचे बळी होण्याचा धोका पत्करून, असुरक्षित (unsafe) सेक्स पडद्यावर साकारतात. वयाच्या ३०-३५ या वयातले अनेक कलाकार रोगग्रस्त होऊन, किंवा वय वाढलं म्हणून काम न मिळाल्यानं, किंवा नैराश्यानं मृत्यूमुखी पडतात. यातलं काहीसुद्धा पोर्नोग्राफीच्या बहुसंख्य प्रेक्षकांना माहीत नसतं. असलं तरी त्यांना त्याच्याशी काहीच घेणं-देणं नसतं. त्यांना फिकीर असते, ती फक्त स्वतःच्या कामतृप्तीची.
बहुसंख्य पुरुषांमधल्या या कमजोरीची फ्लिंटला कल्पना होती. पोर्नोग्राफीचं यशस्वी मार्केटिंग करण्यासाठी त्यानं यासोबतच आणखी दोन गोष्टी केल्या. एक म्हणजे त्यानं अशा प्रेक्षकांना फॅंटसीच्या, कल्पनाविलासाच्या घोड्यावर स्वार केलं. वासनांध प्रेक्षक स्वतः जे जे करू शकत नाहीत, ते ते तो त्यांना दुसऱ्यांच्या माध्यमातून दाखवायचा. एक प्रकारचा हा ‘परकाया प्रवेश’च असतो. पडद्यावरचा किंवा फोटोतला हिरो सेक्स करताना जे जे माकडचाळे करतो, ते सर्व आपणच करतो आहोत, अशी भावना प्रेक्षकाला ते बघताना होते. प्रेक्षक मनानं हिरोच्या शरीरात घुसतो आणि आपणच हिरॉईनशी सेक्स करतो आहोत, असं समजू लागतो. या अशा प्रकारच्या तादात्म्यातून त्याच्या उफाळलेल्या कामवासनेचं विरेचन होतं. हा झाला ‘लैंगिक कॅथार्सिस’.
यापेक्षा वेगळी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लॅरीनं पुरुषातल्या वर्चस्वाच्या मानसिकतेला खतपाणी घातलं. स्त्री ही केवळ उपभोगाची वस्तू असून तिला कोणतंही स्वतंत्र अस्तित्व असू शकत नाही, पुरुषानं कितीही अत्याचार केले तरी तिनं ते निमुटपणे सहन केले पाहिजेत, या प्रकारच्या डॉमिनेशनच्या जुलुमी प्रवृत्तीतून, exploitation म्हणजे शोषणवृत्तीतून पुरुषांमध्ये जो अहंकार जन्माला येतो, त्याला लॅरीनं कुरवाळलं, जोपासलं. हा पुरुषी अहंकारच मुळात पोर्नोग्राफीचा पाया आहे. स्त्रीला जितकं तुच्छ, लाजिरवाण्या अवस्थेत दाखवतात येईल, तेवढं दाखवायचं. यानं पुरुष प्रेक्षकांचा अहंकार सुखावतो. पोर्नोग्राफी हे मुळातच समस्त स्त्रीवर्गाला घृणास्पद रीतीनं अवमानित करण्याचं, पुरुषी वर्चस्वाच्या भावनेतून आणि अतृप्त वासनेतून जन्मलेलं एक हत्यार आहे. लॅरीचे ही तीनही बाण अगदी योग्य ठिकाणी लागले आणि त्यामुळे तो त्याच्या धंद्यात जम बसवू शकला.
लॅरीवर इतरही अनेक आरोप आहेत. त्यातले ठळक म्हणजे तो रेसिस्ट म्हणजे वर्णविद्वेषी होता, तो मिसोजनिस्ट (misogynist) म्हणजे स्त्रीद्वेष्टा होता, कोणाचाही विरोध सहन न करणारा होता, इत्यादी.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
असा हा लॅरी फ्लिंट आता मेला आहे, पण त्यामुळे पोर्नोग्राफी अनाथ झाली असं मुळीच नाही. असे शेकडो लॅरी फ्लिंट जगभरात अजूनही आहेत, आणि उद्याही जन्माला येतील. मेलेला लॅरी फ्लिंट ही फक्त एक व्यक्तीच नव्हती. विकृत मानसिकतेचा आणि प्रवृत्तीचा तो एक सार्वजनिक प्रतिनिधी होता. तो असा एक मुखवटा होता की, ज्याच्या आड लपून अनेक लोकांना विकृत नजरेनं पण उजागिरीनं जगाकडे पाहता येई, स्वखुशीनं अतृप्त वासनांच्या पूर्तीसाठी पोर्नोग्राफीच्या गर्तेत जाता येई.
एके काळी पोर्नोग्राफिक सिनेमे मीदेखील पाहिले होते. पण तेव्हा मी उकळत्या हार्मोन्सनं उतू जाणारा टीनएजर होतो. मात्र हा पहिला आवेग ओसरल्यावर, विशीनंतर कायद्याचं शिक्षण घेताना हळूहळू विचारांत परिपक्वता येऊ लागली. वैचारिक वाचन वाढलं. जगाकडे, विशेषतः स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला. त्यामुळे पोर्नोग्राफीच्या दृष्य चेहऱ्यावरून नजर हटून तिच्या अदृश्य, डार्क, क्रूर, घृणास्पद बाजूकडे लक्ष वेधलं गेलं. मग मी या विषयाचा बराच अभ्यास केला. वकील असल्यानं या बाबतीतल्या कायद्यांचे बारकावे समजायला मला त्रास झाला नाही. त्याच वेळी मी या विषयावर कधी तरी लिहायचं ठरवलं होतं. तो योग आज इतक्या वर्षांनी लॅरी फ्लिंटच्या मृत्यूनंतर आला, एवढंच.
पोर्नोग्राफी ‘लाइलाज’ आहे. ती कधीच मरणार नाही. पण स्त्रियांकडे बघण्याची आपली मानसिकता तर आपण नक्कीच बदलू शकतो. शोषणविरहित मानवी समाज ही युटोपियन फँटसी आहे, पण ती प्रत्यक्षात आणण्यासाठी हे एक साधं पाऊल तर आपण नक्कीच उचलू शकतो. आज ‘जागतिक महिला दिन’ आहे. त्याच दिवशी हा लेखही प्रकाशित होतो आहे. सर्व स्त्रियांना आदर, सन्मानानं वागवणं, त्यांचा मान राखणं, त्यांचं शोषण होऊ न देणं, एवढी जाणीव जरी लॅरी फ्लिंटच्या उदाहरणातून पुरुषांना झाली, तरी ते सध्यापुरतं पुरेसं आहे.
..................................................................................................................................................................
लेखक हर्षवर्धन निमखेडकर वकील आहेत. वुडहाऊसचे अभ्यासकही.
the.blitheringest.idiot@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment