सोनसावरीची जादू मी खूप ऐकली होती, अनुभवली नव्हती कधी. पुण्यातल्या वेताळ टेकडीवर ही झाडे आहेत, असे मी ऐकले होते, पण नक्की कुठे आहेत, हे माहीत नव्हते.
आमच्या एक स्नेही आहेत. रमा देशपांडे नावाच्या. त्यांना झाडझाडोऱ्याचे प्रचंड वेड. सगळी झाडे ओळखता येतात त्यांना. त्यांना मी म्हणालो, ‘हा मौसमसुद्धा जाणार असाच, सोनसावरीचे दर्शन न घेता.’ दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता त्यांचा वेताळ टेकडीवरून फोन आला - ‘सोनसावर फुलली आहे. तिचा पत्ता पाठवते.’ सोनसावरीचा रानातला पत्ता!
टेकडीवरच्या पार्किंगमधून सुरुवातीला उजवीकडे वळायचे, चालत जायचे, मग वनखात्याची एक सिमेंटची टाकी लागते. तिच्या शेजारी गिरीपुष्पाचे एक झाड आहे. तिथून डावीकडे वळायचे... सगळे सांगितले त्यांनी. शिवाय टेकडीवरच्या झाडांचे आणि वनखात्याच्या सिमेंटच्या टाक्यांचे फोटो पाठवले. एवढ्या खुणा मिळाल्यावर मला खात्री झाली की, फारसे न हिंडता मला सोनसावर नक्की सापडेल. शोधण्याची वणवण करण्याचे मुख्य काम मॅडमनी केले होते. मी उन्हे उतरू दिली, कॅमेरा घेतला आणि सोनसावरीच्या शोधात निघालो...
सगळे रान आता कोरडे ठक्क झालेले. सगळ्या प्रकारची गवते शुष्क झालेली. भुरा, तपकिरी, लाल असे कितीतरी रंग गवताचे. पण सगळे कोरडे कोरडे. बहुतेक झाडांची पानगळ झालेली. सगळीकडे नुसत्या काटक्या आणि निष्पर्ण फांद्या. शिरीषाच्या वृक्षांवर आता पाने कमी आणि त्याच्या सोनेरी शेंगा जास्त असा माहौल. या सगळ्या गेल्या वर्षीच्या शेंगा. या वेळचा बहर अजून यायचा आहे. आता पालवी फुटेल आणि मग निवांतीने शिरीषाला हिरवा बहर येईल. तो त्याच्या पानांत लपून राहील. त्याचा नुसता सुगंध येत राहील. नंतर तो बहर मलई रंगाचा (cream colour) होईल. हा रंग चढल्यावर तो बहर लोकांना दिसू लागेल. पण या सगळ्याला अजून वेळ आहे. सध्या गवतांना आलेल्या शेंगा फुटण्याचे दिवस आहेत. झुडपांवर धरलेल्या शेंगासुद्धा आता फुटू लागल्या आहेत. त्यांच्या बिया मातीमध्ये पडलेल्या दिसू लागल्या आहेत.
देशपांडे मॅडमनी पाठवलेल्या खुणांवरून मी चालत राहिलो. ‘ट्रेझर हंट’वर निघाल्याचा फील मला आला. मी त्या खुणांवरून चालत राहिलो, मोठी पायवाट, मग एक गिरिपुष्पाच्या जवळची वनखात्याची टाकी, मग एक पुसटशी पायवाट. मग अजून एक खाली आडवी पडलेली टाकी. मॅडमनी सांगितलेल्या एकाएका खुणेवरून मी त्या शांत आणि वैराण रानातून चालत राहिलो. आणि एके क्षणी अचानक एका झाडावर सोन्याची प्रभा उमललेली दिसली! सोनमोहर फुललेला!! झाडावर एकसुद्धा पान नाही. नुसत्या फांद्या! करड्या खोडातून फुटलेल्या तपकिरी फांद्या आणि त्यांच्यावर तीनतीन-चारचारच्या झुबक्यात फुललेली तेजस्वी फुले...
सगळे झाड एकटेच फुललेले. आपल्यातच मग्न असलेले. आजूबाजूला कुठेच, कसलाही बहर नाही, काही नाही. त्या वैराण रानात हे असले एकट्याने फुलणे. आणि तेसुद्धा असे झगझगीत सोनेरी आणि पिवळ्या अनुपम प्रभेने... काय बोलावे? मी अनिमिष नजरेने बघत राहिलो. या वैराणीमध्ये, या पर्णरहित झाडोऱ्यावर या असल्या सौंदर्याचे असे अवतरण! कुणाला स्वप्नातसुद्धा पाहता येणार नाही असे!! सौंदर्याचे सोनेरी अवतरण!!!
डॉ. अली अहमद अब्बास उम्मीद यांचा एक शेर आहे -
भूरी शाखों से नये फूल गले मिलते हैं
दूर तक शोर है ख़्वाबों के कंवल खिलते हैं
इतक्या कोरड्या फांद्यांवर सोन्याची फुले फुलत असतील तर वैराण आयुष्यालासुद्धा स्वप्नांची कमलपुष्पे लगडत असतीलच की! निदान तशा अफवा उठायला काय हरकत आहे?
सोनसावरीची अजून काही झाडे दिसत आहेत का, हे बघण्यासाठी चौफेर नजर फिरवली. उजव्या बाजूला अजून चार-पाच झाडे दिसली. सगळ्यांचे शेंडे झगमगून उठलेले.
जोबन पर इन दिनों है बहार-ए-नशात-ए-बाग
बागेवर आजकाल वसंताची नशा चढलेली आहे आणि वसंताची नशा सौंदर्यावर चढलेली आहे. नशीला वसंत, नशीली बाग आणि नशीले सौंदर्य!
मुनीर शिकोहाबादीने सोनसावर कधी पाहिली असेल का?
सौंदर्यावर वसंताची नशा स्वार होणे! किती तरल होत जातो माणूस सौंदर्याच्या स्पर्शाने!
मी बघत राहिलो. छायाचित्रं घेत राहिलो. कळेना हा कुठला पिवळा रंग. कधी पाहिलाच नव्हता. बिट्ट्याच्या फुलांचा पिवळा, सोनकीच्या फुलांचा पिवळा, शंकासुराच्या फुलांचा पिवळा, डॅफोडिल्सचा पिवळा, पिवळ्या गुलाबाचा पिवळा आणि मुख्य म्हणजे संपूर्ण शेतावर पसरतो तो सरसोंच्या शेताचा पिवळा. किती छटा! पण सोनसावरीचा पिवळा काही वेगळाच! याचे तेजच काही वेगळे! कसलीतरी आभा यात लपलेली होती. कसलीतरी आभा या पिवळ्या रंगात मिसळलेली होती!
एक फूल खाली पडलेले होते. अगदी जवळून पाहता आले. त्या पिवळ्याला मी नाव दिले - ‘विलक्षण पिवळ’! कारण, पिवळ्या रंगांच्या सगळ्या लक्षणांच्या पलीकडचा पिवळा रंग होता तो! त्या वि-लक्षण पिवळ्याच्या आत पराग कोशांचा सोनेरी रंग! तोसुद्धा मॅट फिनिश सोनेरी. केशरी रंगामध्ये क्रीमिश पिवळा मिसळला की, मॅट फिनिश असलेला सोनेरी रंग तयार होत असेल का?
या झाडाच्या विविध रंगांपासून उत्क्रांत होत गेला का हा सोनेरी रंग?
या झाडाच्या पांढऱ्या करड्या आणि कोरड्या दिसणाऱ्या जुन्या फांद्या. त्यातून ब्राऊन रंगांच्या कोवळ्या फांद्या बाहेर आल्या. मग त्या कोवळ्या फांद्यांमधून डार्क ब्राऊन टपोऱ्या कळ्या बाहेर आल्या. त्या डार्क ब्राऊन टपोऱ्या कळ्यांमधून पांढरटसर पाकळ्या बाहेर येऊ लागल्या. बाहेर येता येता, त्या कळ्या या ‘विलक्षण’ पिवळ्या रंगांच्या कधी झाल्या? आणि रंगांच्या या सगळ्या उलाढालीत फुलाच्या मध्यभागी मॅट फिनिशचा सोनेरी रंग कसा पोहोचला? विलक्षण पिवळा आणि मॅट फिनिश केशरी रंगांचे हे कॉम्बिनेशन कुणी केले. कसे केले?
वाऱ्यावर फुलं हलत होती. प्रकाश किरण तिरपे होत चालले होते. तो विलक्षण पिवळा आता कधीकधी सोनेरी पिवळा वाटू लागला होता. ती फुले आता सोन्याची फुले आहेत, असे वाटू लागले होते.
मी कॅमेऱ्याला मोठी लेन्स लावली. झाडावरच्या फुलांची छायाचित्रं घेतली. लेन्समुळे परागकोश आता जास्त स्पष्ट दिसू लागले. सूर्य कलला होता. तिरक्या प्रकाशकिरणांमुळे परागकोशांच्या सावल्या पाकळ्यांवर पडलेल्या दिसल्या. आणि मग दिसला मध्यभागी असलेला स्त्रीकोश - फिकट हिरव्या रंगाचा! का पिस्ता कलरचा? साक्षात नजरबंदी!
खाली पडलेल्या फुलांचा क्लोज-अप घेता येतो, पण त्या फुलाचे सगळे रंग जिवंत राहिलेले नसतात. झाडावर हसणाऱ्या फुलाचा क्लोज-अप खरा. या नवनवीन लेन्सेस आल्या आहेत म्हणून हे सौंदर्य पाहायला तरी मिळते आहे. लेन्सेस कवींसारख्याच असतात - आपल्याला न दिसणारे सौंदर्य आपल्या जवळ आणतात!
मी त्या फुलांकडे बघत राहिलो. सौंदर्याला वसंताची नशा चढल्याशिवाय ही सर्जनशीलता शक्यच नाही!
नशा नशा सा हवाएँ रचाए फिरती हैं
खिला खिला सा हैं मौसम तिरे सँवरने का
हा शेर सईद आरिफने आपल्या प्रेयसीवर लिहिलेलाच नाहीये मुळी. हा शेर त्याने लिहिला आहे- नटखट सोनसावरीवर. तिचे आत्ममग्न नटणे हाच मौसम, तिचे नटणे हाच वसंत! बाकी बाहेरच्या वैराण आसमंताला काही अर्थ नाही. त्या करड्या आसमंताकडे या रंगांच्या उधळणीला फक्त कॉन्ट्रास्ट पुरवायचे काम दिले गेलेले असते.
कुठून आले असेल हे सौंदर्य? गालिबने त्याचा स्वतःचा अंदाज या बाबतीत लढवलेला आहे -
सब कहाँ, कुछ लाला-ओ-गुल में नुमायाँ हो गई
ख़ाक में क्या सूरतें होंगी, कि पिन्हाँ हो गईं
या जगात पूर्वी येऊन गेलेले सुंदर चेहरे या फुलांमधून पुन्हा व्यक्त झाले आहेत काय? राखेमध्ये आणि मातीमध्ये सगळे चेहरे थोडेच लपून बसणार आहेत कायमसाठी? सौंदर्याची माती होते, हे खरे आहे, पण मातीमधून सौंदर्य पुन्हा पुन्हा व्यक्त होतच राहते की! गालिबच्या मते पूर्वीच्या सुंदर सुंदर स्त्रियाच सुंदर सुंदर फुले होऊन पुन्हा पुन्हा व्यक्त होत राहतात. गालिबची सौंदर्यासक्ती आणि त्याचा आशावाद - दोन्ही बेफाम!
मी त्या फुलांकडे बघत बसलो. त्या अप्रतिम फुलांना कशाचे काही घेणे देणे नव्हते. मी त्यांच्यात का रमत होतो? मी त्यांच्याकडे अनिमिष नजरेने का बघत होतो? तरुण मुली सतत स्वतःत मग्न असतात, तशी ही फुलं स्वतःमध्ये मग्न वाटत होती. मला या फुलांकडे बघून नक्की काय मिळत होते? ही कसली ओढ? सौंदर्याची की आणखी कशाची?
हम हैं मुश्ताक़ और वो बे-ज़ार
या इलाही ये माजरा क्या है
माझ्यात इतकी खळबळ माजली आहे. आणि गंमत म्हणजे ज्या फुलांमुळे ही खळबळ माजली आहे, ती फुले मात्र आपल्या स्वतःतच रमलेली आहेत. हे ईश्वरा हा नक्की काय गोंधळ आहे? एक रमत जातो आणि दुसरा तटस्थ राहतो, असे का? ही नक्की काय भानगड आहे?
सौंदर्यात माणूस का रमतो? आणि त्याच वेळी सौंदर्य मात्र माणसाविषयी उदासीन का असते? गालिबला हे कोडे कधीही सुटले नाही. गालिब म्हणजे पागल माणूस! सौंदर्य पाहिलं की, माणसाच्या अंतरात काहीतरी होतं. गालिब म्हणतो की, त्या जखमा असतात. गालिब पागल होता म्हणून त्याला असं वाटत होतं का? का सौंदर्याच्या नादी लागलं की, शेवटी दुःखच तयार होते, हे गालिब अनुभवाने जाणत होता?
फिर जिगर खोदने लगा नाख़ुन
आमद-ए- फ़स्ल-ए-लाला-कारी है
नखे आपोआप हृदयात रुतत चालली आहेत, फुलांची सुगी जवळ आली आहे. या असल्या जीवघेण्या संवेदनशील कवितेमुळे गालिब आज दीडशे वर्षं झाली लोकांच्या मनात जिवंत राहिला आहे. त्याच्या कवितेचे सौंदर्य सोनसावरीच्या ‘विलक्षण’ पिवळ्या रंगासारखे आहे. सगळ्या सौंदर्याच्या पलीकडचे सौंदर्य.
गालिबची जी मनोवस्था असे, त्याप्रमाणे निसर्ग त्याला प्रतीत होत असे. निसर्ग आपल्याशी हितगूज करतो आहे, असे गालिबला वाटत असे.
बाग़ तुझ बिन गुल-ए-नर्गिस से डराता है मुझे
चाहूँ गर सैर-ए-चमन आँख दिखाता है मुझे
तू बरोबर नसलीस तर ही बाग मला तिच्या फुलांच्या डोळ्यांनी भीती दाखवते. मी बागेत फेरफटका मारायचा विचार जरी केला तरी ही बाग डोळे वटारून माझ्याकडे बघत राहते. मला पूर्वी वाटायचे दारू पिऊन पिऊन गालिबचे डोके फिरले होते, म्हणून त्याला असं वाटत असेल. पण तसं बघायला गेलं तर आज मी सोनसावरीच्या फुलांशी थोडंतरी हितगूज केलेच की! गालिबला आणि त्याच्या दारूला कशाला दोष द्यायचा? त्याच्यात हिम्मत होती जे जाणवले ते लिहून टाकण्याची, त्याने लिहून टाकले. मी विचार करत बसलो. लोकांनी आपल्याला वेडं म्हणू नये म्हणून बोललो नाही. कितीतरी लोक याच भीतीने भावनांचे गाठोडे उरात दाबून ठेवून देतात.
गालिब लिहून जातो -
शेरों की इंतिख़ाब ने रुस्वा किया मुझे
मी जे लिहिण्यासाठी जे शेर निवडले त्यामुळे मी बदनाम झालो. बदनाम तर बदनाम, पण आपल्या हृदयावरचा भार तर गालिबने हलका केला!
सौंदर्य माणसाला बोलायला लावते. त्याच्या मनाचे लपलेले पदर त्यालाच उलगडून दाखवते. त्या उलगडलेल्या पदरांच्या कहाण्या गालिब आपल्या ग़ज़लेमध्ये बंदिस्त करतो. त्याचसाठी तर उर्दूचा खडक फोडत फोडत त्याची कविता वाचाविशी वाटते. उन्हात खूप चालून सोनसावरीचे बन गाठायचे आणि उर्दू फोडत फोडत गालिब वाचायचा, दोन्हीचा ‘मकसद’ एकच - सौंदर्याची ओढ! सौंदर्यामुळे आपल्या मनाचे लपून राहिलेले भरजरी पदर आपल्याच पुढे उलगडत जातात.
आपण फुलांकडे गेलो, सौंदर्याकडे गेलो की, आपल्यात आणि निसर्गात काही तरी देवाणघेवाण होतेच.
मैं चमनमें क्या गया, गोया दबिस्ताँ खुल गया
बुलबुलें सुनकर मिरे नाले, ग़ज़लख्वाँ हो गईं
मी बागेत काय गेलो आणि माझ्या मनात उठणारे नाद ऐकून बुलबुल स्वतः ग़ज़ल गायन करू लागले. नंतर मी दोन आठवडे सोनसावरीकडे जात राहिलो. तिच्याकडे बघत राहिलो. काही फुले गळून पडत होती. त्यांच्या जागी सोनसावरीची तपकिरी फळे लगडत होती. खूप फुले पडली. खूप फळे लगडली. खाली गवतावर पडलेली फुले हसत होती. गालिबने लिहिलेलेच आहे -
इशरत-ए-क़तरा दरिया में फ़ना हो जाना
दर्यामध्ये जाऊन स्वतःचा नाश करून घेणे हाच परमोच्च आनंद असतो, पाण्याच्या कुठल्याही थेंबाचा!
दोन आठवडे रंगलेले सोनसावरीचे तीव्रकोमल सुवर्णनाट्य संपत आले होते. मला वाईट वाटत राहिले. त्या रानातून परत येत असताना गालिबची ओळ पुन्हा पुन्हा मानात येत राहिली -
नखे आपोआप हृदयात रुतत चालली आहेत, फुलांची सुगी जवळ आली आहे.
शेवटच्या भेटीत मी सोनसावरीच्या त्या बनाला एकदा शेवटचे पाहून घेतले. आता पुन्हा भेट पुढच्या वसंतात.
देशपांडे मॅडमना धन्यवाद देण्यासाठी मी फोन केला. त्या कामात होत्या. म्हणाल्या, मीटिंग संपली की फोन करते. मी घरी येऊन सोनसावरीची खूप छायाचित्रं त्यांना पाठवून दिली. ‘रावसाहेब’ या व्यक्तिचित्रात पु.लं.नी सुरांच्या भुताबद्दल लिहिले आहे. सौंदर्याचेही असेच एक भूत असते का? हे भूत मानेवर बसले असेल तरच कळते की, देशपांडे मॅडमना वयाच्या साठीमध्ये असताना सोनसावर शोधायला पहाटे का निघावेसे वाटले?
का हेच निर्मळ आयुष्य आहे? मॅडम आमच्या ग्रूपबरोबर कधीकधी सिंहगडावर येतात. दर वेळी त्या निसर्गातून त्यांचा पाय निघत नाही. दर वेळी आम्हाला सांगतात - ‘पोरांनो घरी जाऊन सांगा- मी इथेच राहिले आहे निसर्गामध्ये.’
..................................................................................................................................................................
अधिक माहितीसाठी पहा - https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
मॅडम असं म्हणाल्या की, पूर्वी मला हसू यायचे. मी आमच्या दत्ता दंडगेला म्हणालोदेखील की, ही बाई एके दिवशी कुठल्या तरी सुंदर जंगलाचा हात धरून हे जग सोडून पळून जाणार आहे...
गालिब असो, शिकोहाबादी असो, देशपांडे मॅडम असो, हे लोक निर्मळपणे निसर्गाचे होऊन जातात. मला कुठल्याही सौंदर्यामध्ये बेभान व्हायला होत नाही. विचार, निरीक्षणे, प्रश्न आणि तत्त्वे सुटत नाहीत. मला सोनसावरीसारखे संपूर्ण आत्ममग्न आणि आत्मरत होता येत नाही.
मी परत येताना मोठ्या पाऊल वाटेवर चालू लागलो. दोन इंजिनियर इलेक्ट्रॉनिक्सवर गप्पा मारत चालले होते. डावीकडच्या झाडीमध्ये केवढे नाट्य लपले आहे, याचा त्यांना थांगपत्ता नव्हता. माझ्या मनात नीत्शेचे वाक्य आले -
And those who were seen dancing were thought to be insane by those who could not hear the music.
नाचणारे लोक वेडात नाचत आहेत, असे संगीत ऐकू न येणाऱ्या लोकांना नेहमीच वाटत राहते.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
मी घरी परत आलो. आता हळूहळू अंधार पडला. मी आता सोनसावरीकडे पुन्हा जाणार नव्हतो पुढच्या वर्षीपर्यंत! त्या सोनेरी प्रतिमा मात्र डोळ्यासमोर तरळत राहिल्या. सौंदर्याचा वियोग होतो. आपण त्या सौंदर्यावर आणि त्याच्या वियोगावर विचार करत राहतो. हेच माणसाचे आयुष्य आहे का?
याद थीं, हम को भी, रँगारँग आराइयाँ
लेकिन अब नक़्श-ओ-निगार-ए-ताक़-ए-निसियाँ हो गईं
गालिब म्हणतो आहे - ‘मलाही रंगांच्या मैफिली खूप दिवस आठवत राहिल्या. पण, आता इतक्या दिवसांनंतर मात्र त्या विस्मरणाच्या कोनड्यातील प्रतिमा झाल्या आहेत.’
पुढच्या वर्षी या विस्मरणाच्या कोनाड्यातील सोनसावरीच्या प्रतिमा जिवंत करण्यासाठी मी पुन्हा एकदा वेताळ टेकडीवर जाईन. तेव्हा त्या साऱ्या प्रतिमा पुन्हा एकदा सोनसावरीची सोनेरी फुले म्हणून पुन्हा एकदा उमलून आलेल्या असतील का?
..................................................................................................................................................................
लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.
sjshriniwasjoshi@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment