‘पटेली’ समकालीन मराठीतील भाषिक, सांस्कृतिक, राजकीय व्यवहाराबाबत बरंच काही बोलू पाहत असली तरी हे काम यापूर्वीच आणि अधिक प्रभावीपणे झालेलं आहे!
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
अक्षय शेलार
  • ‘पटेली’ या कादंबरीचे मुखपृष्ठ
  • Thu , 04 March 2021
  • ग्रंथनामा शिफारस पटेली Pateli अविनाश उषा वसंत Avinash Usha Vasant गणेश मतकरी Ganesh Matkari प्रणव सखदेव Pranav Sakhdev

समकालीन साहित्यात, आणि विशेषतः उत्तर आधुनिक चळवळीचा प्रभाव असणाऱ्या लेखकांच्या लेखनात विखंडिततेला (फ्रॅग्मेंटेशन) अनन्यसाधारण महत्त्व दिसतं. गणेश मतकरी, प्रणव सखदेव यांच्या लिखाणापासून ते नंदा खरेंसारख्या ज्येष्ठ लेखकाच्या ‘उद्या’ (मनोविकास प्रकाशन) या कादंबरीपर्यंत अशा विखंडिततेचं अस्तित्व दिसून येतं. अर्थात, सभोवतालच्या जगात अशा प्रकारचं फ्रॅग्मेंटेशन दिसत असताना साहित्यात त्याचं अस्तित्व असणं काहीसं साहजिक मानता येईल. एखादं पुस्तक अथवा वर्तमानपत्र वाचत असताना कुणाचा तरी फोन येणं नि त्या फोननंतर पुस्तकाकडे वळायचं सोडून मोबाईलमधील एखाद्या ॲपकडे वळणं, मधल्या काळात आपल्याला पुस्तक वाचायचं आहे याची विस्मृती होणं, हा अनुभव अनेकांकरता अगदी रोजचाच झाला आहे. अशात साहित्यात जर प्रत्यक्ष आयुष्याच्या जवळ जाणारा अनुभव कथन करायचा असेल, तर त्यात असं विखंडन दिसण्यात काहीच गैर नाही. मात्र, हे विखंडन मूळ कलाकृतीच्या आशयाला, प्रभावाला मारक ठरणारं असू नये, इतकी अपेक्षा असते. नसता अशा प्रकारच्या कलात्मक निर्णयाला एखाद्या गिमिकचं स्वरूप प्राप्त होण्याची शक्यता अधिक असते. अशा प्रकारचं लेखन चांगलं की वाईट किंवा परिणामकारक की अपरिणामकारक, या प्रश्नांची उत्तरं व्यक्तीसापेक्ष आणि कलाकृतीनुसार बदलत जाणारी असतात. 

नॉन-लिनिॲरिटी आणि त्यातून निर्माण होणारं विखंडन हे एखाद्या कलाकृतीमध्ये कितपत प्रभावी ठरतं, हे त्या कलाकृतीच्या एकूण आकृतिबंधावर ठरण्याची शक्यता अधिक. उदाहरणार्थ, कथेमधील विखंडन आणि कादंबरीतील विखंडन यात फरक आहे. कारण, कादंबरीमध्ये विखंडिततेतून एक विशिष्ट अशी एकसंधता निर्माण होणं आवश्यक असतं. जेणेकरून कादंबरी या आकृतिबंधात अपेक्षित असलेला एकजिनसीपणा साधला जाऊ शकतो. कथेसारख्या आकारानं लहान असलेल्या कलाकृतीत हे एकवेळ चालून जाऊ शकतं, मात्र दीर्घ कथन असणाऱ्या कादंबरीसारख्या कलाकृतीत उत्तर आधुनिक असणं आणि एकजिनसी असणं यांचा मेळ साधला जाणं गरजेचं असतं.

गणेश मतकरी यांचं ‘खिडक्या अर्ध्या उघड्या’ (मॅजेस्टिक प्रकाशन) हे कथासंग्रह आणि कादंबरी यांच्या सीमारेषेवर असणारं पुस्तक किंवा नंदा खरे लिखित ‘उद्या’ ही कादंबरी, ही अशा प्रकारच्या नॉन-लिनिअर, तरीही दीर्घ लेखनाला न्याय देणाऱ्या पुस्तकांची सार्थ उदाहरणं. अविनाश उषा वसंत यांच्या (कथात्म) लेखन क्षेत्रातील पदार्पण असलेल्या ‘पटेली’ या कादंबरीमध्ये अशाच प्रकारचं विखंडन आहे. यात ६२ छोट्या-छोट्या प्रकरणांतून संपूर्ण कादंबरीचं कथानक उभं राहतं. 

..................................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी पहा - https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

‘पटेली’चं कथानक चर्चिण्यात विशेष अर्थ नाही. कारण कथानक आणि निवेदन हे मुक्तप्रवाही आहे. त्याला विशिष्ट सुरुवात असली, ठराविक पात्रं असली तरी त्यांच्या कृती आणि विचार यांच्यात एकसंधतेचा अभाव आहे. त्यामुळे सगळं काही तुकड्या-तुकड्यांत समोर येतं, ज्याचा अर्थ वाचकाला लावावा लागतो. तरी कादंबरीची रूपरेषा थोडक्यात सांगायची झाल्यास ती अशी — नायक आणि निवेदक आहे समुद्र पठारे (वय वर्षे ३५) नामक एक तरुण. तो मुंबईतल्या चाळीत राहतो. त्याचा आणि त्याच्या कुटुंबाचा भूतकाळ मिल संस्कृतीशी संबंधित आहे, ज्याचा उल्लेख कादंबरीत वारंवार येतो. समुद्रच्या आयुष्यात तीन स्त्रिया आहेत - ऊर्जा, गझल आणि गझलची आई — हेमा. पैकी ऊर्जा आणि गझल यांच्याबाबतीत त्याच्या मनात आकर्षण आणि प्रेम आहे, ज्याचं स्वरूप कथानकाच्या ओघात स्पष्ट (किंवा कधी अस्पष्ट) होत जातं. थोडक्यात आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या आणि सभोवतालातील सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक उलाढालींबाबत स्पष्ट मतं बाळगून असणाऱ्या समुद्रची ही कथा आहे. 

असं म्हटलं जातं की, फेसबुक, ट्विटर इत्यादी समाजमाध्यमं अस्तित्वात असण्याच्या काळात प्रत्येकाचं स्वतःचं असं राजकीय मत (यात सांस्कृतिक, सामाजिक पैलूही आले) असणं, कधी नव्हे इतकं गरजेचं आहे. अशा या कालखंडात समुद्रला फेसबुकवर व्यक्त होणं आणि स्वतःची परखड मतं बाळगून असणं गरजेचं वाटतं. अनेकदा तो प्रत्यक्ष आयुष्यातही अशी मतं व्यक्त करताना दिसतो. त्यामुळे समकालीन साहित्यिक, सांस्कृतिक, भाषिक राजकारण, ब्राह्मणी वर्चस्ववाद अशा बऱ्याच मुद्द्यांवरील मतं कादंबरीत विखुरलेली आहेत. (इथं एक नमूद करावंसं वाटतं की, लेखकाची स्वतःची मतं आणि आत्मभान असलेलं लिखाण ही उत्तर आधुनिक साहित्याची वैशिष्ट्यं या लिखाणात दिसून येतात. त्यामुळे कादंबरीतील मतं ही नायकाइतकीच लेखकाचीदेखील आहेत/असावीत, असा समज होणं क्रमप्राप्त ठरतं.)

सामाजिक-राजकीय भोवतालाविषयीची परखड मतं असणाऱ्या नायकाच्या बाबतीत ‘पटेली’ भालचंद्र नेमाडेंच्या कादंबऱ्या किंवा काही अंशी नेमाडेंचाच प्रभाव असणाऱ्या कमलेश वालावलकर लिखित ‘बाकी शून्य’च्या जातकुळीतील आहे. ज्यात कुणा ना कुणावर टीका करणारी, पात्रांच्या मनातील भावना व्यक्त करणारी लांबलचक स्वगतं आहेत. मात्र ती त्यांचं विखुरलेपण आणि गहन, गंभीर भाष्य करण्यात आलेलं अपयश, यामुळे अपेक्षित प्रभाव साधत नाहीत.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

यापुढे जात सांगायचं झाल्यास विखुरलेलं असणं आणि तुकड्या-तुकड्यातील कथन हे ‘पटेली’च्या लेखकाने हेतूपुरस्सररीत्या स्वीकारलेलं स्वरूप. मात्र ते कादंबरीच्या कथनाला मारक ठरतं. कादंबरीतील नायक जसा तुकड्या-तुकड्यांमध्ये फेसबुकवर पोस्ट्स करतो, तसंच काहीसं इथल्या बऱ्याचशा प्रकरणांबाबत घडतं. ज्यातून कादंबरीच्या आकृतीतिबंधात अपेक्षित असलेला एकसंधपणा निर्माण होत नाही. 

‘एक पुरुष, दोन स्त्रिया’ ही मूलभूत संकल्पना आणि कादंबरीभर अस्तित्वात असणाऱ्या विखंडिततेच्या दृष्टीने ‘पटेली’ ही कादंबरी प्रणव सखदेव यांच्या ‘काळेकरडे स्ट्रोक्स’ची (रोहन प्रकाशन) आठवण करून देणारी आहे. या दोन्ही कादंबऱ्यांमध्ये प्रादेशिक, जागतिक साहित्य, सिनेमांचे असलेले संदर्भ हा एक समान धागा आहे. विशेष बाब ही की, दोन्हीकडे या संकल्पनांचं अस्तित्व असताना त्यामधील दोषदेखील समप्रमाणात अस्तित्वात आहेत. स्त्री-पुरुष नातेसंबंध पुरेशा प्रमाणात प्रभावी नसणं आणि अतिविखंडन कादंबऱ्यांच्या गाभ्याला, आशयसूत्राला मारक ठरणं, हे ते दोष होत. 

समुद्रच्या आयुष्यात ऊर्जा आणि गझल या दोन स्त्रिया असल्या तरी स्त्री-पुरुष नातेसंबंधांबाबत, अशा प्रकारच्या नात्यातील अंतर्गत राजकारणाबाबत फारसं वेगळं काही येत नाही. उलट पुरुषाला त्याच्या प्रेयसी किंवा पत्नीच्या मित्रांबाबत आणि स्त्रियांना त्यांच्या प्रियकर किंवा पतीच्या मैत्रिणीबाबत वाटणारा मत्सर, असं नावीन्याचा अभाव असलेलं चित्रण इथं दिसतं. जे कादंबरीत इतरत्र अस्तित्वात असणाऱ्या पात्रांच्या पुढारलेल्या विचारांचं खंडन करतं. ही विसंगती ठळकपणे जाणवणारी आणि मुख्य म्हणजे खटकणारी आहे. (बहुजन समाजातील नायकानं उच्चवर्णीय, ब्राह्मण घरातील नायिकेच्या प्रेमात पडणं, हा आणखी एक क्लिशे.) 

कादंबरीची भाषा इंग्रजीमिश्रित मराठी किंवा मुंबईत तयार झालेली, प्रस्थ बाळगून असलेली विशिष्ट प्रकारची हिंदी यासारखे भाषिक प्रयोग (?) चित्तवेधक जरूर आहेत. मात्र, यातही एक मुद्दा खटकतो, तो म्हणजे समुद्रची बोलीभाषा (जी त्याने इतर पात्रांशी साधलेल्या संवादांत दिसते) आणि त्याने कथनासाठी वापरलेली भाषा यामध्ये तफावत आहे. संवाद आणि प्रत्यक्ष कथन यांच्यातील ही तफावत मुख्यत्वे निवेदन करत असताना येणाऱ्या बोजड शब्दांमुळे अधोरेखित होते, खटकत राहते. असं असलं तरी एकूणच कादंबरीतील भाषा हा कादंबरीचा एक महत्त्वाचा पैलू आहे.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

मुंबईतील भाषेसोबतच प्रत्यक्ष मुंबईचं वर्णन हादेखील कादंबरीमधील महत्त्वाचा भाग. अर्थात, या वर्णनाचा अतिरेक होतो की नाही, या प्रश्नाचं उत्तरही व्यक्तीसापेक्ष बदलत जाईल. 

याखेरीज आणखी एक मुद्दा म्हणजे, कादंबरीमध्ये फेसबुकवरील भाषिक संदर्भ, फेसबुकवरील कंपूंचे, तसेच विशिष्ट व्यक्तींचे संदर्भ समाजमाध्यमांशी थेट संबंध नसलेल्या वाचकांना सहजासहजी न कळणारे आहेत. त्यामुळे कादंबरी वाचत असताना ती वाचकाकडून काहीएक अपेक्षा ठेवते. त्यापैकी एक म्हणजे फेसबुकवरील संदर्भ किंवा बऱ्याचशा व्यक्ती माहीत असणं अपेक्षित आहे. यामुळे समाजमाध्यमांपासून दूर असलेला वाचक कादंबरीपासून दूर जाण्याची शक्यता उद्भवते. 

कादंबरीच्या मुखपृष्ठाचा विशेष उल्लेख करणं गरजेचं आहे. कारण नायकाचं मुंबईस्थित असणं, त्याच्या आयुष्यात चाळीला आणि कॅरमला असलेलं महत्त्व मुखपृष्ठात अचूकपणे दिसतं. कादंबरीतील आशयसूत्र आणि संकल्पना लगेचच लक्षात आणून देण्याचं काम त्यातून चोखपणे पार पडतं. प्रत्यक्ष कादंबरी कथन आणि मांडणीच्या पातळीवर गोंधळलेली भासत असली तरी मुखपृष्ठाबाबत तसं घडत नाही. 

एकूणच, ‘पटेली’ ही कादंबरी समकालीन मराठी जगतातील भाषिक, सांस्कृतिक, राजकीय व्यवहाराबाबत बरंच काही बोलू पाहत असली तरी हे काम ‘बाकी शून्य’सारख्या कादंबऱ्यांनी यापूर्वीच आणि अधिक प्रभावीपणे करून ठेवलं आहे, हेच काय ते खरं! 

पटेली : अविनाश उषा वसंत 

मुखपृष्ठ : सचिन काजारे 

प्रकाशन : ललित पब्लिकेशन, मुंबई.

पाने : १९६, मूल्य : २५० रुपये.

..................................................................................................................................................................

लेखक अक्षय शेलार  चित्रपट अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......