कवी श्रीकांत देशमुख यांचा ‘लोळणफुगडी’ हा नवा कवितासंग्रह नुकताच पार पब्लिकेशन्सच्या वतीने प्रकाशित झाला आहे. या संग्रहाला संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी लिहिलेली ही प्रस्तावना...
..................................................................................................................................................................
वारकरी, शेतकरी हा मराठी समाजजीवनाचा मुख्य प्रवाह असल्याची जाणीव पहिल्यांदा र. वा. दिघे यांच्या कादंबऱ्यांमधून व्यक्त झाल्याचे मी यापूर्वीच निदर्शनास आणले आहे. अलीकडच्या काळात या जाणिवेची कलात्मक उंची दिलीप चित्रे, अरुण कोलटकर आणि भालचंद्र नेमाडे यांच्या रचनांमुळे अधिकच वाढली. याच वारकरी जाणिवेचे नंतरच्या पिढीतील दमदार प्रतिनिधी म्हणजे श्रीकांत देशमुख. त्यांची ‘लोळणफुगडी’ ही प्रस्तुतची कवितामालिका भालचंद्र नेमाडे म्हणतात त्याप्रमाणे ‘कवीमधल्या वारकरी जाणिवेचेच एक अतिसंवेदनशील रूप आहे.’ नेमाडे यांनीच म्हटल्याप्रमाणे ‘एखाद्या आधुनिक कवीने विठ्ठल आणि वर्तमानकाळ, गावगाडा समोर ठेवून अतिशय अकृत्रिमरित्या लिहिलेली मराठी भाषेतील ही पहिलीच रचना’ आहे.
नेमाडे ज्याला गावगाडा म्हणतात, तो महाराष्ट्रामधील पारंपरिक अर्थव्यवस्थेचा कणा तर होताच, शिवाय तो मराठी संस्कृतीचे केंद्र होता. ही मराठी अर्थव्यवस्था व संस्कृती शेती पिकवणारे शेतकरी, शेतीला व शेतकऱ्यांना लागणारी सामग्री उत्पादन करणारे व सेवा पुरवणारे अलुतेदार-बलुतेदार यांच्या कर्मातून साकार झाली, याबद्दल दुमत व्हायचे कारण नाही. अठरापगड जातींच्या या मंडळींना वारकरी संप्रदायाने आध्यात्मिक व सांस्कृतिक पैस उपलब्ध करून दिला. विशेष म्हणजे जात्यतीत झालेल्या ब्राह्मणांचेही या संप्रदायाला वावडे नव्हते. त्यामुळे आपोआपच हा संप्रदाय मराठी समाजजीवनाचा मुख्य प्रवाह बनला.
विठ्ठल या देवतेचे ऐतिहासिक, पौराणिक, लोकतत्त्वीय धागेदोरे काहीही असोत, वारकरी संप्रदायाने ही देवता इतकी आत्मसात केली की, ते तिचे मध्यवर्ती प्रतीकच बनले. विठ्ठल हा पुजाअर्चेचा, नवस बोलायचा देव नाहीच. तो तुमचा सखा, सोयरा, सांगाती, विसावा सर्व काही झाला. जो वारकरी अभिव्यक्तीची अभिमुखता (Orientation) बनला. ज्ञानेश्वर, नामदेवांपासून निळोबारायांपर्यंतच्या सर्व वारकरी संतांनी विठ्ठलाला समोर ठेवून त्याच्या साक्षीनेच काव्यरचना केली. तो त्यांच्या जगण्याचे केवळ प्रतीकच नव्हे तर महासंकेतच झाला. इच्छा, आकांक्षा, भाव-भावना इतकेच नव्हे तर रागद्वेषसुद्धा, ज्याच्या समोर किंवा ज्याला उद्देशून व्यक्त करावेत, असा तो जणू हक्काचा महाश्रोता ठरला.
..................................................................................................................................................................
अधिक माहितीसाठी पहा - https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात महाराष्ट्रात ब्रिटिश सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर महाराष्ट्रातील या गावगाड्याला घरघर लागली. या घरघरीचे विदारक पडसाद त्रिं. ना. आत्रे यांच्या ‘गावगाडा’ पुस्तकात ऐकायला मिळतात. यानंतर महात्मा गांधींनी ग्रामराज्याचा पुरस्कार करूनही गावगाड्याची पुन:स्थापना करण्यात आपण अपयशी ठरलो. १९९० नंतर म्हणजे जागतिकीकरणाचे युग सुरू झाल्यानंतर परिस्थिती आणखीच गंभीर बनली. मात्र गावगाडा कोसळत असला तरी विठ्ठल अजूनही विटेवर स्थिर आहे. अशा परिस्थितीत श्रीकांत देशमुखांसारख्या वारकरी मुशीत घडलेल्या कवीला परंपरेने विठ्ठलावर शाबित केलेल्या हक्काची पुन्हा एकदा अंमलबजावणी कराविशी वाटत असेल तर स्वाभाविक आणि सुसंगतच म्हणायला हवे.
ईश्वराशी अशा प्रकारे कलह करण्याची पद्धत वारकरी परंपरेत कर्ममेळ्यापासून सुरू होते, असे म्हणता येईल. तुकोबांनी तर ती कळसाला नेली. देशमुखांच्या या कवितामालिकेची सुरुवातच कर्ममेळ्याचा अभंग उदधृत करून होते. आता हालमाकलमे । भांडुनिया काढू नर्मे॥ असे म्हणणाऱ्या तुकोबांशीही कवी संवाद साधतो.
देशमुखांच्या या कवितांमध्ये ज्याला आध्यात्मिक म्हणता येईल असा आशय तसा कमीच दिसेल. मुळात त्यांना महाराष्ट्राच्या या सांस्कृतिक संचिताला जोडून येणाऱ्या अध्यात्मापेक्षाही त्याचा समाजधर्म महत्त्वाचा वाटतो. ‘विठ्ठल रूपाने निर्माण केलेली आध्यात्मिक लोकशाही’ त्यांना ‘सामाजिक लोकशाहीचेच प्राथमिक रूपडे’ वाटते. या आध्यात्मिक लोकशाहीचे सबळ आणि सक्षम सामाजिक राजकीय लोकशाहीत रूपांतर करण्यात आपण कोठेतरी कमी पडतोय, ही त्यांची खंत आहे. तिचा राग ते विठ्ठलावर काढताना दिसत असले तरी खरे तर संतांचा वारसा सांगणाऱ्यांवर त्यांचा कटाक्ष आहे. या कटाक्षाने आत्मटीकेचे स्वरूप धारण केलेले दिसते.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
स्वातंत्र्योत्तर काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांनी जी झेप घेतली, तशी वारकरी परंपरा मिरवणाऱ्यांना का घेता येऊ नये, याचे शल्यही त्यांना सलत असल्याचे जाणवते. अर्थात त्यासाठी आंबेडकरी समूहाला गावगाड्यातून बाहेर पडावे लागले. तसे करणे यांना शक्य नाही, त्यातूनही ही व्याकुळता निर्माण होते. त्यापोटीच ते विठ्ठलाला ‘महान आसक्त अप्पलपोटा’ म्हणायला मागेपुढे पाहात नाहीत.
‘आमुचिया भावें तुज देवपण। हे विसरून राहिलाशी॥’ असा प्रश्न पूर्वी तुकोबांनी विठ्ठलाला विचारला होता. नेमका तोच सूर देशमुखांनी पकडला आहे. ‘तुका म्हणे आम्ही असूनिया जाण । तुज देवपण आणियेले ॥’ असे तुकोबा विठ्ठलाला बजावताना दिसतात. वारकरी - शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून आता देशमुखही म्हणतात-
अरे, मी तर खरा जगन्नियंता
तुझ्या आधीपासूनचा
तुझ्या जयघोषात वर्षानुवर्ष चालल्यात दिंड्या
एकतरी पताका माझी रोवू दे.
विठ्ठलाने विटेवर उभे राहण्याला देशमुख ‘समंजस व्यापारी उभेपण’’ म्हणतात आणि विशेष म्हणजे त्याला तसे उभे करणाऱ्या पुंडलिकालाही, तू विठ्ठलाला इतकी पक्की वीट का दिली, असे विचारतात. ‘कारे पुंड्या मातलासी । उभे केले विठ्ठलासी ॥’ असे तुकोबांनी एकदा कौतुकाने विचारले होते. देशमुख मात्र,
विटेवर उभं राहून
कमरेवर हात देण्यापासून
त्याचं नातं आपल्या आसमंतातील जीवजित्राबापासून कायमचं तुटलंय रे पुंडलिका
कुठं फेडशील हे पाप, कोणत्या जन्मी,'
असा धाडशी सवाल करतात.
घडवलं आम्ही तुझं पाषाणकाळं
कर कटीवर असलेलं साजरं रूप
अपार शब्दांना बांधून रचले तुझ्या नावाचे इमले
लावला जन्मोजन्मी टिळा तुझ्याच नावाचा
कपाळभर अष्टगंध, बुक्का
तुळशीची माळ गळाभरून
मंगळसूत्रं बांधल्यासारखी तुझ्या नावाची
एवढे दृढ असलेले हे नाते पण त्याचे फळ काय ? - तर,
जातोय हेलपाटत आम्ही आडवे उभे
भांगात तुझी माती भरून
मिरवतो टळटळीत वैधव्य
साहजिकच आता त्यांना विठ्ठलाला,
तू तर आमचा पिढीजात शत्रू
घरभेदी, मतलबी
मानभावी उभा उजळमाथ्यानं गाभाऱ्यात’
असे म्हणावेसे वाटते.
स्वाभाविकच आहे की नित्याचे अध्यात्म सांगणाऱ्या पारंपरिक, सांप्रदायिक कीर्तनप्रवचनकारांपेक्षा त्यांना गाडगेबाबांचे अधिक आकर्षण वाटते. गाडगेबाबांवर त्यांची एक संपूर्ण अप्रतिम कविताच आहे-
कितीही अध्यात्म सांगितलं तरी जातोय वाढत सारखा गुंता
जन्ममृत्यूच्या बाहेरचं सांगताहेत लोक
आतलं गणित नाही सुटता सुटत
की सोडवायचंच नाही कोणाला
हेही नाही कळत.
जन्माच्या अगोदरचे आणि त्याच्या नंतरचे सांगण्यापेक्षा देशमुखांना जन्ममृत्यूच्या दोन बिंदूच्या मधील प्रश्नांना हात घालणारे गाडगेबाबा जवळचे वाटतात. त्यासाठी विठ्ठलाचे रूपच बदलायला हवे या मुद्यापर्यंत ते येतात -
मला उभारायचंय
हाती आयुध घेतलेल्या विठ्ठलाचं मंदिर
विठ्ठलाच्या मांडीदंडावर गोंदायचाय मला बळीराजा
खांद्यावर नांगर घेऊन दिमाखात चालणारा
जगाला सांगणारा
मिच खरा पोशिंदा, साऱ्यांचा तारणहार
कुठल्याही आपत्तीत न डळमळणारा.
‘तुका म्हणे कुळ । तुझे बुडवीन समूळ ॥’ असे म्हणण्याची हिम्मत असलेल्या गोत्रातला हा कवी आहे -
वाईट वाटणार नसेल तर एक ऐक
तुझ्या आधी आम्हीच होतो या विश्वाचे निर्माते
तरीही दिला मान तुच निर्माता असण्याचा
या धरणीला दिला आम्ही सजीव आकार
फुंकर घालून मातीला दिला अंकूर
भिजल्या मातीवर कोरली धानाची हिर्वी लेणी
आमच्या ओठापोठातून जन्मले अभंग ओवांचे भांडार
तुझ्या नावालाही दिला आम्हीच सचेतन आकार
उभारले तुला सगुणसाकार
स्वत: होऊन निराकार....
वाटतंय राहून राहून
ही तशी चूकच झाली.
असे लिहिताना आपण कठोर होत आहोत हे या कवीलाही वाटतंय पण काय करणार?
बा विठ्ठला
तुझ्यावर कविता लिहितोय
तुझ्यासारखीच निष्ठूर
देव्हाऱ्याला लागलेल्या आगीची धग
येवो माझ्या हातात
पुढे लिहिता लिहिता देशमुखांचा स्वर निर्वाणीचा इशारा देतो -
पुन:पुन्हा तुझ्यासाठी
शब्दांची राबणूक करायला नाही मी मोकळा
आता ही कविता अखेरचीच समज
तिथं जेवला असशील तर
हात धुवायला इथं ये.
पण त्या मागची भावना परत अत्यंत हळवी अशी आहे -
टाळूला जिभ टेकत नाही
इतका फडाफडा बोलतोय रे मी
या निष्प्राण मातीमाणसांना
तुझ्या सावलीत पुन:पुन्हा
उभं करायला बघतोय रे मी.
विठ्ठलावर अशी काळजाच्या देठापासून कविता लिहिणारा कवी रूक्मिणीला विसरेल असे होणेच शक्य नाही. कवितामालिकेतील मायबाईच्या कविता रूक्मिणीला उद्देशून आहेत. देशमुख रूक्मिणीला एकूणच स्त्रीत्वाच प्रतीक बनवतात. ते विठ्ठलाला बजावतात -
अरे बाबा, तू कुठेच नव्हतास
तेव्हाही होती ही माऊली
तू मात्र दडतोयस चंद्रभागेच्या तळाशी चोरट्यासारखा
भूमी सोडून पाण्याशी दडणं वाईट असतं रे राजा.
तसेच,
अरे, बाई ही फक्त नसतेच बाई
ती असते विश्वाचे आर्त
जे तुला किंवा तुझ्या भक्तांना कधीच कळलं नाही
बाईलाही तरी कुठं कळले हे कधी
नाही तर तिनं लावलाच नसता
तुझ्या सौभाग्याचा टिळा.
खरे तर मायबाईच्या या कवितांमधून देशमुखांनी अस्सल स्त्रीवादी जाणिवांचीच अभिव्यक्ती साधली आहे, असे म्हणण्यात अतिशयोक्ती नाही -
मायबाई, तुला जोडून दिसतात मला
गावशिवारातल्या हजारो बाया
निंदणाऱ्या
गवती भारे बांधणाऱ्या
लाकूडफाटा तोडणाऱ्या
गुरं राखणाऱ्या
सोंगणी मळणी करणाऱ्या बाया....
दिसते बाई एकटीच गातांना
एकटीच स्वत:शी हसतांना
आईच्या गर्भातल्या पाण्यातही समाधिस्त बसलेली दिसते बाई
तिला ऐकू येतो आतूनच बाहेरचा नकार
नकाराला होकार देतांना जगण्यासाठी धडपडताना दिसते बाई.
अर्थात तरीही कवीच्या संदर्भविश्वात ही मायबाई विठ्ठलाची सहचारिणी आहे. तेव्हा कवीचा विठ्ठलावरील रागलोभ शेअर करणे तिला भागच आहे -
सांग कुठल्या जन्माची वैरीण झालीस बाई
सांभाळत बसलीस पिढ्यान्पिढ्याच वैर
तुझ्या बांधाला तर आमचा बांध नव्हता ना कधी?
त्याला विठ्ठलाने झपाटले आहे तो तुकोबांपासून अलिप्त कसा राहू शकेल ? देशमुखांच्या कवितांमध्ये तुकोबांच्या संदर्भातील अनेक कविता आहेत -
विठ्ठलानं आवळलेल्या माझ्या गळ्याची गाठ
तुक्याचा अभंग गाऊन मी सोडवतो.
किंवा
इंद्रायणी माझी माय
भंडारा डोंगर
वरल्या आभाळासह माझा बाप.
सगळ्याच दिशांनी विठ्ठलाच्या सावलीला भिडून झाल्यावर -
आता तर मी ठरवतोय
खुडून टाकावे विठ्ठल नावाचे काजळकणीस
त्याचा कुठलाही बाइट आता नकोय मला
पाण्यात कुस्करुन खावी माती तर
मातीही जागतिक झालीय, जगण्याच्या बाराखडीत.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
पण हे तरी खरं आहे का? अर्थातच नाही. भालचंद्र नेमाड्यांच्या कवितेत शेवटी विठू पारंबीला चिकटतोच. देशमुखांना तर ‘राज कोणाचंबी येवो, राज्याचा तू धुरकरी’ असे वाटते. इतकेच नव्हे तर ‘तुझ्या असोशिचं बेणं, लाऊ कोणत्या रानात । कधी पडेल उजेड, रानी पांगल्या धुक्यात।’ हा प्रश्न ते विठ्ठलाला विचारतात. विठ्ठल नामाच्या महाप्रतीकामधील क्षमता अद्याप संपलेली नाही. भक्तांच्या भावातही काही कमी नाही. मुद्दा क्षमतेचं हे बियाणं कोणत्या शेतात पेरायचं, हा आहे. राजकारणात, समाजकारणात, संस्कृतीकारणात की आणखी कुठं?
देशमुखांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नाच्या उत्तरातच महाराष्ट्राचे भवितव्य दडले आहे, असे मला वाटते.
‘लोळणफुगडी’ - श्रीकांत देशमुख, पार पब्लिकेशनस, मुंबई, मूल्य - २५० रुपये.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Amol Yadav
Fri , 05 March 2021
'लोळनफुगडी ' कवितासंग्रह वारकरी अभिव्यक्तीचे समृद्ध दर्शन होय