लॅरी फ्लिंट आणि पोर्नोग्राफी : म्हणजेच, कामातुराणां न भयं न लज्जा (पूर्वार्ध)
पडघम - सांस्कृतिक
हर्षवर्धन निमखेडकर
  • लॅरी फ्लिंट आणि त्यांच्या ‘हसलर’ या मासिकाची काही मुखपृष्ठ
  • Tue , 02 March 2021
  • पडघम सांस्कृतिक हर्षवर्धन निमखेडकर Harshawardhan Nimkhedkar शब्दांचे वेध लॅरी फ्लिंट Larry Flynt हसलर Hustler

शब्दांचे वेध : पुष्प अठ्ठाविसावे

सुमारे दहा-पंधरा दिवसांपूर्वी लॅरी फ्लिंट वारला. त्याच्या मृत्यूच्या निमित्तानं आज मी पोर्नोग्राफी आणि लॅरी फ्लिंट या विषयावर लिहिणार आहे. कोण होता हा लॅरी फ्लिंट नावाचा माणूस? जगातले किती लोक त्याला ओळखत होते? ह्यू हेफनर आणि बॉब गुचोनी यांचा तो जातवाला होता. पण कर्तृत्वानं त्यांचा गुरू. आता ओळखलं?

नाही? जाऊ द्या. मीच सांगतो. लॅरी फ्लिंट, ह्यू हेफनर आणि बॉब गुचोनी हे तिघेही अमेरिकेतले आघाडीचे ‘पत्रकार’ होते. पण वेगळ्या प्रकारचे. ते निळी पत्रकारिता करत. म्हणजेच ते पोर्नोग्राफर होते. ह्यू हेफनर ‘प्लेबॉय’ नावाच्या मासिकाचा मालक-संपादक होता. बॉब गुचोनी ‘पेंटहाऊस’ नावाच्या मासिकाचा मालक-संपादक होता. आणि लॅरी फ्लिंट ‘हसलर’ नावाच्या मासिकाचा मालक-संपादक होता. या तिघांपैकी गुचोनी आधी म्हणजे २०१० मध्ये वारला,  हेफनर २०१७ मध्ये आणि फ्लिंट २०२१ मध्ये. त्यांची ही मासिकं अजूनही धडाक्यात प्रसिद्ध होतात, मात्र ‘प्लेबॉय’ आता फक्त डिजिटल स्वरूपात निघतं. भारतात या तिन्ही मासिकांच्या आयातीवर कस्टम खात्यानं बंदी टाकलेली आहे. तरीही या मासिकांचे अंक स्मगलर लोकांच्या कृपेनं आपल्याकडे उपलब्ध होतात. अगदी खुलेआम नाही, पण थोडासा प्रयत्न केला आणि ‘योग्य’ प्रकारच्या मध्यस्थांशी तुम्हाला संपर्क साधता आला, तर ते मिळवणं अजिबात कठीण नाही. पैसा जरा जास्त खर्च करावा लागतो, एवढंच. शेकडो भारतीय दर महा ही मासिकं आवर्जून वाचतात. खरं तर ‘बघतात’!

असं काय असतं या मासिकांत? मुख्यत्वे पोर्नोग्राफी, दुसरं काय! ‘हसलर’मध्ये तर पूर्णच पोर्नोग्राफी असते. लॅरी फ्लिंट, ह्यू हेफनर आणि बॉब गुचोनी यांची ही मासिकं अमेरिकेतल्या (आणि पर्यायानं जगभरातल्या) कामातुर माणसांच्या वासनांना खतपाणी घालण्याची ‘उत्कृष्ट’ माध्यमं आहेत. अत्यंत सुंदर आणि भरदार अवयव असलेल्या मुलींची व्यावसायिक छायाचित्रकारांनी काढलेली कलात्मक नग्न छायाचित्रं ‘प्लेबॉय’मध्ये दरमहा प्रसिद्ध होतात. ‘पेंटहाऊस’ हेदेखील अगदी आता-आतापर्यंत तसंच होतं. ज्याला ‘सॉफ्ट पॉर्न’ म्हणजे सौम्य स्वरूपाची कामुकता म्हणता येईल अशा प्रकारची ही चित्रं असतात. पण ‘हसलर’ मात्र एकदम पोस्टग्रॅजुएट कॉलेज किंवा त्याही पलीकडचं ज्ञान देणारं विश्वविद्यालय आहे. (‘पेंटहाऊस’ही आता त्या पातळीवर गेलं आहे, असं ऐकतो!) तिथं सगळं हार्डकोअर असतं.

एक काळ असा होता की, Pornography किंवा Porn यांचा नुसता उच्चार करणंही गैर मानलं जात होतं. पण आता पोर्नोग्राफी हा शब्द जगभरात प्रसिद्ध झाला आहे. पोर्नोग्राफी याचंच लघु रूप म्हणजे पॉर्न. मराठीत याला बीभत्स साहित्य, अश्लील लेखन, रतिचित्रण अशा नावांनी ओळखलं जातं. पोर्नोग्राफीत लिखित साहित्य (कथा, कादंबऱ्या, कविता, नाट्य, इत्यादी), पेंटिंग, फोटो, चित्रपट, गाणी, हे किंवा अशा प्रकारचं काहीही येऊ शकतं. त्यांचा उद्देश एकच - प्रेक्षकाची अतृप्त कामवासना शमवणं किंवा तिला अधिक तीव्र करणं.

..................................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी पहा - https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

मुळात सेक्स ही एक उदात्त नैसर्गिक भावना आहे. पोर्नोग्राफी हे तिचं विकृत रूप आहे. ‘सेक्स’ या इंग्रजी शब्दाला तसा अगदी तंतोतंत मराठी प्रतिशब्द नाही. सेक्स म्हणजे नुसता शारिरीक संभोग नाही. त्यात अजून बरंच काही आहे. अगदी काही अपवाद वगळता कामवासना प्रत्येकच स्त्री-पुरुषात जन्मजात असते आणि योग्य वयात, योग्य प्रकारे तिचं शमन केलं जातं. ही नैसर्गिक प्रवृत्ती आहे. कामवासनेला गैर मानून तिचं बलपूर्वक दमन करणारे लोक सोडले, तर बाकी सर्वांना भूक आणि झोपेप्रमाणेच कामवासनेचीही पूर्ती करावी लागते. वयाच्या साधारण पंधराव्या वर्षी तिची जाणीव होऊ लागते आणि चाळीशी येईपर्यंत तिचा जोर कायम राहतो.

विवाहित स्त्री-पुरुषांना आपली कामपूर्ती करणं हे सोपं असतं. पण अविवाहित असलेल्या किंवा या ना त्या कारणानं ज्यांना कामपूर्ती करून घेता येत नाही, त्यांचं काय? वेश्यागमन हा एक मार्ग पुरुषांसाठी उपलब्ध आहे. पण तेदेखील अशा सगळ्यांनाच शक्य नसतं. त्यात धोकेही असतात. पुरुष इतरही मार्गांचा वापर करू शकतात. पण अशा बहुसंख्य काम-अतृप्त भारतीय स्त्रियांच्या बाबतीत तर हेही शक्य नसतं. यामागे अनेक कारणं आहेत. तितक्या खोलात आपल्याला जायची गरज नाही. पोर्नोग्राफीशी संबंधित पैलूवरच बोलू या. पोर्नोग्राफी म्हणजे काय आणि विशेषतः पुरुषांच्या कामवासना तृप्तीसाठी तिचा कसा (अधिकतर गैर)वापर केला जातो, हे लॅरी फ्लिंटच्या उदाहरणातून आपल्याला बघायचं आहे.

Pornography हा शब्द फ्रेंच भाषेतून इंग्रजीत आला आहे. पण त्याचं मूळ प्राचीन ग्रीक भाषेत आहे. तिथं या शब्दाचा अर्थ वेश्यांविषयी लिखाण किंवा त्यांचं चित्रण असा होत असे. Porneía म्हणजे वेश्या/वेश्याव्यवसाय आणि gráphō म्हणजे लेखन, चित्रण. म्हणजे वेश्या आणि त्या जो देहविक्रयाचा व्यवसाय करतात, त्याबद्दलच्या लेखी किंवा दृष्यस्वरूपातील चित्रणालाच एके काळी पोर्नोग्राफी असं म्हटलं जात असे. वेश्यावृत्ती हा जगातला सर्वांत जुना व्यवसाय मानला जातो. जिथं जिथं मानवी समाज आहे, तिथं तिथं विवाह आणि वेश्याव्यवसाय यांच्या अति प्राचीन परंपराही आहेत. त्यामुळे या ग्रीक शब्दांचा अर्थ अधोरेखित होतो.

‘पोर्नोग्राफी’ला बीभत्स स्वरूप नक्की केव्हा प्राप्त झालं, हे मात्र सांगता येणं सोपं नाही.

आधी आधी, स्त्रीच्या देहाचं, तिच्या कामक्रीडेतल्या प्रावीण्याचं सरळ, साधं वर्णन म्हणजे ‘पोर्नोग्राफी’ असं मानलं जाई. नंतर त्यात Erotic छटा शिरली. म्हणजे माफक, हलकी कामुकता. Eros या ग्रीक पुराणातल्या देवाच्या नावावरून हा शब्द तयार झाला. आपल्याकडे त्यालाच ‘मदन’ म्हणतात. सेक्सचा सुखद अनुभव घेताना अधिक आनंद मिळावा, कामेच्छा अधिक प्रबळ व्हावी, काही कारणांनी जर सेक्स करताना शारिरीक, मानसिक समस्या येत असतील तर त्या दूर व्हाव्यात, यासाठी ज्या बाह्य साधनांचा उपयोग करून घेतला जातो, त्यांना इंग्रजीत ‘aphrodisiac’ (आपल्याकडचं ‘वाजीकरण’) असं म्हणतात. हाही एक ग्रीक मुळं असलेला शब्द आहे. ग्रीक पुराणांमध्ये Aphroditeला (शारिरीक) प्रेमभावनेची देवता मानले जात असे. त्यावरून aphrodisiac हा शब्द तयार झाला. खरी-खोटी (बहुधा खोटीच) औषधं, रसायनं, जडीबुटी यांच्या मदतीनं जगभरातले बरेच लोक आपला सेक्स अधिक आनंददायी व्हावा यासाठी प्रयत्न करत असतात. ‘इरॉटिक साहित्य’ हा याचाच बाह्य प्रकार.

इथपर्यंत ठीक आहे. पण पुढे या इरॉटिकातूनच आजच्या पोर्नोग्राफीचा विकास झाला आणि मग वेगळी समस्या उत्पन्न झाली.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

तसं पाहिलं तर निव्वळ नग्न चित्रांत अश्लील असं काही नसतं. स्त्री किंवा पुरुषाच्या उघड्या देहाचं कलात्मक नजरेतून आणि कलात्मक भावनेतून कोणी चित्रण केलं तर त्यात सौंदर्य असतं, कामवासना नसते. अशी चित्रं, छायाचित्रं बघताना बघणारा त्या कलाकृतीच्या आशयाचा रसिकाच्या नजरेनं आस्वाद घेतो. त्याच्या मनातला मदन त्या वेळी जागा होत नाही. मानवी शरीर ही निसर्गाची एक अमूल्य रचना आहे. तिला वस्त्रांनी झाकून ठेवावं लागणं, हा मानवानंच बनवलेल्या समाजशास्त्रीय संकेतांचा एक भाग आहे. पण प्रसंगी एखाद्या अनावृत्त देहाचं सौंदर्य बघणं (किंवा कोणी ते दाखवणं), त्याचं कौतुक करणं, यात काहीच गैर नाही.

ते गैर केव्हा होतं? जेव्हा या कलेचं बाजारीकरण होतं आणि त्यात अतीव कामुकता शिरते, तेव्हा. प्रेक्षकाच्या, दर्शकाच्या कामभावना जागृत करून त्यातून पैसा कमावण्याच्या उद्देशानं जर कोणी नग्नतेचा वापर करत असेल तर त्यातली कला संपून जाते आणि उरते फक्त वासना. यातही काही पदर आहेत. साधं नग्न चित्रण वेगळं. कामवासना दूर ठेवून निव्वळ सौंदर्योपासकाच्या नजरेतून नग्न चित्रं बघता येतात. पुढची पायरी म्हणजे इरॉटिका. म्हणजे सेक्सचा आनंद, लज्जत वाढावी म्हणून नग्न दृष्यांना जरा हलकी, जास्त जहाल नसलेली कामुकतेची फोडणी देणं. हे झालं ‘सॉफ्ट पॉर्न’. यातही कधी कधी बाजारीकरण केलं जातं - पण बेताचं.

‘प्लेबॉय’ आणि (जुन्या प्रकारचं) ‘पेंटहाऊस’ या दोन मासिकांमधल्या नग्न चित्रांचं स्वरूप हे या प्रकारचं होतं. ‘डेबोनेअर’ आणि ‘फॅन्टसी’ या दोन भारतीय मासिकांनी ‘प्लेबॉय’चा हा कित्ता गिरवून मधल्या काही वर्षांत अशाच प्रकारचं दृष्य-साहित्य प्रकाशित केलं होतं. (भारतातल्या अश्लीलता-विरोधी कायदेशीर तरतुदी अत्यंत जुन्या आणि कालबाह्य झालेल्या आहेत. पण त्या जोवर बदलल्या जात नाहीत तोवर त्यांचं पालन करणं भाग आहे.

या पार्श्वभूमीवर, निव्वळ सौंदर्यपूर्ण नग्न चित्रण आणि सॉफ्ट पॉर्न यातली थिन लाईन म्हणजे अस्पष्ट, धूसर अंतर सांभाळून ‘डेबोनेअर’ आणि ‘फॅन्टसी’ यांनी कायद्याचं उल्लंघन होऊ न देता व्यवसाय केला हे उल्लेखनीय आहे आणि कौतुकास्पददेखील.)

पण दुनिया रंगरंगिली असते. इथले सगळेच लोक फक्त कलोपासकच नसतात. सॉफ्ट पॉर्नवरच खुश होणारे आणि समाधान मानणारेही थोडकेच लोक असतात. अनेक लोक असेही आहेत की, ज्यांना आत्यंतिक टोकाचं काही तरी बघायला, अनुभवायला आवडतं. आपली कामेच्छा सदैव जागी रहावी असं त्यांना वाटतं. हे झाले ‘हार्ड कोअर’ प्रेक्षक. बरं, यांना जो सेक्स अभिप्रेत असतो तो नॉर्मल असला तर हरकत नाही - जसा एक पुरुष आणि एक स्त्री यांच्यातला संभोग. दोन पुरुषांमधला किंवा दोन स्त्रियांमधला सेक्स, हे देखील नॉर्मलच आहे. आता हे विधान काहींना खटकू शकतं. पण जरी मी स्वतः हेटेरोसेक्स्चुअल (भिन्नलिंगी सेक्स करणारा) असलो तरी दोन पुरुषांमधल्या किंवा दोन स्त्रियांमधल्या समसंभोगाला (होमो सेक्स्च्युऍलिटीला) मी अजिबात गैर मानत नाही. संमतीच्या वयाच्या वर असलेल्या म्हणजेच कायदेशीरदृष्ट्या अॅडल्ट असणाऱ्या कोणत्याही दोन (भिन्नलिंगी किंवा समलिंगी) व्यक्तींनी परस्पर संमतीनं, राजीखुशीनं केलेला संभोग किंवा घेतलेला सेक्सचा अनुभव यात अनैतिक वगैरे काही नसतं. याला बाकीचे बरेच आयाम असू शकतात, पण ती वेगळी बाब आहे.

परंतु याच्याही पुढे जाऊन ‘वेगळ्या प्रकार’च्या सेक्सची अपेक्षा असणारे लोकही (जास्त करून पुरुष) साऱ्या जगभरात सापडतात. या वेगळ्या प्रकारच्या मार्गानं जाऊन कामतृप्ती करून घेणारे जे लोक असतात, त्यांना ‘विकृत’ किंवा ‘पर्वर्ट’ असं म्हणतात. या प्रवृत्तीला ‘डिव्हिअंट बिहेव्हिअर’ असं नाव आहे. होमो सेक्स्च्युऍलिटीला अजूनही अनेक लोक एक प्रकारची विकृती मानतात. पण हे योग्य नाही. खरी विकृत मनोवृत्ती वेगळीच असते. (‘या जगात विकृत असं काहीच नसतं’ असंही मानणारे महाभाग आहेत. त्यांना ‘Decadent movement’चे समर्थक असं म्हणतात. त्यांनी केलेल्या अशा प्रकारच्या विकृतींच्या उदात्तीकरणाला भुलून जगातले सारेच लोक तसं वागायला लागले तर अनर्थ होऊ शकतो!) अशी कोणतीही लैंगिक विकृती हा मूलतः एक मानसिक आजार असतो. माफक प्रमाणात असेल तर साध्या उपचारांनी तो दूर होऊ शकतो. यातल्या काही विकृतींना कायद्यानं गुन्हा मानलं आहे. (यात भारतीय कायद्यानुसार अगदी आता-आतापर्यंत होमो सेक्स्च्युऍलिटीचासुद्धा समावेश होता.) या लैंगिक विकृतींचे खूप प्रकार आहेत, त्यातले काही ठळक असे -

मृत देहाशी संभोग करण्याची आवड : याला इंग्रजीत ‘नेक्रोफिलिआ’ असं नाव आहे.

कायद्याच्या व्याखेनुसार अल्पवयीन असलेल्या मुलाशी किंवा मुलीशी लैंगिक इच्छेतून केलेले चाळे (यात शारिरीक स्पर्श किंवा प्रत्यक्ष संभोग झाला असलाच पाहिजे असं गरजेचं नाही). इंग्रजीत या ‘चाईल्ड सेक्स’ला ‘पेडेरॅस्टी’ म्हणतात. आणि अशा प्रकारच्या व्यक्तीला ‘पेडेरॅस्ट’ किंवा ‘पेडोफाईल’ म्हणतात. जगातल्या बहुतेक सर्व देशांत या प्रकारच्या विकृतीला भयंकर अपराध मानला जातो.

प्राण्यांशी/जनावरांशी संभोग : याला ‘बिस्टीलिटी’ अशी संज्ञा आहे.

दुसऱ्यांचा सेक्स चोरून बघणे, नग्न स्त्रीला किंवा कपडे बदलणाऱ्या स्त्रीला चोरून लपून बघणे. याला ‘व्हॉयुरिझम’ म्हणतात.

स्वतःच्या नग्न देहाचं जाहीर प्रदर्शन करणं. यात लैंगिक भावना असते. स्वतःच्या वासनापूर्तीसाठी काही लोक असं करतात. याला ‘एक्झिबिशनिझम’ असं नाव आहे.

एखाद्या व्यक्तीला शारिरीक त्रास, यातना देऊन तिच्याशी संभोग करणं किंवा त्या परपीडेतूनच वासनापूर्ती करून घेणं. याला ‘सॅडिझम’ असं नाव आहे. (याचे काही उपप्रकार : बाँडेज- साखळी, दोरीनं समोरच्याला घट्ट बांधून ठेवणं; डिसिप्लीन - चाबकानं किंवा पट्ट्यानं समोरच्याला मारून त्याच्याकडून लैंगिक आज्ञापालन करून घेणं इत्यादी)

दुसऱ्या व्यक्तीकडून स्वतःला शारिरीक त्रास, यातना करवून घेऊन त्या स्वपीडेतूनच वासनापूर्ती करून घेणं. याला ‘मसोकिझम’ असं म्हणतात.

तीन व्यक्तींचा एकत्र सेक्स : मेनाज आ त्र्वा (ménage à trois)

चार किंवा अधिक व्यक्तींचा एकत्र सेक्स : ग्रुप सेक्स.

याखेरीज इतरही बऱ्याच लैंगिक विकृती आहेत. वासनापूर्तीसाठी यांत्रिक साधनांचा (जसे रोबॉ किंवा यंत्र), किंवा मूत्राचा वापर (गोल्डन शॉवर)  - क्वचित विष्टेचासुद्धा - असेही अतिरेकी प्रकार आहेत. तितक्या खोलात न जाता आपण एवढंच म्हणू शकतो की, व्यक्ती तितक्या प्रकृती या सारखंच व्यक्ती तितक्या विकृती, हेही विधान सत्य आहे.

साधारणपणे १९५०पर्यंत पाश्चात्य जगतात सेक्स हा हळू आवाजात, चोरून बोलण्याचा, लपवून ठेवण्याचा, खासगी मानला जाणारा विषय होता. पोर्नोग्राफी तेव्हाही होती, पण ती अंडरग्राऊंड (छुपी) होती. त्यानंतर मात्र हळूहळू ही विचारसरणी बदलू लागली. सेक्समध्ये लाज वाटण्यासारखं काही नाही, सेक्स हा फक्त प्रजननासाठीच असतो, अशा धारणेतून ते लोक बाहेर पडू लागले. यात अमेरिकेन लोक आघाडीवर होते. लवकरच ही लाट युरोपात आणि अन्य ठिकाणी पसरली.

पुढच्या ३०-३५ वर्षांत तर या लाटेचं त्सुनामीत रूपांतर झालं. नग्नता पडद्याबाहेर पडली. एवढंच नाही तर लैंगिक विकृतींचंही उदात्तीकरण, बाजारीकरण होऊ लागलं. सेक्सविषयक विचारांचा लंबक (पेंड्युलम) एका टोकापासून पार दुसऱ्या टोकापर्यंत गेला. जागोजागी पोर्नोग्राफीचे मळे उगवले जाऊ लागले. अर्थात हे लैंगिक स्वातंत्र्य पूर्णपणे अनिर्बंध तर नक्कीच नव्हते. कायद्याचा धाक तिथेही होता आणि आहेदेखील. पण तिथला कायदा या बाबतीत बराच लवचिक आहे. काही अपवाद वगळता इतर अनेक बाबींकडे दुर्लक्ष केलं जातं. किंवा त्यांना दंडनीय मानलं जात नाही.

शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वी ऑस्कर वाईल्डला होमो सेक्स्च्युऍलिटीच्या आरोपाखाली जिथे जेलमध्ये जावं लागलं होतं, त्याच इंग्लंडमध्ये आज ‘सेम सेक्स मॅरेज’ला (समलिंगी विवाह) कायदेशीर मान्यता आहे. (काही नियम पाळून केलेलं) पोर्नोग्राफिक प्रदर्शन आज युरोप-अमेरिकेत अजिबात गैर मानलं जात नाही. तिथल्या सरसकट सगळ्याच लोकांची याला मान्यता आहे, असं अजिबात नाही. तसं मला सुचवायचंही नाही. पण ज्यांना हे पटतं, ते या पोर्नोग्राफीच्या मळ्यांमध्ये उगवली जाणारी फळं आनंदानं आणि खुलेआम खातात. बाकीचे लोक त्याकडे पाठ फिरवतात आणि चूप बसतात.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

या लैंगिक क्रांतीची सुरुवात काही प्रमाणात ‘प्लेबॉय’ या मासिकामुळे झाली. त्यात उत्तम साहित्यिक आणि वैचारिक लेखांसोबतच नग्न स्त्रियांची छायाचित्रंदेखील छापली जाऊ लागली. आधी हा एक कल्चरल शॉकच होता. पण तो लोकांच्या पटकन अंगवळणी पडला. पी. जी. वुडहाऊससारख्या अन्य अनेक बड्या आणि नामांकित लेखकांच्या कथा, मुलाखती ‘प्लेबॉय’मध्ये प्रसिद्ध होत असत. काही तरी नवीन, वेगळं हवं असणाऱ्या वाचकांच्या त्यावर उड्या पडू लागल्या. अल्पावधीतच ‘प्लेबॉय’ हा एक कल्ट म्हणजे पंथ बनला. त्यांचं स्वतःचं असं एक कल्चर तयार झालं.

हळूहळू ‘प्लेबॉय’चं अनुकरण करणारी अनेक मासिकं प्रसिद्ध होऊ लागली. त्यातलंच एक म्हणजे ‘पेंटहाऊस’ मासिक. त्यालाही ‘प्लेबॉय’ एवढीच ख्याती प्राप्त झाली. पण ही दोन्ही मासिकं सॉफ्ट पॉर्न विकायची. त्यांच्यात नग्न स्त्रिया होत्या, पण त्या आपल्या मांड्या उघड्या करून, सताड फाकवून आतला गुह्य भाग लोकांना दाखवत नव्हत्या. नग्न पुरुषांची छायाचित्रं दाखवली जात नसत. पण एव्हाना तिकडच्या माणसांची अवस्था रक्ताला चटावलेल्या वाघासारखी झाली होती. त्यांची भूक वाढली होती. More, moreचा नारा ते लावू लागले. त्यांना सॉफ्ट पॉर्न हे दूधभातासारखं मिळमिळीत वाटू लागलं. त्यांना आता भूक लागली होती झणझणीत तिखट, मसालेदार मटनाची. म्हणून मग हार्डकोअर म्हणजे जालीम पोर्नोग्राफी उदयाला आली. चोरून, लपून छपून तर ती आधीपासून मार्केटात आली होती. पण आता अगदी उघडपणे, खुले आम हार्डकोअर पॉर्न प्रकाशित होऊ लागलं.

यात साहित्य, वैचारिक लेख असं काही तोंडी लावायला नव्हतं. जे होतं ते थेट मेन डिशच्या स्वरूपात. स्त्री-पुरुष किंवा समलिंगी संभोगाची, सेक्सची छायाचित्रं असलेली शेकडो नियतकालिकं युरोप - अमेरिकेत निघू लागली. मग त्यासोबतच ज्याला अनौपचारिक बोलीत ‘ब्लू फिल्म’ म्हणतात असे चित्रपट निघू लागले. कम्प्युटर आणि इंटरनेट क्रांतीनंतर तर काय, या सगळ्यांना मोकळे रानच मिळाले.

या सगळ्या पार्श्वभूमीवर लॅरी फ्लिंट आणि त्याचं ‘हसलर’ मासिक यांना हार्डकोअर पोर्नोग्राफीच्या इतिहासात एक वेगळंच स्थान प्राप्त झालं आहे. कसं, ते या लेखाच्या उत्तरार्धात बघू.

..................................................................................................................................................................

लेखक हर्षवर्धन निमखेडकर वकील आहेत. वुडहाऊसचे अभ्यासकही.

the.blitheringest.idiot@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......