‘लोहपुरुषा’च्या नावाजागी ‘लोभपुरुष’ आला, त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काय आहे?
पडघम - देशकारण
जयदेव डोळे
  • नरेंद्र मोदी स्टेडियम, गुजरात
  • Mon , 01 March 2021
  • पडघम देशकारण मेगालोमॅनिया Megalomania नरेंद्र मोदी स्टेडियम Narendra Modi Stadium मोटेरा स्टेडियम Motera Stadium सरदार पटेल Sardar Patel

मोठाच गहजब उडालाय. अनेकांना वाईट वाटतेय. कित्येक रागावलेत. जणू त्यांना एका माणसाची ओळखच पटली नव्हती… असे कसे करू शकतो एक माणूस? चक्क आधी जाहीर झालेल्या नावाजागी आपले नाव डकवतो तो? जुने नाव त्यानेच काही वर्षांपूर्वी जाहीर केले होते! तरीसुद्धा? सात वर्षे प्रत्यक्ष ओळख झालेली. त्यापूर्वी १३ वर्षे नाव ऐकून होते सारे. अवगुण उधळल्याचे ऐकून होते. आता गुण उधळूनही तक्रारीचा सूर काढायचा, म्हणजे गंमतच. अहो, असे काय करताय, अधिकार आहे त्याचा. काही कसे कळत नाही तुम्हाला?

एका माणसाला खूप सोस आहे भव्यतेचा. खूप म्हणजे खूप. ‘मेरे सवासे करोड देसवासीयों’ अशी हाक मारत तो भाषणे ऐकवत राहिला अनेक वर्षे. तेव्हा खरे तर वाटायला हवे होते की, केवढी ही लोकसंख्या! केवढा हा अविचार. अब्जात गेलेली लोकसंख्या हा माणूस आपल्या कब्जात करू लागला, तेव्हा ऐकणाऱ्याला काय वाटले? बघा, किती कळवळाचा हा माणूस... प्रत्येक नागरिकाची नोंद घेऊन तो भाषणाला सुरुवात करायचा… त्यानंतर त्याने सपाटाच सुरू केला. ७० वर्षांत काय केले? ५०० वर्षांचा अपमान पुसून टाकणार, १५० वर्षांची संस्कृती धुवून टाकणार, १२५ वर्षांचा पक्ष नष्ट करणार, ८० वर्षांची घराणेशाही मोडून काढणार, १००० वर्षांपूर्वीचे वैभव पुन्हा आणून दाखवणार…

त्याच्या भाषणांत शेकडा अन हजार वर्षे तोंडात लाळ येते त्यासारखी येऊ लागली. झालेच तर फूट, मीटर्स, किलोमीटर्स, टन, बाईटस, लीटर्स अशी साकडे सांगणारी थुंकी उडू लागली. जगातला सर्वांत लांब बोगदा, जगातला सर्वांत उंच पुतळा, जगातला सर्वांत मोठा लॉकडाउन, जगातली सर्वांत मोठी नोटबंदी, जगातली सर्वांत मोठी करोना मोहीम, जगात सर्वांत आधी लस, सर्वाधिक लोकांना लसीकरण असे अवघे अगडबंब, अवाढव्य, आडमाप अन अचाट त्याच्यालेखी त्याच्यामुळेच घडत चालले. भव्यतेचा नादच लागलाय या बाबाला…

सर्वाधिक देशांना भेटी देणारा पहिला पंतप्रधान, सर्वांशी मैत्रीचा हात पुढे करणारा पहिला नेता, सर्वांत जास्त विमानप्रवास करणारा आद्य नेता, ईशान्येच्या राज्यांना भेट देणारा अव्वल पुढारी, लडाखच्या बर्फात सैनिकांशी गप्पा मारणारा अग्रदूत, गुहेत ध्यानस्थ बसणारा एकमेव नेता, मोरांना खाऊ वाटणारा पहिलाच राजकारणी, आणि योगासने करणारा एकमेवाद्वितीय… विक्रमी, पराक्रमी, अग्रक्रमी, पातालक्रमी, अवकाशक्रमी असा हा नेमानेमक्रमी…

एक राहिलेच. ट्विटरचे अनुयायी भारतात याचेच जास्त. ‘मन की बात’च्या निमित्ताने रेडिओचे श्रोते याचेच अफाट. जाहिरातींत सर्वांत जास्त वेळा झळकणारा चेहरा याचाच. गोरगरिबांच्या योजना याचे पदनाम लावल्याशिवाय जमिनीवर लागूच होत नाहीत.

तर असो. मूळ मुद्दा भव्यभानाचाय. सारे भव्यदिव्य करून त्याला आपले नाव द्यायचाय. अहमदाबादेत ते क्रिकेट स्टेडियम १ लाख ३२ हजार लोकांची आसनव्यवस्था करणारे, या विश्वातले एकमेव आहे, यात थक्क होण्यासारखे काय? एखाद्या माणसाला नको असतात किरकोळ गोष्टी. नाही आवडत त्याला बारक्यासारख्या बाबतीत नाक खुपसायला. मुळात तो सामान्य माणूस कुठाय आपल्यासारखा?

मुख्यमंत्री केशूभाई पटेल यांना बाजूला करून हा बाबा मुख्यमंत्री झाला. आमदार व्हायची गरज होती का तेव्हा? आधी मुख्यमंत्री, नंतर आमदार अशी रीत त्याने सुरू केली. आमचे उद्धव ठाकरे त्याचेच फॉलोअर. पॅराशूट लँडिंग राजकारणात अन सत्तेच्या खुर्चीवर करायला घराणे आणि खानदान लागते, हा समज या एका माणसाने कायमचा मातीत गाडून टाकला.

त्याचेच पाहून डोनाल्ड ट्रम्प या माणसाने सेनेटर, गव्हर्नर किंवा रिप्रेझेंटिटीव्ह न होता थेट अध्यक्षपदावर झेप घेतली. असा झेपामागून झेपा घेणारा हा एक माणूस सरदाराला बाजूला सारून चौकीदार म्हणून बसला, तर त्यात अचंबित होण्यासारखे काय?

प्रधानसेवक कसा झाला ते आठवतेय ना? मूळचे हक्कदार लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांना त्याने उमेदवारीसुद्धा दिली नव्हती. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवरून एकदम पंतप्रधानांच्या खुर्चीवरच झेप घेतली याने. खासदारकीचा अनुभव नाही की, केंद्रीय मंत्रीपदाचा. याला म्हणतात महत्त्वाकांक्षा आणि खरा आत्मविश्वास!

जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर हाच एकमात्र. ते निदान तुरुंग, कैद, उपोषणे, आंदोलने, मोर्चे, सत्याग्रह या मार्गाने तरी पंतप्रधान झाले. या माणसाने त्याचीही काही गरज नसते, हे सिद्ध करून दाखवले. याला ना कधी लोकनेता होता आले, ना पुढारी. इतरांनी सारवलेल्या जमिनीवर हा सतरंजी टाकून ज्ञान पाजळणार! कट, कारस्थाने, कूटनीती यांत पारंगत असलेल्या संघटनेचा हा प्रचारक थोडाच लोक आणि जनता यांसाठी झटणारा असणार? छे! काहीतरीच…

आपण काही मनोवैज्ञानिक नाही, तरीही एक अंदाज असा की, हडेलहप्पी करून कमाई करणाऱ्याला ती खूप चमकदार व भव्य, देखणी कराविशी वाटतेच. ‘दिवार’मधला विजय नव्हे का धाकट्या रवीला गाडी, बंगला, पैसा, प्रतिष्ठा यांचे हवाले देत आपल्याकडे ओढू पाहतो. रवी बिचारा ‘मेरे पास माँ है’ म्हणून खडतर जगत राहतो. त्याला काय माहीत की, खरे यश अशाच विजयपथावर धावल्याशिवाय मिळत नसते. ‘माँ’ आणि ‘माँ का प्यार’ दाखवायच्या, सांगायच्या गोष्टी असतात. ‘दिवार’ चालला तो विजयच्या तत्त्वज्ञानामुळे. रवीसारखी सेवा करणाऱ्यांमुळे नाही. ‘दिवार’चे भव्य यश म्हणजे हपापाचा माल गपापा करणाऱ्या तत्त्वज्ञानाची उत्तुंग भरारी.

मेगालोमॅनिया अर्थात भव्यतेचा सोस हा काही गरीब देशाला परवडणारा छंद नाही. गरिबांना तर कधीच असे छंद परवडत नाहीत. स्वप्ने मोठी पाहावीत जरूर, मात्र त्याच वेळी त्या स्वप्नपूर्तीसाठी कशाचा बळी तर जाणार नाही ना, हेही पाहायचे असते. मायावती यांनीही उत्तर प्रदेशात आपले व कांशीराम यांचे एक मूर्तीउद्यान उभे केलेय. तेव्हा जेवढी टीका, कल्लोळ झाला, तेवढा आता मुळीच झाला नाही. मायावती यांचा तो अतिरेक होता आणि ‘अहं ब्रह्मासि’सारखा भ्रमही होता. या भ्रमाचा भुसा थोड्याच काळात झाला, हे खरे असले तरी ते पुतळ्यांचे उद्यान कुणी उखडू शकणार नाही, हेही तितकेच खरेय. मोठेपणाच्या नादात मायावती किती तरी मोहमायेत रुतत गेल्या अन आज प्रभावशून्य होऊन बसल्या.

नेपोलियन, मुसोलिनी, हिटलर यांना भव्यतेचा मोठा नाद होता. कुणाला जगज्जेता व्हायचे होते, तर कुणाला आर्यवंशसंस्थापक. पण आपले छंद आणि सोस जोपासताना ते केवढे मोठे विध्वंसक ठरले! स्वत: नष्ट होताना त्यांनी त्यांचे देश अर्धमेले करून ठेवले होते. जगालाही उभारी घ्यायला खूप वर्षे लागली. आपला धाक कायम राहावा म्हणून अनेक हुकूमशहा क्रूर होत असंख्य माणसे मारून टाकत. अंगावर सरंजाम, पुरस्कार व बक्षीसे यांची लयलूट, खुशमस्कऱ्यांना अपरिमित खैरात आणि हस्तकांना हत्तीएवढी बिदागी, अशी कितीतरी उदाहरणे शेकडो वर्षे जग बघत आले आहे.

सामान्य माणसाने चकित व्हावे म्हणून अशाच बेलगाम राजा-महाराजांनी काही भव्यदिव्य स्मारके करून ठेवलीयत. ती आज प्रदर्शनीय जास्त, ऐतिहासिक मूल्यांनी कमी ठरलीयत. पण ती अखेर प्रतीकेच. लोकांनाही त्या प्रतीकांचे कधी कौतुक, तर कधी चीड वाटत राहते.

साहीर लुधियानवी यांनी शहेनशहाने बनवलेल्या ताजमहालावर टीका करणारे काव्यच लिहिलेय. तरीही ताजमहाल लाखो लोकांना आकर्षित करणारी एक वास्तू ठरलीय. एक सुंदर, अद्वितीय ऐतिहासिक ठेवा या नात्याने तिचे जतन आपण करतोय, पण त्याचे सौंदर्य मनात साठवताना त्या मागचा खर्चही मनात मांडत राहतो.

शिवाजी महाराजांना नसता का करता आला असा एखादा भव्यदिव्य ठेवा? त्यांचा पराक्रम, त्यांचे स्वराज्य आणि त्यांनी जागवलेली स्वातंत्र्याची आस हा खरा त्यांचा ठेवा. त्यांचे गड, किल्ले, वाडे असे किती जण जगातून बघायला येतात?

खरा नेता साधा, प्रामाणिक, दार्शनिक असतो. दिखाऊ अन नमुनेदार इमारतींपेक्षा अभंग अन कठोर इमान घडवायला त्याला आवडते. पण अदृश्यापेक्षा दृश्य, निराकारापेक्षा साकार बघायला सामान्यांचे मन वेडे झालेले असते. मानवापेक्षा अमानवी अथवा अतिमानवी पाहण्याकडे त्याचे मन ओढा घेत असते.

“सिग्मंड फ्रॉईड म्हणतो की, दृश्यातला आनंद मानवाला फार सुखावतो. कारण तो जवळपास सहजप्रवृत्ती असतो. माणसाला देखाव्यात फार समाधान लाभते. दृश्यमान रंगीबेरंगी जगापेक्षा अदृश्यात रस घेणे त्याला फार कठीण. फॅसिझम दृष्टीखेचक असतो. अभावग्रस्त लोकांना फॅसिझम भपका, भव्यता, रंग, प्रकाश, आवाज बहाल करत असतो. माणसांना देवादिकांनी पृथ्वीवर यावे अन ती भव्य शोभा दाखवावी, अशी चाह असते. फॅसिस्ट भपक्यातून मानवाला काही चमत्कृती, गूढ अन अधिकारिक प्राप्त होत असते. फॅसिस्ट नेता सर्वसामान्यांची इच्छा साकार करत असतो. आपल्याला काय हवे ते प्राप्त करत असतो. काही इच्छित असतो अन योग्य वेळी पुढे जातो. त्याच्या मनात द्वंदे नसतात, असे जगाला वाटत असते. तरीही जे हवे तो ते मिळवतोच. या उलट संस्कृतीचा नायक आपली तातडीची लालसासुद्धा अन्य कुठल्या चांगल्या गोष्टीसाठी आवळून धरतो. अतृप्त आणि विसंगत इच्छा कशी अस्वस्थता निर्माण करतात, हे तो जाणतो. हेच जगणे असते असे तो मानतो. त्यावर तो वैयक्तिक वा सांस्कृतिक तोडगा शोधत नाही. तो प्रचंड आनंदी कधी राहणार नाही. मात्र त्याचा आत्मसंयम इतरांना मोहवतो व त्यांना विज्ञान, कला व सरकार यांत नवी सत्ता देववतो. तो त्यांना आत्मसन्मानही देतो. फॅसिस्ट नेत्याहून फ्रॉईडचा नेता आत्मभंग ठळक करणारा असतो. म्हणजे तो उपरोधिक बोलू शकतो, तसा स्वत:वर विनोदही करणारा असतो.” (‘द डेथ ऑफ सिग्मंड फ्राईड’, मार्क एडमंडसन, २००७)

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

म्हणून अहमदाबादमध्ये आधीचे ‘सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम’ एका रात्रीत ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’ होते, यामागे क्षणभंगुरता विरुद्ध चिरंतनता असा खास हिंदू तत्त्वज्ञानाचा अर्क नक्कीच नाही.

चुकीचे निर्णय घेणारा अन बहुमताचा सोयीस्कर अर्थ मनमानी असा करवून घेऊन फसगत व फजित झालेला एक नेता आहे. आरंभीची चार वर्षे त्याच्यावर भारतीय जनता फिदा झालेली होती. पण नंतर त्याचे सुमारपण जसजसे ठसत चालले, तसा त्याचा भव्यतेचा सोस (भव्यगंड असे त्याला म्हणू) प्रकट होत चालला. त्याची दाढी जितकी लांबतीय, तितका त्याचा पोकळपणा गडद होतोय. छातीवर लांब रुळणारी दाढी व मागे मानेखाली गेलेले केस, ही हिंदू प्रतीके संन्यास, वैराग्य यांसह विद्वत्ता, तप आणि सुसंस्कृतता यांचीही आहेत.

‘मोदी मुळीच बुद्धिजीवी नाहीत’ असा अभिप्राय अ‍ॅमेझॉनसारख्या व्यापारी (मात्र ते साधे, तार्किक व थेट वागणारे आहेत) कंपनीने द्यावा, यातच सारे काही आले. शुभ्र केसांचे रुळणे देशातल्या राजकीय कृष्णकृत्यांशी मेळ खात नाहीत. लोकही काळे अन उजळ यांत उजळ बाजूची निवड करत असतात. म्हणून त्यांचे डोळे असेच दिपत जाणार… एक माणूस असेच राज्य करत राहणार… तोंडाच्या समस्यांपेक्षा तोंडाचा ‘आ’ वासेल असे काही करत राहणार…

..................................................................................................................................................................

लेखक जयदेव डोळे माध्यम विश्लेषक आहेत.

djaidev1957@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......