छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातून लोककल्याणकारी निष्ठा दिसते...
पडघम - सांस्कृतिक
व्ही. एल. एरंडे
  • छत्रपती शिवाजी महाराज
  • Sat , 27 February 2021
  • पडघम सांस्कृतिक शिवाजी महाराज Shivajai Maharaj शिवजयंती Shivjayanti

‘मराठी समाजशास्त्र परिषदे’तर्फे १९ फेब्रुवारी २०२१ रोजी माजी प्राचार्य डॉ. व्ही. एल. एरंडे यांचे ‘लोककल्याणकारी राजा : छत्रपती शिवाजी महाराज’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्याचे हे संक्षिप्त स्वरूपातले शब्दांकन...

..................................................................................................................................................................

कॉ. गोविंद पानसरे यांनी ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकात स्पष्ट केले आहे की, सरंजामशाही काळात शिवाजी महाराजांमध्ये कोणते असे वेगळेपण आहे की, त्यांना लोककल्याणकारी राजा म्हणून संबोधले गेले. हा जगातील एकमेव राजा सरंजामदार असूनही लोककल्याणकारी म्हणून ओळखला गेला. रयतेला हा राजा आपला का वाटत होता? त्यांच्या प्रती अशी कोणती निष्ठा होती? याचे उत्तर शोधणे आवश्यक आहे. ‘आपण मेलो तरी चालेल, परंतु राजा जगला पाहिजे’ असे त्या वेळच्या जनतेला का वाटत होते? मावळ्यांना माहीत होते की, त्यांना मरण येणार आहे. मग ते मरण्यासाठीच का लढले? त्यांची अशी कोणती निष्ठा होती? याचे उत्तर शोधले तरच महाराजांना लोककल्याणकारी राजा का म्हणतात, हे समजू शकेल.

महाराजांच्या पूर्वीची महाराष्ट्रातील परिस्थिती अत्यंत वाईट, सरंजामदारीने पिचलेली होती. सरंजामदार, वतनदार हे जनतेवर जुलूम, अत्याचार, मनमानी करणारे होते. या व्यवस्थेत स्त्री ही उपभोग्य वस्त्तू मानली जात होती, स्त्री-पुरुषांना गुलाम मानले जात होते. ‘आपण मालक आहोत असे समजून रयतेची लूट करणे हा आपला अधिकार आहे’, असे वतनदार समजत होते. यामुळे सामाजिक अन्यायाची व धार्मिक दहशतवादाची परिस्थिती निर्माण झाली होती. १६४०मध्ये आदिलशहाचा सरदार ‘मुरार जगदेव’ याने पुण्याभोवती गाढवांचा नांगर फिरवून त्या ठिकाणी पहार रोवली आणि जनतेला सांगितले की, ही जागा वस्ती करण्यासाठी योग्य नाही. जो कोणी या ठिकाणी वस्ती करील, त्याचा विनाश होईल.’

अशा वस्तीमध्ये जनता जीवन जगत होती. ही परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न महाराजांनी केला. रा.ना. चव्हाण ‘आधुनिक महाराष्ट्रातील प्रबोधन’ या ग्रंथामध्ये म्हणतात - ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यक्रांतीकरता सामाजिक क्रांती केली.’ त्यांनी केलेल्या लढाया हे त्यांचे २० टक्के कार्य असून ८० टक्के कार्य सामाजिक, आर्थिक, भौतिक, कृषीविषयक आहे.

महाराजांच्या अगोदर या महाराष्ट्रामध्ये संपूर्णपणे धार्मिक दहशतवाद निर्माण केला गेला होता. म्हणून महाराजांनी धार्मिक छळाच्या निवारणासाठी प्रयत्न केले. वतनतदारांकडून शेतकऱ्यांच्या होणाऱ्या छळास पायबंद कसा घालता येईल, यासाठी प्रयत्न केले. त्र्यं. शं. शेजवलकर व कॉ. शरद पाटील असे म्हणतात की, महाराजांना वतनदाऱ्या नष्ट करणं शक्य नव्हतं, परंतु वतनदारी नष्ट करून रयतेसाठी राज्य निर्माण करण्याची त्यांची पार्श्वभूमी होती.

१७व्या शतकात स्त्रीला गुलाम म्हणून विकले जात असे. त्यांच्या चारित्र्याला, अब्रूला कोणतीही किंमत नव्हती. तिला स्वातंत्र्य, सुरक्षितता नव्हती. अशा या काळात ‘स्त्रीवादा’ची मांडणी करणारा राजा म्हणून महाराजांना ओळखले जाते. स्त्रीला सन्मान मिळावा, त्यांना मानाचे स्थान मिळावे, प्रतिष्ठा मिळावी व माणूस म्हणून स्त्रीला जगता यावे, महाराजांचे हे विचार त्यांना निष्ठा देऊन गेले. त्यामुळे ते ‘लोककल्याणकारी राजा’ झाले.

..................................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी पहा - सर्व प्रकारच्या कट्टरतेला नाकारणाऱ्या ‘इन्शाअल्लाह’ या अभिराम भडकमकर यांच्या बहुचर्चित कादंबरीवरील ‘परीक्षण’ स्पर्धा

..................................................................................................................................................................

तत्कालीन व्यवस्थेत बहुजनांकरता व सर्वसामान्यांकरता धार्मिक व राजकीय अंधश्रद्धा जाचक ठरत होती. तसेच वतनदार, सरंजामदार यांच्याकडून सुटका होऊ शकत नाही, अशी स्थिती निर्माण झाली होती. महाराज रयतेचे राजे, कुळवाडीभूषण, बहुजन प्रतिपालक, क्षत्रिय कुलावंत होते. त्यांचा ‘बहुजनांचा राजा’ म्हणून महात्मा फुलेंनी उल्लेख केला आहे. त्यांनी सरंजामदारी व्यवस्थेकडून लोककल्याणकारी राजाकडे वाटचाल केली. महाराजांचे तीन पैलू होते - महाराजांचे चरित्र, महाराजांची विचारसरणी आणि महाराजांचे प्रजाप्रती असलेला व्यवहार किंवा कार्य पद्धती.

महाराजांनी प्रस्थापित समाजरचनेला विरोध करून एका समाजक्रांतीकडे वाटचाल केली. म्हणून डॉ. आनंद पाटील म्हणतात- ‘१७ व्या शतकामधील पाटीलकी, वतनदारी, आदिलशाही आणि मोगलशाही यांना छेद देऊन प्रस्थापितांविरुद्ध राज्य स्थापित केले.’ चंद्रशेखर शिर्के म्हणतात, “महाराजांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये दोन-तृतीयांश संघर्ष आपल्या स्वकीयांविरुद्ध केला. त्यामध्ये मराठा वतनदार, मराठा सरदार यांचा समावेश होता. कारण हे मराठा स्त्रियांवर जुलूम करणारे, अत्याचार व बलात्कार करणारे होते.शेतकऱ्यांवर, कष्टकऱ्यांवर अत्याचार करणारे होते, त्यांच्या वतनदाऱ्या होत्या, ते मालक होते. म्हणून त्यांनी या प्रस्थापित सत्तारचनेला विरोध केला.” दुसरा संघर्ष त्यांनी मोगलांविरुद्ध केला.

महाराजांची कुळवाडीभूषण आणि बहुजन प्रतिपालक ही प्रतिमा निर्माण झाली. त्याविषयी कॉ. गोविंद पानसरे म्हणतात की, ‘महाराजांच्या स्वराज्याचा केंद्रबिंदू बहुजन समाज व शेतकरी समाज हा होता. म्हणून ते कुळवाडीभूषण होते.’ त्यांनी सरदारांच्या लुटीला विरोध केला. त्यांनी एका आज्ञापत्रात लिहिले आहे की - ‘तुम्हाला शेतकऱ्यांकडून अतिरिक्त कर वसूल करता येणार नाही, पिकलं नाही तर शेतसारा वसूल करता येणार नाही, दुष्काळ पडला तर शेतसारा माफ करावा लागेल, उत्पन्न पाहून शेतसारा लावावा.’ अशा स्वरूपाच्या वतनदारांच्या आर्थिक जाचाला प्रतिबंध घालून महाराजांनी लोककल्याणकारी व्यवस्था निर्माण केली. म्हणून त्यांना ‘कुळवाडीभूषण’ असे संबोधले जाते.

महाराजांना ‘बहुजन प्रतिपालक’ असेही म्हटले जाते. त्यांनी अस्पृश्यता, भेदभाव आणि शूद्रता मानली नाही. त्यांच्या सैन्यामध्ये अठरापगड जाती-धर्माचे सैनिक आढळतात. यामुळे त्यांना ‘बहुजन प्रतिपालक’ असे म्हणतात. चंद्रकांत शिर्के म्हणतात, ‘महाराजांचे सैनिक हे बहुजन समाजातील आहेत. त्यांनी मराठा क्षत्रियांना बाजूला सारून रामोशी, कोळी, सोनकोळी, मुस्लीम, बेरड, महार, मांग, माळी यासारख्या जातींमधून व शेतकऱ्यांमधून आपल्या सैनिकांची नेमणूक केली. म्हणजेच महाराजांनी कष्टकऱ्यांना क्षत्रिय बनवले. त्यांना स्वराज्याचा महत्त्वाचा भाग बनवले. म्हणून महाराजांना रयतेच्या निष्ठा प्राप्त झाल्या व महाराज बहुजन प्रतिपालक व कुळवाडीभूषण बनले.’

महाराज केवळ योद्धे नसून नव-समाजरचनेचे व नव्या कृषीरचनेचे जनक होते. त्यांनी शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रामध्ये नव्या कृषीरचनेची संस्कृती निर्माण केली. त्याची आपल्याला आजही अनुभूती येते. त्यांनी शेतकऱ्यांसाठी आपल्या अधिकाऱ्यांना आज्ञापत्रे लिहिली. अशाच एका आज्ञापत्रात - “तुमची पाटीलकी ही रयतेच्या हितासाठी सोपवलेली जबाबदारी आहे, तुम्ही पाटील असून रयतेचे मालक नाहीत. म्हणून तुमच्याकडे काहीही शिल्लक राहिले नाही तरी चालेल, परंतु माझ्या स्वराज्यात कोणीही उपाशी राहता कामा नये. कोणत्याही शेतकऱ्याला अडवू नये, त्यांना कर्ज द्यावे, स्वराज्यात नव्याने दाखल झालेल्या शेतकऱ्यांना नांगर, बी-बियाणे, आर्थिक मदत करा,” अशा प्रकारचा आदेश पाटलाला केला. यातून महाराजांची रयतेप्रतीची निष्ठा दिसून येते. म्हणून शेतकऱ्यांची लेकरं महाराजांच्या सैन्यामध्ये गेली. ‘आपण मेलो तरी चालेल, पण आपला हा पोशिंदा राजा जगला पाहिजे’ अशी भावना या शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची बनली. म्हणून शिवा न्हावी, बाजीप्रभू, तानाजी मालुसरे यांच्यासारखे सैनिक तयार झाले.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

महाराजांनी राज्यक्रांतीऐवजी समाजक्रांती केली. त्यांनी स्वराज्यासाठी पोषक ठरेल अशी सामाजिक पार्श्वभूमी तयार केली. विशेषतः शेतकरी, कष्टकरी व स्त्रीरक्षक म्हणून त्यांची प्रतिमा निर्माण झाली. एका स्त्रीवर बलात्कार केला म्हणून महाराजांनी सकुजी गायकवाड यांना शिक्षा दिली. कॉ. पानसरे म्हणतात त्यानुसार ज्यांच्या बळावर स्वराज्य निर्माण करणार आहोत, अशांना शिक्षा देण्यासाठी समान न्यायावर निष्ठा लागते. ती महाराजांकडे होती. ‘किल्लेदार, सुभेदार आपला असला काय?, स्त्री स्वकीय किंवा परकीय असली काय? व शत्रूची असली तरी स्त्रीच्या अब्रूला हात घालण्याचा अधिकार मी तुम्हाला दिलेला नाही,’ या विचारातून महाराजांचा महिलांप्रती असलेला आदर स्पष्ट होतो. जेथे महिलांना प्रतिष्ठा नसेल, सन्मान नसेल तेथे स्वराज्य स्थापन करण्याचा अधिकार मला नाही असे महाराज म्हणत. म्हणजेच बहुजन, स्त्रिया, शेतकरी, शूद्रा-अतिशूद्र, अस्पृश्य या चार घटकांच्या कल्याणासाठी महाराजांनी आपले स्वराज्य व सत्ता वापरली.

महाराजांच्या विचारसरणीमध्ये समाजक्रांती, नव-समाजरचना आणि नवी कृषी संस्कृती या तीन गोष्टी दिसतात. आपल्यास रयतेचे राज्य, लोककल्याणकारी राज्य निर्माण करायचे असेल तर समाज आपल्या सोबत हवा. म्हणून त्यांनी अठरापगड जातींना सोबत घेतले. प्रसंगी आपल्या समाजाचा विरोध पत्करला, परंतु दौलत खानसारख्या अनेकांना प्रमुख बनवले. जे लोक शेती व समुद्रावर जीवन जगत होते, त्यांना क्षत्रिय बनवले. महाराजांनी रयतेच्या कल्याणासाठी सत्तेचा वापर केला. या वेळी घोरपडे, शिर्के, निंबाळकर, खेडसावंत हे सर्व मराठे महाराजांच्या विरोधात गेले. तरीही त्यांनी त्याचा विचार केला नाही. या त्यांच्या विचारसरणीतून लोककल्याणकारी धोरण जाणवते.

१७व्या शतकात देशांमध्ये गुलामगिरीची प्रथा सुरू होती. त्यांनी गोव्याचे डच, पोर्तुगीज यांना पत्र लिहिले. त्यात ते म्हणतात, “बादशहाच्या काळात स्त्रिया व पुरुष यांची खरेदी-विक्री होत असे, परंतु माझ्या काळात हे होऊ देणार नाही किंवा माझे सैनिक तुम्हाला खरेदी-विक्री करू देणार नाहीत.” जी प्रथा या सरंजामदारी व वतनदारी व्यवस्थेत सर्रासपणे चालू होती, त्याला प्रतिबंध घालण्याचे काम महाराजांनी केले. यातून त्यांची समाजक्रांतीची व समाज न्यायाची भूमिका स्पष्ट होते.

महाराजांना ‘लोककल्याणकारी राजा’ संबोधायचे कारण म्हणजे शोषणमुक्त बहुजन समाजरचना होय. ते कोणत्याही समाजातील धार्मिक, आर्थिक, लैंगिक शोषणाच्या विरोधात होते. म्हणून त्यांनी स्वराज्यामध्ये शोषणमुक्त समाजाचा आग्रह धरला. शेतकरी, स्त्रियांचे शोषण कोणीही करणार नाही, यासाठी फर्मान काढले.

महाराजांचा चिपळूणला सैनिकांचा तळ होता. त्यास त्यांनी आज्ञापत्र पाठवले होते. त्यात ते म्हणतात, ‘आता उन्हाळा पडत आला आहे, तुम्हाला अन्नधान्य कमी पडत असेल, परंतु तुम्ही कोणीही लूट करायची नाही किंवा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये चोरी करायची नाही. त्यांच्याकडून पैसे देऊन अन्नधान्य खरेदी करावी. नसता जनता असे म्हणेल की यांच्यापेक्षा मोगल बरे!’

महाराजांनी स्त्रियांच्या शोषणाला पायबंद घालण्याचा प्रयत्न केला. त्यांनी शत्रूच्या स्त्रीलासुद्धा सन्मान दिला. किल्लेदार सावित्रीबाई व रायभागी हे त्यांचे उत्तम उदाहरण आहे. म्हणजे महाराज अन्याय व शोषण सहन करत नाहीत. म्हणून ही व्यवस्था लोककल्याणकारी होती, असे अधोरेखित होते.

१६४०मध्ये जगदेवच्या पराक्रमामुळे पुणे सोडून गेलेल्या रयतेस महाराज ‘नवी रयत’ असे संबोधतात. यासाठी त्यांनी आज्ञापत्र काढले. ‘स्वराज्यामध्ये जी नवी रयत सामील झाली आहे, त्यांना कसण्यासाठी जमिनी द्या, त्यांना त्यासाठी लागणारे साहित्य, बैलगाडी, लाकूड-फाटा, बी-बियाणे आणि पैसे द्या. यातून ते शेती करू शकतील.’ हा सामाजिक परिवर्तनाचा व सामाजिक न्यायाचा प्रवाह महाराजांनी तयार केला.

तत्कालीन समाजव्यवस्थेने सर्व बहुजन समाजाला प्रतिष्ठा, सन्मान व जीवन नाकारले होते. यासाठी महाराजांनी महार, मांग, रामोशी, मदारी, साळी, कोळी, बंजारा, न्हावी आणि मुस्लीम यांसारख्या असंख्य जातींना क्षत्रित्व प्राप्त करून दिले. त्यांना शूद्र किंवा अस्पृश्य न मानता आपले सवंगडी, स्वराज्याचा घटक मानले. या संदर्भात डॉ. आनंद पाटील व मुजुमदार असे म्हणतात की, ‘महाराजांच्या या वर्तनामुळे समाजातील स्पृश्य-अस्पृश्य हे अंतर कमी होऊन, जातीयता व अस्पृता महाराजांच्या काळात कमी झाली.’ यातून महाराजांचा लोककल्याणकारी दृष्टीकोन स्पष्ट होतो.

१७ व्या शतकात महाराजांनी निर्माण केलेले स्वराज्य व इतर मोगलाया यांमध्ये फरक जाणवतो. कारण महाराजांनी स्वत: स्वराज्य निर्माण केले, तेही रयतेच्या जीवावर. त्यांनी शोषणमुक्त समाज आणि सामाजिक न्याय यावर आधारित समाजरचना निर्माण केली. स्वराज्यात असलेली जुनी कर पद्धती बंद करून नवीन कर पद्धती निर्माण केली. ती  बहुजनांच्या हिताची होती.

महाराज चरित्र, विचार आणि व्यवहार या तीनही पातळीवर जगाच्या पाठीवर एकमेव राजा होते. त्यांचा संपूर्ण व्यवहार सामाजिक न्याय, शोषणमुक्त समाजाची रचना करण्यावर होता. म्हणून महाराजांनी प्रस्थापितांना बाजूला करून बहुजनांना सोबत घेऊन स्वराज्याची निर्मिती केली. तत्कालीन कालखंडात महाराजांनी शेतकऱ्यांना जमिनी दिल्या, कर पद्धतीत बदल केला, दुष्काळामध्ये होरपळलेल्यांना मदत केली, सारा पद्धतीत बदल केला, शेती साहित्य दिले. यातून त्यांची कार्यपद्धती बहुजन समाजाच्या हिताची व कल्याणासाठीची होती असे दिसते.

त्यांची संपूर्ण आज्ञापत्रे केवळ आणि केवळ शेतकरी, गुलामगिरी, अत्याचार, शोषण यांच्या विरोधात होती. त्यांची संपूर्ण कार्यपद्धती शूद्र व कष्टकरी समाजाला प्रतिष्ठा मिळवून देण्याची होती.

महाराजांना कुळवाडीभूषण, बहुजन प्रतिपालक, कुलावंत आणि गो-ब्राह्मण प्रतिपालक ही विशेषणे लावली गेली आहेत. यातील गो-ब्राह्मण प्रतिपालक हे विशेषण नंतर खोडसाळपणाने लावण्यात आले. ते गो-ब्राह्मणप्रतिपालक नव्हते, तर बहुजन प्रतिपालक होते.

जून १६७४ मध्ये महाराजांचा पहिला राज्याभिषेक वैदिक पद्धतीने झाला. कॉ. शरद पाटील असे म्हणतात की, ‘महाराजांनी जाणीवपूर्वक शाक्त धर्मीय पद्धतीने दुसरा राज्याभिषेक केला.’ तो करण्याचा महाराजांचा हेतू होता की, त्यांना बहुजनांची प्रतिष्ठा प्राप्त करायची होती. ‘मी ब्राह्मणांचा राजा किंवा गो-ब्राह्मण प्रतिपालक’ ही प्रतिमा त्यांना नष्ट करायची होती. तर ‘मी बहुजनांचा, शूद्रातिशूद्रांचा, शेतकऱ्यांचा, कष्ट्टकऱ्यांचा, सर्वसामान्यांचा, रयतेचा राजा आहे’, हे सिद्ध करायचे होते. म्हणून महाराज कुळवाडीभूषण व बहुजन प्रतिपालक होते.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

‘हिंदवी स्वराज्य’ म्हणजे हिंदूंचे राज्य नसून ‘एतदेशीय’ राज्य होय. हा शब्द धर्मवाचक नसून, प्रदेशवाचक आहे. ‘आपले स्वराज्य’ या अर्थाने हिंदवी स्वराज्याची संकल्पना महाराजांनी वापरली. म्हणून ते धार्मिक जरी असले, तरी सर्वधर्म समावेशकता मानणारे होते. महाराज मुस्लीम विरोधी होते, असे बोलले जाते, परंतु तसे ते नव्हते. हिंदू-मुस्लीम वाद हा धार्मिक नसून राजकीय होता.

महाराजांनी १६७६ मध्ये ‘प्रभानवल्ली’च्या सुभेदाराला एका आज्ञापत्रामध्ये असे लिहिले आहे की, ‘पाटील रयतेकडून भाजीच्या एका देठाचीही अपेक्षा न ठेवता तुम्ही योग्य वर्तन करावे, त्यांना बी-बियाणे, नांगर, बैल नसतील तर त्यांना बिनव्याजी कर्ज किंवा आवश्यक वस्त्तू खरेदी करून द्याव्यात, त्यांनी कर्ज फेडले नाही तर त्यांच्या शेतावर व घरावर जप्ती आणू नये.’

महाराजांच्या अनेक पैलूपैकी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे सामाजिक न्याय. त्यांची सामाजिक न्यायाची भूमिका आजपर्यंत एकाही इतिहासकाराने समोर आणली नाही. त्यांचा खरा इतिहास महात्मा फुले यांनी समोर आणला. त्यांनी नेहमी सामाजिक न्यायाची भूमिका घेतली. कोणावरही अन्याय अत्याचार होणार नाही, शोषण होणार नाही, याची दक्षता ते घेत असत. त्यांनी शोषणमुक्त समाजरचना निर्माण केली. म्हणून ते समाजक्रांतिकारक, लोककल्याणकारी व नवसंस्कृतीचे जनक झाले.

लोकशाहीत ‘नव-सरंजामगिरी’ राजकीय व्यवस्था निर्माण झाली आहे. येत्या काळामध्ये महाराजांचे स्मरण करून प्रजाहितदक्ष राजकीय व्यवस्था निर्माण व्हायला हवी. महाराजांविषयी चुकीचे विचार पसरवणाऱ्या लोकांपासून जनतेला दूर ठेवणे गरजेचे आहे. संशोधकांनी महाराजांचा खरा इतिहास समोर जनतेसमोर आणावा.

..................................................................................................................................................................

शब्दांकन :

डॉ. विनोद बी. खेडकर (सहायक प्राध्यापक, डॉ. एम. के. उमाठे कॉलेज, नागपूर)

khedkarvinod09@gmail.com

प्रा. प्रियदर्शन भवरे (बारवाले महाविद्यालय, जालना)

priyadarshan1971@gmail.com

..................................................................................................................................................................

लेखक व्ही. एल. एरंडे माजी प्राचार्य व राज्यशास्त्राचे प्राध्यापक आहेत.

vlyerande@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......