अजूनकाही
की-वू किम आपला मित्र मिन-ह्युकबरोबर नोकरी नाही म्हणून चर्चा करतोय. महिन्याची दोन टोके जुळवता जुळवता नाकी नऊ येताहेत. कसंतरी करून नोकरी मिळणं गरजेचं आहे. मित्र म्हणतो- तो शिकण्यासाठी परदेशात जाणार आहे. तो एका श्रीमंत कुटुंबातील मुलीला इंग्लिश शिकवत असतो. ती नोकरी की-वूने करावी असं तो सुचवतो. की-वू लागलीच तो जॉब स्वीकारतो. त्याच्या डोक्यात एक प्लॅन साकारतो- एकेक करून किम कुटुंबातील सर्वांनी तिथं काम करायचं. त्यासाठी अवैध मार्गानं ते काम मिळवतात, पण तिथं पूर्वी काम करणाऱ्या बाईचं रहस्य उघड होतं आणि किम कुटुंबाला स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडावं लागतं.
हे दक्षिण कोरियन दिग्दर्शक बॉन्ग जून-हो दिग्दर्शित ‘पॅरासाईट’ (२०१९) या सिनेमाचं थोडक्यात कथानक. सध्याच्या कोरियातील आर्थिक-सामाजिक परिस्थितीचं भयावह चित्रण करणारा सिनेमा. श्रीमंत-गरीब यातील दरी अतिस्पष्टपणे अधोरेखित करणारा. वर्गसंघर्ष कोणत्या टोकाला जाऊ शकतो, याचं प्रत्ययकारी चित्रण करणारा.
शाळकरी वयाच्या जांबुवंत उर्फ जब्याचं शालूवर प्रेम आहे. ती त्याच्या वर्गात आहे. एका काळ्या चिमणीची राख तिच्यावर टाकली तर ती आपली होईल असं त्याला वाटतं. त्याचा मित्र पिराजी त्याला सांगतो- तुझं स्वप्न पूर्ण होऊ शकणार नाही कारण ती उच्चवर्णीय आहे. आपण खालच्या जातीतील आहोत. त्यामुळे तुझ्या प्रेमाला कुणी किंमत देणार नाही. त्याचे वडील कचरू माने गावात छोटी-मोठी कामं करून मुलीच्या लग्नाची तयारी करत असतात. त्यातच त्यांना गावात हैदोस घालणाऱ्या डुकराला पकडण्याचं काम नाईलाजास्तव स्वीकारावं लागतं.
नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘फँड्री’चं (२०१४) कथानक वरील परिच्छेदावरून थोडंफार समजू शकतं. मंजुळे जो मुद्दा मांडतात तो यापेक्षा जास्त खोलवर व अंतर्मुख करणारा. पारंपरिक जातव्यवस्थेचं इतकं प्रांजळ चित्रण खचितच गेल्या काही वर्षांत थेटपणे पडद्यावर बघायला मिळालं असेल. शेवटी जब्याच्या हातून प्रेक्षकांवर दगड मारण्यातील दिग्दर्शकीय टच तर मंजुळेंच्या मनात असणाऱ्या भारतीय समाजव्यवस्थेवरील रागाचं प्रतीकच.
..................................................................................................................................................................
अधिक माहितीसाठी पहा - सर्व प्रकारच्या कट्टरतेला नाकारणाऱ्या ‘इन्शाअल्लाह’ या अभिराम भडकमकर यांच्या बहुचर्चित कादंबरीवरील ‘परीक्षण’ स्पर्धा
..................................................................................................................................................................
पाच वर्षांच्या फरकाने प्रदर्शित झालेल्या या दोन्ही सिनेमांत एक गोष्ट समान दिसून येते. ती म्हणजे दोन्हीत दिसणारा वर्गसंघर्ष. तो भारत व दक्षिण कोरियातील आर्थिक-सामाजिक स्थितीचं प्रतिनिधित्व करणारा. दोन्हीत एका गरीब कुटुंबाचं चित्रण आहे. दोन्हीत काम मिळवण्यासाठी प्रयत्न करून जगणं सुखकर करण्याची प्रचंड धडपड दिसून येते. जिथे माने कुटुंबीय कष्ट करून एकेक पैसा जमवत असतं, तिथं किम कुटुंब अवैध मार्ग वापरायला मागेपुढे पाहत नाही. त्यांनी पिझ्झा बॉक्स तयार करून देण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आहे. घरातील सर्वांनी काही ना काही काम केलं तरच महिन्याची दोन टोकं जुळतील असं त्यांना वाटतं. मानेचं कुटुंबसुद्धा कामावर जात असतं. दोन्ही कुटुंबातील एकही व्यक्ती घरी निवांत बसलीय असं दिसत नाही. मी घर सांभाळते असं मध्यमवर्गीय किंवा श्रीमंत घरातील स्त्रिया म्हणतात, तसं माने व किम कुटुंबातील स्त्रियांना म्हणता येत नाही. त्यांना दररोज कामावर जावं लागतं. जब्याला एकाच वेळी शाळा व काम दोन्ही करावं लागतं. त्याला ते आवडत नाही, हे त्याच्या देहबोलीवरून दिसून येतं. एके ठिकाणी नळाच्या खड्ड्यात पडलेलं डुकराचं पिल्लू काढ म्हणून पाटील सांगतो, पण तो नकार देतो. त्याला ते काम कमीपणाचं वाटतं. तो माजोरडा झालाय असं पाटील म्हणतो. त्याला आपली सामाजिक परिस्थिती आपल्याकडून किती व कसली कामं करवून घेत आहे याचा राग आहे. आपलं जगणं सन्मानाचं नाही, हे त्याच्या कोवळ्या मनात लहानपणापासून ठसलेलं आहे. त्यामुळे जमेल तसा तो त्याला विरोध करत असतो.
‘पॅरासाईट’मध्ये किम कुटुंबीय पार्क कुटुंबाच्या घरात प्रवेश करतं, ते त्यांच्या आयुष्याला काही अर्थ प्राप्त करून द्यावा म्हणून. त्यासाठी वाट्टेल तो मार्ग स्वीकारायला ते तयार होतात. सिनेमाच्या सुरुवातीला किम कुटुंबातील मुख्य स्त्रीने कुठल्याश्या स्पर्धेत गोळाफेकमध्ये पदक मिळवलेलं दिसून येतं. पुढे ते पार्क कुटुंबाच्या आलिशान घरात लॉनवर विसावलेले असतात, तेव्हा ती स्त्री गोळाफेकचं प्रदर्शन करताना तो गोळा फेकून देते. जेणेकरून तिला ते नकोय, कारण पुढे त्याचं काय झालं याबद्दल कुणी काहीच बोलत नाही. तिनं ते भिरकावून देणं यात तिच्या कुटुंबियांना पण वावगं वाटत नाही. त्यांच्या लेखी त्याचं महत्त्व नगण्यच असलेलं दिसून येतं. पारितोषिक प्राप्त खेळाडू असूनसुद्धा तिला काम करावं लागतंय. कोरियन समाजात खेळाडूंचं असणारं स्थान अतिशय सहजपणे बॉन्ग जून-हो दाखवतात. तसेच खेळाडू असण्याने सन्मान प्राप्त होतो पण आर्थिक चणचण संपत नाही. त्यामुळे तिला सुद्धा कुटुंबातील इतर जणांसारखं काम करावं लागतं. दिग्दर्शक बॉन्ग जून-हो मंजुळेंसारखंच त्यांचं संपूर्ण लक्ष किम कुटुंबावर ठेवतात. पुढे कथानक रहस्यकथेच्या मार्गानं जातं तेव्हा एकमेव किम कुटुंबच पार्क कुटुंबावर अवलंबून नाही, हे सत्य उघडं पडतं. कोरियातील आर्थिक स्थिती किती हलाखीची आहे, याचा प्रत्यय येतो.
दोन्ही सिनेमांत असणारा हिंसेचा वापर हा विचार करायला लावणारा. कोरियाच्या आर्थिक विषमतेत श्रीमंत-गरीब या दरीत किम कुटुंबांच्या व्यक्तींच्या शरीराला येणारा वास विषमतेला मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरलेला दिसतो. पार्क कुटुंबातला मुलगा म्हणतो- किम कुटुंबातील मुलगी व स्वैपाकघरातील स्त्री यांच्या अंगाला एकसारखाच वास येतो, तर त्या मुलाचे वडील म्हणतात- सबवेमध्ये जे अन्न सर्वसामान्यांना दिलं जातं तिथला वास ड्रायव्हरच्या पण अंगाला येतो. तो शेवटी नाकावर बोट ठेवून त्यावर भाष्य करतो, तेव्हा त्याला त्याचे परिणाम भोगावे लागतात. किम कुटुंबाचा प्रमुख त्याचा खून करतो. कथानकाने एकदम हिंसेचा घेतलेला आधार अंगावर काटा आणतो.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
भारतीय परिप्रेक्षात वर्गसंघर्ष हा पारंपरिक जात व्यवस्थेतील विषमतेशी निगडीत दिसून येतो. किंवा असे म्हणता येईल की, वर्गसंघर्ष व जातीय विषमता समांतरपणे मार्गक्रमण करतात. वर्गसंघर्षात जात ही केंद्रस्थानी असलेली दिसून येते. ब्राह्मणी चातुर्वर्ण्य अन्यायी व्यवस्थेमुळे वर्षानुवर्षे खितपत पडलेल्या वर्गाला एकीकडे समानतेशी झगडावं लागतं, तर न्याय हक्कासाठी आंदोलनं करावी लागतात, तर दुसरीकडे सर्वसामान्यांच्या मनात असणाऱ्या विषमतेला तोंड द्यावं लागतं.
‘फॅंड्री’त हा संघर्ष वास्तववादी पद्धतीनं थेट दिसतो. मंजुळे त्याला कुठेही स्टायलिश करत नाहीत. जब्याला शेवटी हातात दगड घेऊन वरच्या जातीतल्या एका माणसाला मारावासा वाटतो, तिथेच विषमता आजही किती खोलवर रुजली आहे, हेच दिसून येतं. जब्या व किम कुटुंबातील कर्तेपुरुष शेवटी हातात शस्त्र घेतात, तेव्हा कार्ल मार्क्सचं सुप्रसिद्ध वाक्य आठवतं. तो म्हणतो- जगातील सर्व संस्कृतींचा इतिहास हा वर्गसंघर्षाचा इतिहास आहे. हे वाक्य समकालीन भारत व दक्षिण कोरियाला चपखल लागू होतं.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
अठराव्या शतकाच्या शेवटी इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली. संपत्ती निर्मिती करून तिचा उपभोग घेणारा एक वर्ग त्या वेळी उदयास आला, तर त्या संपत्तीच्या निर्मितीत हातभार लावणारा कष्टकरी वर्गाचा उदय झाला. त्या वेळेपासून आज एकविसाव्या शतकापर्यंत हे दोन वर्ग नेहमीच आमनेसामने आलेले दिसतात. सध्याची औद्योगिक क्रांती ही डिजिटल तंत्रज्ञानाच्या मोठ्या वापरामुळे तिसऱ्या पर्वातील औद्योगिक क्रांती म्हटली जाते. ‘पॅरासाईट’मधील वाय-फायचा प्रसंग त्याचं उदाहरण. ‘फॅंड्री’त तंत्रज्ञानाचा वापर दिसून येत नाही, पण गावातील सुखवस्तू वर्गातील मंडळी त्यांचा वापर करत असतील असा अंदाज करता येतो. पण हे तंत्रज्ञान जब्याच्या कुटुंबापर्यंत अजून पोचलं नाही, कारण ते त्यांना परवडणारं नाही. जगण्याचा संघर्षच एवढा मोठा आहे की, डिजिटल वस्तू हाताळायला मिळणंच मुश्कील आहे. एकीकडे भारत डिजिटल होत चाललाय, तर दुसरीकडे माने कुटुंबांसारखी असंख्य कुटुंबं दोन वेळच्या जेवणासाठी मोठा संघर्ष करत आहेत. जात विषमतेबरोबर आर्थिक विषमतासुद्धा त्यांच्या नशिबी आलेली आहे. औद्योगिक क्रांतीचे एकीकडे ढोल वाजवले जात असताना किम व माने कुटुंबांकडे बघताना ही क्रांती कितपत उपयोगाची, असा प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही.
दिग्दर्शक बॉन्ग जून-हो व नागराज मंजुळे दोन वेगवेगळ्या देश, समाज व संस्कृतीत राहतात. पण काळानुसार झालेल्या बदलात समाजातील एक वर्ग अजूनही संघर्षाच्याच पातळीवर राहिलेला आहे, या सत्याकडे ते डोळेझाक करत नाहीत. उलट अप्रतिम प्रतिमांचा वापर करून ते कसं हिंसक स्वरूप धारण करतं, याचं प्रत्ययकारी रूप दाखवतात. भलेही दोन्हीत फरक असला तरी ते एकाच प्रतलातील आहेत याची जाणीव करून देतात.
.............................................................................................................................................
लेखक विवेक कुलकर्णी सिनेअभ्यासक आहेत.
genius_v@hotmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment