‘गर्दीकडून दर्दीं’कडे जाणारे ‘ट्रेंडसेंटर’ साहित्य संमेलन!
पडघम - साहित्य संमेलन विशेष
टीम अक्षरनामा
  • प्रातिनिधिक छायाचित्र
  • Mon , 06 February 2017
  • साहित्य संमेलन Sahitya Sammelan अक्षयकुमार काळे Akshaykumar kale ९०वे संमेलन

९० वे अ.भा.मराठी साहित्य संमेलन ३, ४, ५ फेब्रुवारी दरम्यान डोंबिवली इथं संपन्न झालं. या संमेलनाचा लसाविमसावि काढायचा झाला तर तो ‘साहित्याचे नव्हे रिकाम्या खुर्च्यांचे, गर्दीशिवायचे संमेलन’ असाच काढावा लागेल. संमेलनाच्या उदघाटनापासून समारोपापर्यंत कुठल्याही कार्यक्रमाला माणसांच्या गर्दीपेक्षा रिकाम्या खुर्च्यांची गर्दी जास्त होती. अनेक कार्यक्रमांना ३०-४०पेक्षा जास्त रसिकांची उपस्थिती नव्हती!

काल संध्याकाळी झालेल्या साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी आपण कसे महिनाभर डोंबिवलीमध्ये तळ ठोकून होतो, हे संमेलन यशस्वी करण्यासाठी अहोरात्र कार्यकर्त्यांसह मेहनत घेत होतो, याचा पाढा वाचून दाखवला. आगरी युथ फोरम या आयोजक संस्थेचे त्यांनी संमेलन यशस्वी केल्याबद्दल तोंड भरभरून कौतुक केले. स्वागताध्यक्ष गुलाबराव वझे यांनीही संमेलन यशस्वी करून दाखवल्याची ग्वाही दिली. श्रीपाद जोशी यांनी तर समारोपाच्या भाषणात ‘गर्दीकडून दर्दींकडे जाणारे संमेलन’, ‘ट्रेंडसेंटर संमेलन’ असे या संमेलनाचे वर्णन केले. त्यांचे म्हणणे अगदी शंभर टक्के खरे आहे. हे संमेलन ‘ट्रेंडसेटर’ होतेच. कारण गर्दीऐवजी दर्दी साहित्यरसिक या संमेलनात होते. तुरळक का होईना होते. आणि त्यातले बरेचशे मुख्य मंडपाच्या आवारातील पेनाच्या आणि इतर प्रतिकृतींसमोर उभे राहून सेल्फी काढून घेत होते. त्या अर्थाने या संमेलनाने नक्कीच एक नवा ‘ट्रेंड’ सेट केला आहे. या संमेलनाला माणसांची गर्दी नव्हती, पण दर्दींची गर्दी होती, हेही त्यांचे म्हणणे खरे आहे. फक्त ही दर्दी मंडळी माणसं नसून लालभडक व पांढऱ्याशुभ्र आणि रंगीत कुशन असलेल्या खुर्च्या, सोफासेट होते.

अभूतपूर्व अशा ‘ट्रेंडसेटर’ व ‘दर्दीमय’ साहित्य संमेलनाची ही चित्रमय झलक.

मुख्य सभामंडप, श.ना.नवरे सभामंडपाचे हे अगदी व्यासपीठाजवळील छायाचित्र. ज्येष्ठ रंगकर्मी कमलाकर व कांचन सोनटक्के यांच्या प्रकट मुलाखतीला मान्यवरांसाठी असलेल्या आसनव्यवस्थेमध्ये फक्त सजवलेल्या खुर्च्याच तेवढ्या हजर होत्या.

वरील सजवलेल्या खुर्च्यांनंतर अगदी व्यासपीठाला लागून हे सजवलेले सोफासेट. अति अति महत्त्वाच्या व्यक्तींसाठी खास राखीव असलेले. सत्यपालमहाराज चिंचोळकर आणि सोनटक्के दांपत्य यांचे कार्यक्रम या सोफासेटनी शेवटपर्यंत न कंटाळता भक्तिभावाने ऐकले!

वरील दोन्ही कार्यक्रमाच्या वेळेस याच सभामंडपातील मध्यभागाचे हे दृश्य. इथे काही माणसं खुर्च्यांना सोबत म्हणून बसलेली दिसत होती.

अगदी सुरुवातीला महत्त्वाच्या व्यक्तींसाठी राखीव असलेल्या खुर्च्या आणि अति अति महत्त्वाच्या व्यक्तींसाठी राखीव असलेले सोफासेट जसे शांतचित्ताने चिंचोळकरमहाराज व सोनटक्के दांपत्य यांचे कार्यक्रम ऐकत होते, त्याच शांतचित्ताने पाठीमागच्या या केवळ रंगाने लालभडक असलेल्या प्लॅस्टिकच्या खुर्च्याही ऐकत होत्या.

या संमेलनाचे खास वैशिष्ट्य म्हणजे तीन दिवस चालणारे काव्यहोत्र, गझल व बोलीभाषेतील काव्यवाचन. इथे काही साहित्यरसिक बसून खुर्च्यांना आधार देत होती, तर काही खुर्च्या साहित्यरसिकांना धीर देत होत्या.

डॉ. आनंदीबाई जोशी सभामंडपामध्येही साधारण काव्यहोत्रासारखीच स्थिती होती.

मुख्य सभामंडप, संततधार काव्यहोत्र आणि आनंदीबाई जोशी सभामंडप याशिवाय सावित्रीबाई फुले कलामंदिरामध्येही काही कार्यक्रम झाले. काल दुपारी ‘विविध साहित्य प्रवाहांची सद्य:स्थिती’ हा परिसंवाद होता. या कलामंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे संमेलनातले हे एकमेव स्थळ वातानुकुलित होते. एरवी या ठिकाणी बसण्यासाठी २००पासून ५०० रुपयांपर्यंतची तिकिटे काढावी लागतात. संमेलनाच्या तिन्ही दिवशी मात्र इथे विनामूल्य हवा तेवढा वेळ बसता येत होते. इथे साहित्यरसिकांची संख्या ही अशी होती.

वरील परिसंवादाच्या वेळी सभागृहाच्या शेवटी शेवटी साहित्यरसिक निद्राधिन होते, तर खुर्च्या वातानुकुलित वातावरणाला सरावलेल्या असल्याने टक्क जाग्या राहून परिसंवाद ऐकत होत्या!

मुख्य सभामंडपासमोर साहित्यरसिकांसाठी खास सेल्फी काढण्यासाठी पेनाची भव्य प्रतिकृती आणि इतर काही साहित्यिकांच्या बाकड्यावर बसलेल्या प्रतिकृती होत्या. तेवढाच सामान्य साहित्यरसिकांना त्यांचा सहवास मिळावा, त्यांच्याशी हितगूज करता यावं या उदात्त हेतूने ही योजना आयोजकांनी केली होती.

साहित्यरसिकांनीही आयोजकांच्या या कल्पकतेला दाद देत बाकड्यांवर बसलेल्या साहित्यिकांशी हितगूज करत त्यांच्यासोबत सेल्फी काढून घेतले.

आपला सेल्फी खास असावा यासाठी इतरांना मिनिट-अर्धा मिनिटं बाजूला होण्याची विनंती साहित्यरसिकांकडून केली जात होती. आणि आश्चर्य म्हणजे त्यालाही उत्तम प्रतिसाद मिळत होतो. त्यामुळे अनेकांना आपल्या मनासारखे सेल्फी काढता आले.

हल्ली लोक पुस्तकं वाचत नाहीत असं म्हणतात, पण स्वागताध्यक्ष गुलाबराव वझे यांनी संमेलनाला येणाऱ्या प्रत्येकाने जास्ती जास्त पुस्तकांची खरेदी करावी अशी अपेक्षा तिन्ही दिवशी संधी मिळेल तेव्हा व्यक्त केली होती. पण साहित्यरसिक संमेलनाला येताना घरूनच पुस्तकं वाचून येत असल्याने त्यांनी संमेलनातल्या ग्रंथप्रदर्शनाला काही प्रमाणात भेट दिली. ‘दिल मिले न मिले हाथ मिलाते रहिये’ या न्यायाने त्यांनी पुस्तकांच्या भेटी घेतल्या, नाही असे नाही.

‘पुस्तकं तुम्हाला काही सांगू इच्छितात, तुमच्यासोबत राहू इच्छितात’, अशा आशयाची कविता सफ़दर हाश्मी यांनी लिहिली आहे. पण एरवी नेहमीच पुस्तकांचं ऐकणारे, त्यांच्यासोहत राहणारे साहित्यरसिक संमेलनातल्या पुस्तकप्रदर्शनाकडे फारसे फिरकले नाहीत, यात फारसं काही वाटून घेण्याचं कारण नाही. प्रकाशक काय नेहमी साहित्यरसिकांच्या नावाने तक्रारच करत असतात. पुस्तकं संमेलनात विकत घेतली काय आणि घराजवळच्या पुस्तकांच्या दुकानातून किंवा ऑनलाईन विकत घेतली काय, सारखंच की!

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शारीर प्रेम न करता शार्लट आणि शॉचे प्रेम ४५ वर्षे टिकले आणि दोघांनीही असंख्य अफेअर्स करूनही सार्त्र आणि सीमोनचे प्रेम ५४ वर्षे टिकले! (पूर्वार्ध)

किटीवर निरतिशय प्रेम असताना लेव्हिन आनाचे पोर्ट्रेट बघून हादरून गेला. तिला बघितल्यावर, तिची अमर्याद ग्रेस त्याला हलवून गेली. आनाला कुठले तरी सत्य स्पर्शून गेले आहे, हे त्याला जाणवले. आनाबद्दल त्याच्या मनात भावना तयार व्हायला लागल्या. त्याला एकदम किटीची आठवण आली. त्याला गिल्टी वाटू लागले. ही सौंदर्याची ताकद! शारीरिक आणि भावनिक आणि तात्त्विक सौंदर्य समोर आले की, काहीतरी विलक्षण घडू लागते.......

प्रश्न कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो तोंडावर आपटतात की काय याचा नाही. प्रश्न आहे, आपण आणि आपली लोकशाही सतत दात पाडून घेणार की काय, हा...

३० जानेवारीला भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने, उलट कॅनडाच भारताच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप केला आहे. पण याचे आपल्या माध्यमांना काय? त्यांनी अपमाहिती मोहिमेबद्दल जे म्हटले गेले, ते हत्याप्रकरणाशी जोडून टाकले. त्यांच्या बातम्यांचे मथळे पाहता कोणासही असे वाटावे की, या अहवालाने ट्रुडोंचे तोंड फोडले. भारताला निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र मिळाले. प्रोपगंडा चालतो तो असा. अर्धसत्ये आणि अपमाहितीवर.......