अजूनकाही
“Loneliness isn’t the physical absence of other people, he said—it’s the sense that you’re not sharing anything that matters with anyone else. If you have lots of people around you—perhaps even a husband or wife, or a family, or a busy workplace—but you don’t share anything that matters with them, then you’ll still be lonely.”
― Johann Hari, Lost Connections : Uncovering the Real Causes of Depression – and the Unexpected Solutions
‘ब्लेड रनर २०४९’ या हॉलिवुड सिनेमात भविष्यात माणूस कॉर्पोरेट कंपन्या तयार करतील आणि तो या कंपन्यांचा गुलाम असेल असं काहीसं भीतीदायक चित्र दाखवलं आहे. यातल्या नायकाला एक आभासी मैत्रीण असते. ती त्याच्या गरजांनुसार त्याच्याशी प्रणय करते, बोलते व त्याला खूश ठेवते. ही जरी कल्पना असली तरी ती खरी होऊ शकते, अशी परिस्थिती बऱ्याच देशांत निर्माण झाली आहे.
कालच्या बातमीनुसार जपान या प्रगत व कौटुंबिक संस्कृतीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या देशाने वाढत्या आत्महत्या थोपवण्यासाठी ‘loneliness minister’ म्हणजे ‘एकटेपणाचा मंत्री’ नियुक्त केला आहे. ब्रिटनमध्ये तर २०१८मध्येच अशा प्रकारच्या मंत्र्याची नियुक्ती करण्यात आली आहे. सीएनएनच्या बातमीनुसार जपान सरकारने आत्महत्या आणि बाल गरिबीसारख्या मुद्द्यांसाठी १ फेब्रुवारी २०२१ रोजी ‘एकटेपणा प्रतिरोधक कार्यालय’ तयार केलं आहे. जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार जपानमध्ये कोविडच्या काळात ४२,६००हून अधिक कोविड रुग्ण आणि ७,५७७ मृत्यूची नोंद झाली आहे.
दुसऱ्या महायुद्धात झालेली हानी भरून काढण्यासाठी जपानने जे धोरण अवलंबलं, ते राष्ट्राला परत उभारायच्या दृष्टीनं जरुरीचं असलं तरी त्यामुळे नागरिकांवर विचित्र भार टाकला गेला. कौटुंबिक संस्कृतीसाठी प्रसिद्ध असलेला जपानचा जन्मदर अत्यंत कमी आहे. डेटिंग, प्रेम, शारीरिक संबंध अशा गोष्टी करण्यासाठी जपानी पुरुषांना कामामुळे वेळ मिळत नाही. त्यामुळे त्यांना गेशांकडे जाऊन त्यांना शरीराला फक्त स्पर्श करण्यासाठी पैसे द्यावे लागतात, हे मला माझ्या एका जर्मन सहकार्यानं सांगितलं होतं. बरेच लोक पाच दिवस काम करून फक्त झोपायला एका ठिकाणी जातात आणि शनिवार-रविवार घरी राहायला जातात. ‘कामामुळे मृत्यू’ (ज्याला ‘करोशी’ म्हणतात) जपानमध्ये मोठ्या प्रमाणात बघायला मिळतात.
एकटेपणा हा एक वैश्विक मानवी अनुभव आहे. तो फार आधीपासून ओळखला जात आहे, परंतु तो प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळा आहे. एकाकीपणामुळे नैराश्य आणि कमीपणाची भावना निर्माण होऊ शकते. एकांत (solitude) व एकटेपणा (loneliness) यात फरक आहे. एकांत म्हणजे एकट्याने राहण्याची इच्छा. ती काही वेळा सर्जनशील लोकांसाठी अत्यावश्यक असते. मात्र एकटेपणा शरीर व मन यांच्यासाठी घातक आहे, कारण त्यात आजूबाजूला व्यक्ती असूनही मन मोकळं करायला जागा नसते व नात्यावर विश्वास नसतो. एकटेपणाला बळी पडणारे लोक काहीसे संशयी असून ‘आपण नाकारले जाऊ’ या भीतीमुळे (काही पूर्व-ग्रह व आधीचे वाईट अनुभव) मोकळेपणाने व्यक्त होत नाहीत.
एकटेपणा अनेक मानसिक व शारीरिक आजारांना निमंत्रण देतो. त्यातून मेंदूवर ताण वाढून नीट झोप न लागणे, रक्तदाब वाढणे, रक्तातील साखरेची पातळी वाढणे, प्रतिकारशक्ती कमी होणे, अशा अनेक शारीरिक समस्या उद्भवतात. एकटेपणा व व्यसन यांचा अत्यंत जवळचा संबंध आहे. एकटेपणा अनुभवणं हे दिवसाला १५ सिगरेट पिण्यासारखं आहे!
‘HomoSapiens’ या अत्यंत गाजलेल्या पुस्तकाचे लेखक युव्हाल नोआ हरारी यांच्या मतानुसार एक लहान मूल वाढवायला एका कळपाची आवश्यकता असते. पण ते आजच्या आई-वडिलांनी अत्यंत सुरक्षित कवचात वाढवलेल्या बबडी वा बबड्याला मिळत नाही. मानवी मेंदू आजूबाजूच्या नात्यातून मिळणाऱ्या अनुभवातून घडतो, पण गेल्या २० वर्षांत औद्योगिकीकरणामुळे जगात व भारतात आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात काम/व्यवसाय/नोकरी हे सर्वस्व झालं असून तीच आपली ओळख झाली आहे. परिणामी ‘माणूस’ म्हणून आपण खूप कमी उरलो आहोत. याला कारणीभूत आहे वाढती स्पर्धा, पैशाने सुख विकत घेता येतं ही भावना आणि कमालीच्या वेगानं बदलणार तंत्रज्ञान.
‘त्याला मिळालं, मला पण पाहिजे’, ‘भला उसकी सारी मेरी सारी से सफेद कैसे’ अशा तत्त्वावर आधारित अमेरिकन संस्कृती आपल्याकडे टीव्ही, सिनेमा व गेल्या काही वर्षांत सोशल मीडियाने लादली आहे.
आपण सगळ्यांनी कधी न कधी आपल्या डॉक्टरकडून वेदनाशामक इंजेक्शन घेतलेलं असतं. त्यामुळे वेदनेचे सिग्नल ब्लॉक होऊन तिची जाणीव कमी/नाहीशी होते. तसाच प्रकार भावनिक वेदनेच्या बाबतीत होतो. कुठलंही व्यसन आपली भावनिक वेदना ब्लॉक करतं.
..................................................................................................................................................................
अधिक माहितीसाठी पहा - सर्व प्रकारच्या कट्टरतेला नाकारणाऱ्या ‘इन्शाअल्लाह’ या अभिराम भडकमकर यांच्या बहुचर्चित कादंबरीवरील ‘परीक्षण’ स्पर्धा
..................................................................................................................................................................
भावनिक वेदना कुठून येते? कशी येते? ज्या कुठल्याही घटना/व्यक्ती/आठवण आपल्याला त्रास देतात, त्यातून आपल्यात नकारात्मक भावना जागवली जाते. ती जर सतत येत राहिली तर आपल्यावर ताण येतो. त्यातून तात्पुरती सुटका व औटघटकेचा आनंद मिळवण्यासाठी आपण जो मार्ग स्वीकारतो, तो हळूहळू व्यसनाकडे जातो. एकटेपणा अनुभवणाऱ्यांना व्यसन सोबत करतात.
सध्या आभासी जगातील संवाद/नाती अति प्रमाणात वाढल्याने मेंदूत dopamine जरी स्त्रवत असलं (समाजमाध्यमांची likes, comments, notification हे मेंदूसाठी reward सारखी कामं करतात), तरी त्यात कुठलीच ओढ असलेली भावना नसते. कारण मेंदूत oxytocin व serotonin स्त्रवत नाही. म्हणून आभासी जगात नाती तयार करताना व तोडताना त्रास होत नाही. कारण लगेच दुसरा पर्याय तयार असतो.
प्रत्यक्ष नाती ही माणसाची मूलभूत गरज असते. ती पूर्ण होत नसेल तर मेंदू केवळ आनंद शोधत व्यसनाच्या आहारी जातो. दुर्दैवानं सध्याची समाजरचना व अर्थव्यवस्था आपल्याला जास्तीत जास्त dopamine कसं मिळेल याचाच विचार करतात. ‘दुःखी होऊ नका, आम्ही आनंद विकायला बसलो आहोत’ असं सांगत असंख्य गोष्टी आपल्याला लुभावतात. ब्रेकअप झाल्यावर डेटिंग अॅप्स, मित्राशी भांडण झाल्यावर गेमिंग, आई-बाबांशी पटत नसेल तर सोशल मीडिया, असं केल्यानं आपल्यात उतावळेपणा वाढीस लागतो आणि आपली दुःख सहन करण्याची क्षमता कमी होते. हे चक्र भयावह आहे. वाढत्या स्पर्धेत अपयश सहन न होऊन जीव गमावणाऱ्यांची संख्या वाढतच चालली आहे.
व्यसन हे केवळ दुःखी बाजू बधिर करण्यासाठी वापरलं जातं. व्यसन थांबवल्यावर ही दबलेली भावना दुहेरी वेगानं बाहेर येते. तो जोर इतका असतो की, व्यसनाची तीव्रता आणखी वाढते. भावनिक वेदनेच्या मुळाशी गेल्यास, ती वेदना स्वीकारून, तिचा आदर करून तिच्यापासून दूर न पळता तिच्यासोबत काही काळ राहणं आवश्यक आहे. व्यसन कठीण भावनांपासून पळण्याचा एक मार्ग आहे.
ब्रिटनमध्ये व्यसन हा संसर्गजन्य आजार झाला आहे, कारण ब्रिटिश समाजात एकटेपणा टोकाला पोहचला आहे.
उद्योग-केंद्रित राष्ट्रात एकटेपणा जास्त आहे, कारण तिथं लोक व्यवहारी नात्यापुरते एकत्र येतात. त्यात भावनेचा ओलावा नसतो. सतत एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या नादात कामाच्या ठिकाणी मैत्री राहत नाही. पूर्वीच्या पिढीत कामाच्या ठिकाणी बंध जुळायचे आणि ते शेवटपर्यंत टिकायचे. मात्र आता बाजूच्या टेबलवर बसलेली व्यक्ती काय करते, हेही बहुतेकांना कळत नाही. कितीही किचकट काम करत असलो तरी आपण रोबो नाही. आपल्या भावनिक गरजा पूर्ण होत नसल्यानं एकटेपणा व जोडीनं आत्महत्या वाढत आहेत. मार्केटिंगवाल्यांनी आपली वस्तू विकण्यासाठी आपल्या एकटेपणाचा छान वापर करून सोशल मीडिया आपल्या माथी मारला आहे.
आनंदापेक्षा दुःख जास्त देणारी अत्यंत चुकीची कामं करण्याची पद्धत, ही भारतीयांची खासीयत आहे. लोकांना कमीपणाची भावना देऊन काम करून घेणं व अत्यंत चलाखीनं त्यांना साम्राज्यवादी व्यवस्थेवर अवलंबून ठेवणं, अशी आपली मानव संसाधन व्यवस्था आहे. यात एखाद्या रोबोप्रमाणे माणसं काम करत राहतात. ‘तत्काळ समाधान’ हे एकमेव उद्दिष्ट मानून सध्या आपल्या समाजाची वाटचाल सुरू आहे.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
धंदेवाईक प्रवृत्तीच्या राजकारणानं गेल्या काही वर्षांत धर्म व जात यांचा वापर करून समाजात पाडली गेलेली दुही एकटेपणा वाढण्याचं एक प्रमुख कारण आहे. आपल्यासारखी नसणारी व्यक्ती ही आपली शत्रू आहे, अशी असुरक्षितता वाढल्यानं विश्वास कमी झाला आहे. शेजारी, मित्र-मैत्रिणी, नातेवाईक व कामाच्या ठिकाणचे जिव्हाळ्याचे संबंध कमी होऊन लोक आता ‘राजकीय पक्षाचे कार्यकर्ते’ म्हणून वावरायला लागले आहेत. आपला पक्ष, आपली जात, आपला धर्म वरचढ दाखवण्यासाठी लोक सतत भांडत असतात. त्यामुळे एकटेपणा वाढीस लागला आहे.
पैसा व त्यातून येणारा ऐशोआराम म्हणजे आनंद ही कल्पना भारतीय लोकांमध्ये एकटेपणा वाढण्यामागचा आणखी एक घटक आहे. आनंदी देशाच्या यादीत भारत अगदी शेवटच्या क्रमांकावर आहे. समृद्ध नाती हा आनंदी समाजाचा सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. आनंदी देशाच्या यादीत पहिल्या पाचमध्ये येणारे देश कामाला महत्त्व देणारे ‘नसून’ तिथं आनंद व समाधान ही कल्पना मध्यभागी ठेवून देशाची धोरणं आखली जातात. नॉर्वे, फिनलंड, स्वीडन, डेन्मार्क अशा देशातील well-being Index अमेरिका, ब्रिटनपेक्षा खूप जास्त आहे.
भारतीय लोक छंद, खेळाची आवड, कला-जोपासना अशा गोष्टींना अजिबात महत्त्व देत नसून सुट्टी घेऊन आराम करणं पाप समजलं जातं. सुट्टी घेणाऱ्या लोकांना आळशी समजतात, मात्र सतत कामात राहणं, हेसुद्धा व्यसन आहे हे लोकांना कळत नाही. छंद, खेळ या गोष्टींतून आनंद मिळवता येतो, मग वारंवार मेंदू शांत करायला दारू/सिगरेट लागत नाही.
लग्नाच्या विचित्र कल्पनासुद्धा अनेक विचित्र गोष्टींना निमंत्रण देतात. निरोगी स्त्री-पुरुष नात्यांसाठी लैंगिक शिक्षण सगळ्यात जास्त आवश्यक आहे. लग्नासाठी समुपदेशन घेणाऱ्या जोडप्यांना लैंगिक समुपदेशन करावं लागतं, असं बहुतेक समुपदेशक सांगतात. शारीरिक समाधान नसेल तर दुरावा येऊन एकटेपणाची समस्या वाढते.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
कोविडमुळे एकटेपणाच्या समस्येने गंभीर स्वरूप धारण केलं आहे. त्यामुळे आत्महत्या वाढल्या आहेत. अचानक नोकरी जाणं, वृद्धापकाळ, आजार, मानसिक रोग अशा अनेक कारणांमुळे कोविड अनेक भारतीयांसाठी कर्दनकाळ ठरला आहे.
लॉकडाउनच्या काळातील डाटा उपलब्ध नसला तरी आत्महत्येचं प्रमाण खूप आहे.
हे पहा -
टिक-टॉकवर लोकप्रिय असलेल्या समीर गायकवाड या तरुणाने नुकतीच केलेली आत्महत्या ही तरुण वर्गातील मानसिक त्रास किती वाढले आहेत, याचं एक उदाहरण आहे.
हे पहा -
https://www.thehindu.com/society/how-loneliness-is-affecting-the-indian-youth/article27115615.ece
एकटेपणाची समस्या कमी करण्यासाठी केवळ समुपदेशन, औषध उपयोगी ठरत नाही, तर बदललेली सामाजिक वीण जोडणं आवश्यक आहे. हे आपण स्वत:पासून व आपल्या घरापासून सुरू करायला हवं. नाहीतर ब्रिटन, जपान यांच्या धर्तीवर आपल्या देशातही जनतेतला एकटेपणा घालवण्यासाठी स्वतंत्र मंत्रालय आणि मंत्री नियुक्त करावे लागतील.
..................................................................................................................................................................
लेखिका डॉ. वृषाली रामदास राऊत विश्वकर्मा विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक आहेत.
vrushali31@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment