अजूनकाही
नरसिंह राव हे देशाला एका मोठ्या आर्थिक संकटातून बाहेर काढणारे पंतप्रधान. भारताची आर्थिक ताकद वाढवण्यासाठीचा पाया त्यांनी शांतपणे रचला. अनेक आव्हानांना तोंड देत त्यांनी हे काम केलं. तरीही हे दुर्लक्षित राहिलेलं व्यक्तिमत्त्व. ती उणीव आता मराठीत ‘रावपर्व’ या पुस्तकानं भरून निघाली आहे.
भारताचं पुढचं चित्र बदलून टाकणाऱ्या आर्थिक आणि धर्माशी संबंधित दोन प्रमुख घडामोडी राव यांच्या कारकिर्दीत घडल्या. त्या दोन्ही घडामोडींचे अनेक पदर ओघवत्या शैलीत लेखक प्रशांत दीक्षित यांनी या पुस्तकात उलगडून दाखवले आहेत. त्यामुळेच ‘रावपर्व’ हे माजी पंतप्रधान नरसिंह राव यांचं केवळ चरित्र न समजता, भारताच्या इतिहासातल्या महत्त्वाच्या पर्वाचं विश्लेषण करणारं पुस्तक म्हणायला हवं.
स्वातंत्र्यानंतर आपल्या देशानं समाजवादाचा मार्ग पत्करला. पुढं इंदिरा गांधींच्या काळात लायसन्स-परमीट राजमुळे आर्थिक आघाडीवर अनेक प्रश्न उभे राहिले. १९९० पर्यंत देशाची आर्थिक परिस्थिती अतिशय खालावली. आवश्यकता असूनही आर्थिक सुधारणा केल्या जात नव्हत्या. मनमोहनसिंग यांच्यासह अनेक अर्थतज्ज्ञ वेळोवेळी – We missed the bus – असं सांगत आले होते. जागतिक परिस्थिती बदलत चालली होती. जागतिक व्यापारी संघटनेच्या (त्या वेळचा GATT) वाटाघाटींना सुरुवात झाली होती. पण देशात राजकीय स्थैर्य नसल्यानं आर्थिक बाबतीत निर्णय घेण्यात विलंब होत होता. उगवणारा प्रत्येक दिवस म्हणजे डोक्यावर कर्जाचा वाढलेला भार.
..................................................................................................................................................................
अधिक माहितीसाठी पहा - सर्व प्रकारच्या कट्टरतेला नाकारणाऱ्या ‘इन्शाअल्लाह’ या अभिराम भडकमकर यांच्या बहुचर्चित कादंबरीवरील ‘परीक्षण’ स्पर्धा
..................................................................................................................................................................
राव यांनी सत्तेवर आल्यावर पहिल्याच दिवशी आता ही वेळ दवडून चालणार नाही हे ओळखलं. देशाचं वळण बदलल्याशिवाय तरणोपाय नव्हता, पण यात आव्हानं अनेक होती. खाजगी क्षेत्राला आजच्यापेक्षा तीव्र विरोध होता. डाव्या पक्षांचा प्रभाव मोठा होता. राव हेही समाजवादी. तरी त्यांनी हा बदल कसा घडवून आणला? नाईलाजानं का होईना, पण धैर्य आणि निर्णयाक्षमता दाखवून देशाचं आर्थिक चाक त्यांनी अतिशय कुशलतेनं कसं वळवलं, हे या पुस्तकात सविस्तर आलं आहे. अर्थमंत्री मनमोहन सिंग यांना काम करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य देऊन राव यांनी राजकीय किल्ला प्रसंगी धूर्तपणे लढवला. यातून देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी राजकीय डावपेच खेळणाऱ्या रावांची प्रतिमा आपल्यासमोर साकार होते.
राव यांच्या कारकीर्दीवर डाग लावणारी मोठी घटना म्हणजे राम जन्मभूमी-बाबरी मशीद वादाची. बाबरी मशीद पाडण्याच्या घटनेची सविस्तर नोंद घेत राव यांच्या नेतृत्वाचा या पुस्तकात तटस्थपणे वेध घेतला आहे. यातून राव पंतप्रधान म्हणून कुठं कमी पडले, हे समजते. राव कोणत्या बाबतीत यशस्वी झाले, कोणत्या बाबतीत अयशस्वी ठरले, या यशापयशाची कारणं काय या ऊहापोहामुळे राव यांचं सखोल दर्शन वाचकाला होतं.
या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे नरसिंह राव यांच्या स्वभावाचं लेखकाने बारकाईनं केलेलं विश्लेषण. इतर नेते - नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, मनमोहन सिंग या पंतप्रधानांबरोबरच सोनिया गांधी, शरद पवार, अर्जुन सिंग इत्यादि प्रमुख नेते - आणि राव यांच्या स्वभावातल्या आणि कार्यपद्धतीच्या फरकातूनही रावांचं व्यक्तिमत्त्व नीट उभं राहतं. त्यांच्या मनात शिरून घेतलेला शोध म्हणजे as if the author has put himself in Rao’s shoes. उदा. सोने गहाण टाकणे आणि श्रीराम याबाबत राव यांनी भारतीय मानसिकतेचा केलेला विचार. हेच ‘रावपर्वा’चे cruces म्हणता येतील. पण लेखक लगेच पाय बाहेर काढून राव यांच्या भूमिकेचं, निर्णयाचं मूल्यमापनही करतात. नेत्यांच्या कारकिर्दीचे आणि त्यांच्या स्वभावाचे विश्लेषण कसं करावं, याचा हा वस्तूपाठच झाला आहे.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
या पुस्तकाचं दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे निर्णय कसे घेतले जातात, त्यावर प्रभाव टाकणारे घटक कोणते, कुणाचे हात कुठं बांधले जातात याचं सखोल विवेचन. सनदी अधिकारी निर्णय घेण्यात, धोरण ठरवण्यात मोठी भूमिका बजावतात. हा एरवी दुर्लक्षित असणारा मुद्दा. पण या लेखनातून आर्थिक प्रश्नाच्या बाबतीत सनदी अधिकाऱ्यांची भूमिका आणि त्यांचं महत्त्वही अधोरेखित झालं आहे.
पंतप्रधानपदावरून पायउतार झाल्यावर काँग्रेसनं राव यांना खड्यासारखं वगळलं. आज भारताचं जगात असेलेलं स्थान उंचावण्यासाठी आणि गरिबी दूर करण्यासाठी त्यांनी दिलेलं योगदान फारसं लक्षात घेतलं जात नाही. राव आयुष्यभर काँग्रेसशी एकनिष्ठ असूनही असं का घडलं, याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न या लेखनात आहे. राव यांनी अभ्यासाच्या आणि निष्ठेच्या जोरावर काँग्रेसमध्ये स्थान मिळवलं, पण कोणताही गट तयार न करता काम करत राहणं ही त्यांची वृत्ती होती. शेवटच्या काळातले राव सच्चे नेते आणि माणूस म्हणून आपल्या मनात मोठे ठरतात. उतारवयात क्षुल्लक प्रकरणात न्यायालयाचे खेटे घालणारे, एकटे पडलेले आणि आयुष्यभर सचोटीने जमवलेला पैसा न्यायालयीन लढाईत घालवणारे राव हे चित्र वाचकाला अस्वस्थ करतं. इतर नेते आपल्या दहा पिढ्यांना पुरेल एवढी संपत्ती गोळा करत असताना, आपल्या वडलांनी उलट वडीलोपार्जित जमीनही सरकारजमा केली, याचा मुलांना राग असावा का? राव यांचा वैचारिक ओढा नेहरूंकडे होता, पण याबाबतीत ते गांधींच्या मार्गाने जाणारे ठरले.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
‘History will be kinder to me than the media,’ असं मनमोहनसिंग म्हणाले होते. राव यांनी स्वतःच्या पक्षाकडून तेवढीसुद्धा अपेक्षा बाळगली नाही. हे राव यांचं मोठेपण. समाजवाद आणि अध्यात्म (धार्मिकता नव्हे) यांचं मिश्रण त्यांच्यात होतं. देशासाठी आपण योग्य वेळी आपल्याला शक्य तेवढं काम केलं यातच त्यांनी समाधान मानलं. डावपेच खेळून त्यांनी सत्ता जरूर मिळवली, पण तिचा दुरुपयोग केला नाही. आपल्यातल्या गुणदोषांची त्यांना पूर्ण जाणीव होती, हेही लेखक संदर्भ देऊन दाखवतात.
‘रावपर्व’ या पुस्तकाच्या समतोल आणि स्पष्ट मांडणीमुळे ‘आर्थिक मन्वंतराच्या शिल्पकारा’चं आणि त्या पर्वाचंही सुस्पष्ट आकलन होतं. त्या काळातले राजकीय डावपेच, आर्थिक प्रश्न, राम जन्मभूमी- बाबरी मशिदीचा वाद हे तसे गुंतागुंतीचे प्रश्न. पण ठोस आणि तरीही सोप्या भाषेमुळे या पर्वाच्या कथेत वाचक गुंतत जातो. राव यांनी दाखवून दिलेल्या मार्गावरच भारताचा प्रवास चालत आला आहे, अजूनही चालतो आहे. त्यामुळे ‘रावपर्व’ या पुस्तकातून आजचा काळ समजून घ्यायलाही मदत होते.
‘राजहंस प्रकाशना’ने प्रकाशित केलेलं हे पुस्तक २४२ पानांचं असलं, तरी त्यातला ऐवज संदर्भग्रंथाचा आहे, हे नक्की. राव हे तसे गंभीर चेहऱ्याने वावरणारे राजकारणी होते. पण मुखपृष्ठावर आपल्याला दिसतात ते प्रसन्नमुद्रेतले, स्मितहास्य करणारे राव. ते म्हणत असावेत, “मी सत्तेचा दुरुपयोग न करता देशासाठी काम केलं यातच मला समाधान आहे.”
..................................................................................................................................................................
‘रावपर्व : आर्थिक मन्वंतराचे शिल्पकार - प्रशांत दीक्षित, राजहंस प्रकाशन, पुणे, मूल्य - ३०० रुपये.
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5307/Raoparva
..................................................................................................................................................................
लेखिका विशाखा पाटील प्राध्यापक व ग्रंथसंपादक आहेत.
pvishakha@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment