निव्वळ जातीय दंगलींमुळे खानदेश जमातवादाचे नवे केंद्र बनले असे नव्हे, तर मागास-शोषित जनमानसाच्या असंतोषाचा ताबा अनेक आघाड्यांवर जमातवादी शक्तींनी घेतल्याने ही प्रक्रिया घडली आहे
पडघम - राज्यकारण
इनायत परदेशी
  • २०१३च्या धुळ्यातील दंगलीचे एक छायाचित्र
  • Wed , 24 February 2021
  • पडघम राज्यकारण खानदेश Khandesh मालेगाव Malegaon जमातवाद दंगल Riot

आर्थिक हितसंबंध, सामाजिक प्रभुत्व आणि जमातवाद यांचे आंतरसंबंध ग्रामीण, अर्धशहरी विभागांतसुद्धा गतिमान असतात. सामाजिक प्रभुत्वाची पूर्वअट ही शोषित, अर्धविकसित जनविभागांना जमातभानग्रस्त करणारी असते. जमातवादाच्या या मूल्यात्मक वृद्धीचा तडाखा सातत्याने नवे-नवे जनविभाग सहन करत असतात. जागतिक ते स्थानिक आर्थिक हितसंबंध, त्यांचे साध्य असलेले सामाजिक प्रभुत्व शोषित जनविभागांचा भूगोल, इतिहास जमातवादी करतात. त्या भूगोल-इतिहासाचा समन्वयवादी, समावेशक वारसा पुसण्यात जात-वर्ग-स्त्रीदास्यवादी सामाजिक प्रभुत्वाची प्रेरणा कार्यरत असते.

दक्षिण आशियातील बहुसंख्य देशांत ही प्रक्रिया ११ सप्टेंबर २००१नंतर वाढलेली दिसते. स्थानिक जनसंबंधाचे जमातीकरण आणि जमातीय दंगली - दहशतवादी हल्ले यांच्या क्रिया-प्रतिक्रियेचा वाढता आलेख म्हणूनच केरळ, तेलंगणा, प.बंगाल, आसाम आणि महाराष्ट्रात पाहायला मिळतो. पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत खानदेशात जमातीय ध्रुवीकरण अधिक तीव्र झालेले पाहायला मिळते. नव्या जनसंख्येला सामाजिक प्रभुत्वासाठी वापरणे, हे जरी जमातीकरणाचे उद्दिष्ट असले, तरी बदलत्या राजकीय-सामाजिक दाता-आश्रीत उतरंडीचा आधार घेत जमातीकरण घडते. जात - पितृसत्ताक - आर्थिक सत्तेच्या हितसंबंधवादी प्रक्रियेत शोषित जनसमूह, मागास भौगोलिक क्षेत्र हे तुलनेने सुलभ पीडित-सोपे योद्धे ठरतात. या लोकसांस्कृतिक जनसमूहांचे जमातीकरण ही मोठी सामाजिक समस्या आहे. म्हणूनच या जनविभागांचा, त्यांच्या भौगोलिक क्षेत्रांचा अभ्यास जमातवादासंदर्भात महत्त्वाचा ठरतो.

खानदेशातल्या जमातीकरणाची प्रक्रिया

खानदेश आणि बागलान यांच्या सीमेवर असणारे मालेगांव हे २००८ पूर्वी दंगलींचे केंद्र मानले जाई. तेथील मुस्लीमबहुल जनसंख्या आणि तिच्या असंतोषाला जमातीय वळण देऊन दंगली घडवल्या जात. मात्र २००८ मध्ये झालेली धुळे दंगल, त्यानंतर झालेली नंदुरबार दंगल (२०११) आणि २०१३ मध्ये धुळ्यात पुन्हा झालेली दंगल या घटनांनी खानदेश हे जमातवादाचे नवे केंद्र म्हणून पुढे आले. (The Indian Express, Feb. 5, 2014, Communal Incidents of 30% in 2013, Mumbai).

निव्वळ जमातीय दंगलींमुळे खानदेश जमातवादाचे नवे केंद्र बनले असे नव्हे, तर खानदेशातील मागास-शोषित जनमानसाच्या असंतोषाचा ताबा अनेक आघाड्यांवर जमातवादी शक्तींनी घेतल्याने ही प्रक्रिया घडली आहे. आर्थिक विकासापासून दूर असलेल्या, रोजगारहीन, दुष्काळी जनसमूहांचा असंतोष हा प्रारंभी जनप्रतिनिधी, शासन आणि प्रशासनाविरुद्ध राहिलेला होता. जनतेने प्रतिक्रियेदाखल राजकीय स्थित्यंतरेही घडवली होती.

..................................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी पहा - सर्व प्रकारच्या कट्टरतेला नाकारणाऱ्या ‘इन्शाअल्लाह’ या अभिराम भडकमकर यांच्या बहुचर्चित कादंबरीवरील ‘परीक्षण’ स्पर्धा

..................................................................................................................................................................

सत्तरच्या दशकात धुळे हे म्हणूनच भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि डाव्यांचे केंद्र बनण्याच्या शक्यता होत्या. त्यानंतर १९८० आणि १९९०च्या दशकात सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाने आदिवासी पट्ट्यात दबदबा निर्माण केलेला होता. परंतु संसदीय राजकारणातील गठजोडवाद, सांस्कृतिक राजकारणाचा मर्यादित आवाका आणि जमातवादी शक्तींचा धर्मांध अजेंडा, यांमुळे डाव्या- धर्मनिरपेक्षतावादी शक्तींची खानदेशात पीछेहाट झाली. पारंपरिक सत्ताधारी काँग्रेसच्या भ्रष्ट कारभाराची, खानदेशकडे वारंवार झालेल्या आर्थिक दुर्लक्षाची परिणती जमातवादी शक्तींच्या राजकीय-सामाजिक सबलीकरणात झाली. जमातवादी शक्तींनी शासनविरोधी असंतोष काबीज करत राजकीय सत्ता मिळवली आणि राजकीय सत्ता कायम ठेवण्यासाठी जमातीय ध्रुवीकरणाचा वापर केला. या प्रक्रियेत खानदेशात जातवर्गीय पातळीवर नवे दाता-आश्रीत संबंध प्रस्थापित झाले आणि जातीय शोषण पूर्वीच्या तुलनेत अधिक तीव्र झाले.

जनअसंतोषाचे परजमातीवरील प्रक्षेपण

आर्थिकदृष्ट्या मागास असणारा खानदेश बेरोजगारी, दुष्काळ यांनी त्रस्त होता आणि आहे. ही त्रस्तता राजकीयदृष्ट्या पारंपरिक विपक्ष असणाऱ्या शिवसेना आणि त्यानंतर भाजपने वापरली. तत्कालीन सत्ताधारी - जनप्रतिनिधींचा पक्ष असलेला काँग्रेस हे विरोधकांचे मुख्य लक्ष्य राहिले. शिवसेना आणि भाजपच्या नव्या नेतृत्वाने दुष्काळ, शेतीचे प्रश्न, काँग्रेस पक्षाच्या जनप्रतिनिधींवरील भ्रष्टाचाराचे आरोप, आर्थिक मागासलेपण, पाणीप्रश्न, बेरोजगारी या मुद्द्यांना लक्ष्य केले. मात्र या राजकीय विरोधप्रक्रियेत मोठा हात धार्मिक आक्रमकता- हिंदुत्व - त्याला जोडून येणारी जमातवादी उपक्रमशीलता- ओबीसी तरुणांचे जनसंघटन यांचा राहिला. काँग्रेसविरोध हा प्रारंभी शिवसेनेने सहजरित्या मुस्लिमविरोधात परिवर्तीत केला. काँग्रेसचे पारंपरिक मतदार असलेल्या मुस्लीम मतपेढीला शिवसेनेने लक्ष्य करत हिंदू ओबीसी तरुणांचे जनसंघटन तयार केले. त्याला धार्मिक सण, उत्सव आणि स्थानिक सांस्कृतिक प्रतीकांनी उपक्रमशीलता बहाल केली. खानदेशातील स्थानिक ओबीसी तरुणांमध्ये पारंपरिक आणि घराणेशाहीतून सत्ताधारी असलेल्या काँग्रेसच्या मराठा आणि काही आदिवासी (भिल्ल) जनप्रतिनिधींप्रती असंतोष होता. हे तरुण बेरोजगार आणि निम्न मध्यमवर्गातील होते. त्यांना शिवसेनेने प्रारंभी काँग्रेसविरोध आणि त्यानंतर मुस्लीमविरोध हे राजकीय संघटनतंत्र बहाल केले.

खानदेशातील गैरमराठा, गैरभिल्ल, गैरमुस्लीम जाती संघटना, त्यांची वाढती राजकीय क्षमता यांचा लाभ शिवसेनेसारख्या जमातवादी पक्षांना झाला. १९९५मध्ये काही ब्राह्मण परिवारांपुरते मर्यादित असलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजप हे शिवसेनेमूळे काहीसे दृगोचर झाले. विश्व हिंदू परिषद खानदेशातील मारवाडी आणि गुजराथी बनिया परिवारांपुरतीच मर्यादित न राहता ओबीसी तरुणांच्या हिंदू एकता आंदोलनाशी जोडली गेली. मुस्लीम तरुणांत तोपर्यंत जमातवादी राजकीय पक्ष-संघटनेचा अभाव होता. १९९२च्या बाबरी मशिद विध्वंसनानंतरही असुरक्षिततेने ग्रस्त मुस्लीम राजकीयदृष्टया काँग्रसलाच बांधिल राहीले होते. परंतु मालेगावमध्ये वारंवार घडणाऱ्या दंगली, त्यातील जमातीय तणाव काळातील पोलीस आणि प्रशासनाची पक्षपाती भूमिका, मालेगावच्या काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या जनप्रतिनिधींचे अपयश यांचा जमातीय परिणाम धुळे, जळगाव, नंदुरबार आणि मध्य प्रदेशाच्या सीमावर्ती भागांतील मुस्लिमांवर झाला. (Concerned Citizens's Inquiry Report in to Malegaon Riots of 2001, Published Dec. 2001,  Part 21, Mumbai).

असुरक्षित, भयग्रस्त आणि सूडभानग्रस्त मुस्लीम हे स्वधर्मीय पक्षाचाच स्वधर्मीय नेता शोधू लागले. ही भय-सूडभानग्रस्त मनो-सामाजिक प्रक्रिया मुस्लिमांतील उच्चजातीय अश्रफ नेतृत्वाने हेरली. हिंदूंतील नवनेतृत्व असलेल्या ओबीसी शिवसैनिकांप्रमाणे मुस्लिमांतही अन्सारी, बागवान, शेख, लोहार या ओबीसी जातींतील तरुणांच्या काही गटांना अश्रफांनी नेतृत्वाचे लाभांश वितरीत केले. खानदेशात जमिअत-उल-उलेमा ही काँग्रेसपुरस्कृत संघटना मागे पडून जमातवादी विचारसरणीची जमात-ए-इस्लामी वाढीस लागली.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

२००८च्या धुळे दंगलीच्या पीडित, हिंदुत्ववादी शक्तींकडून यातना सहन कराव्या लागलेल्या मुस्लिमांतील ओबीसी, दलित आणि खानदेशी मुस्लीम तरुणांचा भरणा तबलिगी जमातमध्ये वाढला. गावपातळीवर हिंदूंशी मित्रत्वाचे संबंध असणारे बहुतांशी मुस्लीम २००८मधील धुळे दंगलीतील हिंदुत्ववादी हल्ल्यांमुळे कडवे जमातवादी बनण्याचा धोका निर्माण झाला. तत्पूर्वी दर्गे आणि कव्वाली यांना विरोध करणारे जमात-ए-इस्लामी व तबलीगचे कार्येकर्ते दर्गे, मशिदी, सामाजिक कार्यक्रम यांना संघटनवाढीसाठी वापरू लागले. हिंदूंमधील शिवसेना आणि भाजपच्या ग्रामीण, ओबीसी कार्यकत्या-नेत्यांचा मुस्लिमांशी असलेला संबंध\संवाद त्यामुळे बिघडला. अर्थातच या प्रक्रियेला प्रारंभ हिंदुत्ववादी जमातीय राजकारणाने झाला होता. हिंदूंमधील ओबीसी सुतार, माळी, कुणबी, भोई या जातींतील कार्यकर्ते दर्गा, संदल, मोहरमची मिरवणूक (हिंदू-मुस्लीम एकत्रितरीत्या) यांना पर्याय म्हणून नवरात्रोत्सव, शिवजयंती, गणेशोत्सव, धुलीवंदन यांकडे वळले. हे उत्सव म्हणजे मुस्लीमविरोधी घोषणाबाजी आणि जमातीय ध्रुवीकरणाचे केंद्र बनले. अप्रत्यक्षरित्या दोन्ही धर्मांतील जनप्रतिनिधीविरोधी असंतोष, विकासाचा प्रश्न, बेरोजगारी, दुष्काळ, शेती इ. प्रश्न मागे पडून धर्माच्या आवरणाखाली नव दाता-आश्रीत संबंधांच्या आधारे जात-वर्गीय-पितृसत्ताक शोषण अबाधित राहिले. कारण, राजकीय सत्ता, तिचे लाभांश, सहकारी कारखाने, सहकारी बँका, मूठभर व्यापारी परिवारांची मक्तेदारी, अवौध धंद्यांतील हिंदू-मुस्लिमांतील प्रभुत्वशाली जातींची दादागिरी कायम राहिलेली दिसते.

मुख्य प्रवाही शिक्षणातून मुस्लिमांची होणारी गळती ही असुरक्षितता, दारिद्रय आणि बकालीकरणातून आहे. गळती झालेले विद्यार्थी मदरस्याच्या धार्मिक शिक्षणाकडे वळाल्याची स्थिती खानदेशात पहायला मिळते. मुस्लीम धनाढ्यांचा आणि असुरक्षितताग्रस्त मध्यमवर्गाचा मदरस्यांना आणि मशिदींना देणग्या देण्याचा कल वाढलेला दिसतो. २००८च्या धुळे दंगलीनंतर शहरात चार नवे मदरसे सुरू झाले. तत्पूर्वी ११ मदरसे होते. अक्कलकुव्याच्या मोठ्या मदरस्यातही या दंगलीनंतर विद्यार्थीभरणा वाढला. तसेच आर्थिक मंदीतून स्थानिक पातळीवर जमातीय ध्रुवीकरण वाढले. (Balajiwale, Vaishali; Jan.8, 2013, How Riots Rob Dhule of Economic Growth,DNA, Mumbai)

लोकसंस्कृतीचे जमातीकरण

खानदेशला कान्हुबाई या मातृसत्ताक दैवताची परंपरा आहे. खानदेशातील एकवीरा, मरीआई, देवमोगरा, कालिका, पाटना, सप्तशृंगी, गिरणा इ. स्त्री-ग्रामदेवता त्याची साक्ष देतात. घटस्थापना, कानबाई उत्सव, अक्षय तृतीया, पित्तरपाटा या परंपरांमधून मातृसत्ता, तिचा स्त्रीवादी - अब्राह्मणी आशय, बहुजन असणाऱ्या हिंदू-मुस्लिमांचा गावजत्रेच्या निमित्ताने संवाद-संपर्क ही खानदेशची परंपरा होती. काही अंशाने ती अजूनही आहे. परंतु बाबरी विध्वंस, ११ सप्टेंबर २००१चा वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ला, त्यानंतरच्या मालेगाव दंगलींची मालिका, २००८ व २०१३च्या धुळे दंगली, २०११ची नंदूरबार दंगल, २००२नंतर जामनेरमध्ये वारंवार निर्माण होणारा जमातीय तणाव यांनी जमातीकरणाची प्रक्रिया वृद्धिंगत केली. विशेष म्हणजे, जमातीकरणासाठी स्थानिक प्रतीके, लोकसंस्कृती यांचा वापर केला गेला. सातपुड्यातील देवमोगरा देवीच्या जत्रेत गुजरातच्या २००२मधील दंगलीनंतर मुस्लीमविरोधी पत्रके संघ-परिवाराने वितरित केली. हिंदू स्त्रियांवरील लैंगिक अत्याचाराच्या अफवा व क्रौर्याच्या वर्णनांनी ही पत्रके आदिवासी तरुणांना हिंदू जमातवादाकडे वळवणारी ठरली. पितृसत्तेचा वापर जमातवादी संघटनांनी केला. आदिवासी तरुणींवरील मुस्लीम तरुणांद्वारे लैंगिक अत्याचाराच्या खोट्या बातम्यांनी ही पत्रके भरलेली असत. (Jaffrelot 2011 : 390).

खानदेशला लागून असलेल्या आणि खानदेशातील आदिवासींशी मातृसत्ताक लोकसंस्कृतीने बांधील असलेल्या गुजरातच्या अहवा-डांग भागातही जमातीकरणाचा हा प्रयोग यशस्वी केला गेला. संघ-परिवार, विहिंपने स्थानिक आदिवासींना व्यापारी-सावकार मुस्लिमांविरुद्ध पितृसत्ताक अफवांच्या आधारे हिंसाप्रवृत्त केले. स्थानिक आदिवासींनी सातपुडयाच्या बहुतांशी भागांमध्ये मिरवणूक व पारंपरिक वाद्ये वाजवून एकत्र येत तीर-कामठे, भाले, बरच्या या पारंपरिक हत्यारांनिशी खोजा, मेमन, बोहरा या व्यापारी जातीय मुस्लिमांवर हल्ले केले. त्यांच्या मालमत्ता लुटल्या आणि नष्ट केल्या. (Lobo  Nov.30, 2002 : 4845, 4846).

वरील प्रक्रिया ‘लोकसंस्कृतीचे जमातीकरण’ (Communilization of Folk- Culture) स्पष्ट करते. कारण, मूलत: मातृसत्ताक, लैंगिकदृष्ट्या मुक्त, बहुदेवतावादी, समावेशक असणा∙या आदिवासी लोकसंस्कृतीला पितृसत्ताकभानग्रस्त केले गेले. हिंदू एकतेच्या नावाखाली मुस्लीमविरोध संवर्धित करत. आदिवासींना हिंसाप्रवृत्त केले गेले. आदिवासी लोकसंस्कृतीचा मुक्त लैंगिकतेचा, स्त्रीला स्वत:चा पुरुष जोडीदार स्वत: निवडण्याचा अधिकार देणारा महत्त्वाचा आशय या जमातीकरणाच्या प्रक्रियेतून मागे पडला. समाजशास्त्रीयदृष्ट्या आदिवासी हे हिंदू नसून त्यांचा निसर्गपूजक धर्म आहे. परंतु त्यांना बहुसंख्यांक-हिंदुत्ववादी- मुख्य प्रवाहात स्थान नाकारून त्यांचे केवळ मुस्लीमविरोधी - हिंदूमतपेढीकेंद्री ‘जमातीकरण’ केले गेले. सत्ता-संपत्ती-प्रतिनिधित्व-विकास यात ते हिंदू उल्लेखित केले जाऊनही नव्हते आणि नाहीत. मात्र, हिंसाकरणासाठी त्यांचे ‘जमातीकरण’ घडवले गेले.

..................................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी पहा - सर्व प्रकारच्या कट्टरतेला नाकारणाऱ्या ‘इन्शाअल्लाह’ या अभिराम भडकमकर यांच्या बहुचर्चित कादंबरीवरील ‘परीक्षण’ स्पर्धा

..................................................................................................................................................................

आदिवासींची अब्राह्मणी - नैसर्गिक आवासाशी जोडलेली काही प्रतीके आहेत. त्यात हनुमान, अश्वत्थामा, एकलव्य, शबरी, निरनिराळ्या मातृदेवता यांचा समावेश होतो. या प्रतीकांना विश्व हिंदू परिषद आणि संघ-परिवाराने अनुक्रमे राम, महाभारत, पुन्हा राम आणि महाभारत, हिंदू देवी-देवता यांच्याशी जोडले.

राममंदिर आंदोलनानंतर ओबीसी आणि आदिवासींच्या धर्मप्रतीकांचे जमातवादी प्रतीकांशी ही ‘जोडले जाण्याची प्रक्रिया’ (Allignment of Folk - Symbols to Communal Symbols) हेतूपुरस्सर घडवली गेली. ही प्रक्रिया फक्त ‘जोडले जाणे’ एवढ्यापुरतीच मर्यादित नव्हती. तर ओबीसी आणि आदिवासींच्या प्रतीकांचे हिंदू-उच्चजातवर्चस्ववादी आशय असलेल्या राम, कृष्ण, विष्णू, ब्रह्मा या देवतांप्रती असलेले निम्नत्व (Subordination) अधोरेखित केले गेले. या ‘जोडत्व-निम्नत्व’ (Allignment - Subordination) प्रक्रियेत अब्राहृमणी-आदिवासी प्रतीकांना परजमातद्वेष्ट्या स्वरूपात सादर केले गेले. आदिवासी हे हनुमान, तर भाजप हा राम आणि मुसलमान हे रावण, खलनायक अशी पत्रके, भाषणे, कॅसेटस, सीडीज, चित्रफिती वारंवार आदिवासींमध्ये प्रसारित केल्या गेल्या. शबरी मेळा, सातपुड्यातील सर्व मातृदेवतांच्या जत्रा, भोंगऱ्या बाजार यांत विश्व हिंदू परिषद आणि संघ-परिवाराने मुस्लीमविरोधी प्रचार केला. आदिवासी स्त्रियांमधील मुस्लिमांप्रती असणारा लैंगिक भयगंड- मुस्लीमविरोध वापरत अफवा पसरवल्या गेल्या. ख्रिश्चन मिशनऱ्यांना आदिवासी भागात विरोध करतांना मुस्लिमांनाही लक्ष्य केले गेले. संघ-परिवाराने पाड्यापाड्यावर हनुमानाची मंदिरे बांधली. आदिवासी तरुणांना राम आणि हनुमानाच्या प्रतिमा असलेल्या व्यायामशाळा बांधून देऊन रामनवमी, धुलीवंदन हे ‘जमातीय’ उपक्रम दिले. काही आदिवासी तरुणांना तुटपुंज्या मानधनावर आदिवासींची गणना, पारिवारिक माहिती गोळा करण्यासाठी कामाला लावले. ही माहिती वनवासी कल्याण आश्रमामार्फत संघ-परिवाराने जमातीकरण - ध्रुवीकरण-हिंसा यांसाठी वापरली. (Lobo  Nov.30,2002 : 4846)

खानदेशची ग्रामीणकडून अर्धशहरी भागाच्या दर्जाकडे होणारी वाटचाल ही शिक्षण, नोकऱ्या, प्रशासन, विविध सेवा इ. क्षेत्रांत स्त्री-पुरुष संबंधांत काही अंशी खुलेपणा आणणारी ठरली. मुस्लिम पुरुष आणि हिंदू स्त्री असे काही विवाह त्यामुळे घडले. अर्थातच हिंदू पुरुष आणि मुस्लीम स्त्री असे विवाहही घडले. मात्र मुस्लिमांतील पितृसत्तेचा तुलनेने अधिक पगडा, सामाजिक सुधारणांची कमतरता आणि मुख्य म्हणजे जमातवादामूळे आलेली असुरक्षितता यांमुळे मुस्लीम स्त्रियांचे आंतरधर्मीय विवाहांचे प्रमाण तुलनेने कमी राहिले. परिणामी मुस्लीम पुरुष आणि हिंदू स्त्री अशा विवाहांना यापूर्वी हिंदुत्वावरील हल्ला आणि आता ‘लव्ह जिहाद’ संबोधत हिंदूंतील ओबीसी तरुणांना भाजप आणि शिवसेनेने हिंसा प्रवृत्त केले.

(Rajput, Rashmi; The Indian Express, Dec. 29, 2017, A Trial & an Overwidening Chasm in Malegaon, Mumbai).

गुजरातप्रमाणे खानदेशातही नवरात्रोत्सवात मुस्लीम तरुणांना सहभागी करून घेण्यास सक्त निर्बंध घालण्यात आलेले आहेत. खानदेशातील उच्चजातवर्गीय मारवाडी, गुजराती, बनिया धनाढ्य हस्तींनी याबाबत पुढाकार घेतला आहे. विशेष म्हणजे राजकीयदृष्टया निरीक्षण केल्यास असे आढळते की, हे बहुतांशी धनाढ्य भाजप व संघ परिवाराचे निष्ठावान आहेत.

(The Indian Express, Sept. 25, 2014, After VHP call to Ban Their Entry to Garba Events, Ahmedabad)

खानदेशात हिंदू-मुस्लीम जनतेची परस्परांच्या सण-उत्सवांत, कुटुंबांत तसेच कुटुंबांच्या- वस्तीच्या निर्णयात दखल असे. परस्परांच्या निर्णयांना संमती, मान असे. परंतु, जमातीकरणाच्या प्रक्रियेने ही सामाजिक सौहार्दाची सरमिसळ थांबवली. हिंदूंचे दर्ग्यावर जाणे, संदलमध्ये सहभागी होणे, होळीत-रंगपंचमीत नाचणे लुप्त झाले. हिंदूंतील नवसत्ताकांक्षी ओबीसी मतपेढ्या बाळगणाऱ्या नेत्यांनी या जमातीकरणाची पहल केली. तर मुस्लिमांत संख्येने अल्प असलेल्या खानदेशी-अहिराणी भाषिक मुस्लिमांच्या सौहार्द परंपरेस डावलत उत्तर भारतीय मुस्लिमांनी (प्रामुख्याने अन्न्सारी, बागवान) जमातीकरणाचे नेतृत्व केले. यास ‘लोकप्रिय संस्कृतीचा ऱ्हास’ (Decline of Popular Culture) असे म्हणता येईल. यासंबंधी महत्त्वाच्या घटना म्हणजे ‘गदर’, ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटांवेळी धुळ्याच्या ज्योती व प्रभाकर टॉकीजमध्ये धार्मिक नारे लागून हिंदू-मुस्लिमांत मारामाऱ्या झाल्या व शहर तणावग्रस्त राहिले.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

२००२च्या गुजरात दंगलीनंतर गुजरातला लागून असलेल्या खानदेशातील हिंदू-मातृसत्ताक जत्रांवर- उत्सवांवर मुस्लीमविरोधी परिणाम झाला. शाळा-कॉलेजांतील हिंदू तरुण जत्रा आणि उत्सवांत आंतरधर्मीय युगुलांना लक्ष्य करत असल्याच्या घटना घडल्या. याउलट मुस्लीम पितृसत्ताक आक्रमकतेच्या काही घटना- त्यातून जमातीय तणाव मालेगाव आणि अक्कलकुव्यात घडल्या. परिणामी मुस्लीमबहुल मालेगाव आणि त्याचे प्रशासकीय - नागरीकरणाच्या समस्यांतून घडलेले ‘घेट्टोकरण-सीमांतीकरण’ (Ghettonization\Marginalization) हे हिंदूविरोधी म्हणून रंगवण्यात आले.

मागासलेपण, मंदी, बेरोजगारी आणि जमातवाद

काँग्रेसी जनप्रतिनिधींना खानदेश आणि मुख्यत्वे त्याच्या आदिवासी भागांचा आर्थिक-औद्योगिक विकास करण्यात अपयश आले. धुळयाची कापड मिल, प्रताप मिल, धुळे व नंदुरबारच्या एमआयडीसी यांची मृतावस्था, खानदेशच्या मोठया भागात रेल्वेचे जाळे नसणे, मोठे उद्योग नसणे, स्थानिक कुशल-अकुशल कामगारांना रोजगारासाठी सुरतेकडे जावे लागणे, अजूनही आदिवासी भागांतील काही पाडयांवर रस्ते नसणे, अनारोग्य हे घटक सत्ताधारी काँग्रेसविरोधात जनमानसात राहिले. प्रताप मिल, जवाहर सुतगिरणी, देशोधडीला लागलेल्या हातमाग उद्योगातील हिंदू-मुस्लीम कामगारांची नवी पिढी ही म्हणूनच गरिबी - गुंडाकरण- जमातीकरण या क्रमात राहिली.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

याचा फायदा शिवसेना आणि २००८च्या धुळे दंगलीनंतर मजलीस-ए-इत्तेहादुल-मुस्लिमीन (एमआयएम) या जमातवादी पक्षांना झाला. या दंगलीची सर्वाधिक झळ धुळे शहरातील हातमाग- यंत्रामाग उद्योगास व त्यातील मुस्लीम कामगारांस बसली. मुस्लिमांचे कापड व इतर मालांवरील हिंदूंचा बहिष्कार मुस्लिम निम्नजातवर्गीयांची आर्थिक नाकेबंदी करणारा राहीला. त्यातून हे मुस्लीम जनसमूह काँग्रेसकडून एमआयएम या जमातवादी पक्षाकडे वेगाने आणि अधिक संख्येने वळाले. २०१३च्या धुळे दंगलीनंतर हे ध्रुवीकरण अधिक गतिमान झाले आणि एमआयएमने खानदेशात धुळे येथून विधानसभेचे खाते २०१९च्या निवडणूकीत उघडले. क्रिया-प्रतिक्रियेच्या या जमातीय तणावप्रक्रियेत करोना काळातही गैरसमजुतींतून - माध्यमांच्या अपप्रचारांतून मुस्लिमांना हिंदूंद्वारे वस्तीबंदी, नाकेबंदी, व्यापारीबंदी, आर्थिक व आरोग्याबाबतची नाकेबंदी अशा घटना खानदेशात घडल्या.

जमातवाद आणि बौद्ध राजकारणाची भूमिका

खानदेशात ‘शिवशक्ती-भीमशक्ती’ आणि ‘जयभीम - जयमीम’ हे प्रयोग झाले. त्यातून बौद्धांमधील बेरोजगार तरुणांचा एक मोठा समूह राजकारणात सक्रिय झाला. हे तरुण राजकीयदृष्टया सजग आणि राजकारणात कळीची भूमिका ठेवणारे आहेत. कारण, संख्यात्मकदृष्टया ते इतर निम्नजातींपेक्षा अधिक आहेत. २००८ आणि २०१३मध्ये हिंदू-मुस्लीम दंगलीत काही हिंदू वस्त्यांचा बचाव बौद्ध तरुणांनी केला होता. या तरुणांच्या संख्याबळातून नवी समीकरणे जमातवादी व प्रस्थापित-धर्मनिरपेक्ष पक्षांतील स्थानिक नेत्यांनी स्वीकारली आहेत. त्यातून नवे दाता-आश्रीत संबंध जमातवादाच्या अनुषंगाने खानदेशात रुजत आहेत. आदिवासी भागांतही ही दाता-आश्रितीकरणाची राजकीय प्रक्रिया जोर धरत असून शोषित-अविकसित-मागास जनविभाग, त्यांचा संपूर्ण रहिवासी प्रदेश, त्यांची धर्मनिरपेक्ष संस्कृती-अस्मिता यांचे जमातीकरण घडत आहे. अभ्यासक आणि मातृसत्ताक वारशाचे पाईक म्हणून ते रोखण्याची आपली जबाबदारी आहे!

(खानपान आणि मांसाहार हा लोकप्रिय संस्कृतीचा (Popular Culture) एक भाग आहे. परंतु, गोहत्या, वराहपालन आणि मांसाहाराच्या उद्योगातील स्पर्धा, हिंदू-मुस्लीम जमातीय ध्रुवीकरण या बाबी लोकसंस्कृतीला जमातभानग्रस्त करतात.)

संदर्भ

1. The Indian Express, Communal Incidents up to 30% in 2013, Feb. 5, 2014, Mumbai.

2. Rajput, Rashmi; The Indian Express, Dec.29, 2017, A Trial & an Overwidening Chasm in Malegaon, Mumbai.

3. The Indian Express, Sept. 25, 2014,  After VHP call to Ban Their Entry to Garba Events, Ahmedabad.

4. Balajiwale, Vaishali; Jan.8,2013, How Riots Rob Dhule of Economic Growth, Mumbai, DNA

5. Concerned Citizen's Inquiry Report in to Malegaon Riots of 2001, (Published Dec. 2001) Part 21, Mumbai.

6. Lobo, Lancy; Nov. 30, 2002, Adivasis, Hindutwa and Post Godhra Riots in Gujarat, Economic and Political Weekly, Mumbai.

7. Jaffrelot, Christophe; 1st Edition 2011 (Reprinted), Religion, Caste and Politics in India, Penguin Books, Delhi.

..................................................................................................................................................................

लेखक इनायत परदेशी हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादच्या इतिहास विभागात रिसर्च स्कॉलर म्हणून कार्यरत आहेत. ‘DEVELOPMENT OF COMMUNALISM IN POST INDEPENDENT INDIA’ या विषयावर त्यांनी पीएच. डी. केली आहे.

inayat.pardesi@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......