कोरोनिलची चुकीच्या पद्धतीने जाहिरात करणे, हे काही अपघाताने घडलेले नाही
पडघम - देशकारण
आर. एस. खनके
  • पतंजली कोरोनिल किट
  • Wed , 24 February 2021
  • पडघम देशकारण पतंजली कोरोनिल किट Patanjali Coronil Kit कोरोनिल Coronil करोना Corona जागतिक आरोग्य संघटना WHO

प्रसारमाध्यमे, पैसा आणि सत्ता यांचा संगम झाला की, अवैज्ञानिक गोष्टी प्रतिष्ठित संस्थेच्या नावाने कशा खपवण्याचा प्रयत्न होतो, याचे एक उत्तम उदाहरण म्हणून ‘कोरोनिल’च्या लोकार्पण सोहळ्याकडे पाहता येते. रामदेव बाबा यांच्या पतंजली आयुर्वेद संस्थेने निर्माण केलेल्या ‘कोरोनिल’ला जागतिक आरोग्य संघटने(WHO)चे प्रमाणपत्र मिळाले आहे, असा दावा या संस्थेकडून केला गेला. ‘इंडिया टीव्ही’चे रजत शर्मा यांनीही तसे ट्वीट केले होते. परंतु सुज्ञ लोकांनी त्यावर आक्षेप घेतल्यानंतर आणि WHOच्या दक्षिण आशियायी शाखेने या दाव्याचे खंडण केल्यानंतर ट्वीट डिलिट करण्याची नामुष्की शर्मा यांच्यावर ओढवली.

शुक्रवार, १९ फेब्रुवारी २०२१ रोजी करोनिलचा लोकार्पण सोहळा झाला. या वेळी पतंजलीचे हे औषध WHOने प्रमाणित केले असल्याचेही जाहीर करण्यात आले होते. तशा आशयाची माहिती खुद्द पतंजलीचे वरिष्ठ अधिकारी राकेश मित्तल यांनी ट्वीट करून दिली होती. आपल्या ट्वीटमध्ये मित्तल यांनी “Patanjali has made history in the field of Ayurveda as Coronil has been recognized by WHO as first Evidence Based Medicine for Corona,” असा दावा केला होता. यावर देश-विदेशातील सजग लोकांनी WHOकडेच याबाबत खुलासा करण्याची मागणी केल्यावर या संघटनेच्या दक्षिण आशियायी शाखेने तात्काळ स्पष्टीकरण दिले की, “@WHO has not reviewed or certified the effectiveness of any traditional medicine for the treatment #COVID19.” त्यानंतर मित्तल यांनी आपले ट्वीट डिलिट केले.

समाजमाध्यमावरून, विशेषत: ट्वीटरसारख्या माध्यमावरून पतंजलीच्या या दाव्यावर प्रचंड टीका होत असताना या संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण यांनी पुढे येऊन “जागतिक आरोग्य संघटनेने आमच्या कुठल्याही औषधाला मान्यता अथवा अमान्यता दिलेली नाही. तर भारत सरकारच्या औषध दर्जा नियंत्रण विभागामार्फत पतंजलीला प्रमाणपत्र मिळालेले आहे,” असे स्पष्टीकरण दिले.

..................................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी पहा - सर्व प्रकारच्या कट्टरतेला नाकारणाऱ्या ‘इन्शाअल्लाह’ या अभिराम भडकमकर यांच्या बहुचर्चित कादंबरीवरील ‘परीक्षण’ स्पर्धा

..................................................................................................................................................................

WHOच्या प्रमाणपत्र प्रणालीप्रमाणे केंद्रीय औषध दर्जा नियंत्रण संघटनेच्या (CDSCO) आयूश शाखेच्या वतीने पतंजली आयुर्वेद संस्थेला औषध निर्मिती प्रमाणपत्र मिळाले असल्याचे सांगत कोरोनिलबाबत गैरसमज असू नयेत असे निवेदन करावे लागले.

वास्तविक पाहता WHO कुठल्याही औषधाला प्रमाणित करत नाही किंवा मान्यता बहाल करत नाही, तर औषधांच्या गुणवत्ता नियंत्रणासाठी आवश्यक मापदंड निश्चित करून देण्याचे काम करते. कुठल्याही औषधाला ते तयार होत असलेल्या देशातील सक्षम यंत्रणांमार्फत मान्यता प्रमाणपत्र दिले जाते. असे असतानाही पतंजलीने कोरोनिल जारी करताना मंचावरील फलकावर WHOने आपले औषध प्रमाणित केल्याचा आणि सदरचे औषध करोनावरील उपचारासाठी उपयुक्त असल्याचे नमूद केलेले होते.   

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या लोकार्पण सोहळ्यात त्यांच्या पाठीमागेच असे फलक लावून देशातील लाखो लोकांच्या डोळ्यात धूळफेक करणारी ही घटना खरेतर लाजीरवाणी आहे.

यापूर्वीदेखील जुलै २०२०मध्ये संपूर्ण देशभरात करोनाचा प्रकोप झालेला असताना पतंजलीने कोरोनिल करोनावर प्रभावी असल्याचा दावा केला होता. तेव्हादेखील लोकांच्या सजग प्रतिक्रिया येताच पतंजलीने अशीच माघार घेतली होती. तेव्हा आयूष मंत्रालयाने कोरोनीलची विक्री केवळ प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी करता येऊ शकेल, करोना बरा करणारे औषध म्हणून त्याचा वापर करता येणार नाही, असे जाहीर केले होते.

म्हणूनच की, काय इंडियन मेडिकल असोसिएशननेदेखील या दाव्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

करोनावर शास्त्रीय वैद्यकीय उपचार कसा करता येईल, यासाठी जगभरच्या औषध संशोधन संस्था शोधकार्यात गढून गेलेल्या आहेत. त्यात अनेक देशांना यशदेखील आलेले आहे. या औषधाला आरोग्य क्षेत्रात नवा बाजार उपलब्ध झाला आहे. अनेक देशांनी करोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यासाठी औषध निर्माण कंपन्यांबरोबर करार केले आहेत. लसीकरणाचा नियोजनबद्ध कार्यक्रम विविध देशांत राबवण्यात येत आहे. तर करोनाचा नवा उत्प्रेरित धोका (Mutation Strain) वाढलेला असताना भारतात मात्र रामदेव बाबा आपले औषध बाजारात आणण्यासाठी धडपडत आहेत.

भारतात करोनाची नव्याने लाट निर्माण होत असताना आणि फायझरची लस अपेक्षित परिणामकारकतेअभावी आफ्रिकेतून माघारी आलेली असताना कोरोनिलची चुकीच्या पद्धतीने जाहिरात करणे, हे काही अपघाताने घडलेले नाही. यासाठी आरोग्य क्षेत्रात निर्माण झालेली अर्थार्जनाची नामी संधी, पतंजलीच्या आर्थिक प्रेरणा आणि त्याला सादर घालणारी व्यवस्था यांच्या एकत्रित बांधीलकीतून प्रकट झालेली ही नियोजनबद्ध घटना आहे.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

करोनासारख्या जीवघेण्या विषाणूजन्य वैश्विक संकटातून बाहेर पडण्यासाठी विज्ञानाधारित प्रमाणित औषधोपचार हाच एकमेव उपाय आहे. त्यासाठी वैज्ञानिक दिवस-रात्र परिश्रम घेत असताना भारतात मात्र पतंजलीकडून वारंवार लोकांच्या भेदरलेल्या भावनेला अवैज्ञानिक मार्गाने हात घातला आहे.

या घटनेमुळे केवळ पतंजलीचीच नाचक्की झालेली नसून आंतरराष्ट्रीय पातळीवर आयुर्वेद आणि देशाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्नही रामदेव बाबांकडून झालेला आहे. मात्र सद्यस्थितीत या अपराधासाठी शासन स्तरावरून दंड किंवा कान उघाडणी मिळणार नाहीच, उलट झाल्या प्रकाराला पाठीशी घातले जाणार यात मात्र शंका नाही.

..................................................................................................................................................................

आर. एस. खनके

sangmadhyam@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......