संवेदनशीलतेचे अपार करुणेत रूपांतर करण्याचे सामर्थ्य फार कमी लेखकांमध्ये आढळते. अशा मोजक्या आणि श्रेष्ठ लेखकांत भास्कर चंदनशिव यांची गणना आपल्याला करावी लागते!
पडघम - साहित्यिक
आसाराम लोमटे
  • भास्कर चंदनशिव यांची ग्रंथसंपदा
  • Mon , 22 February 2021
  • पडघम साहित्यिक भास्कर चंदनशिव Bhaskar Chandanshiv जांभळढव्ह मरणकळा अंगारमाती नवी वारुळं बिरडं भूमी आणि भूमिका माती आणि नाती माती आणि मंथन

मराठी कथासाहित्यात मोलाची भर घालणाऱ्या भास्कर चंदनशिव यांनी गेल्या महिन्यात वयाची ७५ वर्षे पूर्ण केली आहेत. मागील ५० वर्षे तरी ते कथा लिहीत आहेत. त्यांच्या कथेची महत्ता अनेकांनी अनेक वेळा नोंदवून ठेवली आहे. ज्या काळी केवळ किस्से आणि वर्णनांची जंत्री म्हणजेच कथा, असे समीकरण निश्चित झाले, त्या काळात चंदनशिव यांनी अत्यंत सशक्त, मूल्यगर्भ अशी कथा लिहिली. ‘जांभळढव्ह’ (१९८०), ‘मरणकळा’ (१९८३), ‘अंगारमाती’ (१९९१), ‘नवी वारुळं’ (१९९२), ‘बिरडं’ (१९९९) या त्यांच्या कथासंग्रहांतील कथेने मराठी वाचकांना समृद्ध केले आहे. त्यांच्या कथेत ग्रामीण परिसर, गावातल्या माणसांच्या वंचना, समाजातल्या असंख्य बिनचेहऱ्याच्या माणसांची जगण्यासाठीची धडपड, गावातले राजकारण- समाजकारण, जातव्यवस्था अशा सर्व बाबी विलक्षण सामर्थ्याने कलात्मक रूप धारण करतात.

या कथांच्या व्यक्तिरेखा ग्रामीण परिसरातील असल्या तरी चंदनशिव यांच्या कथेला ‘ग्रामीण’ हे विशेषण लावणे म्हणजे त्यांच्या कथेचा संकोच करणे, तिला मर्यादित ठेवणे होय. वस्तुतः चंदनशिव यांची कथा जे जीवन आपल्या समोर ठेवते, त्या जीवनाचा परीघ विशाल आहे. त्यातही सामाजिक विषमतेचे चटके सहन करणाऱ्या माणसांची मूक वेदना, दारिद्रय-उपासमार सहन करणाऱ्यांचा प्राणांतिक संघर्ष, नैसर्गिक आपत्तीतून आलेले भेगाळलेपण आणि त्याला सुलतानीची जोड, अशा सर्व बाबी चंदनशिव यांच्या कथेत येतात. या कथेचे किती तरी विशेष सांगता येतील, पण एकूण मानवी जीवनाविषयीचा आंतरिक कळवळा हे या कथेचे बलस्थान आहे. एखादे साहित्य वाचल्यानंतर वाचकांच्या संवेदनशीलतेचे अपार करुणेत रूपांतर करण्याचे सामर्थ्य फार कमी लेखकांमध्ये आढळते. अशा मोजक्या आणि श्रेष्ठ लेखकांत चंदनशिव यांची गणना आपल्याला करावी लागते.

लेखकाच्या जडण-घडणीत, त्याचा प्रकृतिधर्म घडवण्यात परिसरातही वाटा असतो. शिवाय कोणती परिस्थिती लिहायला भाग पाडते, यावरही सर्जनाच्या मिती ठरल्या जातात. चंदनशिव यांचा परिसर हा उस्मानाबाद जिल्ह्यातला केज-कळंब हा दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या प्रदेश आहे. त्यांच्या संवेदनशील मनावर १९७२च्या दुष्काळाचा खोलवरचा परिणाम झालेला आहे. ज्या दुष्काळात माणसे सैरभैर झाली, या माणसांना गुराढोरांचे जिणे जगावे लागले, भुकेचे उग्र रूप सोसावे लागले; त्या दुष्काळाचे असंख्य पैलू चंदनशिव यांच्या कथेने टिपले. ७२च्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर रक्तातल्या नात्यांच्या माणसाचेही ओझे वाटावे, असा भीषण काळ त्यांच्या कथेत चटका लावणारी दाहकता घेऊन येतो. करपलेले शिवार, उमेद हरलेली मने आणि आपल्या जित्राबाच्या काळजीने सतत डोळ्यांतून पाणी गाळणारी हताश माणसे भास्कर चंदनशिव यांच्या दुष्काळाशी संबंधित कथांमधून पानोपानी दिसू लागतात.

..................................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी पहा - सर्व प्रकारच्या कट्टरतेला नाकारणाऱ्या ‘इन्शाअल्लाह’ या अभिराम भडकमकर यांच्या बहुचर्चित कादंबरीवरील ‘परीक्षण’ स्पर्धा

..................................................................................................................................................................

‘पिळं’, ‘तर गया दारात बसूनय’ या कथांमधून दुष्काळाने उन्हातान्हात उसवत असलेला लोकजीवनाचा पोत दिसून येतो. केवळ दुष्काळच नाही तर भूक आणि वासनेची चित्रणे चंदनशिव यांच्याएवढी अन्य कुठल्याही त्यांच्या समकालीन कथाकाराने समर्थपणे हाताळलेली नाहीत. वेगवेगळ्या प्रतीक-प्रतिमांच्या माध्यमातून त्यांच्या कथा आपल्या मनाचा ठाव घेतात. त्यासाठी त्यांची बोली ही आतून आलेल्या उमाळ्यासारखी वाटते. कथांना चित्रमय करण्याचे सामर्थ्य या बोलीत आहे.

‘अंगारमाती’ या कथासंग्रहातील ‘आतडी’ या कथेत दुष्काळाचे वर्णन वाचले म्हणजे, काही ओळींतच साऱ्या शिवारातला सन्नाटा निर्माण करण्याचे चंदनशिव यांचे सामर्थ्य किती अजोड आहे, याची कल्पना येते. “उन्हाळंपाळ्याची तासं तशीच ताजीतवानी पडून दिसायची. कोरड्या, तहानलेल्या जमिनीत माणसांची मनं भेगाळून गेली. करपून धुराळत चालली, झाडं आतल्या आत झुरणी लागल्यागत शेळमटून गेली. पानं, फांद्या ओरबाडून गेल्यानं सापळं उभं राहिल्यागत झाडं भेसूर-भयाण दिसायली. काटेरी बोटं आभाळात खुपसून भेसूर थयथयाटत राहिली. खायची सारी चंदीच सरली. गुरंढोरं माती हुंगत हिंडायची. आरडत- वरडत वर तोंड करून हंबरत फिरायची. पोटात जळती आग घेऊन झळाळणारं वारं जित्या, वल्याचा ठावठिकाणा हुडकत गावात शिरायचं. मुठीत जीव धरून आऊक मागणारी उघडी-बोडकी घरं चितमनानं भाजत करपत उभी व्हती.”

साऱ्या दुष्काळाचा वणवा या शब्दांमधून साकारतो. ‘जांभळढव्ह’, ‘मरणकळा’ या कथासंग्रहांत अशी दुष्काळाची किती तरी शब्दचित्रे आपल्याला दिसून येतात.

‘जांभळढव्ह’ या त्यांच्या पहिल्याच कथासंग्रहातील कथांनी त्यांचा परिसर, भूमिका आणि अर्थपूर्ण जीवनानुभवाचे त्यांच्याकडे असलेले संचित सूचित केले. या कथेत येणारे ग्रामजीवन केवळ रूढ अर्थाने गावगाड्याचे चित्रण नाही. वेगवेगळ्या आपत्ती-प्रवृत्तींनी हा गाव भेगाळलेला, तडकलेला आहे.

‘मरणकळा’ कथासंग्रहात ही कथा ग्रामजीवनात आणखी खोलवर रुतत जाते. सर्व जातीपातीच्या, वर्गवारीच्या सीमा पार करून निखळ मानवी जगण्यालाच ती कवेत घेते. ग्रामीण जीवनाचे असंख्य पदर ती आपल्यासमोर उलगडते. प्रतीक-प्रतिमांच्या भाषेत ती आपल्याशी बोलत राहते. अर्थात, ही कथा केवळ प्रतिमा-प्रतीकांच्या नक्षीदार वेलबुट्टीत रमणारी नाही. तळातला माणूस चित्रित करताना आपले समाजवास्तव, जातवास्तव, चाली-रीती, अनेक प्रश्नांनी वेढलेले ग्रामीण जीवन या साऱ्यांचाच ती आडवा छेद घेते. या कथांमधून येणारी माणसे केवळ त्यांच्या वृत्ती-प्रवृत्तीची ओळख सांगत नाहीत, तर आपल्या ठणकत्या दुःखालाच उघड करतात. अनेक कथांतील पात्रांचा संघर्ष बाहेरच्या वास्तवाबरोबरच आत स्वतःशीसुद्धा सुरू असतो. अशा अनेक संघर्षाची चित्रणे ‘मरणकळा’मधून येतात.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

हा संघर्ष व्यक्त होत असताना तो चढ्या आवाजात व्यक्त होत नाही. आतल्या आत होणारी घुसमट या संघर्षाला आणखी कलात्मक पातळीवर नेते. दुःख भोगताना द्यावी लागणारी झाडाझडती आपल्यापुढे मांडून ही पात्रे थांबत नाहीत, त्यांच्या दुःखाची घनदाट छाया आपल्या मनावर पसरत जाते. लेखक म्हणून चंदनशिव यांची ही ताकद अतिशय मोठ्या कलावंताची आहे.

गावपांढरीत जगणारी किती तरी वेगवेगळी माणसे आपल्याला या कथेतून दिसतात. दुष्काळाने भाजून निघाल्यानंतरही स्वतःचा पीळ न उकलणारी, कामधंद्यासाठी-पोटापाण्यासाठी गाव सोडताना आतून जड होणारी, नात्यातल्या माणसांसाठी झुरणारी आणि सख्ख्या बापालाही ढोरासारखं जेरबंद करणारी, कधी पोटच्या पोरीलाच स्वार्थासाठी दुसऱ्याच्या वासनेची शिकार व्हायला भाग पाडणारी (पोटचं पोटाला); तर कधी शिकून साहेब झालेल्या स्वतःच्या मुलाकडूनच अपमानित होणारी (तडा)- अशी किती तरी माणसे ठळक व्यक्तिरेखांच्या माध्यमातून चंदनशिव यांच्या कथेत आपल्याला भेटतात.

त्यांच्या कथालेखनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, ज्या जीवनाविषयी ते लिहितात त्या जीवनाबद्दल त्यांना जिवंत आस्था आहे. म्हणूनच कथेच्या नावाखाली ते केवळ किस्से सांगत नाहीत, थेट अनुभवाच्या गाभ्याला भेटतात. एखादा पट्टीचा पोहणारा जसा तळापर्यंत बुडी घेऊन वस्तू वर घेऊन येतो, तसे ते तळपातळीच्या वास्तवाला नेमकेपणाने आपल्या मुठीत पकडतात. त्यांच्या कथांना गवसलेले आकार हे चिंतनातून आले आहेत.

१९८०नंतर ग्रामपंचायत, पंचायतराज निवडणुका, साखर कारखान्यांचे राजकारण, गावपातळीवरील गट-तट, झपाट्याने होत असलेले बदल या पार्श्वभूमीवर चंदनशिव यांच्या कथेने आणखी वेगळे वळण घेतले. ‘जांभळढव्ह’, ‘मरणकळा’मधून दिसणारी प्रतिमा- प्रतीकांची बोली ‘अंगारमाती’मधून वेगळा अनुभव पेलताना दिसते. या कथांमधील कलात्मकतेइतकाच वास्तवाचाही परिणाम वाचकांच्या मनावर होतो. आधीच्या दोन्ही कथासंग्रहांमध्ये पात्रांचा संघर्ष बऱ्याचदा स्वतःशी होता. ‘अंगारमाती’मध्ये मात्र असे घडत नाही. या संग्रहातील कथांमधला संघर्ष हा हळूहळू व्यापक होत जातो आणि शेतीव्यवस्थेतील शोषणाचे चक्रव्यूह भेदू पाहतो. लुटीची व्यवस्था निर्माण करून शेतीधंद्याला जागोजागी लुटणाऱ्यांविरुद्धची हत्यारं या कथेत परजली जातात. सर्वांगाने चालू असणारे शोषण मांडून ही कथा थांबत नाही, तर ती भूमिपुत्रांच्या उठावातून पेटणाऱ्या ठिणग्याही चित्रित करते. ‘‘जमाना बदललाय आन्‌ आजूनबी बदलंल, म्याच त्या तसल्या आडतीच्या खाटीकखान्यात राहणार नाय. आन्‌ ह्येबी ध्यानात घ्या मालक- माजी पिढी पुरता हिशोब मागितल्याबिगरबी राहणार नाही’’ (हिशोब) असे सांगणारा महिपती असो, किंवा ‘‘गोरा इंग्रज गेला पर काळ्या इंग्रजानं तसलंच पाऊल उचललं. आपलं आबा, माय, थोरला भाऊ आन्‌ चार बैल रातंध्या राबत्यात, उरं खांदी फुटल्यात, घासातला घास पिकाच्या वाफ्याबुडी घालून टकुरं धरून बसल्यात... दोन सालं झाली, न्हाणीची भिंत पडलीय... माज्या डोक्या-उरात समदा समदा इतिहास आठवत चालला. मोगलाच्या लढाया, रयतेची लुटालूट, इंग्रजांचा व्यापार, सावकार-संस्थानिकांचे सौक...’’ असे चिंतन मांडणारा एखादा ‘लाल चिखल’ कथेतील शाळकरी विद्यार्थी असो- शोषणाची अशी मांडणी करूनही अनुभवाचे कथापण हरवत नाही, हे या कथांचे वैशिष्ट्य आहे. भूमिनिष्ठ जाणिवांमधून केलेली ग्रामविद्रोहाची मांडणी हीच ‘अंगारमाती’ची खरी ओळख आहे.

कायम उलटपट्टी नशिबी येणाऱ्या शेतीव्यवसायातून आपल्या लेकरांनी बाहेर पडावे, असे ‘अंगारमाती’मधील शेतकऱ्याला वाटते. शिक्षण पोटापुरतेही कामाला येत नाही, नोकरी लागत नाही; तेव्हा बाप आपल्या मुलाला घेऊन सावकाराच्या वाड्यावर येतो. आपल्या मुलाने सावकाराच्या वाड्यावर नोकरीला राहावे, असे बापाला वाटते; पण मुलाला शिक्षणामुळे आत्मभान आलेले आहे. व्याजाच्या चक्रव्यूहाला भेदता-भेदता आपले अनेक पूर्वज या सावकाराच्या वाड्याने गिळले आहेत, अशी जाणीव त्याला होते.

रक्त-घाम गाळून आपल्या पिढ्यांनी वाड्याची ताबेदारी पत्करली, त्याबदल्यात सरकारने करात, सावकाराने व्याजात मारले. पंजा लुटला, आजा चाबलला, बाप बांधून घेतला; तिथल्याच दावणीला आपुनबी दावं लावून घ्यायचं का? असा प्रश्न कथेतील तरुण अस्वस्थ नायकाला पडतो. कोणाकोणाचे रक्त आणि घाम चाटून वाड्याचे हे वैभव उभे राहिले आहे, असे त्याला वाटते आणि त्याच वेळी तो सावकाराची ताबेदारी नाकारतो. ‘हिशोब’ या कथेत शोषणाची रीत उलगडताना या शोषणाला नकार देणारा नायक वाचकांवर प्रभाव टाकतो, हे चंदनशिव यांच्या कथेचे वेगळेपण आहे.

‘अंगारमाती’ संग्रहातील कथांमध्ये जी ग्रामविद्रोहाची जाणीव दिसून येते, तिचे नेमके विश्लेषण ज्येष्ठ समीक्षक र.बा. मंचरकर यांनी केले आहे. “भास्कर चंदनशिव यांची कथा वाचताना आपण भूतकाळाच्या रमणीय भुलावणीतून बाहेर येतो आणि वर्तमानाच्या दाहक वास्तवाला थेटपणे भिडतो. शेतीच्या आजच्या समस्या, त्यांनी व्यथित झालेला शेतकरी या संग्रहात आहे. तो नव्या आत्मभानाकडे बदलत्या वास्तवाकडे पाहू लागला आहे. त्याची वेदना त्याला एका सर्वंकष विद्रोहाकडे खेचीत नेत आहे, याची जाणीव हा संग्रह वाचताना पानोपानी होते.” (मुक्तशब्द, ऑक्टोबर २०१०, पृष्ठ - ३२)

‘अंगारमाती’मधील ‘मेखमारो’, ‘लढत’, ‘तोडणी’, ‘लाल चिखल’ यासारख्या कथा अभ्यासल्या म्हणजे मंचरकर यांच्या विधानातली यथार्थता पटू लागते. या कथा केवळ वास्तवाचे जसेच्या तसे चित्रण मांडून थांबत नाहीत, तर त्या कथांमागे आंदोलनाच्या धगीतून येणारी व्यवस्थेविरुद्धच्या लढ्याची प्रेरणा आहे.

चंदनशिव यांच्या आधीची आणि त्यांच्याच काळात लिहिली जाणारी ‘ग्रामीण कथा’ ही केवळ किस्से आणि वर्णनामध्ये रमलेली होती. अर्थहीन वर्णनाची घटना-प्रसंगाची जंत्री असेच या कथेचे स्वरूप होते. चंदनशिव यांच्या कथेने वास्तवाचे अनेक अदृश्य कंगोरे उजागर केले. ज्या काळी रंगेल, इरसाल आणि नमुनेबाज व्यक्तिरेखा ग्रामीण कथेतून मनोरंजनादाखल येत होत्या, तेव्हा ‘ग्रामीण कथा’ ही संज्ञाच बदनाम व्हायला लागली. ‘ग्रामीण साहित्य’ या संकल्पनेसमोरही नवे प्रश्न निर्माण व्हायला लागले. अशा वेळी चंदनशिव यांनी ‘शेतकरी साहित्य’ अशी नवी मांडणी केली. त्यांच्या कथेने पृष्ठस्तरीय वास्तवाखाली असलेले जीवनाचे प्रवाह निरखले.

त्यांच्या कथेत १९८०, ९० या दशकांमधले काळाचे अनेक संदर्भ येतात. मात्र ही कथा या संदर्भांना पोटात घेऊन भक्कम आशयद्रव्याच्या आधारे आपला आकार धारण करते. त्यामुळेच तिचे महत्त्व सार्वकालिक आहे. महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त २०१०मध्ये ‘लोकवाङ्‌मय गृह’ या प्रकाशन संस्थेने ‘निवडक साहित्य मालिका’ प्रकाशित केली. या मालिकेत चंदनशिव यांच्या निवडक कथांचे संपादन ‘लाल चिखल’ या नावाने इंद्रजित भालेराव यांनी केले आहे. या संग्रहाच्या प्रस्तावनेत भालेराव म्हणतात - ‘‘चंदनशिव यांच्या लेखनाला काळाचा संदर्भ असला, तरी ती कथा कालमर्यादेत संपणारी नाही. कथानकाचे आराखडे, मानवी स्वभावाची रेखाटनं, जीवनाकडे पाहण्याचा करुणामय दृष्टिकोन यामुळे ही कथा कालसंबद्ध असूनही कालातीत आहे. चंदनशिव यांच्या लेखनात काही चिरंतन मूल्ये आहेत.’’

चंदनशिव यांची कथा कृषिकेंद्रित असली तरी ती रूढ अर्थाने एवढ्यापुरतीच मर्यादित नाही. या कथेत शेतीक्षेत्रातील शोषणव्यवस्थेचा खराखुरा चेहरा उघड होतो. आजवर ग्रामीण कथेने दुःख, दैन्य, दारिद्य्र आणि शोषणाची अनेक चित्रणे केली; पण ‘अंगारमाती’तील कथेत शोषकाचा चेहरा हा सावकार, सरकार, भ्रष्ट अधिकारी अशा असंख्य रूपांत दिसला. कृषिकेंद्रित वास्तव मांडणाऱ्या कथेमध्ये चंदनशिव यांच्या कथेचे योगदान अपूर्व आहे. र.बा. मंचरकर म्हणतात त्याप्रमाणे, ग्रामीण हे विशेषण वर्णनात्मक मानले गेल्याने पुष्कळसे ग्रामीण साहित्य वर्णनपरतेकडे झुकले, हे नाकारता येत नाही. या वर्णनपरतेकडून ग्रामीणतेला मूल्यगर्भतेकडे नेण्याचे श्रेय ज्या लेखकांना दिले पाहिजे, त्यांपैकी भास्कर चंदनशिव हे महत्त्वाचे लेखक आहेत. ‘भूमी आणि भूमिका’मधून वैचारिक पातळीवर आणि कथेमधून ललित पातळीवर त्यांनी ग्रामीणत्वाला एक निश्चित मूल्यगर्भ अर्थ प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला. या विधानातून चंदनशिव यांच्या कथेतील योगदानाची निश्चिती केली जाऊ शकते.

लेखक म्हणून असलेली त्यांची बांधीलकीही तेवढीच महत्त्वाची आहे. १९७२चा दुष्काळ संपला होता. शिक्षण अर्धवट टाकून दुष्काळी कामावर गेलेले खेड्यापाड्यांतले तरुण पुन्हा महाविद्यालयांत परतले होते. दुष्काळाचा घाव खोलवर बसलेला होता. वैजापूरच्या विनायकराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य त्या वेळी ज्येष्ठ लेखक रा.रं. बोराडे हे होते. त्यांनी एक आठवण नोंदवून ठेवलेली आहे. याच महाविद्यालयात भास्कर चंदनशिव हे मराठीचे प्राध्यापक होते. महाविद्यालयाच्या वार्षिक अंकाचा विषय हा ‘मी अनुभवलेला दुष्काळ’ असा निश्चित करण्यात आला. विद्यार्थ्यांनी दुष्काळातले आपले अनुभव व्यक्त करावेत, असे आवाहन महाविद्यालयाच्या सूचनाफलकावर करण्यात आले. एके दिवशी घडले असे की- ज्या विद्यार्थ्याने दुष्काळाचा दाह अनुभवला, तो बिचकत-बिचकत चंदनशिव यांच्याकडे आला आणि ‘सर, मला आपल्या कॉलेजच्या अंकासाठी लिहायचंय, पण मुद्दे हवेत. तुम्ही मदत करा.’ असे म्हणाला. दुसऱ्या दिवशी चंदनशिव यांनी हा प्रसंग बोराडे यांना सांगितला. या प्रसंगाने दोघेही अंतर्मुख झाले. त्यातूनच ग्रामीण आत्मकथन या वाङ्‌मयीन शिबिराचा उपक्रम सुचल्याचे बोराडे लिहिले असून, या संपूर्ण शिबिराची आखणी चंदनशिव यांची असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. त्या वेळी विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील जाणकारांचे मार्गदर्शन लाभले आणि आपले अनुभव शब्दबद्ध कसे करायचे याचा वस्तुपाठही या शिबिरातून त्यांना मिळाला.

या उपक्रमासोबतच ‘शेतकऱ्याचा असूड’ या म.जोतीराव फुले यांच्या महत्त्वपूर्ण ग्रंथाच्या शताब्दीनिमित्त या ग्रंथाची मिरवणूक प्राचार्य रा.रं. बोराडे आणि भास्कर चंदनशिव यांनी काढली होती. शेतीविषयक प्रश्नांच्या मूलभूत चिंतनातून ज्या ग्रंथाने महाराष्ट्राच्या प्रबोधन-परंपरेला मोठे योगदान दिले, त्या ग्रंथाविषयीची कृतज्ञता या निमित्ताने व्यक्त करण्यात आली. अशा काही उपक्रमांच्या माध्यमातून चंदनशिव यांची बांधिलकी दिसून येते. उस्मानाबाद येथे पार पडलेल्या २८व्या मराठवाडा साहित्य संमेलनात त्यांनी जे अध्यक्षीय भाषण केले, त्यात आपल्या या बांधीलकीचे सार सांगितले आहे. ते म्हणतात - ‘‘राबत्या शेतकरी कुटुंबातून आल्यामुळे शेतीमातीचे संस्कार जन्मजात आहेत. तसा कागदा-पुस्तकाचा वारसा माझ्या घरात नव्हता. वडिलांनी शाळेच्या प्रवेश अर्जावर अंगुठा देऊन शाळेत माझा प्रवेश निश्चित झालेला. आपला मुलगा वकील व्हावा यासाठी वडिलांनी जिद्द धरली होती. हयातभर कोर्टकचेऱ्या केल्यामुळे त्यांना वकिलीचं महत्त्व वाटत असावं. कोर्टातला वकील मला होता आलं नाही, पण समाजाचा विश्वस्त म्हणून साहित्याद्वारे सामाजिक प्रश्नांची वकिली मी जरूर केली आहे.’’

चंदनशिव हे आपल्या भूमिकेवर ठाम राहणारे लेखक आहेत. म.जोतीराव फुले, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसिंह नाना पाटील, ताराबाई शिंदे यांच्या वैचारिक मांडणीतून त्यांचा ‘भूमी आणि भूमिका’ हा ग्रंथ सिद्ध झाला आहे. शेतीमातीच्या प्रश्नांसंबंधी एवढे मूलगामी चिंतन करणारा दुसरा ग्रंथ आढळत नाही. आज या ग्रंथाचे संदर्भमूल्य खूप मोठे आहे. ‘माती आणि नाती’, ‘माती आणि मंथन’ या त्यांच्या ग्रंथांमधूनही त्यांनी केलेले चिंतन अव्वल दर्जाचे आहे. अमेरिकास्थित ‘महाराष्ट्र फाउंडेशन’च्या विशेष पुरस्कारासह अनेक मान्यवर संस्थांनी त्यांच्या कथेचा गौरव केला आहे. त्यांच्या काही कथांचे हिंदी-इंग्रजी भाषेत अनुवाद झालेले आहेत. मोजके, लेखन करणारे लेखक म्हणून मराठी वाचक त्यांना ओळखतो.

ग्रामीण जीवनाचे चित्रण करणाऱ्या अनेक लेखकांनी प्रमाणभाषेत निवेदन आणि बोलीभाषेत संवाद असे तंत्र वापरले आहे. चंदनशिव यांनी मात्र निवेदनासाठीसुद्धा अस्सल बोलीचा अवलंब केला आहे. या बोलीला लोकजीवनाचा स्पर्श आहे. त्यांच्या कथांमधून ही बोली जिवंत आणि रसरशीतपणे प्रकटली आहे. परिसर उभा करताना, प्रसंगातला जिवंतपणा साकारताना ही बोली विलक्षण चित्रमय होते.

“आषाढ महिनाय. फुग्यागत आभाळ फुगत चाललंय. काळ्याभोर नागानं मुंग्या येचाव्यात, तशा एक-एक चांदण्या गिळत चालल्यात. ते सुसतच निघालंय. आग प्याल्याली इज बुडातून सळ्‌कन सेंड्याला भिडतीय. झरकन घसरून गपकन इजतीय. अन्‌ लगेच सारी धरती हादरवणारा गडगडाट- कानांत हादरविणारा गडगडाट कानात बोटं घालायला लावतोय.” (मसनवटा)

“चुलवण धडकावं तसं दुपार जळत व्हती. धगधगत व्हती. मुंडकी उडालेली झाडं अन्‌ ढासळल्याली घरं सावरत-कलथत चित मनानं उभी व्हती. मुक्या वाऱ्यावर आगजिभा सवार होऊन चाटीत, भाजीत पळत व्हत्या. आतून-बाहिरून होरपळून जात व्हत्या. सारं रस्तं रया गेल्यागत उताणं- पातानं हून पडलं व्हतं. भितीबुडाच्या दबक्या सावल्या जिरून गेल्या व्हत्या.” (कळस)

“दिवसानं पाय सोडलं. कोंडून टाकल्यागत आभाळ झाकाळून आलं. ढोणात मोट रिचावी, तसं भरून आलेलं आभाळ बुडातूनच गर्जत उठलं. फळीच्या फळी हाताला धरून वर वर सरकू लागली. भेदरलेला वारा पावसाचा वास पसरीत धडपडत पळू लागला. पावसाची मशीनगन त्याची पाठ तडकू लागली.” (वासना)

चंदनशिव यांच्या कथेत बोलीचा वापर किती परिणामकारक होतो, हे दर्शवण्यासाठी वरील उदाहरणे पुरेशी आहेत. कुंचल्याच्या एखाद्या फटकाऱ्याने कॅनव्हासवर चित्र उमटावे, तसे बोलीभाषेतल्या मोजक्या शब्दांत चंदनशिव कथांमधली वातावरणनिर्मिती करतात. विशेष म्हणजे, बोलीभाषेत निवेदन येऊनसुद्धा कथेच्या आशयाला कुठेही उणेपणा येत नाही अथवा वाचकालाही रसविघ्न आल्याचे जाणवत नाही; उलट बोलीच्या नैसर्गिक सहजतेने त्यांची कथा आणखी सघन रूप धारण करते.

..................................................................................................................................................................

हेही पाहा - लाल चिखल - भास्कर चंदनशिव

..................................................................................................................................................................

चंदनशिव यांच्या कथेत गावकुसाबाहेरचे जीवनही मोठ्या सामर्थ्याने व्यक्त होते. सामाजिक विषमतेचे चटके भोगणाऱ्या माणसाविषयी, समूहाविषयी त्यांच्या मनातला अपार कळवळा त्यांच्या अनेक कथांमधून व्यक्त झाला आहे. चंदनशिव यांच्याकडे असलेले सामाजिक भान अत्यंत तीव्र आहे आणि याचा प्रत्यय अगदी त्यांच्या सुरुवातीच्या कथांपासून येतो. त्यांच्या विद्यार्थिदशेत औरंगाबादच्या मिलिंद महाविद्यालयाने ‘अण्णा भाऊ साठे कथा स्पर्धा’ आयोजित केलेली होती. या स्पर्धेत चंदनशिव यांच्या ‘मसनवटा’ या कथेला पहिला क्रमांक मिळाला. या कथेने त्यांना लेखक म्हणून आत्मविश्वास दिला. या कथेत त्यांनी जो अनुभव चित्रित केला, तो सामाजिक दृष्ट्या तळपातळीवर असणाऱ्या घटकाचा होता. हेच त्यांच्या लेखणीचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. शोषणव्यवस्थेत तळाशी असणारा हा माणूसच त्यांच्या लेखनाचा केंद्रबिंदू राहिला आहे.

‘अस्मितादर्श’ या नियतकालिकातून त्यांच्या अनेक कथा प्रसिद्ध झाल्या. ज्या मोजक्याच लेखकांनी आपला परिघ ओलांडून गावकुसाबाहेरच्या जगण्याला स्पर्श केला, त्यांत चंदनशिव हे नाव अत्यंत महत्त्वाचे आहे. ‘कावड’, ‘गुन्हेगार’, ‘सरपंच’, ‘इलाज’, ‘पाणी’, ‘मसनवटा’, ‘संगर’, ‘माती’ अशा किती तरी कथांमधून त्यांची प्रखर सामाजिक जाणीव दिसून येते. या चित्रणात कथित कळवळा नाही. हे सारे अनुभव अत्यंत जिवंतपणे येतात. त्यांच्या अनेक कथा वाचताना अनवाणी पायांना चटके बसावेत, तशी दाहकता आपल्याला जाणवते. या कथांची जातकुळी अण्णा भाऊ साठे, बाबूराव बागुल यांच्या तळ ढवळून काढणाऱ्या लेखनाशी आहे. व्यापक मानवी करुणा असल्याशिवाय असे लेखन हातून घडत नाही. चंदनशिव यांचे लेखक म्हणून असणारे हे थोरपण डॉ. नागनाथ कोतापल्ले यांनी पुढील शब्दांत मांडले आहे - “भास्कर चंदनशिव यांनी ग्रामीण भागातील दलितांचे जीवन फार उत्कटपणे साकारले आहे ‘अस्मितादर्श’मधून त्यांनी अनेक कथा लिहिल्या. त्यामुळे भास्कर चंदनशिव दलित लेखक असतील, असे अनेकांना वाटत होते आणि आजही वाटते. त्यांच्याशी बोलताना कधी कधी ते दलित आहेत असं गृहीत धरून काही लोक बोलतात. ते त्यांच्याशी सहजपणे बोलतात. परंतु ते मराठा आहेत आणि त्यांचे मूळचे आडनाव ‘यादव’ हे आहे, ते कधी कोणाला सांगत नाहीत. त्याची त्यांना आवश्यकताच वाटत नाही. कारण त्यांच्या दृष्टीने माणूस महत्त्वाचा आणि त्याची वेदना महत्त्वाची. विसाव्या-एकविसाव्या शतकातील माणूसपणाची पहिली अट- जात विसरणे, ‘डी- कास्ट’ होणे हीच आहे, असे मला वाटते. जाणिवांच्या पातळीवर इतका ‘डी-कास्ट’ झालेला दुसरा लेखक मी पाहिला नाही.” (प्रतिष्ठान, नोव्हेंबर ते फेब्रुवारी २००७, पृष्ठ - ३३)

या विधानावरून चंदनशिव यांची लेखक म्हणून असणारी श्रेष्ठता अधोरेखित होते. कोत्तापल्ले यांच्या अवतरणावर आणखी कुठलेही भाष्य करण्याची आवश्यकता नाही इतके ते नेमके आहे.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

लेखक म्हणून चंदनशिव यांच्या आस्थेचा व्यूह अत्यंत विशाल आहे. त्यात शेतकरी, शेतमजूर, ऊसतोड कामगार, सालगडी, अठरापगड जातींतील असंख्य घटक, सुशिक्षित बेरोजगार, निराधार, वयोवृद्ध, शोषित स्त्रिया, जात-धर्म व्यवस्थेच्या कोंडवाड्यात घुसमट सहन करणारी माणसे असे असंख्य समाजघटक येतात. त्यांच्या कथेत येणारा गाव हा स्थितिशील नाही, तो संक्रमणाच्या सांध्यावरचा आहे. बदलाच्या खाणाखुणा या वास्तवात जाणवतात.

शिक्षणाचे जाळे विस्तारत आहे, सहकार बाळसे धरतो आहे, तरुणाई असंख्य स्वप्ने डोळ्यांत घेऊन धडपडत आहे, सत्तेच्या विकेंद्रीकरणासाठी म्हणून अस्तित्वात आलेल्या पंचायतराजच्या निवडणुका आहेत. ही सगळी चाहूल जाणवत असली तरी त्यातल्या कोणत्याच घटकाचे विधायक चित्र मात्र दिसत नाही. कष्टणाऱ्यांना पदोपदी नाडणारे नोकरशहा आणि सामान्यांचा गळा घोटणारी प्रशासकीय व्यवस्था, दुबळ्यांना टाचेखाली रगडणारे राजकारण, प्रस्थापितांकडून होणारी गळचेपी, सत्तेच्या साठमारीत निर्धन- गोरगरिबांचा जाणारा बळी; सहकार, शिक्षण, सिंचन, विकासाच्या कथित कल्याणकारी योजना या सर्व बाबींना आलेली विकृतीची फळं चंदनशिव यांच्या कथेत येतात.

त्या दृष्टीने ‘पोटचं पोटाला’, ‘आधार’, ‘इलाज’ अशा अनेक कथांचे दाखले देता येतील. त्यांची कुठलीच कथा सपाट नसते. जीवनानुभवाची खोली आणि चिंतनशीलता या जोरावर त्यांच्या कथेला एक अनवट आकार प्राप्त होतो. ती कुठेही कृत्रिम जाणवत नाही. म्हणूनच कथा आणि वैचारिक लेखनातून प्रकटलेले चंदनशिव यांचे सर्जन अजोड स्वरूपाचे असून एकूण मराठी साहित्यात या लेखनाची स्वतःची अशी जागा आहे.

..................................................................................................................................................................

हा मूळ लेख ‘साधना’ साप्ताहिकाच्या २० फेब्रुवारी २०२१च्या अंकात ‘भारस्कर चंदनशिव : सर्जनाचा मूल्यगर्भ आविष्कार’ या नावाने प्रकाशित झाला आहे. 

..................................................................................................................................................................

लेखक आसाराम लोमटे पत्रकार व कथाकार आहेत. त्यांची ‘इडा पिडा टळो’ (कथासंग्रह), ‘आलोक’ (कथासंग्रह), धूळपेर (लेखसंग्रह) ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. ‘आलोक’ या कथासंग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कार (२०१६) मिळाला आहे. ‘तसनस’ ही त्यांची पहिलीवहिली कादंबरी नुकतीच प्रकाशित झाली आहे.

aasaramlomte@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......