‘डुलाली टॅप’, ‘डेली बेली’ आणि ‘बंगलोर्ड’ : देवळाली, दिल्ली, बंगलोर ही गावं खूप चांगली आहेत. पण तरीही त्यांच्या नावांना कुत्सित, निंदाव्यंजक अर्थ प्राप्त झालाय
पडघम - सांस्कृतिक
हर्षवर्धन निमखेडकर
  • डावीकडे मुंबईतील मोल स्टेशन तर उजवीकडे देवळाली स्टेशन
  • Mon , 22 February 2021
  • पडघम सांस्कृतिक हर्षवर्धन निमखेडकर Harshawardhan Nimkhedkar शब्दांचे वेध टोपोनिम Toponyms देवळाली Deolali दिल्ली Delhi बंगलोर Bangalore

शब्दांचे वेध : पुष्प सत्ताविसावे

देवळाली, दिल्ली आणि बंगलोर या तीन गावांमध्ये काय साम्य आहे? तसं पाहिलं तर काहीच नाही. पहिलं एक छोटेखानी टुमदार गाव आहे, बाकीची दोन महानगरं आहेत. एक उत्तरेला आहे, एक पश्चिमेला आणि एक दक्षिणेकडे आहे. या तिन्ही ठिकाणी भारतीय लष्कराचे महत्त्वाचे तळ आहेत हे एकच साम्य दिसतं बुवा.

नाही, अजून एक साम्य आहे. या तीनही ठिकाणांच्या नावांवरून इंग्रजी भाषेत शब्द बनलेले आहेत, हे ते साम्य. आणि हे तीनही शब्द नापसंती-दर्शक आहेत, हे विशेष. (यालाच इंग्रजीत पिजोरटिव्ह सेन्स (pejorative sense) असं म्हणतात.) यातला ‘बंगलोर’ हा शब्द अगदी एवढ्यातला आहे. या बाबतीत ‘देवळाली’चा क्रमांक पहिला आहे.

या शब्दांबद्दल वाचण्यापूर्वी एखाद्या गावाच्या, शहराच्या नावांवरून तयार होणाऱ्या शब्दांना काय म्हणतात, हे बघू. जगभरातल्या अनेक जागांच्या नावांवरून तयार झालेल्या अशाच शब्दांची इंग्रजीत रेलचेल आहे. या शब्दांना ‘टोपोनिम’ (toponyms) अशी शास्त्रीय संज्ञा आहे. Toponymy किंवा toponymics किंवा toponomastics या विषयात जागांची, शहरांची, गावांची नावं कशी तयार झाली, त्यांची व्युत्पती आणि इतिहास यांचा सखोल अभ्यास केला जातो. प्राचीन ग्रीक भाषेतल्या ‘टोपॉस’ (tópos, ठिकाण) आणि ओनोमा ‘onoma’ (नाव) या दोन शब्दांपासून ‘Toponymy’ हा शब्द बनला. या विषयाचा जो अभ्यास करतो तो ‘toponymist’ (टोपोनिमिस्ट). १८७६ पासून भूगोलशास्त्रज्ञ या शब्दाचा वापर करत आहेत. आपल्याला या विषयाच्या सविस्तर वर्णनात जायचं नाही. पण त्याचा आवाका खूप मोठा आहे आणि जगातले सर्व खंड, देश, प्रांत, प्रदेश, शहरं, गावं, नद्या, पर्वत, इत्यादींच्या भौगोलिक नामाभिधानांचा त्यात अभ्यास केला जातो. पण ही सगळी असतात विशेष नामं (proper nouns). इंग्रजीत ती लिहिताना त्यांची आद्याक्षरं कॅपिटल केसमध्ये लिहिण्याचा प्रघात आहे.

..................................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी पहा - सर्व प्रकारच्या कट्टरतेला नाकारणाऱ्या ‘इन्शाअल्लाह’ या अभिराम भडकमकर यांच्या बहुचर्चित कादंबरीवरील ‘परीक्षण’ स्पर्धा

..................................................................................................................................................................

मात्र जेव्हा यातल्या एखाद्या विशेष नामाचा सामान्य नामासारखा किंवा विशेषणासारखा किंवा क्रियापदासारखा वापर होऊ लागतो, तेव्हा त्याच्यातलं विशेषत्व लोप पावतं आणि तो लोअर केसमध्ये लिहिला तरी चालतो. सुरुवातीला उल्लेख केलेल्या तीनही शब्दांचादेखील जेव्हा सामान्य शब्द म्हणून वापर होतो, तेव्हाही हेच होतं. म्हणजे, I live in Delhi किंवा Bangalore is the capital of Karnataka असं लिहिताना Delhi आणि Bangalore ही विशेष नामं आहेत हे समजतं. परंतु My American friend George was bangalored या वाक्यात bangaloreनं आपलं विशेषत्व गमवलं असून ते या ठिकाणी एक क्रियापद बनलं आहे. याचा सविस्तर खुलासा पुढे करेनच. टोपोनिम्सपासून बनलेल्या अशा अनेक इंग्रजी शब्दांच्या बाबतीत हेच दिसून येतं.

‘Waterloo’ या शब्दाचंच उदाहरण घ्या. एखाद्याचा भयंकर पराभव झाला आहे, हे सांगण्यासाठी he met his waterloo किंवा it proved his waterloo यांसारख्या वाक्यांचा प्रयोग केला जातो. वॉटर्लू हे गाव आताच्या बेल्जियम देशात आहे. १८ जून १८१५ रोजी महापराक्रमी फ्रेंच सम्राट नेपोलियन बोनापार्टचा याच गावानजीक झालेल्या निर्णायक लढाईत ड्यूक ऑफ वेलिंग्टनच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या इंग्रज आणि त्याच्या काही मित्र देशांच्या फौजांनी दारुण पराभव केला. नेपोलियनच्या या नामुष्कीसाठी इंग्रजांनी आपल्या भाषेत भयंकर, अपमानास्पद पराजय होणं, यासाठी ‘वॉटर्लू’ला समानार्थी शब्द म्हणून सामावून घेतलं.

नापसंती-दर्शक किंवा पिजोरटिव्ह सेन्समधल्या इंग्रजी टोपोनिम शब्दांच्या यादीत ‘वॉटर्लू’चा उल्लेख सर्वप्रथम करावा लागतो. त्यानंतर नंबर लागतो आपल्या मराठी ‘देवळाली’चा. मात्र त्या वेळी तिथे असलेल्या इंग्रजांना दे-व-ळा-ली (किंवा गेला बाजार दे-व-ला-ली) असा उच्चार करता येत नव्हता. त्यात काय कठीण होतं, तेच जाणोत! त्यामुळे ते देवळालीला ‘डुलॅली’ (Deolali/Devlali) असं म्हणत. त्याचं झालं ‘Doolally’ आणि पुढे हा शब्द इंग्रजी भाषेत जेव्हा शिरला तेव्हा तो बनला ‘doolally’.

‘देवळाली’ या गावानं इंग्रजांचं असं काय बरं बिघडवलं होतं, हा प्रश्न तुम्हाला साहजिकच पडला असेल. ते बिचारं एक साधं, सरळ, शांत, सुंदर असं एक छोटंसं हिल स्टेशन आहे. नाशिक शहराला अगदी लागून. इंग्रजांच्या काळात तर ते अधिकच छोटं होतं. तेव्हा ते धुळीनं माखलेलं असायचं. मुंबईपासून सुमारे शंभर मैल अंतरावर असलेल्या या गावाला लष्कराच्या दृष्टीनं फार महत्त्व आहे. त्यामुळे इंग्रजांनी तिथं आपला अड्डा जमवला. आताही ते भारतीय लष्करासाठी एक महत्त्वाचं ठिकाण आहे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

१८६१ नंतर देवळालीच्या महत्त्वाला एक नवा आयाम मिळाला. एक ‘ट्रांझिट कॅंप’ (transit camp) म्हणूनदेखील लष्कर त्याचा उपयोग करू लागलं. शेकडो सैनिकांना घेऊन इंग्लंडहून आलेली जहाजं (troop ships) मुंबई बंदरात दाखल झाल्यावर त्यांच्यातल्या सैनिकांची राहण्याची तात्पुरती व्यवस्था मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात न करता देवळालीच्या या ट्रांझिट कॅंपमध्ये केली जात असे. त्या काळात मुंबईच्या बोरीबंदर (VT/CSMT) या रेल्वे स्टेशनच्या जवळच ‘मोल’ (Mole) नावाचं आणखी एक स्टेशन बॅलर्ड पिअरला होतं. मुंबई बंदराला अगदी खेटून. इथं या सैनिकांसाठी खास आगगाडी उभी असे. जहाजातून उतरताच हे सैनिक या गाडीत येऊन बसत आणि मग त्यांना घेऊन ती बोरीबंदर - नाशिक रेल्वे लाईनवरच्या देवळाली स्टेशनला येत असे.

तिथं काही दिवस घालवल्यावर आणि भारतीय वातावरणाची, हवामानाची त्यांच्या शरीराला सवय झाल्यावर या सैनिकांना पुढे रीतसर आपापल्या पोस्टिंगच्या गावी पाठवलं जात असे.

हे झालं नव्यानं भारतात आलेल्या रंगरुटांच्या (रिक्रुट) बद्दल. भारतातला आपला मुक्काम संपल्यावर जे सैनिक मायदेशी इंग्लंडला परत जाणार असतील, त्यांचं काय? त्यांनाही भारतभरातून याच देवळाली ट्रांझिट कॅंपमध्ये आणून ठेवलं जात असे. त्यांच्याजवळची शस्त्रं काढून घेतली जात. तिथं त्यांना काहीच काम नसे. फक्त आराम.  निष्क्रियतेत काही दिवस असे घालवल्यावर पुढे त्यांना भयंकर कंटाळा येत असे.

आजारी असलेल्या, जखमी झालेल्या, दुखण्यातून बरं झालेल्या पण अजूनही पूर्णपणे शक्ती न आलेल्या (convalescent किंवा उपशमावस्थेत असलेल्या) सैनिकांसाठी देवळाली ट्रांझिट कॅंप हे एक प्रकारचं sanitarium किंवा आरोग्यधामसुद्धा होतं. मुंबईला इंग्लंडहून आलेल्या सैनिकी जहाजांत किंवा तिथून इंग्लंडला जाणाऱ्या अन्य जहाजांत या सर्व प्रकारच्या सैनिकांना बसवलं जाई आणि त्यांची मायदेशी रवानगी केली जात असे. पण कोणत्याही एका जहाजात या सगळ्यांची सोय करणं शक्य नसायचं. त्यामुळे कंटाळलेल्या, घरी परतायला आणि आपल्या प्रियजनांच्या भेटीला आतुर झालेल्या, ‘होमसिक’ झालेल्या या सैनिकांना काही काळ देवळालीत राहून जहाजात जागा मिळण्याची वाट बघावी लागे. कधी महिनाभर तर कधी अगदी वर्षभर. मात्र हा जो इंतजार का समय होता, तो या सैनिकांसाठी फार कष्टाचा ठरायचा. त्यांचा देवळालीतला वेळ जाता जात नसे. तिथलं हवामान सह्याद्रीच्या सानिध्यामुळे जरी इतर भारतीय प्रदेशांपेक्षा सुसह्य असलं तरी त्यांना त्याचाही त्रास व्हायचा. कधी एकदा इथून आपली सुटका होते, याची ते आतुरतेतनं प्रतीक्षा करत असत. एक एक दिवस त्यांच्यासाठी एखाद्या तपासारखा लांब ठरायचा. यातले काही सैनिक जवळच्या नाशिक शहरात जाऊन प्रचंड दारू प्यायचे किंवा वेश्यागमन करायचे.

त्यातल्या अनेकांना गुप्तरोग झाले. काही सैनिकांनी आत्महत्या केल्याच्याही घटना घडल्या. कॅंपमध्ये डासांचा सुळसुळाट होता. त्यामुळे तिथले अनेक सैनिक मलेरियाचे आणि मेंदूविकाराचे शिकार झाले. कॅंपमध्ये त्यांच्या राहण्याचीदेखील नीट व्यवस्था नव्हती. दाटीवाटीनं रहावं लागे. काहींना बरॅकमध्ये पुरेसे पलंग नसल्यानं खाली जमिनीवर झोपावं लागत असे.

याच मानसिक व्यथेमुळे या सैनिकांतले अनेक जण आजारी पडत. त्यांना ताप यायचा, भ्रम व्हायचा आणि काही लोकांना तर चक्क वेड लागायचं. पहिल्या महायुद्धानंतर यात अधिकच भर पडली. या मानसिक रोग्यांची काळजी घेण्यासाठी कॅंपात मानसोपचारतज्ज्ञसुद्धा नव्हते.

..................................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी पहा - सर्व प्रकारच्या कट्टरतेला नाकारणाऱ्या ‘इन्शाअल्लाह’ या अभिराम भडकमकर यांच्या बहुचर्चित कादंबरीवरील ‘परीक्षण’ स्पर्धा

..................................................................................................................................................................

आता हे सगळं देवळालीत होत असल्यामुळे सुपिक डोक्याच्या इंग्रजांनी या घडामोडींसाठी एक नवीन नाव तयार केलं. देवळाली कॅंपमध्ये जर कोणाला वेड लागलं तर ते म्हणत, त्याला ‘डुलॅली’ झाला आहे - He has gone doolally. कोणाला ताप आला किंवा भ्रम झाला तर ते म्हणायचे, त्याला ‘डुलॅली टॅप’ आला आहे. म्हणजे फिव्हर, fever, ताप. Doolally tap म्हणजे एखाद्या गोष्टीची वेड लागेपर्यंत किंवा लागल्यासारखी वाट बघणे. ब्लायटीत म्हणजेच विलायतेत वापस गेलेल्या अशा सैनिकांच्या बोलीमुळे पुढे हे शब्द इंग्लंडमध्येही चलनात आले आणि १९१७ पासून doolally (tap), Going Doolally या शब्दांचा ‘मॅडनेस’, ‘वेड लागणं’, ‘वेड्यासारखं वागणं’, ‘भ्रमिष्ट होणं’, या सारख्या बाबींसाठी स्लॅंग शब्द म्हणून इंग्रजी शब्दकोशांत समावेश केला जाऊ लागला.

हॉबसन जॉबसनच्या प्रसिद्ध शब्दकोशात याचा उल्लेख नाही, याचा अर्थ हा शब्द त्यांच्या काळात चलनात आला नव्हता, हे उघड आहे. अशा प्रकारचा ‘कॅंप फिव्हर’ वैद्यकीय शास्त्राला नवीन नाही. पण देवळालीत येणाऱ्या या तापानं भाषिकदृष्ट्या आपली स्वतःची अशी एक वेगळीच पहचान मिळवली, हे खरं. आणि त्यामुळेच ‘डुलाली’ किंवा ‘देवळाली’ हे गाव एका अप्रिय अर्थानं इंग्रजीत प्रसिद्ध झालं.

बीबीसी (लंडन) तर्फे १९७० साली ‘It Ain’t Half Hot Mum’ या शीर्षकाची एक सिटकॉम मालिका टीव्हीवर दाखवण्यात आली. यातल्या सुरुवातीच्या काही भागांची कथानकं १९४५ साली देवळाली कॅंपच्या ‘Royal Artillery Depot’ इथं घडली आहेत, असं दाखवलेलं आहे. या प्रचंड गाजलेल्या विनोदी मालिकेवर वर्णविद्वेष आणि ती साम्राज्यवादाला खतपाणी घालत असल्याचे आरोप केले गेले आहेत, पण कधी संधी मिळाली तर निव्वळ गंमत म्हणून ती बघायला हरकत नाही. या अशा आरोपांना फारसं सिरियसली घेऊ नये. या मालिकेमुळे देवळालीला आणखी जास्त प्रसिद्धी मिळाली.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

आता ‘चलो दिल्ली’.

या शहराचं इंग्रजीत ‘Delhi’ असं विचित्र नामकरण झालं आहे. परदेशातून भारतात आलेल्या बऱ्याच प्रवाशांना ‘Delhi-Belly’ या विकाराचा सामना करावा लागतो. आपल्याकडच्या तथाकथित दूषित पाण्यानं किंवा मसालेदार, तेलकट खाण्यामुळे त्यांची पोटं बिघडतात आणि त्यांना वारंवार कमोडकडे धाव घ्यावी लागते, असा या शब्दाचा अर्थ सरळ अर्थ आहे.

आता दिल्लीच का, नागपूर - मुंबई - कलकत्ता का नाही, याला काही उत्तर नाही. बेली म्हणजे पोट. त्याच्याशी यमक जुळतं म्हणून Delhi किंवा डेली. (यातल्या ‘ह’चा उच्चार अगदी अस्पष्ट करायचा असतो.) Delhi-Belly हे एक जोड-नाम आहे. परदेशात खूप काळ वास्तव्य केलेले भारतीय लोकदेखील भारतात आल्यावर या ‘डेली बेली’ला घाबरतात. अमेरिकेत राहणारी माझी बहीण जेव्हा जेव्हा आमच्याकडे येते, तेव्हा आम्हाला तिच्यासाठी उकळलेल्या पाण्यानं भरलेल्या बाटल्या फ्रीझमध्ये आठवणीनं ठेवाव्या लागतात. ते असो. पण परदेशी लोक आपल्या पाण्याला घाबरतात, हे खरं.

खरं तर डायरिया कशानंही होऊ शकतो. त्याला ‘Delhi-Belly’ असं नाव देऊन इंग्रजी भाषिकांनी उगीचच दिल्लीला बदनाम केलं आहे. हेच लोक जेव्हा मेक्सिको देशात जातात, तेव्हा त्यांना ‘डेली बेली’चा भाऊ असलेल्या ‘Montezuma's revenge’शी सामना करावा लागतो. हाच माँटझुमाचा बदला, सूड म्हणजे काय? Montezuma किंवा Moctezuma II ( १४६६ - १५२०) हा मेक्सिकोतल्या अ‌ॅझटेक राजवंशाचा शेवटचा शासक होता. १५२१ मध्ये युरोपातून आलेल्या स्पॅनिश लोकांनी त्याच्यावर हल्ला केला, त्याचं साम्राज्य खालसा केलं, त्याच्या हजारो प्रजाजनांची कत्तल केली किंवा त्यांना गुलाम बनवलं असा इतिहास आहे. या घटनेचा बदला माँटझुमा आता त्यांची पोटं खराब करून घेतो, अशी लोककथा आहे.

खरं म्हणजे अशा प्रकारच्या आजाराला ‘traveller’s diarrhoea’ (TD) असं म्हणतात. याचीच रूपं बाली बेटावर किंवा इजिप्टमध्येसुद्धा नजरेस येतात. त्यामुळे उगीच आपल्या दिल्लीला नावं ठेऊ नका. अगदी अमीर खानचंसुद्धा ऐकू नका. त्याची निर्मिती असलेला ‘डेली बेली’ हा २०११ सालचा हिंदी सिनेमा तुम्ही पाहिला आहे का? कॉमेडीच्या नावाखाली काढलेला हा एक बकवास चित्रपट आहे. त्यातले अश्लील, असभ्य संवाद सोडले तर मला तरी त्यात बाकीचं काही आवडलं नाही.

..................................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी पहा - सर्व प्रकारच्या कट्टरतेला नाकारणाऱ्या ‘इन्शाअल्लाह’ या अभिराम भडकमकर यांच्या बहुचर्चित कादंबरीवरील ‘परीक्षण’ स्पर्धा

..................................................................................................................................................................

आणि आता बंगलोर किंवा आताचे बंगळुरू. ‘To be Bangalored’ हा तसा अगदी नवा नवा आणि अनौपचारिक वाक्प्रचार आहे. शब्दकोशातल्या व्याख्येनुसार ‘if someone or their job is Bangalored, they lose their job because the work has been moved to another country where labour is cheaper’'. उदाहरण - The US is getting Bangalored, with Americans supposedly losing jobs to harder-working Indians.

म्हणजे असं की, संगणक-क्रांतीनंतर गेल्या २०-२५ वर्षांत संगणकांच्या क्षेत्रात भारतीय लोकांनी आघाडीचं स्थान मिळवलं. ‘इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी इंडस्ट्री’ या क्षेत्रात लाखो भारतीय युवक-युवतींनी प्रचंड प्रगती केली. त्यातले काही जण परदेशी गेले, तर उरलेल्या अनेकांना लोक गुरगांव, पुणे, हैदराबाद आणि बंगलोर येथे नव्यानं सुरू झालेल्या संगणकाशी संबंधित असलेल्या शेकडो कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळाल्या. बंगलोर शहर या बाबतीत सर्वांत पुढे आहे. आता गंमत अशी आहे की, या क्षेत्रातलं जे एखादं काम एखादा अमेरिकन माणूस अमेरिकेत बसून करतो, तेच किंवा तसंच काम एखादा भारतीय माणूससुद्धा बंगलोरमध्ये राहूनही तेवढ्याच चांगल्या प्रकारे करू शकतो. पण अमेरिकेत तिथल्या त्या माणसाला तिथल्या नियमांप्रमाणे डॉलरमध्ये वेतन द्यावं लागतं. काही काळानं या कंपन्यांच्या असं लक्षात आलं की, आपण आपलं हे काम अमेरिकेत करून घेण्याऐवजी जर ते बंगलोरला पाठवून दिलं आणि एखाद्या भारतीय माणसाकडून करून घेतलं तर त्याला डॉलरऐवजी रुपयांत पगार देता येईल आणि अमेरिकेच्या तुलनेत ते केव्हाही स्वस्तात पडेल. अमेरिकेत जर त्या कामाला रोज शंभर डॉलर लागत असतील तर भारतीय कंपन्या ते रोज सत्तर डॉलरमध्येच करायला तयार असतात. यातली सगळी रक्कम भारतीय कंपनी स्वतःकडे ठेवून घेते आणि ठराविक मासिक वेतनावर असलेल्या तिच्या एखाद्या कर्मचाऱ्याकडून ती ते काम करून घेते. (हे फक्त ढोबळ उदाहरण आहे, एक अंदाज येण्यासाठी.) यात अमेरिकन कंपनीचे रोजचे तीस डॉलर वाचले, भारतीय कंपनीला रोज सत्तर डॉलर (सुमारे सात हजार रुपये रोजचे आणि महिन्याचे दोन लक्ष दहा हजार) मिळाले आणि महिन्याचा खर्च झाला जास्तीत जास्त ४०-५० हजार रुपये. बाकीचा कंपनीचा नफा.

हे आउटसोर्सिंगचं गणित अमेरिकन कंपन्या आणि भारतीय कंपन्या या दोघांच्याही फायद्याचं होतं. जसं हे अमेरिकन कंपन्याच्या लक्षात आलं, तसं त्यांनी भारतातल्या स्वस्त वेतन दरांचा फायदा करून घ्यायचं ठरवलं आणि अशी हजारो कामं भराभर भारतात (मुख्यत्वे बंगलोरला) पाठवून दिली. परिणामी, काम नसल्यामुळे अमेरिकेतल्या अनेक माणसांना घरी बसावं लागलं. अशा बातम्या रोजच्या येऊ लागल्यावर तिकडचे लोक चिडले, पण ते काहीच करू शकत नव्हते. हे सगळं कायदेशीर होतं. या घडामोडींना पुढे ‘To be Bangalored’ असं म्हणण्यात येऊ लागलं. I was B/bangalored म्हणजे ‘माझा जॉब बंगलोरवाल्यानं पळवला आणि मला घरी बसवलं’, असा याचा अर्थ काढायचा. या शब्दाच्या निर्मितीचं श्रेय ‘The Economist’ या नियतकालिकाकडे जातं.

देवळाली, दिल्ली, बंगलोर ही गावं खूप चांगली आहेत. पण तरीही त्यांच्या नावांना या शब्दांमुळे एक प्रकारचा कुत्सित, निंदाव्यंजक अर्थ प्राप्त झाला, हेही सत्य आहे.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

या तीन गावांशिवाय इतरही काही भारतीय गावं शब्दस्वरूपांत इंग्रजी भाषेत मौजुद आहेत. मात्र त्या शब्दांना कोणतीही निगेटिव्ह, नकारार्थी अर्थच्छटा नाही. त्यातली काही अशी आहेत- डमडम (dumdum). कलकत्त्याजवळच्या डमडम या गावात ब्रिटिशांनी दारूगोळा ठेवण्यासाठी एक फार मोठं शस्त्र-भांडार उघडलं होतं. फुगणाऱ्या काडतुसांवर पहिले प्रयोग याच ठिकाणी केली गेले. म्हणून आता अशा ‘Expanding bullets’ना ‘डमडम बुलेट’ किंवा नुसतंच ‘डमडम’ असं म्हटलं जातं.

‘मद्रास’ (Madras) म्हणजे आताचं चेन्नई. या गावात एक खास प्रकारचं तलम सुती कापड तयार केलं जात असे. त्यामुळे आता अशा प्रकारच्या कापडाला ‘मद्रास’ असंच म्हणतात.

‘बोंबिल’ माशाला इंग्रजीत ‘Bombay duck’ म्हणतात. यात बदक कुठून आलं ते नक्की सांगता येत नाही, पण Bombay (मुंबई) जवळच्या समुद्रात हा मासा सापडतो, म्हणून यात ‘Bombay’ आलं.

‘दार्जिलिंग’? उत्तम प्रकारच्या चहासाठी समानार्थी शब्द, ‘Darjeeling’ (tea).

या विषयावर अजून खूप लिहिता येईल. भारत सोडून जगातल्या अन्य भागांवरून इंग्रजीत तयार झालेले टोपोनिम शब्द हा तर एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे. बघू पुढे केव्हा तरी.

जाता जाता : आत्ता मी हा लेख लिहित असताना सैगलची गाणी ऐकत होतो. त्यातलं एक होतं, ‘एक बंगला बने न्यारा’. त्यावरून हे आठवलं. ‘बंगला’ हा शब्द आपल्याकडून इंग्रजीत गेला आहे. तिथे त्याचं स्पेलिंग ‘bungalow’ असं होतं. गुजराथी लोकांच्या संपर्कात आल्यानंतर इंग्रजांनी त्याचा इंग्रजी शब्द म्हणून वापर करणं सुरू केलं. पण मुळात हा शब्द तत्कालीन बंगाल किंवा बांगला प्रांतातल्या घरबांधणीच्या एका विशिष्ट शैलीवरून तयार झाला आणि मग भारतभर पसरला. बांगलातून आला म्हणून त्याचा झाला ‘बंगला’ किंवा ‘बंगली’. आणि मग त्याचा झाला ‘बंगलो’. एखाद्या प्रदेशाच्या नावावरून बनलेल्या टोपोनिम शब्दाचं हेही एक उदाहरण आहे.

..................................................................................................................................................................

लेखक हर्षवर्धन निमखेडकर वकील आहेत. वुडहाऊसचे अभ्यासकही.

the.blitheringest.idiot@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Vikrant Londhe

Mon , 22 February 2021

खूपच सुंदर अभ्यासपूर्ण लेख आहे. धन्यवाद.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......