अजूनकाही
“Dark skin is not a crime, White skin is not a prize.”
‘Hidden Figures’ हा सिनेमा नासात काम करणाऱ्या एका आफ्रिकन, कृष्णवर्णीय स्त्री गणितज्ञाच्या संघर्षावर आधारित आहे. एक बुद्धिमान कृष्णवर्णीय स्त्री कमालीची हीन वागणूक मिळूनही लोकशाही पद्धतीनं स्वत:चं अस्तित्व नासात काम करणार्या गोर्या सहकार्यांना व अर्थात जगाला कशा पद्धतीनं दाखवून देतं, हे या सिनेमात बघायला मिळतं. अत्यंत गंभीर विषय रोचक पद्धतीनं या सिनेमातून मांडला आहे. हा सत्य घटनेवर आधारित सिनेमा आहे.
यात या कृष्णवर्णीय स्त्रीला कुठेही आपल्या त्वचेच्या रंगावरून रडताना किंवा गोर्यांसारखं व्हावं, याचा खटाटोप करताना दाखवलेलं नाही. रंगावरून स्वत:ची व दुसर्याची किंमत करणार्या भारतीयांनी हा सिनेमा नक्की पाहायला हवा.
मानसशास्त्रात ‘self-esteem’ (स्व प्रतिमा/मूल्य) ही संकल्पना अनेक बाबींवर आधारित आहे. यात प्रामुख्यानं आई-वडील किंवा काळजीवाहू व्यक्ती यांच्याकडून मिळणारी वागणूक, त्वचेचा रंग, शारीरिक ठेवण - उंची, वजन व शारीरिक व्यंगाचा अभाव - या गोष्टी येतात. त्याचबरोबर आंतरिक गोष्टी - प्रामुख्यानं जीवन मूल्यं, बुद्धिमत्ता, भावनिक क्षमता व आयुष्यातील वेगवेगळ्या आघाड्यांवर मिळवलेलं यश येतं. मात्र पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांची स्व-प्रतिमा त्वचेचा रंग व शारीरिक ठेवण यावर मुख्यत्वे आधारित असल्यानं केवळ भारतातच नाही, तर जगभर गोरा रंग (ब्रिटिश गोरा रंग) नसणार्या स्त्रियांना ‘low self-esteem’चा सामना करावा लागतो.
ब्रिटिश साम्राज्यावर सूर्य मावळत नाही, अशा गुर्मीत इंग्रजांनी बळजबरीनं सगळ्या जगात आपल्या वसाहती स्थापन केल्या. त्यात अफ्रिका खंडातील काही देश, भारत, श्रीलंका, हाँगकाँग यासारखे आशियाई देशांचाही समावेश होता. भारतात ब्रिटिशांच्या अगोदर मुघलांनी राज्य केलं, ते भारतीयांपेक्षा रंगानं उजळ होते. त्यामुळे अनेक शतकांपासून गोरा रंग हा आपल्या मनात वरच्या स्थानावर, सत्तेच्या ठिकाणी विराजमान आहे. गोरे लोक व त्यातही हिरवे, निळे, घारे डोळे असणारे लोक हे जातिवंत बुद्धिमान, यशस्वी व सधन असतात, हे मानसिक समीकरण आपल्या मेंदूत ठसलं आहे. ही कित्येक शतकांची गुलामगिरी अजूनही वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त होत असते.
..................................................................................................................................................................
अधिक माहितीसाठी पहा - सर्व प्रकारच्या कट्टरतेला नाकारणाऱ्या ‘इन्शाअल्लाह’ या अभिराम भडकमकर यांच्या बहुचर्चित कादंबरीवरील ‘परीक्षण’ स्पर्धा
..................................................................................................................................................................
मानव जातीचा इतिहास बघितल्यास थंड प्रदेशात राहणार्या लोकांची त्वचा व डोळ्यांचा रंग हा सूर्याचा प्रकाश मुबलक असणार्या प्रदेशातील लोकांपेक्षा वेगळा असतो. यामागे शास्त्रीय कारणं आहेत. मेलनीन नावाच्या घटकावर आपल्या त्वचेचा व डोळ्यांचा रंग अवलंबून असतो. हे मेलनीन सूर्याच्या प्रदेशात राहणार्या लोकांच्या त्वचेत यूव्ही किरणांपासून संरक्षण व्हावं, यासाठी आपोआप तयार होतं.
भारतात त्वचेचा रंगावर जातीव्यवस्थेचाही खूप प्रभाव आहे. ब्राह्मण समाज व उच्च वर्गाला उन्हातान्हात काम करावं लागत नाही. असा वर्ग साधारण गव्हाळ वर्ण असलेला असतो. त्यामुळे भारतीय समाजात गोरा रंग हा सरळ सरळ बुद्धी, पैसा व सत्ता यांच्याशी जोडला जातो. डोळ्यांचा निळा रंग असलेल्या लोकांचा पूर्वज एकच असून हा डोळ्यांचा रंग फक्त युरोपात आढळतो.
हे पहा - https://www.healthline.com/health/eye-health/eye-color-percentages
स्त्रियांच्या बाबतीत बोलायचं झालं तर समाजात दुय्यम भूमिका असल्याने बुद्धी व यश यांसारख्या गोष्टींपेक्षा जे पुरुषाला आवडेल, त्यात गोरा रंगाचं सामाजिक मूल्य जास्त असतं. तो असला की, आपण पुरुषाला जास्त सुख देऊ शकतो असा समज रुजलेला आहे. त्यामुळे आपलं अस्तित्व टिकून राहील, येणारी पुढची पिढी सुंदर (म्हणजे गोरी) राहील, या हिशोबानं स्त्रियासुद्धा गोर्या रंगाशी ‘स्व’चं मूल्य जोडतात.
लैंगिक सुख व त्वचेचा रंग यांचा वैज्ञानिकदृष्ट्या काहीही सबंध आढळलेला नाही. याउलट पुरुषांना स्त्रियांकडे आकृष्ट व्हायला नितंब व स्तन यांचा आकार, तसंच बारीक कंबर या गोष्टी आवश्यक ठरतात. याचं शास्त्रीय कारण हे पूर्णपणे प्रजनन क्षमतेशी संबंधित आहे. देवेंद्र सिंह आणि स्टीवन प्लाटेक यांनी केलेल्या संशोधनातून असं आढळलं की, या आकारांमुळे पुरुषांच्या मेंदूतील ‘आनंदाची अनुभूती देणारी केंद्रं’ (reward center) जागृत होतात. नितंब व स्तनांचा सुडौल आकार हा जास्त व आरोग्यदायी संततीसाठी आवश्यक असल्यानं त्याचा संबंध लैंगिक स्पृहणीयते (sexual desirability)शी जोडला जातो. वर्षानुवर्षं ते पुरुषांच्या मेंदूत ठसलेलं आहे. एका अभ्यासानुसार अमेरिकेतील पुरुष स्त्रियांच्या ‘hourglass figure’ न्याहाळण्यासाठी वर्षाला तीन बिलियन डॉलर्स इतका खर्च करतात.
हे पहा - Eternal Curves
संशोधनानुसार त्वचेचा रंग कोणताही असला तरी लठ्ठ स्त्री-पुरुष लैंगिक आयुष्याचा आनंद उपभोगू शकत नाहीत. कारण कार्डियोचा स्टॅमिना, स्नायूंची ताकद, तसंच लवचिकता यांवर लैंगिक सुख अवलंबून असतं. शरीरावर नको त्या ठिकाणी असलेली चरबी हे मानसिक व शारीरिक रोगाचं लक्षण असूनही भारतात त्वचेचा रंग हा व्यक्ती, विशेष करून स्त्रियांच्या बाबतीत आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी (उदा. शिक्षण, नोकरी व जोडीदार) निवडताना उपयोगी ठरतो. तारुण्याचं लक्षण असलेली घट्ट त्वचा, काळे केस व सुडौल शरीर हे मुळात प्रजनन क्षमतेशी संबंधित आहे, ते व्यायाम केल्यानं अधिक काळ टिकतं.
हे पहा - It’s ok to not be skinny: Curves are attractive too
त्वचेच्या गोऱ्या रंगानं भारतीयांना एवढं पछाडलं आहे की, स्वातंत्र्य मिळून ७०हून अधिक वर्षं झालेली असली तरीही आपण अजूनही गोर्या रंगाच्या गुलामीत आहोत. गोर्या करणार्या क्रिम्स व त्वचेच्या शस्त्रक्रिया या भारतात प्रचंड लोकप्रिय आहेत. नवीन स्मार्ट-फोनचे कॅमेरा व वेगवेगळे फिल्टर्स (ज्यात त्वचा गुलाबी गोरी व अगदीच अनैसर्गिक दिसते) यांचं पेव फुटलं आहे. मराठी मालिकांमधून गोर्या रंगाचा एवढा उदो-उदो केला जातो की, सावळ्या रंगाच्या व्यक्तीनं जगूच नये असं वाटतं. कहर म्हणजे ‘चला, हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम आहे. त्यात सावळा रंगाचे भाऊ कदम, सागर करंडे, कुशल बद्रिके स्वत:च्या रंगावर अत्यंत हिणकस जोक करतात आणि समोर बसलेले कलाकार व प्रेक्षक त्यावर हसून दाद देतात. नीलेश साबळे यांनी तर सावळ्या रंगाला सतत अपमानित करायचा विडाच उचलला आहे की काय, असं वाटतं.
सावळ्या रंगाच्या व्यक्ती दु:खी, निर्बुद्ध, अपयशी व दुय्यम दर्जाच्या असतात, असं एकंदर चित्र वेगवेगळ्या माध्यमांतून तयार केलं गेलं आहे. त्यामुळे ज्या व्यक्ती हळव्या असतील, त्यांच्या मनाचं काय होत असेल, याचा विचारही करवत नाही.
हे पहा - HOW COLORISM AFFECTS MENTAL HEALTH AND LIFE?
मी स्वत: रंगानं सावळी असल्यानं टोमणे व तिरस्कार बऱ्याच वेळा सहन केला आहे. सावळी असूनही इतका आत्मविश्वास कुठून येतो, हे मला अनेकांच्या नजरेत स्पष्टपणे जाणवतं. तुझ्याकडे गोरा रंग नाही म्हणजे तुझ्यात काहीतरी कमी आहे, हे अनेकांनी अप्रत्यक्षपणे बोलूनही दाखवलं आहे. माझ्या कुटुंबियांनी मला कधीही ही गोष्ट जाणवू दिली नाही, परंतु शाळा, महाविद्यालय आणि ऑफिसमध्ये गोरा रंग फायद्याचा ठरतो, हे नंतर कळलं. माझ्या रंगामुळे लग्नाला नकार येतो म्हणूनही त्वचेचा रंग उजळवून घ्यायचे सल्ले दिले गेले, पण अशा पद्धतीनं लग्न करण्यापेक्षा मी अविवाहित राहणं पसंत केलं. त्यात मी खूश आहे.
ज्या एका गोष्टीसाठी माणसाचं सगळं व्यक्तिमत्त्व झाकोळलं जातं, त्या त्वचेच्या रंगावरून ‘स्व’ची किंमत ठरवणार्या लोकांची कीव येते. रंग सावळा होईल व पुरुषी दिसू या भीतीनं मुली मोकळेपणानं खेळत नाहीत. त्यामुळे त्यांची शारीरिक वाढ खुंटते. पुरुषांना जसे बळकट स्नायू आवश्यक असतात, तसंच ते स्त्रियांनाही उपयोगी असतात. स्त्रिया Estrogen या स्त्री संप्रेरकामुळे कितीही व्यायाम केला तरी पुरुष दिसत वा होत नाहीत.
सावळ्या रंगाच्या लोकांना स्वत:च्या शरीराविषयी घृणा निर्माण होऊन त्याचे वाईट परिणाम होतात. सुदैवानं मला नृत्याची व खेळाची आवड असल्यानं शरीराशी लहानपणीच ओळख होऊन त्याची काळजी घेतल्यानं मी माझ्या सावळ्या रंगावरही समाधानी आहे.
गोरा रंग हा भारतीयांचा कच्चा दुवा आहे. गेल्या दहा वर्षांत गव्हाळ व सावळा रंग हिंदी सिनेमांतून जवळपास नाहीसा झाला आहे. रबरासारखी त्वचा असणारे पांढरे चेहरे प्रसारमाध्यमांतून आपल्या दिसतात आणि ते सतत ‘गोरे व्हा’ असा संदेश देऊन गोरं करणाऱ्या वेगवेगळ्या वस्तू विकत असतात. आपल्याकडच्या बहुतेकांना गोरा रंग म्हणजे आपण ब्राह्मण झालो असं वाटतं. आपल्या जातीव्यवस्थेनंही या गोर्या रंगाच्या वेडाला खतपाणी घातलं आहे. हे वेड बर्याच आफ्रिकन व आशियाई देशांतही आहे.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
भारतीयांनी कितीही प्रयत्न केला तरी त्यांना ‘brown’ म्हणूनच ओळख आहे. भारतात किंवा अगदी परदेशातसुद्धा गोऱ्या रंगाच्या लोकांचा भावनिक बुद्ध्यांक कमीच असतो. त्यातही सहसंवेदना खूप कमी असते, कारण गोऱ्या रंगामुळे आपण वेगळे व श्रेष्ठ आहोत, ही जाणीव त्यांना लहानपणीच झालेली असते. त्याचा फायदा घेऊन कमी श्रमात काम करणंसुद्धा त्यांना जमतं. यात स्त्रियांचा क्रमांक आधी येतो. गोरा रंग व इंग्रजी असलं की, भारतात दुसरं काही आलं नाही तरी लोकांचं आरामात निभतं. रंगाचा खूप विचार करणाऱ्या स्त्री-पुरुषांत body dissatisfaction, disturbed body image असे मानसिक आजार असतात.
महात्मा गांधींना पहिल्या दर्ज्याच्या डब्ब्यातून प्रवास करताना दक्षिण आफ्रिकेत रेल्वेतून खाली उतरायला लावलं, कारण त्यातून फक्त गोरे प्रवास करू शकत असत. या अनुभवानं हादरून गेलेल्या गांधींना झालेली कमीपणाची जाणीव त्यांचं आयुष्य घडवायला व जगाचा इतिहास बदलवायला कारणीभूत ठरली. गांधींपासून प्रेरणा घेऊन वर्णद्वेषाचा लढा लढणारे मार्टिन लूथर किंग ज्युनियर व नेल्सन मंडेला यांनीसुद्धा गोर्यांसारखं होणं पसंत करण्यापेक्षा समानतेचा लढा उभारला.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
आफ्रिकन लोकांच्या वर्णद्वेषाच्या लढ्याचं यश म्हणजे बराक ओबामा, कमला हॅरिस, सेरेना विलियम्स! त्वचेचा रंग बुद्धिमत्ता, भावनिक कौशल्य व नेतृत्व क्षमता ठरवतो, असा कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. भारतीय मनावर राज्य करणाऱ्या देवी-देवतासुद्धा सावळ्या आहेत, परंतु अनेक वेळा वर्चस्वाच्या भ्रामक कल्पनांनी या देवांचंही रंग-रूप बदलायला भाग पाडलं गेलं. द्रौपदी राजकन्या असूनही सावळी होती. जिजाबाईंचं वर्णन हे त्या सावळ्या असाव्यात असं दर्शवतं. अशी इतिहासात अनेक उदाहरणं सापडतील, परंतु ‘गोरा रंग श्रेष्ठ’ असं आपल्याला वारंवार बजावून सांगितलं गेलं आहे आणि आपणही ते निमूटपणे मान्य केलं आहे.
गोर्यांनी शेकडो वर्षं राज्य करताना स्वाभिमानासोबत आपली ओळखही हिरावून घेतली. ज्या लोकांना स्वत:च्या ओळखीची लाज वाटते, ते खरंच स्वतंत्र नागरिक म्हणून राहू शकतात?
त्यामुळे गोऱ्या रंगाच्या भूतानं पछाडलेल्यांनी ‘महात्मा गांधींना सुखी आयुष्य सोडून भारतात परत येऊन स्वातंत्र्यलढ्याची प्रेरणा का मिळाली?’ या गोष्टीचा विचार नक्की करावा.
..................................................................................................................................................................
हेही पाहा - गोरे रंग पे ना इतना गुमान कर... - अलका गाडगीळ
..................................................................................................................................................................
लेखिका डॉ. वृषाली रामदास राऊत विश्वकर्मा विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक आहेत.
vrushali31@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment