अजूनकाही
प्रतापगडाच्या पायथ्याशी वाहनतळावर गाडी उभी केली. उतरलो. वर पाहिले तो हा उंचच्या उंच बुरूज. त्यावर फडफडणारा भगवा ध्वज.
बुरुजावर तरुण शिवभक्तांचा एक गट घोषणा देत होता. शिवरायांचा आणि हिंदुधर्माचा जयजयकार करत होता. खालपर्यंत त्यांच्या घोषणांचा ध्वनी दुमदुमत होता.
या वाहनतळाच्या जवळच परिसरात शिवरायांनी अफजलखानास मारले. मोठा थरारक प्रसंग तो! अलीकडेच गजानन भास्कर मेहंदळेंच्या ‘श्री राजा शिवछत्रपती’ या बृहत्ग्रंथात त्याविषयी वाचलेले. ते सारे आठवत होते.
महाराजांनी ‘तलवारीचे टोक’ अफजलखानाच्या पोटात खुपसून त्याची आतडी बाहेर काढली. तसा तो ओरडू लागला. ‘शिवभारता’तील हकीकतीनुसार, ते ऐकताच अफजलखानाचा ब्राह्मण सेवक महाराजांवर धावून आला. अफजलखानाचीच पडलेली तलवार उचलून त्याने महाराजांवर वार केला. महाराजांनी तो वार अडवला. अज्ञानदासांचा पोवाडा सांगतो, तेवढ्यात जिवाजी महालदार यांनी त्या ब्राह्मणास बरची फेकून मारली आणि त्यात तो मेला. अफजलखानाच्या त्या ब्राह्मण सेवकाचे नाव होते कृष्णाजी भास्कर.
अफजलखान मारला गेल्याचे पाहून त्याचे दहा अंगरक्षक शिवरायांना मारण्यासाठी धावून आले. त्यात अब्दुल सय्यिद, बडा सय्यिद, अफजलखानाचा पुतण्या रहीमखान, पहिलवानखान आणि इतर चार मुसलमान होते. त्यात पिलाजी मोहिते, शंकराजी मोहिते हेही होते. हे दोघे हिंदू.
..................................................................................................................................................................
अधिक माहितीसाठी पहा - सर्व प्रकारच्या कट्टरतेला नाकारणाऱ्या ‘इन्शाअल्लाह’ या अभिराम भडकमकर यांच्या बहुचर्चित कादंबरीवरील ‘परीक्षण’ स्पर्धा
..................................................................................................................................................................
वर बुरूजावरून घोषणा देणाऱ्या शिवभक्तांना या इतिहासाशी काहीही देणेघेणे नसणार. महाराजांना हिंदूंचा राजा म्हणूनच ते गौरवत होते. चूक त्यांची नाही. इतिहासाकडे थरारपट म्हणून पाहण्याची वर्षानुवर्षांची सामाजिक सवय! हा सारा ‘इतिहास’ समजून घ्यायचा कोठून, तर कादंबऱ्या आणि चित्रपटांतून. हल्ली गावगन्ना शिवशाहीर झालेत. त्यांच्या यू-ट्यूब चॅनेलांनाही हजारोंनी अनुयायी असतात. तर हे आपले इतिहास अभ्यासाचे मार्ग. परिणाम हे होणारच. ते होणे हे येथील धर्मवाद्यांच्या फायद्याचे. कोण अडवणार त्यास?
महादरवाजातून आत जाता आपसूकच पावले वळली त्या बुरुजाकडे. गडाच्या एका टोकाकडे जाणारी चिवाळ नागमोडी तटबंदी. आत इतस्ततः पडलेले दगडधोंडे, खडक. त्यातच एके ठिकाणी भलेमोठे दगडी जाते पडलेले. भंगलेले. खाली पसरलेले जावळीचे हिरवेगार खोरे.
कोकणात जाताना आमच्या मालवणी मित्राला गमतीने चिडवत होतो. त्याला कोकणाच्या निसर्गसमृद्धीचा मोठा अभिमान. तर म्हणत होतो - ‘अरे, इथं सगळीकडं झाडं आणि डोंगरच दिसताहेत. तुमचा तो निसर्ग आला की सांग हं.’ गडाच्या तटबंदीवरून दिसत होता तो निसर्ग… डोळ्यांना, मनाला निववणारा, मानवी क्षुद्रत्वाची जाणीव करून देणारा निसर्ग.
आमच्या पुढेच एक गुजराती कुटुंब चाललेले. मम्मी, पप्पा आणि त्यांच्या दोन मोठ्या मुली आणि धाकटे चिरंजीव. मम्मी त्यांना गुजरातीमिश्रित इंग्रजीतून प्रतापगडाचे महत्त्व सांगत होती. मुली मन लावून ऐकत होत्या, पाहत होत्या. ती गुर्जर भगिनी मध्येच ‘तानाजी’ सिनेमाचे संदर्भ देत होती. इतिहासाची छान सरमिसळ चालली होती.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
गडावर चढताना एक गाईड मागे लागला होता. गाईड न घेतल्यास तुम्हाला काहीही समजणार नाही, गडावर भरकटाल असे भय घालत होता. पण त्यास स्पष्ट ‘नाही’ म्हणून सांगितले. तरीही तो चिवटपणे मागे मागे येत होता. त्याच्या रोजीरोटीचा तो प्रश्न असणार. त्याशिवाय कोण एवढे अजिजीने वागणार?
वर भवानी मातेच्या मंदिराबाहेर असाच एक मार्गदर्शक दिसला, परप्रांतीय पर्यटकांच्या घोळक्यात. तेथे काही छोट्या तोफा मांडलेल्या आहेत. त्या दाखवून तो हिंदीतून सांगत होता की, या पन्नास पन्नास किलोच्या तोफा खांद्यावर घेऊन शिवाजी राजांचे मावळे तटावरून गस्त घालत असत त्या काळी. म्हणजे बघा, कशी माणसे असतील ती...
ते ऐकून वाटले, बरे झाले आपण त्या मार्गदर्शकास नको म्हणालो. मार्गदर्शक सांगत असलेला थरारपटी इतिहास आणि ती गुर्जर भगिनी सांगत असलेला चित्रपटोत्भव इतिहास यांत केवळ तपशीलाचाच फरक.
सिंधुदुर्गावर तर या गाईडांचा मोठा विचित्र अनुभव आलेला. तेथे असलेला महाराजांच्या हाताचा आणि पायाचा ठसा पाहण्याची फार इच्छा होती. आत गेल्यावर मित्राने तेथील एकास विचारले,
ते ठसे कोणत्या बाजूस आहेत हो?
त्याने उलट विचारले, तुम्ही गाईड घेतलाय?
मित्र म्हणाला, नाही.
त्यावर तो उर्मटपणे म्हणाला, मग तुमचे तुम्ही शोधा.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
आम्ही शोधले ते. पण तेथे पाहिले, आपली अनेक मराठी माणसे त्या छोटेखानी देवळीजवळून तशीच जात होती. त्यांना पत्ताही नव्हता की, त्यात किती अनमोल खजिना आहे तो.
सिंधुदुर्ग काय किंवा प्रतापगड काय, किंवा असेच अन्य गड काय… सगळीकडे हीच माहितीची आबाळ. पर्यटन खात्याने वा पुरातत्त्व विभागाने लावलेला एखादा फलक सोडला तर कुठे माहिती मिळण्याची व्यवस्थाच नाही.
या गडांवर जागोजागी केवढा इतिहास घडून गेलेला. किती तरी अवशेष पडलेले. पण कुठेही त्यांची माहिती देणारे फलक नाहीत. दिशादर्शक बोर्ड नाहीत.
गड पाहण्यामागे निसर्गदर्शन हा हेतू असतो काय? पायांना व्यायाम व्हावा म्हणून लोक किल्ले चढतात काय? पण होते ते तेवढेच. गडांवरील अवशेषांतून नजरेसमोर तेव्हाचा काळ उभा राहावा, तेथील इतिहासाची ओळख व्हावी, शिवरायांच्या राज्यकारभाराविषयीची, त्यांच्या दूरदृष्टीची, त्यांच्या रणनीतीची थोडीफार माहिती व्हावी, हा हेतू असायला हवा. पण त्याचा आपल्या राज्यकर्त्यांना पत्ताच नाही. गडाची डागडुजी करणे, निगा राखणे वगैरे दूरच, तेथे जागोजागी साधे माहिती फलक लावण्याचेही सुचू नये? प्रतापगड पाहताना मनात वारंवार हेच विचार येत होते.
भवानीमाता मंदिराकडून बालेकिल्ल्याकडे जाताना दिसणारी घरे आणि दुकाने आणि हॉटेले, त्यांची पत्र्यांची छप्परे हे सारे पाहताना वाटले, ऐतिहासिक, हेरिटेज वास्तूंबाबतची आपल्या बकाल आस्थेची प्रतीकेच ती.
कुठे कुठे फोटो काढून गड उतरलो. म्हटले, छान निसर्गदर्शन झाले. तसेच दुर्गदर्शनही झाले असते तर भरून पावलो असतो.
..................................................................................................................................................................
लेखक रवि आमले ज्येष्ठ पत्रकार असून, त्यांचे ‘प्रोपगंडा’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे.
ravi.amale@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment