महाराष्ट्रातील एक विचक्षण विचारवंत वसंत पळशीकर यांचा आज ८५वा (जन्म : १८ फेब्रुवारी १९३६) जन्मदिन. त्यानिमित्ताने त्यांच्या एका दुर्मीळ लेखाचे पुर्नप्रकाशन...
..................................................................................................................................................................
१.
महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसमधून प्रवास करण्याचा प्रसंग वारंवार येतो. तिकीट पूर्ण रुपयांमध्ये असते असे क्वचितच घडते. दहा पैसे, वीस पैसे, तीस पैसे, चाळीस पैसे असे बाकी राहिलेले पैसे कंडक्टर स्वत:हून परत करतो असे अलीकडच्या काळात सहसा घडत नाही. नाणेटंचाईचे कारण बहुतेक वेळा चटकन पुढे केले जाते. प्रवाशांच्या देखत कंडक्टरच्या हाती चिल्लर गोळा होत असली तरी, हे कारण पुढे करण्यास कंडक्टर बिचकत नाही. उरलेले चिल्लर पैसे परत मिळवण्यासाठी पुष्कळ हुज्जत घालावी लागते, आठवण करून द्यावी लागते, प्रवास संपेपर्यंत वाट पाहून, उतरताना लाजलज्जा सोडून पैसे मागावे लागतात.
कोणत्याही लहान-मोठ्या कारणाने समोरचा माणूस आपल्या तावडीत सापडला तर त्याला नागवण्याची, पिळण्याची ती सुवर्णसंधीच होय अशी वृत्ती समाजात पार दूरवर पसरलेली, मुरलेली आढळते. बसचा कंडक्टर काही एकटा नाही, आपण एकटे नाही याची त्याला कल्पना असते. त्याला पुन्हा छेडले तर ‘सगळेच हा धंदा करतात, मलाच तुम्ही का म्हणून धरताय?’ अशा आशयाचे उत्तर कमी-अधिक सौजन्याने तो देईल आणि तुम्हाला गप्प बसवील. त्याचे म्हणणे खरेच असते. स्थान, प्रतिष्ठा, सत्ता, अधिकार यांमुळे ज्यांची वागणूक लोकांसमोर अनुकरणीय म्हणून असते, ते लोक वेगवेगळ्या प्रकारे गैर मार्गांनी धन करण्यात, म्हणजेच सरळ-सरळ नाही तर आडवळणाने लोकांना लुबाडण्यात गुंतलेले आहेत. डॉक्टर, वकील, शिक्षक, व्यापारी, सरकारी कर्मचारी-अधिकारी, पुढारी जवळपास सगळेच.
स्वत:च्या नोकरीपेशात वा व्यवसायात जे यशस्वीपणे कमी-अधिक प्रमाणात लुटमार करत असतात त्यांची, इतरांनीही संधीचा फायदा उठवून लुबाडणूक करण्यास हरकत आढळत नाही. किंबहुना अशा वागणुकीची अपेक्षाच ते बाळगतात व आपल्या बोलण्या-चालण्यामधून ते अशा वागण्याचे समर्थन करतात, प्रोत्साहन देतात. समाजाचे धुरिणत्व ज्या राजकारणी पुढारी, प्रशासक, व्यापारी-उद्योगपती वर्गांच्या हाती आहे, ते वर्गच लुटमारीत आघाडीवर असल्याने साऱ्या समाजव्यवहारांनाच हे वळण मिळणे अटळ आहे.
काहीसे निर्लज्जपणे पण कर्तव्यबुद्धीने झगडून बस कंडक्टरकडून उरलेले पैसे पदरात पाडून घेण्यात यश येते तेव्हाही, तसे करून आपण वस्तुत: त्याच्या हृदयापर्यंत वा बुद्धीपर्यंत पोचलेलोच नाही, हे कटुसत्य मनात दाट निराशाच उत्पन्न करते.
..................................................................................................................................................................
अधिक माहितीसाठी पहा - सर्व प्रकारच्या कट्टरतेला नाकारणाऱ्या ‘इन्शाअल्लाह’ या अभिराम भडकमकर यांच्या बहुचर्चित कादंबरीवरील ‘परीक्षण’ स्पर्धा
..................................................................................................................................................................
मनाला खिन्नता आणून देणारी अशी असंख्य उदाहरणे प्रत्येक जण त्याच्या त्याच्या कलानुसार देऊ शकेल. माजी सरसेनापती अरुण वैद्य यांनी संरक्षण मागितल्यावरही त्यांच्या संरक्षणाची अगदी जुजबी व्यवस्था, तीही अत्यंत गलथानपणे केली जाते. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचा अहवाल हाती आल्यावरही भ्रष्ट अभियंत्यांवर खटले भरण्यास मुंबई महानगरपालिकेचे नगरपिते नाकारणारा ठराव करतात. सेऊलच्या दहाव्या आशियाई क्रीडास्पर्धांमध्ये पंचाहत्तर कोटी लोकसंख्येच्या भारतास सगळी मिळून जेमतेम ३७ पदके मिळतात. वाढणारे प्रत्येक शहर हे नगरपिते, प्रशासक व राजकारणी पुढारी संगनमताने मनमानी व्यवहारासाठी बिल्डरच्या हवाली करतात. रोजगार हमी योजनेच्या कामावर नियमितपणे लाखो रुपयांचा भ्रष्टाचार चालतो. अशा उदाहरणांची न संपणारी यादीच तयार होईल. शेवटी अशा सर्व गोष्टींचा पाढा वाचून काय होणार आहे, असा प्रश्न पडतो. काहीच फरक पडणार नाही, असे उत्तरही मन लगेचच देते, आणि हताशा वाढते. चीड, संताप येण्याच्याही पलीकडे गोष्टी जाऊन पोचल्या आहेत, असे म्हटले तर वावगे होईल का?
ही हताशा, निराशाच देशाचा सर्वांत मोठा घात करणारी गोष्ट आहे. निराशेने, हताशेने ग्रासलेला समाज स्वत:चे उत्थान घडवून आणू शकत नाही.
थोर निराशेच्या काळातही आशा पल्लवित करणाऱ्या घटना घडतच असतात. भारतातही वैयक्तिक व सामाजिक पातळीवर, स्थानिक व राष्ट्रीय पातळीवर अशा घटनांकडे बोट दाखवू शकू. अनेकांनी आवाज उठवल्यामुळे केरळमधील सायलेंट रॅलीचा आज तरी बचाव झालेला आहे. भ्रष्टाचाराची, अस्मानी-सुलतानीची किंमत म्हणून महाराष्ट्राच्या तीन मुख्यमंत्र्यांना सत्ता सोडावी लागली आहे. जागरूक राहून वेळोवेळी पुरेसा आरडाओरड करत राहिल्याने पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजच्या मागच्या टेकडीवर सिंबायोसिस या संस्थेस आपला ताबा अजूनही पूर्णपणाने प्रस्थापित करता आलेला नाही. पण अशी उदाहरणे तुरळकच. अशा प्रकरणी यश संपादन केलेल्यांनाही, हे यश तात्पुरतेच आहे याची बोचणारी जाणीव असते. हिशेबच मांडला तर, काही अघटित घडले नाही तर आपली हार त्यांना स्पष्ट दिसते.
समाज परिवर्तनाच्या व्यापक आघाडीवर यश पदरात पडेल या विषयी कोणतीच खात्री बौद्धिक युक्तिवादाच्या आधारे मिळत नसतानाही अनेक व्यक्ती लहान-मोठ्या संघटना स्थापन करून मोठ्या जिद्दीने समाजपरिवर्तनाच्या लढ्यात उतरलेल्या दिसतात. त्या आकर्षणामधून वा साहसाला निमंत्रण देण्याच्या वृत्तीमधून काही वर्षे लढाऊ उपक्रमांमध्ये सहभाग देणाऱ्यांची गोष्ट आपण सोडून देऊ.
तरुणपणाचा काळ ओसरल्यानंतरही, म्हणजे वयाची पस्तिशी ओलांडल्यावरही प्रवाहाविरुद्ध पोहत राहिलेल्यांचाच आपण विचार करू. यापैकी अनेक जण राजकीय पक्ष, कामगार संघटना, विधायक कार्य करणाऱ्या विकाससंस्था वा अन्य तत्सम संघटना यांच्यात मानाचे, प्रतिष्ठेचे व सत्तेचे पद उपभोगत असतात. ते पद व त्यासोबत येणारी सत्ता व मानमान्यता यांमध्ये त्यांचा व्यक्तिगत हितसंबंध गुंतलेला असतो. काही वेळा या संस्था-संघटनांचा पसारा तसा मोठा असतो आणि त्यामुळे आर्थिक लाभही लक्षणीय असतो. लौकिकदृष्ट्या यशही पदरात पडलेले असते. म्हणजे एका अंगाने प्रवाहाविरुद्ध पोहत असल्याची भूमिका हीच दुसऱ्या अंगाने, त्याच वेळी प्रस्थापित समाजव्यवस्थेत प्रवाहपतित म्हणून बऱ्यापैकी लाभ, सत्ता व प्रतिष्ठा मिळवून देणारी असते. व्यापक समाज परिवर्तन हे ध्येय अधिकृत व औपचारिक पातळीवर कायम राहिलेले असले तरी व्यवहारात अशांची भूमिका ‘जैसे थे’वादीच बनलेली असते, असा अनुभव येतो. अशांची निराशाही खरे तर तोंडदेखलीच असते. त्यांचे सगळे वर्तन हे आत्मसंतुष्ट, यशस्वी माणसासारखेच होत असते. अशांचाही विचार आपण सोडून द्यायला हवा.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
समाज परिवर्तनकारी संस्था\संघटना\चळवळींमध्ये काम करणाऱ्यांमध्ये अशाही अनेक व्यक्ती असतात की, ज्यांनी आयुष्याची सुरुवात कार्यकर्ता म्हणून केलेली असली तरी चाळीशी गाठेतोवर त्यांची अवस्था अगतिक व असंतुष्ट कर्मचाऱ्यांसारखी झालेली असते. त्यांनाही आपण बाजूला ठेवायला हवे.
ही सारी मंडळी वगळल्यानंतर शिल्लक किती उरतात, असा छद्मी सवाल कुणी विचारील. आपापल्या कल्पनेतील समाज परिवर्तनास बांधीलकी मानून निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या तरीही पुष्कळ मोठी निघेल. आणि खरे तर प्रश्न संख्येचाही नाही. या मंडळीच्या निष्ठेचा, जिद्दीचा मूळ स्त्रोत कोणता असा प्रश्न आहे.
समाज परिवर्तनाचे जे लक्ष्य समोर ठेवले आहे, त्या प्रकारचा समाज निर्माण होणे ही नियतीच आहे वा ते ऐतिहासिक वाटचालीचे अटळ भवितव्यच आहे, वा तसा ईश्वरी संकेत आहे अशा धारणेमधून अजेय अशी निष्ठा व जिद्द निर्माण झालेली आपण अनेक वेळा अनुभवतो. अशा धारणेच्या समर्थनार्थ पुष्कळ बौद्धिक युक्तिवाद केला जात असला तरी अंतिमत: अशी धारणा ही बौद्धिक युक्तिवादाच्या पायावर टिकून राहू शकत नाही. खरोखरीच्या वा अभ्यासात्मक यशाचा टेकू तिला मिळत राहावा लागतो. विशेषत: विज्ञानयुगाच्या आजच्या कालखंडात वैज्ञानिक रीतीचा अंगीकार करून नियत, ईश्वरी संकेत, वा ऐतिहासिक वाटचालीचे अटळ भवितव्य या सिद्ध करता येणाऱ्या गोष्टी नाहीत, ही गोष्ट स्पष्ट झालेली आहे. म्हणजेच बौद्धिक युक्तिवादाच्या द्वारे आपल्या निष्ठेचे समर्थन करणाऱ्यांच्या बाबतीतही अशा धारणेच्या बुडाशी वस्तुत: ठाम आग्रही समजून वा भाविक श्रद्धा यापैकी कोणती तरी एक गोष्ट असते. आणि या दोन्ही तितक्याच आंधळ्या आहेत.
आज जी कार्यकर्ते मंडळी चाळीशीच्या पलीकडे आहेत, त्यांच्या धारणेचे अधिष्ठान आंधळी ठाम समजूत असते की, आंधळी भाविक श्रद्धा, ती धारणा त्यांच्या इतकी अंगवळणी पडली आहे की, तो त्यांचा स्वभावच बनून गेला आहे. निराशेचे प्रसंग आले तरी, निराशेवर मात करून ते परत जिद्दीने कामाला लागतात, असे आढळते. अवैज्ञानिक आंधळेपणा हे त्यांचे एक सामर्थ्य स्थळ ठरते.
पण विज्ञानाच्या प्रभावाखाली ज्यांचे मानस घडले आहे, वा यापुढच्या काळात घडणार आहे, त्यांच्या पुढील आव्हान अवघड आहे. नियती असलीच, ईश्वर असला व त्याचा काही संकेत असलाच, इतिहासाचा म्हणून काही नियमबद्ध असा भविष्यक्रम असलाच तरी जो जाणून घेण्याचे काम वैज्ञानिक रीतींचा अंगिकार करून व\वा बौद्धिक युक्तिवादाद्वारे पार पाडता येणारे नाही, ही गोष्ट स्पष्ट आहे.
ऐतिहासिक-समाजशास्त्रीय विश्लेषणही, अंतिमत: आजच्या परिस्थितीत अंगभूत असलेल्या वेगवेगळ्या भावी शक्यतांचीच तेवढी गोष्ट सार्थपणे करू शकते. आणि वैज्ञानिक रीत तर नियती, ईश्वरी संकेत, इतिहासाचा अटळ क्रम यांसारख्या बाबी मुळातच विज्ञानाच्या कक्षेबाहेर व म्हणून गैरलागू असल्याचे जाहीर करते. इतकेच नाही तर विज्ञानाच्या चौकटीमध्ये मूल्ये, ध्येये यांना मानवनिरपेक्ष असे कोणतेच अस्तित्व व प्रामाण्य नाही. किंबहुना सर्व काळात, सर्व समाजांमध्ये सर्व माणसांनी स्वीकारायला हवीत, अशी कोणतीच सर्ववाची (युनिव्हर्सल) सनातन सत्ये, मूल्ये वा आदर्श वा श्रेये-ध्येये असत नाहीत. त्यामुळे आधुनिक विज्ञान ज्यांच्या पचनी पडते, त्यांना जुन्या मंडळींसारखा स्वत:चा ठाम समजही करून देता येत नाही की, भाविक श्रद्धाही बाळगता येत नाही.
विज्ञानाच्या युगातही विज्ञान पचनी पाडून न घेता स्वत:च्या निष्ठेसाठी जुन्याच स्वरूपाच्या ठाम कडव्या समजुतींचा वा भाविक श्रद्धेचा आधार घेणारी, शोधणारी तरुण कार्यकर्ते मंडळी पुष्कळ भेटतात. वैज्ञानिक युक्तिवादाच्या प्रखर तेजोकिरणांपासून आपल्या ठाम समजुतींचा वा भाविक श्रद्धेचा बचाव करण्याचा त्यांचा आटोकाट प्रयत्न व्यर्थ असल्याचे त्यांनाही आतून लक्षात आलेले असते. निष्ठा व जिद्द टिकवून धरायची तर विज्ञान पचनी पाडून न घेण्याचा अट्टाहास करावयासच हवा असतो.
पण ही गोष्ट किती दिवस चालणार? फार काळ नाहीच. आशा-निराशेच्या हेलकाव्यात न सापडता, यशाचा खरा वा भ्रामक टेकू शोधत बसण्याची गरज न पडता, स्थिरचित्ताने निष्ठापूर्वक कार्य करण्यासाठी उपयोगी व पुरे पडणारी बैठक वा धारणा कोणती असू शकते? या गोष्टीचा शोध समाज परिवर्तनाची इच्छा बाळगणाऱ्या कार्यकर्त्यांनी घेण्याची आज मोठी निकड आहे.
२.
अशी निकड असण्याचे आणखीही एक कारण आहे. त्या त्या वेळेच्या विषम, अन्याय्य, दु:खद वा अन्य कोणत्या कारणाने असमाधानकारक असलेल्या स्थितीची प्रतिक्रिया म्हणून आदर्शस्वरूप समाजव्यवस्थेची स्वप्ने द्रष्ट्या व्यक्तींनी प्राचीन काळापासून रंगवली असल्याचे आपणास आढळते. यातही एक विशेष गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. आदिवासी समाज, मग ते लहान टोळीच्या आकाराचे असोत वा बृहद् स्वरूपातील असोत, परंपरेने चालत असलेल्या समाजव्यवस्थेचा स्वीकार करून सुख-दु:खाचा समतोल साधण्यात समाधान मानतात, असे दिसते. संघटित संस्था\पीठ या स्वरूपात धर्म ज्या नागर समाजांमध्ये उदयास आले, त्या नागर समाजांमध्येच आदर्शस्वरूप समाजव्यवस्थांची चित्रे रंगवली गेली आहेत. आदिवासी समाजव्यवस्थेचा टप्पा ओलांडून अशा समाजांवर कुरघोडी करून नागर समाज ज्या वेळी अस्तित्वात आले, त्या वेळी मानव व्यक्तिमत्त्वांमधील नैसर्गिक समतोल कायमचा ढासळला. सुसंस्कृततेची, सुष्टतेची नवी उच्च पातळी गाठण्याला अवसर उत्पन्न झाला, तसेच विकृतीची, दुष्टतेची नीच पातळीपण गाठण्याला तेवढाच अवसर उत्पन्न झाला. समाजात क्रौर्य, अन्याय, पिळवणूक, अत्याचार, अनाचार यांना उत येताना आपल्याला इतिहासात वारंवार आढळते. माणसात व जगात ही जी दुष्टता व पाप आढळते, तीपासून मुक्त अशा सर्वस्वी सुष्ट व पुण्यशील समाजाची कल्पना प्रतिक्रियास्वरूप माणसाच्या मनात पुन:पुन्हा उदभवत राहिली आहे, असे या गोष्टीचे स्पष्टीकरण देता येईल. मार्क्सप्रणीत कम्युनिस्ट समाज आणि महात्मा गांधीप्रणीत सर्वोदयी समाज ही दोन याच परंपरेतील चित्रणे होत.
आधुनिक कालखंडाच्या आधी आदर्श समाजाचे चित्रण केले गेले. त्या वेळी आदर्श समाज निर्मितीच्या, म्हणजेच समाज परिवर्तनवादी ज्या चळवळी उत्पन्न झाल्या, त्या धार्मिक होत्या आणि पृथ्वीवर स्वर्ग निर्माण करण्यासाठी त्यांची मदार ईश्वराच्या शक्तीवर व कृपेवर होती. बुद्धीची - बुद्धीच्या पोटात विज्ञानही आले - प्रभा जसजशी फाकत जाईल, आणि प्रबुद्ध समाज अस्तित्वात येईल, अशी धारणा प्रबोधन युगात निर्माण झाली. आदर्श समाजाची निर्मिती हे सर्वस्वी इहवादी ध्येय बनले. इतकेच नाही तर, त्या दिशेनेच साऱ्या मानवजातीची वाटचाल अटळपणे चाललेली आहे, अशी समजही बळावली. विज्ञानाच्या प्रगतीने व विस्ताराने ही समज दृढ होण्यास अधिकच मदत झाली. जुन्या अंध धर्मश्रद्धा व खुळचट समजुती विज्ञानामुळे कायमच्या दूर झाल्यावर सर्व बाबतीत वैज्ञानिक सत्यावर आधारित समाजव्यवस्था अस्तित्वात येणारच. अशा वैज्ञानिक समाजात सर्व प्रश्नांची शंभर टक्के उत्तरे मिळालेली असल्याने कोणतेच प्रश्न उरणार नाहीत.
माणसाच्या मनाला असणारे अनेक स्तर आणि त्यांची गुंतागुंतीची रचना यांची उकल अलीकडच्या काळात वैज्ञानिक रीतींचा अवलंब करून केली जात आहे. तसे तर साधुसंतांनी, धर्मप्रवर्तकांनी, तत्त्वज्ञांनी, साधकांनी आणि साहित्यिक-कलावंतांनी प्राचीन काळापासूनच माणसाच्या मनात खोलवर बुडी मारलेली आहे. माणसाच्या भुका, वासना, विकार बुद्धीला बटीक बनवतात. बुद्धीचा वापर करून घेतात हा सनातन अनुभव आहे. वैज्ञानिक ज्ञानाचा अभाव असल्यामुळे माणसे अविवेकाने, अप्रबुद्धपणे वागत असतात ही वस्तुस्थिती नाही. माणसाचे वागणे सर्वस्वी बाह्य परिस्थितीजन्य असते ही गोष्टही खरी नाही. दुष्टपणा, विकृती, अविवेक यांचे अस्तित्व माणसात एक प्रकारे अंगभूतच असते, असे प्रतिपादन करणेही वावगे होणार नाही. इतका त्यांचा आढळ सार्वत्रिक आहे. सर्व माणसे स्वत:च्या दुष्टपणावर वासना-विकारांवर, विकृतींवर कायमची मात करून पूर्णपणे नि:स्वार्थी बुद्धिनिष्ठ बनतील, किंवा ती तशी बनतील व वागतील अशी परिस्थिती (समाजव्यवस्था) निर्माण करून ती कायमची टिकवूनही धरता येईल. या गोष्टीबद्दल विसाव्या शतकात विश्वास उरलेला नाही. आदर्शस्वरूप नवसमाजाची उभारणी हे नेहमीच एक स्वप्न राहणार, भविष्यदर्शी स्वप्न म्हणून त्याचे मानवी जीवनात सदैव महत्त्व राहणार, माणसाच्या धडपडीला दिशा देण्याचे, त्याचे जीवन उन्नत करण्याचे कार्य ते पार पाडणार, पण आदर्श समाज मात्र कधीच अस्तित्वात येणार नाही, या निष्कर्षाला आज माणूस येत आहे.
आदर्श समाज अस्तित्वात येण्याच्या दिशेने मानवसमाजाची वाटचाल उत्क्रांतीक्रमाच्या अटळपणे चाललेली आहे, असे मानण्यास विज्ञानाचा आधार कधीच मिळू शकत नाही, असे जीवसृष्टीच्या सूक्ष्म पातळीवर अभ्यास करणारे शास्त्रज्ञ अधिकारवाणीने सांगत आहेत.
आपण म्हणतो तसे समाज परिवर्तन, आपल्या हयातीमध्ये नाही तरी, एक ना एक दिवस घडून येणारच आहे, अशी ठाम समजूत वा भाविक श्रद्धा बाळगण्यास विज्ञानाच्या अंगानेही अडचण उपस्थित झालेली आहे.
३.
आदर्श समाज अस्तित्वात येईल, याची कोणतीही खात्री देता येत नसताना, स्वत:च्या मनातील आदर्शाच्या दिशेने समाजाचे उन्नयन करण्यासाठी अविरतपणे कार्य करण्याची प्रेरणा कशातून येऊ शकते, असा प्रश्न आहे. ‘भगवदगीते’मध्ये निष्काम कर्मयोगाची महती सांगितली आहे. फलाची वासना स्वत:साठी म्हणून न बाळगता प्राप्त कर्तव्य पार पाडत राहावे असे म्हणणे समजू शकते, पण ‘गीता’ ही निष्फळ ठरणारी कर्मे करत राहावीत असे खासच सांगत नाही.
सारा समाज एका क्षणी आदर्श बनेल, व त्यानंतर यावच्चंद्रदिवाकरौ तसाच आदर्श व्यवस्थेत राहील, अशी खात्री कोणी कधीच देऊ शकणार नाही. अशी खात्री नसेल तर मग आदर्श समाजाच्या निर्मितीसाठी धडपड करणे निष्फळ होय, असे म्हणणाऱ्यास आपल्यापाशी काही उत्तर आहे का? त्यालाही सांगण्यासारखे काही आहे काय?
आपल्या कल्पनेतला आदर्श समाज पृथ्वीवर प्रत्यक्षात अवतरण्याची खात्री नसेलच, तर मग उगाचच त्या खटपटीत आयुष्य व्यर्थ का दवडा? ज्या समाजात व ज्या परिस्थितीत आपण जन्मलो आहोत त्या परिस्थितीचा स्वत:च्या स्वार्थी उत्कर्षाच्या दृष्टीने अधिकात अधिक लाभ उठवण्याचेच का पाहू नये, असा विचार बुद्धिमान व धडपड्या तरुणाच्या मनात येणे स्वाभाविक आहे. एकेकाळची सर्वस्वार्पण करणारी ध्येयवादी तरुण मंडळी काही वर्षांनी करिअरच्या मागे लागताना आढळतात.
अशा तरुणांना आपण इतिहासाचा दाखला देऊन एक गोष्ट खात्रीपूर्वक सांगू शकतो. सारा समाज आदर्शावस्थेला पोचला आहे अशी उदाहरणे जरी इतिहासात आढळत नसली तरी समाजाच्या इतिहासात भरभराटीचे आणि ऱ्हासाचे, दोन्ही प्रकारचे कालखंड आढळतात. काही कालखंडात सामान्य माणसाच्या कर्तृत्वाला अधिक वाव मिळताना दिसतो, त्याला सन्मानाची व माणुसकीची, न्यायाची वागणूक मिळताना दिसते. तर उलट काही कालखंडात सामान्य माणसाची क्रूर दडपणूक होताना दिसते. मराठ्यांच्या इतिहासाचेच उदाहरण घ्यावयाचे तर शिवाजी महाराजांचा, स्वराज्य संस्थापनेचा एक कालखंड असतो, तर उत्तर पेशवाईचाही एक कालखंड असतो. आदर्श समाज हे कदाचित नेहमीसाठीच स्वप्न राहणार असले तरी सापेक्षत: अधिक सुसंस्कृत, अधिक माणुसकीसंपन्न व न्यायी समाज अस्तित्वात येणे, हे स्वप्नच राहील, असे मानण्याचे कारण नाही.
इथेही एक लक्षात घेण्याची गोष्ट आहे. शिवाजी महाराजांनी ज्या ‘मावळ्यां’ना घेऊन स्वराज्य स्थापन केले, ते ‘मावळे’ किंवा महात्मा गांधींनी ज्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसांना हाताशी धरून असहकाराचे देशव्यापी लढे उभारले, ती मध्यमवर्गीय माणसे, इतिहासाचे नायक बनण्यास पात्र आहेत, असे शिवाजी महाराजांच्या उदयापूर्वी व महात्मा गांधींच्या आगमनापूर्वी कोणी सहजासहजी कबूल केले असते का?
नेपोलियन, लिंकन, लेनिन, माओ - जगभर अशी उदाहरणे आहेत की, थोर प्रतिभाशाली नेत्यांनी ‘मातीतून माणसे’ निर्माण केली. यापैकी कोणालाच आदर्श समाज स्थापन करता आला नाही, आणि त्यांनी निर्मिलेल्या युगाचाही कालांतराने अस्त होऊन तो तो समाज ऱ्हास पावला. पण सामान्य माणसांमधूनच उत्तुंग सामूहिक कर्तृत्व उभे करता येते व समाजाचे उत्थान उडवून आणता येते. या दोन गोष्टी पुन:पुन्हा इतिहासात घडलेल्या दिसून आल्या आहेत. समाजाचे उत्थान घडवून आणण्याचे, समाज परिवर्तन करण्याचे ध्येय बाळगणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रेरणा देण्यास, त्यांच्या ठायी निष्ठा मुरवण्यास हे ऐतिहासिक सत्य पुरेसे आहे.
४.
आशा-निराशेच्या हेलकाव्यांच्या पलीकडे राहून सातत्याने, काम करत राहण्यासाठी इतिहासाचा एवढा आधार पुरेसा होत नाही. विशेषत: काळ प्रतिकूल असतो, तेव्हा इतरांच्या वेगळ्या कालखंडातील व समाजातील यशाचा हवाला पुरेसा पडत नाही.
प्रेरणा, स्फूर्ती, जिद्द टिकून राहण्यासाठी अगदी व्यक्तिगत असे अधिष्ठान आवश्यक असते. नेता, संघटन, विचारप्रणाली, चळवळ यावरील उत्कट पण आंधळी सर्वस्वार्पण वृत्ती हे असे एक प्रभावी अधिष्ठान असते. ही आपल्या परिचयाची गोष्ट आहे. अशा समर्पणातून प्राप्त होणारे सामर्थ्य व बळ न नाकारताही आपण असे म्हणू की, यात जो आंधळेपणा व कडवेपणा असतो, ते एक गंभीर न्यून आहे. न्यून कोणत्या अर्थाने? तर आंधळा कडवेपणा क्रूर दडपणुकीस, अन्याय विषमतेस जन्म देतो. याचा अनुभव आपणास आजही राजकीय व सामाजिक जीवनात येतो आहे.
कार्यकर्त्यांच्या निष्ठेची, प्रेरणेची, जिद्दीची पर्यायी बैठक कोणती असू शकते, आणि असावी? मानवमात्राविषयीचा आस्तिक्यभाव हे कार्यकर्त्यांच्या निष्ठेचे अधिष्ठान असावे, ही गोष्ट सर्व दृष्टींनी योग्य व इष्ट आहे.
माणूस मुळात चांगलाच आहे, असतो, परिस्थिती वा अज्ञान त्याला बिघडवते, अशी समजूत म्हणजे आस्तिक्यभाव नव्हे. ही समजूत भाबडी व खोटी आहे, हे सत्य आहे. मनुष्य स्वभाव प्रकृती म्हणजे सुष्ट व दुष्ट यांचे एक संमिश्रण आहे. ईश्वर व सैतान या दोन्ही सत्य संकल्पनांची निर्मिती त्याने स्वत:च्या अंतरंगात डोकावूनच केली आहे. तोच ईश्वरही आहे आणि तोच सैतानही. मग आस्तिक्यभावाची आधारशिला कोणती, असा प्रश्न उपस्थित होईल. आदिम कालापासून माणसे सुष्ट-दुष्ट, उचित-अनुचित, पाप-पुण्य, सत्य-असत्य असा भेद करत आली आहेत. आणि समष्टीच्या (म्हणजे त्या काळी टोळीच्या) ऐक्याचा, समृद्धीच्या हिताच्या कसोटीवर हा भेद केला गेला आहे, असे दिसते. हा भेद करत असताना असा भेद करणे हे व्यक्तीच्याही भल्याचेच आहे अशीही धारणा आढळते. आजही माणसे हे सर्व करतात. या शब्दांच्या व्याख्या, त्यांचा आशय यांची अधिक प्रगल्भ व काटेकोर स्पष्टता आज तत्त्वज्ञ कसोशीने करत असले तरी भेदरेषा जवळजवळ त्याच राहिल्या आहेत. हे सर्ववाचित्व इतके आश्चर्यकारक आहे की, तत्त्वज्ञ व शास्त्रज्ञ आज असे सुचवत आहेत की, भाषा ही जशी मानवी मेंदूच्या रचनेशीच अंगभूत निगडीत क्षमता आहे, तशीच नैतिक-अनैतिक भेद करण्याची क्षमताही. यात सुचवायचे असे की, मानवप्राण्याचे प्राणिजाती म्हणून अस्तित्व टिकवून धरण्यामध्ये या नैतिक-अनैतिक भेद करण्याच्या क्षमतेचा फार घनिष्ठ व आवश्यक असा संबंध आहे. माणसाची स्वभाव प्रकृती संमिश्र आहे, व तो कोणत्याही दिशेने जाऊ शकतो, पण सुष्ट काय, नैतिक काय, याची जाण त्याच्या ठायी जणू उपजतच असते. स्वत:च्या दुष्ट प्रवृत्तींचे नियमन करून सुष्टतेचा परिपोष करण्याची गरज त्याला अंतर्यामी मान्य असते, आणि अनैतिक वर्तनाने त्याच्या ठायी अपराधीत्वाची बोच निर्माण होते. म्हणजेच नैतिकतेचे, सदभावाचे आवाहन त्याच्यापर्यंत पोचते व अशा आवाहनास प्रतिसाद देण्याची क्षमता त्याच्या ठायी अंगभूत असते. माणसासंबंधीचे हे सर्ववाची सत्य हीच आस्तिक्यभावाची आधारशीला आहे.
माणसाबद्दलच्या या चिरंतन सत्याचा उच्चार संत महात्म्यांनी तर प्राचीन काळापासून केला आहेच. अक्षर साहित्यामध्येही त्याची प्रचिती आपणास येतेच. पण आज वैज्ञानिक रीतींचा अंगिकार करून मानवाच्या स्वभावप्रकृतीचा जो काही अभ्यास झाला आहे, त्यातून प्राप्त झालेले विज्ञानही या सत्याकडे निर्देश करत आहे. भाषेच्या निर्मितीच्या क्षमतेखेरीज जसे माणसाला माणूसपण प्राप्त झाले नसते, तशीच गोष्ट सुष्ट-दुष्ट, नैतिक-अनैतिक, सुंदर-असुंदर असा भेद करण्याच्या क्षमतेची.
५.
‘मातीतून माणसे’ निर्माण करण्याची किमया आता समजू शकते. माणसाच्या मूळ स्वभाव-प्रकृतीत एकाएकी फरक पडतो असे नाही. त्याच्यातील विधायक पुरुषार्थी, नि:स्वार्थी, उदात्त अंशाला आवाहन करून त्यांचा प्रतिसाद मिळवण्यात ज्यांना यश येते, ते ‘मातीतून माणसे’ निर्माण करतात, असे म्हणता येते. ही क्षमता या थोर नेत्यांच्या ठायी कशामुळे उत्पन्न होते? त्या त्या वेळच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांच्या हृदयाची पकड घेणारे ध्येय लोकांसमोर ठेवण्यात, भविष्याचे दर्शन घडवण्यात त्यांना यश येते. हे ध्येय साकार करण्यात त्यांनाही एक महत्त्वाची भूमिका पार पाडावयाची आहे आणि ते ती पार पाडू शकतात, असा आत्मविश्वास लोकांमध्ये ते निर्माण करू शकतात. नेत्याकडून अशी हृदयाची पकड घेतली जाते आणि नेता व अनुयायी\लोक यांच्यात परस्पर विश्वासाचे नाते प्रस्थापित होते, तेव्हा लोक एक वेगळी उंची गाठतात. आस्तिक्यभावाने जे आवाहन केले गेलेले असते आणि जो विश्वास प्रकट केला गेलेला असतो, त्याला लोकांचा हा प्रतिसाद असतो.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
समाज परिवर्तनासाठी कार्य करणारा प्रत्येक कार्यकर्ता थोर नेता नसतो, ही गोष्ट खरी, पण तो आणि सभोवतालची जनता यांच्यात हीच प्रक्रिया तेवढ्याच प्रभावीपणे घडू शकते. उच्च कोटीचे नेतृत्व गुण नसतील तर त्याच्या कार्याने साऱ्या समाजाला वेगळे वळण मिळणार नाही, समाजरचना वा व्यवस्था आमूलाग्र पालटणार नाही, समाजाचे उत्थान घडून येणार नाही. पण त्याच्या कार्यक्षेत्रात त्याच्या व्यक्तित्वाने व कार्याने तो समाजात सुसंस्कृततेचा, माणुसकीचा परिपोष करत राहील. समाज परिवर्तनाची परिभाषा न वापरता, आपल्या कार्याविषयी असा कोणताही दावा न करता आस्तिक्यबुद्धीने इतरांच्या उपयोगी पडण्याची गोष्ट नाना परींनी करणारी माणसे समाजात असतात. आणि त्यांच्या असण्याने, त्यांच्या जीवन जगण्याच्या रीतीमुळे समाजजीवन सुसंस्कृत, माणुसकीसंपन्न बनवण्यात व टिकून राहण्यात फार मोठी मदत होत असते, हा आपला नित्याचा अनुभव आहे. किंबहुना समाजातील अधिकात अधिक माणसांच्या स्वभावात, व्यक्तित्वात आस्तिक्यभाव रुजवणे, तो दृढ व सक्रिय करणे, ही समाज परिवर्तनाची अखंडितपणे पार पाडत राहण्याची प्रक्रिया आहे.
स्वत:च्या अंतरंगामध्ये डोकावून पाहिले असता आपल्यातील सुष्ट व दुष्ट, ईश्वर व सैतान दोहोंचे स्वच्छ दर्शन माणसाला घडते. या दर्शनाच्या शेवटी स्वत:च्या ठायी असलेल्या चांगुलपणावर आणि ईश्वरी अंशाचा परिपोष करण्याच्या स्वत:च्या क्षमतेवर जो श्रद्धा ठेवतो, तोच आस्तिक्यभावाने इतरही माणसांच्या चांगुलपणावर, त्यांच्या चांगले बनण्याच्या, वागण्याच्या क्षमतेवर श्रद्धा ठेवू शकतो.
आस्तिक्यभावसंपन्न व्यक्तित्व हे असे मुळातच आशावान, श्रद्धावान असते. जोडीला ते क्षमाशीलही असते. स्वत:च्या व इतरांच्या ठायी असलेल्या दुष्टतेपलीकडे सदैव अक्षुण्ण असणाऱ्या चांगुलपणाची डोळस घेण्याची आज मोठी निकड आहे. जाण अशा व्यक्तीमध्ये क्षमत्वबुद्धी निर्माण करते. अशी व्यक्ती क्षणिक आशा-निराशेच्या हेलकाव्यांपलीकडे सदैव आशावान असते. चांगुलपणाची कास तिच्याकडून कधीच सुटत नाही.
विज्ञानयुगाच्या काळात समाजपरिवर्तनाच्या चळवळीचे व चळवळीतील कार्यकर्त्यांच्या व्यक्तित्वाचे अधिष्ठान आस्तिक्यभाव हेच असायला हवे.
हा मूळ लेख ‘आस्तिक्यभाव’ या नावाने ‘स्पंदन’च्या १९८६ च्या दिवाळी अंकात प्रकाशित झाला आहे.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment