अजूनकाही
या जगातील पहिला एकपात्री कार्यक्रम करणारा कलाकार म्हणजे महर्षी नारदमुनी. त्रिखंडात संचार करत मुखानं ‘नारायण नारायण’चा जप करत, निरनिराळ्या कथा, वार्ता ऐकवणारा पहिला कलावंत. त्या काळात दृक्श्राव्य माध्यम नव्हतं. त्यामुळे आपल्या अमोघ आणि रसाळ वाणीतून, वृत्तांत कथन करत, सर्व श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणं, यात त्यांचा हातखंडा. हाच त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून, पुराणकाळापासून आजमितीस कीर्तनकार या कलावंतानं भगवंताचं नामस्मरण करत, गोष्टी, कथा, आख्यान सांगायला सुरुवात केली. आणि आजमितीस ते नारदाची गादी अभिमानानं पुढे चालवत आहेत. पूर्वी पुरुषांची यात मक्तेदारी होती. कालांतरानं स्त्रियांनीही कीर्तन करायला सुरुवात केली. पुरुषांइतकंच स्त्रियांचं कीर्तनही रसाळ होऊ लागलं. मुळात स्त्री म्हणजे माया, ममता यांचा मूर्तीमंत पुतळा. त्यामुळे त्यांचं कीर्तन काकणभर सरस रंगू लागलं.
सांगायचा मुद्दा हा की, काल जवळ जवळ ४० वर्षांनी मंदिरामध्ये कीर्तन ऐकायला गेलो. मुंबईतल्या शिवाजी पार्कच्या श्री उद्यान गणेश मंदिरात काल दुपारी श्रीगणेश जन्माचं सौ. शिल्पा पटवर्धन यांचं कीर्तन होतं. स्वच्छ, स्पष्ट उच्चार, रसाळ वाणी आणि मधुर आवाज, संगीताची उत्तम जाण, या जोरावर त्यांनी छान कीर्तन केलं.
मन एकदम भूतकाळामध्ये गेलं. लहानपणी मी आईबरोबर कीर्तनाला जात असे. गिरगावामध्ये काळाराम व गोराराम मंदिर, व्यंकटेशाचं मंदिर, फडके श्रीगणपती मंदिर इथं नियमित कीर्तनं होत असत. तसंच शांतरामाच्या वाडीत कोपरकर बुवा दरवर्षी आठ दिवस दासनवमीचा उत्सव करीत, तिथंही अनेक सुश्राव्य कीर्तनं ऐकली. राष्ट्रीय कीर्तनकार गोविंदस्वामी आफळे, कोपरकरबुवा, प्रकाशकरबुवा, कवीश्वरबुवा, मालगुंडकरबुवा, दासगणू महाराजांचे शिष्य अभ्यंकरबुवा, श्रीमती गोखलेताई, श्रीमती बापटताई, इत्यादींची सुश्राव्य कीर्तनं ऐकली. सु. ग. शेवडे यांची रसाळ प्रवचनं ऐकली. त्यांची भारत-पाक लढाईमधील शूर वीरांवरील ‘१९७१चे अभिमन्यू’ ही व्याख्यानमाला आजही जशीच्या तशी स्मरणात आहे.
..................................................................................................................................................................
अधिक माहितीसाठी पहा - सर्व प्रकारच्या कट्टरतेला नाकारणाऱ्या ‘इन्शाअल्लाह’ या अभिराम भडकमकर यांच्या बहुचर्चित कादंबरीवरील ‘परीक्षण’ स्पर्धा
..................................................................................................................................................................
पूर्वरंगामध्ये कीर्तनकारबुवा एखादा चार ओळींचा अभंग घ्यायचे आणि त्याच्या प्रत्येक ओळींचा अर्थ सोप्या भाषेत समजावून सांगायचे. मग विठ्ठल, गणपती, गुरू महाराज, इत्यादींचा गजर व्हायचा. त्यानंतर त्या दिवशीच्या कथेला किंवा आख्यानाला सुरुवात व्हायची. ती एखादी पौराणिक गोष्ट असायची. त्यात आम्हा मुलांना भारी रस, कारण गोष्ट ऐकायला मिळायची. शेवटी आख्यान संपलं की, ‘हेची दान देगा देवा’ व्हायचं आणि नंतर कीर्तन समाप्त व्हायचं. त्यानंतर आरतीचं दर्शन घेऊन निघायचं. क्वचित प्रसंगी गूळ-खोबरं किंवा गूळ-शेंगदाण्याचा प्रसादही मिळायचा. तो मला सर्वांत प्रिय होता.
काही बुवांना संगीताचं चांगलं ज्ञान होतं. ते मग आपली गायकी दाखवण्यासाठी नाट्यसंगीत (पण देवाची आराधना करणारे पद) आळवून गायचे. श्रोतेही खूश आणि बुवासुद्धा खुश. पण, मला आश्चर्य वाटायचं की, चातुर्मासाच्या कीर्तनात एकच आख्यान बुवा चार महिने थोडी थोडी गोष्ट सांगत पुरवायचे. त्यावरून आजकालच्या टीव्हीवरील सिरियलच्या रोजच्या भागांची (Daily Soaps) आठवण होते.
पूर्वरंगातील अभंगही चार दिवस चालवून, वेगवेगळे दाखले देऊन, सांगितला जायचा. त्यावरून मला आमच्या शाळेतील, संदर्भासहीत स्पष्टीकरण द्या, याची आठवण यायची. कधी कधी निखळ, नर्म विनोदसुद्धा ऐकायला मिळायचे. विनोद संपला की, बुवा पुन्हा ‘रामकृष्ण हरी, वासुदेव हरी’वर येऊन पोचायचे.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
शेवटच्या दिवसाचं लळिताचं किंवा काल्याचं कीर्तन मला फार प्रिय. कारण त्या दिवशी भरपूर आणि वेगवेगळ्या प्रकारचा प्रसाद मिळायचा. काय नाही ऐकलं कीर्तनात! पुराणातील गोष्टींपासून, इतिहासातील वीरपुरुष, संत, महात्मे, यांची चरित्रं समजली, पण आफळेबुवा सारख्यांकडून आपल्या क्रांतिकारकांच्या शौर्य कथाही ऐकायला मिळाल्या. ते जेव्हा ‘जय’ करायला सांगत, तेव्हा सर्व ताकद काढून आम्ही मुलं ओरडायचो. ‘पंढरीनाथ महाराज की जय, राजाधिराज रामचंद्र महाराज की जय, पवनसुत हनुमान की जय, गो माता की जय, भारतमाता की जय, सनातन हिंदू धर्म की जय, धर्म की जय हो, अधर्म का नाश हो, प्राणियों मे सद्भावना हो, हरहर महादेव...’
अंगावर नुसता रोमांच उभा राहायचा. आजही शिल्पाताईंच्या कीर्तनात मी मास्क आडून का होईना, पण खूप ओरडून घेतलं. तास-दीड तास कसा गेला, कळलंच नाही. एक अद्भुत आणि अलौकिक आनंद मिळाला.
आज मागे वळून पाहताना जाणवतंय की, या प्रवचनानं, कीर्तनानं नकळत माझ्यावर आणि एकंदरच आमच्या पिढीवर चांगले संस्कार केले. सर्वांशी प्रेमानं वागा, कुणाचं वाईट चिंतू नका, ईश्वरावर श्रद्धा असू दे, तो सदैव पाठीशी असतो, अशा शिकवणी न कळत मिळाल्या. आम्हाला संस्कार वर्गात जायची गरज पडलीच नाही, उलट हे कीर्तनकार, प्रवचनकार हेच एक प्रकारचे संस्कारवर्ग होते. आणि त्यामुळेच वेडेवाकडे वागण्याचा विचार कधी मनात आला नाही, अनेक संकटांना धैर्यानं तोंड दिलं. त्या शिदोरीवरच ३८ वर्षांची नोकरी निष्कलंक आणि निर्विघ्न पार पडली.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
पण सध्या कीर्तन, प्रवचन ऐकायला मिळणं दुर्मीळ होत चाललं आहे. हे कलावंत सन्मानानं जगले पाहिजेत. आपण त्या दृष्टीनं काळजी घ्यायला हवी. एक जण म्हणाले, कीर्तनकार हल्ली भरपूर बिदागी घेतात म्हणे! काय चूक आहे, त्यांनाही घरदार आहे. आपण सहकुटूंब सिनेमा पाहायला मल्टिप्लेक्समध्ये गेलो, तर चार जणांच्या कुटुंबावर सहज दोन-तीन हजार खर्च होतात आणि मुले नको ते शिकून घरी येतात. पण, आपल्या धर्माची परंपरा आणि पताका फडकत ठेवून, संस्कार करण्याचं काम करणाऱ्या प्रवचनकार, किर्तनकार यांना बिदागी देताना हात आखडता का घ्यायचा? इतर धर्मातील धर्मप्रचारकांची काय बडदास्त ठेवली जाते, जरा पहावी. मग आपण का दुर्लक्ष करतो? असो.
मला मात्र काल खरंच स्वर्गीय आनंद मिळाला. एकदा तुम्ही सर्वांनी मुद्दाम वेळ काढून, कीर्तनाला जाऊन तर बघा...
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment