अजूनकाही
१. अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस व्ही. के. शशिकला यांची तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदी नियुक्ती होणार, हे आता पक्कं झालं आहे. पक्षाच्या आमदारांच्या बैठकीत विधिमंडळाच्या नेत्या म्हणून त्यांची निवड झाली आहे.
चला, आता अम्मा म्हणून कोणाच्या पायावर लोटून घ्यायचं, कोणाचे उत्तुंग कटआउट उभे करायचे, कोणाच्या पायाशी पायपोसापेक्षा वाईट वागणूक प्रेमाने मिळवायची आणि कोणाच्या मृत्यूनंतर आत्महत्या करायची, हे सगळे प्रश्न सुटले एकदाचे!
……………………………………
२. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमुळे भाजपची मुंबईतील ताकद वाढली. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीत अनेक प्रभागांमध्ये भाजपची थेट लढत शिवसेना आणि काँग्रेसविरुद्ध आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शिवसेना आणि काँग्रेसने मॅचफिक्सिंग केली आहे. या दोन्ही पक्षांनी भाजपला टक्कर देण्यासाठी एकमेकांना पूरक असे उमेदवार दिले आहेत. ४२ प्रभागांमध्ये काँग्रेस आणि शिवसेनेने मॅच फिक्सिंग केली आहे. : मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार
बायदवे, विषय निघालाच आहे, तर जरा सांगाल का शेलारमामा की मागच्या निवडणुकांमध्ये भाजपची ताकद एकदम कशी काय वाढली? राष्ट्रवादीच्या 'निवडून येण्यास सक्षम' नेत्यांना कमलदलांवर विराजमान करूनच ना? आताही गावोगावचे भ्रष्टवादी गुंड गोळा करताय, तर त्यांना टिपून काढण्यासाठी 'सामना' करायला धनुष्य कोणाच्या तरी 'हाता'त जाणारच ना?
……………………………………
३. नोटाबंदीच्या माध्यमातून मी चुकीचे काम करणाऱ्यांचे स्क्रू टाईट केल्याने विरोधी पक्ष माझ्यावर चिडले आहेत. : पंतप्रधान नरेंद्र मोदी
आपल्याच अकाउंटमधून पैसे काढण्यासाठी सर्वसामान्य लोक बँकांबाहेर आणि एटीएमबाहेर रांगा लावत होते, चोरांसारखी कागदपत्रं सादर करत होते आणि स्वत:ला सीबीआय अधिकारी समजणाऱ्या बँक अधिकाऱ्यांच्या अप्रस्तुत प्रश्नांना उत्तरं देत होते, ते सगळे चुकीचं काम करत होते, ही मौलिक माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. स्क्रू तर त्यांचेच टाइट केले होते तुम्ही. एखाद्याचा 'स्क्रू ढिला' आहे, असा शब्दप्रयोगही कानावरून गेलाच असेल ना तुमच्या?
………………………………………….
४. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र जाहिरातीमध्ये वापरल्याप्रकरणी ग्राहक व्यवहार, अन्न आणि पुरवठा खात्याने पेटीएम आणि रिलायन्स या कंपन्यांना नोटीस पाठवली आहे. मोदींचे छायाचित्र छापण्यापूर्वी परवानगी घेतली होती का, अशी विचारणा या खात्याने केली आहे.
अच्छा, त्या अँटिलियामधून गडगडाटी हसण्याचा आवाज येतोय तो त्यामुळे होय. मुकेश अंबानी आणि पेटीएमचे चाळीस टक्के मालक असलेल्या चिनी 'अलीबाबा'चे सर्वेसर्वा जॅक मा हे दोघे म्हणे एकमेकांना सारखे फोन करून नुसते ख्या ख्या हसत होते दिवसभर. घाबरा रे घाबरा जरा; पटकन् सर्जिकल स्ट्राइक करून मोकळे होतील आमचे डेअरडेव्हिल पंतप्रधान, तेव्हा कळेल. पाचपाचशे रुपये तयार ठेवा दंडाचे मुकाट्याने.
…………………………………………………..
५. रक्तातील साखर वाढल्याने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल विश्रांती आणि निसर्गोपचार घेणार.
केजरीवालांच्या शरीरप्रकृतीची काही वेगळी तपासणी करायला हवी. ते सतत काँग्रेसपासून भाजपपर्यंत प्रत्येक पक्षाच्या नेत्यांबद्दल कटुशब्द बोलत असतात. सर्व पारंपरिक पक्षांचे नेते आणि अनुयायी त्यांच्या नावाने कडाकडा बोटं मोडत असतात. या कडू कारल्यासारख्या गृहस्थाच्या रक्तात साखर येते तरी कुठून?
editor@aksharnama.com
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment