शब्दांचे वेध : पुष्प सव्विसावे
(८ फेब्रुवारी २०२१ रोजी प्रसिद्ध झालेल्या ‘कोणत्याही मर्त्य मानवाची प्रतिष्ठा तो गेल्यावर काही काळानं विलयाला जाते’ या लेखाचा हा उत्तरार्ध आहे.)
संत कबीरदास यांचं एक सुप्रसिद्ध भजन आहे - ‘कौन ठगवा नगरिया लूटल हो’. त्यातलं एक कडवं असं आहे -
आये जमराजा पलंग चढ़ी बैठा,
नैनन अंसुआ छूटल हो,
कौन ठगवा नगरीया लूटल हो |
म्हणजे, तुम्ही पलंगावर लेटून झोप घेत असताना यमराज केव्हा तिथे येतात, पलंगावर चढतात, आणि केव्हा तुमचे प्राण घेऊन पसार होतात, हे तुम्हाला कळतही नाही. त्या वेळी मागे राहणाऱ्यांच्या डोळ्यांतले दुःखाश्रू फक्त तेवढे बाकी राहतात. (आपल्यापैकी बहुतेकांनी हे भजन ऐकलं असेलच, पण जर नसेल ऐकलं तर पं. कुमार गंधर्व यांच्या स्वरातून प्रकट झालेली ही अप्रतिम पेशकश ऐका, कान तृप्त होतील.
आपल्या आध्यात्मिक परंपरेतील ‘कठोपनिषद’ या ग्रंथानुसार वाजश्रवस् ऋषींचा मुलगा नचिकेत याला त्याचे वडील यमाला (मृत्यूदेवतेला) दान करतात. तो यमाच्या घरी जातो, पण यम घरी नसल्यामुळे त्याला तीन दिवस उपाशी रहावं लागतं. यमाला याचं फार वाईट वाटतं, म्हणून तो नचिकेताला तीन वर देतो. यातल्या तिसऱ्या वराच्या पूर्ततेसाठी नचिकेत यमाला मृत्यूचं रहस्य विचारतो. मानवाच्या मृत्यूनंतर काय होतं, हे जाणून घ्यायची त्याला जिज्ञासा असते. आधी जराशा नाखुशीनं पण नंतर आनंदानं यमराज त्याला ब्रह्मज्ञान देतात. मृत्यूचं रहस्य या ब्रह्मज्ञानातच लपलेलं असतं. हे रहस्य कळल्यावर नचिकेत ऐहिक पाशातून आणि भवबंधनातून बाहेर निघालेला एक मुक्तात्मा म्हणून पृथ्वीतलावर आपल्या वडिलांच्या घरी परततो, अशी ही कथा आहे.
हिंदू अध्यात्मशास्त्रात यमानं नचिकेताला केलेल्या या उपदेशाचं फार महत्त्व आहे. एका ऋषीच्या शापानं पुढच्या सात दिवसांनंतर आपला मृत्यू होणार आहे, हे कळल्यावर अर्जुनाचा नातू परीक्षित राजा यानंसुद्धा ऋषीमुनींच्या सत्संगातून मृत्यू म्हणजे काय हे जाणून घेतलं होतं, ज्यामुळे त्याचं मृत्यूबद्दलचं भय नाहीसं झालं, अशी कथा भागवतात आहे. ‘ऋग्वेदा’तल्या (१०:१२९) ‘नासदीय सूक्ता’ला ‘Hymn of Creation’ म्हणजे ‘निर्मितीचे स्तोत्र’ म्हणतात. अगदी त्याच्यापासून तर ‘भगवद्गीता’, ‘ज्ञानेश्वरी’सकट अनेक प्राचीन - अर्वाचीन वाङ्मयांत सृष्टीचं निर्माण, जीवन, मृत्यू, आणि मृत्यूनंतर काय, या गहन विषयांवर चर्चा केलेली अहे.
अन्य प्रस्थापित धर्मांमध्येसुद्धा मृत्यू या संकल्पनेवर सखोल चिंतन केलं गेलं आहे. मृत्यूनंतर पुढे काय होतं, याची उत्सुकता जगातल्या सर्वांनाच असते. भूताखेतांवरही विश्वास ठेवणारे अनेक लोक असतात. अतृप्त वासना घेऊन मेलेले लोक भूतयोनीत प्रवेश करतात, असं ते मानतात. स्वर्ग आणि नर्क याही समजुती अनेकांना आजही मान्य आहेत.
..................................................................................................................................................................
अधिक माहितीसाठी पहा - सर्व प्रकारच्या कट्टरतेला नाकारणाऱ्या ‘इन्शाअल्लाह’ या अभिराम भडकमकर यांच्या बहुचर्चित कादंबरीवरील ‘परीक्षण’ स्पर्धा
..................................................................................................................................................................
पण समजा तुम्ही नास्तिक आहात आणि या धर्म - अध्यात्मशास्त्रांवर, भुतांवर तुमचा विश्वास नसला तरीसुद्धा मृत्यू म्हणजे काय याविषयी तुमच्याही काही कल्पना असतीलच. त्यासाठी तुम्ही वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा आधार घेता. पण हे कुतूहल तुम्हालाही सतावतंच. ‘Matter is infinite, eternal, indestructible, and exists in infinite quantity’ असं जर तुम्हाला वाटत असेल तर मृतदेहाची राखरांगोळी किंवा माती झाली तरी कुठल्या ना कुठल्या वेगळ्या स्वरूपात तो अस्तित्वात राहू शकतो, हेही तुम्हाला पटू शकत असेल.
थोडक्यात काय, तुम्ही कोणीही असा - ‘बिग बॅंग थिअरी’वाले आणि उत्क्रांतीवादी वैज्ञानिक, Creationist म्हणजे देवानं या चराचर सृष्टीची, तिच्यातल्या समस्त जीवजंतूंची निर्मिती केली असं मानणारे, किंवा काहीच न मानणारे निहिलिस्ट; कधी ना कधी तरी मृत्यूवर तुम्ही विचार केला असण्याची दाट शक्यता आहे. वैज्ञानिक नजरेतून मृत्यू म्हणजे ‘death’ या विषयाचा शास्त्रीय अभ्यास करण्याच्या शास्त्राला ‘थॅनटॉलॉजी’ (Thanatology) असे म्हणतात. ग्रीक भाषेत ‘Thanatos’ (θάνατος) किंवा death.
कधीकधी मृत्यूवर मनुष्यत्व आरोपित केलं जातं. म्हणजे त्याला आपल्याला समजेल असं दृश्यरूप दिलं जातं. मानवाची कवटी आणि तिच्या सोबत असलेली क्रॉस आकारात (×) ठेवलेली दोन लांब हाडं या चिन्हाला मृत्यूचं प्रतीक मानलं जातं. ही एक मध्ययुगीन कल्पना असून या प्रतीकाला इंग्रजीत ‘death's head’ आणि जर्मन भाषेत ‘Totenkopf’ असं म्हणतात. एखादी व्यक्ती समजा तुम्हाला आवडत नसली, ती अत्यंत वाईट आहे, असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तिची तुलना साक्षात मृत्यूशी करू शकता. याचं उदाहरण म्हणून प्रसिद्ध आंग्ल कवी शेली याच्या या ओळी पहा -
I met Murder on the way--
He had a mask like Castlereagh--
Very smooth he looked, yet grim;
Seven blood-hounds followed him
(Percy Bysshe Shelleyच्या १८१९मध्ये लिहिलेल्या ‘The Mask of Anarchy : Written on the Occasion of the Massacre at Manchester’ यात या ओळी आहेत. यात ज्या ‘Castlereagh’ (कासलरे)चा उल्लेख केलेला आहे. त्याचं पूर्ण नाव Robert Stewart, 2nd Marquess of Londonderry किंवा Lord Castlereagh असं होतं. मूळचा आयरिश असलेला हा माणूस तत्कालीन ब्रिटिश राजकारणातला एक कुप्रसिद्ध नेता होता. व्यक्तीस्वातंत्र्य, कोणत्याही प्रकारचे बदल, आधुनिक विचार यांची त्याला नफरत होती. याच कारणासाठी त्यानं शेकडो लोकांवर अत्याचार केले. म्हणून सुधारणावादी लोक त्याचा अतोनात तिरस्कार करत. त्याला मृत्यूसमान लेखून शेलीनं या कवितेत त्याच्या नावानं शिमगा केलेला आहे. ‘Hate poetry’ किंवा तिरस्कारदर्शी काव्यात या कवितेचं आघाडीचं स्थान आहे.)
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
ग्रीक ‘Thanatos’ (θάνατος) ला इंग्रजीतले -ology हे उत्तरपद जोडून ‘Thanatology’ हा शब्द तयार झाला. -ology चे मूळ ग्रीक भाषेतल्या -logia (-λογια) या शब्दात आहे. त्याचा अर्थ बोलणे/वार्तालाप असा होतो. Thanatos हा प्राचीन ग्रीक पुराणातला एक प्रकारचा यमराजच. मनुष्यांना दिसणारं मृत्यूचं रूप. हाच शब्द पुढे जेव्हा लॅटिन भाषेत गेला, तेव्हा त्याचं नामकरण ‘Mors’ किंवा ‘Letum’ असं झालं. कारण रोमन लोकांच्या दंतकथांमध्येसुद्धा ‘Mors’ला मृत्यूदेवता मानलं गेलं होतं.
Thanatos आणि Mors या दोनही शब्दांपासून तयार झालेले अनेक शब्द इंग्रजी भाषेत आज प्रचलित आहेत. या लेखाच्या पूर्वार्धात मी ‘Euthanasia’ या शब्दाचा उल्लेख केला होता. Euthanasia म्हणजे दयामरण, मर्सी किलिंग. ग्रीक भाषेत याचा अर्थ चांगलं किंवा सु-मरण. Eu म्हणजे चांगलं, good. Thanatos म्हणजे मृत्यू ‘death’. अतीव, असह्य वेदनांनी तळमळणारा, तडफडणारा एखादा रुग्ण डॉक्टरांकडे दयामरणाची भीक मागतो. पण अजून तरी अशा याचनेला सरसकट मान्यता देता येत नाही. स्वेच्छेनं स्वीकारलेल्या दयामरणाला (एक प्रकारचं इच्छामरणच हे) फार कमी देशांची कायदेशीर संमती आहे. याचं कारण उघड आहे. या तरतुदीचा दुरुपयोग होण्याची शक्यता जास्त आहे. ज्या देशांत ‘Euthanasia’ला बेकायदेशीर मानलं जातं, तिथं अशा प्रकारानं पेशंटचा घडवून आणलेला मृत्यू हा हत्या किंवा खून मानला जातो. स्विट्झर्लंड या देशात Euthanasiaला काही अपवाद वगळता कायदेशीर केलं गेलं आहे. David William Goodal या नावाच्या १०४ वर्षीय ऑस्ट्रेलियन वैज्ञानिकानं दोन वर्षांपूर्वी १० मे २०१८ रोजी आपल्या निरोगी, पण दीर्घ जीवनाला कंटाळून स्विट्झर्लंडला जाऊन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तिथल्या डॉक्टरांच्या मदतीनं Euthanasiaच्या मार्गानं मृत्यूचा स्वीकार केला होता, हे अनेकांना आठवत असेलच.
मृत्यूच्या अवाजवी/अतिरेकी भयाला ‘थॅनटोफोबिया’ (thanatophobia) असं म्हणतात. ‘थॅनटॉप्सिस’ (thanatopsis) म्हणजे मृत्यूवर केलेलं (जसं एखाद्या कवितेतून) चिंतन. ‘जन पळभर म्हणतील हाय, हाय!’ हा भा. रा. तांब्यांचा thanatopsis आहे. ऑपसम, काही प्रकारचे साप, बेडकं, आणि मुंग्या, शार्क मासे यासारखे काही प्राणी शत्रूपासून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी मरणाचं ढोंग करतात. या खोट्या, कृतक मृत्यूला प्राणीशास्त्रात ‘thanatosis’ अशी संज्ञा आहे.
लॅटिनमधून इंग्रजीत आलेल्या मृत्यूविषयक शब्दांचीही संख्या बरीच आहे. MORS, MORI आणि MORT या तीन मूळ लॅटिन धातू-शब्दांचा अर्थ मरण, मृत्यू असा आहे. या तीन शब्दांपासून बनलेले हे इंग्रजी शब्द बघा. यातील अनेक शब्द बहुतेकांना माहीत असतील.
Remorse : रिमोर्स (पश्चात्ताप) आणि Remorseful रिमोर्सफुल (पश्चात्तापदग्ध) यांत mors आहे. याचा प्रत्यक्ष मरणाशी संबंध नसला तरी पश्चात्तापदग्ध व्यक्तीला मरणप्राय मानसिक वेदना होत असतात.
MORT पासून बनलेले शब्द आहेत --
Mortal - मर्त्य
Mortality - मृत्यूदर, मृत्यू पावू शकणारा
Mortally - ज्यामुळे मरण येईलच असा
Immortable / immortal / Immortality - अमर्त्य, अमरपद
Immortalize - एखाद्याला अमर करणे
Immortalism - आत्म्याच्या अमर असण्यावर विश्वास ठेवणारी विचारधारा
Immortelle - कायम, अविनाशी
Mortify / Mortification - मरण यावे अशी मनाची होणारी लाजीरवाणी, ओशाळवाणी
अवस्था, तसे करणे - होणे
Mortician - मॉर्टिशियन - अंत्यविधीची जबाबदारी ज्याच्यावर असते असा
व्यावसायिक माणूस
Mortuary - मॉर्च्युअरी - शवागार (यालाच ‘morgue’ (मॉर्ग) असाही प्रतिशब्द आहे. पण तो mori पासून तयार झाला आहे.)
Mortuous - मॉर्च्युअस - मृत्यूसदृश
Moribund - मॉरीबंड. हा शब्द moriपासून बनला आहे. याचा अर्थ मरणासन्न, शेवटच्या घटका मोजणारा, मृतप्राय. लाक्षणिक अर्थानं हे विशेषण एखाद्या संस्थेसाठी, विचारसरणीसाठी देखील वापरतात.
..................................................................................................................................................................
‘खिंडीत’ : शैक्षणिक जगताच्या अंतरंगाची विरूपता भेदकपणे उलगडणाऱ्या कथा
हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये ऑनलाईन खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5254/Khindit
..................................................................................................................................................................
याशिवाय post-mortem हा शब्द आपण नेहमी ऐकतो. खरं तर post-mortem examination असा संपूर्ण शब्द आहे. मृत्यूपश्चात केलेली देहाची परीक्षा, शवचिकित्सा. १८५०पासून तो वापरात आलेला आहे. यालाच ‘ऑटॉप्सी’ (Autopsy) असाही प्रतिशब्द आहे, पण त्याचा उगम मृत्यू्विषयक शब्दांतून झालेला नाही. प्राचीन ग्रीक भाषेतल्या αὐτοψία (autopsia)पासून तो बनला आहे. याचा अर्थ स्वतः बघणे, खात्री करून घेणे. मृत्यूचं नक्की कारण शोधण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर लोक स्वतः एखाद्या मृत देहाची चिरफाड करून तपासणी करतात, म्हणून हा शब्द post-mortem या अर्थानं वापरला जाऊ लागला. मृत्यूनंतर काही तासांनी मृत देह कडक होऊ लागतो. याला ‘रायगर किंवा रिगर मॉर्टिस’ (rigor mortis) अशी तांत्रिक संज्ञा आहे.
‘Mort’ या शब्दाचे खरं मूळ प्रोटो-इंडो-युरोपियन या अतीप्राचीन भाषेतल्या mer या धातूत आहे, असंही मानलं जातं. Mer म्हणजे घासणं, मरणं, इजा पोहचवणं. या धातूपासून अंशतः किंवा पूर्णपणे बनलेले आणखी काही शब्द आहेत - ambrosia; amortize; manticore; marasmus; morbid; mordacious; mordant; morsel; mortar; mortgage; murder; murrain; nightmare; इत्यादी.
एका तर्कानुसार मर किंवा मेर (Mer) हा शब्द संस्कृतमधून प्रोटो-इंडोयुरोपियनमध्ये आला. मृत, मृत्यू, मर्त्य, अमर्त्य यासारख्या संस्कृत शब्दांत हा ‘मर’ सापडतो. याखेरीज, अवेस्तन, पर्शियन, हिटाईट, आर्मेनियन, गॉथिक, आयरिश, लिथुएनियन, स्लॅवॉनिक, रशियन, आणि सर्बो-क्रोएशियन या व अन्य अनेक भाषांच्या जुन्या स्वरूपांत ‘मर’ म्हणजे मरण/मृत्यू या अर्थाचे, बरेचसे उच्चार साधर्म्य असणारे शब्द आहेत. हे सगळे त्या लॅटिन शब्दांचे नातलगच आहेत. इंग्रजीतल्या death, die, dead या शब्दांचं मूळ मात्र जर्मॅनिक भाषांमध्ये सापडतं. डच ‘dood’ आणि जर्मन ‘Tod’ या शब्दांचा हा भाऊ आहे. प्रोटो जर्मॅनिक भाषेतल्या dauthuzपासून तो बनला.
जगातल्या प्रत्येकच भाषेत डेथ/मरण/मृत्यू यासाठी आपापले स्वतंत्र शब्द आहेत. त्यातले युरोपियन भाषांतले काही ठळक शब्द असे - अल्बेनियन vdekje, बल्गेरियन смърт, झेक smrt, डॅनिश død, फिनिश kuolema, फ्रेंच décès, हंगेरियन halál, इटलियन morte, नॉर्वेजियन død, पोलिश śmierć, पोर्च्युगीझ morte, रशियन смерть [smert'], आणि स्पॅनिश muerte.
(स्वर्ग, नर्क, आणि भूत पिशाच्चांसाठी पण असेच अनेक शब्द प्रत्येक भाषेत सापडतात, पण त्यांच्याविषयी एक वेगळा लेख लिहावा लागेल.)
आतापर्यंत आपण मृत्यू/ मरण/मरणे यांबद्दलचे सभ्य किंवा औपचरिक शब्द बघितले. इंग्रजी ही एक फार लवचिक आणि नावीन्याच्या सतत शोधात असलेली भाषा असल्यामुळे तिच्यात मृत्यूविषयक अनेक अनौपचारिक शब्दांची आणि वाक्प्रचारांची देखील भरमार आहे. बरेच वेळा आपण ‘अमुक तमुक माणूस मेला’ असं स्पष्टपणे न बोलता तो स्वर्गवासी, कैलासवासी, वैकुंठवासी, ख्रिस्तवासी झाला, अल्लाह को प्यारा हो गया, असं म्हणतो. यात मृताविषयीचा आदर तर दिसतोच, पण ऐकणाऱ्यालाही त्यामुळे बरं वाटतं. हा एक सभ्य संकेत आहे. देह ठेवला, देहांत झाला, प्राणोत्क्रमण झालं, निधन झालं, ही सगळी ‘तो मेला’ याची हळूवार, नम्र रूपं आहेत. गुजराथीत यालाच ‘ओफ थयी गयो’ (off ऑफचं झालं ओफ) म्हणतात. (असभ्य बोलीत तो चेचला, खपला, खल्लास झाला, उसका गेम बज गया, ठार मेला असं सांगतात). अर्थ तोच, पण बोलण्याची तऱ्हा वेगळी.
इंग्रजीतही हाच न्याय वापरून अप्रिय गोष्टी ज्या सौम्य, मृदू शब्दांत सांगितल्या जातात, त्यांना ‘euphemisms’ म्हणतात. मृत्यूविषयक अशा अनेक युफमिझम्सनी इंग्रजी भाषा नटली आहे. Pass away, expire, depart, leave for heaveny abode, gone, go to reside with the morning star, yield the ghost, shuffle off the mortal coil, peg out, cash in one's chips, succumb, decease हे त्यातलेच काही पर्याय. एका अंदाजानुसार इंग्रजी भाषेत मृत्यूविषयक सुमारे एक हजार नवे जुने औपचारिक आणि अनौपचारिक शब्द आहेत. यातले काही विशेष परिणामासाठी तर काही विनोदनिर्मितीसाठी वापरतात.
मॉन्टी पायथन (Monty Python) नावाची एक फार गाजलेली विनोदी इंग्रजी मालिका होती. तिच्या एका भागात कॉकनी बोली बोलणारा लंडनचा एक माणूस पाळीव पशूपक्षी विकणाऱ्या दुकानात जातो आणि त्यानं नुकताच विकत घेतलेला पोपट मेला, याची तक्रार करतो-
Customer: 'E's bleedin' demised!
Owner: No no! 'E's pining!
Customer: 'E's not pinin'! 'E's passed on! This parrot is no more! 'E' as ceased to be! 'E's expired and gone to meet 'is maker! 'E's a stiff! Bereft of life, 'e rests in peace! If you 'adn't nailed 'im to the perch 'e'd be pushin' up the daisies! 'Is metabolic processes are now 'istory! 'E's off the twig! 'E's kicked the bucket! 'E's shuffled off 'is mortal coil, run down the curtain, and joined the bleedin' choir invisible!
(कॉकनी बोलीत ‘ह’ हा उच्चार करत नाहीत. म्हणून तो he, hadn't, his असं म्हणायच्या ऐवजी ई 'E, ऍडन्ट 'adn't , इज 'is असं म्हणतो.) ‘मेला, वारला’ यांच्या समानार्थी शब्दांची रेलचेल असलेला हा विनोद फार गाजला.
आपले हिंदी सिनेमावाले पण काही कमी नाहीत! त्यांच्यातही काही हुशार लोक आहेत. इंद्रकुमार दिग्दर्शित २००७ सालचा संजय दत्त, अर्शद वारसी यांचा ‘धमाल’ हा हिंदी चित्रपट किती लोकांनी पाहिला आहे? ही आहे तशी एक टुकार कॉमेडी, पण मी ती अनेकदा बघितली आहे. खरं तर जेव्हा जेव्हा मला टीव्हीवर हा सिनेमा दिसतो, तेव्हा तेव्हा मी तो न चुकता बघतो. कारण त्याच्यात दिवंगत विनय आपटे यांनी एक बहारदार कॅमिओ भूमिका (cameo role) केली आहे. फक्त चार-पाच मिनिटांच्या या आपल्या कामात त्यांनी काय जबरदस्त अदाकारी केली आहे म्हणून सांगू? ती बघायला मी नेहमीच तयार असतो. पण ते जाऊ द्या. हा चित्रपट सुरू झाल्यानंतर २९.४८ मिनिटांनी एका कार अपघातात जखमी झालेला प्रेम चोपड़ा मरतो आणि त्या वेळी तो एका प्लास्टिकच्या बकेटला लाथ मारतो, असं दृश्य आहे. इंग्रजी भाषेचा गंध नसलेल्या किंवा अगदी प्राथमिक इंग्रजी जाणणाऱ्या किती लोकांना यातला सूक्ष्म विनोद कळला असेल, असा प्रश्न मला नेहमी पडतो. इंद्रकुमारनं दिग्दर्शक म्हणून या ठिकाणी फारच बारीक कामगिरी केली आहे. (मेल ब्रुक्स नावाच्या प्रसिद्ध हॉलिवूड निर्माता/दिग्दर्शकाच्या विनोदी चित्रपटांत अशा प्रकारच्या गंमती बघायला मिळतात. ही जर इंद्रकुमारची स्वतःचीच कल्पना असेल, त्यानं जर याबाबतीत उचलेगिरी केली नसेल तर त्याला खरंच मेल ब्रुक्सच्या तोडीचा मानावा लागेल!)
‘To kick the bucket’ या इंग्रजी अनौपचारिक वाक्प्रचाराचा अर्थ मरणे, प्राण सोडणे, असा होतो. धमालच्या दिग्दर्शकानं आपल्या बुद्धीचा कौशल्यपूर्ण वापर करून हा वाक्प्रचार प्रेम चोपड़ाने त्या बादलीला मारलेल्या लाथेच्या प्रतीकातून सूचित करून तो मेला हे सांगितलं आहे. तुम्हाला हा चित्रपट बघायचा असेल तर या दुव्याला भेट द्या -
या वाक्प्रचाराची व्युत्पत्ती अशी आहे - ‘bucket’ (बादली) या शब्दाला सोळाव्या शतकात ब्रिटिश इंग्रजीत आणखी एक अर्थ होता. एखादी वस्तू टांगायला वापरलेल्या लाकडाच्या आडव्या पट्टी किंवा काडीला देखील तेव्हा ‘bucket’ म्हटलं जायचं. (तराजूची दोन्ही पारडी ज्या आडव्या पट्टीला बांधतात, तिच्यासारखी.)
शेक्सपिअरच्या १५९७च्या ‘Henry IV Part II’ मधला हा उल्लेख बघा - “Swifter then he that gibbets on the Brewers Bucket.” (gibbet म्हणजे टांगणे.)
अशीच बकेट प्राण्यांच्या कत्तलखान्यातही वापरली जायची. ज्या प्राण्याला खाटिक मारणार आहे, त्याचे समोरचे दोन्ही पाय तो या पट्टीला बांधून त्या प्राण्याला उभं करायचा आणि मग सुरा चालवायचा. प्राण जाताना तो प्राणी सुटायची धडपड करायचा, त्याचे बांधलेले पाय या पट्टीवर प्रहार करायचे - म्हणून ‘किक द बकेट’ असं झालं.
‘तो मेला’ असं सुचवण्यासाठी पी. जी. वुडहाऊस ‘he handed in his dinner pail’ अशा वेगळ्याच वाक्प्रचाराचा वापर करतो. आपण ज्याला टिफिन किंवा लंच बॉक्स म्हणतो (जेवणाचा डबा) त्याला पूर्वी इंग्लंडमध्ये ‘डिनर पेल’ म्हणायचे. बकेटच्या आकाराची ही डिनर पेल कामगारवर्गात जास्त लोकप्रिय असे. एखादा कामगार मेला किंवा त्यानं कामावर येणं बंद केलं की, त्यानं आपली डिनर पेल मालकाला परत (हॅंडेड इन) केली आहे, असं समजलं जाई. त्यावरून हा वाक्प्रचार अस्तित्वात आला.
या मृत्यूविषयक लेखाचं सार काय? माझ्या मते प्रियजनांच्या मृत्यूने जरी आपल्याला शोक, दुःख होत असलं तरी ती एक तात्पुरती मानसिक अवस्था असते. प्रत्येकाच्या शोकाची तीव्रता वेगवेगळी असू शकते. दुःखावर मात करायला लागणारा अवधीही व्यक्तीपरत्वे बदलू शकतो. पण कधी ना कधी तरी आपण त्यातून बाहेर पडतोच, नव्हे, आपल्याला तसं करावंच लागतं. आपल्या स्वतःच्या मृत्यूचंही असंच आहे. जे एक ना एक दिवस होणारच आहे, त्याला (इतकं) का घाबरायचं? हे तत्त्वज्ञान आहे आणि ते अंगिकारणं आणि त्यानुसार वागणं हे फार कठीण आहे, हे मला माहीत आहे. कोविडमुळे येऊ शकणाऱ्या (संभाव्य) मृत्यूच्या भीतीनं मीसुद्धा सावधगिरी बाळगतोच. आमच्या नागपुरी टपोरी भाषेत सांगायचं तर सध्या आपल्या सगळ्यांचीच ‘हातभर फाटली आहे’, आपण जाम टरकलो आहोत. अशा वेळी ‘गीता’, ‘ज्ञानेश्वरी’ आपल्या हाताशी असली तरी आपण त्यातून कितपत दिलासा मिळवू शकतो? हे आपल्या प्रत्येकाच्या मानसिक तयारीवर आणि ताकदीवर अवलंबून आहे.
आपला मृत्यू आता जवळ आला आहे, त्याचा स्वीकार केलाच पाहिजे, हे प्राण्यांकडून शिकता येतं. जगण्याची धडपड तर तेही करतात. पण कधीतरी त्यांच्या आयुष्यात एक क्षण असा येतो की, त्या वेळी ते ही सारी धडपड बंद करतात आणि शांतपणे मृत्यूला कवटाळतात. या बाबतीत माझा गुरू आहे माझा बॉबी - माझं पाळीव मांजर- ज्यानं चौदा वर्षं जगून म्हातारपणी अत्यंत संयमानं, शांततेनं मरणाचा स्वीकार केला. मी मरेन तेव्हा त्याचा हा कित्ता मला गिरवता येईल का? इच्छा तर आहे, प्रत्यक्षात काय होईल ते आज माहीत नाही.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
मृत्यूला आनंदानं सामोरे जाणारे, त्याची अपरिहार्यता स्वीकारणारे असेच अनेक लोकही आहेत. जगभरातल्या अनेक समाजांत समारंभपूर्वक, वाजत गाजत, शोक न करता मृतदेहांना स्मशानभूमीपर्यंत पोहचवण्याची प्रथा असते. ‘Death is a celebration, not a tragedy’ असं बरेच लोक मानतात. ओशो रजनीश म्हणतात, “Death is not the end, but the beginning of a new life. Yes, it is an end of something that is already dead. It is also a crescendo of what we call life, although very few know what life is. They live, but they live in such ignorance that they never encounter their own life. And it is impossible for these people to know their own death, because death is the ultimate experience of this life, and the beginning experience of another. Death is the door between two lives; one is left behind, one is waiting ahead.”
या बाबतीतला शेवटचा शब्द आपल्या संत नामदेव महाराजांचा आहे. त्यांचा एक प्रसिद्ध अभंग आहे, जो तुम्ही अनेकदा ऐकला असेल. सुरेश वाडकरांनी लयीशी अत्यंत लडिवाळपणे खेळत खेळत आपल्या मधुर आवाजात नामदेवांच्या या शब्दांना जिवंत केलं आहे -
काळ देहासी आला खाऊ
आम्ही आनंदे नाचू गाऊ
‘भय इथले संपत नाही’ हे तर खरंच आहे, पण माझ्या स्वतःपुरतंच बोलायचं झालं तर निदान प्रत्यक्ष मरणाच्या वेळी तरी माझी मनःस्थिती संत नामदेवांनी सांगितल्याप्रमाणे ही अशी आनंदी असेल, अशी आशा आहे.
..................................................................................................................................................................
लेखक हर्षवर्धन निमखेडकर वकील आहेत. वुडहाऊसचे अभ्यासकही.
the.blitheringest.idiot@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment