अजूनकाही
ती मला अगदी अचानकच दिसली. सकाळी बागेला पाणी घालताना एका गच्च झाडोऱ्याच्या आळ्यात, कोपऱ्यात काहीतरी पांढरेशुभ्र दिसलं. वाकून पाहिलं तर कोपऱ्यात बसलेली ती दिसली. कुशीमध्ये तसाच पांढरा लोकरीचा गोळा होता. छोटे छोटे कान, छोटीशी शेपटी... दूध पीत आईच्या कुशीत निवांत पडला होता तो. आमच्या घरात अनाहुत आलेले हे पाहुणे बघून अतिशय आनंद झाला. पाणी घालायचं सोडून देऊन मी मनुताईकरता दुधाची वाटी आणायला धावले. तिला दुधाची लालूच दाखवून तिच्या पिल्लाला हातात घेतलं. निळसर ग्रे रंगाचे डोळे असलेलं ते साधारण पंधरा दिवसांचं पिल्लू होतं. बोका होता तो. अजूनही त्याची आई तोंडात पकडूनच त्याला इकडे-तिकडे येत होती. तिने त्याला ठेवण्याकरता जी जागा निवडली होती, ती अगदी परफेक्ट होती. दुसऱ्या मांजरा-कुत्र्यांपासून त्याला सुरक्षित ठेवण्याकरता तिला सगळीकडे लक्ष ठेवता येणार होतं.
आता आमचं लक्ष सारखं मनी आणि तिचा माऊला यांच्यावरच राहू लागलं. जाता-येता ती आहे ना, याची खात्री करू लागलो आम्ही. रोज रात्री त्याच्याशी खेळून झोपायला जाताना तो सुरक्षित राहावा म्हणून प्रार्थना करू लागलो. सकाळी मनीला दूध-पोळी खायला देताना तो दृष्टीस पडेस्तोवर जीवात जीव नसायचा. तो दिसला की, त्याच्या आईला धन्यवाद देऊन हुश्श्य करायची मी.
आता त्याला आमची सवय झाली. मनुताई पण दूध-पोळीच्या आशेनं का होईना पायात घोटाळू लागल्या. स्वयंपूर्ण असलेल्या त्या मांजरीचंही बरोबरच होतं. तिची आमच्याशी काही अटॅचमेंट नव्हती. त्यामुळे तिच्या या स्वार्थी वृत्तीकडे आम्ही कानाडोळा केला. ती आपल्या पिल्लाला घेऊन आमच्याकडे राहावी, असा आमचाही स्वार्थ होताच की!
..................................................................................................................................................................
अधिक माहितीसाठी पहा - सर्व प्रकारच्या कट्टरतेला नाकारणाऱ्या ‘इन्शाअल्लाह’ या अभिराम भडकमकर यांच्या बहुचर्चित कादंबरीवरील ‘परीक्षण’ स्पर्धा
..................................................................................................................................................................
बघता बघता पिल्लूने आमचं अंगण, कुंड्या, वाफे ओळखीचे करून घेतले. आपल्या चकचकीत डोळ्यांनी तो रोज नव्या नव्या गोष्टी एक्सप्लोअर करू लागला. आम्ही त्याचं नाव ‘ढंप्या’ ठेवलं. ढंप्या आणि त्याची आई आता आमचे फॅमिली मेंबर झाले.
आमच्या अंगणात पूर्वी काही भटकी मांजरं ओझरती बघितली होती मी. पण, आताशा एक गाढवी रंगाचा गलेलठ्ठ बोका मधूनच दिसू लागला होता. ढंप्याला तो काही इजा करेल या भीतीनं, तो दिसला की, लांबूनसुद्धा आम्ही त्याला हाकलायला लागलो. तो इतका माजुरडा होता की, आमच्या आरडाओरड्याकडे तो चक्क दुर्लक्ष करायचा. फारच जवळ गेलो तर क्षणार्धात कंपाउंड पलीकडे लुप्त व्हायचा.
एके दिवशी सकाळी ढंप्याला दूध-पोळी द्यायला गेले तर वेगळंच दृश्य दिसलं. हा गलेलठ्ठ बोका तिथं गाणी गात होता. ढंप्या आणि मनी पोळी खायला आले. हा लांबून मागून हाका मारत होता. मनीची आता नवीन ढंप्यांची इतक्यातच तयारी की काय असा विचार मी करत होते. पण, ढंप्याला तो काही करेल या भीतीनं त्याला मी हाकलून दिला.
दुसऱ्या दिवशी सकाळी खायच्या वेळेस लांब असलेली बोकोबाची स्वारी दिसली. फरक कसा होता की, आज गाणी माझ्याकडे बघून गात होता. माझ्याकडे एकटक बघत होता. मधूनच दूध-पोळी खाणाऱ्या ढंप्या व त्याच्या आईकडे नजर टाकत होता. मी त्याला हाकलल्यावर ‘जातोच आहे मी... ओरडू नका...’ असा भाव चेहऱ्यावर आणून किंचितही चाल न बदलता निघून गेला.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
मी वर येऊन कामाला लागले, पण गलेलठ्ठ बोकोबा काही मनातून जाईना. विचार केल्यावर त्याच्या नजरेची भाषा जरा उशीराच माझ्या लक्षात आली. तो गाणी मनीकरता गातच नव्हता. ती गाणी माझ्याकरता होती. खरं तर ती गाणी नसून मागणी होती, ‘कारणे दाखवा’ अशी नोटीस होती! ‘मनी आणि ढंप्या तुमचे फॅमिली मेंबर होऊ शकतात, तर मग मी का नाही? त्यांना रोज दूध-पोळी-अंडं मिळतं, तर मी काय पाप केलंय, मला न द्यायला? या मांजरीला मी पुष्कळ वर्षं ओळखतो. केवळ पिल्लू बरोबर आहे म्हणून ती भाव खाते आहे. इथं मजेत राहते आहे. मलाही सेटल व्हायला आवडेल. मलाही तुमचा फॅमिली मेंबर करून घ्या.’
जसजसं हे उलगडलं तसतसा तो बोका मला आवडलाच एकदम. इतके दिवस स्वबळावरच स्वारी गलेलठ्ठ झाली होती. त्याचा माज हा त्याच्या कर्तृत्वातून निर्माण झाला होता. कुणाच्याही पायात घोटाळून, लाचारीनं तो कधी जगलाच नसावा. आताही त्याच्या स्वरात, बॉडी लँग्वेजमध्ये अजिजी, विनवणी नव्हती. होता तो एक स्वच्छ थेट मॅसेज- ‘मलाही तुमचा फॅमिली मेंबर बनवा’.
मी त्याच्याशी दुसऱ्या दिवशी बोलायचं ठरवलं. पण तो आलाच नाही. नंतरही पुढचे कित्येक दिवस तो दिसला नाही. माझ्याकडे त्याचा प्रस्ताव विचाराधीन होता. मला ठरवता येत नव्हतं, ढंप्याच्या काळजीमुळे. पण खरं तर तो मला आवडला होता.
पुढे काही दिवसांनी नेहमीप्रमाणे मी सकाळी दूध-पोळी घेऊन खाली गेले. मनी आणि ढंप्या माझी वाटच पाहत होते. ढंप्या आता चांगलाच उंच आणि चपळ झाला आहे. त्याची भूकही वाढू लागली होती. मी त्यांना खायला दिलं. ते दोघं खाण्यात गर्क झाले, आणि मी ढंप्याला निरखण्यात. काही क्षणांनंतर, मला मऊ आवाजातली ‘म्याव म्याव’ ऐकू आली. थोडावेळच अगदी. तेवढ्यात मला तो दिसला. तोच गलेलठ्ठ गाढवी रंगाचा बोका. दोन कुंड्यांमधून त्याची नजर थेट माझ्या नजरेला भिडली. मी पण माझ्या खास नजरेनं त्याच्याकडे पाहिले. तो थोडा वेळ माझ्याकडे तसाच पहात राहिला आणि मग त्याने नजर खाली वळवली. मला या शीतयुद्धाचं पारडं माझ्या बाजूला झुकल्यासारखं वाटलं. त्याने पडती बाजू घेतलेली पाहिल्यावर मग त्याच्या-माझ्यात थेट संवादच झाला.
मी - बरेच दिवसांनी येणं केलंत. काय म्हणणं आहे?
बोको - तेच पूर्वीचं...
मी - पूर्वीचं?
बोको - आय अॅम सॉरी. फार उद्धटपणे वागलो मी.
मी - मग आता काय ?
बोको - तोच पूर्वीचा प्रस्ताव...
मी - ढंप्याच्या केसालाही धक्का लागलेला मला चालणार नाही.
बोको - पुन्हा विचार कराल का?
मी - ढंप्याची सेफ्टी सर्वांत महत्त्वाची.
बोको - तुम्हाला समजत नाहीये मी काय म्हणतोय ते...
(आतापर्यंत ढंप्या दूध पिऊन पळापळी खेळू लागलेला होता…)
मी - मनी तुला चालणार आहे हा आलेला?
मनीने माझी नजर चुकवली. ढंप्या पळापळीच्या मूडमध्ये मग्न होता. मी त्याला पकडायला गेल्यावर बोको निमूटपणे मागे सरकला. ढंप्याची पळापळी सुरूच होती. तो बोक्याकडे फारसं लक्ष नाही देत नाहीये, याचं मला आश्चर्य वाटत राहिलं. तेवढ्यात मनी त्याच्याशी खेळू लागली. ढंप्या पळत बोक्याच्या दिशेनं गेला आणि तिथून पुढे पळताना सहजच बोक्याच्या शेपटीशी खेळून पुढे गेला.
मी चकित.
मनुताई ढंप्याच्या मागे गेली. वाटेत बोको बसलेला. आता त्याला राहवलं नाही. शेजारून जाणाऱ्या मनीचा त्याने माझ्यासमोरच ओझरता किस घेतला.
मी हताश.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
मी येऊन झोपाळ्यावर बसले. बोको समोर पण अंतरावर येऊन बसला. त्याची नजर माझ्याकडे लागलेली.
बोको - आता तरी कळली का खरी गोष्ट ?
मनी ढंप्यामागे जायचं म्हणून दृष्टीआड झालेली. आम्हाला दोघांना बोलता यावं म्हणून बहुदा. पण माझं बोलणंच खुंटलेलं.
दुधाची तिसरी वाटी ठेवायची का नाही, हे ठरवण्यापुरताच या नाटकात माझा रोल होता, हे मला आत्ता कळतंय.
अखेर परवानगीचं शिक्कामोर्तब त्याला देण्याखेरीज मला पर्याय उरला नाही.
..................................................................................................................................................................
लेखिका उज्ज्वला ढमढेरे यांचे अनेक ललितलेख विविध वर्तमानपत्रे आणि नियतकालिकांतून प्रकाशित झाले आहेत.
ujjwaladhamdhere3172@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment