खरे प्रेम स्वतःमध्ये संपूर्ण असते. त्याला ना विश्वाचा आधार लागतो, ना कुणाच्या व्यक्तिमत्त्वाचा, ना कुठल्या अस्तित्वाचा!
संकीर्ण - ललित
श्रीनिवास जोशी
  • प्रातिनिधिक चित्र
  • Sat , 13 February 2021
  • संकीर्ण ललित व्हॅलेंटाइन डे Valentine's Day १४ फेब्रुवारी 14 February फ्रान्सवा द ला रॉशफुको Francois de La Rochefoucauld एलिझाबेथ बॅरेट ब्राउनिंग Elizabeth Barrett Browning रॉबर्ट ब्राउनिंग Robert Browning ऑस्कर वाईल्ड Oscar Wilde जलालुद्दीन रूमी Jalaluddin Rumi

तुम्ही स्त्री असा वा पुरुष, प्रेम हे प्रेम असते. प्रेम ही एक ‘रॉक-सॉलिड’ गोष्ट असते, असे आपण प्रेमात असताना आपल्याला वाटत असते. ज्या व्यक्तीवर आपले प्रेम असते, ती या जगातली सगळ्यात सुंदर व्यक्ती आहे, असे आपले मत असते. त्याचप्रमाणे, ती या जगातली सगळ्यात आकर्षक व्यक्ती आहे, असेही आपल्याला वाटत असते. त्या व्यक्तीचे प्रेम मिळो वा न मिळो, आपण त्या व्यक्तीचे होऊन राहिलेले असतो.

शेक्सपिअरने लिहिलेले आहे -

Love is not love which alters it when alteration finds…

Love alters not with his brief hours and weeks, but bears it out, even to the edge of doom.

(जेव्हा तुम्ही कुणा एका व्यक्तीचे होऊन राहू शकत नाही, तेव्हा तुमचे प्रेम हे प्रेमच नसते. काळाच्या ओघात समोरची व्यक्ती बदलत जाते. तिच्या बदलण्याबरोबर तुमचे प्रेम कमी झाले तर ते प्रेम नसते. खरे प्रेम मृत्यूच्या किंवा कल्पांताच्या काठावरसुद्धा आपल्या प्रिय व्यक्तीचा हात आपल्या हातात घट्ट धरून उभे असते.) 

हे सगळे ऐकायला कितीही छान वाटले तरी हे सगळे खरे आहे का?

प्रेम ही इतकी साधी गोष्ट आहे का? या जगातल्या प्रत्येक व्यक्तीला एकच व्यक्ती प्रियकर किंवा प्रेयसी म्हणून आवडत असते का?

प्रेम ही काही साधीसुधी गोष्ट नाही. प्रेम म्हटले की, सगळ्यांच्या डोळ्यात चमक येते. सगळ्यांच्या हृदयात एक अधीर अशी धडधड तयार होते. सगळ्यांच्या पोटात खड्डा वगैरे पडतो. प्रेमामुळे आपल्या अस्तित्वात एक सळसळता जिवंतपणा उसळून उठतो. प्रेमाच्या भावनेने आपल्या अस्तित्वात जीव धरला की, आपले रक्तसुद्धा जास्त लाल झाले आहे, असे आपल्याला वाटत राहाते, कारण त्या लालेलाल रक्ताच्या लाटा आपल्या गालावर येऊन धडका मारत आहेत, असे आपल्याला जाणवत राहाते.

हा प्रेमाचा अनुभव अनेक लोकांना त्यांच्या आयुष्यात अनेक वेळा येतो. अनेक व्यक्तींच्या बाबतीत येतो.

..................................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी पहा - सर्व प्रकारच्या कट्टरतेला नाकारणाऱ्या ‘इन्शाअल्लाह’ या अभिराम भडकमकर यांच्या बहुचर्चित कादंबरीवरील ‘परीक्षण’ स्पर्धा

..................................................................................................................................................................

पहिल्या प्रेमाचा या जगात खूप बोलबाला असला तरी, दुसरे प्रेम, तिसरे प्रेम, सतरावे प्रेम असे प्रकारसुद्धा फार जेन्युइन असतात, असा अनेक लोकांचा अनुभव असतो. शेक्सपिअरचे म्हणणे मानायचे असेल तर या लोकांचे म्हणणे नाकारायचे का?

समोरच्या व्यक्तीविषयी पराकोटीचे प्रेम वाटले की, त्या पराकोटीच्या प्रेमामुळे आपल्या मनाचे आणि आपल्या शरीराचे जे व्हायचे ते होतेच. प्रेमाची लाट उठायची म्हटली तर कधीही उठू शकते. हजार वेळा उठू शकते.

कोण खरे? शेक्सपिअर, का हे प्रत्येक वेळी तेवढ्याच जेन्युइनली प्रेमात पडणारे लोक?

‘प्रेमाचा त्रिकोण’ ही किती रोमांचकारी घटना आहे मानवी आयुष्यातली! किती सिनेमे, किती नाटके आणि किती कादंबऱ्या लिहिल्या गेल्या आहेत, या प्रेमाच्या जीवघेण्या त्रिकोणावर!

दोन पुरुष आणि एक स्त्री, दोन स्त्रिया आणि एक पुरुष. सगळ्यांचेच एकमेकांवर खरेखुरे प्रेम. इथे कल्पांताच्या काठावर नक्की कोण कुणाचा हात आपल्या हातात धरून उभे राहणार असते?

‘प्रेम स्थिर असते’ असे शेक्सपिअर लिहितो. पण, तसे पाहायला गेले तर प्रेम लयाला जात नाही का? प्रेमाइतकी अस्थिर गोष्ट या जगात नसेल, असे अनेक प्रज्ञावंत लेखकांना वाटत राहिले आहे. 

रॉय किणीकर लिहून गेले आहेत -

ही प्रीती नाही दगडावरची रेघ

ती आहे चंचल पाण्यावरची आग

प्रीतीचा नसतो अक्षत अंतरपाट

का वेड्या असते ती जन्माची गाठ।।

प्रेम म्हणजे काही दगडावरची रेघ नसते. पाण्यावर पसरलेल्या आगीसारखी ती अत्यंत क्षणभंगूर अशी गोष्ट असते. प्रेम ही काही जन्माची गाठ नसते. अंतरपाट बाजूला करून एकमेकांना हार घातले की, एकमेकांच्या जन्माची गाठ बसत असेल, पण चिरंतन प्रेमाची गाठ त्यामुळे कशी बसू शकेल?

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

पाण्यावरची आग! किती सुंदर कल्पना! अतिशय सुंदर आणि उत्कट प्रतिमा आहे ही. प्रेमाइतकीच सुंदर. निळ्याशार पाण्यावर केशरी रंगाची आग लागलेली आहे. पाण्याच्या निळ्या लाटांवर केशरी ज्वाला लाटांप्रमाणे खालीवर होत आहेत. शांत निळाईवर धगधगणारा केशरी रंग! आग आणि शांतता यांचा संगम! प्रेम म्हणजे तरी दुसरे काय? काही काळ आपल्या बरोबर राहणारे समाधान. हे समाधान आपल्याला सतत मिळत राहावे, अशी आपली इच्छा असते. ही इच्छा पूर्ण होताना फारशी दिसत नाही. कधीही पूर्ण न होणाऱ्या इच्छेची आग म्हणजे प्रेम!

खूप जणांना वाटते की, या जगाच्या विराट आणि क्रूर पटावर प्रेमाची नाजूक भावना आणि तिच्यातली निष्पाप उत्स्फूर्तता किती काळ टिकणार? स्वार्थाच्या आणि क्रूरतेच्या पार्श्वभूमीवर सगळे संपून जाणे अपरिहार्य वाटते. प्रेम म्हणजे उल्का. क्षणभर प्रकाशाने तरळून जाऊन माती होणारी गोष्ट!

आपण अत्यंत उमेदीने अत्यंत खरे प्रेम करतो. आपल्यालाही हवे असलेल्या व्यक्तीचे प्रेम मिळते. आणि होते काय? जुळून आलेल्या या सगळ्या प्रेमाच्या राज्याची काही काळाने राखरांगोळी होऊन जाते - या जगातल्या कितीतरी लोकांना या शोकांतिकेचा दारुण अनुभव आलेला असतो.

प्रेमाचा शेवट बहुदा दारुणच असतो हे बहुतेकांना माहीत असते. तरीही, प्रेमाचे आणि प्रेमाच्या धुंदीचे आकर्षण कमी होत नाही.

आपले राम गणेश गडकरी म्हणून गेले आहेत -

क्षण एक पुरे प्रेमाचा, वर्षाव पडो मरणांचा।।

तो जिवंतपणा, ती उत्स्फूर्तता, तो भावनांच्या पौर्णिमेचा आविष्कार या सगळ्या सगळ्याचा एक क्षण जरी आपल्याला मिळाला तरी ते खूप असते. नंतर मरणांचा वर्षाव पडला तरी त्याचे काही वाटत नाही. एक क्षणभर जरी उत्स्फूर्त जीवन मिळणार असेल तर कितीही मरणे आली तरी त्यांचे काही वाटत नाही. प्रेमाच्या उत्स्फूर्ततेची मजाच वेगळी.

प्रेमातल्या उत्स्फूर्ततेबद्दल ख्रिस्टोफर मार्लोने लिहिले आहे -

Where both deliberate, the love is slight,

Who ever lov'd, that lov'd not at first sight?

(जिथे विचार करून प्रेम केले जाते, तिथे प्रेम फार कमी असते. ज्या व्यक्तीने पहिल्या नजरेत घायाळ होऊन प्रेम केले नाही, तिने प्रेम केले असे म्हणताच येत नाही.)

मार्लोच्या वाक्याचा विचार करताना कधी कधी मला वाटते की, आपण प्रेमात वगैरे पडत नसतो. वीज कोसळावी तसे प्रेम आपल्या अंगावर येऊन कोसळत असते.

प्रेम ही विचारांच्या पलीकडची अवस्था आहे. मनात विचार येऊ लागले की, समजून जायचे - हे प्रेम नोहे!

प्रेम ही भावना सगळ्या लोकांच्या अनुभवाची गोष्ट असली तरी ती सगळ्यांनाच कळते असे नाही.

प्रेमाचे आकर्षण नक्की कशात आहे? या प्रश्नाचे उत्तर शोधायचा खूप प्रयत्न मी माझ्या परीने केला.

..................................................................................................................................................................

‘खिंडीत’ : शैक्षणिक जगताच्या अंतरंगाची विरूपता भेदकपणे उलगडणाऱ्या कथा

हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये ऑनलाईन खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5254/Khindit

..................................................................................................................................................................

कधी वाटले की, मानवाचे सौंदर्यावर प्रेम असते त्या सौंदर्यात प्रेमाचे आकर्षण लपलेले असावे. पण नंतर लक्षात आले की, फक्त एखादी स्त्री सुंदर आहे म्हणून तिच्यावर आपले प्रेम बसत नाही. आपले प्रेम बसण्यासाठी सौंदर्याच्या पलीकडचे असे काहीतरी त्या स्त्रीमध्ये असावे लागते आणि ते आपल्याला जाणवावे लागते.

कधी मला वाटले की, आपल्याला जवळीक हवी असते. आपल्याला अत्यंत जवळचे नाते हवे असते. फक्त आपले असे कुणीतरी आपल्याला हवे असते. या आपलेपणाच्या गरजेत प्रेमाचे आकर्षण आहे, असे मला काही काळ वाटत राहिले. पण नंतर लक्षात आले की, कित्येक लोकांना त्यांच्या प्रेमाची व्यक्ती मिळाली नाही तरी त्यांचे त्या व्यक्तीवरचे प्रेम अजिबात कमी होताना दिसत नाही. वर्षानुवर्षे ते लोक त्या प्रेमात झुरत राहिलेले दिसतात.

काही काळ मला वाटत राहिले की, मानवी सृजनासाठी निसर्गाने केलेली आपली फसवणूक म्हणजे प्रेम. प्रेमाचे अतितीव्र आकर्षण नसेल तर एखादी स्त्री अपत्य जन्माच्या कळा सहन करायला का तयार होईल? प्रेमाचे आकर्षण नसेल तर एखादा पुरुष छाती पिचून जाईल, अशा जबाबदाऱ्या उचलायला का तयार होईल? पण, नंतर लक्षात आले की, अनेक लोक केवळ स्थिरतेसाठी या सगळ्या कळा सहन करायला तयार होतात, या सगळ्या जबाबदाऱ्या उचलायला तयार होतात! आयुष्यातली आणि संसारातली स्थिरता लोकांना फार महत्त्वाची वाटते. प्रेमाचा टिपूस नसलेले कित्येक संसार कित्येक वर्षं होत राहातात आणि शेवटी कधीतरी एकदाचे पैलतीराला लागतात.

पुढे मध्यम वयात आल्यावर मला जाणवले की, आपल्यातल्या प्रत्येकाला अपूर्णत्वाची तीव्र भावना छळत असते. आपल्या अंतर्मनात - अगदी आत कुठेतरी - आपल्याला पूर्णत्वाची आस लागून राहिलेली असते. आपल्या मनात सतत जिवंत असलेल्या अपूर्णत्वाच्या धगीत प्रेमाचे आकर्षण लपलेले असेल, असे मला काही काळ वाटत राहिले. आपल्याला आपल्या नकळतपणे पूर्णत्व हवेहवेसे वाटत असते. पूर्णत्वाच्या या अपार इच्छेमध्ये प्रेमाचे आकर्षण लपलेले असेल असेही काही काळ मला वाटत राहिले.

हे विचार माझ्या मनात घोळत होते त्या काळात जलालुद्दीन रूमीची एक ओळ या विचारांचे समर्थन करायला पुढे आली -

Love is a whole thing, we are only pieces.

(प्रेम हे पूर्णत्व आहे. आपण फक्त तुकडे तुकडे आहोत.)

किती योग्य! थोडे शांत बसून आपण आपल्या मनात डोकावून पाहिले की, आपल्याला जाणवते की, प्रेमासाठी किती तरसत असतो आपण. प्रेमाशिवाय किती अपूर्ण वाटत असते आपल्याला! स्त्री अपूर्ण असते. पुरुष अपूर्ण असतो. प्रेम सफल झाले की, किती संपृक्त वाटते आपल्याला. पूर्णत्वाची संवेदना आपल्या सर्वांगात पसरलेली असते. आपल्या सर्व अस्तित्वात पसरलेली असते. किती सुंदर अनुभव असतो तो!

.................................................................................................................................................................

विसंगती व सुसंगती समजून घेण्यासाठी उपयुक्त पुस्तक - वासंती दामले

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/4299/Madhyamvarg---ubha-adva-tirpa

.................................................................................................................................................................

पण, तसे पाहायला गेले तर किती कमी काळ टिकते ही संपृक्त प्रेमाची संपृक्त अनुभूती!

हे पाहून मानात विचार येतो - प्रेम इतके क्षणभंगुर असेल तर ते खरंच खरे असते का? कारण या जगातल्या सगळ्या खोट्या गोष्टी अजिबात टिकावू नसतात.

हा विचार मनात सुरू असण्याच्या काळात फ्रान्सवा द ला रॉशफुको याचे एक भारीतले वाक्य सामोरे आले.

True love is like ghosts, which everyone talks about and few have seen.

(खरे प्रेम हे भुतांसारखे असते. भुतांबद्दल बोलत सगळेच असतात, पण त्यातल्या फार कमी लोकांनी स्वतःच्या डोळ्यांनी भूत बघितलेले असते.)

खरंच, किती लोकांना खरं प्रेम मिळत असेल? प्रामाणिकपणे पाहिलं तर आपल्यातील बहुतेकांना प्रेमाच्या मागे कुठल्या ना कुठल्या स्वार्थाचा भाग दिसून येईल. दुसऱ्याने आपल्यावर केलेल्या प्रेमामागे त्या व्यक्तीचा काहीना काही स्वार्थ लपलेला आपल्याला दिसत असतो. आणि आपण एखाद्या व्यक्तीवर केलेल्या प्रेमामागेही आपल्याला आपला स्वार्थ लपलेला दिसत असतो. हे लक्षात आले की, आपल्या मनात एक विचार परत परत येत राहतो - आपण जे प्रेम करतो ते खरे आहे का आणि आपल्याला जे प्रेम मिळते आहे तेसुद्धा खरे आहे का? आपल्याला प्रश्न पडतो - आपल्या स्वार्थावर लैंगिक आकर्षणाची झळाळी चढली की, तिला प्रेम म्हणायची पद्धत या जगात पडली आहे का?

प्रेमाला पटकन खरे किंवा खोटे म्हणायचा धीर आपल्याला होत नाही. कारण, एकीकडे आपले प्रेम जिवंत आहे, हे आपल्याला कळत असते आणि दुसरीकडे आपल्या प्रेमामागे आपला स्वार्थ लपलेला आहे, हेसुद्धा आपल्याला समजत असते.

सिनिकल फिलॉसॉफीचा बादशहा ऑस्कर वाईल्ड म्हणतो ते काही वेळा खरे वाटू लागते. तो म्हणाला आहे -

To love oneself is a beginning of a life long romance.

आपण आपल्या स्वतःवर करतो ते प्रेम खरे. ज्या क्षणी आपण सगळ्या जगाला विसरून स्वतःवर प्रेम करू लागतो त्या क्षणी खऱ्या रोमान्सचा जन्म होतो. जन्मभर जिवंत आणि तजेलदार राहणाऱ्या रोमान्सचा जन्म!

प्रेमाचा विषय निघाला की, एवढे सगळे विचार आपल्या मनात येऊ लागतात आणि आपण पुरते गोंधळून जातो. म्हणूनच ऑस्कर वाईल्ड म्हणाला आहे -

The mystery of love is greater than the mystery of death.

प्रेमाचे गूढ मृत्यूच्या गूढापेक्षा जास्त खोल असते. एका टोकाला, प्रेम म्हणजे दोघांचे पूर्णत्व हा विचार; आणि दुसऱ्या टोकाला, आपण स्वतःवर करतो ते खरे प्रेम बाकी सगळे झूट, हा विचार. शिवाय, या दोन टोकांच्या मध्ये मत-मतांतरांच्या असंख्य छटा आपल्याला दिसत राहतात ते वेगळेच. या सगळ्यातले काय खरे मानायचे आणि काय खोटे मानायचे?

प्रेमविचारातील खऱ्याखोट्याचा शोध एके दिवशी मला अचानक लागला. एके दिवशी एलिझाबेथ बॅरेट ब्राउनिंगची ‘लव्ह’ ही कविता वाचनात आली आणि कुठले प्रेम खरे आणि कुठले खोटे हे मला कळले.

तिच्या ‘लव्ह’ या अप्रतिम कवितेमध्ये ती म्हणते -

when a soul, by choice and conscience, doth

Throw out her full force on another soul,

The conscience and the concentration both make

mere life, Love.

खरे प्रेम करायचे असेल तर विवेक, विचार आणि भावना जिवंत असाव्या लागतात. अशा तिहेरी जिवंतपणाने जेव्हा एखादी व्यक्ती आपले सगळे अस्तित्व दुसऱ्या व्यक्तीवर अत्यंत उत्स्फूर्तपणे उधळून टाकते तेव्हा त्या दोघांच्याही आयुष्याचे झगमगते प्रेम बनून जाते.

आयुष्य आणि प्रेम असे वेगळे वेगळे काही उरतच नाही. अवघ्या आयुष्याचे प्रेम बनून जाते.

विवेकातून येणारा चांगुलपणा आणि त्या विवेकी चांगुलपणातून येणारी निष्ठा या दोन गोष्टीतून  खऱ्या प्रेमाचा उगम होतो. कॉन्शन्स आणि कॉन्सन्ट्रेशन या हातात हात घालून चालणाऱ्या गोष्टी आहेत. चांगुलपणा आणि निष्ठा, या हातात हात घालून चालणाऱ्या गोष्टी आहेत.

एका व्यक्तीच्या निस्वार्थी आणि निर्व्याज प्रेमाने दोन व्यक्तींची संपूर्ण आयुष्ये प्रेमाच्या ईश्वरी उंचीवर पोहोचतात.

एलिझाबेथ बॅरेट ब्राउनिंगच्या या कवितेने मला खरे प्रेम नक्की कशातून जन्म घेते हे सांगितले. खरे प्रेम चांगुलपणातून आणि निष्ठेमधून जन्मते.

तिच्या ‘लव्ह’ या कवितेत एलिझाबेथ बॅरेट ब्राउनिंग पुढे लिहिते -

For Life in perfect whole

And aim consummated, is Love in sooth,

As nature's magnet-heat rounds pole with pole.

प्रेमामुळे त्या प्रेमिकांचे सगळे आयुष्य पूर्णत्वाला पोहोचलेले असते. प्रेमात एक होण्याचे त्यांचे ध्येय आता पूर्ण झालेले असते. पृथ्वीच्या दोन ध्रुवांना उष्ण अशा चुंबकशक्तीने लपेटून टाकलेले असते, तसे त्या दोघांना प्रेमाने म्हणजेच पूर्णत्वाने एकमेकांत लपेटून टाकलेले असते.

पुरुष आणि स्त्री या दोन ध्रुवांना पूर्णत्वात लपेटून टाकणारी आणि एकजीव करणारी, लाव्ह्यासारखी जिवंत आणि चुंबकीय उष्णता म्हणजे प्रेम.

ब्राउनिंग बाईंनी प्रेमाविषयीचा माझा गोंधळ संपवला.

चांगुलपणातून आणि निष्ठेतून प्रेम नक्की कसे जन्मते, हे विचार करून किंवा चिंतन करून कुणाला समजत असेल यावर माझा विश्वास नाही. तुमच्यावर कुणीतरी अफाट प्रेम केले तरच ते तुम्हाला समजले तर समजते.

एलिझाबेथ बॅरेट ब्राउनिंग शरीराने अत्यंत अतिशय विकल होती. लहानपणापासून तिला तीव्र डोकेदुखीचा त्रास होता. तिला मणक्याची असाध्य व्याधीसुद्धा होती. तिला नीट चालताही येत नव्हते. तिला पुढे क्षयरोग झाला. वेदना कमी करण्यासाठी तिला अफू घेण्यास सांगण्यात आले. त्यातून तिला अफूचे व्यसन लागले. असे सर्व असताना कवी रॉबर्ट ब्राउनिंग तिच्या आयुष्यात आला आणि त्याने तिच्यावर निरतिशय आणि निर्व्याज प्रेम केले. ती ज्या अवस्थेत होती, त्या अवस्थेत तिच्यावर प्रेम केले. मनापासून प्रेम केले. हे सगळे पाहून माझ्या मनात विचार येत राहतो - रॉबर्ट ब्राउनिंगने तिच्यावर केलेल्या अफाट प्रेमामुळे तिच्या मनात खऱ्या प्रेमाची खरी जाण तयार झाली असेल का?

बालकवी जसे सौंदर्याचे कवी तशी एलिझाबेथ बॅरेट ब्राउनिंग ही प्रेमाची कवयित्री. तिची ‘सॉनेट्स फ्रॉम द पोर्च्युगीस’ वाचल्याशिवाय प्रेम करायला माणूस ‘क्वालिफाय’ होत नाही, असे माझे आपले प्रायव्हेट मत आहे.

तिच्या प्रेमावरील कवितांनी ऑस्कर वाईल्डसारख्या सिनिकल तत्त्वज्ञालासुद्धा हलवून टाकले. आपला सिनिसिझम बाजूला ठेवून वाईल्डला म्हणावे लागले की -  एलिझाबेथ बॅरेट ब्राऊनिंग या स्त्रीला प्रेमामागची ‘स्पिरिच्युअल मिस्टरी’ कळून चुकली होती. प्रेमामागचे आध्यात्मिक गूढ एलिझाबेथ बॅरेट ब्राउनिंगला कळून चुकले होते.

ऑस्कर वाईल्ड खरं तर खूप संवेदनशील माणूस. आपल्या अति संवेदनशील हृदयाला जखमा होऊ नयेत म्हणून त्याने आपल्या हृदयाभोवती एक किल्ला उभा केला होता. सिनिसिझमचा आणि त्यातून येणाऱ्या कठोर विनोदाचा किल्ला. एलिझाबेथ बॅरेट ब्राउनिंगच्या सखोल भावनांचे मार्दव आणि तिची प्रेमाविषयीची अथांग जाण बघून वाईल्ड हादरला. त्याने आपल्या हृदयाभोवतीच्या किल्ल्याची दारे थोडी उघडली. जे जाणवते आहे ते आपल्या हृदयाला बोलू दिले. वाईल्ड असो वा अजून कोणी, संवेदनेची आणि पूर्णत्वाची आस कोणाला नसते? या जगात एकटे राहावे असे कोणाला वाटत असते? 

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

जलालुद्दीन रूमी सूफी संत होता म्हणून त्यालाही प्रेम म्हणजे पूर्णत्व हा शोध लागला होता. त्याच्या मते, प्रेम म्हणजे पूर्णत्व आणि पूर्णत्व म्हणजे अमरत्व. अपूर्णत्वाला मृत्यू असतो. पूर्णत्व कधी मरत नाही.

रूमीच्या दृष्टीतून बघायला गेले तर प्रेमामुळे आपल्याला पूर्णत्व प्राप्त झाले असे होत नाही. प्रेम हेच पूर्णत्व असते. आपले अपूर्णत्व संपवायचे असेल तर आपल्याला स्वतःची साथ सोडून प्रेमाच्या राज्यात जायला लागते. तिथे राहायचे असेल तर आपल्याला आपल्या स्वतःला विसरावे लागते. आपण आपल्या प्रेमाच्या व्यक्तीत राहायला गेलो की, आपण प्रेमात राहायला जातो. तिथून मग आपल्याला बाहेरच पडता येत नाही.

एलिझाबेथ बॅरेट ब्राउनिंग आणि जलालुद्दीन रूमी यांच्याकडून एवढे सगळे समजून घेतल्यावर आपण लेखाच्या सुरुवातीला दिलेल्या ओळींकडे पुन्हा एकदा पाहिले तर शेक्सपिअरच्या त्या ओळींचा अर्थ नव्याने आपल्या लक्षात येतो.

Love... bears it out, even to the edge of doom.

या विश्वाच्या अंताच्या कड्यावरसुद्धा प्रेम आपल्या प्रिय व्यक्तीचा हात हातात घेऊन शांतपणे उभे असते. ना त्याला स्वतःच्या अंताची भीती वाटते, ना त्याला या विश्वाच्या अंताची भीती वाटते. कारण खरे प्रेम स्वतःमध्ये संपूर्ण असते. त्याला ना विश्वाचा आधार लागतो, ना कुणाच्या व्यक्तिमत्त्वाचा, ना कुठल्या अस्तित्वाचा!

..................................................................................................................................................................

लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.

sjshriniwasjoshi@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......