मला असं लिहिता आलं असतं तर मजा आली असती! पण कुणीतरी लिहिलं, तो मीच आहे!!
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
नंदा खरे
  • अतीत कोण? मीच...’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Fri , 12 February 2021
  • ग्रंथनामा शिफारस अतीत कोण? मीच... Atit kon? Meech नंदा खरे Nanda Khare प्रसाद कुमठेकर Prasad Kumthekar

‘बगळा’ आणि ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ या दोन दोन कादंबऱ्यांनंतर प्रसाद कुमठेकर लिखित ‘अतीत कोण? मीच...’ या तिसऱ्या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच फेसबुक लाईव्हवर करण्यात आले. हे प्रकाशन विख्यात साहित्यिक आणि अभ्यासक श्री. नंदा खरे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी त्यांनी केलेल्या भाषणाचा हा संपादित अंश..

..................................................................................................................................................................

माझी एक पस्तीस एक वर्षांपूर्वीची मैत्रीण आहे. तिने काही काळापूर्वी ‘संस्कृतीसाठी काय पाहिजे?’ या नावाची एक कविता पाठवली. तुम्हाला ती वाचून दाखवतो.

तर एक भाषा हवी.

जिवंत. टवटवीत. खळखळती. वर्धिष्णू

कुठल्याही मृत खापरढापर आजेपणज्यांच्या परंपरेला न जुमानणारी.

जगभरातून जे काही उमदं अन कसदार असेल ते न लाजता घेणारी आणि आपलंसं करणारी...

त्या भाषेत बेहोष करणाऱ्या कविता हव्यात आणि ताल  धरायला लावणारी गाणी हवीत.

त्या गाण्यांना सजवणारं संगीत हवं

असं संगीत की जे परक्यालाही आपल्या भाषेच्या प्रेमात पाडेल.

आणि पायजेत बंडखोर वांड पोरं...

‘अरे’ला ‘का रे’ करणारी. प्रश्न विचारणारी. नित्यनूतन किडे करणारी.

व्यवस्थेच्या तोंडाला फेस आणणारी. सर्व प्रकारच्या status quoला फाट्यावर मारणारी...

आणि पाहिजेत पोरी.

मुक्त स्वतंत्र आडदांड गुंड दांडग्या पोरी. सहजासहजी न पटणाऱ्या आणि पोरांना घाम पाडणाऱ्या

आणि पाहिजेत पोरांपोरींना पेटवणाऱ्या म्हाताऱ्या आणि म्हातारे

कसली रे तुम्ही पोरं? आपण तर असलं काही सहन नसतं केलं बा. असं म्हणून आगीत तेल ओतणारी.

मजेत जागून एक दिवस समाधानाने आनंदाने मरणारी

निरोगी दणकट रानटी निरागस संस्कृतीसाठी एवढा ऐवज बक्कळ झाला.

धर्म वगैरे matter तद्दन निरुपयोगी...

ब्रॅड डी नावाच्या कवी मुलाने ही कविता लिहिलीय. साधारण पंचवीस-तीस वर्षांचा. मला बाकी काही माहिती कळली नाही. त्याचं म्हणणं मला अत्यंत पटलं. भाषा हवी, भाषेत कविता आणि ताल धरायला लावणारी गाणी हवीत आणि फारसं इतरांचं न ऐकणारी बंडखोर मुलं-मुली पाहिजेत. आणि म्हाताऱ्यांनी त्यांना आणखी उचकवलं पाहिजे. शांत व्हा, चूप बसा, हाताची घडी तोंडावर बोट असं बोलणारे म्हातारे आपल्याला नकोयत. तसले म्हातारे दिल्लीत आहेत पुष्कळ.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

प्रसादच्या तिन्ही पुस्तकांमध्ये लिहिली गेलेली भाषा ही पूर्वी काय झालं याचा विचार न करता आज वापरली जाणारी भाषा आहे. प्रमाणभाषा पुण्याच्या अकलनीय वर्तुळांमध्ये बोलली जाते. त्यांनी ठरवलं ती प्रमाणभाषा. खरं तर बाकी लोकांनी ते मानलं पाहिजे असं नाहीये. प्रत्येक पाच कोसावर भाषा बदलते. महाराष्ट्रभर अनेक भाषा आहेत. नागपूरच्या पूर्वेला भंडारा गाव आहे. तिथली भाषा ही नागपूरच्या भाषेपेक्षा वेगळी आहे. हिंदीचा प्रभाव तिथे बराच जास्त आहे.

माझ्या नशिबाने मी वऱ्हाड, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र सगळीकडे काम करू शकलो. कोकणात काही फारसं गेलो नाही आणि उत्तर महाराष्ट्रात फारसं गेलो नाही. पण प्रत्येक ठिकाणची भाषा वेगळी आहे. सगळ्या भाषा प्रमाणभाषेपेक्षा गोड आहेत. मराठवाड्याची भाषा मला विशेषतः गोड वाटते. त्या भाषेवरती उर्दू भाषेचा पुष्कळसा प्रभाव आहे. ‘कोणत्या गावाचे?’ असं विचारायचं असेल तर बाकी महाराष्ट्रात विचारतात ‘तुम्ही कुठले?’, मराठवाड्यात विचारतात ‘तुम्ही कोठल्ले?’. कानाला खूप छान वाटतं. ‘बहरहाल’ असा एक उर्दू शब्द आहे. म्हणजे ‘सध्याची परिस्थिती अशी आहे’, ‘सध्याचे हाल असे आहेत’. तर हा शब्द ‘भरल’ या रूपामध्ये मराठवाड्यात मराठीचा भाग झालेला आहे. छान वाटतं ऐकायला.

मी काम करत होतो ‘एग्झीक्युटीव्ह इंजिनियर’ म्हणून, ज्याला मराठीत ‘कार्यकारी अभियंता’ असं म्हणतात. पूर्वी हैद्राबादमध्ये ‘मोत्मीन साहेब’ असं म्हणत असत. जितक्या भाषा जास्त एकमेकांत मिसळतील, तेवढा माणसांचा गर्व कमी होतो, असा माझा वैयक्तिक अनुभव आहे. वास्तविक, भाषा समृद्ध होण्यासाठी आपण शुद्ध भाषेचा आग्रह धरायला नको. आमच्या लहानपणी डॉक्टर रघुवीर म्हणून होते. ते शुद्ध संस्कृतमधून निघालेल्या हिंदी भाषेचा आग्रह धरायचे. ‘नेक-टाय’ला ते ‘कंठलंगोट’ म्हणायचे. त्यांची टिंगल होत असे. त्या मानाने लोक जी भाषा एसटी स्टँड, बाजार, रेल्वे स्टेशन, सर्वसामान्य जीवन यांत वापरतात ती सुंदर असते. त्या भाषेची नाडी पकडण्यात प्रसादला खूप यश मिळालं आहे.

हे एक भाषेचं झालं. प्रसाद म्हणाला की, तो फार आत्मकेंद्री आहे. पण तसं मला काही वाटलं नाहीये. मी त्याच्या ‘अतीत कोण? मीच’च्या पहिल्याच प्रकरणात लिहिलेल्या काही गोष्टी वाचून दाखवतो. 'मीने बाजूच्याचं बघून अगदी casually तो प्रश्न स्वतःच्या syllabusमध्ये टाकून घेतला... who am I? का? तर माकड हसलं म्हणून मी हसला. आता मी कोण? हे उत्तर शोधण्यापेक्षा मी काय करू शकतो? मी काय केलं पाहिजे? पडल्या प्रश्नाबद्दल मीला स्वतःला काय वाटतं? हे असे प्रश्न मीने स्वतःला विचारायचे ठरवलंय. त्याबद्दल मीला शुभेच्छा.'

आता प्रत्येक माणूस काहीही कृती करायला जातो, तेव्हा त्याच्या मनात धाकधूक असते की, मला हे जमणार आहे का? चांगलं जमणार आहे का? लोक काय म्हणतील? आत्मकेंद्री माणूस असेल तर ते जास्त असतं. प्रसाद इथे स्वतःचीच नाडी पाहतोय आणि स्वतःलाच शुभेच्छा देतोय.

त्याच प्रकरणातील प्रसादचं वाक्य 'तर गान्यामिन्याभिंगोऱ्या... पृथ्वी गोल आहे. आणि तिच्यावर अजूनही कोहम? मी कोण? हा प्रश्न ट्रेंडीग आहेच की... त्याचं उत्तर? 'देहम नाहम कोहम सोहम?  माझ्या सुदैवाने किंवा दुर्दैवाने मी संस्कृत शिकलेलो नाही. पण नात्यातल्या ज्येष्ठ लोकांकडून बऱ्याच गोष्टी ऐकल्या होत्या. तर मला याचं अर्थ काही कळला नाही, पण प्रसादने सांगितला. ‘हा देह म्हणजे जर मी नसेन तर मग मी कोण आहे?’ हे माझ्या बुद्धीला अगदी पटतं, कारण मी पूर्णपणे इहवादी किंवा जडवादी आहे तसा आहे. हे शरीर आहे म्हणजे मी आहे. त्यातलं यंत्र चालू आहे, ते देह नावाचं चालू यंत्र म्हणजे मी. त्याचं इलेक्ट्रिकल करंट कधीतरी बंद होईल. त्याच्यानंतर माती राहील. 

प्रसादच्या काही ओळी वाचतो, प्रश्न मीच्या syllabus बाहेरचा. ऐच्छिक त्यामुळे मीला त्याचं उत्तर साहिर लुधियानवी यांच्या सौजन्याने लगेच मिळालं... मी कोण? कोहम? who am I? याचं क्लीअर कट उत्तर इन्सान की औलाद... इन्सान.मला हिंदी सिनेमांची गाणी आयुष्याचं तत्त्वज्ञान देणारी वाटतात आणि तसा माझा अनुभव आहे. मी साहिर लुधियानवीचा भक्तच आहे. ‘तू हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा. इन्सान की औलाद हैं इन्सान बनेगा’ प्रसादने कोट केलेलं हे गाणं मला वाटतं ‘धूल के फूल’मधलं आहे. मलाही हे गाणं आवडतं. मग प्रसादने आई, पुरणपोळीची गोष्ट सांगितली आहे.

अतीत म्हणजे कोण? सर्वातीत. सर्वातीत म्हणजे सर्वांच्या पुढे जाणारा. इंग्लिशमध्ये सांगायचं झालं तर ‘ट्रान्ससेन्डिंग एवरीथिंग’. हे जे देह नावाचं यंत्र आहे, जे इलेक्ट्रिकल करंट चालू असेपर्यंत जिवंत आहे, ते यंत्र सगळ्यांना ट्रान्ससेन्ड करून जातं, सगळ्यांच्या पुढे जातं. कालातीत, स्थलातीत सगळ्या मर्यादा पार करून जातं. आपले बहुतेक सगळे चांगले कवी हेच वेगवेगळ्या रूपात सांगत असतात. साहीर लुधियानवी जसा माझा आवडता आहे, तसे केशवसुतही माझे आवडते आहेत. त्यांच्या एका कवितेतली एक ओळ अशी आहे

‘ज्ञाताच्या कुंपणावरून,

धीरत्व धरून,

उड्डाण करून,

चिद्घनचपला ही जाते,

नाचत तेथे चकचकते,

अंधुक आकृति तिस दिसती,

त्या गातासी

निगुड गीती;

त्या गीतीचे ध्वनि निघतो...

झपूर्झा... गडे झपूर्झा’

आता आपल्याला जगाबद्दल काय माहितीय? खरं तर काहीच माहीत नाही आपल्याला. एक बिल्लास बाय दीड बिल्लास आपलं ज्ञात क्षेत्र आहे. पण आपण उड्या मारून मारून पाहायचा प्रयत्न करत असतो की बाहेर काय आहे? उजेड कोण देतो? आपणच देतो. त्या उजेडात आपण पाहण्याचा, ऐकण्याचा, ज्ञान मिळवायचा सवर्तोपरी प्रयत्न करत असतो. जे माहिती आहे, ज्ञात आहे त्या सगळ्याच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करणे हा माणसाचा लक्षण गुण आहे. ‘मी कोण?’ हा प्रश्न दुय्यम आहे. प्रसादने फार सुंदर लिहिलं आहे. ‘मी कोण?’ हा प्रश्न बिन महत्त्वाचा का आहे ते.

माझ्याच वयाच्या माझ्या मित्राने, कुमार केतकरने सांगितलं होतं की, ‘‘मी कोण?’ प्रश्न महत्त्वाचा नाही. ‘मी कोणाचा?’ हा प्रश्न महत्त्वाचा आहे. मी कोणाकरता जगतो आहे, कोणाकरता काम करतो आहे, हे जास्त महत्त्वाचं आहे.’

याचा संबंध परत अतीत कोण म्हणजे अतिथी कोण यातून येतो. त्याच्याबद्दल प्रसाद लिहितो, ‘मी अतिथी आहे. हे कधीच विसरायचं नाही. henceforth पृथ्वीवर अगदी पाहुण्यासारखंच तिला न ओरबडता राहायचं. अन तिने मानाने दिलेली पुरणपोळी खात गुणानं म्हणायचं, अतीत कोण... मीच.' प्रसादचं अगदी खरंय. ओरबाडायचं नाही ही सवय लावून घेणं फार कठीण असतं. माणूस हे साधं जनावर नाही. हलकट, हिंस्त्र जनावर आहे. काही आवडलं तर ओरबाडायची भयंकर इच्छा होते. त्या वेळेला आपण इथे टेम्पररी आलेलो आहोत, पुढे जायचं आहे आणि आपल्या मागनं येणाऱ्या लोकांसाठी हे नीट ठेवायचं आहे, ही शहाणी जाणीव माणसाने ठेवायला हवी. शहाण्यासारखं वागायला माणसाला भयंकर प्रयत्न करावा लागतो. बहुतेक वेळेला ते जमत नाही.

आणखी एक उतारा वाचून दाखवतो. मला जे सांगायचंय ते प्रसादने इतकं चांगलं सांगितलंय की मी ते सुधारू शकत नाही. ‘व्हर्चुअल जगणाऱ्या मीने जमिनीवर यावं, राहावं. जमिनीशी इमान राखणाऱ्या कृतीशील व्यक्तींचं काम पहावं, समजून घ्यावं, त्याच्याबद्दल बोलावं. मी माध्यमाद्वारे कनेक्टेड राहतो. त्याला खंडीने मित्र आहेत. ते मीने आणखी खंडी खंडीने वाढवावेत. हरकत नाही. त्यांच्या माध्यमातूनसुद्धा जिथे कुठे चांगलं मूल्यात्मक काम होत आहे, ते सातत्याने समोर आणत राहावं. त्या कामात येनकेन प्रकारे स्वतःला सहभागी करून घ्यावं. मोबाईलमुळे जग छोटं झालंय. त्याच्या मदतीने जे जे ज्या ज्या पर्यावरणासाठी चांगलं, ते ते तिथून तिथून वेचावं. जे जे चांगलं आहे ते ते द्यावं, घ्यावं, सांभाळावं, वाढवावं, वाढवत न्यावं. आजच्या ट्रेंडनुसार सुरू असलेल्या भूतकाळातील सुवर्णकाळाचे नगारे, डांगोरे पिटत कर्णकर्कश हाकारे घालण्यात शक्ती खर्च करण्यापेक्षा, भूतकाळात झालेल्या अक्षम्य चुकांची वर्तमानात उजळणी होऊ नये, याची काळजी घ्यावी, घेत राहावी. झाल्या चुकांचं होता होईल तेवढ परिमार्जन करावं. आणि पुढच्या पिढीचं भविष्य उज्वल करता येईल का ते पहावं आणि समजा ते शक्य नसेल तर कमीत कमी त्यांचं भविष्य आपल्या हातून नासू नये याची जी-तोड़ कोशिश मीने जरूर करावी. आणि हे करताना जे जे भीतीदायक दिसेल असेल त्याला पाठ न दाखवता हिमतीने त्या भीतीच्या पोटात शिरून सुरक्षितता, प्रेम, जिव्हाळा एकमेकांत वाटत भीतीचं योग्य निराकरण करावं. अत्त दीप भव... आपण इथे पाहुणे आहोत ही जाणीव ठसवायचे अनेक मार्ग आहेत. त्यातला एक सुंदर, रीलॅक्स्ड मार्ग प्रसादने वापरला आहे.

प्रसाद म्हणतो की, तो आत्मकेंद्री आहे तर तो तसा का वाटत नाहीये हे तुम्हाला लक्षात आलं असेल. आत्मकेंद्री असेल तर भविष्याची काळजी कोण करेल? मला खायला आहे, मी खाऊन टाकेन, पुढच्याला उरलं नाही उरलं याच्या विचार कशाला करायचा. नामदेव ढसाळांची ‘माण्साने’ नावाची कविता आहे. तीन-चार पानाची. पहिल्या तीन पानात अत्यंत बीभत्स गोष्टी सांगितल्या आहेत. माणसाने कसं वागावं, माणसाने असं वागावं... शेवटी त्यांनी म्हटलं आहे- ‘आकाशाला बाप आणि जमिनीला आई म्हणून एक तीळ सात जणांनी करंडून खावा.’

ढसाळ जेव्हा सुरुवातीला आले, तेव्हा बीभत्स ते लिहितात वगैरे असं म्हटलं गेलं. पण पु. ल. देशपांडे यांनी म्हटलं- ही कविता वाचून मला ‘शांती शांती शांती’ म्हणावसं वाटतं. तसं थोडंसं मला प्रसादच्या पुस्तकानंतर वाटतं. मी का नाही लिहिलं हे? मला असं लिहिता आलं असतं तर मजा आली असती! पण कुणीतरी लिहिलं, तो मीच आहे!! तो माणूस आत्मकेंद्री असू शकत नाही. एक शेर आहे, आठवत नाही नीट. पण मी एक पाण्याचा थेंब आहे. एकटा वाहू नाही शकत. वाहायला इतरांबरोबरच जावं लागतं.

फार चांगलं काम प्रसादच्या हातून झालंय. त्याचं अभिनंदन.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

Post Comment

Amit Trivedi

Sun , 21 February 2021

मी प्रसाद कुमठेकर ह्यांच्या तिन्ही कादंबऱ्या वाचल्या आहेत, बगळा , बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या , आणि अतीत कोण मीच ... एका पाठोपाठ तिन्ही पुस्तके वाचून झाल्यानंतर आपणहून मला असं वाटायला लागलाय कि मी उदगिरचा आहे जणू. हे तिन्ही पुस्तक इतर पुस्तकांपेक्षा नक्कीच वेगळे आहे, त्यामुळे वाचकांनी सुद्धा हे पुस्तक वाचायला हाती घेतल्यानंतर एक विशेष काळजी घ्यायला हवी ती अशी कि पुस्तकांचा मजकूर उदगिरी भाषेचा असून वाचकाला सुरवातीला वाचताना अवघडल्या सारखं होईल, त्यामुळे नकळत वाचलेल्या लिखाणाचा संधर्भ लगेच न कळल्याने पुस्तक नकळत पणे बाजूला ठेवून देण्याची माफक चूक बहुतांश वाचका कडून होऊ शकते. अश्या वाचकांना मोलाचा सल्ला असा आहे कि तुम्ही एक दोन पानं वाचत गेलात तर सहज त्या भाषेशी एकरूप व्हाल आणि वाचताना नक्कीच निखळ आनंद प्राप्त झाल्या शिवाय राहणार नाही लेखक प्रसाद कुमठेकर ह्यांच्या हातून ह्या तिन्ही पुस्तकाच्या रूपाने जे काही आहे ते फार सुंदर असं घडून आलाय.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

म. फुले-आंबेडकरी साहित्याकडे मी ‘समाज-संस्कृतीचे प्रबोधन’ म्हणून पाहतो. ते समजून घेण्यासाठी ‘फुले-आंबेडकरी वाङ्मयकोश’ उपयुक्त ठरणार आहे, यात शंका नाही

‘आंबेडकरवादी साहित्य’ हे तळागाळातील समाजाचे साहित्य आहे. तळागाळातील समाजाचे साहित्य हे अस्मितेचे साहित्य असते. अस्मिता ही प्रथमतः व्यक्त होत असते ती नावातून. प्रथमतः नावातून त्या समाजाचा ‘स्वाभिमान’ व्यक्त झाला पाहिजे. पण तळागाळातील दलित, शोषित व वंचित समाजाला स्वाभिमान व्यक्त करणारे नावदेखील धारण करता येत नाही. नव्हे, ते करू दिले जात नाही. जगभरातील सामाजिक गुलामगिरीत खितपत पडलेल्या समाजघटकांचा हाच अनुभव आहे.......

माझ्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवलेला हा सीमारेषाविहिन कवी तुमच्याही हृदयात घरोबा करो. माझ्याइतकंच तुमचंही भावविश्व तो समृद्ध करो

आताचा काळ भारत-पाकिस्तानातल्या अधिकारशाही वृत्तीच्या राज्यकर्त्यांनी डोकं वर काढण्याचा आहे. अशा या काळात, देशोदेशींच्या सीमारेषा पुसून टाकण्याची क्षमता असलेल्या वैश्विक कवितांचा धनी ठरलेल्या फ़ैज़चं चरित्र प्रकाशित व्हावं, ही घटना अनेक अर्थांनी प्रतीकात्मकही आहे. कधी नव्हे ती फ़ैज़सारख्या कवींची या घटकेला खरी गरज आहे, असं भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतल्या विवेकवादी मंडळींना वाटणंही स्वाभाविक आहे.......