‘मोहॉक व्हॅली फॉर्म्युला’ : आंदोलन चिरडण्याचे प्रोपगंडा आधारित ‘शास्त्रशुद्ध’ सूत्र
पडघम - विदेशनामा
रवि आमले
  • ‘मोहॉक व्हॅली फॉर्म्युला’
  • Thu , 11 February 2021
  • पडघम विदेशनामा मोहॉक व्हॅली फॉर्म्युला Hungama Mohawk Valley Formula आंदोलन Agitation संप Strike कामगार Worker

ही गोष्ट तशी फार दूरची आहे. लांबवरची आणि जुन्या काळातील.

आणि आपण तर राहतो नव्या भारतात. तेव्हा या इतिहासात जाण्याचे कारणच काय? या गोष्टीचा आणि आपल्या नव्या भारतातील उत्तम परिस्थितीचा काय संबंध? असे प्रश्न पडण्याची शक्यता आहे. परंतु ते तसे नाही. त्या गोष्टीचे तात्पर्य सार्वकालिक. तेव्हा आजच्या, कालच्या आणि उद्याच्याही परिस्थितीच्या आकलनास ते उपयुक्त ठरू शकते. तेव्हा ही गोष्ट जाणून घेणे आवश्यक ठरते.

तर ती आहे अमेरिकेतल्या मोहॉक व्हॅली नावाच्या भागातली. हे न्यू यॉर्क राज्यातील खोरे. जमीन, पाणी आदी नैसर्गिक साधनसंपत्ती मुबलक. त्यामुळे तेथे अनेक उद्योग एकवटलेले. रेमिंग्टन रँड टाईपरायटर कंपनी ही त्यातलीच एक. ती मूळची नॉईसलेस टाईपरायटर कंपनी. जोसेफ मेरियम हा तिचा मालक. १९२४ मध्ये ती रेमंग्टिन कंपनीत विलिन झाली. तिचे नामांतर झाले. पण स्थानिक लोकांसाठी ती ‘नॉईसलेस’च राहिली.

कंपनीचे नाव नॉईसलेस. आवाजहीन. पण तिशी-चाळिशीच्या दशकांत त्या टाईपरायटर कंपनीत झालेल्या संपांचा कडकडाट मात्र अमेरिकाभर गाजला. अमेरिकेतील औद्योगिक जगतातील खळबळीची वर्षे ती. पहिले महायुद्ध संपले होते. दुसऱ्याची तयारी सुरू झाली होती. तिकडे रशियात बोल्शेविकांची क्रांती झाली होती. सोव्हिएत साम्यवादाचे आकर्षण युरोप-अमेरिकेत वाढत चालले होते.

अमेरिकेतील कामगार चळवळ तशी त्या आधीची. सोशलिस्ट पार्टी ऑफ अमेरिका, इंडस्ट्रियल वर्कर्स ऑफ द वर्ल्ड यांच्या माध्यमातून तेथे कामगार चळवळ सुरू झालेली होती. अमेरिकन फेडरेशन ऑफ लेबर या कामगार संघटनेची स्थापना तर डिसेंबर १८८६ मधील. म्हणजे आपल्याकडे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेचे अधिवेशन मुंबईत झाले, त्यानंतर बरोबर एक वर्षानंतरची. १९१७च्या रशियन क्रांतीने त्या कामगार चळवळीला शास्त्रीय साम्यवादाचे बळ लाभले.

या कामगार चळवळीच्या मागण्या काही अगदीच अवाजवी नव्हत्या. कालांतराने त्या मागण्या मान्य झाल्या, त्याबाबतचे कायदे झाले यावरून त्यांचे वाजवीपण नक्कीच स्पष्ट होते. पण तेव्हा हे सारे चळवळे, आंदोलक, साम्यवादी म्हणजे देशाचे शत्रू ठरले होते भांडवलशाहीच्या पुरोहितांसाठी. एकदा आपण म्हणजेच देश अशी भावना निर्माण केली की, आपल्या शत्रूंना थेटच देशाचे शत्रू म्हणता येते. पण ते असो. आपल्याला गोष्ट समजून घ्यायची आहे - रेमिंग्टन रँड कंपनीची आणि मोहॉक व्हॅलीची.

..................................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी पहा - सर्व प्रकारच्या कट्टरतेला नाकारणाऱ्या ‘इन्शाअल्लाह’ या अभिराम भडकमकर यांच्या बहुचर्चित कादंबरीवरील ‘परीक्षण’ स्पर्धा

..................................................................................................................................................................

तर अमेरिकन फेडरेशन ऑफ लेबरने आपल्या या रेमिंग्टन रँड टाईपरायटर कंपनीतल्या कामगारांची संघटना स्थापन केली. १९३४ साली कंपनीशी संघटनेचा करार झाला. कामगारांत आनंदी आनंद झाला. पण कंपनीचे मालक जेम्स रँड ज्युनियर यांच्यासाठी तो सारा नाखुशीचा मामला होता. त्यांनी करार केला खरा, पण त्याची अंमलबजावणी करायची टाळाटाळ सुरू केली. हळूहळू कामगारांत अविश्वासाचे, संशयाचे वातावरण निर्माण झाले. तशात कामगारांच्या कामी बातमी आली की, कंपनी बरीचशी कामे दुसऱ्या युनिटमध्ये हलवणार आहे. कामगार अस्वस्थ झाले. संघटनेचे प्रतिनिधी व्यवस्थापनाकडे खुलासे मागत होते. व्यवस्थापन त्यांना उडवून लावत होते. तोवर जुना करार संपत आला होता. नवा करार करायचा होता. पण त्यालाही कंपनीने नकार दिला. झाले, ठिणगी पडली. संघटनेने मतदान घेतले आणि त्यात ठरले संपावर जायचे. हे साल होते १९३६.

संघटनेने संपाची हाक दिली. पण तत्पूर्वी सर्वमान्य तोडग्यासाठी कंपनीला साकडेही घातले. कंपनीने त्यालाही नकार दिला. उलट कंपनीच्या ठिकठिकाणच्या युनिटमधील कामगार नेत्यांना कामावरून काढून टाकण्याचे सत्र सुरू केले. आगीत तेलच ओतले गेले त्याने. आणि अखेर २५ मे १९३६ रोजी कामगारांनी हत्यारे खाली ठेवली. मोहॉक व्हॅलीच्या इतिहासातील एका मोठ्या आणि तेवढ्याच हिंसक अशा ऐतिहासिक संपाला सुरुवात झाली. साडेसहा हजार कामगार त्यात सहभागी झाले होते.

यास ऐतिहासिक का म्हणायचे, तर कामगारांच्या या आंदोलनातून संपफोडीचे एक नवे ‘शास्त्र’ जन्माला आले. तशी संपफोडी नवी नाही. अमेरिकेत तर त्या काळी संपफोड्यांच्या व्यावसायिक कंपन्या होत्या. जेम्स फार्ले हे त्यातील एक कुप्रसिद्ध नाव. ‘बॉस’ ही त्याची उपाधी. हाणामाऱ्या करून औद्योगिक संप फोडायचे यास व्यावसायिक स्वरूप देणाऱ्या पहिल्या काही व्यक्तींत त्यांचे नाव अग्रस्थानी घेतले जाते. कामगारांना हाणामारी करण्याचा व्यवसाय करणारा हा गडी होता क्षयरोगी. आपल्याला मार पडू नये म्हणून दहा अंगरक्षक घेऊन सतत फिरायचा तो. वयाच्या ३९व्या वर्षी क्षयरोगाने वारला तो.

पर्ल बर्गॉफ नावाचा त्याचा चेला होता. पुढे त्याने आपल्या बंधुरायासोबत एक कंपनी सुरू केली. तिचे नाव होते - बर्गॉफ स्ट्राईक सर्व्हिस अँड लेबर अॅडजस्टर्स. मालकवर्गात मोठे नाव कमावले होते त्याने. संपकरी कामगारांवर हल्ले करायचे, त्यांच्या वसाहतींवर दगडफेक करून दहशत निर्माण करायची, संप फोडण्यासाठी कंपनीत कामगार म्हणून गुंड घुसवायचे वगैरेंत त्याचा हातखंडा. याला बर्गॉफ तंत्र म्हणतात. आपल्याकडील गिरणी कामगारांच्या ऐतिहासिक संपाचा इतिहास माहित असणाऱ्यांना हे तंत्र चांगलेच ओळखीचे असेल. तर जेम्स रँड यांनी या पर्ल बर्गॉफला संपफोडीचे कंत्राट दिले. त्याने पहिला हल्ला चढवला मोहॉक व्हॅलीतल्या इलियन येथील युनिटमध्ये.

या अशा गोष्टी सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादाशिवाय कधीही घडत नसतात. येथेही इलियनमधल्या ३०० पोलिसांच्या तुकडी या संपफोड्यांच्या साह्याला होती. गुंडांनी संपकऱ्यांना मारहाण करायची, परप्रांतातून बदली कामगार आणून त्यांना पोलिस संरक्षणात कंपनीत घुसवायचे आणि पोलिसांनी आंदोलकांना हिंसाचाराबद्दल गजाआड करायचे, न्यायालयांनी त्यांना तुरुंगात टाकायचे, असे ते सारे सर्वपरिचित तंत्र. पण मग या आंदोलनाचे एवढे ऐतिहासिक वगैरे कौतुक कशासाठी?

ते अशासाठी की, यात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर प्रोपगंडाच्या तंत्रांचा वापर करण्यात आला होता. संपफोड्यांचा वापर करून दहशत निर्माण करता येते. संप संपवता येतात. पण त्याचा दुष्परिणाम कंपन्यांच्या प्रतिमेवरही होतो, हे एव्हाना उद्योगपती मंडळींच्या लक्षात आले होते. संपातील कंपनीपुरस्कृत हिंसाचारास नेहमीच राजकीय पाठिंबा मिळत नसतो, कारण अखेर तो कामगार हा मतदारही असतो, हेही उद्योगपतींच्या ध्यानात आले होते. यातून मार्ग काढण्यासाठी उद्योजकांच्या साह्याला आली जनसंपर्क कलेतील तज्ज्ञमंडळी. यांनी दाखवून दिले की डोकी फोडण्याच्या जुन्या पद्धती आता फारसे काम करू शकत नाहीत. अखेर कामगारांनाही डोकी फोडता येतात. तेव्हा डोकी फोडण्याबरोबरच डोकी बदलण्याचाही, फिरवण्याचाही प्रयत्न करायला हवा. या विचारांतून आंदोलने चिरडण्याची एक शास्त्रशुद्ध पद्धत निर्माण झाली. ती ओळखली जाते मोहॉक व्हॅली फॉर्म्युला या नावाने. हे नाव आज अनेकांना अपरिचित असेल. पण ते सूत्र मात्र आजही वापरले जाते. आजही ते सुस्पष्टपणे दिसते.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

या मोहॉक व्हॅली सूत्रातील मध्यवर्ती कल्पना साधीसोपीच होती. आंदोलक कोणीही असोत, त्यांच्याविरोधात समाजमन तयार करायचे. आंदोलक - मग ते कोणत्याही क्षेत्रातील असोत - त्यांच्याविरोधात उर्वरित जनतेला उभे करायचे. समाजात ‘ते विरुद्ध आपण’ असे द्वंद्व निर्माण करायचे. हे आंदोलक म्हणजे काही परग्रहावरचे प्राणी नसतात. आपल्यातीलच असतात ते. पण चित्र असे रंगवायचे की, ते व्यवस्थेत तोडफोड करणारे आहेत, समाजकंटक आहेत, ‘समाजा’साठी - म्हणजे सामान्य नागरिक, उद्योजक, व्यावसायिक, कामगार, कामगारांची कुटुंबे, गृहिणी अशा उर्वरित सर्व वर्गासाठी म्हणजेच आपल्यासाठी – धोकादायक आहेत. आता तर त्यांना देशविरोधी ठरवणेही सोपे झाले आहे. आणि एकदा ते समाजविरोधी, देशद्रोही ठरले की कोण त्या आंदोलकांच्या पाठीमागे उभे राहणार?

मुळात सर्वांनाच शांततेत जगायचे असते. संघर्ष नको असतो. एकमेकांच्या हातात हात घालून एकसंघपणे समाज चालला पाहिजे ही इच्छा असते आपली. त्या भावनेचा वापर या सूत्रात व्यवस्थित केला जातो. आंदोलक हे सामाजिक सौहार्दाचे वातावरण नष्ट करू पाहात आहेत याची ध्वनिफीत लोकांसमोर सातत्याने वाजवली जाते. साधी गोष्ट आहे. समजा आपल्याला कोणी विचारले की, तुम्हांला सामाजिक सौहार्द हवे की नको? तुमचा सामाजिक शांततेला पाठिंबा आहे की नाही? तर आपण काही नाही असे म्हणणार नाही. हे प्रश्न ‘तुमचे देशावर प्रेम आहे की नाही’, ‘तुम्ही आपल्या सैनिकांच्या पाठीशी आहात की नाही?’ यांसारखेच असतात. त्यांना कोण नकारार्थी उत्तर देईल? खरे तर हे अत्यंत पोकळ आणि भाबडे असे प्रश्न. आता या देशप्रेमाचे परिमाण काय? टेबलाखालून लाच घेणारे-देणारे, भ्रष्टाचारी, कंत्राटातील टक्केवारी खाणारे, वाहतुकीचे नियम मोडून अपघाताची संभाव्यता वाढविणारे, नियम न पाळणारे, पैसे घेऊन मतदान करणारे, विद्वेषाधारित विचारसरणी बाळगणारे, दंगलखोर, हरामखोर सारे सारे स्वतःला देशप्रेमीच समजत असतात. याच लोकांना सांगा, की आंदोलक हे शांततेचा आणि सौहार्दाचा भंग करीत आहेत, तातडीने आणि भाबडेपणाने ते त्यावर विश्वास ठेवतात. येथे माध्यमांची भूमिका महत्त्वाची असते. ती हाताशी असावी लागतात. 

रेमिंग्टन रँडमध्ये कामगार संघटनेने संपाची हाक दिल्यानंतर रँडसाहेब मजकुरांनीही तेच केले. त्यांनी आंदोलकांचे मोठ्या प्रमाणावर प्रतिमाहनन सुरू केले. ते संपकरी कामगार खरे कामगार नाहीतच. त्यांचे नेते हे ‘अॅजिटेटर’ आहेत. म्हणजे ते लोकांना भडकावणारे आहेत. कोणाच्या तरी सांगण्यावरून ते काम करत आहेत. ते गणशत्रू आहेत, समाजकंटक आहेत. असा सारा प्रचार चालवला. आंदोलकांच्या, त्यांच्या नेत्यांच्या विश्वासार्हतेवर आघाताचा हा प्रयत्न. ती संपवणे हे या प्रोपगंडाचे काम.

याच बरोबर आणखी एक गोष्ट करण्यात आली. ती म्हणजे बहुसंख्य विरुद्ध अल्पसंख्य असा वाद निर्माण करण्यात आला. फार चलाखीने केला जातो हा उद्योग. लोकशाहीत लोकसंख्या महत्त्वाची असते आणि नेत्यांची ताकद त्यांच्या अनुयायांत असते. या दोन गोष्टी लक्षात घेऊन, त्या आंदोलक नेत्यांमागे मोजकेच लोक आहेत, हे सातत्याने, वारंवार बिंबवले जाते. आंदोलक हे अल्पसंख्य आहेत आणि म्हणून ते बहुसंख्येच्या विरोधात आहेत आणि बहुसंख्याकांची बाजू नेहमीच न्यायाची असते आणि म्हणून आपण बहुसंख्याकांबरोबर राहिले पाहिजे, हे स्पष्ट न सांगताही मग जनतेला समजते. यातून मग आंदोलनास असलेली सामाजिक सहानुभूती खिळखिळी होते.

याकरता आणखी एक प्रोपगंडा तंत्र वापरले जाते. ते म्हणजे फ्रंट ग्रुपची स्थापना. फ्रेंच तत्त्वज्ञ जॅक इलूल यांनी लोकशाहीतील प्रोपगंडाबद्दल बोलताना म्हटले होते की, सरकारने जे आधीच ठरवलेले असते, त्याचीच मागणी जनतेला सरकारकडून करायला लावणे हे त्याचे वैशिष्ट्य. फ्रंट ग्रुपची स्थापना केली जाते ती त्यासाठीच. ज्यांचा प्रोपगंडा करायचा आहे त्यांच्याशी या फ्रंट ग्रुपचा काहीही संबंध नाही असे दाखवले जाते आणि त्या गटांच्या माध्यमातून आपल्याला हवी ती माहिती प्रसारित केली जाते. रेमिंग्टन रँड संपातही त्यांच्या पाळीव प्रोपगंडा-पंडितांनी ‘नागरिकांची समिती’ स्थापन केली. हा फ्रंट ग्रुप. त्यात समाजातील प्रतिष्ठित नागरिक, महिला, धर्मगुरू, लेखक, बँकर, उद्योजक, व्यापारी यांचा समावेश करण्यात आला. ही समिती नागरिकांच्या सभा घ्यायची. त्यांतून आंदोलनाविरोधात जनभावना तयार करण्याचा प्रयत्न करायची. आंदोलकांवर दबाव आणायचा. एक प्रकारे हे आंदोलकांच्या विरोधातील आंदोलनच.

आंदोलनाविषयीची सामाजिक सहानुभूती नष्ट करण्यासाठी आणखी एक बाब उपयुक्त ठरते - आंदोलनातील हिंसाचार. मोहॉक व्हॅली सूत्रात यास महत्त्वाचे स्थान आहे. या सूत्रानुसार पहिल्यांदा आंदोलक नेते हे उपद्रवी आहेत, समाजकंटक आहेत, दहशतवाद पसरवणारे आहेत, असा प्रचार करायचा असतो. त्यांचा मुकाबला करण्यासाठी मग पोलिसी बळाचे साह्य घ्यायचे असते. आपले गुंड तर असतात. त्यातून हिंसेची शक्यता निर्माण होते. हे आंदोलक कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणार आहेत, ते हिंसाचार घडवणार आहेत, असे वातावरण तयार केले जाते. नागरिकांच्या मनात त्याचे भय निर्माण केले जाते. त्याची पुरेशी व्यवस्था झाली की प्रत्यक्ष हिंसाचार घडवायचा. आंदोलनात हिंसाचार शिरला की ते मोडणे केव्हाही सोपेच.

..................................................................................................................................................................

हेही पाहा : श्रमजीवी, बुद्धिजीवी, आंदोलनजीवी, परोपजीवी आणि तुच्छताजीवी वगैरे वगैरे...

..................................................................................................................................................................

अशा परिस्थितीत पोलिसांचा मोठ्या प्रमाणावर वापर करायचा. कोणत्याही आंदोलनाच्या ठिकाणी राज्याची ही दंडशक्ती मोठ्या प्रमाणावर दिसली, की आपोआपच त्याचा नागरिकांच्या नीतीधैर्यावर परिणाम होतो. हे सर्व सुरू असतानाच, संप कसा फसलेला आहे, कारखाने कसे सुरळीत चाललेले आहेत, याचा प्रचार करायचा. प्रसिद्धी माध्यमांतून अपमाहितीचा भडिमार करायचा. कामावर येण्यासाठी कामगार तयार आहेत, परंतु आंदोलक नेत्यांचे गुंड त्यांना धमकावत आहेत. अमुक ठिकाणी संपावरील कामगारांनी माघार घेतली. आंदोलकांचा तमुक नेता मिल मालकांशी चर्चा करत आहेत... नाना अफवा पसरवायच्या.

रेमिंग्टन रँडच्या टोनावँडा युनिटमध्ये असाच प्रयोग करण्यात आला. कामगार संपाला कंटाळले आहेत, त्यांना संप नको आहे, त्यातील काही संपातून बाहेर पडणार आहेत, ते कामावर परतणार आहेत, अशी अफवा पहिल्यांदा रँड यांनी पसरवली. मग नॅशनल मेटल ट्रेडर्स असोसिएशन या उद्योजकांच्या संघटनेने बाहेरून ८५ गुंड पाठवले. कामगाराच्या वेशात ते कंपनीच्या गेटवर आले. ते कंपनीत शिरू लागताच अपेक्षेनुसार संपकऱ्यांनी त्यांना अडवले. तेथे तुफान हाणामारी झाली. रँड यांचे छायाचित्रकार बाजूला तयारच होते. त्यांनी त्याची छायाचित्रे घेतली. दुसऱ्या दिवशी सर्व वृत्तपत्रांत बातम्या झळकल्या की, कामावर परतू इच्छिणाऱ्या प्रामाणिक कामगारांना संपकऱ्यांकडून मारहाण.

यातून मग संपकऱ्यांबाबतची समाजातील सहानुभूती आपोआपच कमी होत जाते. कारण ‘आपण’ नेहमीच सामाजिक सौहार्दाच्या आणि शांततेच्या बाजूचे असतो. हा ‘ते विरुद्ध आपण’ संघर्ष मोठा मजेशीर असतो. आपण मागण्या घेऊन उभे राहिलो की, आपण ‘ते’ होतो. बाकीच्या वेळी आपण ‘आपण’च असतो. आणि मग ‘त्यांची’ बाजू कितीही बरोबर असो, मागण्या वाजवी असोत, ‘त्यांच्या’वर अन्याय होत असो, आपण असेच म्हणू लागतो की, संघर्ष करण्याचा मार्ग संप/बंद/निदर्शने/मोर्चा हा नव्हे. आंदोलकांनी शांततेने चर्चा करून समस्या सोडवली पाहिजे. संघर्षामुळे समाजाचे म्हणजे ‘आपले’ नुकसान होते. आपण विकासाच्या बाजूने असले पाहिजे. रेमिंग्टन रँड कंपनीचे म्हणणे हेच होते. त्यांना विकासच हवा होता, शांतताच हवी होती. ती त्यांनी प्रस्थापित केलीही.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

वरवर पाहता हे किती साधेसोपे वाटते. अवघे पाच-सहाच तर मुद्दे आहेत. -

१. आंदोलकांच्या नेत्यांचे प्रतिमाहनन. (ते संपास सोकावलेले आहेत. आपल्याकडे त्यासाठी आता एक नवा शब्द आलाय. आंदोलनजीवी. तर ते तसे आहेत, असा प्रचार करायचा. त्यांना समाजद्रोही, देशद्रोही ठरवायचे. हे प्रोपगंडातील राक्षसीकरणाचे तंत्र.)

२. कायदा आणि सुव्यवस्थेचा झेंडा उभारणे. (त्याखाली आंदोलकांविरुद्ध सत्तेचे बळ उभे करायचे. पोलिस आणि न्यायालयांची मदत घ्यायची. रेमिंग्टन रँड संपातील एक घटना आहे. कंपनीने भरलेल्या बदली कामगारांविरुद्ध निदर्शने सुरू होती. त्यावेळी दोन किशोरवयीन मुलींनी त्या कामगारांना रबरी उंदीर दाखवला. तर या गुन्ह्यासाठी न्यायालयाने त्या दोघींना तीस दिवस कारावासाची शिक्षा ठोठावली.)

३. फ्रंट ग्रुप, जाहीर सभा, माध्यमे यांद्वारे दबाव आणणे.

४. आंदोलकांविरोधात पोलिसी बळ उभे करून नागरिकांच्या मनावर मानसिक परिणाम घडवून आणणे.

५. हिंसाचारातून, अपप्रचारातून आंदोलनाबद्दलची सामाजिक सहानुभूती नष्ट करणे.

६. अपमाहिती, असत्ये, अफवा यांद्वारे आंदोलनाचे फोलपण अधोरेखीत करणे.

रेमिंग्टन रँड कंपनीने अशा सर्व तंत्रांचा वापर केला. पुढे संप मिटला. असे सांगतात की, त्यानंतर ‘नॅशनल असोसिएशन ऑफ मॅन्युफॅक्चरर्स’ या उद्योजकांच्या संघटनेच्या वार्तापत्रात या सर्व बाबी सूत्रबद्ध करण्यात आल्या. तोच हा ‘मोहॉक व्हॅली फॉर्म्युला’. आता चांगलाच रुळला आहे तो. इतका की, त्याचा वापर करण्यासाठी कोणाला त्याचे नाव माहीत असण्याचीही आवश्यकता नाही. तो फार लांबून, जुन्या काळातून आलेला असला तरी काही बिघडत नाही. नव्या भारतात आसपास पाहिले तरी तो दिसतो, जाणवतो.

..................................................................................................................................................................

लेखक रवि आमले ज्येष्ठ पत्रकार असून, त्यांचे ‘प्रोपगंडा’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे.

ravi.amale@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......