श्रमजीवी, बुद्धिजीवी, आंदोलनजीवी, परोपजीवी आणि तुच्छताजीवी वगैरे वगैरे...
पडघम - देशकारण
राम जगताप
  • आंदोलनजीवी आणि तुच्छताजीवी
  • Wed , 10 February 2021
  • पडघम देशकारण श्रमजीवी ShramJivi बुद्धिजीवी budhhiJivi आंदोलनजीवी AandolanJivi परोपजीवीParopJivi तुच्छताजीवी TuchhtaJivi

काही वर्षांपूर्वी ‘गोड शब्दांच्या भाकरी होत नाहीत’ असं एक वाक्य कादंबरीकार वि. स. खांडेकर यांच्या कुठल्याशा कादंबरीत वाचल्याचं आठवतं. आणि ‘दुसऱ्यासाठी जगलास, तरच जगलास, स्वतःसाठी जगलास तर मेलास’ असं एक वाक्य अनंत काणेकर यांच्या एका लघुनिबंधात वाचल्याचं आठवतं. परवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं संसदेतलं भाषण ऐकताना ‘तुच्छताजीवी’ असा एक शब्द सारखा आठवत होता. ‘श्रमजीवी’, ‘बुद्धिजीवी’ हे शब्द आपण ऐकलेले असतात. सध्या देशात ‘आंदोलनजीवी’ नावाची नवी जमात तयार झालीय, असं मोदी सांगत होते. मोदी हे स्वतंत्र भारतातले असे एकमेव पंतप्रधान असावेत, जे नेहमी बोलताना, भाषण करताना प्रत्येक गोष्टीची अर्धीच बाजू सांगत असतात. परवाही त्यांनी तसंच केलं. ते ‘आंदोलनजीवी’ जमातीबद्दल बोलले. पण ते पंतप्रधान झाल्यापासून देशात ‘तुच्छताजीवी’ अशी एक नवी जमातही उदयाला आलीय. तिच्याबद्दल बोलणं मात्र त्यांनी टाळलं. ही ‘तुच्छताजीवी’ जमात ‘तिरस्कारयुक्त शब्दांनी असत्य हेच सत्य’ म्हणून प्रस्थापित करण्याचं काम ठासून करत असते.

सगळेच ऋतू तीव्र असलेल्या उत्तर भारतात थंडी-वाऱ्यात आणि वयाचा विचार न करता जे शेतकरी आबालवृद्ध गेले सव्वादोन-अडीच महिने आपल्या न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत, त्यांना पंतप्रधान मोदी यांनी ‘आंदोलनजीवी’ या शब्दांनी हिणवलं आहे. आणि त्यांच्यापासून देशातील जनतेनं सावध राहायला हवं, असंही सुचवलं आहे. कविवर्य नारायण सुर्वे यांची कामगारांविषयीची एक कविता आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे -

‘एकटाच आलो नाही युगाचीही साथ आहे

सावध असा तुफानाची हीच सुरवात आहे’

आपल्या अवतीभवती कुठलं तुफान घोंघावतंय याची या देशातल्या आत्ममग्न मध्यमवर्गीयांना अजून फारशी जाणीव झालेली नाही. आपल्या पोटापाण्यासाठी जे रात्रंदिवस राबतात, ते शेतकरी जीव पणाला लावून आंदोलन करत आहेत, त्यांना देशभरातून मिळणारा पाठिंबा दिवसेंदिवस वाढतो आहे. त्यामुळे केंद्र सरकार सैरभैर झालंच आहे, पण या सरकारच्या समर्थक असलेल्या ‘तुच्छताजीवीं’नीही सावध होण्याची गरज आहे. उद्या हे तुफान तुमच्या दारात येऊन थडकू शकतं. त्यामुळे मोदींनी दिलेला इशारा अगदी योग्यच म्हणावा असा आहे.

..................................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी पहा - सर्व प्रकारच्या कट्टरतेला नाकारणाऱ्या ‘इन्शाअल्लाह’ या अभिराम भडकमकर यांच्या बहुचर्चित कादंबरीवरील ‘परीक्षण’ स्पर्धा

..................................................................................................................................................................

त्याचबरोबर ‘इन लोगों को पहचानाना होगा’ असंही मोदींनी सांगितलं. या वाक्याचा मोदींना गर्भित असलेला अर्थ कदाचित वेगळा असू शकतो. आधी म्हटल्याप्रमाणे मोदींना अर्धीच गोष्ट सांगायची खोड असल्यामुळे आपण उरलेली अर्धी गोष्ट समजून घेणं, हे आपलं कर्तव्य आहे. खरं म्हणजे देशातील जनतेनं ‘आंदोलनजीवी’ लोकांपासून सावध राहायला हवं, एवढं सांगून मोदींना थांबता आलं असतं. पण त्यांनी या ‘आंदोलनजीवीं’ची देशातील जनतेनं ‘पहचान’ म्हणजेच ‘ओळख’ करून घेतली पाहिजे, असंही सांगितलं. त्यांचं म्हणणं खरंच आहे. साक्षात मोदींनीच सांगितल्यामुळे देशातील जनता, निदानपक्षी त्यांचे समर्थक, भक्त ही ओळख करून घेण्याचं काम करतील, अशी आशा करायला हरकत नाही.

करोनाकाळातल्या लॉकडाउनमध्ये हातावर पोट असलेले हजारो ‘श्रमजीवी’ आपल्या पायाचे तुकडे पडेपर्यंत घरादाराच्या दिशेनं चालत निघाले. या प्रवासात आपल्या बायकोमुलांसह प्रवास करताना कोण वाटेतच थकून बसलं, कुणाचा अपघात झाला, कुणाला वाटेतच मृत्यू आला. तरीही या ‘श्रमजीवीं’तले जे कुणी घरी पोहचले, त्यातल्या अनेकांना त्यांच्याच गाववाल्यांनी गावाच्या सीमेवरच रोखलं. सरकारच्या धोरणामुळे ही दुर्गती त्यांच्यावर ओढवली, पण सरकारने त्यांची पर्वा केली नाही. कारण हातावर पोट असलेल्या या ‘श्रमजीवीं’नी करोनाकाळात स्वत:चा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. मोदी सरकारने या ‘श्रमजीवीं’ची किती तत्परतेनं काळजी घेतली, हे आपल्यापैकी अनेकांनी टीव्हीवर पाहिलं, वर्तमानपत्रांत वाचलंच असेल. तेव्हा मोदींनी ‘इन लोगों को पहचानाना होगा’ असं सांगितल्याचं आठवत नाही.

नोटबंदीच्या काळात दिवसरात्र एटीएमच्या रांगेत उभं राहून राहून आणि त्यापायी झालेल्या चेंगराचेंगरीत अनेकांचा मृत्यू झाला. तेव्हाही मोदींनी ‘इन लोगों को पहचानाना होगा’ असं म्हटलं नाही. करोनाकाळातल्या लॉकडाउनमध्ये केवळ ‘श्रमजीवी’च नाहीतर ‘बुद्धिजीवीं’च्या नोकऱ्या गेल्या, त्यांच्या पगारात कपात झाली, तेव्हाही मोदींनी ‘इन लोगों को पहचानाना होगा’ असं देशवासियांना सांगितलं नाही. ते, त्यांचं सरकार आणि त्यांचे समर्थक नोटबंदीमुळे कसा फायदा झाला आणि लॉकडाऊनमुळे करोना कसा आटोक्यात राहिला, हेच सांगत राहिले.

याशिवाय देशातल्या ‘बुद्धिजीवीं’चा एक छोटासा गट सोशल मीडियाच्या माध्यमातून गेल्या सहा-सात वर्षांत केंद्र सरकारच्या धोरणांविषयी आपली नाराजी व्यक्त करतो आहे. त्यांच्याविषयी ‘इन लोगों को पहचानाना होगा’ असं मोदींनी देशवासियांना जाहीरपणे सांगितल्याचं आठवत नाही, पण कदाचित त्यांच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना सांगितलं असावं. त्यामुळे या कार्यकर्त्यांनी एक ‘ट्रोल आर्मी’ तयार करून ती या ‘बुद्धिजीवीं’चा समाचार घेण्यासाठी कामाला लावली.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

थोडक्यात श्रमजीवी, बुद्धिजीवी आणि आंदोलनजीवी यांच्याविषयी ना मोदींना प्रेम आहे, ना त्यांच्या पक्षाला. मग त्यांना कुणाबद्दल प्रेम आहे? तर ‘परोपजीवीं’बद्दल. हे परोपजीवी कोण आहेत? प्रसारमाध्यमांतल्या ‘परोपजीवीं’ना रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते पत्रकार रवीश कुमार यांनी नाव दिलं आहे - ‘गोदी मीडिया’. हा मीडिया आणि त्यातले परोपजीवी दिवसरात्र मोदी आणि त्यांच्या सरकारच्या आरत्या ओवाळत राहतात. म्हणजेच त्यांच्याच जीवावर जगतात. याशिवाय सिनेक्षेत्रातले काही कलाकार, खेळाडू, वेगवेगळ्या क्षेत्रातले अभ्यासक, प्रशासकीय सेवेतले आजी-माजी अधिकारी, न्याययंत्रणेतले काही महानुभाव अशी एक मोठी जमात ‘परोपजीवी’ म्हणजेच ‘मोदीजीवी’ झालेली आहे. काँग्रेसविषयी तिरस्कार असलेले, राहुल गांधींना ‘पप्पू’ म्हणणारे, बेरोजगार असलेले पण मोदींमुळे चाळीस पैशाच्या रोजंदारीवर लागलेले, नोकरी-व्यवसायातून निवृत्त झालेले आणि टीव्हीसमोर बसून देशाच्या कल्याणाची प्रगती पाहून भारावून जाणारे, प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मोदी सरकारच्या कृपेमुळे कामाधंद्याला लागलेले ‘परोपजीवी’ही काही कमी नाहीत.

श्रमजीवी, बुद्धिजीवी आणि परोपजीवी यांच्याबद्दल मोदी आणि त्यांच्या सरकारला चिंता, काळजी आहेच. त्याशिवाय का ते सतत ‘आत्मनिर्भर भारता’विषयी बोलत असतात! पण गेल्या दोन-अडीच महिन्यात दिल्लीच्या सीमेवरच्या घडामोडींवरून त्यांना ‘आंदोलनजीवी’ या नव्या जमातीची माहिती झाली. त्यामुळे त्यांनी परवा संसदेत बोलताना ‘इन लोगों को पहचानाना होगा’ असं देशवासियांना सांगितलं. त्यांचं म्हणणं खरंच आहे. या ‘आंदोलनजीवीं’ची ओळख करून घेतल्याशिवाय त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे, हे समजू शकत नाही.

दिल्लीच्या सीमेवर ठिय्या देऊन बसलेले हे ‘आंदोलनजीवी’ एकप्रकारे ‘श्रमजीवी’ही आहेत. ते ‘परोपजीवी’ मात्र नाहीत. देशातील बुद्धिजीवी, मसीजीवी (शाईवर जगणारे) मात्र नक्कीच ‘परोपजीवी’ आहेत. ते या ‘श्रमजीवी’-‘आंदोलनजीवीं’वर अन्नासाठी अवलंबून आहेत. त्यामुळे त्यांची ‘पहचान’, ‘ओळख’ करून घेणं गरजेचंच आहे. त्यासाठी त्यांच्याशी संवाद करावा लागेल, त्यांचं ऐकून घ्यावं लागेल.

पण ओळख करून घेण्यासाठी तुमच्याकडे मनाचा मोठेपणा असावा लागतो आणि संवाद साधण्यासाठी अंत:करण उदार असावं लागतं. पण केवळ या दोन गोष्टींमुळे ओळख आणि संवाद होतो असं नाही. त्यासाठी आपला ‘इगो’ बाजूला ठेवावा लागतो, आपलंच कसं बरोबर आहे हा हेका चालवता येत नाही. शिवाय समोरच्यानं आपलं ऐकून घेण्यासाठी आपल्याकडे सहनशीलता, संयम आणि सामंजस्यही असावं लागतं. आपली भाषा चांगली असावी लागते. तिच्यातून आकस, पूर्वग्रह डोकावले तर समोरची व्यक्ती आपलं ऐकून घेऊ शकत नाही. शिवाय राग, मत्सर, द्वेष, तिरस्कार, घृणा यांची आपल्या भाषेतून हकालपट्टी करावी लागते..  

म्हणजे ओळख करून घेण्यासाठी आणि संवाद साधण्यासाठी आपल्याला बरीच मेहनत घ्यावी लागते. तोंडदेखल्या ‘हाय’मधून किंवा ‘भालो आछे ना?’ (कसे काय, बरे आहात ना?) असं विचारण्यातून ओळख होतेच असं नाही.

संवादाला पारखी असलेली माणसं पारध्यासारखी कायम शिकारीच्या शोधात असतात किंवा शिस्तबद्ध आणि केवळ आदेश पाळणाऱ्या सैनिकासारखी कायम शत्रूच्या शोधात असतात.

..................................................................................................................................................................

आंबेडकरांना सहन करावा लागलेला विकृत व अविचारी वैरभाव या व्यंगचित्रांमधून उघड होतो. त्याचबरोबर ऐतिहासिक अन्याय सहन केलेल्या आंबेडकरांचं वास्तविक चरित्रही उजेडात येतं.

हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये खरेदीसाठी करण्यासाठी क्लिक करा - 

https://www.booksnama.com/book/5282/Hasanyawari-Neu-Naka

..................................................................................................................................................................

पंतप्रधान मोदी पंतप्रधान झाल्यापासून देशात अशी एक जमात उदयाला आली आहे. ती आहे - ‘तुच्छताजीवी’. या जमातीची काही प्रमुख लक्षणं आहेत. ही जमात इतरांशी संवाद साधू शकत नाही, इतरांचं ऐकून घेऊ शकत नाही. असे गणंग फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅपवरही ढिगानं सापडतात. ते इतर ‘तुच्छताजीवीं’पेक्षा आपण कसे वेगळे आहोत, असं सांगत, दाखवत असतात, पण त्यांच्यात ‘उन्नीस-बीस’चाच फरक असतो!

या ‘तुच्छताजीवीं’चं समाजशास्त्र आणि मानसशास्त्र समजून घ्यायला हवं. ते संवादाच्या शक्यता मोडीत काढण्यातून आणि प्रत्येक प्रसंगी त्या धाब्यावर बसवण्यातूनच आकाराला येतं. इतरांची अक्कल मोजण्याचा तराजू हा कायमच पक्षपाती आणि सोयीस्करपणावर अवलंबून असतो. वजनात माप मारल्याशिवाय पाप करता येत नाही, हा व्यापाऱ्यांचा ‘पाठ’ हे ‘तुच्छताजीवी’ खूप चांगल्या प्रकारे गिरवून, घोटून आणि कोळून प्यालेले असतात. वर त्या व्यापाऱ्यासारखेच स्वतःच्या सचोटीचे दाखले पुढे करत राहतात. कारण त्याशिवाय इतरांच्या डोळ्यात धूळ फेकता येत नाही.

हे ‘तुच्छताजीवी’ जसजसे धूळफेकीत वाकबगार होत गेले, तसतसा त्यांचा संप्रदायही झपाट्यानं वाढत गेला. संप्रदाय वाढला की, प्रभाव आणि दबावही वाढतो. आणि कुठलाही दबावगट नेहमी आपलं म्हणणं आपल्या उपद्रवमूल्याच्या जोरावर खरं करून दाखवत असतो. शत्रूला नामोहरम केलं की, आपली बाजू सत्याची आहे किंवा न्याय्य आहे, याचे दाखले देण्याची गरजच राहत नाही.

एका काठीची शक्ती ही मोळीपेक्षा नेहमीच कमी असते, या गृहीतकावर ‘तुच्छताजीवीं’ची अव्यभिचारी निष्ठा असते. त्यामुळे ते जेवढ्या लवकर होईल, तेवढ्या लवकर आपला संप्रदाय वाढवतात. तो बऱ्यापैकी उपद्रवी झाल्यावरही ते आपल्या संप्रदायात नवनव्या लोकांना ओढत, खेचत राहतात. ‘तुच्छता’ हा मानवी स्वभावाचाच एक गुणधर्म आहे. त्यामुळे त्याचं आकर्षण अनेकांना असतं. ज्यांना इतरांची ओळख करून घेण्याचा कंटाळा आणि संवादाचा तिटकारा असतो, त्यांना ‘तुच्छता’ हे नामी शस्त्र वाटतं. त्यातल्या ज्यांच्यामध्ये इतरांविषयीची ‘तुच्छता’ व्यक्त करण्याची अजिबात धमक नसते, ते ‘टाळकरी’ होतात, ज्यांच्याकडे भाषिक कौशल्य असतं असे लोक ‘तुच्छताजीवीं’चे ‘अनुयायी’ होतात आणि ज्यांच्यामध्ये ‘तुच्छता’ ठासून भरलेली असते ते ‘गंडाबंद शिलेदार’ होतात.

सतत शत्रू हुडकत राहणं आणि सापडलेल्या शत्रूवर हल्ला करत राहणं, हा ‘तुच्छताजीवीं’चा स्वभावधर्मच असतो. कायम युद्धाच्या तयारीत आणि आक्रमणाच्या पवित्र्यात असणारी हे ‘तुच्छताजीवी’ नेहमी एकट्या-दुकट्या शत्रूलाच खिंडीत गाठून त्याच्यावर मोठ्या फौजफाट्यानिशी हल्ला करण्याचं काम करतात.

विसंवाद निर्माण करणं, कळीच्या प्रश्नांना बगल देणं, चर्चेला विकृत वळणावर नेणं, मुद्द्यांपेक्षा गुद्द्यांवर जाणं, उत्तरापेक्षा प्रश्न विचारणाऱ्याची लायकी काढणं, ही ‘तुच्छताजीवीं’ची शस्त्रं असतात. ती सतत परजत राहिलं की, त्यांचा समूह दबावगट म्हणूनही उभा राहतो. मग अशा ‘तुच्छताजीवीं’च्या वाट्याला जाणं शहाणे टाळायला लागतात. आणि हेच नेमकं या तुच्छताजीवींना हवं असतं. शहाण्यांचा मूक-उघड बहिष्कार हा नेहमीच तुच्छताजीवींच्या पथ्यावर पडत आलाय.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

या ‘तुच्छताजीवीं’ना सतत काहीतरी सेलिब्रेट करत राहावं लागतं. आपल्या प्रभावाच्या सीमारेषा पुन्हा पुन्हा बदलत राहाव्या लागतात. कारण आपल्या सीमारेषांची सतत पुनर्मांडणी केल्याशिवाय त्यांचं प्रभावक्षेत्र वाढत नाही.

मुख्य म्हणजे आपलं प्रभावक्षेत्र किंवा साम्राज्य मोठं करण्यासाठी इतरांच्या प्रभावक्षेत्रावर सतत हल्ला करून ते काबीज करावं लागतं. त्यांचा प्रदेश आपल्या प्रदेशात सामील करत राहावा लागतो. तेव्हा कुठे आपल्या राज्याचं साम्राज्य होतं. यासाठी भूप्रदेशाची, जनजीवनाची पुनर्रचना करावी लागते. त्यामुळेच तर ‘श्रमजीवी’, ‘बुद्धिजीवी’, ‘आंदोलनजीवी’ यांचा समाचार घेण्यासाठी या देशात ‘तुच्छताजीवी’ ही एक नवी जमात कार्यरत झाली आहे. या जमातीचा एकच अजेंडा आहे. तो म्हणजे देभरातल्या सर्वांना ‘परोपजीवी’ करण्याचा. देशातील पत्रकार, उद्योगपती, नोकरदार, कारखानदार, व्यावसायिक, कलाकार, सामाजिक कार्यकर्ते, आजी-माजी न्यायाधीश, मध्यमवर्गीय, निम्नवर्गीय आणि सर्वसामान्य जनता, हे ‘परोपजीवी’ या एकाच वर्गवारीत यायला हवेत, असं त्यांना वाटतं. त्यासाठी ते प्रसारमाध्यमांपासून सोशल मीडियापर्यंत आटोकाट प्रयत्न करताना दिसतात.

थोडक्यात, या देशातील ‘श्रमजीवी’, ‘बुद्धिजीवी’, ‘आंदोलनजीवी’ या जमातींची जेवढ्या लवकर ‘परोपजीवी’ या एकाच वर्गवारीत पुनर्रचना होईल, तेवढं ‘तुच्छताजीवी’ जमातीला हवं आहे. तेच या ‘तुच्छताजीवीं’चं अवतारकार्य आहे.

मुखवटे घालून घेतलेला अवतार असो किंवा चिलखतं घालून, त्याची कधीतरी समाप्ती करावीच लागते. त्यामुळे ‘आंदोलनजीवीं’ची ओळख करून घ्यायला हवी, त्यांच्याशी संवाद करायला हवा. अन्यथा आपलं अवतारकार्य औट घटकेचं ठरण्याची शक्यता आहे, याची या देशातल्या ‘परोपजीवी’ आणि ‘तुच्छताजीवीं’ना आज ना उद्या जाणीव होईलच. त्या दिवसाची वाट पाहायला हवी. आपण समजतो, त्यापेक्षा वाट पाहण्याला जास्त महत्त्व असतं!

..................................................................................................................................................................

लेखक राम जगताप ‘अक्षरनामा’चे संपादक आहेत.

editor@aksharnama.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......