अजूनकाही
परवा हे गाणे आम्ही राज्यसभेत ऐकले. मनापासून ऐकले. त्यावर ठेकाही धरला. नाचायचे बाकी होते. पण वयामुळे आता नाचणे होत नाही. बसल्या जागी हात हलवले. छान आहे गाणे. गेल्या दीड वर्षांपासून ते ऐकतोय. प्रत्येक वेळी ऐकताना आमचे मन आनंदून जाते. अगदी ‘मन की बात’च ती! गांधीजींच्या तत्त्वावर आधारलेले हे गाणे आहे, हे आम्ही पहिल्या दिवसापासून जाणून होतो. पण आमचे चुकीचे निदान होते ते. गांधीजी खूप चुका करायचे असे ते सांगत तेव्हाच आम्हाला कळे. मोठ्यांच्या चुका ‘चुका’ नसतात. त्यातून आपण खूप काही शिकत असतो. परवा नाही का, चौरीचौरा गावच्या आंदोलनाची शताब्दी आपले थोर शुभ्र जटाधारी, शुभ्र दाढिकाधारी, धवलवस्त्रांकित प्रधानसेवक आणि त्यांचे परमस्नेही प्रधानसेवकेच्छू भगवेवस्त्रधारी मुख्यसेवक यांनी साजरी केली? त्यावेळच्या भाषणांत दोघांनीही गांधीजींचे नाव घेतले नव्हते. चौरीचौरा आणि गांधीजी यांचे नाते अवघे जग जाणते. त्यामुळेच या महात्म्यांनी गांधीजींचा उल्लेख करून उगाच वेळ कशाला घालवायचा, असा भला विचार केला असावा. नाव गाळायची गलती केली का त्यांनी?
छे, छे! अहो, असे काय करता? शरद पवार, मनमोहनसिंग यांसारखे नेते चुका करतात अन दुसऱ्यांना संधी देतात त्यांच्यावर टीका करायची. हे गाणे नीट ऐकले का तुम्ही? इर्शाद कामिललिखित, अर्जितसिंग आणि शाश्वतसिंग यांनी गायलेले (संगीत - प्रीतम, चित्रपट - लव्ह आज कल) हे गाणे चूक कबूल करणारे वाटते तरी का? चुकीची कबुली करणारा स्वर कसा कातरकापरा, विव्हलव्यथित अन दु:खीदुबळा असतो. नजर खाली झुकलेला, शरीर गळालेले, चेहरा लाल झालेला… असे काही म्हणजे काही हे गाणे ऐकताना जाणवत नाही. उलट कार्तिक आर्यन आणि सारा अली खान आडवेतिडवे नाचून हे गाणे म्हणतात. असेल बुवा आजच्या पिढीची कबुलीजवाब देण्याची ही तऱ्हा. चुका व माणूस यांचे तत्त्वज्ञान सांगताना नव्या पिढीची शैली तीत आणली तर बिघडले कुठे अन काय?
नाहीतर आमच्या पिढीची गाणी ऐका बरे! एवढीशी ‘खता’ केलेला नायक माफी मागता मागता पुरता रडवेला झालेला. नकळत झालेला ‘सितम’ असो की गंमतीत केलाला एखादा ‘सिला’. प्रेमपत्र पाठवतानाही ‘तुम नाराज ना हो’ असे तो आर्जव करणारा. कधी कधी खट्याळ नायिकेने केलेले छेड आणि खोडी तिलाही क्षमायाचना करायला लावी. तीही रडकुंडीला येई मग.
..................................................................................................................................................................
अधिक माहितीसाठी पहा - सर्व प्रकारच्या कट्टरतेला नाकारणाऱ्या ‘इन्शाअल्लाह’ या अभिराम भडकमकर यांच्या बहुचर्चित कादंबरीवरील ‘परीक्षण’ स्पर्धा
..................................................................................................................................................................
हा सगळा गांधीसंस्कार बरे का! प्रेमात सगळे माफ असले तरी क्षमा, दिलगिरी मागितलीच पाहिजे असे बजावणारा. दुखावलेल्या दिलाला गलती झाल्याचे हळूवार मलम लावणारा. संपले सारे आता.
पण ‘हां, मैं गलत’ असे ठणकावून, दणक्यात सांगणारा आमच्या मते गोडसेसंस्कार आहे : हो, घातल्या गोळ्या! देश तोडला म्हणून दिली शिक्षा. बोला, काय करता मग आमचे? असा चुकीला सार्थ ठरवणारा अचूकतेचा आविर्भाव तेव्हापासून भारतात सर्वत्र पाहायला मिळू लागला. त्याचाच प्रतिध्वनी राज्यसभेत उमटला, त्यात वावगे काय, नाही का? लोकांनी बहुमताने सत्तेत आणलेले चुकतील कुठे? लोकच चुकले नाहीत, तर सत्ताधारी कसे चुकतील! बसा बोंबलत. आंदोलने करा की आणखी काही…
‘पुरा, सही कोई नहीं’ असे सुनावणारे हे गाणे ठेकाबद्ध इशाराही देते. हे लक्षात घ्यायला हवे. त्यातच साधू किंवा ऋषिमुनीं यांचा भास होईल अशा वेशभूषेसह काही दाबून सांगितले तर खपून जाते, हा आपला राष्ट्रीय अनुभव आहेच. तरीही एक फरक आहे बुवा. जुने साधूपुरुष आणि ऋषिमुनी शाप दिल्यावर भानावर येत. बऱ्याचदा ज्याला शाप दिला, त्याने शरणागती पत्करल्यावर उ:शापसुद्धा ते देत.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
थोडक्यात एका अर्थाने दिलगिरीच ती. पश्चात्ताप किंवा आत्मपरीक्षणसुद्धा. पण काळ बदलला. आता पश्चात्ताप, आत्मशोध असे काही न मानायची परंपरा आली. आपण बिनचूक आहोत असे ठाम मत बाळगणाऱ्यांची सत्ता आलेली आहे. दोष इतरांचे असतात. ते त्यांच्या पदरात टाकायची संधी कधी दवडायची नसते, अशी प्रतिज्ञा केलेल्यांची पिढी आहे ही. गांधींनी कशाला अस्पृश्यतेचा प्रश्न हाती घेतला? का म्हणून हिंदू धर्मात ढवळाढवळ करावी त्यांनी? अशा माणसाला जगायचा काही अधिकार नाही. धर्माहून मोठा कोणी नाही. म्हणून त्याला जगातूनच बाहेर काढले. त्यात काय चूक? चूक कोणाची होती, ते पुस्तक लिहून सांगण्याचे शौर्यही पार पडले आहे. त्याच्या आवृत्त्यांवर आवृत्त्या उगाच का खपत असतात?
त्यामुळे आपण पाहिले की, राज्यसभेत बराचसा उर्मट अन खूपसा उद्धट सूर पकडलेला या गाण्याचा आविष्कार झाला. हो, झाली असेल चूक, ठरले असेल माझे बोलणे चुकीचे. पण म्हणून माझे अवघे चुकत कसे असेल? हा घ्या माझा गंभीर इशारा - संपूर्ण, खरा असा (माझ्याखेरीज आणि पक्षाखेरीज) कोणी नाही. पवारसाब आणि सिंगसाब खोटारडे आहेत. ते बेलाशक ‘यू टर्न’ घेत असतात, असेच भाषांतर (नव्हे, सूरांतर) राज्यसभेत झाले.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
तर गोडसेवादाची सांगीतिक अभिव्यक्ती आणखी एका गाण्यात झाल्याचे आमच्या भाबड्या गांधीवादी कानांनी ऐकली. ‘मैं इतनी सुंदर हूँ, मैं क्या करू’ असे ते गीत ‘आहेच मी आडमूठा, काय करायचे ते करा’ या वृत्तीचे एक ठेकेबद्ध सूरांतर आहे. पूर्वीची आमच्या वेळची गाणी कशी गूढ असत… नायिकेला कळतच नसे नायकाने ती सुंदर आहे हे सांगितल्याशिवाय! नायक खूप रसभरीत वर्णन करायचा, तेव्हा कुठे प्रेक्षक आणि ती प्रेमिका केवढी सौंदर्यपूर्ण आहे ते जाणत असत. तोवर ती नायिका आपल्या अन्य स्त्रियांसारखीच वावरे. नायकाचे वर्णन करून झाले की, ती खलनायकालाही आवडू लागे. मग नायक-खलनायक तिच्यावरून मारामारी करत. अगदी शेवटी ती नायकालाच प्राप्त होईल. नाजूक, गुलबदन, कमसीन, हसीन, चांद, खूबसुरत असे काय काय तिला म्हटले जाई.
तेव्हा चित्रटगीतांच्या अभ्यासकांनी एक गोष्ट ध्यानात घ्यावी की, राजकीय विचारसरणी व सत्ताधारी यांचा प्रभाव चित्रपट कलावंतांना ट्विट करण्यालाच प्रवृत्त करतो असे नाही. राज्यकर्त्यांचे स्वभाव, वृत्ती आणि चारित्र्यसुद्धा गीतकारांना प्रेरणा देत राहते. प्रेम जाहीर करण्याची आडदांड, धसमुसळी शैली आजच्या बव्हंशी गीतांना लाभल्याचे ते कारण होय. चूक आहे का माझे?
..................................................................................................................................................................
लेखक जयदेव डोळे माध्यम विश्लेषक आहेत.
djaidev1957@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment