‘घरवापसी’ आणि ‘लव जिहाद’च्या गोष्टी... पण वेगळ्या प्रकारच्या
पडघम - सांस्कृतिक
कामिल पारखे
  • प्रातिनिधिक चित्र
  • Tue , 09 February 2021
  • पडघम सांस्कृतिक लव जिहाद Love Jihad घरवापसी Ghar Wapsi ख्रिस्ती ख्रिश्चन

‘घोगरगावचे जाकियरबाबा - मराठवाड्यातील ख्रिस्ती मिशन कार्य : इ  स. १८९२ पासून’ या माझ्या पुस्तकात आतील पानावर एक रंगीत छायाचित्र आहे. मराठवाड्यात विशेषतः औरंगाबाद जिल्ह्यात ख्रिस्ती धर्माचा पाया रचणारे फ्रेंच फादर गुरियन जाकियर यांच्या कार्यावर आणि पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य असलेल्या ख्रिस्ती समाजाविषयीचं हे पुस्तक आहे. ‘घोगरगावातील एक ख्रिस्ती कुटुंब’ असं त्या छायाचित्राखाली लिहिलेलं आहे. त्यात नऊवारी पातळ घातलेली माझी आई, मार्थाबाई आपला भाचा, नाथू शिनगारे आणि त्याची बायको-मुलं-नातवंडं आणि माझ्या एका पुतणीबरोबर आहे. आम्ही श्रीरामपूरला परतताना नाथुने स्वतः जमिनीतून भराभरा उपटून हरभऱ्याच्या टहाळीचा वानवळा आम्हाला दिला होता, तेव्हा त्याच्या हिरव्यागार शेतात मी ते छायाचित्र काढलं होतं.     

फ्रान्समधून १८९२ साली येऊन औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यात घोगरगाव येथे ग्रामीण लोकांच्या सेवेत स्वतःला वाहून, ५० वर्षांच्या काळात शेकडो लोकांना बाप्तिस्मा देणारे जाकियरबाबा आज संत मानले जातात. कॅथोलिक धर्मात एखाद्या व्यक्तीला संत म्हणून जाहीर करण्याची प्रक्रिया अत्यंत किचकट, वेळखाऊ आणि खूप खर्चिक असते. जाकियरबाबांनी घोगरगावात १९२७ साली बांधलेल्या टोलेगंज चर्चच्या शेजारीच असलेल्या त्यांच्या समाधीला भेट देऊन भाविक या मिशनऱ्याविषयी आदर व्यक्त करतात.

विशेष म्हणजे माझ्या आईचे दोन थोरले भाऊ शांतवनमामा आणि वामनमामा हे त्यांच्या तरुणपणी १९३०च्या दशकात जाकीयरबाबांचा एक घोडा असलेला छकडा चालवत असत. हा छकडा आजही जाकीयरबाबांच्या समाधीपाशी ठेवला आहे. घोगरगावात दरवर्षी ११ फेब्रुवारीला होणाऱ्या वेलंकणी मातेच्या यात्रेच्या वेळी हजारो भाविक जाकियरबाबांच्या या समाधीला भेट देतात.

या शांतवनमामाचा थोरला मुलगा म्हणजे नाथू. बाई (आई) जाण्याआधी सहा महिने मी तिच्यासह तिच्या माहेराला, माझ्या आजोळाला, घोगरगावाला जाऊन तिथं दोन-तीन दिवस राहिलो होतो. बाई खूप दिवसांनी आपल्या माहेरला आली म्हणून तिच्या भाच्याने, नाथूने तिला माहेरची भेट म्हणून एक भारी पातळ दिलं होतं. तिथून निघताना बाईने ते नवंकोरं पातळ अंगावर घातलं होतं, तेव्हा हे छायाचित्र मी घेतलं होतं. घोगरगावातील ख्रिस्ती कुटुंबाचं एक प्रातिनिधिक छायाचित्र म्हणून मी ते सुरुवातीला उल्लेख केलेल्या पुस्तकात छापलं होतं. त्यातील फोटोओळीत आपण काही चुकीचं, सत्याचा विपर्यास करून लिहिलं आहे, असं मला त्या वेळी वाटणं शक्यच नव्हतं.       

..................................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी पहा - सर्व प्रकारच्या कट्टरतेला नाकारणाऱ्या ‘इन्शाअल्लाह’ या अभिराम भडकमकर यांच्या बहुचर्चित कादंबरीवरील ‘परीक्षण’ स्पर्धा

..................................................................................................................................................................    

पुस्तक प्रसिद्ध झाल्यानंतर सहा-सात महिन्यांनी किंवा बहुधा वर्षभराने मला घोगरगावातून फोन आला. तेव्हा मोबाईलचं प्रस्थ नुकतंच सुरू होत होते. नाथूने आपल्या मुलाच्या फोनवरून माझ्याशी संपर्क साधला होता.

“कामिलभाऊ, तुमी तुमच्या पुस्तकात आमचा तो फोटु छापला ना, त्याच्यामुळं आमची ना लई गोची झालीया बगा.” माझ्याहून वयाने खूप मोठा असलेल्या नाथूला मी ‘अरेतुरे’ करायचो. तो मात्र मला संभाषणाच्या सुरुवातीला तरी ‘अहोजाहो’ करायचा.

औरंगाबाद आणि अहमदनगर जिल्ह्यांत दोन बहीणभावांमधील संबंध पुढच्या पिढीत कायम राखण्यासाठी मामाची मुलगी बायको करण्याची पद्धत आहे. त्यामुळेच नाथु मला ‘दाजी’ म्हणत होता. ख्रिस्ती धर्माच्या कॅनन लॉनुसार समान रक्ताचे म्हणजे एकाच कुटुंबातील ‘फर्स्ट कझन’ असलेल्या मामेभाऊ, चुलतभाऊ, आतेभाऊ वा बहीण यांच्यात विवाहसंबंधास परवानगी नाही. मात्र याकडे सर्रास कानाकोडा केला जातो. माझ्या थोरल्या भावाचं लग्न असंच १९७०च्या दशकात वामनमामांच्या मुलीशी झालं.         

“फोटोमुळे गोची? कसली गोची?” नाथूच्या बोलण्याने मी चक्रावलोच. त्याच्या कुटुंबाचं माझ्या आई आणि पुतणीसोबत घेतलेलं छायाचित्र पुस्तकात छापल्याबद्दल त्याला आनंद वाटेल असं मला वाटलं होतं.

“दाजी, तुमी त्या पुस्तकातल्या फोटुत आमाला ‘किरीस्ती घरातली लोकं’ म्हनलं हाय ना, त्यांच्यामुळंच सगळी गोची झालिया बगा!”

ते ऐकून मी थक्कच झालो.

“ख्रिस्ती घरातले लोक म्हटलं, हो, मग त्यात काय चुकलं?” माझा गोंधळ काही संपत नव्हता.        

“आता तुमाला कसं सांगू, दाजी? इथल्या गावाकडं कसं अस्तंया, तुमाला ठावूक हाईच. त्या राफाएलशी आमची जमिनीबाबत कोर्टकचेरी चालू हाई. तुमाला म्हाईतच हाई त्ये. तर त्यानं कोर्टात आमचा तो फोटुच आमच्या इरुद्ध पुरावा म्हनून टाकलाय!”

नाथूचे आणि त्याच्या चुलतभावाचे म्हणजे माझ्या दुसऱ्या मामाच्या मुलाचे - राफाईल - जमिनीबाबत दावे चालू होते. 

“पण त्या फोटोत खोटं काय आहे?”

“अवं कामिलदाजी, आमी तर ‘जय भीम’वाले ना! पन त्या राफाईलने आमी किरीस्ती म्हनून पुराव्यासाठी तुमच्या पुस्तकातला तो फोटुच कोर्टात पुरावा म्हणून दिलाय! आमच्या प्रॉपर्टीच्या वादात आमाला खोटारडे ठरवायला अन सवताची बाजू भक्कम करायला!”'

ते ऐकून मी एकदम सर्दच झालो.

“आमी ‘जय भीम’वाले” असे माझा मामेभाऊ, माझ्या रक्ताचा नातेवाईक मला सांगत होता आणि ते इथल्या ख्रिस्ती मिशनकार्याचा इतिहास लिहिणाऱ्या मला आतापर्यंत माहीतच नव्हतं!

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

घोगरगावात आलो की, आम्ही नाथूच्या घरातच मुक्काम करणार हे ठरलेलं असायचं. शांतवनमामा आणि शिवराममामा यांच्या ‘राजवाड्या’मध्ये (या भागात महारवाड्याला ‘राजवाडा’ म्हणण्याची पद्धत आहे) असलेल्या पांढऱ्या मातीच्या घरात राहायचो आणि जेवायला, चहापानाला इतर सगळ्या घरांत भेटीगाठी द्यायचो. नाथूचे वडील शांतवनमामा जाऊन आता खूप वर्षं झाली. अलिकडच्या वर्षांत नाथूच्या घरी त्या वेळी त्याच्या घरात येशू आणि मारियाबाईचे छायाचित्र असलेले अल्तार पाहिल्याचे आठवत नाही. पण खेडेगावांत दोन खोल्यांचं घर असलेल्या ख्रिस्ती कुटुंबांत अल्तार तरी कसे असणार? ते नसले तरी पुढल्या खोलीत किमान क्रूस, येशूचा, मारियाबाईचं छायाचित्र आवश्यक होतं. पण असं काही होतं की, नव्हतं तेही आता आठवत नाही.

शिनगारे परिवारातील इतर लोकांसह नाथू आपल्या बायको-मुलांसह अनेकदा हरेगावला मतमाऊलीच्या यात्रेला यायचा. तिथल्या त्या भव्य देवळात मिस्सासाठी येताना तो रितीरिवाजाप्रमाणे डोक्यावरची पांढरी टोपी काढून ठेवायचा, हे मात्र मला पक्कं आठवतं. त्या वेळी त्याच्या धर्माविषयी अशी शंकाही कधी आली नव्हती. हं, एक मात्र आठवतं, नाथूच्या बायकोचे माहेरचे लोक बौद्ध होते आणि लग्नानंतरही ती आपल्या ‘जय भीम’ विश्वासाशी अगदी ठाम राहिली, हे बाईने अनेकदा म्हटल्याचं आता लक्षात येतं.

आमच्या कुटुंबात आणि जवळच्या नातेवाईकांत जी काही ‘लव जिहाद’ प्रकरणं झाली, त्यापैकी हे एक ठळक उदाहरण. पण ख्रिस्ती धर्मातून पुन्हा एकदा आपल्या मूळ धर्मात परतणारे किंवा बौद्ध धर्म स्वीकारणारे नाथू शिनगारे हे काही अपवादात्मक उदाहरण नाही.

महाराष्ट्रात ख्रिस्ती धर्माचा प्रसार सर्वप्रथम मुंबईजवळील वसई येथे तिथल्या पोर्तुगीज राजवटीच्या काळात झाला. पोर्तुगीज राजकन्या कॅथरीनचं इंग्लंडचा राजा चार्ल्स दुसरा यांच्याशी २१ मे १६६२ रोजी लग्न झालं, तेव्हा हिंदुस्थानात ब्रिटिशांआधी आपली वसाहत स्थापन करणाऱ्या पोर्तुगीजांनी ब्रिटिशांना आपल्या ताब्यातील मुंबई बेट हे आंदण दिलं होतं. पोर्तुगीजांची वसईत सत्ता असताना तिथं मोठ्या प्रमाणात ख्रिस्ती धर्माचा प्रसार झाला.

आज महाराष्ट्रात सर्वांत जास्त ख्रिस्ती लोकसंख्या आढळते ती मुंबई-वसई परिसरात. एका छोट्याशा तालुक्याचा परिसर असला तरी वसई हा स्वतंत्र डायोसिस (धर्मप्रांत) आहे आणि त्या धर्मप्रातांसाठी बिशप आहेत. यावरून इथल्या ख्रिस्ती समाजाच्या ठळक अस्तित्वाची कल्पना येऊ शकते. वसई परिसरातील हा ख्रिस्ती समाज तसा एकजिनसी नाही. पूर्वाश्रमीच्या वरच्या, मध्यम थरांतील आणि खालच्या समजल्या जाणाऱ्या हिंदू जातींतून इथं ख्रिस्ती धर्मात धर्मांतर झालं आहे. जाणकारांना स्थानिक लोकांच्या पोषाखावरून, चालीरितींवरून आणि बोलीभाषांवरून हे चटकन समजतं. 

ख्रिस्ती लोकसंख्येच्या बाबतीत राज्यात मुंबई-वसई परिसरानंतर पुणे जिल्ह्याचा आणि त्यानंतर अहमदनगर जिल्ह्याचा क्रमांक लागतो. पुणे जिल्ह्यातील बहुतांश ख्रिस्ती लोकसंख्या अर्थातच स्थलांतरित म्हणजे मूळची अहमदनगर, इतर जिल्ह्यांतील आणि परप्रांतांतील आहे. 

अहमदनगर जिल्ह्यात ख्रिस्ती धर्माची गुढी एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस प्रोटेस्टंट मिशनरींनी लावली. त्यानंतर १८७८ला अहमदनगर जिल्ह्यात राहुरीजवळ केंदळ या गावात जर्मन येशूसंघीय (जेसुइट) मिशनऱ्यांनी कॅथॉलिक पंथाचं मिशनकार्य सुरू केलं. सर्व जातीधर्मांच्या, दलितांच्या आणि मुलींसाठी पहिल्यांदाच शाळा सुरू करून आणि ग्रामीण परिसरात दवाखाने उभारून या प्रोटेस्टंट आणि कॅथोलिक मिशनरींनी अहमदनगर, औरंगाबाद, जालना, कोल्हापूर जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर धर्मांतर घडवून आणलं. रेव्हरंड नारायण वामन टिळक, रेव्हरंड नीळकंठशास्त्री नेहेम्या गोरे, नारायण शेषाद्री आणि पंडिता रमाबाई यांच्यासारखी काही अपवादात्मक उदाहरणं सोडता या धर्मांतरीत समाजातील सर्व लोक हे पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य म्हणजे महार आणि मातंग जातींतले होते. 

..................................................................................................................................................................

आंबेडकरांना सहन करावा लागलेला विकृत व अविचारी वैरभाव या व्यंगचित्रांमधून उघड होतो. त्याचबरोबर ऐतिहासिक अन्याय सहन केलेल्या आंबेडकरांचं वास्तविक चरित्रही उजेडात येतं.

हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये खरेदीसाठी करण्यासाठी क्लिक करा - 

https://www.booksnama.com/book/5282/Hasanyawari-Neu-Naka

.................................................................................................................................................................. 

या धर्मांतरित नवख्रिस्ती समाजात चलबिचल सुरू झाली ती स्वातंत्र्योत्तर काळात. या काळात परदेशातून येणाऱ्या मिशनरींचा आणि आर्थिक मदतीचाही ओघ कमी होत गेला. मिशनरींअभावी अनेक मिशनकेंद्रांचं काम थंडावलं, मिशनरींनी गावोगावी सुरू केलेल्या प्राथमिक शाळा बंद झाल्या किंवा इतरांच्या ताब्यात गेल्या. ख्रिस्ती समाजात अध्यात्म्यासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या ‘पास्टरल सर्व्हिस’(पाळकीय सेवे)च्या अभावी किंवा नव्याने आलेल्या धर्मगुरूंच्या अनास्थेमुळे हळूहळू या ख्रिस्ती कुटुंबांची ‘घरवापसी’ सुरू झाली.

त्यातच आरक्षणाच्या मुद्द्याची भर पडली. देशातील पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य असलेल्या सर्व जातीच्या लोकांना शेड्युल्ड कास्ट म्हणजे अनुसूचित जातींसाठी असलेलं आरक्षण आणि सर्व सुविधा मिळतात. उदाहरणार्थ, हिंदू दलितांना, अस्पृश्य समाजातून शीख किंवा बुद्ध धर्मांत धर्मांतर केलेल्या सर्वांना हे फायदे मिळतात, पूर्वाश्रमीचे अस्पृश्य असलेल्या ख्रिस्ती लोकांना मात्र नाही!

यामागे तार्किक किंवा इतर कुठलंही पटण्यासारखं कारण आहे काय, असं सर्वोच्च न्यायालयानं तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सरकारला विचारलं, तेव्हा त्यांच्याकडून मौन पाळण्यात आलं होतं. पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य समाजाला दिल्या जाणाऱ्या सवलती दलित ख्रिश्चनांनाही लागू करण्यास सरकारचा आक्षेप नाही, असं सर्वोच्च न्यायालयाला सांगणं युपीए सरकारला आणि काँग्रेसला राजकीयदृष्ट्या आत्मघातकी ठरलं असतं. (अनुसूचित जमातींतून ख्रिस्ती झालेल्या सर्वांना मात्र आरक्षणाचे फायदे मिळतात. उदाहरणार्थ उत्तर-पूर्व राज्यांतील पी. ए. संगमा यांच्यासारख्या ख्रिस्ती समाजातील लोकांना). मूळ हिंदू धर्मात परतण्याचे किंवा ते नको असल्यास बौद्ध धर्मात प्रवेश करण्याचे आर्थिक, राजकीय आणि इतर फायदे समजल्याने ख्रिस्ती समाजातील असंख्य कुटुंबं बिनभोभाट ‘माघारी’ परतली. अशी  ‘घरवापसी’ मोठ्या प्रमाणात विदर्भात, मराठवाड्यात, पश्चिम महाराष्ट्रात झाली आणि यांपैकी बहुतेकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांसह बौद्ध धर्मात प्रवेश केला.

याविषयी फार बोभाटा वा वाद झाला नाही, कारण हा स्वखुशीचा मामला होता आणि महत्त्वाचं म्हणजे यामुळे सरकारी कचेरीत कागदोपत्री काहीही फेरफार झाले नव्हते आणि होणार नव्हते. माझा मामेभाऊ नाथू शिनगारे हा अशा पूर्वाश्रमीच्या शेकडो नवख्रिस्ती समाजातील एक! 

या धर्मांतराची, घरवापसीची आणि नंतर पुनर्धर्मांतराची फारशी चर्चा झाली नाही. स्थानिक समाजानेही त्याकडे फारसं गंभीरपणे पाहिलं नाही. कारण या एका धर्मातून बाहेर जाण्याची, परत येण्याची आणि पुन्हा तिसऱ्या धर्मात जाण्याची सरकारदरबारी कागदोपत्री नोंद होत नसायची, अजूनही यात बदल झालेला नाही.

सर्वांचं रक्त समान असणाऱ्या एकाच घरात वा कुटुंबात, भाऊबंदांत एक व्यक्ती हिंदू, एक जण ख्रिस्ती आणि एक जण बौद्ध असू शकते, यावर या समाजाबाहेरच्या लोकांचा विश्वासही बसणार नाही. पण या समाजातून आलेल्या लोकांना यात काही अजब दिसत नाही.

याचाच एक परिपाक म्हणून इकडच्या ख्रिस्ती समाजात ‘लव जिहाद’ पाचवीलाच पुजलेला असतो. ग्रामीण भागातील लोक लग्न जमवताना, विशिष्ट लग्नविधीचा आग्रह करताना मुलाकडचे वा मुलीकडचे लोक याबाबतीत फार सोवळं पाळत नाहीत. मात्र यात पुरोगामीपणाचा वा प्रागतिकपणाचा आव बिलकूल नसतो. मुळात तसं नसतंच. या सर्रासपणे पार पडणाऱ्या ‘लव जिहाद’मधली ग्यानबाची मेख असते, ती म्हणजे ही सगळी मंडळी तीन धर्मांत विखुरलेली असली तरी मूळची एकाच जातीची आणि पुष्कळदा नात्यागोत्यातली असतात.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

अनेकदा लग्नपत्रिका पाहिल्यावर, लग्नाची जागा कळल्यावर किंवा लग्नासाठी आल्यानंतर वऱ्हाडातल्या लोकांना कळतं की, कॅथोलिक चर्चमध्ये फादर नवीन जोडप्याला लग्नाच्या शपथविधी देणार आहेत किंवा हा लग्नविधी ‘मंगल परिणय’ आहे वा ‘बायबल’ वचनं वाचून प्रोटेस्टंट पद्धतीनं लग्न लावलं जाणार आहे. यात नवरदेव, नवरी वा त्यांच्या घरचे लोक आपल्या धार्मिक श्रद्धांशी प्रतारणा करत आहेत, असं कुणालाही वाटत नाही.  

धर्म वा पंथ या दोन्हींपेक्षा इथं जात हाच महत्त्वाचा मुद्दा होतो. धर्मांतरानं मूळ हिंदू धर्मातील अस्पृश्यता, जाती वा उच्चनीच हा भेदभाव नष्ट होतील, हा भाबडा समज भारतात काही शतकांपूर्वीच फोल ठरला आहे. सतराव्या शतकात इटालियन धर्मगुरू रॉबर्ट डी नोबिली यांनी मदुराई आणि इतर दक्षिण भारतात उच्चवर्णिय, अस्पृश्य आणि इतर जातींच्या लोकांना ख्रिस्ती केलं, तेव्हा ही सर्व मंडळी आपल्या जातींच्या बाडबिस्तऱ्यासह ख्रिस्ती धर्मात डेरेदाखल झाली. या सर्व जाती तेथील ख्रिस्ती समाजात आजही गुण्यागोविंदानं नांदत आहे. मूळचे ब्राह्मण असलेले रेव्हरंड नारायण वामन टिळक हे दक्षिण भारतात गेले, तेव्हा तिथल्या ख्रिस्ती समाजातील जातिभेद पाहून दिङ्मूढ झाले होते.

असे ‘आंतरधर्मिय’ विवाह जुळवताना ‘तेथे पाहिजे जातीचे’ हा मंत्र आळवला जातो. मराठवाड्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात जे काही ख्रिस्ती धर्मांतर झालं, ते या भागांतील त्यावेळच्या काही ठराविक अस्पृश्य जातींमध्येच झालं होतं. औरंगाबाद आणि अहमदनगर जिल्ह्यांत हे धर्मांतर या ठिकाणच्या बहुसंख्य असलेल्या महार समाजातच झालं, तर मराठवाड्याच्या इतर जिल्ह्यांत तिथं बहुसंख्य असलेल्या मातंग समाजात हे धर्मांतर झालं. त्यामुळे आता धर्मानं ख्रिस्ती असलेल्या मात्र वेगळी प्रादेशिक पार्श्वभूमी असलेल्या मराठी ख्रिस्ती समाजात सोयरीकच होत नाही, भले ते लोक रोमन कॅथोलिक असोत वा कुठल्याही प्रोटेस्टंट पंथांतील! 

..................................................................................................................................................................

लेखक कामिल पारखे ज्येष्ठ पत्रकार आहेत.

camilparkhe@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......