कोणत्याही मर्त्य मानवाची प्रतिष्ठा तो गेल्यावर काही काळानं विलयाला जाते
पडघम - सांस्कृतिक
हर्षवर्धन निमखेडकर
  • प्रातिनिधिक चित्र
  • Mon , 08 February 2021
  • पडघम सांस्कृतिक हर्षवर्धन निमखेडकर Harshawardhan Nimkhedkar शब्दांचे वेध ग्लोरी Glory ग्लोरिया Gloria

शब्दांचे वेध : पुष्प पंचविसावे

या आठवड्यात ‘ग्लोरिया’वर काही लिहावं असा विचार गेले काही दिवस माझ्या मनात घोळत असतानाच दै. ‘लोकमत’मध्ये अनंत सामंत यांचा एक चांगला लेख वाचायला मिळाला. ‘करोनामुळे अस्वस्थ होण्यासारखं काय आहे?’ (https://www.lokmat.com/editorial/what-it-be-upset-corona-a301/) हा तो लेख आहे. त्यातील प्रतिपादन आपल्याला नक्कीच विचार करायला भाग पाडतं.

करोनामुळे आपला मृत्यू होऊ शकतो आणि तोही परक्या ठिकाणी - जवळचे कोणी अवतीभोवती नसताना, या नुसत्या कल्पनेनंच अनेक जण भेदरून जातात. त्यांच्या मनोबलवृद्धीसाठी किंवा ‘हौसला अफझाई’साठी सामंतांचा हा लेख आहे. तो वाचून मला मृत्यू आणि ग्लोरिया यांचाही किती निकटचा संबंध आहे, हे जाणवलं. म्हणून आज या दोन्ही विषयांवर एकत्र लिहिणार आहे.

प्रत्येक जिवंत प्राण्याचा केव्हातरी मृत्यू होणं, ही एक अटळ नैसर्गिक प्रक्रिया असली तरी आपल्यापैकी बहुतेकांना हे सत्य सहजतेनं स्वीकारता येत नाही. याचसोबत, जे आज आहे, ते उद्या - फार फार तर परवा - नष्ट होणार आहे, आणि त्याची जागा दुसरं काहीतरी, कोणीतरी घेणार आहे, हेही सत्य आपल्याला सहजतेनं पचनी पडत नाही. सृष्टीत स्थित्यंतरं होणारच. कधी ती आपल्याच डोळ्यासमोर घडतात, कधी आपल्या पश्चात, एवढाच काय तो फरक. कोणाचं, अगदी नवजात शिशूचंसुद्धा, कोणावाचून अडत नाही. जो तो आपापल्या परी आपलं आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतो आणि एक दिवस जगातून निघून जातो.

अकाली मरण, लवकर मरण, उशीरा आलेले मरण या सापेक्ष संकल्पना आहेत. जिवलगांच्याच काय, पण कधी अगदी परक्या माणसाच्या किंवा प्राण्यांच्या मरणानंसुद्धा आपल्याला वाईट वाटतं, धक्का बसतो, शोक होतो. पण कोणाच्याही जाण्यानं पोकळी वगैरे निर्माण होत नाही. ती आपोआप भरून निघतेच. ‘Nature abbhors a vacuum’, असं म्हणतात, ते काही उगीच नाही. काही काळ गेलेल्याची आठवण येत राहते; कधी एखाद्याच्या अकस्मात जाण्यानं त्याच्यावर अवलंबून असणाऱ्यांच्या आयुष्यात काही अडचणी उत्पन्न होऊ शकतात, पण त्याही कायमस्वरूपी नसतात. कालांतराने हे दिवसही निघून जातात आणि जो तो पुन्हा मार्गाला लागतो. जयंती - पुण्यतिथी या अशा प्रसंगी गेलेल्याचं स्मरण केलं जातं, श्राद्ध किंवा अन्य मार्गांनी त्याला आदरांजली वाहण्यात येते - बस, इतकंच! ‘जन पळभर म्हणतील हाय, हाय!, मी जाता राहील कार्य काय?’, बरोबर?

..................................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी पहा - सर्व प्रकारच्या कट्टरतेला नाकारणाऱ्या ‘इन्शाअल्लाह’ या अभिराम भडकमकर यांच्या बहुचर्चित कादंबरीवरील ‘परीक्षण’ स्पर्धा

..................................................................................................................................................................

‘अशा जगास्तव काय झुरावे?’ हा कवी तांब्यांना पडलेला प्रश्न अनेकांना पडला आहे. मरण म्हणजे नक्की काय, यावर प्राचीन काळापासून आजवर हजारो लेखकांनी, कवींनी, तत्त्वज्ञांनी, आणि विचारवंतांनी लिखाण केलं आहे. जगातल्या प्रत्येकच भाषेत आणि समाजांत यावर सखोल चिंतन झालं आहे. त्यातलं काही आपण वाचतो, त्यावरची भाषणं- प्रवचनं ऐकतो, बघतो, पण तरीही आपण झुरतोच. ‘मरण ही एक अवस्था आहे - कायम मुक्ती मिळवण्यासाठी, स्वर्गलोकात जागा मिळवण्यासाठी भूलोकीच्या आपल्या नश्वर देहाला नष्ट व्हावंच लागतं’ असा अनेकांचा विश्वास असतो, पण तरीही ते मृत्यूला घाबरतात. ‘मौत का एक दिन मु'अय्यन है, नींद क्यों रात भर नहीं आती?’ हे ग़ालिबचे शब्द ग़ज़लेत ऐकायला बरे वाटतात, प्रत्यक्षात प्रत्येकाच्याच मनाची अशी तयारी झाली नसते. कारण यासाठी फार मोठी तात्त्विक भूमिका असावी लागते, खऱ्या अर्थानं स्थितप्रज्ञ असावं लागतं. हे येऱ्यागबाळ्याचं काम नाही.

‘मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तो ही पुढे जात आहे’, ही समर्थ रामदास स्वामींची उक्ती आहे. आपण किती जणांनी यातून बोध घेतला आहे? ही जाणीव होण्यासाठी तुम्ही आध्यात्मिक प्रवृत्तीचे असलेच पाहिजे असं नाही. हे एक चिरंतन सत्य आहे आणि ते जितक्या सहजतेनं तुम्ही मान्य कराल, तितक्या सहजतेनं तुम्हाला शोकभावनेवर ताबा मिळवता येईल.

मृत्यू कसा असतो, याचंही रामदास स्वामींनीच दासबोधाच्या तिसऱ्या दशकाच्या नवव्या समासात निरूपण करून ठेवलं आहे -

होतां मृत्याची आटाटी । कोणी घालूं न सकती पाठीं ।

सर्वत्रांस कुटाकुटी । मागेंपुढें होतसे ॥ ५॥

मृत्युकाळ काठी निकी । बैसे बळियाचे मस्तकीं ।

माहाराजे बळिये लोकीं । राहों न सकती ॥ ६॥

मृत्य न म्हणे किं हा क्रूर । मृत्य न म्हणे हा जुंझार ।

मृत्य न म्हणे संग्रामशूर । समरांगणीं ॥ ७॥

---

आतां असो हें बोलणें । मृत्यापासून सुटिजे कोणें ।

मागेंपुढें विश्वास जाणें । मृत्युपंथें ॥ ३६॥

च्यारी खाणी च्यारी वाणी । चौर्यासी लक्ष जीवयोनी ।

जन्मा आले तितुके प्राणी । मृत्य पावती ॥ ३७॥

मृत्याभेणें पळों जातां । तरी मृत्य सोडिना सर्वथा ।

मृत्यास न ये चुकवितां । कांहीं केल्या ॥ ३८॥

मृत्य न म्हणे हा स्वदेसी । मृत्य न म्हणे हा विदेसी ।

मृत्य न म्हणे हा उपवासी । निरंतर ॥ ३९॥

मृत्य न म्हणे थोर थोर । मृत्य न म्हणे हरिहर ।

मृत्य न म्हणे अवतार । भगवंताचे ॥ ४०॥

असा हा सर्वसमावेशक, सर्व लोकांना समान लेखणारा, सर्वभक्षी मृत्यू कोणालाच सुटलेला नाही. त्याचं आगमन वेगवेगळ्या तऱ्हांनी, प्रकारांनी होऊ शकतं. पण तो एक दिवस येतोच. राम, कृष्ण, बुद्ध, ख्रिस्त यांनाही मरण आलं; रावण, अलेक्झांडर, अकबर, औरंगझेब, राणी व्हिक्टोरिया, लेनीन, स्टॅलिन, माओ, आणि हिटलरदेखील मरण पावले; गांधी, नेहरू, वाजपेयी पण गेले, पण जगरहाटी चालूच राहिली. एखाद दिवशी आपणही जाऊ, आणि त्यामुळे जगबुडी वगैरे काही होणार नाही.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

हे सगळे खरं असलं तर मग आपण मरणाला इतकं का घाबरतो? संत तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे ‘मरणाही आधीं राहिलों मरोनी’ किंवा गदिमा म्हणतात तसं ‘मरण कल्पनेशी थांबे तर्क जाणत्याचा’ असं आपलं का होतं? करोनात तरी असं काय वेगळं आहे, की त्यामुळे त्याच्यामुळे होऊ शकणारं मरण हे कोणालाच नकोसं वाटतं? ‘जिंकुनी मरणाला मरणाला जीव कुडीतून गेला’, ही फक्त कवीकल्पनाच आहे का? की हे फक्त महात्मा गांधी आणि रेव्ह. टिळकांसारख्या महापुरुषांनाच शक्य आहे? कवी जॉन डन (John Donne) यानं तर साक्षात मृत्यूलाच आव्हान दिलं होतं-

Death, be not proud, though some have called thee

Mighty and dreadful, for thou art not so;

For those whom thou think'st thou dost overthrow

Die not, poor Death, nor yet canst thou kill me.

--

One short sleep past, we wake eternally

And death shall be no more; Death, thou shalt die.

मृत्यूला असं डनसारखं आव्हान आपण सामान्य माणसं का देऊ शकत नाही?

एक ना एक दिवस मरण हे येणारच आहे, हे माहीत असूनही आपण त्यावर विचार करत नाही. (साधं मृत्यूपत्र करून ठेवायलाही घाबरणारे अनेक लोक मी पाहिले आहेत.) कधी केला तरी आपण सगळेच आपल्याला ‘योग्य वेळी’ अनायास, विनाकष्ट, आणि सहज मरण येईल या भ्रमात असतो. म्हणून तर आपल्याला करोना किंवा अन्य व्याधींमुळं येणारं दुःसह मरण नको वाटत असेल का? मरणाची योग्य वेळ कोणती, हेदेखील प्रत्येकाच्या हिशोबानं ठरतं. पण हे असं सहसा होत नाही. तुमच्या मरणाची योग्य वेळ कोणती आणि तुम्ही कसं मराल, हे निसर्गच ठरवतो, तुम्ही नाही. आता मरण यावं अशी नुसती इच्छा करून मरण येत नसतं. भीष्मासारखं इच्छामरणी आजच्या या जगात कोणी नसतं. (याला अपवाद आहे फक्त ‘युथनेसिआ’चा मार्ग कायदेशीररीत्या आणि स्वेच्छेनं स्वीकारणाऱ्यांचा. पण यावर नंतर लिहितो.)

काही लोक अपघातात मरतात, काही दुर्धर रोगांनी, असह्य वेदना सहन करत मरतात, काही रणभूमीवर प्राण सोडतात, काही पोलिसांच्या गोळीबारात किंवा फाशीच्या खांबावर लटकून मरतात. काहींच्या नशिबात तिळातिळानं झिजत जाण्याचा तर काहींच्या नशिबात क्षणाक्षणानं विझत जाण्याचा, मावळत जाण्याचा शाप लिहिला असतो.

मुलगा आणि सून विचारत नाही म्हणून माझ्या परिचयाची एक वृद्ध महिला वृद्धाश्रमात राहत होती. शेवटचं वर्षभर ती आपल्या मुलाच्या आठवणीनं तीळ तीळ झिजली जात होती. आणि मग बेवारसच असल्यासारखी गेली. तिच्या अंत्यसंस्कारालादेखील गावातच राहणारा तिचा मुलगा आला नाही. अल्झायमर्सच्या व्याधीत एखाद्या पूर्ण विकसित डौलदार फुलाच्या पाकळ्या हळूहळू मावळत जाव्या आणि शेवटी ते फूल बंद होऊन त्याचं निर्माल्य व्हावं, तशी पेशंटची अवस्था होते.

..................................................................................................................................................................

आंबेडकरांना सहन करावा लागलेला विकृत व अविचारी वैरभाव या व्यंगचित्रांमधून उघड होतो. त्याचबरोबर ऐतिहासिक अन्याय सहन केलेल्या आंबेडकरांचं वास्तविक चरित्रही उजेडात येतं.

हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये खरेदीसाठी करण्यासाठी क्लिक करा - 

https://www.booksnama.com/book/5282/Hasanyawari-Neu-Naka

..................................................................................................................................................................

माझ्या परिचयाच्या अशाही काही व्यक्ती आहेत. त्यातली एक तर माझी आईच होती. तशी ती जवळपास नव्वदची होऊन गेली. पण तिच्या आयुष्यातली शेवटची दीड-दोन वर्षे तिला अल्झायमर्सच्या सावलीत घालवावी लागली. तिच्या सुंदर डोळ्यांतली ती चमक, तिचे सर्वांचं स्वागत करणारं ते स्मित, प्रचंड बुद्धिमता असलेला तिचा मेंदू, तिची धडाडी, तिची वाचा, तिची स्मृती या सार्यांवर अल्झायमर्सने ताबा मिळवला. रोज तिच्यात कालच्यापेक्षा वेगळा बदल होत होता. हिंदीत ‘मुर्झा जाना’ म्हणतात, तशी ती रोज मुर्झावत होती. तिला काहीच शरिरीक त्रास, यातना झाल्या नाहीत, कारण तिला तसे कोणतेच गंभीर आजार नव्हते. दररोज अशी मिटत मिटत जाता जाता नंतर एक दिवस अत्यंत शांतपणे ती मरण पावली, पण त्यावेळी ती एखाद्या आतून बंद, अभेद्य, चिरेबंदी बेटासारखी झाली होती. न बोलता, न हसता, ‘येते रे’, असा निरोपही न घेता ती गेली. तिचा ‘केअर गिव्हर’ (काळजीवाहक) म्हणून मला त्या काळात ज्या भयानक मानसिक वेदना झाल्या, त्यांची आणि रोग्यांना होणाऱ्या मानसिक वेदनांची तुलना होऊ शकेल का? काय माहीत!

(जिवलगांच्या) मृत्यूवर अनेक लेखक, कवींनी आजवर गद्य आणि पद्य रचना केल्या आहेत, संगीतकारांनी सांगितीक शोकविलाप केला आहे, चित्र आणि नाट्यमाध्यमांतूनही अनेकांनी अशीच अभिव्यक्ती केली आहे. कलाक्षेत्रात या सर्व कृतींचं एक वेगळंच स्थान आहे. यापैकी माझा सर्वांत आवडता शोक-आलाप मराठीत आहे. वयानं लहान असलेल्या आपल्या भावाचा आकस्मिकरीत्या झालेला मृत्यू जुन्या पिढीतले ज्येष्ठ साहित्यिक पु. भा. भावे यांना इतका हलवून गेला, इतका विरहव्यथित करून गेला की, त्यांनी या घटनेवर एक दीर्घ लेख लिहिला. जागतिक कीर्तीच्या एखाद्या महाकवीच्या लेखणीतून उतरलेले भासावेत, अशा तोलाचे हे शब्द आहेत. ही जणू काही एक गद्य विलापिकाच आहे. मृत्यू म्हणजे काय आणि प्रियजनांच्या निधनानं त्यांच्या परिवारातल्या लोकांचं आयुष्य, भावविश्व कसं अंतर्बाह्य ढवळून निघतं, यावरचं एक उत्कट, उत्कृष्ट विवेचन म्हणजे भावे यांचा हा लेख!

आता या सगळ्याचा ग्लोरियाचा काय संबंध? आणि ही ग्लोरिया आहे तरी कोण? ग्लोरिया हे काही एखाद्या मुलीचं नाव नाही. ग्लोरिया म्हणजे ग्लोरी - गौरव, कीर्ती, प्रतिष्ठा. ग्लोरिया (खरं तर ग्लोरिआ) हा लॅटिन भाषेतला शब्द आहे. चराचर सृष्टी असलेलं हे आपलं जग क्षणभंगूर आहे, तात्पुरतं आहे, तात्कालिक (ephemeral, transient, fleeting, evanescent) आहे, अळवावरच्या पाण्यासारखं आहे. ते निसर्गनियमांनी बांधलेलं आहे, त्याच्यात बदल हे होणारच, त्यात भरती-ओहोटी येतच राहणार. यात मानवानं कमावलेली प्रतिष्ठा, गौरव, मान सन्मान हेदेखील येतात. कधी एका सेकंदात हे सारे धुळीला मिळू शकतात, तर काही वेळा हळूहळू, कालौघात ते विलीन होतात.

कोणत्याही मर्त्य मानवाची प्रतिष्ठा तो गेल्यावर काही काळानं विलयाला जाते, विस्मृतीत जाते. काही कारणांनी, काही प्रसंगी त्याची आठवण भलेही येत असेल, पण तो जिवंत असताना त्याला जो मानसन्मान मिळत होता, तेव्हा त्याचा जो आदरयुक्त दरारा होता, किंवा धाक होता, त्याचा जो प्रभाव होता, तो सगळा त्याच्या मृत्यूनंतर हळूहळू नाहीसा होतो. रावण, कंस, औरंगझेब, हिटलर -- यांचंच उदाहरण घ्या. कोणे एके काळी ‘टेरर’ असलेली ही माणसं आज आपल्याला घाबरवू शकत नाहीत. कालपरवापर्यंत ट्रम्प हा जगातला सर्वांत शक्तिमान इसम होता. त्यानं अमेरिकेचं अध्यक्षपद सोडल्यावर आज तो एक सामान्य माणूस झाला आहे. जगातले दुष्ट हुकूमशहा काय किंवा आपापल्या कार्यकाळात अत्यंत लोकप्रिय असलेले नायक, नेते, खेळाडू, वैज्ञानिक, लेखक काय - या सर्वांचीच ‘ग्लोरी’ तात्पुरती असते. ते निवृत्त झाल्यावर किंवा मरण पावल्यावर ती प्रतिष्ठाही पुढे संपून जाते.

ईस्ट इंडिया कंपनीसाठी अर्धा भारत जिंकणारा, महापराक्रमी मराठ्यांचं साम्राज्य उद्ध्वस्त करणारा ड्यूक ऑफ वेलिंग्टन आज इंग्लंडमध्येसुद्धा किती लोकांना माहीत असेल? आजच्या पिढीतल्या मुलांना स्वतंत्र भारताच्या आजवरच्या पंतप्रधानांची, राष्ट्रपतींची, आणि सरन्यायाधीशांची किती नावं सांगता येतील? रणजी, कंकय्या नायडू, चंदू बोर्डे, नरी कॉन्ट्रॅक्टर, भागवत चंद्रशेखर, ना. सी. फडके, ह. ना. आपटे, आचार्य अत्रे, सैगल, पंकज मलिक - अशी किती नावं घ्यावीत? आपापल्या काळात त्यांनीही त्यांचं जग गाजवलं. पण त्या त्या क्षेत्रातली मोजकी जाणकार मंडळी सोडली तर आज किती लोकांना त्यांची नावं अथवा त्यांच्या प्रसिद्धीची कारणं, त्यांचे विक्रम माहीत असतील? जस्टिस विवियन बोस किंवा जस्टिस हिदायतुल्ला आज किती लोकांना आठवतात? आद्य शंकराचार्य किंवा अगदी पहिला पोप यांच्यानंतर गादीवर आलेले किती शंकराचार्य किंवा पोप नावानिशी लोकांच्या स्मरणात आहेत?

तात्पर्य, एके काळी प्रसिद्धपुरुष (अथवा महिला) होते हे निर्विवाद, पण आज कोणी त्यांची आठवण विसरलं, त्यांची ख्याती विसरलं तरी काही बिघडत नाही. लोक वर्तमानात जगतात. त्यांच्यासाठी भूतकाळ हा असलाच तर फक्त स्मरणरंजनासाठी असतो. आपल्या खापरपणजोबा किंवा खापरपणजीबद्दल जिथे आपल्याला माहिती नसते - तिथे एका जमान्यात जस्टिस विवियन बोस किंवा जस्टिस हिदायतुल्ला हे किती महान न्यायविद मानले जात होते, हे स्मरणात ठेवण्याची तसदी कोण घेणार? आणि त्यांनी ती का घ्यावी?

एजिप्ट देशात हजारो वर्षांपूर्वी फॅरो (pharoh) वंशाच्या राजांनी अनेक वर्षं राज्य केलं. आज त्यातल्या फक्त टुटनकामेन या फॅरोची कथा (मोजक्या) लोकांना माहीत आहे, कारण त्याचा भव्य आणि गूढ दंतकथांचं वलय ल्यालेला मकबरा किंवा पायरॅमिड प्रवासी लोकांत फार लोकप्रिय आहे, म्हणून. शंभर वर्षांपूर्वी तो मकबरा जर उत्खननात सापडला नसता तर टुटनकामेनचं नावही कोणी ऐकलं नसतं. जगातल्या सर्वच क्षेत्रांना हे पूर्वापार सत्य लागू पडतं. आणि पडेल. हाच जगाचा नियम आहे. हे सगळं असं असूनही काही लोक याकडे का दुर्लक्ष करतात? आपल्याला मरणानंतर फक्त सहा फूट लांब जागा तेवढी दफनासाठी लागणार आहे (हिंदू असाल तर तेवढीही नाही) या टॉलस्टॉयनं अधोरेखित केलेल्या त्रिकालाबाधित सत्याकडे हे लोक का दुर्लक्ष करतात? सत्ता असताना, पदावर असताना का काही लोक माज करतात? आपलं पद सुटलं की, रस्त्यावरचा कुत्रा सुद्धा आपल्याला सलाम करणार नाही हे पक्कं ठाऊक असूनही का कित्येक सनदी अधिकारी, पोलीस, न्यायाधीश आपल्या क्षणिक सत्तेची घमेंड बाळगतात?

शेक्सपिअरच्या ‘हॅम्लेट’ या सुप्रसिद्ध नाटकाच्या पाचव्या अंकाच्या पहिल्या दृष्यात स्मशानातली एक कवटी बघून हॅम्लेट म्हणतो -

To what base uses we may return, Horatio! Why may

not imagination trace the noble dust of Alexander,

till he find it stopping a bung-hole?

No, faith, not a jot; but to follow him thither with

modesty enough, and likelihood to lead it: as

thus: Alexander died, Alexander was buried,

Alexander returneth into dust; the dust is earth; of

earth we make loam; and why of that loam, whereto he

was converted, might they not stop a beer-barrel?

Imperious Caesar, dead and turn'd to clay,

Might stop a hole to keep the wind away:

O, that that earth, which kept the world in awe,

Should patch a wall to expel the winter flaw!

म्हणजे अलेक्झांडर असो किंवा सीझर - त्यांच्या देहाची एकदा माती झाली की, त्यांच्यातलं महानपण संपतं. मग त्यांना कोणी गिनत नाही. एका अर्थानं तुम्ही तुमच्या जिवंतपणी मिळवलेल्या प्रसिद्धीचा, ख्यातीचा, गौरवाचा हा मृत्यूच आहे. आपल्या देहाचा मृत्यू तुम्ही जसा सहजतेनं स्वीकारला पाहिजे, तसाच आपल्या कर्तृत्वाचा, ख्यातीचाही मृत्यू तुम्हाला स्वीकार्य असलाच पाहिजे. तुम्हाला ते मान्य नसेल तरी हे असंच होत आलं आहे आणि होत राहणार!

लॅटिन भाषेत हीच बाब एका सुंदर वाक्प्रचाराद्वारे सांगितलेली आहे. आपली ती ग्लोरिया इथे बघायला मिळते. हा वाक्प्रचार असा आहे - Sic transit gloria mundi (किंवा STGM). याचा अर्थ ‘Thus passes worldly glory’ म्हणजे या ऐहिक जगात मिळालेलं अथवा मिळवलेलं वैभव, मानमरातब, प्रतिष्ठा, गौरव यासारख्या गोष्टी क्षणिक आहेत, नाशिवंत आहेत -- आणि एक दिवस त्यादेखील मानवी देहासारख्या संपून जातील. याच अर्थाचा एक फारसी किंवा पर्शियन भाषेतला वाक्संप्रदायसुद्धा एवढाच प्रसिद्ध आहे. ‘हे दिवसही जातील’ असं तत्त्वज्ञान सांगणारं हे वाक्य आहे - याचा पर्शियन उच्चार इन निझ बोगझरद (īn nīz bogzarad) असा काहीसा होतो. इंग्रजी अर्थ आहे - ‘This too shall pass’. एका सुलतानाच्या हुकुमावरून त्याच्या दरबारातल्या एका सूफी संतानं हे वाक्य सुलतानाच्या अंगठीवर कोरून दिलं, अशी त्यामागची कहाणी आहे. प्रत्यही बदलणाऱ्या या मानवी जगात मानवाची खरी मनोवृत्ती कशी असली पाहिजे, याचं एका वाक्यात वर्णन करायला त्या संताला आदेश देण्यात आला होता. त्याचं उत्तर म्हणून त्यानं हे वाक्य लिहिलं. त्यामुळे पुढे जेव्हा जेव्हा त्या सुलतानाला दुःख झालं की, तो आपल्या अंगठीवरचं हे वाक्य वाचायचा आणि खुश व्हायचा. अर्थातच, जेव्हा केव्हा तो अतीव आनंदात असायचा, तेव्हा हेच वाक्य त्याला अंतर्मुख, उदासदेखील करायचं.

‘Sic transit gloria mundi’ या शब्दांचा अर्थही असाच आहे. Sic म्हणजे thus (असं, अशा प्रकारे). आज हा शब्द मुख्यत्वे मुद्रणव्यवसायात किंवा औपचारिक लेखनात वापरतात. वाचणाऱ्याला एखादा शब्द चुकीचा वाटला तरी तो तसाच आहे, तसाच वाचावा, हे सांगण्यासाठी त्याच्यासमोर कंसात (sic) असं लिहिण्याचा प्रघात आहे. म्हणजे ‘यात बदल करू नका, हे असंच आहे’.

Transit म्हणजे पुढे, मागे, कशातून, कशाच्या तरी वरून जाणे. मूळ लॅटिन शब्द आहे transire. यात trans म्हणजे ‘over’ आणि‎ ire म्हणजे ‘to go’. नंतर फ्रेंच भाषेच्या माध्यमातून हा शब्द इंग्रजीत आला. प्रवास या अर्थानं हा शब्द वापरतात. Gloria म्हणजे गौरव हे आपण बघितले आहेच. यातून इंग्रजीतला ‘glory’ हा शब्द तयार झाला. ख्रिस्तीधर्मियांसाठी या शब्दाचं विशेष महत्त्व आहे. Mundus किंवा Mundi मुंडी म्हणजे जग, विश्व.

१४०९मध्ये अलेक्झांडर पाचवा नावाचे पोप (रोमन कॅथलिक ख्रिश्चनांचे सर्वोच्च धर्मगुरू) गादीवर आले. तेव्हापासून १९६३पर्यंत जेव्हा जेव्हा नवीन पोप निवडले गेले, तेव्हा त्या प्रत्येकाच्या सत्ताभिषेकाच्या प्रसंगी ‘Sic transit gloria mundi’ या वाक्याचे उच्चारण करण्याची परंपरा पाळली गेली. नूतन पोपला समारंभपूर्वक त्यांच्या आसनाकडे नेत असताना वाटेत तीन वेळा ही मिरवणूक थांबायची. या संपूर्ण सोहळ्याच्या व्यवस्थापनाची जबाबदारी ज्या अधिकाऱ्यावर असायची, तो या तिन्ही वेळा हातात चांदी किंवा पितळेची एक छडी घेऊन पोपसमोर गुडघे टेकवून बसायचा. या छडीच्या वरच्या टोकाला एक वस्त्र जळत असायचं. आणि प्रत्येक वेळी तो अधिकारी शोकाकूल, पण मोठ्या आवाजात म्हणायचा- ‘Pater Sancte, sic transit gloria mundi!’ (‘Holy Father, so passes worldly glory!’ पवित्र पिताश्री, ऐहिक गौरव हा असा (जळणाऱ्या वस्त्रासारखा) नष्ट होतो.) ऐहिक जगाच्या क्षणभंगूर अस्तित्वाची पोपना जाणीव करून देण्यासाठी या प्रथेचं पालन केलं जात असे. त्यातूनच पुढे हा वाक्प्रचार निर्माण झाला आणि इंग्रजीसह अनेक भाषांत तो रूढ झाला. Thomas à Kempis च्या ‘The Imitation of Christ’ या १४१८च्या रचनेतही ‘O quam cito transit gloria mundi’ ("How quickly the glory of the world passes away") असा उल्लेख सापडतो.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

रोमन कवी व्हर्जिलचं ‘fugit inreparabile tempus’ किंवा ‘Tempus fugit’ असं एक लॅटिन वाक्य फार प्रसिद्ध आहे. त्याचा साधा अर्थ आहे, time flies, काळ वेगानं निघून जातो. म्हणूनच Memento mori किंवा आपल्याला मृत्यू येणारच आहे, हे कायम लक्षात असू द्या. मृत्यूला विसरू नका. त्याला घाबरू नका, पण त्याची आठवण कायम लक्षात ठेवा, असंही तत्त्वज्ञ सांगतात. जेम्स बाँडच्या ‘Spectre’ नावाच्या २०१५च्या चित्रपटात एका उत्कंठावर्धक प्रसंगी बाँड खलनायकाला उद्देशून ‘Tempus fugit’ असं म्हणतो, हे बाँडप्रेमींना आठवत असेलच.

आपल्या मराठीतही समर्थ रामदास स्वामींनी याच अर्थाचं एक पद लिहिलं आहे. ते म्हणजे, ‘घटका गेली पळे गेली तास वाजे झणाणा । आयुष्याचा नाश होतो राम कां रे म्हणाना’. सर्वशक्तिमान काळाचा महिमा हा असा असतो. तुम्ही राम म्हणा, कृष्ण म्हणा, किंवा आणखी काही म्हणा - किंवा काहीच म्हणू नका, पण काळाला कदापी विसरू नका, एवढंच या कथनाचं सार आहे.

जाता जाता - लॅटिन भाषेतल्या Sic transit gloria mundi या वाक्याचं ‘सोमवारी प्रवास करताना ग्लोरिया नावाची मुलगी आजारी पडली’ असं भाषांतर जर तुम्हाला कोणी ऐकवलं तर तो एक विनोद आहे, हे पण लक्षात ठेवा!

(मृत्यूविषयक आणखी काही शब्दांची चर्चा पुढच्या भागात.)

..................................................................................................................................................................

लेखक हर्षवर्धन निमखेडकर वकील आहेत. वुडहाऊसचे अभ्यासकही.

the.blitheringest.idiot@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......