आपण आपली राजकीय मते अत्यंत विचारपूर्वक ठरवलेली आहेत आणि आपल्या विरोधकाची मते मात्र त्याच्या स्वार्थी स्वभावाचा परिपाक आहेत, अशी आपली भावना असते...
पडघम - सांस्कृतिक
श्रीनिवास जोशी
  • हान्स आयझेन्क आणि ‘सेन्स अँड नॉनसेन्स इन सायकॉलॉजी’चे मुखपृष्ठ
  • Mon , 08 February 2021
  • पडघम सांस्कृतिक हान्स आयझेन्क Hans Eysenck सेन्स अँड नॉनसेन्स इन सायकॉलॉजी Sense and Nonsense in Psychology

आपली राजकीय मते आपण अतिशय विचारपूर्वक ठरवलेली असतात, असे आपल्याला वाटत असते. आजूबाजूच्या परिस्थितीचा, एकूण इतिहासाचा, मानवी स्वभावाचा आणि विविध विचारप्रणालींचा व्यवस्थित विचार करून आपण आपली राजकीय मते ठरवली आहेत, असे आपल्याला वाटत असते.

याउलट माणसाची राजकीय मते त्याच्या नकळत घडलेली असतात, असे काही मानसशात्रज्ञ म्हणतात. आपल्या मनाच्या काही भावनिक गरजा असतात. त्या आपल्या आकलनशक्तीच्या बाहेरच्या असतात. आपण ज्या परिस्थितीत वाढतो, मोठे होतो आणि आपल्यावर जे मानसिक आघात होतात; त्या सगळ्यातून या भावनिक गरजा निर्माण होतात. आपण अगदी लहान असताना हे सगळे घडते. त्यामुळे आपल्या या जडणघडणीचे ज्ञान आपल्याला नसते.

उदाहरणार्थ, एखाद्या मुलाचे वडील लहानपणी गेले असले तर, त्याच्या मनात एक असुरक्षिततेची भावना राहायला येणे स्वाभाविक असते. अशी व्यक्ती मोठी झाली तरी तिच्या अंतर्मनात ती भावना तशीच जिवंत असते. अशा व्यक्तीला अर्थातच खंबीर नेता किंवा खंबीर भूमिका घेणारा राजकीय पक्ष आवडतो. असा नेता किंवा पक्ष त्या व्यक्तीला अपरिहार्य वाटतो. याच्या उलट एखाद्या व्यक्तीचे वडील जर हुकूमशाही वृत्तीचे असतील, तर त्या व्यक्तीला व्यक्तिगत स्वातंत्र्याचा आदर करणारा नेता आणि पक्ष अपरिहार्य वाटतो.

अशा दोन विरुद्ध भावनिक गरजांमुळे दोन विरुद्ध राजकीय मते असणाऱ्या व्यक्ती चर्चा करू लागल्या की, भांडणे होतात. एकमेकांची मते त्या समजूच शकत नाहीत. समोरची व्यक्ती, इतक्या मूर्खपणाची भूमिका घेऊच कशी शकते, असे दोघांनाही वाटत असते. समोरची व्यक्ती एकतर कमी बुद्धिमत्तेची असणार किंवा भावनिकदृष्ट्या अस्थिर तरी असणार असा निष्कर्ष दोघेही काढतात. निदान आपल्या वैयक्तिक स्वार्थापोटी तरी समोरची व्यक्ती अशी वागते आहे, असे दोघांनाही वाटत राहते.

थोडक्यात काय तर, आपण आपली राजकीय मते अत्यंत विचारपूर्वक ठरवलेली आहेत आणि आपल्या विरोधकाची मते मात्र त्याच्या कमी बुद्धीचा, किंवा भावनिक अस्थिरतेचा किंवा त्याच्या स्वार्थी स्वभावाचा परिपाक आहेत, अशी आपली भावना असते.

..................................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी पहा - सर्व प्रकारच्या कट्टरतेला नाकारणाऱ्या ‘इन्शाअल्लाह’ या अभिराम भडकमकर यांच्या बहुचर्चित कादंबरीवरील ‘परीक्षण’ स्पर्धा

..................................................................................................................................................................

सध्या आपल्यातील प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रूपचा सदस्य असतो. प्रत्येक ग्रूपवर अशा प्रकारच्या खडाजंगी सुरू असते. यात अजून एक मजा लपलेली असते. आपल्या राजकीय विचारांसाठी प्रत्येकाने एखाद्या राजकीय विचारवंताची किंवा नेत्याची निवड केलेली असते. त्या त्या विचारवंताचे किंवा नेत्याचे विचार त्याने शिरोधार्ह मानलेले असतात. कुणी गांधीवादी असतो, कुणी सावरकरवादी असतो, कुणी गोळवलकर गुरुजी यांना पूज्य मानलेले असते, तर कुणी मनाच्या देव्हाऱ्यात कार्ल मार्क्सची प्रतिष्ठापना केलेली असते.

या सगळ्या प्रकारात सगळ्याच व्हॉट्सअ‍ॅप ग्रूपवर प्रचंड भांडणे होतात. चर्चा, आमने-सामने आणि दारू वगैरे पिऊन चाललेली असेल तर मग विचारायलाच नको. काही कळायच्या आत प्रकरण मारामारीवर येते. ग्रूपमधले बरेचसे लोक या राजकीय मारामाऱ्यांच्या बाहेर असतात. भांडणारे दोन्ही बाजूचे लोक वेडे आहेत असे त्यांना वाटत असते. भांडणाऱ्या लोकांना, हे न भांडणारे लोक - कणाहीन, भित्रे आणि राजकीयदृष्ट्या अपरिपक्व आहेत असे वाटत असते. 

आजच्या काळात सगळ्या जगभर याच स्वरूपाचे चित्र दिसत आहे. प्रत्येक ठिकाणी पक्ष वेगळे असतात, नेते वेगळे असतात, पण भांडणे एकसारखीच असतात. खरं तर, राजकीय चर्चा सर्व जगभर पुरातन काळापासून सुरू आहेत. परंतु आता, सोशल मीडियामुळे या सर्व प्रकाराला एक नवी धार आलेली आहे.

राजकारण हा पुरातन काळापासून इतका जिवंत विषय असल्यामुळे मानसशास्त्रज्ञ या विषयात उतरले नसते तरच नवल होते. मानवाच्या राजकीय प्रेरणांचे आणि वर्तणुकीचे मानसशास्त्र नक्की काय आहे, याचा अभ्यास खूप पूर्वीपासून सुरू आहे. हान्स आयझेन्क हे मानसशास्त्रज्ञातील एक मोठे नाव. विसाव्या शतकात अनेक मोठे मानसशास्त्रज्ञ होऊन गेले. त्या मोठ्या मानसशास्त्रज्ञातही हान्स आयझेन्क यांचे नाव फार मोठे आहे.

१९५७ साली त्यांनी ‘सेन्स अँड नॉनसेन्स इन सायकॉलॉजी’ हे महत्त्वाचे पुस्तक लिहिले. या पुस्तकाच्या सातव्या प्रकरणाचे नाव आहे - ‘पॉलिटिक्स अँड पर्सनॅलिटी’. या प्रकरणात त्यांनी माणसाचे एकूण व्यक्तिमत्त्व आणि त्याची राजकीय मते, यांचे काही नाते असते का या प्रश्नाचा अभ्यास केला आहे.

एखादा विचार मांडून मोकळे होणे वेगळे आणि आपण जो काही विचार मांडला आहे, त्याला स्टॅटिस्टिक्सचा म्हणजे संख्याशास्त्राचा आधार देऊन तो सगळा अभ्यास समाजाच्या समोर ठेवणे वेगळे. कुठलेही शास्त्र म्हटले की, आपण जे म्हणतो आहे ते सिद्ध करणे आले. कमीत कमी सिद्ध करण्याचा प्रयत्न तरी केला जायला हवा.

राज्यशास्त्र किंवा मानसशास्त्र ही शास्त्रे, भौतिकशास्त्रासारखी संपूर्ण (परफेक्ट) शास्त्रे नाहीत. भौतिक शास्त्रामध्ये ज्याप्रमाणे प्रयोग करून आणि निरीक्षणे करून आपले मत सिद्ध करता येते, तसे इथे करता येत नाही. त्यामुळे इथे आधारासाठी संख्याशास्त्र वापरले जाते. आयझेन्क यांनी त्यांचे जे विचार होते किंवा त्यांची जी गृहितके होती, त्यांना संख्याशास्त्राचा आधार दिला. 

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

भाजपसारख्या परंपरावादी पक्षाला मत देणारे इतर पक्षांना मत देणाऱ्या लोकांपेक्षा जास्त बुद्धिमान असतात - असे जर कुणाचे म्हणणे असेल तर त्याने समाजातील प्रातिनिधिक समूहाचा अभ्यास केला पाहिजे. त्या समूहातील सर्वांचे बुद्ध्यांक काढून तपासले पाहिजेत, त्यातले जास्त बुद्ध्यांकाचे लोक भाजपला मते देत आहेत, हे दाखवून द्यायला पाहिजे आणि आपले म्हणणे सिद्ध करायला पाहिजे.

थोडक्यात, अनुभवावर आधारित बोलण्याला किंमत असते. नुसत्या विचारांवर आधारित बोलण्याला किंमत नसते. परंतु संख्याशास्त्रीय निष्कर्ष हा काही पूर्ण अनुभव नाही. ते अनुभवाच्या जवळ जाणे आहे. त्यामुळे मानसशास्त्रात सिद्धान्तांवर अवलंबून राहावेच लागते आणि अनुमाने काढावीच लागतात. नाहीतर आकड्यांशिवाय हाती काहीच लागत नाही. आयझेन्कचे म्हणणे असे की, आपण आपली भाषा शिकतो, त्याचप्रमाणे आपण राजकारणसुद्धा शिकतो. राजकारण शिकताना दोन गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. प्रत्येक व्यक्तीला आपला फायदा झालेला हवा असतो आणि प्रत्येक व्यक्तीला कुठल्यातरी समूहाचा भाग बनून राहायला आवडते. या दोन्ही गोष्टी मानवाच्या नैसर्गिक प्रेरणा आहेत. या प्रेरणा माणसाचे राजकीय विचार घडवत असतात.

आपल्या आयुष्याच्या सुरुवातीलाच आपल्या लक्षात येते की, या जगातले सगळे लोक एकसारखे नाहीत. या जगात लोकांचे विविध समूह आहेत. या जगात वेगवेगळ्या सामाजिक प्रतिष्ठा असलेले लोक आहेत. समाजाच्या एका टोकाला कोट्यधीश असतो, तर दुसऱ्या टोकाला गरिबातला गरीब असतो. असे अनेक प्रकारचे वर्ग समाजात आहेत, हे अगदी लहानपणी आपल्या लक्षात येते. उच्च वर्ग असतो, उच्च मध्यमवर्ग असतो, मध्यम आणि कनिष्ठ वर्ग असतो आणि सगळ्यात खालचा वर्ग असतो. तुम्ही भारतासारख्या देशात असाल तर समाजामध्ये अनेक जातीसुद्धा आहेत, असे तुमच्या लक्षात येते. या जगातला कुठलाही समाज किंवा कुठलेही राष्ट्र अशा प्रकारे अनेक वर्गात विभागलेले असते. या विभागणीमुळे अनेक प्रश्न निर्माण होतात. एका वर्गाच्या हिताचे जे असते, नेमके तेच दुसऱ्या वर्गाच्या हिताचे नसते.

सध्याचा शेतकऱ्यांचा प्रश्न घेतला तर आपल्या लक्षात येईल की, आंदोलनाचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आधारभूत किमतीचा आहे. ही किंमत द्यायची असेल तर ती सरकारलाच द्यायला लागणार आहे. आणि सरकार ही किंमत देणार असेल तर ती जमा झालेल्या विविध करांमधून देणार आहे. भारतात शेतीवर आयकर नसल्यामुळे, आयकर देणारे लोक म्हणणार की, आम्ही दिलेल्या करातून ही किंमत का देत आहात? तेसुद्धा शेतकरी आयकर भरत नसताना! आम्ही दिलेल्या पैशातून आधी आमच्या शहरातील रस्ते दुरुस्त करा. त्यानंतर, पैसे उरले तर शेतकऱ्याला द्या. त्यावर शेतकरी म्हणणार की, अहो, एक रुपया कर जमला तर त्यातले फक्त चार पैसे आयकरातून येणार. मुख्य कर जीएसटी हा आहे. तो तर आम्ही खरेदी केलेल्या प्रत्येक गोष्टीवर देतोच आहोत. अगदी काडेपेटीपासून ते आम्ही खरेदी केलेल्या ट्रॅक्टरपर्यंत प्रत्येक गोष्टीवर जीएसटी आहे. आम्ही ७० टक्के आहोत. म्हणजे या देशातला जवळ जवळ सगळा कर आम्ही देतो आहोत. तुमचे रस्ते वगैरे कौतुक राहू द्या बाजूला. आधारभूत किंमत हा आमच्या जीवन-मरणाचा प्रश्न आहे. त्याकडे पहिल्यांदा बघा.

थोडक्यात काय तर राष्ट्रीय संपत्तीचा केक कसाही कापला तरी काही लोकांना जास्त भाग मिळतो आणि काही लोकांना कमी भाग मिळतो. यातही मजा म्हणजे ज्यांना जास्त भाग मिळाला आहे, त्यांना आपल्याला आपल्या गरजांपेक्षा कमी भाग मिळालेला आहे, असे वाटत राहाते. एकंदर परिस्थिती पाहायला गेले तर सगळेच लोक या ना त्या कारणाने नाखुश राहतात.

अशा प्रकारे भांडणाऱ्या समाजातील या विविध वर्गांच्या हिताची काळजी घेण्यासाठी विविध पक्षांची स्थापना होते. समाजातील विविध वर्गांच्या मागे विविध पक्ष उभे असतात. वरच्या वर्गाच्या हिताकडे लक्ष देण्यासाठी जे राजकीय पक्ष उभे राहतात, त्यांना ‘काँझर्व्हेटिव्ह पक्ष’ म्हणतात. किंवा ‘उजवे पक्ष’ म्हणतात. समाजाच्या खालच्या वर्गाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी जे पक्ष उभे राहतात त्यांना ‘रॅडिकल पक्ष’ म्हणतात किंवा ‘डावे पक्ष’ म्हणतात.

अशा परिस्थितीत, आपल्या वर्गाच्या मागे उभ्या असलेल्या पक्षाला लोक खरंच आपले मत देतात का, हे बघण्यासाठी आयझेन्कने अनेक सर्व्हे केले. अनेक सर्वेक्षणे केली. त्यातून त्याला असे दिसून आले की, वरच्या वर्गातील जवळजवळ ७९ टक्के लोक उजव्या पक्षांना मत देतात. तर खालच्या वर्गातील केवळ २० टक्के लोक उजव्या पक्षांना मत देतात. खालच्या वर्गातील ९० टक्के लोक डाव्या पक्षांना मत देतात, तर वरच्या वर्गातील केवळ ५ टक्के लोक डाव्या पक्षांना मत देतात.

..................................................................................................................................................................

आंबेडकरांना सहन करावा लागलेला विकृत व अविचारी वैरभाव या व्यंगचित्रांमधून उघड होतो. त्याचबरोबर ऐतिहासिक अन्याय सहन केलेल्या आंबेडकरांचं वास्तविक चरित्रही उजेडात येतं.

हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये खरेदीसाठी करण्यासाठी क्लिक करा - 

https://www.booksnama.com/book/5282/Hasanyawari-Neu-Naka

..................................................................................................................................................................

इथे प्रश्न उभा राहतो की, आपल्या वर्गाच्या हिताचे रक्षण करणाऱ्या पक्षाला त्या त्या वर्गाचे १०० टक्के लोक आपले मत का देत नाहीत?

यावर आयझेन्क म्हणतो की, आपल्या वर्गाच्या पक्षाला मत न देणाऱ्या लोकांना वाटत असते की, आपण विरुद्ध पक्षाला मत दिले की, त्यात आपले हित साधले जाईल. किंवा कधी कधी जागतिक परिस्थितीच अशी तयार होते की, पक्षांना आपापल्या वर्गातील लोकांच्या हिताचे रक्षण करता येत नाही. उदाहरणार्थ, जगाच्या बाजारात क्रूड तेलाच्या किमती खूप वाढल्या की, त्या वेळी सत्तेत असलेल्या डाव्या पक्षांना खतांच्या किमती वाढवाव्या लागतात. आणि त्या रागापोटी शेतकरी पुढच्या निवडणुकीत उजव्या पक्षाला मत देतात. असाच प्रकार उच्च वर्गाविषयीसुद्धा होतो. उदारहरणार्थ, भारतातील आरक्षण रद्द करावे असे भारतातील उच्च वर्गाला वाटत असते. परंतु, मतदारांची एकूण टक्केवारी बघितली तर भारतातील उजव्या पक्षांना आरक्षण रद्द करण्याचा विचारही करता येत नाही.

काही वेळा विरुद्ध पक्षांना मत देण्यामागे मानसिक कारणेसुद्धा असतात. उदाहरणार्थ, उच्च वर्गातील अत्यंत तिरसट बापाच्या पोटी जन्माला आलेला मुलगा डाव्या पक्षांना मत देऊ शकतो. इथे आपल्या बापाला राग यावा एवढीच त्याची इच्छा असते. अगदी याच कारणासाठी खालच्या वर्गातील मुलगा उजव्या पक्षाला मत देऊ शकतो.

याही पलीकडे जाऊन आयझेन्कच्या लक्षात आले की, काही लोक विरुद्ध पक्षाला मत देतात कारण, त्यांना बुद्धी नावाची गोष्ट खरंच कमी प्रमाणात असते. आपले खरे हित कुठल्या पक्षाला मत देण्यात आहे, हे त्यांच्या लक्षातच येत नाही. काही लोक मानसिकदृष्ट्या खरंच खूप अस्थिर (न्युरॉटिक्स) असतात. या लोकांना, आपल्या मनातील अविवेकाच्या राज्यातली कारणे महत्त्वाची वाटतात आणि त्यासाठी ते विरुद्ध पक्षाला मत देताना दिसतात.

आतापर्यंत आपण वैयक्तिक फायद्याचा विचार एखाद्या व्यक्तीची राजकीय भूमिका कशी घडवतो, ते पाहिले. आता, कुठल्यातरी मानवी समूहाचा भाग बनून राहण्याची मानवाची गरज त्याची राजकीय भूमिका कशी घडवते ते आपण पाहू.

एखाद्या व्यक्तीला मानवी समूहाचा भाग बनून राहायचे असेल तर तिला स्वतःवर काही निर्बंध घालून घ्यायला लागतात. एखाद्या व्यक्तीला समाजात राहायचे असेल तर तिला आपल्या लैंगिक इच्छांवर आणि आपल्या आक्रमकतेवर निर्बंध घालून घ्यावे लागतात. प्रत्येक व्यक्तीची या संदर्भातील मते त्या व्यक्तीच्या राजकीय विचारांवर सखोल परिणाम करताना दिसतात.

..................................................................................................................................................................

‘खिंडीत’ : शैक्षणिक जगताच्या अंतरंगाची विरूपता भेदकपणे उलगडणाऱ्या कथा

हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये ऑनलाईन खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5254/Khindit

..................................................................................................................................................................

इथे आयझेन्क माणसांचे दोन प्रकार सांगतो - ‘मवाळ व्यक्तिमत्त्वाचे लोक’ आणि ‘जहाल व्यक्तिमत्त्वाचे लोक’. मवाळ व्यक्तिमत्त्वाच्या लोकांना हे सामाजिक निर्बंध पाळले गेलेले हवे असतात. जहाल स्वभावाच्या लोकांना मात्र लैंगिकता आणि आक्रमकता या आदिम प्रेरणांना समाजामध्ये जास्त मोकळा वाव हवा असतो.

अजून एक म्हणजे, मवाळ अंतःकरणाचे लोक अहिंसेकडे ओढले जातात, तर जहाल अंतःकरणाच्या लोकांचे म्हणणे असते की, मानवी आयुष्यात हिंसा अपरिहार्य असते. त्यामुळे तिच्यापासून दूर पळण्यात काही अर्थ नसतो. मवाळ अंतःकरणाच्या लोकांना विवाहसंस्थेने आणलेले निर्बंध हवे असतात तर जहाल लोकांना थोडी अघळ-पघळ स्वरूपाची विवाह संस्था हवी असते. घटस्फोट देणे किंवा घेणे अगदी सोपे असावे, असे या लोकांचे म्हणणे असते.

उजवे पक्ष आणि डावे पक्ष, अशी पक्षांची साधी रचना नसते. उजव्या आणि डाव्या पक्षात अनेक छटा असतात. सगळ्यात डावीकडे कम्युनिस्ट असतात, त्यांच्या थोड्या उजव्या अंगाला सोशलिस्ट असतात त्यांच्या उजवीकडे काँग्रेस पक्षासारखे पक्ष असतात. मध्यभागी लिबरल - म्हणजे उदारमतवादी असतात. उजव्या बाजूचा विचार केला तर सगळ्यात उजवीकडे फॅसिस्ट असतात. त्यांच्या थोड्या डाव्या बाजूला हिंदू महासभेसारखे पक्ष असतात आणि त्यांच्या डाव्या अंगाला भाजपसारखे पक्ष असतात.

डावे, कमी डावे, अगदी कमी डावे असे अनेक प्रकार असतात. त्याच प्रमाणे जहाल उजवे, थोडे कमी उजवे आणि अगदी सौम्य उजवे असे प्रकार उजव्या पक्षांमध्येही असतात.

जहाल डावे ते जहाल उजवे अशी आखणी केली तर असे चित्र दिसते.          

भारतातील मुख्य पक्षांचा विचार केला तर शून्याच्या डावीकडे आणि सोशलिस्टांच्या अलीकडे काँग्रेस पक्ष येईल. शून्याच्या उजवीकडे आणि फॅसिस्टांच्या खूप अलीकडे भाजप येईल.

काही लोकांना ही मांडणी योग्य वाटत नाही. ते म्हणतात की, कम्युनिस्ट आणि फॅसिस्ट हे पक्ष लोकशाहीविरोधी आहेत. मग ते विरुद्ध टोकाला का दिसत आहेत?

या गोष्टीला न्याय द्यायचा असेल तर आधी आपण ‘डावे पक्ष ते उजवे पक्ष’ अशी मांडणी केली होती, त्याऐवजी ‘हुकूमशाहीवादी पक्ष’ आणि ‘लोकशाहीवादी पक्ष’ अशी मांडणी करावी लागेल.

या मांडणीमध्ये फॅसिस्ट आणि कम्युनिस्ट हे हुकूमशाहीवादी पक्ष एकमेकांच्या जवळ येतील. शून्याच्या डाव्या बाजूला भाजपसारखे पक्ष येतील. शून्याच्या उजव्या बाजूला काँग्रेससारखे पक्ष येतील आणि सगळ्यात उजवीकडे संपूर्ण लोकशाहीवादी लिबरल किंवा उदारमतवादी पक्ष येतील.

डावे पक्ष ते उजवे पक्ष आणि हुकूमशाहीवादी पक्ष ते लोकशाहीवादी पक्ष, अशा या दोन मांडण्या आहेत. आयझेन्कने केलेल्या या दोन मांडण्यांमुळे विविध पक्षांविषयीचे चित्र आपल्या डोळ्यासमोर चांगल्या प्रकारे उभे राहते. वेगवेगळे पक्ष आणि त्यांच्या भूमिकांबद्दल आपल्या मनामध्ये एक स्पष्ट चित्र तयार होते.

याच्या पुढचा टप्पा म्हणून आयझेन्कने या दोन मांडण्या एकमेकींना जोडल्या. त्यामुळे सगळे चित्र अजून स्पष्ट झाले.

आपण बघितले की, एका वर्गाचे लोक साधारणपणे एका पक्षाला मत देतात. त्या पक्षाची सामाजिक आणि राष्ट्रीय महत्त्वाच्या गोष्टींवर काही मते असतात. आता हे बघावे लागेल की, एका पक्षाला मते देणाऱ्या लोकांची सामाजिक विषयांवरील मते एकसारखी असतात का?

उजव्या पक्षाला मत देणाऱ्या लोकांची मते अनेक विषयांवर जुळताना दिसतात. उदाहरणार्थ, उद्योगांचे राष्ट्रीयकरण करून फार काही साधले जात नाही. धार्मिक शिक्षण सक्तीचे असायला हवे. फाशीची शिक्षा रद्द केली जाता कामा नये.

या उलट डाव्या पक्षांना मते देणाऱ्या लोकांची मते या विरुद्ध असल्याचे दिसून येते - खासगी मालमत्ता बरखास्त केली गेली पाहिजे, धार्मिक शिक्षण हा जुनाट प्रकार आहे, शांतता आणि राष्ट्रीय सार्वभौमत्व यामध्ये शांततेला जास्त महत्त्व दिले गेले पाहिजे.

अशा अनेक विषयांवरचे प्रश्न दोन्ही बाजूंच्या लोकांना विचारले, तर एका समूहाच्या लोकांची मते बऱ्यापैकी जुळणारी असतात, हे सिद्ध करता येते.

एवढे झाल्यावर आयझेन्क ‘मवाळ अंतःकरणाचे लोक आणि जहाल अंतःकरणाचे लोक’ अशा मांडणीकडे वळतो.

जहाल अंतःकरणाचे लोक गुन्ह्यांना अत्यंत कठोर शिक्षा केल्या गेल्या पाहिजेत, लहान मुलांनी मोठा गुन्हा केला असेल तर त्यांनाही फाशीची शिक्षा दिली गेली पाहिजे, अशा मताचे असतात. लग्नाआधी लोकांना एकत्र राहू दिले गेले पाहिजे, गर्भपातविरोधी कायदे रद्द केले जावेत, अशी मतेसुद्धा हे कठोर लोक मांडत असतात.

या उलट, मवाळ अंतःकरणाचे लोक शांततावादी असतात. धार्मिक असतात. त्यांना गर्भपातात होणाऱ्या हत्या मान्य नसतात. त्यांना फाशीची शिक्षा रद्द केली जावी असे वाटत असते. आणि एकंदरीतच सर्व शिक्षा अत्यंत सौम्य स्वरूपाच्या असल्या पाहिजेत असे त्यांना वाटत असते.

या मांडणीचा विचार केला तर आपल्या लक्षात येते की, फॅसिस्ट लोक जहाल स्वभावाचे उजवे असतात. कम्युनिस्ट लोक जहाल स्वभावाचे डावे असतात. लिबरल लोक मवाळ स्वभावाचे मध्यममार्गी असतात. काँझर्व्हेटिव्ह लोक फॅसिस्ट लोकांपेक्षा मवाळ स्वभावाचे उजवे असतात आणि समाजवादी लोक कम्युनिस्टांपेक्षा मवाळ स्वभावाचे डावे असतात.

थोडक्यात मवाळ अंतःकरणाचा काँग्रेसवाला थोडा कठोर झाला की, समाजवादी बनतो. थोडा कठोर अंतःकरणाचा समाजवादी अजून कठोर झाला की, कम्युनिस्ट बनतो.

उजव्या बाजूचा विचार केला तर लक्षात येते की, मवाळ अंतःकरणाचा भाजपवाला थोडा कठोर बनला की, हिंदू महासभेचा बनतो. हिंदू महासभावाला अजून कठोर बनला की, तो फॅसिस्ट बनतो.

.................................................................................................................................................................

विसंगती व सुसंगती समजून घेण्यासाठी उपयुक्त पुस्तक - वासंती दामले

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/4299/Madhyamvarg---ubha-adva-tirpa

.................................................................................................................................................................

या सर्व मांडण्यांमध्ये कुठली व्यक्ती नक्की कुठे बसते आहे, हे ठरवण्यासाठी आयझेन्कने साठ विचारांची एक मालिका बनवली. या मालिकेमध्ये प्रश्न नव्हते. फक्त विचार होते. समोरच्या व्यक्तीने, त्या मालिकेतील विचाराशी आपण पूर्ण सहमत आहोत की, थोडेबहुत सहमत आहोत, हे सांगायचे होते. विरोध असेल तर पूर्ण विरोध की, थोडाबहुत विरोध हे सांगायचे होते. कुठलेच मत नसेल तर तसे सांगायचे होते.

त्या मालिकेतील काही विचार खालीलप्रमाणे होते.

१) राष्ट्र व्यक्तीसाठी असून, व्यक्ती राष्ट्रासाठी नाही.

२) युद्ध हा मानवी स्वभावाचा अविभाज्य भाग आहे.

३) खासगी मालमत्ता बरखास्त केली गेली पाहिजे.

४) सामान्य माणूस धर्माशिवाय चांगले जीवन जगू शकतो.

५) फाशीची शिक्षा अत्यंत रानटी स्वरूपाची आहे.     

६) स्त्री-पुरुषांमध्ये मुक्त लैंगिक प्रेम अस्तित्वात असले तर ते त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी योग्य ठरते. 

७) समाजासाठी विचारवंतापेक्षा कष्टकरी माणूस जास्त उपयोगी असतो.

या मालिकेला लोकांनी दिलेल्या उत्तरांवरून आयझेन्कला दिसून आले की, कम्युनिस्ट लोक आणि फॅसिस्ट लोक एकमेकांपासून फारसे वेगळे नसतात, मवाळ डावे आणि मवाळ उजवे आणि एकमेकांपासून फारसे वेगळे नसतात. आपल्याकडील उदाहरण द्यायचे तर भाजपचा समर्थक आणि फॅसिस्ट यांच्यात जीवनमूल्यांच्या बाबतीत जेवढी दरी असते; त्यापेक्षा कमी दरी भाजप आणि काँग्रेस यांच्या समर्थकांमध्ये असते. जीवनमूल्यांच्या विचार केला तर काँग्रेसवाला कम्युनिस्टापेक्षा भाजप समर्थकाला जास्त जवळचा असतो.

एवढे सिद्ध केल्यावर आयझेन्क अजून पुढच्या प्रश्नाकडे वळतो. माणसाचा वर्ग आणि त्याच्या मनाची मृदुता किंवा कठोरता यांचा काही संबंध असतो का? त्या अभ्यासातून त्याच्या लक्षात आले की, मध्यमवर्गीय काँझर्व्हेटिव्ह (भाजपवाले) खालच्या वर्गातील काँझर्व्हेटिव्ह लोकांपेक्षा जास्त मवाळ असतात. मध्यमवर्गातील लिबरल लोक खालच्या वर्गातील लिबरल लोकांपेक्षा जास्त मवाळ स्वभावाचे असतात. मध्यमवर्गीय समाजवादी खालच्या वर्गातील समाजवादी लोकांपेक्षा जास्त मवाळ असतात. आणि, मध्यमवर्गातील कम्युनिस्ट खालच्या वर्गातील कम्युनिस्ट लोकांपेक्षा जास्त मवाळ असतात.

(वरील निरीक्षण पाहिल्यावर अ‍ॅरिस्टॉटलचे मध्यमवर्गाविषयीचे विचार आठवतात. आपल्या ‘निकोमॅकियन एथिक्स’ या पुस्तकात तो लिहितो, जेव्हा मध्यमवर्गीयांच्या हातात सत्ता एकवटली जाते, तेव्हा ते सरकार अत्यंत व्यवहारवादी आणि वास्तववादी असते. श्रीमंत आणि गरिबांच्या आहारी गेलेली सरकारांचा आणि वास्तवाचा फारसा संबंध उरत नाही.)

आयझेन्कने ज्या काळात त्याचा अभ्यास केला, तेव्हा जगात कुठेच फॅसिस्ट उरले नव्हते, कारण दुसऱ्या महायुद्धात फॅसिझम पराभूत झाला होता. त्यामुळे मध्यमवर्गीय फॅसिस्ट खालच्या वर्गातील फॅसिस्ट लोकांपेक्षा मवाळ असतात की नाही हे आयझेन्कला सांगता आले नाही. आयझेन्क आज जिवंत असता तर त्याला भरपूर ‘सँपल्स’ मिळाली असती. आज बघायला गेले तर प्रत्येक व्हॉट्सग्रूप मध्ये थैमान घालणारे पाच-सहा तरी फॅसिस्ट दिसून येतात.

..................................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी पहा - सर्व प्रकारच्या कट्टरतेला नाकारणाऱ्या ‘इन्शाअल्लाह’ या अभिराम भडकमकर यांच्या बहुचर्चित कादंबरीवरील ‘परीक्षण’ स्पर्धा

..................................................................................................................................................................

आयझेन्कने केलेला हा सर्व अभ्यास मुख्यतः अमेरिकेत आणि युरोपात केला गेलेला असल्यामुळे या अभ्यासातील निष्कर्ष संपूर्ण जगातील सर्व समाजांना लागू पडतील का, असा प्रश्न आयझेन्क उभा करतो. या प्रश्नाचे उत्तर आयझेन्क होकारार्थी देतो. कारण मृदू आणि कठोर अंतःकरणाचे लोक सर्वत्र असतात. मानवी स्वभावाचे हे दोन प्रकार सार्वत्रिक आणि शाश्वत स्वरूपाचे असतात - युनिव्हर्सल आणि परमनंट असतात. अशा रीतीने व्यक्तिमत्त्व, सामाजिक विचारसरणी आणि राजकीय वर्तन यात काही नाते, नक्की सापडते.

येथे एक लक्षात ठेवले पाहिजे की, सर्व कम्युनिस्ट कठोर स्वभावाचे असतात असे नाही. उदाहरणार्थ, नवरा कम्युनिस्ट आहे म्हणून एखादी स्त्री कम्युनिस्ट असते. राजकीय विषयामुळे लग्नाचे नाते धोक्यात यायला नको असा विचार करून ती कम्युनिस्ट झालेली असते. असे प्रकार सर्वच पक्षांच्या बाबतीत झालेले दिसतात.

कम्युनिस्ट आणि फॅसिस्ट जरी कठोर विचारांचे असले तरी त्यांच्यातही काही फरक असतात असा निष्कर्ष आयझेन्क नोंदवतो. तो म्हणतो की, कम्युनिस्ट कठोर असले तरीदेखील त्यांच्या आजूबाजूच्या लोकांचे ते चांगले सहकारी होऊ शकतात. फॅसिस्ट लोक त्या मानाने जास्त संशयी स्वभावाचे असतात. अविश्वासाने जगण्याची वृत्ती त्यांच्यामध्ये जास्त प्रमाणात आढळून येते. 

कम्युनिस्ट आणि फॅसिस्ट यांच्यात आक्रमकता असते हे आपण पाहिले. आता या दोघांच्या आक्रमक वृत्तीत काही फरक असतो का, हा प्रश्न उभा राहतो. त्यासाठी सर्वेक्षण केले, तेव्हा लक्षात आले की, फॅसिस्ट लोक हे कम्युनिस्ट लोकांपेक्षा जास्त आक्रमक असतात. ही आक्रमकता विविध कारणांसाठी वापरली जाते. द्वेष करण्यासाठी, एखाद्याला शिक्षा करण्यासाठी, टीका करण्यासाठी, दोष देण्यासाठी, आरोप करण्यासाठी, द्वेषभावाने भरलेला उपहास करण्यासाठी, जखमी करण्यासाठी, ठार मारण्यासाठी, क्रूरतेने वागण्यासाठी, घटनात्मक सत्ताकेंद्रे अस्थिर करण्यासाठी, सगळीकडे ही आक्रमकता वापरली जाते. 

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

हान्स आयझेन्कचा अभ्यास मानवाच्या सर्व राजकीय वर्तनाला कवेत घेण्याएवढा सर्वंकष नाही, पण तो अभ्यास राजकारणाबाबत आपली जाण वाढवतो हे नक्की.

आजकाल भारत देशात डावे विरुद्ध उजवे अशी दरी तयार झाली आहे. अनेक लोक त्या दरीच्या आहारी गेलेले आहेत. डावे आणि उजवे हा फरक मुख्य मानला जात आहे. परंतु, हान्स आयझेन्कच्या अभ्यासावरून आपल्या लक्षात येते की, कठोर आणि मृदू अंतःकरणाच्या लोकांमधील फरक, उजवा आणि डावा या फरकापेक्षा खूप जास्त महत्त्वाचा ठरतो. खरा राजकीय संघर्ष लोकशाहीवादी उजवे आणि लोकशाहीवादी डावे असा नसतो. खरा संघर्ष जहाल आणि मवाळ यांच्यामध्ये असतो. दोन्ही बाजूच्या मवाळ स्वभावाच्या लोकांना लोकशाही जवळची वाटते. आणि दोन्ही बाजूच्या कठोर स्वभावाच्या लोकांना हुकूमशाही जवळची वाटते. भारतात आज हा संघर्ष तीव्र होऊ पाहतो आहे. भारतातील मध्यममार्गीय लोक – फक्त मध्यमवर्गीय नव्हे - आज उजवे आणि डावे हा खेळ खेळत राहिले तर लवकरच, भारतातील राजकीय संघर्षाची सगळी सूत्रे कम्युनिस्ट आणि फॅसिस्ट लोकांच्या हातात जातील हे उघड आहे. कठोर लोकांच्या हातात राजकारणाची आणि समाजकारणाची सूत्रे गेल्याने कुठल्याही देशाचे कल्याण झाल्याचे जगाच्या आजवरच्या इतिहासात कुणी पाहिलेले नाही.

..................................................................................................................................................................

लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.

sjshriniwasjoshi@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Umeshrao K

Mon , 08 February 2021

अतिशय भंगार लेखक आहे हा, मनोविक्रुत , हिंसक विचाराचा, हिंसेचे समर्थन साहित्यिक शैलीत करणारा , समाजविघातक देशविरोधी लेखक आहे. अक्षरनामा सारखी साईट अशा विक्रुताला प्लँटफाँर्म कसे देती हाच मोठा प्रश्न आहे.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......