क्रिकेटचा देव नाही, मातीच्या पायाचा माणूस!
पडघम - क्रीडानामा
प्रवीण बर्दापूरकर 
  • सचिन तेंडुलकर
  • Sat , 06 February 2021
  • पडघम क्रीडानामा सचिन तेंडुलकर Sachin Tendulkar क्रिकेटCricket शेतकरी आंदोलन Farmers protest शेती farming शेतकरी farmer शेती सुधारणा बिल Farm Reform Bill

प्रत्येकाला एक भूमिका असली पाहिजे आणि ती भूमिका मांडण्याचं स्वातंत्र्यही त्याला असलं पाहिजे. शिवाय आपण जे काही व्यक्त होतो, त्या संदर्भात प्रतिवाद करण्याचा अधिकार समोरच्याला असतो, हे मला कायमच मान्य आहे. जात-पात-धर्माच्या पातळीवर आणि शारीरिक व्यंगात्मक नसलेला, म्हणजे सुसंस्कृतपणे केलेला प्रतिवाद किंवा असहमत होणं मी खिलाडूपणे स्वीकारतोच. मात्र सुसंस्कृतपणाची पातळी सोडून जर कोणी प्रतिवाद करत असेल तर ते मला पूर्णपणे अमान्य असतं. असो. हे सांगण्याचं कारण रिहाना, ग्रेटा, मिया खलिफा, मीना हॅरिस यांनी भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या संदर्भात व्यक्त केलेल्या मताच्या संदर्भात क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यानं कालपरवा जे काही ट्विट व्यक्त केलंय त्यामुळे हे लेखन...

आमच्या घरी टीव्ही जेवढा वेळ चालतो, त्यातला ७५ टक्के वेळ त्यावर नवे-जुने खेळ असतात.  साधारण २० टक्के वेळ बातम्या आणि ५ टक्के वेळ मनोरंजनाच्या कार्यक्रमासाठी असतो. सचिनच्या अगदी पदार्पणापासून त्याचं क्रिकेट पाहात आलो आहे. अगदीच एखाद-दुसरा अपवाद वगळता त्याची कोणतीही इनिंग्ज मी आजवर चुकवलेली नाही. सुरुवातीच्या काळातला त्याचा खेळ मला खूप आवडत असे. परंतु हळूहळू जसं जसं बघत गेलो, वाचत गेलो, अनुभवत गेलो, तसंतसं सचिन क्रिकेटपटू म्हणून कितीही चांगला असला तरी माणूस म्हणून रद्दड आहे, याविषयी मी ठाम होत गेलो.

अगदी खरं सांगायचं तर सचिनच्या शेवटच्या कालखंडात तो क्रिकेटपटू म्हणूनही स्वार्थी आहे, असं माझं मत होत गेलं. स्वविक्रमासाठी तो रेटून क्रिकेट खेळतो (म्हणून तो विक्रमादित्य!), तोवरच्या त्याच्या निर्माण झालेल्या प्रतिमेचा दबाव टाकून खेळत राहतो, असं माझं मत होत गेलं.

बहुदा २०१२ मधली घटना आहे. सचिन तेंडुलकर त्याच्या कसोटी क्रिकेट आणि एक दिवसीय क्रिकेटमधील मिळून शंभराव्या शतकाच्या प्रतीक्षेत होता आणि क्रिकेटपटू म्हणून ते उत्तुंग यश साजरं करण्यासाठी कसाबसा शब्द तोकडा पडावा इतका वाईट क्रिकेट खेळत होता; तरी असंख्य चाहते त्याचा खेळ पाहतच होते. सचिनचं ‘ते तसं’ खेळणं बघून त्याची भयंकर कीव यायची. अगदी सुमार गोलंदाजाच्या गोलंदाजीवर सचिन बीट होत असे. तेव्हा ‘सचिन सदृश्य कोणीतरी खेळाडू कसंबसं क्रिकेट खेळतो आहे. त्याला चेंडू नीट दिसत नाही म्हणून त्यानं चष्मा लावून खेळावं, म्हणजे त्याला चेंडू नीट दिसेल अन तो नीट खेळेल, कारण त्याची चाळिशी आता जवळ आली आहे’, अशी एक पोस्ट मी फेसबुकवर टाकली.

त्या पोस्टवर ‘एबीपी माझा’नं एक चर्चाही घडवून आणली होती. त्यात सचिनचा भक्त असलेल्या एका क्रिकेट समीक्षकांनी सचिनच्या त्या क्रिकेट खेळण्याचं जोरदार समर्थन केलं होतं आणि अतिशय स्वाभाविकपणे माझ्या कमेंटवर टीकाही केली होती. पण ते असो. कारण मी व्यक्त केलेल्या मताशी सगळ्यांनी सहमत असलंच पाहिजे असं नसतं. पण सचिनचं ते क्रिकेट खेळणं बघून जीव गलबलून जायचा हे खरं होतं.

..................................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी पहा - सर्व प्रकारच्या कट्टरतेला नाकारणाऱ्या ‘इन्शाअल्लाह’ या अभिराम भडकमकर यांच्या बहुचर्चित कादंबरीवरील ‘परीक्षण’ स्पर्धा

..................................................................................................................................................................

अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतलं शंभरावं शतक सचिननं बांगला देश विरुद्ध पूर्ण केलं. ती त्याची खेळी आठवून बघा. त्याचं ते खेळणं नव्हतं तर कण्हणं होतं, कुंथणं होतं. अखेर त्यानं शतक पूर्ण केलं आणि ते यशाचं उत्तुंग शिखर गाठलंही, परंतु त्या सामन्यात बांगला देश विरुद्ध भारत कधी नव्हे तो हरला, हे अतिशय वाईट होतं. सचिन विक्रमासाठी खेळतो, क्रिकेटसाठी क्रिकेट खेळत नाही किंवा देशासाठी खेळत नाही,  या तोवरच्या हळूहळू पसरत चाललेल्या समजाला पुष्टी देणारी त्याची ती खेळी होती. महत्त्वाचं म्हणजे ‘आपल्या विक्रमी शतकापेक्षा भारताचा विजय महत्त्वाचा होता...’ अशी तोंडदेखली खंतही सचिननं तेव्हा व्यक्त केली नाही. तो सामना हरल्यावर त्या क्रिकेट समीक्षकाला अतिशय खवचट असा मॅसेज पाठवला होता. अर्थात त्याचं उत्तर त्यानं दिलं नाही, तो भाग वेगळा.

आणखी एक प्रसंग सांगतो. सचिन निवृत्त झाला, पण त्याच्या तोवरच्या प्रतिमेला साजेसा शेवटचा सामना झाला नाही, हे प्रामाणिकपणे मान्य केलं पाहिजे. त्याचा शेवटचा सामना कसोटी दर्जा दुय्यम असणार्‍या वेस्ट इंडिज विरुद्ध मुंबईत झाला. खरं तर तो कसोटी क्रिकेट सामना न राहता सचिन उदोउदो कार्यक्रम झाला. त्यात सचिननं कसंबसं अर्धशतक गाठलं आणि क्रिकेट जगताचा निरोप घेतला. त्याच्या कौतुकाच्या स्वाभाविक अहमहमिकेच्या धावांचा हिमालय तेव्हा उभा केला गेला. लगेच त्या सामन्यानंतर सचिनला ‘भारतरत्न’ही मिळालं आणि राज्यसभेचं सदस्यत्वही त्याला बहाल करण्यात आलं. सचिनचा असा बहुमान होण्याबद्दल मुळीच तक्रार नाही, पण सचिन त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला ‘क्रिकेटसाठी क्रिकेट’ खेळला आणि नंतर विक्रमासाठी खेळला असं माझं जे मत होतं गेलं, त्यावर या दोन घटनांमुळे शिक्कामोर्तब झालं. तरी सचिनविषयी तसं काही माझं वाईट मत नव्हतं.

दरम्यान एक फारच विचित्र घटना घडली. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की, सचिनचे वडील एक कसदार कवी होते. रमेश तेंडुलकर हे त्यांचं नाव. त्यांच्या कविता प्रकाशित करण्यासाठी सचिन तेंडुलकरने चक्क पुण्याचा एक प्रायोजक गाठला आणि त्या प्रायोजकत्वाच्या बदल्यात पुण्यात एक बंगलाही पदरात पाडून घेतला, हे जेव्हा समजलं, तेव्हा मला सचिनची पितृभक्ती ही किती कचकड्याची आहे, याची जाणीव झाली.

सचिननं त्याच्या वडिलांच्या पुस्तकासाठी प्रायोजकत्व मिळवलं, तेव्हा जी काही आकडेवारी प्रकाशित झालेली होती, त्याप्रमाणे अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या खालोखाल सचिनची मालमत्ता होती. तेव्हा अमिताभ यांची मालमत्ता दोन हजार कोटी रुपये होती, अशा वार्ता प्रकाशित झाल्या होत्या आणि त्या खालोखाल सचिनचं नाव अठराशे कोटींवर होतं. त्यातले पाच-दहा लाख म्हणजे कीस झाड की पत्ती! तरी वडिलांचा एक कवितासंग्रह प्रकाशित करण्यासाठीसुद्धा प्रायोजक शोधण्याइतका हा माणूस कंजूष (Miser) आणि लोभी (Lobated) आहे, हे आजवर कधीच स्वीकारता आलेलं नाही. पितृभक्तीचं हे उदाहरण आदर्श असूच शकत नाही.

सचिन त्याच्या क्रिकेट कारकिर्दीच्या उतारावर असताना, परंतु प्रसिद्धीच्या शिखरावर असताना क्रिकेटमधील यशाचं सर्व श्रेय त्याने सत्य साईबाबांना दिलं होतं, हा तर भंपकपणाचा कळस आणि क्रिकेटचा अपमान होता. ‘माझ्या क्रिकेट किटमध्ये सत्य साईबाबांचं छायाचित्र लावलेलं असतोतं आणि त्याला नमस्कार करूनच मी फलंदाजीसाठी उतरतो’, असं काहीसं विधान त्याने त्या वेळी केलं होतं.  

सचिन वैयक्तिक पातळीवर श्रद्धावान असला तरी त्याने त्याच्या त्या श्रद्धेचं हे असं जाहीर प्रदर्शन मुळीच समर्थनीय नव्हतं. कोणी कुणाच्या कृपेने मोठा होत नसतो, तर तो त्याच्या कर्तृत्वाने मोठा होत असतो, त्याच्या मनगटावर मोठा होत असतो. अशा वेळी ‘माझी क्रिकेट कारकीर्द कुणातरी बाबा-महाराजाच्या कृपेमुळे फुलली’, हा जो काही संदेश सचिननं त्यावेळेस दिला, ते अतिशय खटकणारं, अतिशय वाईट होतं.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

मी दैववादी, नियतीवादी नाही. ललाट, भागध्येय तळहातावरच्या रेषा वगैरेवर इतर अनेकांप्रमाणे माझाही विश्वास नाही, पण कुणी तसा असण्यास विरोध नाही; विरोध आहे तो त्याचं जाहीर प्रदर्शन करण्यास. सचिननं जे क्रिकेटपटू त्याला आदर्श मानतात, देव मानतात त्यांना ‘बुवावादी’  होण्याचा जो काही चुकीचा संदेश दिला, तो विवेकवादी विचाराच्या कुणालाही पटणारा नव्हता, हेही तेवढंच खरं.

सचिनला ‘भारतरत्न’ जाहीर झालं आणि तो राज्यसभेचा सदस्य झाला. त्या काळात मी दिल्लीतच होतो. खासदाराला मिळालेला बंगला त्यानं घेतला नाही. तो स्वखर्चानं दिल्लीत राहिला आणि जी काही राज्यसभेत हजेरी लावायची होती ती लावली.  मात्र त्याही काळात सचिननं देशातल्या क्रीडाविश्वासाठी फार काही मोलाची कामगिरी बजावली, असं काही दिसून आलं नाही. खासदार निधीतून त्यानं काही खेड्यांच्या विकासासाठी प्रयत्न केला, हे खरं आहे. पण त्या गावांचा जो काही कायापालट झाला, त्याच्या कैकपट जास्त प्रसिद्धी त्याने मिळवली. ‘भारतरत्न’  मिळाल्यानंतरही त्याला जाहिराती करण्याचा मोह आवरता आला नाही, हे तर अतिशय उद्वेगजनक होतं. खरं तो ‘भारतरत्न’ या सन्मानाचा अवमानच होता.

सचिनकडे तेव्हा देवत्व होतं. ‘सचिन इज ए गॉड ऑफ क्रिकेट’ असं तेव्हा लिहिलं, बोललं जायचं. मला मात्र ‘ही इज ए नेव्हर गॉड ऑफ क्रिकेट’ असंच कायम वाटत असे. देवावर विश्वास नसला तरी क्रिकेटचा देव जो कोणी असेल तो ड्रॉन बॅडमन आहे, असं जे माझं मत होतं, ते सचिनच्या या अशा वागण्यामुळे अधिकाधिक पक्कं होत गेलं, हेही सांगितलं पाहिजे.

याचा अर्थ सचिनला  काही भूमिका असू नयेत असं आहे का? तर तसं मुळीच नाही. पण सचिन कधीच या देशातल्या सर्वसामान्य, दीनदलित,  रस्त्यावरच्या माणसाच्या मदतीला म्हणून धावून गेल्याचं दिसलं नाही. त्याने काही देणग्या दिल्या असतील. समाजातल्या एखाद्या किंवा काही किंवा जास्त वंचित गटासाठी साह्यही केलं असेल/केलं आहे, हेही मला माहिती आहे. परंतु हे सगळं एखाद्या पंचतारांकित एनजीओपेक्षा फार काही वेगळं नव्हतं. क्रिकेट खेळत असताना आणि क्रिकेट खेळणं संपल्यावरही आपल्या देशातले एक बडे उद्योगपती, म्हणजे अंबानींच्या दरबारातच सचिन कायम पहुडलेला आहे. आयपीएल नावाचा जो काही क्रिकेटचा धंदा उभा राहिला, त्यातही तो अंबानींच्या बाजूने मार्केटिंग करण्यामध्ये आघाडीवर राहिला. अंबानींच्या अनेक उपक्रमामध्ये त्याचा असणारा सहभाग हा त्याच्या कथित देवत्वाच्या प्रतिमेला तडा देणारा ठरलेला होता, तरी त्याबद्दल फक्त कुजबूज झाली.

..................................................................................................................................................................

आंबेडकरांना सहन करावा लागलेला विकृत व अविचारी वैरभाव या व्यंगचित्रांमधून उघड होतो. त्याचबरोबर ऐतिहासिक अन्याय सहन केलेल्या आंबेडकरांचं वास्तविक चरित्रही उजेडात येतं.

हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये खरेदीसाठी करण्यासाठी क्लिक करा - 

https://www.booksnama.com/book/5282/Hasanyawari-Neu-Naka

..................................................................................................................................................................

आता सचिनला त्याच्या ट्विटवरून समाजमाध्यमांवरून जोरदार ट्रोल करण्यात आलेलं आहे. त्यानं जी काही प्रतिक्रिया व्यक्त केली, ती त्याची स्वत:ची असती, ती सच्ची असती, तर त्याबद्दलही दुमत असण्याचं काही कारण नव्हतं. मात्र जे काही सगळं घडलं, ते कुणीतरी प्रॉम्ट केल्याशिवाय घडलं नाही, असं म्हणण्यास वाव आहे. एकाच पद्धतीचं ट्विट लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, सुनील शेट्टी, सायना नेहवाल अशा असंख्य नामवंतांनी करावं, हा काही योगायोग असं म्हणता येणार नाही!

कडाक्याच्या थंडीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहावं, असं सचिन तेंडुलकरला कधी वाटलं नाही. बॅट आणि चेंडू उकडून पोट भरत नाही, तर त्यासाठी या भूमिपुत्रांनी घाम आणि रक्त गाळून काढलेलं पीक अन्न  म्हणून लागतं, याचा विसर सचिनला पडला. सरकारच्या बाजूने देशभक्तीचे उमाळे काढण्यापेक्षा अन्नदात्यांशी सरकारने बोलावं, अशीच रास्त भूमिका सचिननं घ्यायला हवी होती. करोनाच्या काळात टाळेबंदी जाहीर झाल्यावर टाचा घासत, रक्ताळवत गावाकडे परतणाऱ्या लोकांच्या मदतीला धावून जाणं तर लांबच राहिलं, पण आपुलकीचं एखादं ट्विट करावंसं वाटलं नाही आणि विद्यमान सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाला पाठिंबा देणारं ट्विट सचिनला करावसं वाटावं, हे काही पटणारं नाही.  

सचिन क्रिकेटपटू म्हणून देव कधीच नव्हता. माणूस म्हणूनही त्याचे पाय मातीचे आहे. वृत्तीने तो लोभी आहे, या आजवरच्या समजावर शिक्कामोर्तब करणारं सचिनचं हे ट्विट आहे, याबद्दल कोणतीही शंका असण्याचं कारण नाही.

मुद्दा शेतकऱ्याच्या आंदोलनात कितपत तथ्य आहे, याचा असला तरी आणि त्यात सरकारचीही एक निश्चित बाजू असली तरी; भारतातल्या एका मोठ्या गटाला (त्यात अस्मादिकही आहेत) असं वाटतं की, शेतकऱ्यांची बाजू ग्राह्य आहे आणि ती सरकारनं समजून घ्यायला पाहिजे. सरकारच्या भूमिकेचं समर्थन करूनही सरकारनं आंदोलक शेतकऱ्यांची जी काही अक्षम्य उपेक्षा केली, त्यांना दहशतवादी, देशाचा शत्रू ठरवण्याचा जो काही प्रयत्न केला, ते एक संवेदनशील माणूस म्हणून कधीही मान्य होणारं नाहीये, उलट ही कोंडी फोडण्यासाठी सरकारनं नमतं घ्यायला हवं, अशी भूमिका सचिनला घेता आली असती. पण अशी संवेदनशीलता सचिन दाखवू शकला नाही.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

खेळाडू, लेखक, कलावंतांनी नेहमीच समाजाच्या बाजूनं उभं राहिलं पाहिजे, सत्ताधाऱ्यांच्या नाही. तसं उभं राहण्यात सचिन पूर्णपणे अयशस्वी ठरला. सचिनला आता मिळवायचं काहीच नाहीये आणि खरं सांगायचं तर, गमवायचंही काहीच नाहीये. अनेकांना मान्य असो अथवा नसो, एके काळी सचिन देव म्हणून गणला गेला; लोकांच्या गळ्यातला ताईत बनला. परंतु ते देवत्व त्याला पेलवलं नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्या प्रतिमेला सचिननं स्वत:च तडा दिलेला आहे.

‘भारतरत्न’ आणि राज्यसभेचं सदस्यत्व मिळवण्यासाठी तो काँग्रेसच्या आणि आता तो भाजपच्या चरणी लीन झाला. उद्या अन्य पक्षाचं सरकार आलं तर त्याही सरकारच्या चरणी लीन होण्यास सचिन मागेपुढे पाहणार नाही. हे असं मातीच्या पायाचं असणं हे त्याच्या चाहत्यांनी समजून घेतलं पाहिजे. माणसांत देव नसतो. सचिन तर देव कधीच नव्हता. त्याचे पाय मातीचेच आहेत, याचं भान आता तरी त्याच्या चाहत्यांना यावं...  

..................................................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Ravi Go

Fri , 19 February 2021

Very honest article and substantiated with 20L bid on a certain player by Mumbai Indians!


Dilip Chirmuley

Mon , 08 February 2021

When he made the following statement "सरकारच्या बाजूने देशभक्तीचे उमाळे काढण्यापेक्षा अन्नदात्यांशी सरकारने बोलावं, अशीच रास्त भूमिका सचिननं घ्यायला हवी होती." against Sachin the author seems to have mischievously ignored the fact that the government has had 11 meetings about the farm bills with the protestors. This what current journalists do. The author should know that in any discussions there should be give and take which has not happened in these discussions. All Sachin has said in his tweet is that Indians are capable of taking decisions and foreigners should not interfere.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

प्रा. मे. पुं.  रेगे यांचे तात्त्विक विचार जागतिक तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात मौलिक असूनही ते विचार इंग्रजीत जावेत, असे त्यांचे चहेते असणाऱ्या सुशिक्षित वर्गाला का वाटले नाही?

प्रा. रेगे मराठी तत्त्ववेत्ते होते. मराठीत लिहावे, मराठीत ज्ञान साहित्य निर्माण करावे, असा त्यांचा आग्रह असला, तरी खुद्द रेगे यांच्या विचारविश्वाचे, त्यांच्या काही लिखाणाचे अवलोकन करता त्यांचे काही विचार केवळ कार्यकर्ते, विचारवंत आणि तत्त्वज्ञानाचे अभ्यासक, अन्य तत्त्वज्ञान प्रेमिक यांच्यापुरते मर्यादित नाहीत. त्यांच्या समग्र मराठी लेखनावर इंग्रजीसह इतर भाषिक अभ्यासक, चिंतकांचाही हक्क आहे.......

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......