“Those who deny freedom to others, deserve it not for themselves.”
― Abraham Lincoln
‘सरत मंजूर हैं’ असं म्हणत जेव्हा ‘लगान’ या सिनेमाचा नायक भुवन कॅप्टन रसेलचं आव्हान स्वीकारतो, तेव्हा खेळ हा केवळ खेळ नसून त्यापेक्षा मोठं काहीतरी आहे, हे प्रेक्षकांना जाणवतं. या सिनेमात भारतातील एका खेड्यातील लोक उद्दाम ब्रिटिश अधिकार्याला त्याच्याच खेळाद्वारे आव्हान देऊन आपला कर व गौरव कसा वाचवतात याचं सुंदर चित्रण आहे. ‘लगान’ अजूनही बर्याच प्रतिष्ठित व्यवस्थापन महाविद्यालयांच्या अभ्यासक्रमामध्ये एक केस स्टडी म्हणून शिकवला जातो. ‘लगान’ ही सत्य घटना आहे असा दावा केला जातो. त्यामुळे ही कथा प्रत्येक भारतीयाला आपलीशी वाटते.
‘ग्लॅडिएटर्स’ हे रोमन साम्राज्यात एक प्रकारे खेळाडू होते. ते राजा व प्रजा यांचं मनोरंजन करण्यासाठी एकमेकांशी लढत. ऑलिम्पिक हा सुरुवातीला ग्रीक देवता झेऊससाठी साजरा केला जाणारा एक सोहळा होता, जो पुढे जाऊन खेळाचा कुंभमेळा झाला. सुरुवातीला अगदी मोजक्या खेळांचा समावेश असलेलं ऑलिम्पिक आज समर व विंटर ऑलिम्पिक, पॅरा- ऑलिम्पिक अशा विविध प्रकारे आयोजित केलं जातं. खेळाला मुख्यत्वे मनोरंजन, राजकारण, धर्म यांचं मिश्रण म्हणून पुरातन काळात राजमान्यता होती. मृत्युची शिक्षा झालेले कैदी व वाघ-सिंह यांसारखे प्राणीसुद्धा ‘ग्लॅडिएटर्स’सोबत लढत. त्याची गोष्ट रसेल क्रो यांच्या ‘gladiators’ या सिनेमात बघायला मिळते. जसे आताचे खेळाडू प्रायोजकत्व घेतात, त्याचप्रमाणे हे ‘ग्लॅडिएटर्स’ राजांकडून पोसले जायचे. ही परंपरा गेल्या शतकात पटियालासारख्या राजघराण्यांनी चालवली.
२०व्या शतकाच्या सुरुवातीला आफ्रिकन खेळाडूंनी जेव्हा मैदान गाजवायला सुरुवात केली, तेव्हापासून त्यांनी त्यांच्या समूहावर होणार्या अन्यायावर वेळोवेळी मैदानावर व बाहेर विरोध दर्शवत आवाज उठवायला सुरुवात केली. त्यातलं महत्त्वाचं नाव म्हणजे आफ्रिकन-अमेरिकन बेसबॉलपटू जॅकी रॉबिन्सन. त्याच्या जीवनावर ‘42’ हा चित्रपट आहे. त्यात Chadwick Boseman या नटाने जॅकीची भूमिका साकारली आहे. जॅकी हा बेसबॉल खेळणारा पहिला कृष्णवर्णीय खेळाडू. त्याने ‘सिव्हिल राइट चळवळी’त मार्टिन ल्यूथर किंग (ज्यू) यांच्या समवेत मोलाची भूमिका बजावली.
..................................................................................................................................................................
अधिक माहितीसाठी पहा - सर्व प्रकारच्या कट्टरतेला नाकारणाऱ्या ‘इन्शाअल्लाह’ या अभिराम भडकमकर यांच्या बहुचर्चित कादंबरीवरील ‘परीक्षण’ स्पर्धा
..................................................................................................................................................................
खेळ आवडत नसेल अशा व्यक्तीलासुद्धा मोहम्मद अलीचं नाव माहीत असतं. या जगज्जेत्या आफ्रिकन-अमेरिकन मुष्टियोद्ध्याने मुसलमान धर्म स्वीकारूनही व काही वैचारिक मतभेद असतानासुद्धा मार्टिन ल्यूथर किंग (ज्यू) यांच्या ‘सिव्हिल राइट चळवळी’ला पाठिंबा दिला होता. टॉमी स्मिथ आणि जॉन कार्लोस या दोन विजेत्यांनी १९६८च्या ऑलिम्पिक खेळात वर्ण-द्वेषाविरुद्ध शांतपणे पुरस्कार स्वीकारताना मूठ उंचावून विरोध दर्शवला होता. आर्थर एशने टेनिससारख्या गोर्यांचं वर्चस्व असलेल्या खेळात ग्रँडस्लॅम मिळवत मानवी हक्क, विशेषकरून वंशभेदाविरुद्ध आवाज उठवला होता.
७०च्या दशकात वेस्ट इंडीजच्या संघाने क्रिकेटवर राज्य केलं, लागोपाठ दोन विश्वचषक जिंकले. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत, कुठलीही फारशी सामग्री नसताना केवळ नैसर्गिक गुणवत्तेमुळे वेस्ट इंडीज संघ जिंकत नव्हता, तर त्यामागे गोर्यांविषयीची गुलामीची चीड व त्वेष होता. ‘Fire in Babylon’ या चित्रपटात विव रिचर्डससारख्या अनेक दैवी प्रतिभा लाभलेल्या वेस्ट इंडीजच्या खेळाडूंनी क्लाईव लोईडच्या नेतृत्वाखाली खेळताना गोर्यांनी कसा छळ केला व आम्ही त्याला खेळातून प्रत्युत्तर देऊन कसा माज उतरवला, याचं वर्णन केलं आहे. क्रिकेट हा खेळ नसून अस्तिवाची लढाई होती.
त्याच सुमारास १९८३मध्ये भारताने पहिल्यांदा अनपेक्षितरित्या क्रिकेटचा विश्वचषक जिंकला, तेव्हा जे वेस्ट इंडीज क्रिकेटने केलं, तेच भारतानेसुद्धा गोर्यांनी केलेल्या गुलामीला त्यांच्याच खेळात विश्वविजेता होत केलं, वर्ण-द्वेषाला लोकशाही पद्धतीनं उत्तर दिलं.
खेळाचं मानसशास्त्र सांगतं की, खेळ हा भावनांचा निचरा करण्याचं एक सगळ्यात चांगलं साधन आहे. त्यात शारीरिक हालचाली भावनिक ओझं कमी करायला मदत करतात. आपल्यावर झालेल्या अन्याय जेव्हा बोलून दाखवला जाऊ शकत नाही, तेव्हा खदखदणारा राग शांत करायला खेळ मदत करतात. नागपुरात डॉ. विजय बरसे यांनी सुरू केलेला ‘स्लम सॉकर’ (Slum Soccer) हा उपक्रम झोपडपट्टीतल्या मुलांमध्ये साचून राहलेलं मनातील मळभ खेळाद्वारे बाहेर काढायला मदत करतो, जेणेकरून ही मुलं अपराधाच्या मार्गाला जाणार नाहीत.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
................................................................................................................................................................
आफ्रिकन लोकांची नैसर्गिक ताकद, प्रतिभा त्यांना त्यांच्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडायला वेळोवेळी कामी आली, अजूनही येते. विलियम्स भगिनींनी टेनिस या गोऱ्यांची मक्तेदारी असलेल्या खेळावर अधिराज्य गाजवलं. भारताप्रमाणे श्रीलंका, पाकिस्तान या ब्रिटिशांची सत्ता अनुभवलेल्या जनता व खेळाडू यांनी क्रिकेटमध्ये वर्चस्व गाजवत ब्रिटिशांना एकप्रकारे उत्तर दिलं. पाकिस्तानचे सध्याचे पंतप्रधान इमरान खान यांचं खेळाडू म्हणून ब्रिटिशांशी व क्रिकेटशी असलेलं नातं मनोरंजक होतं. एका आशियाई क्रिकेटपटूवर व त्याच्या खेळावर ब्रिटिश बायका फिदा होतात, ही खरंच अप्रूप वाटण्यासारखीच गोष्ट होती. हे ब्रिटिशांच्या अहंकाराला ठेच लावणारं वर्तन होतं.
८०चं दशक संपेपर्यंत खेळ हा देशासाठी खेळला जाणारी गोष्ट होती. त्यात देशप्रेम केंद्रस्थानी असल्याने पैसा खूप दुय्यम होता. खेळ हा खेळाच्या प्रेमासाठी व देशाच्या झेंड्यासाठी खेळला जायचा, मात्र १९९१च्या नंतर भारतात खुल्या अर्थव्यवस्थेमुळे क्रिकेट हा खेळ न राहता एक व्यवसाय बनला. सचिन तेंडुलकर हा त्यापासून सर्वाधिक फायदा झालेला खेळाडू आहे. ९०च्या दशकात त्याला बघत मोठ्या होणारी आमच्या पिढीने २०००च्या सुरुवातीच्या काळात कर्मचारी म्हणून काम करायला सुरुवात केली. आम्ही भारताचं कॉर्पोरेटीकरण होताना अनुभवलं आहे.
कोट्यवधी भारतीयांचं क्रिकेट या खेळाशी असलेलं भावनिक नातं व्यवस्थितरित्या वापरून १९९३मध्ये भारतात आलेल्या केबलचा वापर करून ESPN, STAR या परदेशी कंपन्यांनी ‘न भूतो न भविष्यति’ नफा कमवला. एक मध्यमवर्गीय मराठी मुंबईकर मुलगा (पक्षी तेंडुलकर) गोर्यांचा खेळ कसा खेळतो आणि त्यांनाच कसा हरवतो, याचा प्रत्येक भारतीय अभिमान बाळगू लागला. जणू सचिन हा सद्गुणांचा पुतळा असल्यागत सर्व प्रसारमाध्यमं, पत्रकार, समालोचक त्याची भजनं गायचे.
याच काळात वेस्ट इंडीजचा क्रिकेट संघ ब्रायन लाराचा अपवाद वगळता अस्तिवासाठी धडपडत होता. कदाचित त्यांना बदलत्या व्यावसायिक क्रिकेटशी जुळवून घेता आलं नाही. पाकिस्तानी पूर्व कॅप्टन इमरान खान यांनी आयुष्याची सर्व कमाई आईच्या स्मृतीप्रित्यर्थ बांधलेल्या कॅन्सर इस्पितळासाठी दिली. आयपीएलमधील कमाईबद्दल बोलताना त्यांनी संगितलं होतं की, जन्मभर क्रिकेटमधून मी जे कमवलं, तेवढा एक आयपीएलचा खेळाडू आज कमवतो. यावरून आपल्याला आपल्या अनेक प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात.
..................................................................................................................................................................
हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये खरेदीसाठी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5282/Hasanyawari-Neu-Naka
..................................................................................................................................................................
याच काळात क्रिकेटच्या समालोचनात बदल झाला. क्रिकेटची आवड असणाऱ्या हर्षा भोगले या आयआयएममधून आलेल्या समालोचकाने त्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे क्रिकेट हा खेळ भावनेच्या ओघातून बाहेर पडून केवळ व्यवस्थापन व नफा याभोवती फिरायला सुरुवात झाली. भोगले यांची शैली आकर्षक असली तरी खेळाला कृत्रिमतेकडे नेणारी होती. टीव्हीने चटपटीत मनोरंजनची सवय भारतीय समाजाला लावली. त्याला आयपीएलसारख्या तद्दन व्यावसायिक प्रकारांनी आदिम भावनांचा (‘हिंसा व लैंगिकता’) वापर करून व्यसन लावलं.
सौरव गांगुलीने भारतीय क्रिकेटला आत्मविश्वास मिळवून दिला, त्यावर २००७नंतर धोनीने कळस चढवला. मात्र तेंडुलकर, धोनी व आता कोहली हे मध्यमवर्गीय लोक. ज्यांनी क्रिकेटकडे व्यवसाय म्हणूनच बघितलं. व्यवसाय नफा-तोटा या धर्तीवर असतो, त्यात भावनेला स्थान नसतं. खेळाची कला ही एक वस्तु/सेवा असून त्यात मानवी मूल्यांना काहीही स्थान नाही. जो कुठलाही व्यावसायिक करेल, तेच ही खेळाडू मंडळी करत आहेत. त्यातील व्यावसायिक अस्थिरता हा एक भाग सोडला तरी या बहुतेक खेळाडूंना सरकारी नोकरी व बरेच पैसे कमावण्याचे मार्ग आहेत. मात्र त्यांनी गरजा वाढवून स्वत:ची गोची करून घेतली आहे. तशीच काहीशी गत सध्याच्या मध्यम व उच्च मध्यमवर्गाचीही आहे.
मी १३ वर्षं सॉफ्टवेअर उद्योगात काम केलं आहे. त्यात कर्मचारी फक्त टार्गेट व प्रॉफिटसाठी परदेशी कंपन्यांसाठी काम करतात आणि त्यांच्या आजूबाजूला असणार्या भारतीय जनतेला ‘cattel class’ म्हणून हिणवतात. वर्षाला २०-२५ लाखांचं पॅकेज कमवणारे ही भाषा वापरत असतील तर वर्षाला करोडो कमवणारे खेळाडू सामान्य भारतीय जनतेला काय म्हणत असतील?
‘मेरी जरूरतें कम हैं इसलीये मेरे ज़मीर मे दम हैं’ हा ‘सिंघम’चा डायलॉग हे लोक कसे म्हणणार?
जी खेळाडूंची गत, तीच सिनेमा व नाटकवाल्यांचीही आहे. गुलजार यांचा आणीबाणीच्या काळातला ‘आंधी’सारखा सिनेमा असेल किंवा मेरील स्ट्रिपने अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात ऑस्करच्या व्यासपीठावर दिलेलं भाषण असेल, अशी अनेक उदाहरणं सांगता येतील, ज्यात कलाकार हे दडपशाही विरुद्ध बोलले आहेत.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
मात्र गेल्या दोन दशकांत कलाकार मंडळी botox व सर्जरीच्या साहाय्याने सतत तरुण दिसत वेगवेगळ्या कार्यक्रमांतून नाचत फिरत असतात. त्यामुळे आपण ज्या समाजात राहतो, त्याच्याशी त्यांना कुठलीही बांधीलकी राहिलेली नाही. ते फक्त पैशासाठी काम करणारे कर्मचारी आहेत. ‘खपतं ते बनतं’ या व्यावसायिक नियमानुसार खपणार्या गोष्टीच बनवल्या जातात. म्हणून कलेत प्रयोग करून प्रामाणिक राहणारे नसरुद्दीन शहा, अनुराग कश्यप, अतुल कुलकर्णीसारखे कलाकार अजूनही स्वतंत्र मत मांडायला धजावतात, मात्र त्यांनासुद्धा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो आणि मर्यादेत राहिल्याने ‘महानायक’ बनता येत नाही.
‘ब्लॅक लाइव्ह मॅटर’सारख्या वर्णभेदाविरुद्धच्या चळवळीला गेल्या वर्षांत अनेक दिग्गज खेळाडू व कलाकारांनी पाठिंबा दिला. त्यात भारतीयही होते, मात्र हेच लोक भारतातल्या अन्यायावर गप्प आहेत. वर नमूद केल्याप्रमाणे व्यवसायाशी असलेली भावनिक बांधीलकी व सामाजिक जबाबदारीचं भान या खेळाडू-कलाकारांमध्ये येणं शक्य नाही. ते असतं तर त्यांनी फास्ट फूड, रमी, व्हिडिओ गेम यांसारख्या अनेक चुकीच्या गोष्टींची जाहिरात केली नसती. पी. गोपीचंद, राहुल द्रविड यांच्यासारखे लोक फार कमी आहेत, कारण तसं जगणं कठीण आहे आणि त्याला ‘मास अपील’ नाही. आर्थर एश या आफ्रिकन खेळाडूने म्हटलं होतं की, मी गोर्यांसारखा वागून कंटाळलो आहे. स्वत:ची जी खरी ओळख आहे- त्यात भाषा व त्वचेचा रंग प्रामुख्याने येतो - ती भारतीयांना नको आहे. त्यांना गोर्यांसारखं आयुष्य हवं आहे.
ज्या गांधींपासून प्रेरणा घेऊन नेल्सन मंडेला, मार्टिन ल्यूथर किंग यांनी वर्णभेदाचा लढा यशस्वी करून दाखवला, त्याच गांधींची टर उडवायची… एकीकडे ‘ब्लॅक लाइव्ह मॅटर’ला पाठिंबा द्यायचा व दुसरीकडे गोरं दिसणाऱ्या क्रीमची जाहिरात करायची… यावरून हे खेळाडू व कलाकार मानसिकदृष्ट्या किती गोंधळलेले आहेत हे स्पष्ट होतं.
तुम्ही जर स्वत:लाच आवडत नसाल, तुम्हाला स्वत:च्याच रंगाची लाज वाटत असेल, तर असे लोक कधीच स्वत:साठी व दुसर्या भारतीयांसाठी उभे राहू शकणार नाहीत. आणि हे व्यावसायिकांना माहीत आहे. त्याचा बेमालूम वापर करून १३५ कोटी लोकांना पुन्हा गोर्यांची गुलामी विकली जात आहे.
सुचित्रा सेन या अत्यंत प्रतिभावान बंगाली अभिनेत्रीने चित्रपटातून संन्यास घेतल्यावर राम-कृष्ण मठात आयुष्य घालवलं. त्यांचा चेहरा कुठेही परत दिसला नाही. मात्र डोळ्यांनी दिसणार्या व हात लावता येणार्या गोष्टींच्या मागे लागणार्या पिढीला त्यांच्या आवडत्या खेळाडूंचं वागणं खरं तर खटकायला नको.
..................................................................................................................................................................
लेखिका डॉ. वृषाली रामदास राऊत विश्वकर्मा विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक आहेत.
vrushali31@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment