अजूनकाही
रियाना, ग्रेटा अन मीना या तीन महिलांनी त्या मर्दानी पण भेकड मोदी सरकारची पुरती फजिती केली! केवढी ती पळापळ, काय ती जमवाजमव अन कसली ती प्रतिक्रिया!! तीन बायकांनी चक्क भारताचे परराष्ट्र खाते, दोन भारतरत्ने आणि मूठभर तारे-तारका हलवले. याला म्हणतात विचारांची निष्ठा आणि ताकद!!! रियाना आतापर्यंत काही हुकूमशाह्यांवर टीका करून थांबली नाही. ती कित्येक गरजूंना आर्थिक मदतही करते. ग्रेटासारखी शाळकरी पोर तर थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या माऱ्यात आली होती. काय झाले? ट्रम्प यांची मिजास कुठल्या कुठे उडून गेली. मीना हॅरिसने तर आपली आत्या उपराष्ट्रपती होताच भारताकडे आपलेही लक्ष असल्याचे सांगून टाकले. बहुधा मीनाच्या ट्विटने भारताच्या या स्युडो राष्ट्रवाद्यांना मिर्च्या झोंबल्या. हे नकली राष्ट्रवादी आणि कॅपिटॉलवर चाल करून गेलेले उजवे अतिरेकी सख्खे भाऊ-बहीणच. मीनाने तो उल्लेख करून बायडेन सरकार अशा उजव्यांची खैर करणार नसल्याचे जणू सूचित केले.
शेतकऱ्यांच्या बायका दोन महिन्यांपासून थंडी-वाऱ्यात दिल्लीच्या सरहद्दीवर बसून आहेत. त्यांची दखल कधी या भारतरत्नांनी आणि सरकारी नररत्नांनी घेतली? ना त्या गावोगावी शेती सांभाळणाऱ्या बायकांची. पण एक गायिका, एक कार्यकर्ती आणि एक उपराष्ट्रपतीची नातलग वकील शेतकरी आंदोलनाच्या दमनाबद्दल चवताळून उठल्याबरोबर काय व्हावे? एका गायिकेला भिडवून दिली दुसऱ्या गायिकेशी. ग्रेटासारखे कार्य करणारी सोडा, विचारही करू शकणारी संघापाशी कुणी मुलगी नसल्याने (काय बोलता, संघापाशी मुलगी कशी असेल? विटाळ होतो ना त्यांच्यामुळे!) संघाने अजय देवगण, अक्षयकुमार आदींना भिडवले. अरेच्चा, हा अक्की तर कॅनडाचा नागरिक आहे. तो कसा काय ढवळाढवळ करू शकतो भारताच्या राजकारणात?
सर्वांत भारी आपले क्रिकेटपटू! एकेकाला लावले की कामाला. म्हणजे ट्विट करायला. कुंबळे, कोहली, राहणे, धवन, शर्मा सारे आले मैदानावरून राजकारणात. बिचारे, भारताच्या टीमला सरकार समजून बसले. यातले एकही शेतकऱ्याचे पोर नसल्याने त्यांना शेतमालाला भाव, एमएसपी, बाजार समिती या गोष्टी माहीत नसणारच! पण हे काय? तीन बायकांनी ट्विट केल्याबरोबर हे क्रिकेटवीर ‘ट्विटवीर’ झाले, मग चीनने भारतावर केलेले आक्रमण, पाकिस्तानचे दहशतवादी हल्ले आणि म्यानमारच्या लष्करशाहीचा धोका यावरही करत राहावे ट्विट त्यांनी. अरेरे! काय गत केली या खेळाडूंची भाजपने!! त्यांच्यातही फूट पाडली त्याने. त्यांना कशाला राजकीय कुरघोडीत ओढले? ते काय सरकारी नोकर आहेत की, संघाचे हिंदुत्ववादी सेवक? शमी, सिराज, कैफ, अजहर, हरभजन, युवराज, सेहवाग यांना ते मुसलमान, शीख व जाट आहेत म्हणून बाजूला ठेवले असे कुणी म्हणाले तर काय करील हा संघ परिवार?
..................................................................................................................................................................
अधिक माहितीसाठी पहा - सर्व प्रकारच्या कट्टरतेला नाकारणाऱ्या ‘इन्शाअल्लाह’ या अभिराम भडकमकर यांच्या बहुचर्चित कादंबरीवरील ‘परीक्षण’ स्पर्धा
..................................................................................................................................................................
छी, छी, छी, राष्ट्रवाद आणि देशभक्ती यांच्या नावाखाली कलाकार अन क्रिकेटपटू यांना कामाला लावले की, या सरकारने! क्रिकेटबरोबर आता आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताच्या परराष्ट्र धोरणाचा अभ्यासही करावा लागणार यापुढे साऱ्यांना. सरकारच्या आंदोलन हाताळतानाच्या चुका अशा रीतीने या लोकप्रिय नागरिकांकडून झाकायला सुरुवात होण्याचा अर्थ हिटलरशाहीचा आरंभ झाला बरे का! हिटलरही कलावंत, क्रीडापटू, उद्योगपती यांना अशाच राष्ट्रवादाच्या नावाने आपल्या कचाट्यात खेचे आणि आपले अत्याचार साजरे करी. ज्यूंच्या कत्तली, शेजारी राष्ट्रांवर हल्ले यांखेरीज अवघे जग युद्धाला प्रवृत्त करणे, या मुद्द्यांचे उदात्तीकरण मग ही अंकित मंडळी जोरजोरात करू लागे. तसेच या लोकांकडून आता रस्त्यावर ठोकलेले खिळे, उभे केलेले सिमेंटचे बॅरिकेडस आणि मारझोडीसाठी आणलेले गुंड आणि पोलीस यांचे समर्थन होणार. नव्हे, ते झालेच आहे!
आपल्या ट्विटमध्ये हे लोक म्हणतात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा निघावा, परंतु भारताच्या सार्वभौमत्वाखाली. भारताचे ऐक्य अभंग राहो वगैरे वगैरे. दोन महिन्यांपूर्वी मग हे का नाही सुचले? रियाना, ग्रेटा, मीना यांनी दखल घेताच या ‘इंटरनॅशनल’ लोकांना शेतकऱ्यांचा पुळका आलाय, याचा अर्थ हे बिचारे अमित शहा यांचे चिरंजीव जय शहा यांचे ताबेदार झाले. हे चिरंजीव शहा नुकतेच ‘एशियन क्रिकेट कौन्सिल’चे अध्यक्ष झाले आहेत. त्या पूर्वी ते ‘बोर्ड ऑफ कंट्रोल फार क्रिकेट इन इंडिया’ या संस्थेचे सेक्रेटरी होते. आता आले लक्षात गृहमंत्र्यांना आपला वंशाचा दिवा क्रिकेटच्या मैदानावर का तेवत ठेवावासा वाटतो? संघ परिवार हा असा सर्वंकष आणि सर्वग्रासी असतो. वेळप्रसंग पाहून अशी फौज उभी करायची. राष्ट्रवादाच्या निमित्ताने तिला लढायला पाठवायचे. आपले सरकार अहंकार, घमेंड, मिजास, माज करत राहून चुकले तरी त्या चुकांवर क्रिकेटचे मैदान अंथरायचे. हे यांचे कारस्थानी राजकारण!
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
मोदी सरकार अर्थात संघ परिवार ज्या हिंदुत्ववादी मिजासीने शेतकऱ्यांशी वागतेय, ती त्यालाच गोत्यात आणतेय. कारण एक अमेरिकन पण मूळची बार्बाडियन, एक स्वीडिश आणि एक अमेरिकन भारतीय अशी तीन प्रसिद्ध बायकांनी ट्विट केले म्हणजे तिथेच काही थांबलेले नाहीये. अवघ्या जगाचा महत्त्वाचा मीडिया भारतात काम करतो. त्याने तर केव्हापासून शेतकरी आंदोलन चिरडायच्या मोदी सरकारच्या क्लृप्त्या जगापुढे नेल्या आहेत. विद्या कृष्णन नामक एक पत्रकार तर बोस्टन इथून एका फ्रेंच वृत्तवाहिनीकडे या आंदोलनात दडपशाही कशी चालूय हे नुकतेच सांगत होती. अशा किती लोकांची मुस्कटदाबी मोदी आणि संघ परिवार करणार? या विद्या कृष्णनला बलात्काराच्या धमक्या दिल्या जातात, शिवीगाळ केली जाते, असे ती सांगत होती. शिव्या देऊन असा आवाज दाबता येतो होय?
संघ परिवार हेही विसरतोय की, आंदोलनातल्या शेतकऱ्यांनी भाजपलाच अनेकदा मतदान केलेलेय. आता ते ‘आमचे चुकले’ असे म्हणून लागलेत. मतदार कुणी कुणाचेही असू द्यात, ते भारताचे नागरीक तर आहेत ना? ‘त्यांनी तिरंग्याचा अवमान केला’ असे राष्ट्रपती, पंतप्रधान धडधडीत कसे काय म्हणू शकतात? लाल किल्ल्यावरच्या तिरंग्याला ना कुणी हात लावला, ना कुणी त्या दिशेने गेले. मोठ्या तिरंग्याखालच्या रिकाम्या खांबावर कुणी तरी खालसा ध्वज लावला. ते लावणारे सापडत नाहीत. ते म्हणे सरकारचेच हस्तक होते, असे शेतकरी आंदोलकांचे म्हणणे आहे. काय गंमतेय पाहा, जेएनयूतल्या हाणामारीतलेही कुणी सापडत नाही, तसेच या लाल किल्ल्यावरचे सापडत नाहीत.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
मोदी सरकार व संघ परिवार यांचे वर्गचारित्र्य सवर्ण-शहरी व मध्यमवर्गीय असल्याचे या घटनेद्वारे सिद्ध झालेय. शेतकरी या श्रमिक वर्गाविरुद्ध मनोरंजन क्षेत्रातल्यांना भिडवून देणे, ही वृत्ती खास अभिजनवर्गीय आहे. क्रिकेटलाही सध्या मनोरंजनातच समाविष्ट केले जाते. ललित मोदी याने ते स्वरूप क्रिकेटला बहाल केलेलेय. म्हणूनच की काय धोनी, कपिल देव यांच्यावर चित्रपट निघाले! खूप पूर्वी चित्रपट कलावंतांना सरहद्दीवर नेऊन तिथे फौजांचे मनोरंजन केले जाई.
आता मनोरंजनाचे रूपही पालटले. क्रिकेटचे संचालक, प्रायोजक, सरकार, परराष्ट्र खाते यांच्या सुचनेनुसार ट्विट करण्याचे नवे प्रशिक्षण नेट प्रॅक्टिसमध्ये सुरू झालेले दिसते. नेट प्रॅक्टिस म्हणजे जाळीत करायची ती! इंटरनेटची समजलात की काय?
बाय द वे, ‘अब की बार, ट्रम्प सरकार’ ही मोदीमहाराजांची घोषणा कितपत राष्ट्रवादी होती, कोण सांगेल?
..................................................................................................................................................................
लेखक जयदेव डोळे माध्यम विश्लेषक आहेत.
djaidev1957@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment