बदललेल्या काळ-काम-वेगाच्या गणितासोबत ज्यांना जुळवून घेता येत नाही, ते ‘लडाईट’ असतात!
पडघम - सांस्कृतिक
हर्षवर्धन निमखेडकर
  • ‘CBS Sunday Morning’च्या ‘Almanac: The Luddites’मधील एक प्रसंग
  • Mon , 01 February 2021
  • पडघम सांस्कृतिक लडाईटLuddites

शब्दांचे वेध : पुष्प चोविसावे

‘गोल्डनआय’ (GoldenEye) या १९९५च्या जेम्स बाँड चित्रपटाच्या शेवटी शेवटी एक दृश्य आहे. क्युबामधल्या एक निर्जन ठिकाणी सुदूर अवकाशात असलेल्या उपग्रहामार्फत एका क्षेपणास्त्राला सांकेतिक संदेश (signal) पाठवण्यासाठी खलनायकाने एक भला मोठा अँटेना उभा केलेला असतो. बाँड आणि हा खलनायक यांची त्या अँटेनावरच हातघाईची लढाई होते. बाँडला कसेही करून तो अँटेना निकामी करायचा असतो, ज्यामुळे त्यातून संदेश पाठवले जाऊ शकणार नाहीत. एका क्षणी त्याला तिथेच असलेली एक खूप लांब आणि जाडजूड लोखंडी कांब दिसते. बाँड पूर्ण ताकदीने ती कांब उचलतो आणि तो अँटेना चक्राकार फिरवू शकण्यासाठी आवश्यक असणाऱ्या एका सरकत्या लोखंडी साखळीत तिला अडकवतो. त्यामुळे साखळीचे पुढेपुढे जाणे थांबते. यंत्राची मोटर पूर्ण वेगाने सुरूच असते, पण ती साखळी एका जागी थांबल्यामुळे आता त्या यंत्रावर जबरदस्त दाब येतो आणि काही अवधीतच त्या मोटरचा स्फोट होतो, आग लागते. त्यामुळे तिला जोडलेला तो अँटेनादेखील निकामी होतो आणि त्याचे तुकडे तुकडे होतात. त्यातलेच काही वजनदार तुकडे खलनायकाच्या अंगावर पडतात आणि त्याचा मृत्यू होतो.

साखळी थांबवण्यासाठी आणि यंत्र बंद पाडण्यासाठी बाँडने केलेल्या या क्लृप्तीचं वर्णन तुम्हाला जर एका वाक्यात करायला सांगितलं तर कसं कराल? अगदी सोपं आहे. ‘He inserted a rod in the moving chain to stop the motor’, बरोबर? पण असं साधं, बाळबोध इंग्रजी न बोलता तुम्ही ‘He threw a spanner in the works’ असं इडिओमॅटिक इंग्रजीतही म्हणू शकता. अर्थात बाँडला दिसलेली ती साखळी एवढी मजबूत आणि जाड होती की, एखाद्या साध्या छोटेखानी स्पॅनरने किंवा पान्याने ती थांबवता आली नसती, हे नक्की. म्हणूनच बाँडने त्याऐवजी त्या कांबेचा उपयोग केला. स्पॅनर काय किंवा कांब काय, परिणाम झाल्याशी मतलब. कोणतंही सुरू असलेलं (चांगले अथवा वाईट) काम थांबवण्यासाठी, एखाद्या गोष्टीत अडथळा आणून ती बंद करण्यासाठी काहीतरी क्लृप्ती करणं, हा तो परिणाम. यासाठी अनौपचारिक ब्रिटिश इंग्रजीत ‘To throw a spanner in the works’ असा वाक्प्रचार आहे. अमेरिकन लोक ‘spanner’ला ‘wrench’ म्हणतात. त्यामुळे तुम्ही जर अमेरिकन इंग्रजी बोलत असाल तर तुम्ही ‘To throw a wrench in the works’ असंही म्हणू शकता. यासाठी आपल्या मराठी भाषेत ‘चालत्या गाड्याला (किंवा गाडीला) खीळ मारणं’ असा वाक्प्रचार आधीपासूनच उपलब्ध आहे.

‘आधीपासूनच’ असं लिहिण्याचे कारण म्हणजे इंग्रजी भाषेत ‘To throw a spanner in the works’ हा वाक्प्रचार तसा उशिरा वापरात आला.

३० जुलै १९०७च्या ‘The Chicago Tribune’ या वृत्तपत्रातलं हे वाक्य बघा : It should look to them as if he were throwing a monkey wrench into the only market by visiting that Cincinnati circus upon the devoted heads of Kentucky’s best customers. हे झालं अमेरिकन उदाहरण.

ब्रिटिश इंग्रजीत या वाक्प्रचाराचा पहिला वापर करण्याचं श्रेय (इतर अनेक वाक्प्रचारांप्रमाणेच) पी. जी. वुडहाऊसकडे जातं. त्याच्या १९३४च्या ‘Right Ho, Jeeves’ या कादंबरीतलं एक वाक्य असं आहे - He should have had sense enough to see that he was throwing a spanner into the works.

..................................................................................................................................................................

आंबेडकरांना सहन करावा लागलेला विकृत व अविचारी वैरभाव या व्यंगचित्रांमधून उघड होतो. त्याचबरोबर ऐतिहासिक अन्याय सहन केलेल्या आंबेडकरांचं वास्तविक चरित्रही उजेडात येतं.

हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये खरेदीसाठी करण्यासाठी क्लिक करा - 

https://www.booksnama.com/book/5282/Hasanyawari-Neu-Naka

..................................................................................................................................................................

चालत्या यंत्रात स्पॅनर अडकवणं या वाक्प्रचाराचं मूळ मात्र ‘लडाईट’ चळवळीत आहे, अशी एक मान्यता आहे. लडाईट? म्हणजे काय बुवा? हिंदीत चंबल के डकैत असतात, टिकैत नावाचे लोक असतात हे आपल्याला माहीत असतं. पण हे लडाईट कोण? हे मूळचे लढैत म्हणजे लढणारे तर नाही? एका अर्थानं हे खरंच आहे. जुने लडाईट लोक एक प्रकारचे लढवय्येच होते. फक्त, त्यांची लढाई समरभूमीवर न होता ती यंत्रभूमीवर म्हणजे कारखाने किंवा वर्कशॉपमध्ये होत असे. त्यांचा इतिहास फार मनोरंजक आहे.

त्याआधी ही एक गंमत.

गॉर्डन नावाचा माझा एक ऑस्ट्रेलियन मित्र आहे. जन्मानं इंग्रज. या माझ्या सत्तरीच्या जवळपास पोहचलेल्या मित्राला आधुनिक तंत्रज्ञानाचा बऱ्यापैकी तिटकारा आहे. नवनवीन साधनं वापरायचा त्याला फार कंटाळा आहे. तो म्हणतो, ‘सेलफोन, सोशल मीडिया (फेसबुक किंवा व्हॉट्सअ‌ॅपसारखी संपर्काची साधनं), यासारख्या गोष्टी मी मेल्यावरच माझ्या घरात येतील.’ तंत्रज्ञानाला त्याचा नकार नाही, पण अत्याधुनिक तंत्रज्ञानाबद्दल तो साशंक आहे. त्याला अजूनही जुन्या पद्धतीचा लॅंडलाईन फोनच आवडतो. ऑफिसला जायला तो कार वापरायचा, पण निवृत्त झाल्यानंतर तर तो तीही अगदी गरजेपुरतीच वापरतो. मी त्याला कधी कधी थट्टेनं ‘गॉर्डन, तू २१ व्या शतकातला ‘लडाईट’ आहेस’, असं म्हणतो. यावर तो फक्त मंद स्मित करत म्हणतो, ‘मी टेक्नोफोब तर नाही ना? मग झालं!’

हे पण सत्य आहे. खरा ‘टेक्नोफोब’ (technophobe) तो असतो, ज्याला तंत्रज्ञानाची भीती वाटते, आणि तो यंत्रांच्या जवळपासही फिरकत नाही. आजच्या काळात अशी किती माणसं सापडतील? आमच्या गॉर्डनला तंत्रज्ञानाचं भय वाटत नाही, पण विनाकारण, गरज नसताना नवनवी उपकरणं घेणं, त्यांच्या आहारी जाणं, त्याला पसंत नाही. गॉर्डन ज्या देशात राहतो, तिथं हे चालून जाऊ शकतं. आपल्या देशात मात्र आज सरकारच्याच कृपेनं (आणि करोनाच्या अवकृपेने) आपले ७०-८० टक्के दैनंदिन व्यवहार ऑनलाईन झाले आहेत. त्यामुळे आपण इच्छा असली तरी नव्या साधनांकडे पाठ फिरवू शकत नाही.

टेक्नोफोब लोक घाबरट असतात. त्यांना एक प्रकारचा मानसिक विकार झालेला असतो. ते या भीतीपोटी तंत्रज्ञानाचा स्वीकार करत नाहीत. लडाईट असलेले लोक मानसिक भीतीपोटी नाही तर त्यांना यंत्रांचा खराखुरा प्रचंड राग येतो, म्हणून तंत्रज्ञानाला जवळ करत नाहीत. त्यांना भीती असते ती वेगळ्या प्रकारची. ती म्हणजे या यंत्रांमुळे त्यांचा कामधंदा बंद पडेल, त्यांची जागा यंत्रं घेतील आणि त्यांना घरी बसावं लागेल, त्यांच्या उपजीविकेचे, कमाईचे मार्ग बंद होतील, याची.

एका अर्थानं ही धास्ती साधार आहे. शे-दोनशे वर्षांपूर्वी लोक जे कामधंदे करत होते, त्यातले अनेक व्यवसाय आज इतिहासजमा झाले आहेत किंवा मोडकळीला आले आहेत. कौले शाकारणारे, हातमागावर कापड तयार करणारे, भांड्यांना कल्हई करणारे, घोड्यांची काळजी घेणारे, भिस्ती किंवा पाणके, या आणि अशा अनेक प्रकारचे किती लोक आज आपल्याला दिसतात? अगदी अभावानेच.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

प्रत्येक ठिकाणी यंत्रं आली आहेत, नवनवीन शोध लागत आहेत, जुनी यंत्रं जाऊन त्यांची जागा अधिक विकसित यंत्रं घेत आहेत. ज्या कामाला पूर्वी दहा कामगार आणि दहा दिवस लागत, तेच काम आज आधुनिक यंत्रांच्या मदतीनं एक किंवा दोन माणसं एका दिवसात करतात. या बदललेल्या काळ-काम-वेगाच्या गणितासोबत ज्यांना जुळवून घेता येत नाही, ते लोक असतात ‘लडाईट’ (Luddites). ऑटोमेशन, कम्प्युटरायझेशन यासारख्या संकल्पनांपासून ते दूर राहतात, त्यांचा विरोध करतात, आणि मनुष्यबळावर अवलंबून असलेले जुने दिवस किती चांगले होते, याचं गाणं गात राहतात.

ब्रिटनमध्ये अठराव्या शतकात फार मोठी औद्योगिक क्रांती झाली. १७६० ते १८४० या काळात यामुळे ब्रिटनचा आर्थिक आणि औद्योगिक चेहरामोहराच पूर्ण बदलून गेला. या क्रांतीच्या प्रारंभानंतर अल्पावधीतच हे लोण उर्वरित युरोपमध्ये आणि जगाच्या इतर भागातही पसरलं. या घडामोडींचं औद्योगिक क्रांती (Industrial Revolution) अशा शब्दांत वर्णन मुळात फ्रेंच लोकांनी केलं होतं, पण इंग्रजी भाषेत या शब्दांना लोकप्रियता मिळाली ती आर्नल्ड टॉयन्बी (Arnold Toynbee) या इंग्लिश आर्थिक इतिहासकारामुळे.

या क्रांतीच्या काळात इंग्लंडमध्ये वाफेवर चालणारी अनेक यंत्रं आली. देशांतर्गत प्रवास आणि मालवाहतूक सोपी व्हावी म्हणून अनेक कालवे खोदण्यात आले. हजारो कारखाने बांधण्यात आले. सूत आणि कापड तयार करण्यासाठी जागोजागी गिरण्या (mills) अस्तित्वात आल्या. घरच्या घरी हातमागांवर किंवा अन्य पारंपरिक पद्धतींनी जे कामगार वस्त्र निर्माण करत होते, त्यांच्या जीवनावर तर या यांत्रिक गिरण्यांचा फार वाईट परिणाम झाला. त्यामुळे ते निराश झाले. पुढे याच निराशेचं रूपांतर रागात झालं. आणि मग त्यातल्या अनेकांनी यंत्रविरोधी एक चळवळच सुरू केली. तिला ‘Luddite Movement’ असं नाव प्राप्त झालं. गिरणीतल्या सूतकताई, सूतविणाई, लोकरविणाई यंत्रांचा निषेध म्हणून हे लोक गिरण्यांमध्ये झुंडीनं घुसायचे आणि तिथल्या चालत्या यंत्रांमध्ये स्पॅनर (पाने) अडकवायचे. त्यामुळे ही यंत्रं बंद पडत आणि खराब होत. निषेधकर्त्यांच्या या कारवायांमुळे ‘To throw a spanner in the works’ (‘चालत्या यंत्रात स्पॅनर घुसवणे’) हा वाक्प्रचार कालांतरानं तयार झाला.

तसं पाहिलं तर हा काही फक्त यंत्रांबाबतचाच प्रश्न नाही. आपल्या नियमित, सुरळीत, एका विशिष्ट लयीत आणि गतीनं चालणाऱ्या (म्हणजेच set झालेल्या) आयुष्यात, दिनचर्येत बदल होणं (तेही बाह्य प्रभावाखाली) बहुतेक कोणालाच आवडत नाही. त्या अर्थानं हे सगळेच एक प्रकारचे ‘लडाईट’ असतात.

‘कॉलिन्स’ शब्दकोशात या शब्दाबाबत असा खुलासा दिलेला आहे - Luddites countable noun [oft NOUN noun]

If you refer to someone as a Luddite, you are criticizing them for opposing changes in industrial methods, especially the introduction of new machines and modern methods. The majority have a built-in Luddite mentality; they are resistant to change.

हे एक नापसंतीदर्शक (disapproval दाखवणारं) नाम आहे.

पण लडाईटच का? या संबोधनाचं प्रयोजन काय? याची व्युत्पती अशी सांगितली जाते -

एका संदिग्ध तर्कानुसार इंग्लंडमधील लेस्टर (Leicester) या शहराजवळच्या अ‌ॅन्स्टी या गावातल्या नेड लड (Ned Ludd) या एका तरुण आणि शिकाऊ गिरणी कामगारानं १७७९मध्ये एका गिरणीत घुसून तिथल्या दोन यंत्रांची नासधूस केली. यंत्रांना विरोध करण्याचा हा या प्रकारचा पहिलाच प्रयोग होता. त्यामुळे त्याच्या नावाची चर्चा सर्वदूर होऊ लागली आणि लवकरच इतरांनीही त्याचा कित्ता गिरवणं सुरू केलं. पुढे तर नॉटिंगम गावात १८१०च्या आसपास यंत्रविरोधी एक सार्वजनिक चळवळच सुरू झाली. तिला नेड लडचं नाव देण्यात आलं. म्हणून लडचे अनुयायी ते ‘लडाईट’.

एक तर्क असाही आहे की, नेड लड या नावाची कोणी व्यक्ती नव्हतीच. सरकारला धाक दाखवायला आणि चिडवायला या काल्पनिक पात्राची निर्मिती करण्यात आली होती. नंतर तर नेड लड या नावाला दंतकथेचं रूप प्राप्त झालं. त्याला कधी कॅप्टन लड, तर कधी किंग लड, तर कधी जनरल लड अशी बिरुदं बहाल करण्यात आली. तुमच्या चळवळीचा संस्थापक कोण?, असं विचारल्यावर सदस्य या तीनपैकी एकाचं नाव सांगायचे. काल्पनिक रॉबिन हुडप्रमाणे हा देखील शेरवुडच्या अरण्यात राहायचा, असंदेखील सांगत असत.

साम्यवादी आणि समाजवादी दृष्टीकोनातून पाहिलं तर या लडाईट लोकांनी यंत्रांना निव्वळ विरोधासाठी विरोध केला नव्हता. विविध प्रकारच्या असंघटित कामगारांना त्या काळात फार वाईट वागणूक दिली जात असे. अत्यल्प पैशाच्या मोबदल्यात भरपूर, ढोरासारखं काम, प्राथमिक सुखसुविधांचा अभाव, मालकांची मनमानी, कामगार हिताचे कोणतेही कायदे नसणं, रोजगाराची हमी नसणं, खाद्यपदार्थांच्या वाढत्या किमती, या आणि अशा अनेक कारणांमुळे इंग्लंडचा श्रमिक वर्ग नाराज होता. त्यांच्या मनात रोषाची भावना खदखदत होती. त्यामुळे लडाईट चळवळीच्या माध्यमातून त्यांनी आपल्या या संतापाला वाट करून दिली आणि सरकार आणि मालक लोकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला, असं मानलं जातं.

असंघटित कामगारांना एकत्र आणण्याचादेखील हा प्रयोग होता. त्यातल्या त्यात वस्त्रोद्योगातल्या घरगुती कामगारांना जरा बरं उत्पन्न होतं. पण यांत्रिक सूत/लोकर गिरण्यांमुळे त्यांच्यावरही संक्रांत आली. म्हणून यंत्रविरोधी पहिली ठिणगी त्या क्षेत्रात पडली, असं मानतात. १८१२मध्ये ‘Huddersfield’ (हडर्सफिल्ड) गावाजवळ सरकारी फौजा आणि लडाईट यांच्यात सशस्त्र लढाई झाली. अनेक लडाईट लोकांना फासावर लटकावण्यात आलं, तर काहींना ऑस्ट्रेलियात कायमचं ‘तडीपार’ करण्यात आलं. त्यामुळे ही चळवळ तेव्हाच जवळपास संपुष्टात आली. १८१३नंतर तर तिचं अस्तित्वच संपलं. पण जाता जाता ती इंग्रजी भाषेला ‘लडाईट’ या शब्दाची देण देऊन गेली. ‘ऑक्स्फर्ड शब्दकोशा’नुसार हा शब्द १८११ साली बहुधा पहिल्यांदा एक विशेषण म्हणून वापरला गेला असावा. संदर्भ बदलले तरी आजही तो बऱ्यापैकी चलनात आहे.

मात्र प्रारंभिक विरोधानंतर कालांतरानं सरकार दरबारी लडाईटांच्या मागण्यांची गोष्टींची नोंद घेण्यात आली आणि मग कामगार हिताचे कायदे तयार करण्यात आले, युनियन म्हणजे कामगार संघटना अस्तित्वात आल्या, सर्वांनाच बरे दिवस आले, आणि मग लडाईट चळवळीचं प्रयोजनच संपलं. कामगारांनीही यंत्रांचा सशर्त का होईना, पण स्वीकार केला.

आजच्या जमान्यात ऑटोमेशन, अमर्याद संगणकीकरण, कृत्रिम बुद्धिमता (artificial intelligence) यांसारख्या तंत्रज्ञानातील बदलांना आणि घडामोडींना विरोध करणाऱ्या लोकांना निओ लडाईट (neo-Luddites, नव - लडाईट) असं म्हटलं जातं. चंगळवाद, उपभोक्तावाद, यासारख्या संकल्पनांना केलेला विरोध हादेखील neo-Luddismचाच एक भाग मानला जातो.

आधुनिक अर्थशास्त्रात ‘Luddite fallacy’ नावाची एक संकल्पना आहे. फॅलसी म्हणजे चुकीचा युक्तीवाद. आधुनिक तंत्रज्ञानामुळे मोजक्या कामगारांकडून जास्त काम करून घेतलं जातं आणि यामुळे बेरोजगारी वाढते. पण त्याच वेळी कमी मनुष्यबळ वापरल्यानं कमी खर्चात तेवढंच किंवा जास्त उत्पादन होतं. आणि त्यामुळे मालाचा जास्त पुरवठा केला जाऊ शकतो. आता जास्त मागणी असली तर तेवढं उत्पादन करायला मालकाला जास्त मनुष्यबळाची गरज भासू शकते. म्हणून कामगारांनी तंत्रज्ञानाचा विरोध करू नये, हाच तो चुकीचा युक्तीवाद किंवा ‘लडाईट फॅलसी’!

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

माझा मित्र गॉर्डनचा तंत्रज्ञानाला आणि नवनवीन शोधांना विरोध नाही, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या अनावश्यक वापराबद्दल आणि त्याच्या दुरुपयोगाबद्दल तो साशंक आहे. तो लडाईट नाही, पण सावध आहे. यात त्याची काही चूक आहे, असं मला वाटत नाही. ‘व्हॉट्सअ‌ॅप’ने नुकताच एक बॉम्ब फोडला आहे. त्यामुळे आपलं खासगीपण संपेल का? या चिंतेत आपण पडलो आहोत. अशा वेळी गॉर्डनची भूमिका मला योग्य वाटते.

आधुनिक तंत्रज्ञानाच्या आपण विनाकारणच आहारी गेलो आहोत. एखाद्या व्यसनाधीन माणसासारखी आपली अवस्था झाली आहे. हळूहळू ‘artificial intelligence’ (कृत्रिम बुद्धिमत्ता) च्या जोरावर यंत्रं आपल्यावर कुरघोडी करतील आणि आपण त्यांचे गुलाम होऊ, अशी धास्ती बाळगण्याचे दिवस सध्या जवळ आले आहेत, असं कधीकधी वाटतं. यालाच ‘ऑर्वेलियन नाईटमेअर’ म्हणतात.

जॉर्ज ऑर्वेल नावाच्या ब्रिटिश कादंबरीकारानं आपल्या १९४९ साली लिहिलेल्या ‘1984’ या भविष्यवेधी कादंबरीत काही भयसूचक गोष्टींची शक्यता वर्तवली होती. त्या खऱ्या होतानाची चिन्हं दिसू लागली आहेत. हेच ते ‘ऑर्वेलियन दुःस्वप्न’!

पण मग यावर उपाय काय? आपण सर्वांनी (निदान आपल्यातल्या सुज्ञ लोकांनी) नवं तंत्रज्ञान नाकारून ‘लडाईट’ बनायचं का? की एखादा सुवर्णमध्य साधून आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि त्यात प्रत्यही होणाऱ्या बदलांचा स्वीकार तर करायचाच पण त्याच वेळी आपण या तंत्रज्ञानाचे शिकार होणार नाही, याचीही काळजी घ्यायची? हे शक्य होईल का, हे तुम्हीच मला सांगा.

..................................................................................................................................................................

लेखक हर्षवर्धन निमखेडकर वकील आहेत. वुडहाऊसचे अभ्यासकही.

the.blitheringest.idiot@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......