...आणि ‘आता शेतकरी आंदोलन संपलं’ असे मनातल्या मनात मांडे खाणाऱ्यांचा विचार त्यांच्या मनातच जिरला
पडघम - देशकारण
कॉ. भीमराव बनसोड
  • दिल्लीच्या सीमांवर चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे एक छायाचित्र
  • Mon , 01 February 2021
  • पडघम देशकारण शेतकरी आंदोलन Farmers protest शेती farming शेतकरी farmer शेती सुधारणा बिल Farm Reform Bill

यंदाचा ‘प्रजासत्ताक दिन’ (२६ जानेवारी २०२१) केवळ शेतकरी आंदोलनाच्याच इतिहासात नव्हे, तर भारताच्या इतिहासातसुद्धा एक ‘ऐतिहासिक दिवस’ म्हणून नोंद होण्यासारखा आहे. त्याचबरोबर २८ जानेवारी हा दिवसही शेतकरी आंदोलनाच्या दृष्टीनं ‘ऐतिहासिक’ ठरावा, अशा घटना या दिवशी घडलेल्या आहेत.

या प्रजासत्ताक दिनी गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या वेगवेगळ्या सीमांवर शेतीविषयक तीन कायदे रद्द करावेत व एमएसपीचा कायदा बनवावा, यांसारख्या मागण्यांसाठी आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून दिल्लीत ‘ट्रॅक्टर परेड’ काढण्याचा निर्णय महिनाभरापूर्वीच घेतला होता. या परेडला मोडता घालण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केंद्र सरकारने करून पाहिला. पण त्यात त्याला यश आलं नाही. पण या परेडला विकृत वळण देण्यात मात्र सरकारला यश आलं. दिल्ली पोलिसांना परेडसाठी परवानगी द्यावी लागली आणि अनेक बैठका घेऊन या परेडचा मार्ग निश्चित केला असला, तरी त्यांनी त्यासाठी मुद्दामहून उशीर केला. २५ मार्चच्या रात्री बारा वाजता त्यांनी त्यासाठीचा मार्ग निश्चित केला.

तत्पूर्वीच ही परेड अत्यंत शांततेनं व्हावी यासाठी शेतकरी संघटनांनी प्रयत्न केले. त्यासाठी एक आचारसंहिताही त्यांनी जाहीर केली होती. त्यानुसार शासकीय परेड संपल्यानंतर अकरा वाजता ट्रॅक्टर परेडला सुरुवात करावयाची होती. पण दिल्ली पोलिसांनी ज्या मार्गावर परेडला परवानगी दिली होती, त्यावर बॅरिकेड (अडथळे) लावले होते. सकाळी अकरापर्यंत त्यांनी ते रस्ते मोकळे केले नाहीत. तर दुसरीकडे दीप सिद्धू नावाच्या युवकाबरोबर जाणाऱ्या लोकांनी मात्र सकाळी नऊ वाजताच नियोजित मार्गाव्यतिरिक्त दिल्लीकडे जाणाऱ्या मार्गावरून आपली परेड काढण्यास सुरुवात केली. त्याला कोणताही प्रतिबंध पोलिसांनी केला नाही. त्यापूर्वीच्या व २५ जानेवारीच्या रात्री झालेल्या सभांतूनही त्याने चिथावणीखोर भाषणं करून आपल्याला दिल्लीत प्रवेश करायचा आहे, असं सांगितलं होतं. त्यामुळे त्याला शेतकऱ्यांनी हुसकावून लावलं होतं. पण त्याला जे करायचं होतं, ते त्याने प्रजासत्ताक दिनी केलंच.

..................................................................................................................................................................

आंबेडकरांना सहन करावा लागलेला विकृत व अविचारी वैरभाव या व्यंगचित्रांमधून उघड होतो. त्याचबरोबर ऐतिहासिक अन्याय सहन केलेल्या आंबेडकरांचं वास्तविक चरित्रही उजेडात येतं.

हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये खरेदीसाठी करण्यासाठी क्लिक करा - 

https://www.booksnama.com/book/5282/Hasanyawari-Neu-Naka

.................................................................................................................................................................

शेजारच्या राज्यातून आलेल्या शेतकऱ्यांना परेडचा मार्ग माहीत होऊ न शकल्याने, ते पोलिसांनी परवानगी दिलेल्या मार्गाव्यतिरिक्त दीप सिद्धूच्या टोळक्याबरोबर गेले. त्यामुळे आंदोलकांमध्ये गोंधळ उडाला. त्यात पोलिसांनी परवानगी दिलेल्या मार्गावरसुद्धा लावलेल्या अडथळ्यामुळे या गोंधळात भर पडली. हे अडथळे पार करतच शेतकऱ्यांची ट्रॅक्टर परेड सुरू झाली. अशात नेमकं कुठं जावं व परत कसं फिरावं हे ग्रामीण भागातून आलेल्या शेतकऱ्यांना रस्त्यांची नीट माहिती नसल्यामुळे उमजलं नाही. दीप सिद्धूच्या टोळक्यासह काही शेतकरी दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ पोहोचले. दीप सिद्धूने लाल किल्ल्यावर धार्मिक झेंडा लावला, तसंच त्याच्या सहकाऱ्यांनी किल्ल्यात प्रवेश करून तेथील सामानाची मोडतोड व नासधूस केली. तिथं बंदोबस्तासाठी उपस्थित असलेले पोलीस हे सर्व उघड्या डोळ्यांनी बघत होते.

पण त्यांनी या कोणत्याही प्रकाराला विरोध केला नाही. नंतर तोंडदेखला विरोध करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यामुळे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांनीच दीप सिद्धूला तेथून पळवून लावलं. या सर्व घटनांच्या व्हिडिओ क्लिप प्रसिद्ध झाल्या आहेत. सिद्धूने आपण हा झेंडा लावला असल्याची व कोणतीही चूक केली नसल्याची कबुली फेसबुकवर दिली आहे. लाल किल्ल्यावर इतका कडेकोट बंदोबस्त असतानाही दीप सिद्धूचं टोळकं आत कसं काय घुसू शकलं? तो धार्मिक झेंडा लावत असतानाही पोलिसांनी प्रतिबंध का केला नाही? पोलीस सशस्त्र असतानाही ते तेथून पळून का गेले? तिथं उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांनी काढलेल्या व्हिडीओ क्लिप उपलब्ध आहेत, पण त्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्‍याचं फुटेज उपलब्ध का नाही? असे काही प्रश्न आहेत.

इथं हेही ध्यानात ठेवलं पाहिजे की, शेतकरी संघटनांचा लाल किल्ल्यावर झेंडा लावण्याचा कोणताही पूर्वनियोजित कार्यक्रम ठरलेला नव्हता. परंतु हा झेंडा जणू काही शेतकरी संघटनांनीच लावला आहे, असा भास ‘गोदी मीडिया’नं तयार केला. त्यामुळे जे या आंदोलनाचे सुरुवातीपासूनच विरोधक आहेत, त्यांनी काहूर माजवण्याचा प्रयत्न केला. त्यात अशा संधीची वाट पाहत असलेल्या ‘गोदी मीडिया’नं आगीत तेल ओतलं.

परिणामी जे या आंदोलनाचे सहानुभूतीदार होते, त्यांना काही समजेनासं झालं. नंतर शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी या सर्व घटनेचा निषेधच केला आहे आणि या कृतीला पोलीस यंत्रणा व खुद्द सरकार जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. आमचा झेंडा लावण्याचा कोणताही कार्यक्रम नव्हता, हेही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. ज्यांनी हे कृत्य केलं आहे त्यांची ओळख पटवून त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करावी, अशीही मागणी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन केली आहे. पण त्याची दखल न घेता सरकारने या सर्व शेतकरी पुढार्‍यांवर देशद्रोहापासून गंभीर गुन्ह्यांचे इतर अनेक खटले दाखल केले आहेत.

खरं म्हणजे विरोधक व ‘गोदी मीडिया’ सांगत आहेत, तितकं काही अघटित घडलेलं नाही. लाल किल्ला देशाची शान आहे, हे सर्वांनाच मान्य आहे. खरं म्हणजे या किल्ल्यावरील झेंड्याचं निमित्त करून शेतकरी आंदोलन कसं मोडून काढता येईल, यासाठी चाललेली ही कोल्हेकुई आहे, हे ध्यानात घेणं गरजेचं आहे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

आता २८ जानेवारीच्या घटनेबद्दल. ‘गोदी मीडिया’नं वरील घटनेबद्दल केलेल्या अपप्रचाराच्या माऱ्यामुळे असेल किंवा गेले दोन महिने सतत दिल्लीच्या सीमेवर राहिल्याने थकल्यामुळे असेल किंवा मग गावाकडे जाऊन, थोडे रिलॅक्स होऊन पुन्हा परत येऊ या विचारांमुळे असेल, पण विविध सीमांवर थांबलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या गावा-घराकडे वाटचाल सुरू केली होती. त्यामुळे सरकार व ‘गोदी मीडिया’ने ही हे आंदोलन उधळून लावण्यासाठी आलेली नामी संधी आहे, असं समजून त्यांनी ‘आता हे आंदोलन संपलं आहे’ असा प्रचाराचा धूमधडाका सुरू केला.

तर दुसरीकडे सरकारने त्यांची संपूर्ण पोलीस यंत्रणा, सीआरपी, रॅपिड अॅक्शन फोर्स, दंगा विरोधी पथकं, लाठ्या-काठ्या, हेल्मेट, दगड प्रूफ जॅकेट, पाण्याचे फवारे व इतर गाड्या, व्हॅन इत्यादी साधनसामग्री गाजीपूरसह सर्वच सीमांवर वाढवली होती. आंदोलनातील वयोवृद्ध, लहान मुलं-मुली व महिला यांच्यावर दहशत बसावी व मानसिक दबाव यावा म्हणून सशस्त्र संचलन (मॉक ड्रिल) केलं.

या आंदोलकांना होणारा पाणीपुरवठा व वीजपुरवठा तोडण्यात आला. लंगर बंद करण्यास सांगण्यात आलं. आंदोलनाच्या नेत्यांना आंदोलन स्थळ खाली करण्यास सांगण्यात आलं. विविध गुन्ह्यांच्या नोटिशी त्यांच्यासह इतर आंदोलक-नेत्यांवर बजावण्यात आल्या. या सर्व वातावरणाचा परिणाम कोणाही होणारच, तसा तो राकेश टीकैत यांच्यावरसुद्धा झाला. म्हणून त्यांनी स्वतः व आपल्या काही निवडक सहकाऱ्यांसह अटक करवून घेण्याची मानसिक तयारी केली होती. काही क्षण त्यांनी तसं जाहीरही केलं होतं. परंतु त्यांच्या सहकार्‍यांकडून त्याच वेळी त्यांना असं समजलं की, त्या परिसरातील भाजपचे आमदार सुनील गुर्जर त्यांच्या काही गुंड सहकार्‍यांसह, पोलीस प्रशासनाशी संगनमत करून लाठ्याकाठ्या घेऊन येत आहेत व आपल्या शेतकऱ्यांना मारहाण करणार आहेत, असा निरोप मिळाला. (याबाबतचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.)

त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांची होणारी संभाव्य दशा पाहून राकेश टीकैत यांना गहिवरून आलं. अटक करून घेण्याचा आपला मानस त्यांनी ताबडतोब फिरवला आणि ‘मी अटक करून घेणार नाही. या जागेवरून हटणार नाही. आंदोलन मागे घेणार नाही. ते यशस्वी झालं नाही तर मी इथंच फाशी घेईल. माझ्या गावावरून ट्रॅक्टर व पाणी आल्याशिवाय मी पाणीही पिणार नाही. वाटल्यास या सरकारने मला गोळ्या घालून इथंच ठार मारावं,’ अशी वक्तव्यं त्याच विचारमंचावरून केली. हे सर्व फुटेज आनंदानं व्याकूळ झालेला ‘गोदी मीडिया’ त्यांच्या चॅनेलवरून दाखवत होता. हे फुटेज सोशल मीडियावरूनही व्हायरल झालं. ही दृश्यं गावोगावच्या, खेडोपाड्याच्या शेतकऱ्यांनी पाहिलं आणि परत गेलेल्या शेतकऱ्यांबरोबरच उरलेले शेतकरीही आंदोलन स्थळाकडे रात्रीतूनच रवाना होण्याला सुरुवात झाली. दिवसभरात हजारो शेतकरी पुन्हा विविध सीमांवर जमा झाले.

अनेक युद्धांत व चळवळींत काही ‘टर्निंग पॉइंट’ आलेले आहेत. त्यांनी इतिहासाला वेगळीच कलाटणी दिली आहे. शेतकरी आंदोलनातला हाही एक ऐतिहासिक ‘टर्निंग पॉइंट’च ठरला आहे. त्यामुळे ‘आता शेतकरी आंदोलन संपलं आहे’ असे मनातल्या मनात मांडे खाणाऱ्यांचा विचार त्यांच्या मनातच जिरला.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

या सर्व घटनावरून मला कॉम्रेड माओ त्से तुंग यांची खऱ्या कार्यकर्त्याबद्दलची व्याख्या उदधृत करण्याचा मोह आवरत नाही. त्यांनाही त्यांच्या चळवळीच्या चढ-उताराचा बराच अनुभव आलेला होता. त्यावरून त्यांनी त्यांच्या खऱ्या कार्यकर्त्यांची व्याख्या केली होती. ती अशी ‘आपल्यापेक्षाही कित्येक पटींनी तुल्यबळ असलेल्या शत्रूसमोर अजिबात न डगमगता, त्याच्या नजरेला नजर भिडवून, छाती काढून व जमिनीत घट्ट पाय रोवून, जो शत्रूशी मुकाबला करतो पण जो आपल्या कष्टकरी बांधवासमोर मात्र नतमस्तक होतो, तोच खरा कार्यकर्ता होय.’

ही व्याख्या शेतकऱ्यांचे पुढारी राकेश टीकैत व त्यांच्या हजारो कार्यकर्त्यांनी सार्थ करून दाखवली आहे. या वेळी त्यांनी केलेल्या भाषणातील ‘चाहे मुझे गोली मार दो, मैं बॉर्डर खाली नही करूंगा. मैं घर नही जाऊंगा. मैं किसान हूँ और किसानही मेरा आत्मसन्मान है. जब तक मेरे गाव के ट्रॅक्टर और मेरे गाव का पानी यहा नहीं आयेगा, तब तक मैं पाणी नहीं पिऊंगा. मैं यहीं पर फाशी लगा लूंगा’ ही काही वाक्यं बराच काळ देशवासीयांच्या स्मरणात राहतील आणि शेतकरी कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देत राहतील.

..................................................................................................................................................................

लेखक कॉ. भीमराव बनसोड मार्क्सवादी कार्यकर्ते आहेत. 

bhimraobansod@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......