अजूनकाही
असे म्हणतात की, आपल्याकडे राजकारण, क्रिकेट आणि चित्रपट या विषयांवर कोणीही बोलू शकते. पण हे फारच सामान्यीकरण झाले. कारण या विषयांवर बोलायचे तर त्याबद्दल किमान काही माहिती तरी असावीच लागते. राजकारणाविषयी बोलायचे असेल, तर किमान रोजच्या वृत्तपत्रांतील बातम्यांचे मथळे तरी वाचावेच लागतात. क्रिकेट वा सिनेमा यावर बोलायचे झाले, तर दूरचित्रवाणी पडद्यावर का होईना, पण ते पाहावेच लागतात. कोणत्या नटीस कितवा महिना सुरू आहे, वगैरे प्रकारचे ज्ञान हे वृत्तपत्रांच्या पुरवण्यांतून वा वृत्तवाहिन्यांतून मिळवावे लागतेच. आपल्याकडे एक विषय मात्र असा आहे की, त्याबाबत काडीचेही वाचन नसले तरी चालते. तो विषय म्हणजे - महात्मा मोहनदास करमचंद गांधी.
प्राचीन ऋषीमुनींना ऋग्वेदातील ऋचा ‘दिसल्या’ होत्या म्हणतात. बहुधा आमच्या या आध्यात्मिक देशातील अनेकांना हा विषय असाच ‘दिसत’ असावा. त्यामुळे महात्मा गांधींविषयी थोडे तरी वाचन असावे, त्यांना समजून घ्यावे याची आवश्यकताच भासत नाही त्यांना. आणि तरीही ते गांधी या विषयात महाज्ञानी असतात, पंडित असतात. या तमाम हिंदूबंधूंना हे आधीच माहीत असते की, ‘आपल्या या पवित्र राष्ट्राची कोणी वाट लावली असेल, तर ती या गांधी नामक लुच्च्या, लबाड, बाईलवेड्या, मुस्लिमधार्जिण्या पापी म्हाताऱ्याने. फाळणीचा खरा गुन्हेगार कोण असेल, तर तो हाच बकरीचे दूध पिणारा आणि खजूर खाणारा पंचेवाला म्हातारा. याने देशाचे सर्व क्षात्रतेजच नाहीसे करून टाकले. आयुष्यभर सत्य आणि अहिंसा करत राहिला. त्या नावाखाली मुसलमानांना पाठीशी घालत राहिला. त्यामुळे नथुराम गोडसे नामक थोर देशभक्ताने त्याचा वध केला हे बरेच झाले.’
आता जर गांधी समजून न घेता एवढे समजत असेल, आणि शिवाय त्यामुळे आपण म्हणजे कसे शूर आणि वीर, धर्मप्रेमी आणि राष्ट्रभक्त असा समज करून घेता येत असेल, तर कोण कशाला गांधी काय म्हणतात हे वाचण्यास जाईल? तर वर्षानुवर्षे आपल्याकडे हे असेच चालत राहिले. वर्षानुवर्षे ही मंडळी गांधींविषयीचे विष आपल्याच काळजात घोळवत राहिले. गांधी जयंती आणि पुण्यतिथीला हमखास त्यांच्या मारेकऱ्याचा गौरव करत राहिले.
पण या देशात सगळेच काही गांधीविरोधी नव्हते. येथील बहुसंख्य तर गांधींना महात्मा आणि राष्ट्रपिता मानणारे होते. गांधीबाबा म्हणणारे होते. याचा अर्थ ते गांधीवादी होते का, तर तसे अजिबात नाही. किंबहुना त्यातील अनेकांना गांधी पूर्णपणे कधीही मान्य नव्हते. गांधी आणि त्यांचा विचार अगदी थोडासाही मान्य करायचा, तर त्यासाठी पुन्हा हवा असतो तो अभ्यास. त्यासाठी वाचन असावे लागते. अडाणी आणि अर्धशिक्षित मंडळी त्या वाटेला जाण्याची शक्यता नाही. उरले ते सुशिक्षित. त्यांतील अनेकांना ग्रंथवाचन अडाणीपणाचे वाटत असते. त्यामुळे तेही गांधीविचार मुळातून समजून घेण्याच्या फंदात पडत नाहीत.
..................................................................................................................................................................
हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये खरेदीसाठी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5282/Hasanyawari-Neu-Naka
.................................................................................................................................................................
असे असले तरी त्यांचे गांधींवर प्रेम असते. याचे कारण त्यांना गांधींमध्ये संत दिसतो. सत्य आणि अहिंसा या दोन तत्त्वांना देव मानणारा, खऱ्या अर्थाने धार्मिक असलेला महान आत्मा म्हणजे गांधी हे त्यांना कळत असते. इंग्रजांसारख्या बलाढ्य शत्रूसमोर तुमचे ते गावठी कट्टे आणि बॉम्ब घेऊन लढता येत नसते. इंग्रजांशी हिंसक लढा देण्याचा एक प्रयोग या देशात एकदा होऊन गेला होता. १८५७ साली येथील संस्थानिकांनी आणि इंग्रजांच्या लष्करातील काही बंडखोर सैनिकांनी युद्ध पुकारले होते ईस्ट इंडिया कंपनीशी. स्वातंत्र्ययुद्धच ते. पण ते फसले. त्यानंतर तर सामना होता थेट इंग्रज सत्तेशीच. तेथे कोणाचा काय पाडाव लागणार? गुलाम देश. जनता निष्प्रभ, निस्तेज आणि निर्धन. पूर्वसत्ताधारी उच्च वर्ग इंग्रज साम्राज्यशहांच्या पायाशी बसलेला. अशा परिस्थितीत मॅझिनी वगैरेंच्या चरित्राचे कितीही पारायण केले, तरी सशस्त्र बंड कसे करणार? बॉम्ब वगैरे फोडून सत्तेला त्रास देता येतो इतकेच.
अशा वेळी हा गांधी नावाचा माणूस उभा राहिला. तो बलदंड नव्हता. त्याला चार हात नव्हते. त्या हातांत सुदर्शन चक्र, धनुष्यबाण, परशू अशी शस्त्रे नव्हती. बंदुका आणि रणगाड्यांच्या समोर त्याने अहिंसा, प्रेम, सत्याग्रह आणि चरखा हे उभे केले आणि युद्ध जिंकले, ‘रणाविना स्वातंत्र्य’ मिळवले. या विजयाचा अर्थ भारताला स्वातंत्र्य मिळाले एवढ्यापुरताच मर्यादीत नाही. येथील सामान्य जनतेला त्याने आत्मबळ दिले. हे सारे सारे येथील गांधीप्रेमी बहुसंख्यांना समजत होते. जगभरातील विचारी जन या गांधींचा आजही गौरव करतात, हेही त्याला दिसत होते. त्यांना एवढेच कळत नव्हते की, तरीही या देशातील काही लोकांच्या मनात गांधींबद्दलचा विखार एवढा का भरलेला आहे? कोण करत आहेत येथे गांधीविरोधी विषाची पेरणी?
मोठा महत्त्वाचा प्रश्न आहे हा. भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास आणि त्याबरोबर गांधी चरित्र वाचले की, त्याचे उत्तर मिळत जाते. त्याची व्यवस्थित मांडणी करण्याचे काही प्रयत्न यापूर्वी झाले आहेत. मराठीत नरहर कुरुंदकर यांचे काही लेख, जगन फडणीस यांचे ‘महात्म्याची अखेर’ ही त्याची छान उदाहरणे. त्याचीच पुढची, अधिक विस्तारित कडी म्हणजे चंद्रकांत वानखडे यांचे ‘गांधी का मरत नाही’ हे पुस्तक.
वानखडे हे विदर्भातील झुंजार सामाजिक कार्यकर्ते. गांधीविचारस्नेही, पुढे जेपींचे आंदोलन, आणीबाणीविरोधी लढा, मग शेतमजुरांत काम असा मोठा प्रवास आहे त्यांचा. ‘आपुला चि वाद आपणांसी’ हे त्यांचे गाजलेले आत्मकथन. आताचे ‘गांधी का मरत नाही’ हे पुस्तकही गाजत आहे. त्याचे एक कारण म्हणजे हे केवळ पुस्तक नाही. तो त्यांचा खेदखंतयुक्त संताप आहे. वयाची पहिली बारा-चौदा वर्षे महात्मा गांधी हे आदराचे स्थान असलेल्या वानखडे यांना आठवीत शिक्षणासाठी अमरावतीला यावे लागले. आजोबांनी त्यांना तेथील संघाच्या शाळेत घातले. तेथील वातावरण वेगळे. गांधींविषयीच्या तिरस्काराने, तुच्छतेने भरलेले. जबर धक्का देणारे वातावरण होते ते. गांधींविरोधी प्रोपगंडाशी ओळख होण्याची त्यांची ती पहिली वेळ. असे का, हा तेव्हाचा त्यांचा प्रश्न होता. तेव्हा गांधींविषयी वाचन नव्हते. त्यांच्यावरील खोट्या आरोपांना, त्यांच्यावर लादण्यात आलेल्या लांच्छनांना उत्तर देण्याइतका अभ्यास नव्हता. पुढे ते जसजसे वाचत गेले, गांधींना अभ्यासत गेले, तसतसे गांधी समजत गेले आणि त्यातूनच त्यांच्या लक्षात आले की गांधींची हत्या का झाली, ती करणारी प्रवृत्ती कोणती आहे आणि आजही गांधीविरोधी गरळ ओकणारे लोक कोण आहेत?
ते आहेत ‘कुजबूज क्लाऊड’वाले.
ते होते आणि आहेत मूठभरच. पण अगदी व्रतस्थपणे त्यांनी या देशात गांधीविरोधी विखार पेरला. त्यांचा बौद्धिक नावाचा एक प्रकार असतो. मेंदूंच्या ‘रेजिमेन्टीकरणा’चा तो उत्तम मार्ग. तर त्या बौद्धिकांतून, शाखांवरच्या पांचट विनोदांतून त्यांनी गांधीविरोधी संस्कार रुजविला. भाषणे, चर्चासत्रे होतीच. त्यांतून लोकांच्या मनांवर गांधींविषयीच्या तिरस्काराची फवारणी करण्यात येत होतीच. आता त्यांच्या साह्याला समाज माध्यमे आहेत. तेथे स्वैराचाराला मर्यादाच नाही. या माध्यमांचा वापर या मंडळींनी मोठ्या चलाखीने करून घेतला आणि गांधीविरोधी प्रोपगंडा आणखी उंचावर नेला.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
समाजात वावरत असताना वानखडे यांना हा गांधीविरोधी प्रोपगंडा पदोपदी दिसत होता. अशा वेळी त्यांच्या अंगातील लढाऊ बाणा गप्प राहू देणारा नव्हता. ते बोलायचे. मुद्दे मांडायचे. चर्चा करायचे. आणि मग ऐकणारा म्हणायचा, की ही सारी मांडणी नवीच आहे आमच्यासाठी. आणि ते खरेच आहे. गांधींची टिंगल टवाळी ऐकतच मोठे झालेल्या अनेकांना या टिंगल टवाळीमागचे मेंदू नेमके कोणाचे आहेत हे समजलेच नाही. गांधीविरोधामागचे नेमके राजकारण कोणते आहे, हे कळालेच नाही. वानखडे यांनी नेमके त्याच्यावरच बोट ठेवले आहे. त्यांनी हे थेटपणे मांडले आहे की, या देशातील उच्च वर्णीयांच्या सत्ताकारणाला गांधींनी जो जबर टोला दिला, त्याचीच प्रतिक्रिया म्हणजे गांधींची हत्या आणि ‘कुजबूज क्लाऊड’जन्य प्रोपगंडा.
गांधींचे अहिंसा, ब्रह्मचर्य यांबाबतचे विचार, त्यांचे धर्मविषयक तत्त्वज्ञान, त्यांची सामान्य राहणी यांची अत्यंत विकृत मांडणी करण्यात आली आहे. गांधींमुळे फाळणी झाली, त्यांनी मुस्लिमांचा अनुनय केला, ते जातीयवादी होते, येथपासून तर त्यांनी सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावर अन्याय केला, शहीद भगतसिंग यांना फासावर लटकू दिले येथपर्यंत अनेक आरोप त्यांच्यावर करण्यात आले आहेत. अपमाहिती, असत्य यांनी बरबटलेले असे हे सारे आरोप. अखेर प्रोपगंडाच तो. वानखडे यांनी त्या एकेका आरोपाचा या पुस्तकात धुव्वा उडवला आहे. गांधींचे सत्याग्रही लढे म्हणजे माजघरात बसून क्रांतीची दिवास्वप्ने पाहणाऱ्यांच्या लेखी टिंगलीचे विषय. मिठाच्या सत्याग्रहाची घोषणा होताच अनेक जण हसले होते त्याला. गांधींचे ते लढे किती मोठे आणि महत्त्वाचे होते, त्यांतील नाट्य किती प्रखर होते, हे वानखडे यांनी येथे तेवढ्याच नाट्यमयतेने मांडले आहे. ते सारेच मुळातून वाचावे असे. येथे त्यांच्या कामी जेवढा त्यांचा अभ्यास आला आहे, तेवढीच शैलीही.
गांधीजी अतिशय सोपे पण अर्थगर्भ बोलायचे. साधे-सोपे म्हणजे थिल्लर नव्हे. वस्तुतः साधे-सोपेपणा येतो, तोच मुळी विषयाचा अभ्यास, आणि वैचारिक खोलीतून. तोच सोपपणा या पुस्तकात उतरला आहे. भाषा अत्यंत प्रवाही आहे, गप्पा मारल्यासारखी. म्हणून मनाला भिडणारी. एक मात्र नोंदवायला हवे, की या भाषेत खोटे सौजन्य नाही. वैदर्भिय मोकळेपणा, रांगडेपणा आणि आक्रमकता हे सारे गुण लेखकाच्या भाषेत उतरलेले आहेतच, शिवाय त्यात विनोदबुद्धीची - सेन्स ऑफ ह्युमरची - पखरणही आहे. त्यामुळेच गांधींची सुंदरशी ‘बनियागिरी’ मोठ्या मिश्किलपणे ती मांडते.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
हे सारे वाचत असताना वानखडे यांच्या मनातील खंतयुक्त संताप मात्र सतत पार्श्वभूमीवर जाणवत राहतो. गांधींवरील सर्व आरोप भरभक्कम युक्तीवाद आणि तथ्ये या शस्त्रांनी गारद करणाऱ्या या पुस्तकाच्या अखेरीस ते म्हणतात -
‘‘गांधींच्या बाबतीत दुर्दैव एवढंच आहे की, ज्यांच्यासाठी त्यांनी आयुष्य झिजवलं, त्यांना त्याची तेवढी तीव्र जाण नाही. पण त्यांच्या (म्हणजे गांधींच्या) नेतृत्त्वात झालेल्या स्वातंत्र्य आंदोलनात गांधींनी ज्यांच्या हितसंबंधांना एक कायमची जी पाचर ठोकली आहे, त्यांना त्याची तीव्र जाणीव आहे. अशा अवस्थेत गांधींवर होणारे आरोप त्वेषाने हातात आणि त्याचा होणारा प्रतिवाद तेवढाच उदासीन असतो…’’
ही उदासीनता असण्याचे एक कारण हेही असावे की, गांधींबद्दल मनात स्नेहभावना असणाऱ्यांचेही गांधींबाबतचे वाचन कमी असते. त्यामुळे त्या आरोपांना कसे भिडावे हे त्यांना समजत नसते. शिवाय या विषयीच्या सोप्या सामग्रीचाही दुष्काळच आहे. दुसरीकडे गांधीविरोधी प्रोपगंडा मात्र पद्धतशीरपणे पसरवला जात आहे. समाजमनातील ‘हिरो’च्या कल्पना, हिंसेची आदीम ओढ, धर्म संकल्पनेविषयीचा गोंधळ आणि समाजकारणाबद्दलचे प्रगाढ अज्ञान आदी विविध कारणांमुळे हा प्रोपगंडा सहजपणे स्वीकारलाही जातो. चंद्रकांत वानखडे यांचे ‘गांधी का मरत नाही’ हे पुस्तक मात्र या प्रोपगंडावरचा प्रभावी उतारा आहे. विद्वेषाच्या महामारीतून स्वतःला वाचवण्यासाठी तो घ्यायलाच हवा.
..................................................................................................................................................................
‘गांधी का मरत नाही’ - चंद्रकांत वानखडे, मनोविकास प्रकाशन, पुणे
पाने - १६८, मूल्य - १८० रुपये.
..................................................................................................................................................................
लेखक रवि आमले दै. ‘सकाळ’ (मुंबई)चे निवासी संपादक आहेत.
ravi.amale@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment