अजूनकाही
१. मुंबई महापालिकेतील पारदर्शी आणि स्वच्छ कारभारावरून शिवसेनेने भाजपला टोमणा लगावला आहे. पारदर्शी कारभाराचा कोंबडा भाजपने कितीही झाकायचा प्रयत्न केला तरी सूर्य उगवला आहे. आम्ही पारदर्शक आहोत, पण तुम्ही आहात का, असा सवालच शिवसेनेने भाजपला विचारला आहे. बोबड्या माफियांवर अंगठा चोखत बसण्याची वेळ आली अशा शब्दांत सेनेने किरीट सोमय्या यांचे नाव न घेता भाजपला चिमटा काढला आहे.
भाजपने स्वहस्ते तोंड फोडून घेतलं आहे, हे खरंच आहे. पण, मुंबई ही पारदर्शकतेत ‘२१ वाईट महानगरपालिकांमधली सर्वांत कमी वाईट महानगरपालिका’ ठरली आहे. त्यात या महापालिकेकडे असलेल्या प्रचंड साधनसामग्रीचाच मोठा वाटा आहे, असं हे सर्वेक्षण करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेनेच म्हटलेलं आहे. ही काही फार फुशारून जाण्यायोग्य कामगिरी नाही. बाकी शारीरिक व्यंगावरून टीका करण्याचा 'बालि'श वारसा पुढे चालू आहे, त्यात काही नवल नाही.
………………………….
२. राजकीय नेते पोलीस संरक्षणाचे पैसे देत नसतील तर त्यांच्या पक्षाकडून ते वसूल करा. पोलीस दल सर्वसामान्यांसाठी आहे. मात्र राज्य सरकारला वाढत्या गुन्हेगारीपेक्षा धनाढ्यांचे संरक्षण त्यांना महत्त्वाचे वाटत असेल तर तशी स्वतंत्र यंत्रणाच सुरू करावी, पण सर्वसामान्यांना वेठीस धरू नये, असा खोचक सल्ला मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला दिला आहे.
पोलिस दल हे सर्वसामान्यांसाठी आहे, राजकीय नेत्यांनी पोलिस संरक्षणाचे पैसे द्यायचे असतात, धनाढ्यांच्या संरक्षणापेक्षा गुन्हेगारीला आळा घालणं हे पोलिसांचं काम आहे, हे उच्च न्यायालयाचे गैरसमज नेमके कशामुळे झाले आहेत, याची आधी उच्चस्तरीय चौकशी करायला हवी राज्य सरकारने. तिचे निष्कर्ष हातात येईपर्यंत न्यायाधीशांचं पोलिस संरक्षण काढलं तर कसं होईल?
………………………….
३. राजस्थानमध्ये जयगढ किल्ल्यात दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना ‘पद्मावती’ सिनेमाच्या झालेल्या मारहाणीबद्दल अभिनेता अन्नू कपूर म्हणाला, ‘इतिहासाच्या नावाखाली प्रणयदृश्य दाखवणे कितपत योग्य आहे? सिनेमा निर्मात्यांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी पैगंबर मोहम्मद यांच्यावर सिनेमा बनवून दाखवावा.’
याच मुलाखतीत अन्नूने सांगितलंय की, आयएएस होण्याऐवजी कौटुंबिक समस्यांमुळे तो अभिनयाकडे वळला. त्याला बळजबरीने अभिनय करावा लागला. पैशांच्या अभावी त्याने काही अॅडल्ट सिनेमेही केले आहेत. थोडक्यात, या प्रकरणावर मत व्यक्त करण्यासाठी जो 'संस्कारी'पणा आवश्यक आहे, तो त्याच्यात पुरेपूर आहे. बाकी, भन्साळी यांच्या सिनेमात असं काही प्रणयदृश्य नाही; पद्मिनी ही ऐतिहासिक व्यक्ती नाही; इतिहासात प्रणय झालाच नसता, तर हे कपूर महोदयही जन्माला आले नसते; मोहम्मद पैगंबरांवर माजिद मजिदी यांनी आधीच सिनेमा काढला आहे आणि त्याला संगीत दिल्याबद्दल ए. आर. रहमानवर फतवाही निघाला आहे, यातलं काही अन्नूच्या गावीही नाही, यातही काही नवल नाही म्हणा.
………………………….
४. चतुर व्यावसायिक शिक्षणसम्राटांनी शुल्क आणि देणग्या घेण्यावर कोणतंही नियंत्रण ठेवलं नसल्याने जगज्जेत्या अलेक्झांडरच्या पराक्रमाला लाजवेल असा केवळ इंग्रजी शिक्षणाच्या साम्राज्याचा वैभवशाली विस्तार झाला आहे. त्यांच्या पंचतारांकित शाळा आणि महाविद्यालयासमोर आज आमच्या मराठी शाळा भिकारणीसारख्या आसवं गाळीत बसल्या आहेत, असं प्रतिपादन संमेलनाध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांनी केलं.
डॉक्टरसाहेब, नका फार मनाला लावून घेऊ. जिथं काही हजार मतदार मिळून कोट्यवधींच्या महाराष्ट्राचं अखिल भारतीय संमेलन भरवतात, मराठीचा घोष करणारे याच इंग्रजी शाळांमध्ये मुलांना पाठवतात, अशा मोठेपणाच्या निव्वळ बाता मारण्याचा छंद जडलेल्या कुपुत्रांकडून त्या भाषामाऊलीनेही आता कसली अपेक्षा ठेवली नसेल!
……………………………….
५. आजची हिंदू संस्कृती ही माझी नाही. माझी हिंदू संस्कृती आता दिसतच नाही. ती नाहीशी झाली आहे. आजची हिंदू संस्कृती ही जगातील सर्वाधिक भ्रष्ट संस्कृती आहे. मुस्लिमांचीही आधीची संस्कृती आता उरलेली नाही. आज जी मुस्लिम संस्कृती आहे ती केवळ भयंकर आहे. : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख वक्ते, ज्येष्ठ हिंदी कवी विष्णू खरे
हे एक बेस केलंत विष्णूजी! तुम्ही हिंदूंवर टीका करताना जोवर मुसलमान धर्मावर टीका करत नाही, तोवर तुम्ही पुरोगामी नाहीत, असं आपले थोर धर्मबांधव मानतात. आता तुम्ही समतोल विचाराचे आहात, असं सर्टिफिकेट संपूर्णतया असमतोल विचारांच्या धर्मांधांकडून मिळायला हरकत नाही. 'फुर्रोगामी' ठरण्यापासून वाचल्याबद्दल अभिनंदन.
……………………………………….
editor@aksharnama.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment