राजीव रवी : चित्रपटातून वास्तववादाच्या नावाखाली रोमॅण्टीसिझम न दाखवणारा दिग्दर्शक
कला-संस्कृती - चलत्-चित्र
संतोष पाठारे
  • राजीव रवी आणि त्यांनी तीन चित्रपटांची पोस्टर्स
  • Sat , 30 January 2021
  • कला-संस्कृती चलत्-चित्र राजीव रवी Rajeev Ravi अन्नायूम रसुलम Annayum Rasoolum न्जान स्टीव्ह लोपेझ Njan Steve Lopez कम्मटी पादम Kammatti Paadam दुलकर सलमान Dulquer Salman फहाद फाझील Fahadh Faasil

भारतीय पातळीवरील प्रयोगशील दिग्दर्शकांची ओळख करून देणारं हे मासिक सदर दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी प्रकाशित होईल...

..................................................................................................................................................................

“दिग्दर्शकानं त्याच्या खांद्यावर बसलेलं पटकथेचं भूत मागे टाकून दृश्यात्मकतेचा विचार करायला हवा… दिग्दर्शकानं लिखित शब्दांची नव्हे तर सिनेमाची भाषा बोलायला हवी’’, असं धाडसी विधान करून ते आपल्या चित्रपटांतून प्रत्यक्षात उतरवणारे राजीव रवी हे एक समकालीन महत्त्वाचे दिग्दर्शक आहेत.

गेल्या दोन दशकांमध्ये भारतीय सिनेमाची भाषा बदल्यासाठी जे जाणीवपूर्वक प्रयत्न केले गेले, त्यात राजीव रवींचा सक्रीय सहभाग आहे. अवास्तव, अतिरंजित कथानाकांपासून फारकत घेत वास्तववादी तरीही रंजन मूल्य असणाऱ्या चित्रपट निर्मितीची सुरुवात या शतकाच्या सुरुवातीला झाली. मल्टिप्लेक्सच्या उभारणीमुळे प्रेक्षकांच्या मानसिकतेमध्ये झालेला बदल, मुख्य शहरांमध्ये सुरू झालेले फिल्म फेस्टिवल, इंटरनेटच्या सुविधेमुळे घरबसल्या सिनेमा डाऊनलोड करण्याची झालेली सोय, या सगळ्याचा परिणाम असा प्रयोगशील सिनेमा अधिक प्रेक्षकांपर्यंत पोहचण्यावर झाला. २००१ साली प्रदर्शित झालेल्या मधुर भांडारकर यांच्या ‘चांदनी बार’मध्ये व्यावसायिक आणि कलात्मक हे दोन्ही घटक मौजूद होते.

‘फिल्म्स अँड टेलीव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’मधून प्रकाशचित्रणाचं प्रशिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या राजीव रवी यांना ‘चांदनी बार’चं प्रकाशचित्रण करण्याची संधी मिळाली. बारमध्ये नाच करून आपल्या कुटुंबाचं पोषण करणाऱ्या एका स्त्रीच्या आयुष्याची फरपट दाखवणाऱ्या ‘चांदनी बार’मधील वास्तव मध्यमवर्गीय प्रेक्षकांच्या कल्पनेपलीकडचं होतं. आजवर हिंदी चित्रपटातून दाखवले गेलेले कोठे, वेश्यांच्या वस्त्या आणि वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांच्या दर्दभऱ्या कहाण्या यापेक्षा हे जग वेगळं होतं, अधिक अस्वस्थ करणार होतं. या जगाचा वास्तव वेध घेण्यात राजीव रवींच्या कॅमेराचा सहभाग मोलाचा होता.

राजीव रवींच्या प्रकाशचित्रणाचे सामर्थ्य अनुराग कश्यपने अचूक हेरलं. हिंदी चित्रपटसृष्टीत व्यावसायिक प्रयोग करणाऱ्या अनुराग कश्यपच्या प्रत्येक चित्रपटात राजीव रवींचा कॅमेरा सोबतीस होता. आधुनिक जगातील देवदासची शोकांतिका चितारणारा ‘देव डी’, न्वार शैलीतील थ्रिलर ‘नो स्मोकिंग’, शिक्षणक्षेत्रातील राजकारणाचा बीभत्स चेहरा उघड करणारा ‘गुलाल’ आणि धनबादमधील कोळसा माफियांचं रक्तरंजित चित्रण करणारा ‘गँग्स ऑफ वासेपूर’, या चित्रपटांनी अनुराग कश्यपला दिग्दर्शक म्हणून जी ओळख निर्माण करून दिली, त्याचं श्रेय राजीव रवींच्या प्रकाशचित्रणालासुद्धा द्यायला हवं.

..................................................................................................................................................................

आंबेडकरांना सहन करावा लागलेला विकृत व अविचारी वैरभाव या व्यंगचित्रांमधून उघड होतो. त्याचबरोबर ऐतिहासिक अन्याय सहन केलेल्या आंबेडकरांचं वास्तविक चरित्रही उजेडात येतं.

हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये खरेदीसाठी करण्यासाठी क्लिक करा - 

https://www.booksnama.com/book/5282/Hasanyawari-Neu-Naka

..................................................................................................................................................................

या प्रत्येक चित्रपटातील दृश्यरचना त्या कथांचा मूड आणि प्रवाह याला सुसंगत अशी होती. ‘सिनेमाचा कॅमेरा हा स्थिरचित्रण करणाऱ्या कॅमेऱ्यापेक्षा वेगळाच असणार. प्रकाशचित्रणकारानं कॅमेराचा उपयोग दृश्यचौकट सुंदर करण्यापेक्षा कथेचा आशय परिपूर्ण करण्यासाठी करायला हवा’, यावर राजीव रवींचा ठाम विश्वास आहे. ‘उडता पंजाब’ (दिग्दर्शक-अभिषेक चौबे), ‘व्हायरस’ (मलयालम, दिग्दर्शक आशिक अबू) हे चित्रपट पाहताना त्यांच्या या विधानाचा प्रत्यय येतो. या दोन्ही चित्रपटात दाखवलं गेलेलं भीषण वास्तव त्यातील प्रत्येक प्रसंगातून अंगावर येतं. गडद प्रकाशयोजना, अस्थिर कॅमेरा आणि क्लोजअपचा वापर, ही राजीव रवींच्या प्रकाशचित्रणाची काही वैशिष्ट्यं!

हिंदीतील अत्यंत महत्त्वाच्या चित्रपटांचं प्रकाशचित्रण करणाऱ्या, लायर्स डायस (दिग्दर्शिका–गीतू मोहनदास) या चित्रपटाच्या प्रकाशचित्रणासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या राजीव रवी यांनी स्वतंत्रपणे चित्रपट दिग्दर्शन करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्यांनी आपल्या मातृभाषेला प्राधान्य दिलं. कम्युनिस्ट पार्टीचे सदस्य असलेल्या त्यांच्या वडिलांनी त्यांना लहानपणी रशियन, लॅटिन अमेरिकन साहित्य वाचण्याची गोडी लावली होती. चित्रपट नव्हे तर साहित्य हेच माझं प्रेरणा स्थान आहे, असं मानणाऱ्या राजीव रवींनी त्यांच्या थोरल्या भावाच्या प्रोत्साहनामुळे पुण्याच्या ‘फिल्म्स अँड टेलीव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’मध्ये प्रकाशचित्रणाच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. या प्रशिक्षणादरम्यान त्यांना अभ्यासाचा भाग म्हणून त्यांचे शिक्षक भाजी मंडई, मार्केट, पुण्याच्या आसपासची खेडी अशा ठिकाणी निरीक्षणासाठी पाठवतं. या निमित्तानं त्यांना समाजातील सामान्य लोकांच्या जीवनशैलीशी जवळून परिचय झाला, जो त्यांच्या चित्रपटांच्या शूटिंगदरम्यान कामी आला.

हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी प्रकाशचित्रणकार म्हणून यश मिळवलं. हिंदीत त्यांनी केलेले सगळेच चित्रपट व्यावसायिक तरीही प्रयोगशील होते, वास्तववादी शैलीतील होते. आपल्या भाषेतसुद्धा ही प्रयोगशीलता आणावी या उद्देशानं त्यांनी मल्याळम चित्रपट दिग्दर्शित करण्याचा निर्णय घेतला आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे दिग्दर्शनाच्या कामाला १०० टक्के न्याय देता यावा म्हणून  त्यांच्या चित्रपटाच्या प्रकाशचित्रणाची जबाबदारी मधु निलकंदन या आपल्या सहकाऱ्याकडे सोपवली.

कल्पित कथानकापेक्षा वास्तव आयुष्यातील नाट्य अधिक परिणामकारक असतं, हे नाट्य पडद्यावर आणण्यासाठी राजीव रवींनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. त्यांची जडणघडण ज्या गावात झाली तिथली माणसं, त्याचं संघर्षमय जीवन, त्यांच्या जीवनविषयक धारणा आणि समकालीन घटनांकडे आजच्या तरुण वर्गाचा असलेला दृष्टीकोन, त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘अन्नायूम रसुलम’ (२०१३), ‘न्जान स्टीव्ह लोपेझ’ (२०१४) आणि ‘कम्मटी पादम’ (२०१६) या चित्रपटांतून स्पष्टपणे अधोरेखित झालेला दिसतो.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

त्यांच्या चित्रपटातील व्यक्तिरेखा सामान्य कुटुंबातील आहेत. त्यांना रोजच्या जगण्यासाठी करावा लागणारा संघर्ष, त्यांच्या वासना, विकार, प्रेम, लोभ आणि सामान्य जीवन जगताना काही अकल्पित घटनांमुळे त्यांच्या आयुष्याला मिळालेली कलाटणी याचं तटस्थ चित्रण राजीव रवी करतात. त्यांच्यावर असलेला त्यांनी चित्रित केलेल्या हिंदी चित्रपटांच्या शैलीचा प्रभाव काही दृश्यातून जाणवतो. मुंबई शहराबरोबर जोडले गेलेले त्यांचे ऋणानुबंधसुद्धा काही प्रसंगी जाणवतात. केरळ राज्यातील कोची, तिरुअनंतपुरम् या गावात राहणारी, छोटामोठा व्यवसाय करणारी त्यांची पात्रं आयुष्याकडून फार काही अपेक्षा ठेवत नाहीत. पण आपल्या समाजात असलेली जातीव्यवस्था, श्रीमंत-गरीब यामधील दरी राजीव रवींच्या कथानायकांना एका तिढ्यावर आणून उभं करते.

‘अन्नायूम रसुलम’ ही गोष्ट आहे कोचीतील मत्तनचेरी भागात टॅक्सी चालवणाऱ्या रसूल (फहाद फाझील) आणि अ‍ॅना या कपड्यांच्या दुकानात सेल्स गर्लचं काम करणाऱ्या मुलीची! अ‍ॅनाला भेटण्याआधीच रसूलचं आयुष्य बेबंद असतं. मित्राच्या नादी लागून छोट्यामोठ्या चोऱ्या करणारा रसूल अ‍ॅनाच्या मागे लागतो, तिला आपल्या सच्च्या प्रेमाची हमी देतो. मात्र रसूलचं  मुस्लीम असणं त्यांच्या प्रेमात अडसर बनतं. अ‍ॅना त्याला ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याची विनंती करते, पण रसूल ते मान्य करत नाही. या दोन सर्वसाधारण परिस्थितीत राहणाऱ्या, एकमेकांवर नितांत प्रेम करणाऱ्या प्रेमिकांना एका अटळ शोकांतिकेला सामोर जावं लागतं.

‘अन्नायूम रसुलम’ ही प्रेमकथा असली तरीही तिची हाताळणी मात्र चाकोरीबद्ध प्रेमकथेसारखी नाही. त्यातील रसूल, अ‍ॅना आणि इतर व्यक्तिरेखांना दिग्दर्शकाने दिलेले आलेख हे ते ज्या परिस्थितीत राहत आहेत, त्याला पूरक आहेत. त्यांच्या धारणा, समजुती त्यांच्या रोजच्या जगण्यातून आलेल्या आहेत. त्यामुळे हा सिनेमा पाहताना आपण त्या पात्रांच्या अवकाशाचा एक भाग होऊन जातो. त्यांच्या सुखदुःखाशी समरस होऊन जातो.

फहाद फाझील हा समकालीन मल्याळम चित्रपटसृष्टीतील एक जबरदस्त ताकदीचा अभिनेता आहे. रसूलचं बेबंद जगणं, त्याचे अ‍ॅनामध्ये गुंतत जाणं आणि आपल्या प्रेमाआड येणाऱ्या प्रत्येकाशी यथाशक्ती प्रतिकार करणं, हे सर्व त्याने आपल्या देहबोलीतून प्रत्ययकारी केलंय. प्रथम स्वतःच्या कोशात असलेली आणि नंतर रसूलच्या प्रेमानं हरखून गेलेली अ‍ॅना अन्द्रेआ जेरेमिया या अभिनेत्रीनं उत्तम उभी केली आहे. या चित्रपटाचा प्रभाव कायम राहतो, तो राजीव रवींच्या वास्तववादी हाताळणीमुळे!

‘अन्नायूम रसुलम’ची गोष्ट आपल्याला कळते ती रसूलच्या नेव्हीमध्ये काम करत असलेल्या मित्राच्या निवेदनातून! त्याच्या निवेदनात रसूल-अ‍ॅनाच्या प्रेमकथेच्या बरोबरीनेच तिथल्या तरुणाच्या नोकरी निमित्तानं होणाऱ्या स्थलांतराचा प्रश्न, कनिष्ठ वर्गातील प्रखर धर्मनिष्ठा आणि त्यामुळे तरुणाची होणारी घुसमटसुद्धा व्यक्त होते.

राजीव रवींच्या ‘कम्मटी पादम’मधील कृष्णन (दुलकर सलमान) हासुद्धा रसूलसारखा सर्वसामान्य घरातील मुलगा आहे. मुंबईत सिक्युरिटी गार्डची नोकरी करत असलेला कृष्णन आपल्या हरवलेल्या मित्राचा- गंगाचा (विनायकन) शोध घ्यायला ‘कम्मटी पादम’मध्ये परतून येतो. या ठिकाणी त्याचे बालपण गेलंय. त्या बालपणीच्या कडू-गोड आठवणी उरात घेऊन कृष्णनचा शोध सुरू होतो. ‘कम्मटी पादम’ अलीकडच्या काळातील एक उत्तम गँगस्टर पट म्हणून नावाजला गेलाय.

गंगा व त्याच्या कुटुंबियांना दलित असल्यामुळे भोगावे लागलेले कष्ट, त्याच्या पदरी आलेली अवहेलना, त्यातून सुटण्यासाठी गंगाने उभी केलेली गँग, कम्मटी पादममधील दलितांच्या जमिनी हडपून त्यावर इमारती बांधण्यासाठी बिल्डर्सनी रचलेली कारस्थानं आणि या कारस्थानांना कृष्णनने दिलेलं उत्तर, असा व्यापक पट असलेली ही गोष्ट पाहताना आपल्या लक्षात राहतात ते राजीव रवींनी धाडसानं या चित्रपटात मांडलेले दलित समाजाचे प्रश्न! आपण मध्यमवर्गीय माणसं दलितांना येणारे अनुभव कधीच समजू शकत नाही, ते पडद्यावर मांडणं हेसुद्धा जिकिरीचं काम आहे, या जाणीवेतून हा धोका राजीव रवी यांनी पत्करला आहे.

उपेक्षितांचं जगणं नशिबी आल्यामुळे गुन्हेगारी वळलेल्या लोकांची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न राजीव रवी यांनी त्यांच्या ‘न्जान स्टीव्ह लोपेझ’ या चित्रपटातसुद्धा केलाय. या वेळी मात्र त्यांचा नायक स्टीव्ह (फरहान फाझील) एका सुखवस्तू घरात राहणारा कॉलेजमध्ये शिकणारा तरुण आहे. प्रेयसीच्या प्रतीक्षेत असणारा स्टीव्ह ‘कैसा तेरा जलवा, कैसा तेरा प्यार, तेरा इमोशनल अत्याचार ‘हे देव डी’मधील गाणंही ऐकतोय. स्टीव्हचे वडील पोलीस खात्यात आहेत. एके दिवशी बस स्टॉप वर स्टीव्हच्या समोर एक गुन्हा घडतो. स्टीव्ह जखमी इसमाला हॉस्पिटलमध्ये नेतो. हा माणूस एका गुन्हेगारी टोळीतील गुंड असतो. पोलीस स्टीव्हला आरोपींना ओळखण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये बोलावतात. आपल्या मुलानं ही नसती ब्याद मागे लाऊन घेतली, असं वडिलांचं मत होतं, मात्र स्टीव्ह पोलीस स्टेशनमध्ये जायला तयार होतो.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

अनेकदा आपण फारसा विचार न करता एखाद्या व्यवस्थेबद्दल आपलं मत देऊन मोकळं होतो, वस्तुस्थिती मात्र काही वेगळीच असते. या प्रसंगामुळे स्टीव्हच्या समोर गुन्हेगारी जगताची उजवी बाजू आणि पोलीस यंत्रणेची काळी बाजू उघड होते. त्याचा जीवनविषयक दृष्टीकोन बदलून जातो. स्टीव्हची व्यक्तिरेखा ही राजीव रवी या दिग्दर्शकाचीच प्रतिमा आहे. त्यांना आपल्या आसपासच्या जगाबद्दल कुतूहल आहे, त्यांच्या मनात उपेक्षित समाजाबद्दल सहानुभाव आहे. चित्रपटातून वास्तववादाच्या नावाखाली रोमॅण्टीसिझम दाखवणाऱ्या कलाकृती बनवणं त्यांना  ढोंगीपणाचं वाटतं.

केरळातील अदूर गोपाळकृष्णन, जी. अरविंदन या नववास्तववादी दिग्दर्शकाची परंपरा पुढे नेणं ही त्यांना आपली जबाबदारी वाटते. त्यांच्या आत्तापर्यंतच्या कलाकृतीमधून त्यांनी ही जबाबदारी पेलली असल्याचं सिद्ध केलंय. त्यांचा आगामी चित्रपट ‘थुरामुखम’ त्यांनी निर्माण केलेल्या अपेक्षा पूर्ण करेल, याबद्दल खात्री बाळगायला हरकत नाही.

..................................................................................................................................................................

लेखक संतोष पाठारे सिनेअभ्यासक आहेत. 

santosh_pathare1@yahoo.co.in

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख