अजूनकाही
चीनमध्ये उगम पावलेल्या कोविड-१९ या विषाणूने जानेवारी २०२०मध्ये आपली दहशत बसवायला सुरुवात केली आणि अतिशय वेगवान वाटचाल करत पुढील तीन महिन्यांत आख्खे जग पादाक्रांत केले. सर्वाधिक प्रगत मानल्या जाणाऱ्या युरोप खंडात त्याने अधिक रौद्र रूप धारण केले आणि महासत्ता असलेल्या अमेरिकेत तर हाहाकार माजवला. आधी गणिताच्या वेगाने वाढत जाणारे रुग्णांचे व मृत्यूंचे आकडे नंतर भूमितीच्या वेगाने वाढत गेले. आधी प्रत्येक नव्या आकड्यानंतर चिंताग्रस्त होत जाणारे चेहरे नंतर त्या आकड्यांवर नजर टाकेनासे होऊ लागले. आणि पुढे पुढे तर कोणालाच त्या वाढत्या आकड्यांचे काही वाटेनासे झाले. आणखी किती दिवस हा विळखा राहणार हा प्रश्न सुरुवातीपासून सर्वांना सतावत होता, पण शतकातून एखाद-दुसरी येणारी अशी ही साथ (महामारी) असल्याचे स्पष्ट होत गेले. आणि मग एक संपूर्ण वर्ष यातच जाणार हे उघड होत गेले. लहान-थोरांनी स्वत:च्या मनाची तशी तयारी केली. जोपर्यंत लस येत नाही, तोपर्यंत सुरक्षित अंतर आणि कमीत कमी जनसंपर्क हेच बचावात्मक उपाय आहेत, यांवर शिक्कामोर्तब झाले.
त्यानंतर लस येण्याकडे संपूर्ण जगाचे डोळे लागले. लसनिर्मितीच्या यशस्वी प्रयोगांच्या बातम्या येऊ लागल्यावर लोकांनी धीर एकवटायला सुरुवात केली... आणि आता सुटकेचा श्वास घ्यायला सुरुवात केली आहे. १६ जानेवारीपासून भारतभरात लसीकरणाची मोहीम सुरू झाली आहे. सव्वाशे कोटी लोकसंख्या असलेल्या या देशात जवळपास तीन कोटी आरोग्य कर्मचारी मागील वर्षभर अहोरात्र कार्यरत होते, तणावात होते; त्यांना सर्वप्रथम लस दिली जाणार हे साहजिक आहे. त्यानंतर आणखी काही कोटी असे करत करत संपूर्ण देशात लसीकरणाच्या मोहिमा राबवाव्या लागणार आहेत. हे किती काळ चालेल, याची स्पष्टता अद्याप आलेली नाही, पण २०२१ हे वर्ष यात जाणार ही शक्यता अधिक आहे. म्हणजे जानेवारी २०२० मध्ये उगम पावलेल्या कोविड विषाणूच्या अंताचा जानेवारी २०२१ हा प्रारंभ आहे, असेच म्हणावे लागते.
एकंदरीत विचार करता, सलग दोन वर्षे एका विषाणूच्या तावडीतून पूर्णत: मुक्त होण्यास लागणार ही संपूर्ण जगाची अवस्था आहे. साहजिकच शारीरिक आरोग्य हा भाग बाजूला ठेवला तरी, मानसिक, सामाजिक व राजकीय आरोग्यांवर त्याचे बरेच दूरगामी परिणाम होत आहेत, होणार आहेत. कारण अर्थव्यवस्था बऱ्याच विस्कटल्या आहेत, व्यक्तींच्या, संस्थांच्या आणि राष्ट्रांच्याही!
ही व्यक्ती, संस्था, उद्योग-व्यापार यांच्यासाठी ही स्थिती इष्टापत्ती ठरली असली तरी त्यांचे प्रमाण नगण्य आहे. सामान्यांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे. या महामारीच्या लाटांमध्ये अनेक जण नामशेष झाले आहेत, अनेक जण कोलमडून पडले आहेत, अनेकांची वाताहात झाली आहे, अनेकांची स्वप्नं उद्ध्वस्त झाली आहेत, अनेकांची उमेद संपुष्टात आली आहेत. परिणामी, मानवी जीवनातील अनिश्चितता व क्षणभंगुरत्व यांची जाणीव नव्याने झालेल्या अनेकांचा जगण्यातील रसच कमी झाला आहे. ही सर्व परिस्थिती मानवी संस्कृतीच्या विकासासाठी सर्वाधिक हानीकारक आहे.
..................................................................................................................................................................
हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये खरेदीसाठी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5282/Hasanyawari-Neu-Naka
..................................................................................................................................................................
अशा पार्श्वभूमीवर पुढील वाटचाल कशी करावी, याबद्दल भल्याभल्यांच्या मनात संभ्रम असणे स्वाभाविक आहे. पण मानवी संस्कृतीची आतापर्यंतची वाटचाल कशी होत आली आहे; याकडे ओझरता दृष्टिक्षेप टाकता आला, त्या प्रवासातील वाटावळणे व खाचखळगे समजून घेता आले, तर तो संभ्रम निश्चितच कमी होईल, मनाला दिलासा मिळेल.
मानवी संस्कृतीचा उत्कर्षच होत आला आहे, असाच निष्कर्ष त्यातून निघेल. वरवर पाहता हा निष्कर्ष मनाला पटवता येणे जड जाईल. पण तसेच आहे खरे! या संदर्भात दोन लिटमस टेस्ट ज्याला त्याला घेता येतील. पहिली टेस्ट अशी घेता येईल की, या जगाचा प्रवास धर्माकडून विज्ञानाकडे झाला तो कसा आणि दुसरी टेस्ट घेता येईल ती अशी की, या जगाचा प्रवास एकाधिकारशाहीकडून लोकशाहीकडे कसा झाला आहे!
आदिमानव विकासाचे टप्पे पार करत पुढे जाऊ लागला, तसतसे देव व धर्म या कल्पना त्याच्या मनाची पकड घेऊ लागल्या. व्यक्तीच्या मनाची सुरक्षितता व समाजाची सुव्यवस्था या गरजेतून त्या दोन कल्पना आकाराला येत गेल्या. हळूहळू त्या कल्पनांना धुमारे फुटत गेले, मग त्यांना जडत्व येऊ लागले. त्यानंतर त्यांचा जाच सुरू झाला. त्यातून येणारी बंधने व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर आक्रमण करू लागली, समूहाने पुढे जाण्याच्या मार्गातील धोंड बनू लागली. त्यात मक्तेदारी निर्माण होऊ लागली. लोकांच्या अज्ञानाचा व सुटेसुटेपणाचा गैरफायदा घेतला जाऊ लागला. रूढी, परंपरा, चालीरिती यामुळे देव व धर्म हे समाजाच्या पायातील बेड्या ठरू लागले. आणि मग देव व धर्म या संकल्पनांविषयी संशय निर्माण होऊ लागला. त्यासंदर्भात प्रश्न विचारले जाऊ लागले. व्यक्तीच्या अधिकाराची चर्चा होऊ लागली.
त्याचदरम्यान या जीवसृष्टीचे आकलन करून घेण्यासाठी विविध ज्ञानशाखा आकाराला येऊ लागल्या आणि मग विज्ञान ही संकल्पना पुढे येऊ लागली. विज्ञान ही जरी विचार करण्याची एक पद्धती म्हणून आपण मान्य करत असलो तरी, निसर्गविज्ञानाच्या विविध शाखांनी सृष्टीची रहस्ये उलगडायला सुरुवात केली तेव्हा खरे बदल होऊ लागले. नंतर उपयोजित विज्ञान (अॅप्लाइड सायन्स) घराघरांत प्रवेश करू लागले तेव्हा ‘चमत्काराशिवाय नमस्कार नाही’, या उक्तीचा प्रत्यय येऊ लागला.
त्यापुढचा टप्पा म्हणजे तंत्रज्ञान. त्यामुळे जनजीवन सुलभ व जलद होण्याची प्रचिती दिली. आणि मग देव व धर्म या संकल्पनांचे गारूड कमी होऊ लागले. ज्ञानविज्ञान दिवाणखाण्यात आले तर देव-धर्म माजघरात ठेवले जाऊ लागले. ही एकूण प्रक्रिया बरीच गुंतागुंतीची राहिली आहे, पण तिचे ढोबळ मानाने निघालेले सार असेच आहे.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
असाच काहीसा जगाचा प्रवास एकाधिकारशाहीकडून लोकशाहीकडे होत आहे. मूलत: माणूस हा एकटा असला तरी टोळी करून राहणे ही त्याची गरज बनली, तेव्हा प्रत्येकाच्या मनात वर्चस्वाची भावना कमी-अधिक प्र्रबळ होत जाणे स्वाभाविक झाले. आणि मग टोळीयुद्ध ही नित्याची बाब बनली. त्यातूनच पुढे मालकीहक्क पक्के होत गेले. त्याला काही एक नियमितपणा आणण्यातून एकाधिकारशाही अस्तित्वात आली, अर्थातच देवघेवीच्या पायावर तिची संरचना उभी राहिली. एकाधिकारशाही किती काळ व किती पिढ्या चालू ठेवायची याची कुजबूज ती चालवून घेणाऱ्यांच्या मनात निर्माण होऊ लागली. त्यानंतर ती ‘शाही’ कितपत सुसह्य व असह्य इथपर्यंत ती चर्चा आली आणि मग त्यातूनच पुढे हळूहळू ‘लोकशाही’ या संकल्पनेचा उदय झाला. अर्थातच लोकशाहीचा विकास व विस्तार होण्याच्या मार्गात अनंत अडथळे येत गेले. (अद्याप ते संपलेले नाहीत.) पण जग उलट्या दिशेने जाणार नाही हेच खरे!
लोकशाही ही काही तरी मूर्त संकल्पना आहे, असे समजून चालणार्यांना हे पटणार नाही. मात्र ती शासनप्रणाली आहे, जीवनप्रणाली आहे आणि उत्क्रांत होत जाणारी प्रक्रिया आहे, याचे भान सुटले नाही तर हे पटायला जड जाणार नाही. तत्कालीन क्रियाप्रतिक्रियांमुळे निराशा जरूर येईल, वेळोवेळी व सर्वत्र होत असलेल्या पिछेहाटीचे दु:ख निश्चित होईल; पण अंतिमत: लोकशाहीचा गाडा पुढेच जातो आहे, याबाबतची खात्री कायम राहील. वरील निष्कर्षाशीही सहमत होता येणे अनेक लहान-थोरांना अवघड जाईल. कारण सभोवतालचे वास्तव तसे नाही, याचा अनुभव त्यांना रोज येत असतो. पण त्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, ‘निरीक्षणे बरोबर, निष्कर्ष चूक’ अशी गल्लत तर आपण करत नाही ना! व्यक्तिगत अनुभवावरून सामाजिक सिद्धान्त मांडण्याची सवय तर आपल्याला लागलेली नाही ना!
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
कोणत्याही समाजाचा राष्ट्राचा व जगाचा उत्कर्ष व ऱ्हास मोजायचा असेल तर समग्र विचार करता येणे आणि काळाच्या टप्प्यांनुसार त्यात कमी-अधिक काय झाले, हा सारासार विचार (म्हणजेच विवेक) करण्याची वृत्ती अंगी भिनली पाहिजे. तसे न करता, तत्कालीन व तुकड्या-तुकड्यांतील निरीक्षणांचा मारा करून धडाधड निष्कर्ष काढत जाणे, यामुळे समाजमनात निराशेची पेरणी तेवढी होत राहते. म्हणून जेवढ्या मोठ्या व जबाबदारीच्या ठिकाणी माणसे, तेवढा हा विवेक अधिक बाळगण्याची गरज असते.
सारांश, संपूर्ण जगावर ओढवलेल्या गतवर्षीच्या संकटाकडेही अधिक धीराने, अधिक संयमाने पाहता यायला हवे. हे खरे आहे की, १९२०नंतर असे (महामारीचे) संकट संपूर्ण जगावर २०२० मध्ये आले, त्यामुळे ते संकट अनुभवलेले आजच्या जगात कोणीही नाही. पण मानवजातीचा इतिहास असेच सांगतो की, प्रत्येक शतकात असे संकट कधी ना कधी येऊ गेले आहे. त्यातून जग पुढे सरकले आहे; नव्या आकांक्षांनी जन्म घेतला आहे, नव्या उमेदीने झेप घेऊन जगाने नवी यशोशिखरे पादाक्रांत केलेली आहेत!
‘साधना’ साप्ताहिकाच्या २३ जानेवारी २०२१च्या अंकातून साभार
..................................................................................................................................................................
लेखक विनोद शिरसाठ साधना साप्ताहिकाचे संपादक आहेत.
vinod.shirsath@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment