अजूनकाही
साहित्य संमेलनात ग्रंथप्रदर्शन हे नेहमीच एक खास आकर्षण असतं. महाराष्ट्रातील वेगवेगळे प्रकाशक, नियतकालिकं आणि पुस्तकविक्रेते-वितरक आपले स्टॉल्स या प्रदर्शनात लावतात. त्यामुळे संमेलनातील ग्रंथप्रदर्शनात तीनशेहून अधिक पुस्तकांचे स्टॉल्स असतात. कथा-कविता-कांदबऱ्यांपासून अध्यात्मापर्यंतची आणि पाकशास्त्रापासून नियतकालिकांच्या विशेषांकांपर्यंतची नानाविध पुस्तकं या ठिकाणी पाहता, हाताळता आणि आवडलेली विकत घेता येतात. हल्ली तर ऑडिओ बुक्सपासून ब्रेलमधील पुस्तकांचेही स्टॉल्स असतात.
तसे ते डोंबिवलीच्या साहित्य संमेलनातही आहेत. पण त्यातील एक स्टॉल सर्वांत वेगळा आणि विशेष आहे. त्या स्टॉलचं नाव आहे – ‘वाचू आनंदे’. हा स्टॉल फक्त माधुरी पुरंदरे यांच्या पुस्तकांविषयीचा आहे. या स्टॉलवर त्यांची बाजारात उपलब्ध असलेली जवळपास सर्व पुस्तकं आहेत.
माधुरी पुरंदरे यांची काही पुस्तकं पुरंदरे प्रकाशन, राजहंस प्रकाशन यांनी प्रकाशित केली असली तरी बरीचशी पुस्तकं पुण्याच्या ज्योत्स्ना प्रकाशनाने प्रकाशित केली आहेत. या प्रकाशनाचे मिलिंद-विकास परांजपे या बंधुद्वयांनी पुढाकार घेऊन हा स्टॉल लावला आहे. इथं पुरंदरे यांची ज्योत्स्ना प्रकाशनाने प्रकाशित केलेली पुस्तकं तर आहेतच, पण राजहंस आणि पुरंदरे प्रकाशन यांनी प्रकाशित केलेली पुस्तकंही आहेत.
आजवर मराठीतल्या कुठल्याही लेखकाचा साहित्य संमेलनातील ग्रंथप्रदर्शनात अशा प्रकारे स्वतंत्र स्टॉल लावला गेला नाही. त्यामुळे हा स्टॉल या संमेलनाचं एक विशेष आकर्षण आहे. मराठीतल्या एका लेखिकेचा अशा प्रकारे सन्मान केला जाणं आणि त्यांची सर्व पुस्तकं एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणं, यात कल्पकता आहे, नावीन्य आहे!
ही कल्पना कशी सुचली याविषयी विकास परांजपे यांनी सांगितलं की, “काही वर्षांपूर्वी कोलकाता बुक फेअरमध्ये एका कवीनं त्याचा स्वत:चा स्टॉल मांडला होता. तो बंगाली तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रियता असलेला कवी होता. त्या कवीनं स्वत:चं मार्केटिंग करण्यासाठी हा स्टॉल लावला होता. वेगवेगळ्या प्रकाशकांनी त्याचे कवितासंग्रह काढले होते. त्यानं आपली सर्व पुस्तकं एकत्र करून ती या स्टॉलमध्ये मांडली होती. त्या जोडीला त्यानं स्वत:ची लॉकेटस, स्वत:च्या कवितांच्या ओळी असलेले मग्ज व टीशर्टस असंही त्या ठिकाणी विक्रीसाठी ठेवलं होतं. मी तो स्टॉल पाहिला तेव्हा मला ही कल्पना मला आवडली. कारण अशा प्रकारे एखाद्या लेखकाची संपूर्ण पुस्तकं एकत्र करून ती स्वतंत्र स्टॉलमध्ये ठेवली, तर त्याचं योगदान लोकांसमोर येईल असं मला वाटलं. पण असं दालन भरेल असा एकच लेखक माझ्याकडे काही वर्षांपूर्वीपर्यंत नव्हता. पण बघता बघता असं लक्षात आलं की, माधुरी पुरंदरे यांची अनेक पुस्तकं आपण प्रकाशित केली आहेत. लहान मुलांच्या गोष्टींपासून ‘लिहावे नेटके’सारख्या पायाभूत प्रकल्पापर्यंत आणि ‘व्हॅन गॉग’वरील कादंबरीच्या अनुवादापासून ‘पिकासो’च्या चरित्रापर्यंत त्यांना वेगवेगळी पुस्तकं लिहिली आहेत. ती सगळीच काही आम्ही प्रकाशित केली नाहीत, पण त्यातील बहुतांशी आम्ही प्रकाशित केली आहेत. मुलांसाठीच्या सर्व पुस्तकांची चित्रंही त्यांनी स्वत:च काढली आहेत. त्यामुळे त्यांच्या पुस्तकांचं स्वतंत्र ग्रंथदालन करता येईल असं माझ्या डोक्यात होतं. दोन-चार वर्षांपासून डोक्यात असलेली ही कल्पना या वर्षी प्रत्यक्षात आणायचं ठरवलं. मुख्य म्हणजे या कल्पनेला प्रसिद्धीपराङमुख असलेल्या माधुरी पुरंदरे यांनीही होकार दिला. रविवारी त्या दिवसभर या दालनात हजर असणार आहेत. या ग्रंथदालनाचं नाव काय ठेवायचं हा प्रश्न होता. कोलकात्याच्या त्या कवीनं स्वत:चंच नाव स्टॉलला दिलं होतं. पण आम्ही ‘वाचू आनंदे’ हे नाव दिलं. कारण बाल व कुमार गटासाठी माधुरी पुरंदरे यांनी दोन दोन भागांत केलेली ही पुस्तकं खूप वाचकप्रिय ठरली आहेत.”
माधुरी पुरंदरे यांनी मुलांसाठी लिहिलेल्या पुस्तकांविषयी फारसं काही सांगण्याची गरज नाही. ‘राधाचं घर’, ‘चित्रवाचन’, ‘आमची शाळा’, ‘वाचू आनंदे’, ‘लिहावे नेटके’, ‘झाडं लावणारा माणूस’ अशी कितीतरी पुस्तकं पुरंदरे यांनी आजवर लिहिली आहेत. ती वाचकप्रियही ठरली आहेत. नुसतं बोलून काहीच होत नाही, प्रत्यक्ष काम करायला हवं, या न्यायाने पुरंदरे यांनी गेल्या वीसेक वर्षांत बाल ते किशोरवयीन मुलांसाठी अतिशय सकस साहित्यनिर्मिती केली आहे. आजघडीला मराठीमध्ये मुलांसाठी सकस आणि दर्जेदार लिहिणाऱ्या दुसरा लेखक मराठीमध्ये नाही. माधुरी पुरंदरे यांच्या पुस्तकांविना बालपण अधुरं आहे, याची साक्ष पटवणारं हे ग्रंथदालन आहे.
पुरंदरे यांची पुस्तकं एकत्र पाहायची असतील, हाताळायची असतील आणि विकत घ्यायची असतील तर ‘वाचू आनंदे’ ग्रंथदालनाला जरूर भेट द्यावी.
editor@aksharnama.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment