हा लेख नवीन शैक्षणिक धोरणाचे (NEP 2020) सर्वंकष विश्लेषण नाही. या धोरणाच्या राजकीय-आर्थिक आणि तत्त्वप्रणाली यांच्या परिणामाबद्दल किंवा त्यामुळे उच्चशिक्षणाच्या वाढत्या खासगीकरणाच्या व वस्तूकरणाच्या शक्यतेबद्दलदेखील नाही. त्यावरून समाजात अगोदरच वादविवाद सुरू झालेला आहे. त्याऐवजी मी या लेखात एका शिक्षकाच्या नजरेमधून चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहे. या नवीन शैक्षणिक धोरणाने भर दिलेल्या शिक्षणाच्या आणि अभ्यासक्रमाच्या काही महत्त्वपूर्ण आदर्शांवर मी चिंतन करणार आहे. या आदर्शांना अगदीच तुच्छ लेखण्याऐवजी त्यांच्या खोलात जाण्याचा प्रयत्न करणार आहे. काही चिकित्सक प्रश्न उपस्थित करणार आहे. शिक्षणाच्या सामाजिक गतिशास्त्राकडे पाहणार आहे आणि त्यामधून शक्यतांचा संच उत्क्रांत करणार आहे.
मला माझ्या मर्यादा माहीत आहेत. मी कोणी तांत्रिक व्यवस्थापक नाही किंवा एखादा अकादमिक नोकरशहादेखील नाही. मी अगदी धोरण अनुकूल व्यक्तीदेखील नाहीये. मी वर्गखोलीच्या छोट्याशा जगात राहणारा एक शिक्षक आहे. म्हणून शक्यता अशी आहे की, मी काहीतरी मोठं आणि भव्यदिव्य पाहण्यास सक्षम नाही. तथापि दूरवरच्या धोरणकर्त्यांसारखा मी नाही. माझा फायदा असा आहे की, माझं दररोजचं जग मला विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या खूपच जवळ घेऊन जातं. मी अध्ययनाचे सामाजिक संदर्भ पाहतो. अकादमिक यंत्रणा वस्तुत: कशी काम करते, हे अनुभवणं आणि जाणवणं ही माझ्यासाठी संपूर्णपणे अशक्य अशी गोष्ट नाही. मी हे पाहू शकतो की, आपण सर्वजण – विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि व्यापक समाज – अकादमिक शिस्तीला, आकलनाच्या विविध ज्ञानशाखांना, शिक्षण, उपलब्धी आणि यश यांना अर्थ चिकटवत असतो.
अविभाज्य शिक्षण – चिकित्सकरीत्या विचार करणे
‘शिक्षणाने चिकित्सक विचार कसा करावा आणि समस्या कशा सोडवाव्यात, तसंच सृजनशील आणि बहुविद्याशाखीय कसं असलं पाहिजे याकडे वळलं पाहिजे. त्याचबरोबर नवनिर्मिती कशी करावी, जुळवून कसं घ्यावं आणि नवीन बदलणाऱ्या क्षेत्रात नवीन साहित्य कसं आत्मसात करावं, याकडेदेखील वळायला पाहिजे. अभ्यासक्रमाने शिक्षणाला अधिक प्रयोगशील, सर्वांगीण, एकात्मिक, चिकित्सक वृत्ती जोपासणारं, शोध घेण्यास प्रवृत्त करणारं, विद्यार्थीकेंद्रित, चर्चा करण्यास प्रोत्साहन देणारं, लवचीक आणि अर्थातच आनंददायी करण्यासाठी उत्क्रांत व्हायलाच पाहिजे.’ (NEP 2020)
होय, हे सगळे आदर्श नवीन नसले तरीही निखालसपणे आदर्श आहेत. आणि आपल्यापैकी ज्यांनी रवींद्रनाथ टागोर, जे. कृष्णमूर्ती आणि श्री अरबिंदो यांच्या शैक्षणिक आदर्शांवर प्रेम केलं, त्यांना हे माहीत आहे की, शिक्षण हे कंटाळवाण्या\नित्यक्रमाच्या परीक्षेतील तत्काळ यशासाठी केलेलं तांत्रिक अध्ययन नाही. तसंच ते जिवंत अनुभव आणि सृजनशील शोधापासून तुटलेलं केवळ पुस्तकी ज्ञान नाही. वास्तविकपणे स्वातंत्र्याच्या आत्म्याशिवाय आणि जागृत करणाऱ्या बुद्धिमत्तेशिवाय शिक्षण हे केवळ श्रेणीबद्ध अध्ययन बनतं. तो एक परात्मभावी उपक्रम बनतो. तरीही वस्तुस्थिती अशी आहे की, या सगळ्या आदर्शांची क्वचितच अंमलबजावणी होते. त्यांच्याकडे नेहमीच एक स्वप्नाळू पर्याय म्हणूनच पाहिलं जातं. या आदर्शांचा प्रयोग केवळ काही निवडक उच्चभ्रू शाळा करू शकतात व त्याच शाळांना परवडणारा आहे, असा मतप्रवाह तयार झाला आहे.
..................................................................................................................................................................
हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये खरेदीसाठी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5282/Hasanyawari-Neu-Naka
..................................................................................................................................................................
बाकी, आपल्या सामान्य शाळा किंवा निकृष्ट पायाभूत सुविधा असलेल्या आपल्या सरकारी शाळा आणि तुडुंब व गोंधळ-गोंगाटाने भरलेल्या वर्गखोल्या आपल्याला एक वेगळीच गोष्ट सांगत असतात. एखादा शिक्षक – स्वत:बद्दल सकारात्मक मत असलेलाच हवा असा अट्टाहास नाही - वर्गात कशीतरी शांतता प्रस्थापित करतो, अभ्यासक्रम पूर्ण करतो, गृहपाठासाठी प्रश्न देतो आणि त्या मुलाला\मुलीला ‘परीक्षा-योद्धा’ म्हणून रूपांतरित करतो. सर्वसाधारणपणे एखाद्या मुलाचा\मुलीचा शैक्षणिक अनुभव क्रमिक अभ्यासक्रमाच्या पुस्तकांपुरताच किंवा यशाचा मंत्र सांगणाऱ्या मार्गदर्शक पुस्तकापुरताच मर्यादित राहतो.
प्रश्न असा आहे की, ही प्रथा बदलणं शक्य आहे की नाही? हे शिक्षण खऱ्या अर्थानं सर्वांगीण, प्रयोगशील आणि आनंददायक बनवता येईल का? हे अदभूत शब्द खरा अनुभव होऊ शकतील का? नाही, मी वेडा नाही. मी अडथळे आणि आव्हानं यावर चिंतन करू इच्छितोय. या सदंर्भात चार मुद्दे तयार पाहणं आवश्यक आहे.
पहिला, इथं एक विरोधाभास आहे. आपण जेवढ्या जास्त प्रमाणात औपचारिक शिक्षणाच्या वैश्विकीकरणाकडे जाऊ तेवढ्या जास्त प्रमाणात आपण सर्वांगीण अध्ययनाच्या अनुभवापासून स्वत:ला विभक्त करू. अगदी मीसुद्धा या शिस्तबद्ध समाजाचं उत्पादन असलो तरी त्याचे दोष उघड करणाऱ्या इव्हान इलिच (Ivan Illich) यांच्या मताशी सहमत होताना डळमळीत होत नाही. आपली प्रशिक्षित जाणीव आपल्याला यावर विश्वास ठेवायला लावते की, शिक्षण ही अत्यावश्यकपणे औपचारिक संस्थांमध्ये घडणारी गोष्ट आहे. तिथं जे घडतं ते शिक्षण असं आपल्या सर्वांचं मत तयार झालेलं आहे. प्रशासकीय अभ्यासक्रमात जे अस्तित्वात आहे, त्यास ‘ज्ञान’ म्हणतात. तिथं स्व-अध्ययनाची कोणतीही शक्यता नसते. शिक्षित असणं म्हणजे औपचारिक शिक्षकांना शिकवणं आणि अकादमिक नोकरशाहीने प्रमाणित करणं होय, असाच आपला विश्वास झाला आहे. त्यावर आपण विचार करायला हवा. अगदी तीन वर्षांच्या बालकालासुद्धा शाळेत जावंच लागतं. कसं खेळायचं ते शिकावं लागतं आणि त्याला वेगवेगळ्या प्रकारची कौशल्यं विकसित करावी लागतात.
आजीच्या गोष्टी अध्ययन म्हणून पाहिल्या जात नाहीत. आई-वडलांसोबत व भावंडांसोबत उत्स्फूर्तपणे खेळण्याला ‘शिक्षण’ म्हणून पाहिलं जात नाही. सगळं काही, म्हणजे चित्रं काढण्याच्या तंत्रापासून ते आहार घेण्याच्या पद्धती प्रथा – औपचारिक शाळेतील व्यावसायिक शिक्षकांकडूनच शिकवलं गेलं पाहिजे, असा समाजाचा विश्वास झाला आहे. ही परकेपणाची आणि विभागणीची सुरुवात आहे. हे सर्वांगीण अध्ययन नाही. पुस्तकांना जिवंत अनुभवापासून वेगळं केलं आहे. खेळाला कामापासून आणि अनौपचारिक अध्ययनाला शिस्तबद्ध प्रशिक्षणापासून वेगळं केलं आहे.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
दुसरा म्हणजे अगदी आपण सर्वांनी आधुनिक\गुंतागुंतीच्या व्यामिश्र समाजात अनिवार्य निकड मान्य केली तरी सर्वांगीण अध्ययन अवघड बनतं. कारण तंत्र-विज्ञानाच्या श्रेष्ठत्वाला एक उच्च-दर्जाचं ज्ञान म्हणून मान्यला मिळाली असल्यानं आपण कवितेला विज्ञानापासून, वस्तुनिष्ठ वास्तवाला अंत:प्रेरणेच्या अनुभवापासून, विवेकाला भावनेपासून, मानसिकतेला शारिरीकतेपासून, बौद्धिकतेला आध्यात्मिकतेपासून आणि कामाला खेळापासून वेगळं करण्याकडे झुकत असतो. तसा आपला कल असतो.
सर्वांगीण अध्ययनाच्या नावाखाली शाळा नेहमीच अभ्यासक्रमाशिवाय इतर अधिकच्या उपक्रमांबद्दल बोलत असतात. तथापि, तार्किक-गणितीय कारणमीमांसेवर दिलेला भर (आणि या वेळेला दस्तवेज सुचवतात त्याप्रमाणे कृत्रिम बुद्धिमत्तेला, यांत्रिक अध्ययन, विदाविज्ञान आणि परिकलन विचार प्रक्रिया यांना खूप महत्त्व दिलं आहे.) उत्सवी आदर्श बनला आहे. हे फक्त एवढंच नाही. मानवी श्रमाच्या अनुभवापासून वेगळी वर्गखोली शिक्षित वर्गास आकर्षित करते. हा वर्ग कधीमधी हस्तकला किंवा मातीच्या भांड्यांचा कौतुकसोहळा करत असतो. गांधीजींनी मानसिक व शारिरीक सृजनशील संयुगासह शिक्षणाचा आग्रह धरला व तशी कळकळीची विनंती केली, तरीपण आपल्या समाजात शिक्षित असण्याचा अनुभव (हे कधीही विसरू नका की आजही आपला समाज शुद्धता विरुद्ध प्रदूषण या श्रेणीबद्धतेने नैतिकदृष्ट्या भ्रष्ट झालेला जातग्रस्त समाज आहे.) म्हणजे पुस्तकांनी आणि सिद्धान्तांच्या ओझ्याने वाकलेलं ‘सभ्य पुरुष’ लक्षण होय. परंतु असा हा ‘सभ्य पुरुष’ गरीब शेतकरी, कारागीर, कामगार यांच्यापासून सांस्कृतिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या आणि भावनिकदृष्ट्या तुटलेला असतो. शिक्षणाची प्रचलित पद्धती त्यांना जोडण्याऐवजी तोडते. केवळ व्यावसायिक प्रशिक्षणाच्या प्रतीकामधून ही मानसिकता बदलणं शक्य आहे का?
तिसरा म्हणजे चिकित्सक विचारप्रक्रियेच्या मशागतीला - आणखी एक प्रेमळ आदर्श - विश्वास, प्रतिसाद आणि संवाद यांच्या आत्म्यानं भरलेल्या पर्यावरणाची गरज असते. दुसऱ्या शब्दांत सांगायचं तर निर्भयपणा हा चिकित्सक विचाराचा पाया असतो. एखाद्या तरुण अध्ययनकर्त्यास प्रश्न विचारण्यास आणि वेगळं मत मांडण्यास, वेगळा विचार करण्यास आणि वस्तुस्थिती, अनुभव व वैचारिक आकलनावर आधारित नवीन निरीक्षणं बनवण्यास प्रोत्साहन दिलं पाहिजे. तथापि, शिक्षकाचं स्वगत (पाऊलो फ्रियरने ज्यास ‘संवाद तार्किकता’ किंवा ‘समस्येला अधोरेखित करणारं शिक्षण’ म्हटलं ते एखाद्याला क्वचितच अनुभवास येतं!) बरोबर किंवा पुस्तकी उत्तरावर भर देणाऱ्या, सृजनशील संशोधनापेक्षा यशाला महत्त्व देणाऱ्या आणि उद्धट म्हणून आपल्याला शिक्षा दिली जाईल की काय या भीतीमुळे एखाद्या विद्यार्थ्यास वेगळ्या पद्धतीने व चिकित्सकपणे विचार करण्यास अधिकच अवघड करतात. तसंच अभ्यासक्रमाच्या किंवा निगराणी यंत्रणेच्या नजरेपल्याडचं जग पाहण्यास विद्यार्थ्यांना खूपच कठीण होऊन जातं.
कल्पना करा – एक विद्यार्थिनी तिच्या शिक्षकाला विचारतेय की, हिंदू-मुस्लीम सातत्याने एकमेकांशी भांडत असताना आणि हिंदू-मुस्लीम असं स्पष्टपणे दाखवून देताहेत की, ते एकत्र राहू शकत नाहीत तर मग भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे, असं उत्तरात का लिहावं लागतं.
किंवा कल्पना करा एक शाळकरी मुलगी तिच्या प्राचार्यांना विचारत आहे की, भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी विविधता ही भारतीय जीवनाची लय आहे असं नेहमी म्हटलं जात असतानादेखील विद्यार्थांना सैन्यदलासारखा एकच गणवेश का परिधान करावा लागतो?
जर शिक्षक म्हणावा एवढा संवेदनशील आणि ग्रहणक्षम नसेल तर अशा प्रकारचे प्रश्न विचारण्यास विद्यार्थ्यांना निरुत्साही केलं जातं आणि विद्यार्थ्यांना शिक्षा केली जाऊ शकते किंवा त्यांना एक आज्ञाधारक विद्यार्थी असण्यासाठी शिस्तपालन करण्याचे आदेश दिले जाऊ शकतात. हे म्हणजे विद्यार्थ्याला तिच्या किंवा त्याच्या स्वत:च्या भाषेपासून आणि आवाजापासून वंचित ठेवण्यासारखं आहे. हे कधीही विसरू नका की, आपण अशा समाजात राहतो जिथं कुटुंब सदस्य मुलांकडून नियमांचं पालन (अगदी हुशार तरुणतरुणीदेखील हुंडा स्वीकारतात, कारण त्यांना त्यांच्या आई-वडलांना दु:खी करायचं नसतं.) आणि शाळा विद्यार्थ्यांकडून आज्ञापालन करण्याची मागणी करतात. चिकित्सक विचाराला प्रोत्साहन देणं म्हणजे श्रेणीबद्ध संरचनेला उदध्वस्त करणं होय. हे व्यवहार्य आहे का?
..................................................................................................................................................................
‘खिंडीत’ : शैक्षणिक जगताच्या अंतरंगाची विरूपता भेदकपणे उलगडणाऱ्या कथा
हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये ऑनलाईन खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5254/Khindit
..................................................................................................................................................................
चौथा, आपण हे जाणून घेतलं पाहिजे की, चिकित्सक विचार म्हणजे केवळ वैज्ञानिक पद्धतीनं विचार करणं नव्हे. भौतिकशास्त्र आणि गणितामध्ये चांगले मार्क्स मिळवणं नव्हे, किंवा बदलत्या रोजगार\व्यवसाय बाजाराशी झुंजण्यासाठी अगदी तातडीनं नवीन कौशल्य मिळवण्याची क्षमता असणं नव्हे. चिकित्सक विचार करणं म्हणजे चष्म्याच्या चकचकीतपणाच्या किंवा अधिकृत सत्याच्या पल्याड पाहण्याची क्षमता असणं होय. उदाहरणार्त, राष्ट्रवादाची विचारसरणी घ्या. आज ज्या पद्धतीनं या विचारसरणीनं आपल्या जाणीवेत आक्रमण केलं आहे; शाळा-महाविद्यालय-विद्यापीठांच्या प्रांगणात प्रवेश केला आहे आणि अभ्यासक्रमाच्या अनुक्रमणिकेला आकार दिला आहे, हे सगळं विचार करण्यासारखं आहे. या प्रत्येक गोष्टीची निरर्थकतादेखील पाहा.
नवीन शैक्षणिक धोरणाचं जंगी स्वागत करणारं हेच सरकार चिकित्सक विचार करण्याच्या प्रक्रियेची मशागत करण्यास अनुत्सूक दिसतं. अगदी अलीकडील काळामध्ये आमच्या सार्वजनिक विद्यापीठांमधील चिकित्सक विचारप्रक्रियेने घडवलेल्या व मार्गदर्शित केलेल्या काही संवेदनशील विद्यार्थी आणि शिक्षकांनी अतिरेकी राष्ट्रवादाच्या चर्चेला प्रश्नांकित केलं. त्यांनी त्यातील अंगभूत विसंगतीला चव्हाट्यावर आणलं आणि एनआरसी\सीएएच्या विभाजनवादी स्वरूपाच्या विरुद्ध त्यांचा आवाज बुलंद केला. परंतु याचा परिणाम म्हणून त्यांना याचा खूप त्रास झाला. राजकीयदृष्ट्या नियुक्त केलेल्या कुलगुरूंच्या हुकमांपासून ते सगळ्या प्रकारच्या पोलीस कारवाईपर्यंत विरोधी मत व्यक्त करणाऱ्यांना एक कडक संदेश देण्यात आला - देशाचा एक निष्ठावान सैनिक म्हणून राहा. प्रश्न विचारायचा नाही.
वास्तविकपणे चिकित्सक विचार करण्याच्या प्रक्रियेला श्रवण कलेची गरज असते किंवा परिप्रेक्ष्याच्या बहुविधतेसोबत राहण्यासाठी धैर्याची गरज असते. चिकित्सक विचारप्रक्रियेला संवाद आणि सहानुभूतीची गरज असते. प्रत्येक गोष्टीचे तिच्या विरुद्ध रूपात रूपांतर करणाऱ्या सत्तेच्या जुलुमशाहीची आवश्यकता नसते. आपण खरंच सहभागी लोकशाहीकडे जात आहोत का? किंवा असं आहे का, की सर्वांनी आत्ममग्नतेच्या संस्कृतीला जवळपास संवैधानिकता प्राप्त करून दिली आहे?
कोड्यात टाकणाऱ्या या प्रश्नाकडे न पाहता आपण या चिकित्सक विचारप्रक्रियेला प्रतिसाद देऊ शकतो का?
विखंडनाच्या पल्याड पाहण्याइतपत आपले मन लवचीक आहे का?
वैद्यकशास्त्र, कायदा, वाणिज्य, अभियांत्रिकी -
ही उदात्त ध्येयं आहेत
आणि उदरनिर्वाहाच्या गरजेची. परंतु कविता,
संगीत, रोमान्स, प्रेम -
यांच्यासाठी आपण जिवंत राहत असतो
- ‘डेड पोएटस सोसायटी’ या चित्रपटामधून
नवीन शैक्षणिक धोरण शिक्षणाबद्दलच्या बहुशाखीय दृष्टीकोनासाठी प्रयत्नरत आहे. ही एक नावीन्यपूर्ण कल्पना आहे. कल्पना करा, आपणाला अगदी शालेय दिवसांपासून वैविध्यपूर्ण ज्ञान परंपरांना श्रेणीबद्ध करण्यासाठी प्रशिक्षित केलं गेलं आहे. पीसीएम (भौतिकशास्त्र-रसायनशास्त्र-गणित) या सिंड्रोमचा विचार करा. हा सिंड्रोम आपल्या शालेय शिक्षणाचा गुणविशेष झाला आहे. आता हे अगदी सरळ सरळ गृहीत धरण्यात आलं आहे की, बुद्धिमान विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेची निवड करावी आणि इंजीनिअर्स किंवा डॉक्टर्स बनवण्याचा प्रयत्न करावा. आणि कमनशिबी विद्यार्थ्यांनी कला आणि मानव्यविद्या शाखेतील समाजशास्त्र, इतिहास किंवा राज्यशास्त्र इत्यादी विषय घेऊन समाधान मानावं. विज्ञान म्हणजे यश आणि मानव्यविद्या म्हणजे अपयश असा संबंध या व्यवस्थेनं जोडला आहे.
या व्यापक प्रमाणावरील मानसशास्त्राने (अशा या मानसशास्त्राचं भयाकूल, चिंतातूर पालकांनी नेहमीच भरणपोषण केलं आहे. अशा पालकांना आपल्या मुला-मुलींसाठी सुरक्षित आणि निश्चिंत करिअर एवढाच ध्यास असतो. उपलब्ध स्रोत किंवा नोकऱ्या आणि इच्छुक उमेदवार यांच्यात प्रचंड दरी असलेल्या आपल्या देशातील ही एक विशिष्ट परिस्थिती आहे.) अनेक तरुण-तरुणींच्या मन-मेंदूला नष्ट केलं आहे. अनेक संधींना मारून टाकलं आहे. त्याने सर्वदूर निराशा परसवली आहे, लोकांची ज्ञानाबद्दलची कच्च्या स्वरूपात साधनीभूत उजळणी केली आहे. (आयआयटी किंवा आयआयएमएस यांसारख्या संस्था मोक्षाची ‘पवित्र स्थळं’ झाली आहेत. तिथं पोचण्यासाठी अगोदर कोटासारख्या शहराकडे प्रयाण करावं लागतं. शैक्षणिक दुकानांसाठी कुप्रसिद्ध असलेलं कोटा हे राजस्थानातील एक शहर आहे.) आणि विखंडीत मानवी जाणीवेला जन्मास घातलं आहे. या अशा प्रचलित व्यवस्थेअंतर्गत एखाद्या भौतिकशास्त्राच्या विद्यार्थ्याने विल्यम वर्डसवर्थ किंवा मुन्शी प्रेमचंद यांच्यामध्ये किंवा एखाद्या समाजशास्त्राच्या विद्यार्थ्याने पुंजकीय भौतिकशास्त्रामध्ये विशेष आवड दाखवल्याची कल्पना करणं खरोखरच अशक्य आहे. आम्ही खूप अगोदरच मानवी जाणीवेच्या खिडक्या बंद करत आहोत.
..................................................................................................................................................................
हेही पहा :
केंद्र सरकारच्या नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे ‘चारित्र्य’ समजून घेतले पाहिजे!
..................................................................................................................................................................
म्हणूनच हा बहुविद्याशाखीय दृष्टिकोन अदभुत आहे. पण प्रश्न असा आहे का, हा दृष्टीकोन केवळ सजावटीसारखा आहे. (भौतिकशास्त्र, गणित आणि रसायनशास्त्र निवडा, परंतु संगीत हा केवळ एक सोपा ‘ऐच्छिक’ विषय म्हणून घ्या) किंवा आपण त्याबद्दल खरोखरच फार प्रामाणिक आहोत. ठीक आहे. आपण सर्वप्रथम हा बहुविद्याशाखीय दृष्टीकोन म्हणजे काय हे समजून घेऊया.
हा दृष्टीकोन ज्ञान परंपरेच्या अरूंद विशेषीकरणाला आणि विखंडीकरणाला छेद देतो. त्यावर मात करतो. त्याऐवजी हा दृष्टीकोन असं समजतो की, हे जग अखंड स्वरूपात समजून घेण्याची आवश्यकता आहे. एक उदाहरण पाहूया. एक संवेदनशील, जिज्ञासू युवा विद्यार्थी सूर्याकडे पाहत आहे. भौतिकशास्त्र त्या विद्यार्थ्याला सूर्य समजून घेण्यास मदत करतंय, परंतु सूर्य आश्चर्य, अदभुतता या गोष्टींनीदेखील भरलेला आहे. सूर्य जीवनाचं भरणपोषण करतो. सूर्य कवितेला प्रेरणा देतो आणि आपल्या सर्वोत्तम प्रार्थनांनादेखील. अगदी वैदिक ऋषींपासून ते विल्यम ब्लेकपर्यंत आणि त्यांच्याही पुढे आपल्याला सूर्याबद्दलची चित्ताकर्षक कविता वाचावयास मिळते.
कल्पना करून पहा की, सूर्यासारखी नैसर्गिक वस्तू समजण्यासाठी जर भौतिकशास्त्र आणि कविता यांचं संयुग झालं असतं तर ती किती अदभुत गोष्ट झाली असती! बहुविद्याशाखीय दृष्टीकोन म्हणजे अशा प्रकारची संवेदनशीलता किंवा जाणीवेची अशी लवचीकता होय.
असं कोणीही म्हणत नाही की, विशेषीकरण महत्त्वाचं नाही. आपलं आकलन आणि उजळणी भिन्न आहे. म्हणूनच हे अगदी खरंय की, प्रत्येक जण गणितज्ञ बनू शकत नाही. तसंच प्रत्येक जण कवी होऊ शकत नाही. त्यापुढे असं म्हणता येईल की, ज्ञानाच्या क्लिष्ट प्रांतात अत्यंत काटेकोर आणि तीक्ष्ण चिकित्सा विशेषीकरणासाठी महत्त्वाची आहे. तथापि विशेषकरणाची गरज असतानादेखील हे समजून घेतलं पाहिजे की, वस्तू किंवा गोष्टी या आंतरिकपणे जोडलेल्या असतात. आणि आंतरिकपणे जोडल्या गेलेल्या जगाबद्दलची संवेदनशीलता हा खजिना आहे. तो अडथळा नाही. ती आपली क्षितिजीय रेषा विस्तारते. आपणाला नम्र बनवते. आणि ती आपल्यातील चिरंतन जिज्ञासूपणाच्या आणि संवादाच्या आत्म्याला प्रोत्साहित करते. जर शास्त्रज्ञ कवींसोबत गुफ्तगू करू लागले, इतिहासकार तत्त्वज्ञांसोबत बोलू लागले आणि गणितज्ञ झेन बुद्धिझमवरील परिषदांना उपस्थित राहू लागले तर किती छान होईल!
हे आपण समजून घेतलं पाहिजे की, बहुविद्याशाखीय दृष्टीकोनाला सरधोपटपणे प्रोत्साहन दिलं जाऊ शकत नाही किंवा त्याची मशागत केली जाऊ शकत नाही. त्यासाठी ज्ञानाबद्दलच्या नवीन उजळणीची आवश्यकता आहे. केवळ साधनीभूत हिसंबंधांच्या पल्याड पाहण्याची क्षमता विकसित करण्याची गरज आहे. आणि जुरगेन हायबरमासने ज्याला ‘हर्मिनेटिक’ (अर्थान्वेषी) किंवा ‘मुक्तीचे हितसंबंध’ म्हटलं, त्याचे कौतुक करण्याची क्षमता विकसित करण्याची गरज आहे. तंत्रविज्ञान, वाणिज्य आणि व्यवस्थापनाच्या नवउदारमतवादी युगात जर आपण साधनीभूत शिक्षणाला प्राधान्य (तांत्रिक कौशल्य असलेलं मनुष्यबळ उत्पादित करणं) दिलं तर हॉटेल व्यवस्थापन, फॅशन डिझायनिंग आणि माहिती तंत्रज्ञान यांना अनुत्पादक लिबरल आर्टस आणि मानव्यविद्यापेक्षांही अधिक महत्त्व देण्यात येईल. बाजारप्रणित तार्किकतेपासून शिक्षणाला मुक्त करणं शक्य आहे का?
अशाच प्रकारे बहुविद्याशाखीय दृष्टीकोन ज्या प्रकारची संवेदनशीलतेची मागणी करतो, त्यास अत्यंत सर्जनशील आणि संवादी तार्किकता असलेल्या शिक्षकांची गरज लागेल. अशा शिक्षकांकडे अदाकमिक रूढीप्रियतेला प्रश्न विचारण्याचं धाडस असतं. (असं नेहमीच होतं की, विशेषज्ञ अकादमिक शाखांचे उच्च धर्मगुरू ‘परंपरानिष्ठ’ राहतात आणि अगदी समाजशास्त्र आणि राजकीय अभ्यास) यांच्या परिवर्तनीय सीमारेषांच्या शक्यतांना नाउमेद करतात. हा बहुविद्याशाखीय दृष्टीकोन अशा शिक्षकांची मागणी करतो, जे अभ्यासक्रमीय शक्यतांसोबत प्रयोग करतील आणि भौतिकशास्त्राच्या वर्गामध्ये एखादी कविता म्हणतील किंवा शास्त्रज्ञ डेव्हिड बोहम आणि भटक्या वृत्तीचे जे. कृष्णमूर्ती यांच्यातील संभाषणाचा संदर्भ देतील.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
चांगले शिक्षक हे अत्यावश्यकपणे प्रशिक्षित शिक्षक असतात असं नसतं (म्हणजे बीएड पदवी किंवा भौतिकशास्त्रात एम.एस्सी किंवा मध्ययुगीन इतिहासामध्ये पीएच.डी. वगैरे असलं म्हणजे तो चांगला शिक्षक असतो असं नव्हे.) प्रशिक्षणाच्या पल्याडदेखील काही असतं. आणि जर प्रशासकीय किंवा नोकरशाही व्यवस्था केवळ औपचारिक पदवीच्या आधारावर एखाद्या शिक्षकाची भरती करत असेल तर ते खरोखरच प्रयोगशील, नावीन्यपूर्ण मनाच्या उमेदवाराला, ज्याच्यासाठी अध्ययन ही केवळ एक तांत्रिकता नसून ती एक कला आहे आणि एक निरतंर शोध आहे, आमंत्रित करण्याची संधी गमावतील.
आपण ही शक्यता स्वीकारण्यास तयार आहोत का?
समारोप
सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे मी निराशावादी नाही. माझा शक्यतांवर विश्वास आहे. त्यानेच मला अध्ययन-अध्यापनाच्या व्यवसायात तगून राहण्यास सक्षम केलं आहे. मला समग्र अध्ययनाचे आदर्श, चिकित्सक विचार आणि बहुविद्याशाखीय दृष्टीकोनाचा सराव व त्याची अमलबजावणी करण्यास आवडेल. तथापि मी हे विसरू शकत नाही की, आपण आदर्श आणि व्यवहार यांच्यात प्रचंड मोठी दरी असणाऱ्या समाजात राहतोय. शिवाय आपल्यासारख्या भ्रष्ट समाजात आपण आपले मार्ग शोधत असतोच. उदा., आपल्याला बी.एड. महाविद्यालयांची कर्करोगासारखी झालेली वाढ माहितेय. तसंच पदव्या विकत घेतल्या जाऊ शकतात हेही. आणि अनेक महाविद्यालयीन\ विद्यापीठीय शिक्षकांनी उत्क्रांत केलेली पदोन्नती रणनीती प्रकाशन उद्योगाच्या (दाम द्या आणि प्रकाशित करा) एका समग्र वृद्धीकडे घेऊन जाते, हेदेखील आपल्याला ठाऊक आहे. जेव्हा आपणाला शिक्षकांच्या भरतीबाबत माहीत होतं, तेव्हा आपल्याला घराणेशाही किंवा भ्रष्टाचार धक्का देत नाही. आपले राजकीयदृष्ट्या नेमणूक केलेले अनेक कुलगुरू सातत्याने सत्ताधारी वर्गाचे एजंटस म्हणून काम करताना दिसतात. आणि चमकदार खासगी विद्यापीठं पंचतारांकित हॉटेल्ससारखी दिसतात. शिकवणी केंद्रं आणि भंकस मार्गदर्शक पुस्तकांच्या या वातावरणात जो शिक्षक अजूनही विश्वासाचा दिवा घेऊन चालत आहे, त्याचा छळ केला जातो. त्याची चेष्टामस्करी केली जाते. त्याला परिघावरती ढकललं जातं. अशा प्रकारच्या समाजात नेतृत्व ‘आत्ममग्न’ असतं. राष्ट्रवाद उन्मादी बहुसंख्याकवादी बनतो आणि डोळ्यावरचा चष्मा वास्तवापेक्षा अतिवास्तववादी बनतो.
म्हणूनच या विवाद्य प्रश्नापासून सुटका नाही. नवीन शैक्षणिक धोरण विविधरंगी संकल्पना आणि चांगले आदर्श यांनी भरलेला आणखी एक दस्तऐवज आहे का? किंवा खरंच आपण आपल्या समाजाची पुनर्रचना, सार्वजनिक शिक्षणामध्ये मोठी गुंतवणूक, सर्वसमावेशक नीतीमूल्यं असलेली उच्च गुणवत्तेची शाळा\महाविद्यालयं सुरू करण्याबद्दल, शिक्षणाचा ध्यास असलेले अधिकाधिक शिक्षक नेमण्याबद्दल, त्यांच्या सर्जनशीलतेवर व बुद्धिमत्तेवर विश्वास ठेवण्यास (होय, राष्ट्रीय चाचणी अभिकरण करते त्यापेक्षा जास्त काही करण्याची तयारी) आणि समतावादी व कनवाळू समाजाकडे जाण्यास तयार आहोत का?
..................................................................................................................................................................
हा मूळ इंग्रजी लेख https://www.mainstreamweekly.net या पोर्टलवर प्रकाशित झाला आहे. मूळ लेखासाठी पहा -
https://www.mainstreamweekly.net/article9847.html
..................................................................................................................................................................
लेखक अविजित पाठक जेएनयूमध्ये समाजशास्त्राचे अध्यापन करतात.
अनुवादक प्रा. राजक्रांती वलसे जालन्याच्या बद्रीनारायण बारवाले महाविद्यालयामध्ये सहयोगी प्राध्यापक आहेत.
rajkranti123@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment