रवीशकुमार सांगू लागला म्हणून नाही, त्याच्या बऱ्याच आधीपासून आम्ही मराठी, हिंदी, इंग्रजी बातम्या बघणे बंद केलेलेय. हां, मोदींची दाढी-कटिंग किती लांबत चाललीय ते पाहायला किंवा आणखी किती दंगलबाज विषय चर्चांसाठी उकरणे चालूय ते ऐकायला अधूनमधून मिनिट पाच मिनिट बघतो. पण लगेच तिथून येणारी धग सहन होत नाही म्हणून विनोदाच्या शिडकाव्यात बसणे पसंत करतो. तिथेही विनोदात पाचर मारलेली! राजकीय विनोद पूर्ण वर्ज्य. सहा वर्षे झाली बरोबर. ना कुणा पक्षावर, ना सरकारवर, ना सत्ताधारी पुढाऱ्यांवर हे टीव्हीवाले हसले, ना त्यांनी कुणाला हसवले! मराठी वर्तमानपत्रांचे संपादक कुणाला नेमायचे हे जसे आता मालकाच्या हाती उरलेले नाही, तशा विनोदाच्या संहिताही मालिका निर्माते अन दिग्दर्शक यांच्या हातात ठेवलेल्या नाहीत. विनोदाच्या स्किटस कमालीच्या पोरकट, अतर्क्य आणि अंगविक्षेपावर भर देणाऱ्या होत चाचल्यात. ‘चला, हवा येऊ द्या’ नावाची मालिका तर बहुधा संघवाल्यांच्या बुद्धीला झेपतील अशा विनोदांनीच बुजबुजलेली असते. पुरुषांनी स्त्रीपात्रे करणे, बुटके व जाड नटनट्या आणून सर्कसछाप चाळे करणे, केवळ विडंबनावर भरोसा आणि स्वत:वरच विनोद करण्यातून आपण किती स्वतंत्र आहोत, असे भासवण्याचा केलेला खटाटोप.
काय करणार अशा पांचट आणि पोकळ देखाव्यापुढे आपण? एक खरेय की, फार उत्तम विनोद अशा टीव्हीमधून अपेक्षित नाही. जशा उत्तम कथा आणि उत्कृष्ट अभिनय या बाजाराधिष्ठित टीव्हीकडून सादर होणार नाही, तसेच विनोदाच्या बाबतीत. शिवाय विनोदनिर्मितीला आणि विनोद-स्वीकृतीला एक निरोगी, बिनविषारी राजकीय-सामाजिक वातावरण लागते ते वेगळेच. हास्यविनोद, टिंगलमस्करी, उपहास अशा गोष्टी द्यायला-घ्यायला एक मन लागते. ते ‘मन की बात’ म्हणत आपलेच रेटणारे असल्यावर काय करायचे? हुकूमशहांना कुठे विनोद अन व्यंगचित्रे आवडतात? त्यामुळे गेली सहा वर्षे मराठी टीव्हीवरचा विनोद कमालीचा शाब्दिक पात्रांनी पात्रांची उणीदुणी काढणारा आणि फार म्हणजे फार कर्कश, कंठाळी होऊन बसलाय. आक्रस्ताळेपणा (सोशल मीडियावरचा) या टीव्हीतल्या विनोदी मालिकांतही झिरपावा याला काय म्हणावे? चापट्या मारणे, हाणामारीचे आवेश अंगी आणणे, झोंबाझोंबी करायच्या तयारीत असणे, असे सारे मर्यादातिक्रम या विनोदी मालिकांत जसेच्या तसे अवतरताना आढळतात.
..................................................................................................................................................................
हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये खरेदीसाठी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5282/Hasanyawari-Neu-Naka
..................................................................................................................................................................
अशा कथानकांची सवय झालेल्यांना २२ जानेवारीच्या रात्री गांधीजींचे तत्त्व घेऊन विनोदनिर्मितीचा एक प्रयोग बघावा लागला. अर्धा फसला, अर्धा ठीक होता. कारण ज्या कारणांसाठी महाराष्ट्राच्या हिंदुत्ववादी मर्दांनी गांधींचा सदैव उपमर्द केला, तेच या स्किटच्या (इंग्रजीत ‘स्किट’चा अर्थ चेष्टा करणारे छोटे नाटक) म्हणजे चेष्टकाच्या मर्मस्थानी आले. क्रोधावर प्रेमाने विजय मिळवावा, त्यासाठी दुसरा गालही पुढे करावा, कुणाला आनंद मिळत असेल तर मार खावा, आपण हात उगारूही नये इत्यादी खास बदनाम गांधीवादी तत्त्वे या चेष्टकात होती.
ते स्किट असे – एक तरुणी गांधीवादी असल्याचे दाखवायला तिच्या हातात एक अज्ञात पुस्तक आहे. म्हणून ती गांधीवादी आहे. ती ज्याला आवडते असा एक तरुण तिच्यासाठी गांधीवादी व्हायला तयार होतो आणि एका मवाल्याचा मार खात त्याला अन तिला प्रेमाने जिंकतो. अहिंसा जीवनमूल्य व्हायला त्याची कशी सवय करायला हवी, असा एक पाठ ती तरुणी त्या तरुणाला देते. तो ‘हो’ म्हणतो. झाला दहा-बारा मिनिटांत गांधीवादी तयार! ‘आमचे सावरकरसुद्धा सांगा’ असा दबाव या कार्यक्रमाच्या निर्मात्यांवर यायला सुरुवातही झाली असेल.
एका तरुणीने आपल्याशी मैत्री करावी, यासाठी विनोदी शैलीत मार खात आणि मनावर ताबा ठेवत गांधीवादी होणारा तरुण अर्थातच नावीन्य म्हणून खपून गेला. पण मार खाताना दुसराही गाल पुढे करत राहावा, हे तत्त्व सावरकरांनी हिंदुत्ववादी आणि संघाने घडवलेले हिंदुत्ववादी यांनी कायम झिडकारलेले आहे. त्याची टिंगलटवाळीही केलेलीय. मुख्य म्हणजे अशा विनोदी कार्यक्रमांचा बव्हंश प्रेक्षक हिंदुत्ववादी असून भाजपचा मतदार आहे. कारण एकीकडे सरकारी दबाव जसा असतो, तसा प्रेक्षकांचाही असतो. कधी हा प्रेक्षक आपल्या आवडीनिवडी कळवतो, कधी त्या सर्वेक्षणांमधून जाणून घेतल्या जातात. पाचपेक्षा अधिक वर्षे चाललेल्या विनोदी मालिका बंद पडलेल्या नाहीत. नाव, अभिनेते, वाहिन्या व प्रायोजक बदलून त्या पुन्हा पुन्हा सादर होत आहेत. याचा अर्थ प्रेक्षकांची मर्जी, मते आणि कल सांभाळूनच सारा कार्यक्रम आखला व मांडला जातो.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
मर्दानगी, आक्रमकता, धर्मप्रेम, परधर्मद्वेष आणि राष्ट्रवाद यांची विचारधारा आज भारतावर राज्य करते. तीनुसार विनोदात हे विचार कसे पाझरतात ते या चेष्टकात आपल्याला स्पष्ट दिसते. बडे उद्योगपती, भांडवलदार, जमीनदार, अधिकारी, श्रीमंत, सत्ताधीश, राजकीय नेते, नोकरशहा, धर्मगुरू, व्यापारी आदी अभिजनांवर अशा प्रहसनांत मुळीच विनोदनिर्मिती नसते. शोषक व पिळवणूक करणारी ही पात्रे कधीही त्यांच्या मूळ रूपात पुढे आणलेली नाहीत. मग या चेष्टकांत असते कुणाची टिंगल? तर अवघे दुर्बल, असहाय, एकाकी आणि कष्टकरी आदींची. सामान्य माणसाची चित्रणे या नावाखाली तमाम बारीक नागरीक या टिंगलटवाळीच्या केंद्रस्थानी असतो. किरकोळ चोर, पाकिटमार, हवालदार, वॉचमन, कारकून, विद्यार्थी, वृद्ध-वयस्क, रुग्ण, सेल्समन, ग्रामीण, खानावळवाला, नोकर, छोटे कलावंत, उभरते गायक, रोजंदारीवरचे नट, कवी, शिक्षक, अर्धशिक्षक, अल्पशिक्षित, चणेवाला, पाणापुरीवाला, लेखक, मुलाखतकार, वन्यप्राणी, खेडूत, झोपडपट्टी रहिवासी, पत्रकार, कवी, कवयित्री, सरपंच, महिला, लठ्ठ बायका, प्रेमात पडलेली मुले-मुली, व्यवसाय न चालणारा डॉक्टर असे कैक. सगळी पात्रे आपल्या अवतीभवती आहेत, अशी रंगवलेली, मात्र आवर्जून सारी हतबल, असहाय, दुबळी आणि पेचात पडलेली.
तसे पाहिल्यास जगभरच स्टँडअप कॉमेडीयन, वन मॅन ह्यूमरस शोज, विडंबनकार, टीव्ही मालिका, चित्रपट, वेबमालिका यांची भरमार छोट्या-बड्या माध्यमांमधून होते आहे. भारतही त्यात मागे नाही. मात्र याबरोबरच अशा कार्यक्रमांतील कलावंत, लेखक व निर्माता यांना अटक करणे, त्यांच्यावर गुन्हे नोंदवणे आणि त्यांच्यामागे भक्तसंप्रदायाची पगारी झुंड सोडणे हेही सर्रास सुरू आहे. यातही भारत मागे नाही. म्हणजे ‘विनोद अथवा मस्तरी आमची करू नका, इतरांची करा’, असा उघड संदेश सत्ताधारी नेते व पक्ष देत आहेत. संघपरिवार तर विनोदाला आणि थट्टेला चार हात दूर ठेवणारा. स्वत:वरचे विनोद तर या परिवाराला फार म्हणजे फार वर्ज्य! यांच्या टोमण्यात, टीकेत अन प्रतिक्रियेत विखार असतो. त्याचे कारण हे लोक स्वत:वर हसत नाहीत. आपण ब्रह्माच्या मुख्यातून जन्मलो असल्याने आपले पावित्र्य व उच्चत्व टिंगलीसाठी असूच शकत नाही, असा त्यांचा भ्रम गेल्या सहा वर्षांत पक्का झालाय. पण यांना छोट्यांची मस्करी आवडते. संघाच्या शाखांत वयाने लहान, नवख्या आणि अशक्त स्वयंसेवकाची सदैव थट्टा चालू असते. कारण काय? करणारे अभिजन आणि धष्टपुष्ट असतात.
गांधीजी अशा परिवाराचे शत्रू. त्यांनी प्रेम व अहिंसा यांची सांगड घालून सामान्य माणसाला समोरच्याला जिंकण्याचा मार्ग दाखवला. पण संघाला हे दौर्बल्याचे प्रतीक वाटले. संघ बलोपासना करत असतो. संघाची लाठी व गांधीजींची काठी यांत फार फरक आहे. त्यामुळेच गांधीजी एक तर या मालिकेत फार अप्रस्तुत वाटले आणि ज्यांच्यासाठी ते चेष्टक करवले त्यांना ते विचित्र वाटले. या मालिका कायम दुबळ्यांची टवाळी करत असताना दुबळ्यांची शस्त्रे अशी समोर आल्याने अवघे प्रेक्षक गांगरले असतील. बिचारे हिंदुत्ववादी!
..................................................................................................................................................................
‘खिंडीत’ : शैक्षणिक जगताच्या अंतरंगाची विरूपता भेदकपणे उलगडणाऱ्या कथा
हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये ऑनलाईन खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5254/Khindit
..................................................................................................................................................................
विनोदाच्या निमित्ताने आजच्या समाजातील सत्तासंबंध, शोषण आणि सत्ता गाजवण्याची माध्यमे या मालिका दाखवत असतात. त्यामुळे विनोदाला थोडे राजकीय वळण द्यायचा प्रयत्न केला की, तो वैयक्तिक होत असतो. उगाच एखाद्या व्यक्तीचा रोष ओढवून घ्यायचा अन तो सारे सरकार आपल्यामागे लावून द्यायचा असे भय लेखक अन कलावंत सतत बाळगत असतील तर काय करायचे? दौर्बल्य आणि दोष सत्ताधाऱ्यांत असतात. ते हुकूमशहा, पंतप्रधान, मुख्यमंत्री अशा साऱ्यांत असतात. पण ते दाखवणे त्यांना आवडत नसते. कारण त्यांनी आपली प्रतिमा शक्तीमान, निर्दोष, अजेय, अढळ अशी केलेली असताना एखादा विनोद जर त्या प्रतिमेला तडा देणारा ठरला तर?
हेच त्यांचे भय असते. म्हणून त्यांना सेन्सॉरशिप, बंधने, मर्यादा या गोष्टी आवडत असतात. छोट्या माणसांची फजिती, त्यांची एखाद्या बलदंड व्यक्तीकडून होणारी घुसळण त्यांना फार आवडते. प्रत्येकाला आपली अशी फजिती, फसगत अन मजा होऊ नये असे वाटणे म्हणजेच आपण अभेद्य व निर्दोष असल्याचा आभास होत राहणे. आपले कोणी काही बिघडवू शकत नाही, ही भावना किती सुखावणारी असते…
अरुण कदम आणि पंढरीनाथ (पॅडी) कांबळे या अतिसामान्य चेहऱ्यांना राजाचा पोशाख चढवून त्यांची झालेली मजा बघायला कोणाला नाही आवडणार? राजबिंड्या, देखण्या, धिप्पाड व सवर्ण राजाची मस्करी करायला कोण धजावणार? नाही का? ज्याची थट्टा झालीय तो राजा आहे, पण प्रत्यक्षात तो राजासारखा नाही, हे समाधान किती छान आहे! सामान्यांना राजेपद मिळाले तरी ते फजितच पावणार, कारण आम्हीच सत्पात्र आहोत, असा विचार बलवानांच्या मनात आणि ‘मन की बात’मध्ये येतच असेल ना?
हसण्यात निर्मळपणा असतो, तसा विद्रोहसुद्धा असतो. विनोद निष्कपट असतो अन भयंकर हादरे देणाराही असतो. खो खो हसणारे हुकूमशहा पाहिलेत कधी? खदाखदा हसून जमिनीवर लोळण घेतलेला एखादा तरी एकतंत्री राज्यकर्ता पाहिला कधी? शक्यच नाही. कारण विनोद नेहमीच दुहेरी असतो. स्वीकारण्यांच्या मनावर अवलंबून असते तो अस्सल आहे की मारका.. म्हणून बड्यांची टिंगल करतोय अशा आविर्भावात थट्टा केली जाते ती छोट्यांची अन दुबळ्यांची. गांधीजींना घेऊन विनोदनिर्मिती करायचीच होती तर सत्य, सत्याग्रह, पारतंत्र्य यांपासून सुरुवात करता आली असती. खुद्द गांधीजी भरपूर मस्करी करत. हास्यविनोदात ते चांगले रमत. त्यांचे हसरे बोलणे कोण विसरेल?
सगळ्या स्किटस या सिटकॉम्स म्हणजे सिच्युएशन कॉमेडीच असतात. ना वेशभूषा, ना नेपथ्य, ना मेकअप, ना अंधार! अशा मोजक्या व माफक सजावटीत ही चेष्टके चालतात. टीव्हीला या सिटकॉम्सनी खूप नफा मिळवून दिला. थोडक्यात मनोरंजन हा प्रकार टीव्हीच्या छोट्या पडद्याला शोभतो. साहजिकच त्यांची उथळपणा, हालचाली आणि शब्दबंबाळ मांडणी करावी लागते. पण नेमका राज्यकर्ता वर्ग आणि त्याचा पक्ष कमालीचा थिल्लर, भाषणबाज व सोहळेबाज असेल तर त्याची दखल विनोदाच्या माध्यमातून का नाही घ्यायची? दोन्ही रूपे क्लॅश होतात की काय? खरे तर उलट आहे. कंठाळी राजकीय संस्कृती कंठाळ अन शब्दबंबाळ माध्यमावरच जगते. डोनाल्ड ट्रम्प यांचा अवतार आणि त्यांची समाप्ती अशाच रूपांत झालेली आहे. भारतात मात्र ती टिकून, खिळून आहे. गंमत आहे!
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
योगी आदित्यनाथ, नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस या घमेंडखोरांना अद्दल शिकवायला त्यांच्यावर केले जाणारे विनोद पुरेसेत. पण तसे घडणार नाही. सत्याग्रहाला बसलेल्या शेतकऱ्यांना ‘हट्टी’, ‘अडेलतट्ट’, ‘बिनकामाचे’, ‘ताठर’ वगैरे म्हणणारे हीच विशेषणे भाजपच्या या नेत्यांना का नाही चिकटवत? केजरीवाल, लालू प्रसाद यादव, नीतीशकुमार, उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी अशा लोकप्रिय नेत्यांची सदानकदा खिल्ली उडवली जाते. मात्र उपरोल्लेखित चौघे आणि नड्डा, गडकरी, राजनाथ, तोमर, गोयल, इराणी यांसारखे उपनेते कितीदा टीव्हीच्या पडद्यावर या मालिकांमधली थट्टा उडवलेली पात्रे बनले? बनतील तरी का?
शक्यच नाही. कितीतरी व्यंगचित्रे यांची काढली गेली आहेत. पण जे माध्यम आधीच दुबळे झालेलेय, त्याकडे कोणाचे लक्ष जाणार? ज्यावर हा पक्ष जगतोय, त्यातच शिरून त्यांची स्किट जोवर केली जात नाही, तोवर यांची घमेंड उतरणार नाही!
..................................................................................................................................................................
लेखक जयदेव डोळे माध्यम विश्लेषक आहेत.
djaidev1957@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment