अजूनकाही
जलालुद्दीन रूमीची कविता आहे -
Don't insist on going where you think you want to go. Ask the way to the spring.
(तुमची इच्छा आहे तिकडे जाण्याचा आग्रह धरू नका. वसंत ऋतूला रस्ता विचारा आणि तो सांगेल तिकडे जा.)
पुण्याच्या आजूबाजूच्या टेकड्यांवरचा सगळा आसमंत बहरून गेला आहे. ग्लिरिसिडियाच्या बहराने. याचे मराठी नाव ‘गिरिपुष्प’. फिकट गुलाबी, जांभळ्या आणि पांढऱ्या रंगांचा बहर. नाजूक फुलांचा. तेजस्वी अशा तपकिरी रंगांच्या जाडसर बाह्यकोषांतून तजेलदार पाकळ्या बाहेर येतात. अशा नाजूक फुलांचे घोसच्या घोस नाजूक हिरव्या छड्यांवर आकारतात. या छड्या असमानात झेप घेत आहेत असं वाटत राहतं.
माझ्या मते बहराचे खरे रंग चारच - लाल, गुलाबी, सोनेरी आणि गडद पिवळा. झाड बहराच्या क्षणांसाठी जगत असते असे मला वाटते. नाहीतर बाकीच्या झाडाकडे वर्षभर कोण बघतो. पळसाला फुले नसतील तर तो किती जणांना ओळखू येईल?
गिरिपुष्प! खरं तर किती साधं झाड! काळसर पांढऱ्या खोडांचे फनगाडे. त्यांना फुटलेल्या तसल्याच रंगांच्या फांद्या. त्या फांद्यांना काटकोनात फुटून वर जाणाऱ्या उपशाखा. सगळी रया एखाद्या ऊंच पण किरट्या पोराची. पानेसुद्धा छोटी छोटी. अगदी साधी. चारचौघात अगदीच उठून न दिसणारी.
गिरिपुष्प हा पानझडी प्रकारातला वृक्ष असल्याने वर्षातले आठ महिने त्याला पाने नसतातच. थोडक्यात सांगायचे तर सुख थोडे दुःख फार - असला सगळा प्रकार! अजून थोडक्यात सांगायचे तर या झाडाचे सगळे आयुष्य माणसाच्या आयुष्यासारखे आहे. माणसाचे नीरस आयुष्य सुरूच असते, पण या नीरस आयुष्यात प्रेम आले की, माणूस कसाही असला तरी झगमगून उठतो. त्याचप्रमाणे वसंत ऋतूची चाहूल लागली की, हा वृक्ष बहराने अचानक झगमगून उठतो.
जानेवारी आला की, सगळा माहौल बदलतो. गिरिपुष्पाला गुलाबी बहर येतो. काळ्या काटकुळ्या उपशाखांवर हिरव्या रसरसलेल्या छड्या उभारून येतात. त्यांना पहिल्यांदा हिरव्या नाजुक कळ्या लागतात. त्यातून पिंक आणि लायलॅक रंगांच्या पाकळ्या उमलून येतात. खरं तर पिंक आणि लायलॅक रंगांच्या मधलीच कुठलीतरी छटा असते ही. पाकळीच्या मध्यभागी फिकट पांढरा रंग असतो. फुलाच्या तळाला फिकट पिवळ्या रंगाचा एक ठिपका असतो. बाह्यकोशाचा चमकता ब्राऊन ते फिकट पिवळा ते फिकट पांढरा ते लायलॅक ते पिंक असा सगळा रंगसोहळा फक्त दोन-दोन सेंटिमीटरच्या फुलामध्ये रेखाटला गेलेला असतो. अशा चिमुकल्या अतीव सुंदर फुलांचे घोसच्या घोस नाजूक हिरव्या छड्यांवर लगडतात. त्या सौंदर्यासह त्या छड्या असमानात झेप घेत आहेत असं वाटू लागतं. एक झाड बहरेपर्यंत इतर अनेक झाडे बहरतात. सगळे रान गुलाबी होते.
चतुःश्रृंगीच्या टेकडीवरून पश्चिमेच्या बाजूच्या उतारावर आलं की, समोर वेताळ टेकडीचा चढ दिसतो. परवा मी चतुःश्रृंगीच्या उतारावरून उतरू लागलो तर डाव्या बाजूला दोन्ही टेकड्यांवर सगळीकडे गुलाबी रंगाची म्हणा, लायलॅक रंगाची म्हणा - अतीव सुंदर उधळण झाली होती. गुलाबी रंगाचे विरळ विरळ ढग दोन्ही टेकड्यांवर उतरले होते. बघत राहावे असे दृश्य.
काही लोक टेकडीवर होते, पण कुणाचं लक्ष नव्हतं त्या दृश्याकडे. का असावं? कुणाला ६.२ वेगानं दहा किलोमीटर पूर्ण करायचे होते. कुणाला टेकडी आठ मिनिटांत चढून जायची होती. कुणाला अजून कसली महत्त्वाकांक्षा होती, कुणाला अजून कसली चिंता होती. निसर्गाकडे कुणी बघावंच का?
मला कुसुमाग्रजांचा किस्सा आठवला. कुसुमाग्रजांना एक नाशिककर म्हणाला – ‘मी सगळे आयुष्य नाशिकमध्ये काढले आहे, पण तुम्ही गोदावरीची सुंदर वर्णनं केली आहेत तशी गोदावरी मला एकदाही दिसली नाही.’ कुसुमाग्रज म्हणाले – ‘अहो, मी तुम्हाला कविता देऊ शकेन, काव्यदृष्टी कशी देऊ?’
इथे तर गुलाबी ढगांची गंगा पसरलेली दोन्ही टेकड्यांच्या उतारावर! तेवढ्यात एका लहान मुलाचं त्या पिंक ढगांकडं लक्ष गेलं. त्यानं आईला विचारलं की, हे काय आहे? आई म्हणाली - चेरी ब्लॉसम! रेनर मारिया रिल्केची एक कविता आहे –
It is spring again. The earth is like a child that knows poems by heart.
(आला वसंत फिरून पुन्हा एकदा. पृथ्वी बनली एखाद्या लहान मुलासारखी, ज्याच्या हृदयात राहायला आलेल्या असतात सुंदर सुंदर कविता…)
बहर, बहार, वसंत, कविता, कवी, काव्यदृष्टी, नजाकत आणि प्रेम सगळं एकमेकांशी कुठल्यातरी अदृश्य धाग्यांनी बांधलं गेलेलं असतं.
बाशो मात्सुओची चेरी ब्लॉसमवर एक हायकू आहे -
How many, many things
They call to mind
These cherry-blossoms!
(किती किती आठवणी उमलत राहतात चेरी ब्लॉसमच्या बरोबरीने…)
एवढे सुंदर दृश्य दिसले की, पहिल्या प्रेमाची आठवण येणार, डोळ्यांची पहिली भेट आठवणार. प्रेमाचा सगळा गाव आठवणार. अजून खूप काही आठवणार. हिंदी कवी रघुवीर सहाय यांनीसुद्धा लिहिले आहे -
वही आदर्श मौसम
और मन में कुछ टूटता-सा :
अनुभव से जानता हूँ कि यह वसंत है
मनात आठवणींचे वारे येत राहतात. वनातून चालत राहणं होतं. सूर्य मावळलेला असतो. गडद संधिप्रकाशात गिरिपुष्पाची पिंक आणि लायलॅक झाडे आता डार्क व्हायोलेट कलरची दिसू लागलेली असतात. ही एक नवीनच जादू…खाली पाहावे तर लाल मतीत ब्लॉसमच्या गुलाबी आणि पांढऱ्या रंगाच्या नाजूक पाकळ्या सर्वत्र विखुरलेल्या असतात. काही नाजूक पाकळ्या गरगरत खाली येत असतात. हा बहर नक्की कुठल्या रंगाचा आहे? आता चंद्र वर आल्यावर तो कुठल्या रंगाचा होईल?
Petals falling
unable to resist
the moonlight
Sakura, sakura
they fall in the dreams
of sleeping beauty
सांध्य-प्रकाशातील व्हायोलेट झाडांमुळे सगळं जग स्वप्निल झालेलं असतं. चंद्रप्रकाशात ब्राइट पिंक रंगांची चेरीची झाडं नक्की कुठल्या रंगाची होत असतील? रात्र झाल्यावर चांदण्याच्या स्पर्शांमुळे चेरी ब्लॉसमच्या पाकळ्या गळून पडत आहेत, असं यासो बुसानला जाणवू लागतं. चांदण्याच्या स्पर्शानं साकुराच्या, म्हणजे चेरी ब्लॉसमच्या पाकळ्या पडतात ते थेट निद्राधीन सौंदर्यवतींच्या स्वप्नांमध्ये जाऊन! बहर, बहार, वसंत, कविता, कवी, काव्यदृष्टी, नजाकत आणि प्रेम या सगळ्यामध्ये आता सौंदर्य आणि स्वप्नं येऊन पडतात. चेरी ब्लॉसमच्या स्वप्नात जाऊन पडणाऱ्या पाकळ्यांसारखी.
गिरिपुष्पांच्या किडकिडीत खोडांवर आता फुलांच्या गुलाबी ढगांच्या बरोबरीने आता एवढे सगळे उतरलेले असते. त्या वनामधून फिरत राहावेसे वाटते. एका एका झाडाच्या बहराकडे बघत बसावेसे वाटते. अनेक सुंदर मुलींमध्ये एखादी अतीव सुंदर मुलगी असावी, त्याप्रमाणे त्या सौंदर्याने नटलेल्या झाडांमध्ये एखादे झाड परफेक्ट सौंदर्याने नटलेले असते.
त्याच्या भरारून आलेल्या फांद्या जास्त भरदार असतात. त्या झाडाचा बहर सर्वांगाने एकसारखा बहरलेला असतो. त्या झाडाचा आणि त्या बहराचा आकार मोराच्या पिसाऱ्यासारख्या परफेक्ट अर्धगोलाकार असतो. त्याच्या फुलांचे घोस जास्त घट्ट बांधलेले असतात. त्याच्या फुलांचे रंग जास्त ब्राइट असतात. एवढेच कशाला - ते झाड आपण मावळत्या सूर्यप्रकाशात कुठल्या अँगलने सुंदर दिसू याचा हिशोब करून उगवलेले असते.
‘द लास्ट सामुराई’ या सिनेमातला मुख्य सामुराई कात्सुमोटो म्हणतो -
The perfect blossom is a rare thing. You could spend your life looking for one, and it would not be a wasted life.
(परफेक्ट बहर सहसा बघायला मिळत नाही. परफेक्ट बहराच्या शोधात तुम्ही तुमचे सगळे आयुष्य घालवू शकता. आणि तरीही, ह्या शोधात तुमचे आयुष्य वाया गेले असे तुम्हाला कधी वाटणार नाही)
कात्सुमोटो हे म्हणतो आहे, त्यामागे फार वेगळा विचार आहे. झाडांमध्ये जसे बहराचे आयुष्य तसे माणसाच्या आयुष्यात सामुराईचे आयुष्य. बहराला ग्रेस असते, बहराकडे अभिजात लावण्य आणि लालित्य असते. बहर ही विकासाची शेवटची पायरी असते. त्याच्या पुढे फक्त फळ असते म्हणजे पुढची पिढी असते. जीवनाचे पुढचे आवर्तन असते. आधीच्या पिढीचा शेवटचा, सुंदर आणि परफेक्ट टप्पा म्हणजे बहर. कात्सुमोटोला बहराचे आकर्षण त्याचसाठी आहे. कात्सुमोटो साठी बहर ही सर्वोच्च अवस्था आहे. बहर म्हणजे परफेक्शन - परिपूर्णता!
कुठलाही सामुराई स्वतःला परिपूर्ततेकडे नेत राहतो. आत्मसन्मान, अभिजात ज्ञान, अभिजात कला आणि अभिजात युद्धकला यांना त्याने जीवन मानलेले असते. यातली एक जरी गोष्ट आयुष्यात राहिली नाही तरी सामुराई आपला मृत्यू झालेला आहे असे मानतो. तो स्वतःला संपवून टाकतो. जीवनाच्या या संपवण्याला ‘सेप्पुकू’ म्हणतात. जीवनातील लावण्यावर आणि लालित्यावर प्रेम करत करत सामुराईने स्वतःला मृत्यूच्या भीतीच्या पलीकडे नेलेले असते. बहरातली एखादी पाकळी, आपले अभिजात लावण्य न गमावता ज्या सहजतेने जमिनीवर पडते, त्या सहजतेने सामुराई आपली ग्रेस न गमावता मृत्यूला कवटाळतो आणि जमिनीवर पडतो. युद्धातला मृत्यू असो वा अजून कुठला, ग्रेस महत्त्वाची. म्हणून कात्सुमोटोला परफेक्ट चेरी ब्लॉसमचे आकर्षण!
क्षणभंगूर आयुष्यात ग्रेस टिकवायची म्हणजे काही सोपे काम नाही. काळ्याकभिन्न मृत्यूच्या दाढेत जायचं ते नव्या पिढीला जन्म देऊन आणि ते सुद्धा स्वतःचा आत्मसन्मान न गमावता! इंग्रजी कवी पर्सी बिश शेलीलासुद्धा हीच गोष्ट जाणवली आहे. त्याच्या ‘म्युटॅबिलिटी’ (‘क्षणभंगुरता’) या कवितेत तो लिहितो -
The flower that smiles to-day
To-morrow dies;
All that we wish to stay
Tempts and then flies.
What is this world's delight?
Lightning that mocks the night,
Brief even as bright.
आज आनंदाने हसणारे फूल उद्या मृत्यूच्या मिठीत जात असते. आपल्याला जे जे आपल्याजवळ राहावेसे वाटत असते, ते थोड्याच काळात आपल्यापासून उडून जात असते. मानवी जीवनाची एकंदर अशी अवस्था असेल, तर मग या जगातला सर्वोच्च आनंद कुठला? शेली उत्तर देतो - काळरात्रीला हसणाऱ्या विजेचा आनंद सर्वोच्च. क्षणभंगूर असले, तरी काळाच्या दाढेत प्रवेश करत असताना चमकून जाणारे विजेचे आयुष्य हे सर्वोच्च आयुष्य! तीच गोष्ट कात्सुमोटोची आणि तीच गोष्ट पिंक आणि लायलॅक रंगांनी डोंगरचे डोंगर रंगवून टाकणाऱ्या बहराची!
बहरलेल्या गिरिपुष्पाच्या रानातून फिरताना एक एक करून कविता आठवत राहतात आणि बहरावर एक एक पक्षी उतरत जावा, तसे एक एक उदात्त तत्त्व उतरत जातं. आता त्यात अभिजात लालित्य, परिपूर्णता आणि मृत्युंजयता ही तत्त्वे उतरून येतात. बहर हे फक्त डोळ्यांचे सुख न राहता सर्वोच्च जीवनानुभवाचे प्रतीक बनून जाते. कात्सुमोटो जगत असतो कारण त्याची तलवार, ती तलवार चालवण्याची कला आणि त्याचा आत्मा हे सर्व एकत्व पावलेले असतात. इथे तर बहर, कविता, परिपूर्ण आयुष्य आणि परिपूर्ण मृत्यू हे सर्व एक झालेले असते.
संध्याप्रकाश संपून गेलेला असतो. वाऱ्याची एक झुळूक येते. आपल्या खांद्यावर दोन पाकळ्या येऊन पडलेल्या आहेत, असा भास मला होतो. त्या अंधारात मी बसून राहतो. ‘कुठे जायचे असेल तर रस्ता वसंत ऋतुला विचारा’ असे जलालुद्दीन रूमी का म्हणाला, हे मला थोडे थोडे उलगडू लागलेले असते.
..................................................................................................................................................................
लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.
sjshriniwasjoshi@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment